शिवकल्याण : (सु. १५६८–१६३८). मराठी संतकवी. मराठवाड्यातील आंबेजोगाई हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. हे घराणे नाथसंप्रदायी आणि विठ्ठलभक्त होते. शिवकल्याणांनी नित्यानंदैक्यदीपिका ह्या ग्रंथात आदिनाथापासून सुरू असलेली आपली गुरुपरंपरा सांगितली असून, ती पाहता मुक्ताबाईपासून शिवकल्याण हे चौदावे पुरुष येतात. त्यांचे वडील त्रिमल ऊर्फ नित्यानंद हे त्यांचे गुरूही होते. भागवताच्या दशमस्कंधावरील शिवकल्याणी ही विवरणात्मक टीका (अध्याय ९० ओव्या ४४,१५३) आणि नित्यानंदैक्यदीपिका ही श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृतावरील (अमृतानुभव) ६,४१० ओव्यांची सविस्तर टीका (रचना १६३५) ही त्यांची ठळक ग्रंथरचना होय.
आपल्या शिवकल्याणी ह्या ग्रंथात त्यांनी श्रीकृष्णावताराचे रहस्य सांगितले असून कृष्णलीलांचा परमार्थपर अर्थ लावला आहे. ‘शृंगाररसचि शांतिरसे मांडिला’ अशी भूमिका त्यांनी घेतलेली असून प्रापंचिकांचे मन परमेश्वराकडे वळवावे, कामक्रोधांपासून परावृत्त होऊन त्यांना नित्यानित्यविवेक सुचावा आणि ब्रह्मात्मैक्य वृत्तीचा अनुभव यावा, असा हेतू त्यांनी मनाशी बाळगलेला आहे. ह्यातील तत्त्वचिंतनावर आणि भाषेवर ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. ह्या ग्रंथातील ‘कृष्णजन्म’, ‘रासपंचाध्यायी’ आणि ‘वेदस्तुति’ एवढा भाग छापून प्रसिद्ध झाला आहे. ह्या ग्रंथाची एक समग्र हस्तलिखित प्रत डॉ. वि. म. कुलकर्णी ह्यांना प्राप्त झाली आहे.
शिवकल्याणकृत नित्यानंदैक्यदीपिका ही कथाकल्पतरू ह्या प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते कृष्णयाज्ञवल्की ह्यांचे पुत्र गोपाळ ह्यांच्या प्रेरणेने लिहिली गेली. आपला ग्रंथ लिहिण्याच्या कामी शिवकल्याणांना गोपाळ ह्यांचे काही मार्गदर्शनही मिळाले. शिवकल्याणांनी श्रीज्ञानदेवांचे हृद्गत समरसतेने विशद करून अनुभवामृताचे रहस्य स्पष्ट केल्यामुळे श्रीज्ञानदेवांच्या परंपरेला उजाळा देण्याचे श्रेय एकनाथांबरोबर शिवकल्याणांनाही दिले जाते.
उपर्युक्त ग्रंथांखेरीज श्रीशंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति ह्या ग्रंथावर एक संस्कृत टीकाही त्यांनी लिहिली असून, तीस त्यांनी ‘हरिकीर्तन’ असे म्हटले आहे.
सुर्वे, भा. ग.