शिरपूर – २ : महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील एक गाव. लोकसंख्या १४,१५८ (२००१). वाशिमपासून वायव्येस २४ किमी. अंतरावर शिरपूर वसले आहे. पूर्वी परिसरातील ६० देशमुखी गावांच्या परगण्याचे प्रमुख ठाणे शिरपूर होते. प्रामुख्याने हे कृषी खेडे आहे. विड्याची पाने, ज्वारी, कापूस, नारिंगे व लिंबे ही येथील प्रमुख कृषिउत्पादने आहेत. कापूस वटणी व दाबणी उद्योग येथे चालतो. एकेकाळी गावात चार किल्ले होते. आता मात्र त्यांचे भग्नावशेष दिसतात. जैन धर्मीयांचे हे पवित्र ठिकाण असून त्याला जैनांची काशी मानले जाते. अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर, पवली दिगंबर मंदिर, विघ्नहर पार्श्वनाथ श्वेतांबर मंदिर व चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर मंदिर अशी चार प्रसिद्ध जैन मंदिरे येथे आहेत. त्यामुळे देशभरातून जैन भाविक दर्शनासाठी येथे वर्षभर येत असतात. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.
चौधरी, वसंत