शिरपूर – १ : महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६१,६८८ (२००१). धुळे शहरापासून उत्तरेस ४८ किमी. वर अरुणावती नदीच्या काठावर हे वसले आहे. १८६९ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. १८७५ व १९४७ मध्ये नदीला आलेल्या महापुरामुळे शहराची फार मोठी हानी झाली होती. याच्या सभोवतालचा परिसर सुपीक आहे. १९८५ पासून शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. कृषिमालाच्या व्यापाराचे हे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असून कापूस, मिरची, अन्नधान्ये, कडधान्ये, भुईमूग व इतर तेलबिया आणि लाकूड यांचा व्यापार, तसेच विड्या निर्मिती, कापूस वटणी व दाबणी, तेलगिरण्या, लाकूड चिरकाम हे उद्योगधंदे येथे चालतात. येथे औद्योगिक वसाहतीचीही स्थापना करण्यात आली आहे. परिसरातील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी, सोने शुद्धीकरण कारखाना यांमुळे शहराच्या विकासात भर पडली आहे. मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग येथून जातो. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी, अत्याधुनिक रुग्णालय, बागा इ, सुविधा येथे उपलब्ध आहेत. पाताळेश्वर, खंडेराय व शनी, बालाजी ही येथे उल्लेखनीय मंदिरे आहेत.

चौधरी, वसंत