शिरोडकर, विठ्ठल नागेश : (२६ एप्रिल १८९९–७ मार्च १९७१). जागतिक कीर्तीचे भारतीय स्त्रीरोगतज्ञ व शल्यक्रियाविशारद. गोव्यातील शिरोडे गावी जन्म. शिक्षण हुबळी व पुणे येथे. पुढे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम्. बी. बी. एस्. (१९२३) आणि स्त्रीरोगविज्ञान व प्रसूतिविज्ञान या विषयांत एम्.डी. (१९२७). परदेशी जाऊन एफ्. आर. सी. एस्. (इंग्लंड), एफ्. ए. सी. एस्. एफ्. आर. सी. ओ. जी. व अन्य पदव्याही त्यांनी संपादन केल्या. इंग्लंडहून परत आल्यावर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले (१९३५–५५). नंतर १९६२–६९ या काळात परदेशातही अध्यापन. ⇨ गर्भपात हा त्यांच्या खास चिंतनाचा व अभ्यासाचा विषय होता. गर्भातील बालकाचे वजन वाढले की, काही स्त्रियांत ते गर्भाशयाला न पेलल्यामुळे गर्भपात होतो. असे गर्भपात टाळण्यासाठी त्यांनी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण नवीन शस्त्रक्रिया शोधून काढली. ती शिरोडकर शस्त्रक्रिया किंवा शिरोडकर टाका (शिरोडकर स्टिच) या नावाने जगभर प्रसिद्ध झाली. या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांनाही त्यांचेच नाव देण्यात आले. फॉदरगिल या वैद्यकशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या यासंबंधातील शस्त्रक्रियेत त्रुटी होत्या. शिरोडकर यांनी शोधलेली शस्त्रक्रिया अधिक सोपी, निर्दोश, जास्त उपयुक्त, जवळजवळ रक्तस्रावरहित आहे, असा निर्वाळा न्यूटन, झॉंडिक इ. अनेक शास्त्रज्ञांनी दिला. सनत जोशी या त्यांच्या विद्यार्थ्यामुळे व नार्टर यांनी केलेल्या प्रचार-प्रसारामुळे शिरोडकरांचे हे कार्य अमेरिकेत पोहोचले. ग्रीन आर्मिटिज यांनी या शस्त्रक्रियेला ब्रिटनभर प्रसिद्धी दिली. स्त्रीरोगतज्ञांच्या तिसऱ्या जागतिक परिषदेत (१९६१) या शस्त्रक्रियेवर जगातील तज्ञांनी निबंध वाचले.
कुटुंबनियोजनासाठी फॅलोपिअन नलिकेवर म्हणजे अंडवाहिनीवर [अंडाशयातून गर्भाशयापर्यंत अंड नेणारी नलिका → अंडवाहिनी] शिरोडकर यांनी केलेल्या विविध शस्त्रक्रिया चित्रफितीद्वारे दाखवून या तंत्राचा परदेशातही प्रसार झाला. नेहमीच्या स्थानावरून खाली घसरणाऱ्या म्हणजे भ्रंश गर्भाशयावरील शस्त्रक्रियेतही त्यांचा हातखंडा होता. कर्करोगावरील त्यांच्या शस्त्रक्रियांची संख्याही लक्षणीय आहे.
वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांना संगीत, चित्रकला, गोल्फसारख्या खेळात आणि इतरही अनेक विषयांत गती आणि आवड होती. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी व पोर्तुगीज या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. कन्नड व रशियन या भाषाही ते शिकले. अनेक मानसन्मानांचे व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. पद्मभूषण हा बहुमानही त्यांना लाभला. मराठी विज्ञान परिषदेने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला (१९६७). मुंबईतील अनेक रुग्णालयांत त्यांनी तज्ञ सल्लागार व शस्त्रक्रियाविशारद म्हणून कार्य केले. ग्रँड मेडिकल कॉलेजात ते गुणश्री प्राध्यापक होते. महाराष्ट्र शासनाच्या कुटुंबनियोजन व कल्याण कार्याचे सल्लागारपद आणि भारत सरकारच्या केंद्रिय कुटुंबनियोजन मंडळाचे सदस्यत्व, मराठी विज्ञान परिषदेच्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष (१९६७) हे बहुमानही त्यांना लाभले. त्यांनी पस्तीसहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. कॉंट्रिब्यूशन टू ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनिकॉलॉजी (१९६०) हा त्यांचा ग्रंथ वैद्यकाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरला आहे.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावे संशोधन संस्था व प्रयोगशाळा उभारून त्यांचे उचित असे स्मारक मुंबई व पुणे येथे उभे करण्यात आले आहे.
कुलकर्णी, सतीश वि.