शिराळा : बत्तीस शिराळा. महाराष्ट्र राज्याचा सांगली जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. ते नागपंचमीच्या सणासाठी विशेष प्रसिद्ध आहे. लोकसंख्या १३,५९७ (२००१). हे वारणा नदीखोऱ्यात सांगलीच्या पश्चिमेस ७३ किमी. वर असून याचे प्राचीन नाव श्रीयाल असल्याचे सांगितले जाते. एका नागपंचमीच्या दिवशी नाथ संप्रदायी गुरू गोरखनाथांनी या गावात जिवंत नाग आणून गावकऱ्यांकडून त्याची पूजा करवून घेतली, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे जवळपासच्या बत्तीस गावांतील काही लोक त्यांचे शिष्य बनले. म्हणून याला बत्तीस शिराळा हे नाव रूढ झाले. नागपंचमीला येथे लहानथोर मंडळी नाग पकडून आणून त्याची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी हे सर्व नाग पुन्हा जंगलात सोडले जातात. शिराळ्याच्या आग्नेयीस गोरखनाथाचे मंदिर आहे. मंदिराजवळ गोरखचिंचेचे उपवन आहे. चैत्र महिन्यात येथे गोरखनाथाची यात्रा भरते. गावाच्या पश्चिमेस अंबाबाईचे मंदिर आहे. तोरणा नावाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या डाव्या बाजूस हनुमान मंदिर आहे. मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगतात.
शिराळा येथे प्राथमिक शाळा, दोन माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व पशुवैद्यकीय दवाखाना इ. सुविधा आहेत. येथे डाक व तार कार्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे इ. कार्यालये असून शासकीय विश्रामगृहाचीही सोय आहे. सोमवारी गावात साप्ताहिक बाजार भरतो. पितळी समया व दिवे तयार करण्याचा कारखाना येथे असून जवळच चिखलीला सहकारी साखर कारखाना आहे.
अवचट, प्र. श्री.