शॉपॅं, फ्रेदेरिक फ्रांस्वा : (२२ फेब्रुवारी १८१० –१७ ऑक्टोबर १८४९). प्रतिभाशाली पोलिश – फ्रेंच पियानोवादक व संगीतरचनाकार. जन्म पोलंडमध्ये झिलाझोवा वोला येथे. आईवडिलांमुळे  त्याच्यावरील कौटुंबिक प्रभाव फ्रेंच-पोलिश असा संमिश्र होता. त्याचे आयुष्यही अर्धे पॅरीस व अर्धे वॉर्सामध्ये गेले. त्याचे वडील वॉर्सामध्ये हिशेबनीस व शिक्षक होते. शॉपॅंने वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पियानो वादनाचा जाहीर कार्यक्रम केला व पुढल्याच वर्षी कतालानी या प्रख्यात गायकास आपल्या कौशल्याने इतके चकित केले की, त्याने शॉपॅंला एक घड्याळ भेट म्हणून दिले. पियानोवादनाचे शिक्षण शॉपँने एल्सनेर व इतर अनेकांकडे घेतले तथापि स्वत:ची मेहनत व नजर याचाच त्याला जास्त फायदा झाला, असे म्हणतात. त्याला वाचनाचा विशेष नाद नव्हता व म्हणून १८१० – २० या काळात प्रसिद्धीस आलेल्या ⇨ फ्रांट्‌स पेटर शूबर्ट वा ⇨ फेलिक्स मेंडेल्सझोन या साहित्यप्रेरित संगीतकारांपेक्षा त्याचे वळण निराळे राहिले.

शॉपॅं १८३१ साली पॅरिसला गेला. पियानोवादनाच्या शिकवण्या करणे व वादनाचे जाहीर कार्यक्रम असा त्याचा शिरस्ता राहिला. जॉर्ज सॅंड या प्रख्यात कादंबरीलेखिकेशी त्याची दहा वर्षे घनदाट मैत्री होती व तिच्या साहित्यिक गोतावळ्यात त्याची बरीच ऊठबस असे. तिच्या ल्युक्रसिआ फ्लोरिआनी या कादंबरीत त्यांच्या संबंधाचे प्रतिबिंब दिसते. याशिवाय बर्लिओझ, बालझॅक, मेरेरबीर वगैरे उल्लेखनीय कलाकारांशीही त्याची मैत्री होती. हंगेरीच्या लिस्इटशी व इटलीच्या बेलिनीशीही त्याचा संपर्क होता. बेलिनीच्या अतूट गायनशैलीच्या परिणामामुळे आपल्या पियानोलाही गावयाला लावण्याची प्रेरणा शॉपॅंला झाली. बेलिनीच्या थडग्याशेजारी आपल्याला मूठमाती द्यावी, अशी इच्छा त्याने व्यक्त केली व तसे पुढे करण्यात आले. प्रकृतीचे अस्वास्थ्य कायम राहिल्याने व पॅरिसमधील दुसऱ्या बंडाळीमुळे त्याला लंडनला पळ काढावा लागला. या अडचणी त्याच्या सांगीतिक कार्यास बऱ्याच मारक ठरल्या.

फार थोडे आयुष्य लाभूनही पियानोचा प्रतिभाशाली कवी, वादनकार व रचनाकार अशी ख्याती शॉपॅंने मिळवली. पियानो या वाद्याशी इतका एकरूप झालेला संगीतकार विरळाच. कोणताही भाव, विचार वा भावस्थिती पियानोतूनच व्यक्त करण्याचे त्याने जणू व्रत घेतले होते. अनेक छोट्या- मोठ्या रचना, २७ एतुदे, २५ प्रील्यूडस, १९ नॉक्टर्नस, ५२ माझुर्का, ३ सोनाता आणि २ काँचेटो इतका त्याचा रचनासंभार आहे. आजही त्याच्या रचनांना श्रोत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो. (पाहा : मराठी विश्वकोश : १०).

रानडे, अशोक