शिंपला : मॉलस्का हा मृदुकाय (शरीर मऊ असलेल्या) व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा संघ आहे. बायव्हाल्व्हिया हा या संघाचा एक प्रमुख वर्ग असून या वर्गात ऑयस्टर, कालव, क्लॅम, कॉकल, स्कॅलप इ. प्राणी येतात. या बहुतेक प्राण्यांना द्विपुटी (क्वचित एकपुटी वा अनेकपुटी) कठीण कवच असते. या कवचाला शिंपला किंवा शिंपा, आणि त्यात राहणाऱ्या प्राण्याला शिंपाधारी प्राणी (बायव्हाल्व्हिया) म्हणतात. लॅमिलिब्रॅंकिया (पटलक्लोम), पेलिसिपोडा (परशुपाद) किंवा आसेफाला (अकपाल वा अशीर्ष) ही या वर्गाची पर्यायी नावे आहेत.
शिंपला हा लॅमिलिब्रॅंक प्राण्यांचा बाह्य कंकाल (सांगाडा) असून सामान्यापणे तो द्विपुटी म्हणजे चलनक्षम दोन झडपांचा (पुटांचा) बनलेला असतो. उजवे व डावे ही दोन पुटे (शिंपले) वरच्या कडेवरील बिजागरी व बंध यांनी एकत्र जुळविलेली असतात. खालच्या कडेशी शिंपले अलग होऊन कवच उघडते आणि एक भाग दुसऱ्या भागाजवळ आणणाऱ्या अभिवर्तनी स्नायूंनी कवच मिटते. बरीच कवचे पूर्णतया मिटतात. काही कवचांत पश्चभागी फट राहते व तिच्यातून निनाल (प्रावाराच्या नलिका) बाहेर येतात. कधीकधी अग्रभागीही फट असते व तिच्यातून पाद किंवा सूत्रगुच्छ (शृंगमय पदार्थाच्या सुतासारख्या धाग्यांचा जुडगा) बाहेर येतो. कवचाच्या लगेच खाली शरीर झाकणारे त्वचेसारखे मांसल आवरण असते व त्याला प्रावार म्हणतात. प्रावाराचे दोन भाग (पाली) दोन शिंपल्यांत अस्तराप्रमाणे चिकटलेले असतात. प्रावाराच्या स्रावातून काँकिओलीन (शंखद्रव्य) व कॅल्शियम कार्बोनेट यांचे शिंपल्यातील थर तयार होतात. हे कवच सामान्यपणे पुढील तीन थरांचे बनलेले असते. बाहेरच्या परिकवचाचा पातळ थर काँकिओलीन या शृंगमय पदार्थाचा बनलेला असून पृष्ठभागी त्याचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो. हा थर टिकाऊ नसल्याने जीवाश्मांत (शिळारूप झालेल्या अवशेषांत) तो सहसा आढळत नाही. आतले दोन थर कॅल्साइटाचे किंवा ॲरॅगोनाइटाचे बनलेले असतात. परिकवचाच्या आतला थर सेंद्रिय पदार्थाचे वेष्टन असलेल्या कॅल्साइटाच्या सूक्ष्म स्तंभांचा बनलेला असतो. म्हणून त्याला स्तंभी थर म्हणतात. त्याच्या आतील तिसरा थर पटलित रचनेचा म्हणजे ॲरॅगोनाइटाचे व सेंद्रिय पदार्थाचे पातळ पापुद्रे एकावर एक असे रचले जाऊन तयार झालेला असतो. ॲरॅगोनाइटाच्या अतिशय पातळ पापुद्र्यांमुळे तो थर मोत्यासारखा तर जाड पापुद्र्यांमुळे पोर्सलिनासारखा दिसतो. अनेक शिंपल्यांत हा मौक्तिक थर, तर काही थोड्या शिंपल्यांत स्तंभी थर नसतो.
शिंपल्याच्या वरच्या कडेशी असलेल्या चोचीसारख्या टोकदार भागाला ककुद म्हणतात. ककुद लहान किंवा मोठे, सरळ, वक्र किंवा पीळदार असते. ककुदाजवळचा भाग प्रथम तयार होतो व नंतर शरीराची वाढ होताना कवचाचीही वाढ होते. कवचाच्या पृष्ठभागावर संकेंद्री वृद्धिरेषा असून या रेषांच्या रूपातील खुणांनी कवचात वेळोवेळी पडलेली भर कळते. शिंपल्याचा पृष्ठभाग गुळगुळीत वा खडबडीत असून त्याच्यावर संकेंद्री वा अरीय (त्रिज्यीय) रेषा, खोबणी, वरंबे, पुटकुळ्या किंवा काटे असू शकतात. शिंपल्याच्या आतील भागावर अभिवर्तनी स्नायूंचे एक किंवा दोन ठसे वा खुणा असतात. रेषेसारख्या किंवा अरुंद खोबणीसारख्या अशा खुणांना प्रावाररेषा म्हणतात व तिच्यातील वळणाला प्रावारखात म्हणतात. शिंपल्याच्या कडा साध्या वा दंतुर असतात. दोन्ही शिंपल्यांतील दात बहुधा एकमेकांत चपखलपणे बसतात. दातांचा आकार व आकारमान भिन्न असून काहींना दात नसतातही. बिजागरीनुसार या प्राण्यांचे वर्गीकरण करतात. शिंपल्यांची हालचाल घडवून काही प्राणी थोडे क्षण पोहू शकतात.
शिंपले विविध आकार व आकारमानांचे असून त्यांच्या पृष्ठभागावरील नक्षी भिन्न प्रकारची असू शकते. उदा., रेझर शिंपला लांबट, आयताकृती व हिरवट असून टॅलिन शिंपला अंडाकार, चमकदार व पातळ, ३ सेंमी पर्यंत लांब व पिवळसर किंवा गुलाबी असतो, तर व्हीनस शिंपल्यावर फिकट गुलाबी पट्टे असतात. स्कॅलॉप शिंपले सुंदर आकारांचे व रंगांचे असतात. क्रॅसॉस्ट्रिया मद्रासेन्सिस शिंपले पातळ पानांसारखे असून त्यांची आतली कडा व स्नायूंचे ठसे जांभळे असतात, तर क्रॅ. क्युक्युलेटा जातीचे शिंपले जाड व कडेशी अगदी सूक्ष्मदंती असतात. अर्थात बहुधा दोन्ही शिंपले सारख्याच आकाराचे व आकारमानाचे असतात. काहींत एक मोठा तर दुसरा लहान असतो. उदा., तळाला चिकटलेला कालवाचा शिंपला मोठा व ओबडधोबड असतो, तर सुटा शिंपला लहान आकारमानाचा असतो. विविध प्रकारच्या जीवनप्रणालींमुळे शिंपल्यांत परिवर्तने झालेली आढळतात. उदा., फोलॅस शिंपले जवळजवळ दंडगोलाकार असून जखडून राहणाऱ्या प्राण्यांचे शिंपले पाचरीसारखे असतात. खडकावर तयार होणाऱ्या ऑयस्टरच्या डाव्या शिंपल्याचा बाह्य आकार अतिशय ओबडधोबड असतो. जीवनप्रणालींनुसार अंतर्गोल, बहिर्गोल, एकाहून दुसरा अधिक बहिर्गोल, उलट्या शंकूसारखा, जवळजवळ वर्तुळाकार, पातळ व सपाट, दंडाकार व जड आणि पातळ व वजनाला हलके अशा प्रकारचे शिंपले तयार होतात. शिंपल्याची लांबी २ मिमी. ते २ मी. (ट्रिडॅकना जायजास) व वजन काही थोडे ग्रॅम ते २५० किग्रॅ. असू शकते.
बायव्हाल्व्हियांचे जीवाश्म मुख्यतः शिंपल्यांच्या व शिंपल्यांवरील स्नायूंच्या ठशांच्या रूपात आढळतात. बिजागरीची वैशिष्ट्ये, स्नायूंचे ठसे व प्रावाररेषा यांच्यानुसार या जीवाश्मांचे वर्गीकरण करतात. यांचे सर्वांत जुने जीवाश्म सु. ५४ कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. काही जीवाश्मांचा कालनिदर्शक जीवाश्म म्हणून उपयोग होतो. उदा,. व्हेनेरिकार्डिया या जीवाश्माने तृतीय कल्पाचा प्रारंभ (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) सूचित होतो. बहुधा एका जातीऐवजी त्यांचा समूह कालनिदर्शक जीवाश्म म्हणून वापरतात. जीवाश्मांवरून त्या काळातील समुद्राची लवणता, तापमान यांसारखी परिस्थितिवैज्ञानिक माहिती मिळते. काश्मीरमधील मिठाचे डोंगर, ऊमिया माला, पूर्व घाटातील काही भाग येथे शिंपल्यांच्या रूपातील जीवाश्म आढळले आहेत. विपुल प्रमाणात शिंपले असलेले चुनखडकांचे थर अनेक देशांत आढळले असून ते नदीमुखांत किंवा उथळ समुद्रांत तयार झाले आहेत. उदा., मिठाच्या डोंगरातील बायव्हाल्व्हिया थर, काश्मीरमधील लॅमिलिब्रँक्स थर तसेच ऑयस्टरांचे शिंपले कठीण खडकांना संयोजक द्रव्याने चिकटविले जाऊन बनलेले ऑयस्टर किनारे वगैरे.
शिंपल्याचे अनेक उपयोग होतात, व ते गोळा करणे हा एक छंद आहे. दुर्मिळतेनुसार शिंपल्याचे मोल ठरते. अलंकार, शोभिवंत व सजावटी वस्तू (उदा., पेट्या, शिंपले जोडून वा चिकटवून बनविलेल्या बाहुल्या, प्राणी व नक्षीदार रचना), आयुधे, वाद्ये, दिव्यांचे तळ, कागदावर ठेवायची वजनदार वस्तू, उठावाचे दागदागिने, कृत्रिम मोती यांसाठी शिंपल्यांचा उपयोग होतो. [→ मोती]. प्लॅकुना ऑयस्टरचे पारदर्शक शिंपले खिडक्यांची तावदाने, दिव्यावरील शेड, तबके, पेट्या, वाडगे इ. बनविण्यासाठी वापरतात. चुना बनविण्यासाठीही शिंपले वापरतात. प्रारणाचे परिणाम तपासून पाहणे, खनिज तेलाचे पूर्वेक्षण इ. कामांसाठी शिंपल्यांचा उपायोग होतो. धार्मिक कार्यात शिंपले वापरतात. पूर्वी नाणी म्हणूनही शिंपले वापरीत, तर रोमन काळात काही पर्ल मुसेलांपासून छोटे, मूत्रपिंडाकार मोती मिळवीत असत. हर्मिट खेकडे राहण्यासाठी शिंपल्याचा उपयोग करतात.
पहा: ऑयस्टर कालव टेरेडो पुराप्राणिविज्ञान बायव्हाल्व्हिया मॉलस्का शंखशिंपल्यांचे कलाकाम.
ठाकूर, अ. ना.