शास्त्री, व्ही. एस्. श्रीनिवास : (२२ सप्टेंबर १८६९–१७ एप्रिल १९४६). भारतीय स्वातंत्र्य – चळवळीतील एक नेमस्त पुढारी व भारतसेवक समाजाचे नेते. पूर्ण नाव वलंगईमन शंकरनारायण श्रीनिवास शास्त्री. जन्म तमिळनाडूतील कुंभकोणम् – जवळच्या वलंगईमन या खेड्यात. शिक्षण बी.ए. (१९८८). पुढे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून १८९९ पर्यंत नोकरी. शास्त्री यांचे जीवन, कार्य व एकूणच राजकीय- सांस्कृतिक दृष्टिकोण यांवर गोपाळ कृष्ण गोखले यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेने शास्त्रींनी सक्रिय राजकारणात १९०७ नंतर प्रवेश केला. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनानंतर ते भारतसेवक समाजाचे अध्यक्षही झाले (१९१५–१९२७). त्यांनी सर्व्हंट ऑफ इंडिया हे साप्ताहिक सुरू केले (१९१८).
तत्कालीन मद्रास इलाख्याच्या विधिमंडळात ते सरकारनियुक्त सदस्य होते (१९१३–१९१६). तसेच व्हाइसरॉयच्या मध्यवर्ती कायदेमंडळातही त्यांनी काही वर्षे काम केले. वसाहतीच्या स्वराज्याचे ते पुरस्कर्ते होते. महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीला त्यांचा विरोध होता. त्यामुळे ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले व राष्ट्रीय उदारमतवादी संघ (नॅशनल लिबरल फेडरेशन) स्थापना करण्यात त्यांनी हिरिरीने भाग घेतला (१९१८). भारतातील ब्रिटिश सरकारच्या वतीने त्यांनी इंग्लंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड वगैरे देशांत विविध कामांसाठी दौरे केले. ब्रिटिश सरकारचे पक्षपाती म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली असली, तरी भारताला स्वराज्य हवे आहे, याचा राष्ट्रीय उदारमतवादी संघाच्या अधिवेशनात (१९२२) स्पष्ट निर्वाळा देऊन त्यांनी आपल्या टीकाकारांना गप्प बसविले. भारत सरकार व दक्षिण आफ्रिका यांच्यातील गोलमेज परिषदेत त्यांनी भाग घेतला (१९२६). त्यातून केपटाउन करार झाला. आफ्रिकेतील वर्णविद्वेषाविरुद्धही त्यांनी आवाज उठविला. तसेच केनिया व पूर्व आफ्रिकेतील अनिवासी भारतीयांना नागरी हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून दर्बान येथे शास्त्री महाविद्यालय सुरू करण्यात आले. १९३०-३१ मधील गोलमेज परिषदांना ते सरकारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना ब्रिटिश शासनाने के. सी. एस. आय. ही उपाधी दिली पण ती त्यांनी नाकारली. त्यांनी महंमद अली जिना यांनी मांडलेल्या द्विराष्ट्र सिद्धांताला विरोध केला होता (१९४५).
शास्त्री हे एक व्यासंगी विद्वान व प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे खाजगी जीवन अत्यंत साधे होते. भारतातील सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांना त्यांच्याविषयी आदर वाटत असे. मद्रास (सध्याचे चेन्नई) येथे त्यांचे हृद्शूलाने निधन झाले.
संदर्भ : 1. Jagadisan, T. N. V. S. Srinivasa Sastri, New Delhi, 1969.
2. Kodanda Rao, P. The Right Honourable V. S. Srinivasa Sastri, New York, 1963.
इनामदार, वि. बा.