शाहजहानपूर : उत्तर प्रदेश राज्यातील शाहजहानपूर जिल्ह्याचे मुख्य ठाणे व लष्करी छावणीचे ठिकाण. लोकसंख्या २,३७,७१७ (१९९१). उत्तर प्रदेशातील रोहिलखंड विभागात, रामगंगा नदीच्या दीओहा (दीओट्टा) या उपनदीच्या डाव्या तीरावर हे वसले आहे. हे लखनौपासून वायव्येस १६० किमी. अंतरावर आहे. इ.स. १६४७ मध्ये नबाब बहादूरखान याने दिल्लीच्या शाहजहान बादशाहाच्या सन्मानार्थ हे स्थापन केले. या शहराजवळच दिलेरखान व बहादूरखान यांनी राजपुतांचा पराभव केला होता. त्याच वेळी येथे एक मशीद बांधण्यात आली. येथे एक किल्लाही होता. १८६४ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. साखर, तेल, रसायने, मद्य, गालिचे इ. निर्मितीचे उद्योगधंदे येथे चालतात. आसमंतात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पादन होते. कृषिमालाच्या व्यापारासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. लखनौ-दिल्ली यांदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील तसेच लोहमार्गावरील हे एक स्थानक आहे.

चौधरी, वसंत