शास्त्रीय उपकरणे : (वैज्ञानिक उपकरणे). विज्ञान व अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांमध्ये विविध राशींच्या मापनाला फारच महत्त्व आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा जसजसा विकास होत गेला, तसतसा मापनपद्धती व मापन उपकरणे यांचासुद्धा विकास होत गेला. उपकरणांच्या मदतीने विविध प्रकारच्या राशींचे अवलोकन, मापन, गणन, नोंदणी व नियंत्रण अशी विविध प्रकारची कार्ये करता येतात. अभियांत्रिकी विषयात अनेक नवीन विभाग सुरू होत आहेत. त्यामुळे आता संवेदन, आकलन, दर्शन, श्रवण व स्मरण अशा कार्यांसाठीही उपकरणे तयार करावी लागतात.

अचूक व विश्वासार्ह उपकरणांचा उपयोग हा शिक्षण, संशोधन (मूलभूत तसेच अनुप्रयुक्त), कृषी, वैद्यकीय तसेच संरक्षण इ. क्षेत्रांत तर होतोच, परंतु मानवाच्या दैनंदिन जीवनातील गोष्टींतही या उपकरणांचा मोठ्या प्रमाणांवर वापर केला जातो. कोणत्याही मानवनिर्मित उपकरणाचे मूलभूत कार्य प्रामुख्याने मानवाच्या विविध ज्ञानेंद्रियांना व स्नायुशक्तीला मदत करून त्यांच्या कार्याचा पल्ला व व्याप्ती वाढविणे हे आहे. साहजिकच ह्या गरजेच्या पूर्ततेसाठी विविध उपकरणांची निर्मिती करण्यात आली. विविध शास्त्रांच्या प्रगतीसाठी तसेच मूलभूत व अनुप्रयुक्त शास्त्रीय संशोधनासाठी वापर करण्यात आलेल्या उपकरणांचे वर्गीकरण प्रामुख्याने ‘शास्त्रीय उपकरणे’ या सदरात करता येईल.

अलीकडच्या काळात विज्ञानाच्या झालेल्या अतिप्रचंड प्रगतीमुळे तसेच मानवी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात होणाऱ्या विज्ञानाच्या वापरामुळे शास्त्रीय उपकरणांचा वापर हा विविध उद्योगधंदे, व्यापार तसेच विविध व्यवसाय यांत केला जातो. त्यामुळे अर्थात शास्त्रीय उपकरणांची सुलभ आणि सुटसुटीत व्याख्या व वर्गवारी करणे कठीण होते. तथापि ज्या उपकरणांची रचना आणि उत्पादन करताना कौशल्य आणि कार्यानुभव यांशिवाय मूलभूत शास्त्रीय ज्ञानाची आवश्यकता असते, अशा उपकरणांना ‘शास्त्रीय उपकरणे’ म्हणता येईल. उदा., हलक्या प्रकारची कॅमेऱ्याची भिंगे मोठ्या प्रमाणावर सहज बनविता येतात तथापि उत्तम कार्य करणाऱ्या चांगल्या कॅमेऱ्याचे भिंग बनविण्यासाठी प्रकाशकीचे ज्ञान असणे आवश्यक असते आणि म्हणून अशा भिंगांचा वापर केलेला कॅमेरा हे शास्त्रीय उपकरण म्हणून संबोधता येईल.

मराठी विश्वकोशातील ‘उपकरण योजना’ या नोंदीत उपकरणांचे वर्गीकरण, उपकरणांचे गुणधर्म, उपकरण संहती व वैद्यकीय उपकरणे यांसंबंधी थोडक्यात माहिती दिलेली आहे.

इतिहास आणि प्रगती : पूर्वीच्या काळातील खगोलशास्त्रज्ञांनी अवकाशाचा आणि त्यातील वस्तूंचा वेध घेण्याच्या दृष्टीने अँस्ट्रोलेब  [⟶ वेधयंत्र] व्यतिरिक्त बऱ्याच शास्त्रीय उपकरणांचा शोध लावला. सोळाव्या शतकातील ⇨ ट्यूको ब्राए यांनी कोणादर्श, इक्वेटोरिअल आर्मीलरी तसेच ॲझीमूथल चतुर्थयंत्र यांसारख्या उपकरणांचा शोध लावला आणि त्यांच्या साहाय्याने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात पहिल्यांदा शास्त्रीय उपकरणे बनविण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात आला. यंत्राद्वारे बनविलेली शास्त्रीय उपकरणे ही अधिक अचूक व स्वस्त होती त्यामुळे साहजिकच हौशी संशोधकांमध्येही या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. या उद्योगधंद्याची वाढ आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित असल्याने सतराव्या शतकातील प्रबोधनकाळातच संघटितरीत्या उपकरणाच्या निर्मितीस सुरुवात झाली, असे म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात संशोधक स्वत:च्या प्रयोगासाठी लागणारी उपकरणे स्वतःच बनवीत असत. उदा., सर आयझॅक न्यूटन यांनी स्वतःच्या परावर्तन दूरदर्शकाचे भाग स्वतःच तयार केले. तसेच रॉबर्ट बॉइल यांनी आपल्या प्रयोगासाठी वापरलेली उपकरणे ही त्यांच्या रॉबर्ट हुक या साहाय्यकाने तयार केली होती. दूरदर्शकाच्या निर्मितीचे श्रेय विल्यम हर्शेल यांच्याकडे जाते. बऱ्याचदा नवसंशोधित शास्त्रीय घटनांच्या प्रायोगिक प्रात्यक्षिकासाठी शास्त्रीय उपकरणे बनविली जातात व कालांतराने त्या शोधाच्या वाढत्या उपयोगामुळे वा वापरामुळे या उपकरणांची उपयुक्तताही वाढत जाते. अशा वेळी ही उपकरणे प्रयोगशाळेबाहेर बनविणे जरुरीचे ठरते व उपकरणनिर्मिती हा एक उद्योग बनतो. वैज्ञानिक प्रगतीच्या सुरुवातीच्या काळात शास्त्रीय उपकरणांचा उद्योग अशाच पद्धतीने सुरू झालेला आढळून येतो. सध्या इंग्लंडमध्ये न्यूटन यांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेल्या व शास्त्रीय उपकरणांचे व्यवहार करणाऱ्या काही कंपन्या आहेत.

विजेची शास्त्रीय उपकरणे ही प्रकाशीय उपकरणांच्या मानाने आधुनिक म्हणता येतील परंतु याही बाबतीत व्यावसायिकांच्या आधी छंद असणाऱ्या लोकांनीच विजेच्या शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीचे काम अधिक केले दिसते. उदा., ⇨ बॅरन विल्यम टॉमसन केल्व्हिन यांनी अटलांटिक महासागरात संदेशवहनासाठी तारा घालण्याचे काम चालू असताना त्या कामाच्या प्रारंभिक चाचण्यांसाठी आवश्यक असणारी विजेची बरीचशी शास्त्रीय उपकरणे स्वत: तयार केली व त्यांच्या निर्मितीवर देखरेख ठेवली. त्यानंतर त्यांनी स्वत:च शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीचा उद्योग सुरू केला. त्याचप्रमाणे येना येथील जगप्रसिद्ध झाइस या कंपनीची सुरुवातही अशीच झालेली दिसते. येना विद्यापीठात संशोधन करताना ⇨अर्न्स्ट ॲबे यांना एका विशिष्ट उपकरणाची गरज होती. त्यांनी आपल्या कल्पनेनुसार ते उपकरण बनविण्यासाठी कार्ल झाइस यांना नेमले, नंतर या कामातून प्रेरणा घेऊन अँबे यांनी झाइस या नावाने मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणे तयार करण्याचा कारखानाच काढला.

शास्त्रीय उपकरणांच्या उद्योगव्यवसायाची बीजे खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीच्या काळातच रुजलेली दिसून येतात. प्रारंभी औद्योगिक क्रांतीमध्ये शास्त्रीयदृष्ट्या मुख्यतः वाहतुकीची यंत्रे व तदनंतर ग्राहकोपयोगी धंद्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची निर्मिती झालेली दिसून येते. अर्थात या गोष्टींचा उपकरणनिर्मितीच्या उद्योगधंद्यावर काही परिणाम झाला नाही. त्यानंतर हळुहळू निरनिराळ्या चाचण्या तसेच तपासण्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शास्त्रीय उपकरणांची निर्मिती झालेली आढळून येते. उदा., जमिनीच्या बिनचूक मोजमापनासाठी सर्वेक्षण उपकरणांची तसेच इंग्लंडच्या परदेशी व्यापारात झालेल्या प्रचंड वाढीमुळे नौकानयनासाठी उपयुक्त अशा अनेक उपकरणांची निर्मिती झाली. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळापर्यंत इंग्लंडमध्ये शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीकडे फारसे लक्ष दिले गेल्याचे दिसत नाही. याउलट जर्मनी आणि अमेरिका या दोन देशांमध्ये शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीचा उद्योग भरभराटीस आला होता. त्यामुळे इंग्लंडपेक्षा या दोन्ही देशांमध्ये शास्त्रीय उपकरणे फारच स्वस्त आणि चांगल्या प्रतीची मिळत होती. दोन्ही महायुद्धांच्या काळात मात्र या उद्योगाला ब्रिटिश सरकारद्वारा संशोधनविषयक आणि जकातविषयक खास सवलती देण्यात आल्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर या व्यवसायाला समाजातील सर्वच थरांतून अधिकाधिक चालना मिळत गेली. याच काळातरडारच्या निर्मितीमुळे इलेक्ट्रॉनीय व्यवसाय भरभराटीला आला आणि त्यातून मनुष्यबळाऐवजी स्वयंचलित यंत्रांचा वापर पुढे आला. त्याचप्रमाणे अनेक नवीन देश उदयास आल्याने त्यांच्या प्रगतीसाठी प्रयोगशाळा, वैद्यकीय आणि औद्योगिक उपकरणांची वाढती गरज निर्माण झाली. त्या काळात इंग्लंड जगातील जवळजवळ सर्व देशांना विजेची तसेच इलेक्ट्रॉनीय उपकरणे पुरवीत होता, असे दिसून येते. १९५५ सालानंतर शास्त्रीय उपकरण व्यवसाय व औद्योगिक उपकरण व्यवसाय यांतील परस्परसंबंध दृढ झाला. त्याचप्रमाणे शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने संपूर्ण उत्पादन प्रक्रिया स्वयंचलन पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले.


शास्त्रीय उपकरणांचे प्रकार : मराठी विश्वकोशात रासायनिक उपकरणे, वातावरणविज्ञानीय उपकरणे, विद्युत्‌ राशिमापक उपकरणे, विमानातील उपकरणे व वैद्यकीय उपकरणे अशा स्वतंत्र नोंदी आहेत. तसेच विविध शास्त्रीय उपकरणांवरील स्वतंत्र नोंदींतून त्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.  (उदा., इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, खस्वस्तिक, दूरदर्शक, रडार, सूक्ष्मदर्शक, सूक्ष्ममापक इ.). प्रारणमापन, प्रकाशमापन, तापमापन, दाब व दाबमापन, वर्णपटविज्ञान इ. नोंदींमध्येही शास्त्रीय उपकरणांसंबंधी माहिती दिलेली आहे. याशिवाय व्यवहारोपयोगी उपकरणांसंबंधीची माहिती ‘गृहोपयोगी उपकरणे’ आणि ‘व्यावसायिक व कार्यालयीन उपकरणे’ अशा स्वतंत्र नोंदींत दिलेली आहे. प्रस्तुत नोंदीमध्ये यापुढे मूलभूत राशी व त्यापासून मिळणाऱ्या साधित किंवा दुय्यम राशी यांच्या मापनाकरिता वापरण्यात येणाऱ्या काही शास्त्रीय उपकरणांची थोडक्यात माहिती दिली आहे.

लांबी, जाडी इ. : लांबी अचूकपणे मोजण्यासाठी मोजपट्टीचा उपयोग करतात. तिच्या साहाय्याने साधारणत: १ मिमी. पेक्षा जास्त लांबी अचूकपणे मोजता येत नाही. म्हणून जरूरीनुसार निरनिराळ्या उपकरणांनी अधिकाधिक अचूकपणे लांबीचे मापन करतात. रैखिक किंवा सूक्ष्म परिमाणांचे (उदा., लांबी, कोन) अधिक अचूकपणे मापन करण्यासाठी व्हर्नियर वापरतात. व्हर्नियर प्रमाणाचा वापर करणारे व्हर्नियर कॅलिपर हे एक सामान्य उपकरण आहे. या उपकरणामधील मुख्य पट्टीवरील व सरकपट्टीवरील रेषांची संख्या एकच्या फरकाने वाढवून आणि त्यांमधील अंतर सारखे करून किमान वाचन कमी करता येते आणि मोजण्यातील अचूकता वाढविता येते. याच तत्त्वाचा उपयोग चल सूक्ष्मदर्शकात करतात. त्यामुळे दोन अगदी नजिकच्या बिंदूंमधील अंतर किंवा केशनलिकेचा व्यास १०-४ सेंमी. इतक्या अचूकपणे मोजता येतो. [⟶ व्हर्नियर].

एखाद्या कागदाची जाडी किंवा तारेचा व्यास अशा प्रकारच्या मोजमापनासाठी मळसूत्राच्या तत्त्वावर आधारित उपकरण वापरतात. त्यास मळसूत्र सूक्ष्ममापक असे म्हणतात. या उपकरणात साधारणत: दोन आट्यांमधील अंतर ०-५ मिमी. असते व वर्तुळाकर मोजपट्टीवर ५० खुणा असतात. यामुळे ०.००१ सेंमी. इतक्या अचूकपणे जाडी मोजता येते. [⟶ सूक्ष्ममापक].

मळसूत्राच्या तत्त्वाचा उपयोग गोलत्वमापकातही केला जातो. या उपकरणाच्या साहाय्याने वक्र पृष्ठभागाची कोणत्याही ठिकाणी वक्रता त्रिज्या काढता येते. या उपकरणाच्या मळसूत्रावर वर्तुळाकार मोजपट्टी असते व त्यावर ५० किंवा १०० रेषा असतात. सूक्ष्ममापकाप्रमाणेच याचे वाचन करतात. [⟶ गोलत्वमापक].

एखादा पृष्ठभाग सपाट आहे का नाही हे तपासण्यासाठी निरनिराळी शास्त्रीय उपकरणे वापरतात. तबकडीदर्शक या उपकरणात दट्ट्याचे एक टोक तपासावयाच्या पृष्ठभागावरून फिरवितात. पृष्ठभागाच्या खडबडीतपणामुळे दट्ट्याचे होणारे चलन अनेक प्रकारे वर्धन करून ते वर्तुळाकर तबकडीवर मोजतात.

विद्युत्‌ तुलना यंत्र या उपकरणाचा उपयोग लांबीतील लहान बदल किंवा त्रुटी मोजण्यासाठी करतात. या उपकरणाचे स्टॅंड, दर्शक व विद्युत शक्ती पेटी असे तीन भाग असतात. या उपकरणाने दर्शकाच्या टोकाचे २ x १०-५ सेंमी. इतके सूक्ष्म चलन म्हणजेच तितका लांबीतील फरक अचूकपणे मोजता येतो.

अतिशय पातळ मुलाम्याची जाडी मोजण्यासाठी मुलाम्याच्या पदार्थानुसार उपकरणे बनवितात. एका पद्धतीने प्रकाशीय तत्त्वाचा उपयोग करून १ x १०-७ सें.मी. इतक्या अचूकपणे जाडी मोजता येते. यात विशिष्ट प्रकारे एकवर्णी प्रकाश मुलाम्यावर पाडल्यास व्यतिकरण पट्टे दिसतात. या पट्ट्यांमधील अंतर सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने मोजून मुलाम्याची जाडी काढतात. अशा प्रकारचे व्यतिकरणदर्शक उपलब्ध आहेत. दुसऱ्या पद्धतीत दिलेल्या पृष्ठभागाबरोबरच त्याच प्रकारे एका क्वॉर्ट्‌झ दोलकाच्या स्फटिकावर मुलामा चढवितात. मुलाम्याच्या जाडीनुसार त्या दोलकाची कंप्रता बदलते व कंप्रता मोजून मुलाम्याची जाडी अजमाविता येते.

वस्तुमान : वस्तुमान म्हणजे वस्तूत असलेले एकंदर द्रव्याचे माप. त्यांचे मापन त्याच्या वजनावरून करतात. तराजू हे एक शास्त्रीय उपकरणच आहे. तो परिबलाच्या तत्त्वावर चालतो. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तराजूची संवेदनक्षमता खूपच चांगली असून विशेष प्रकारात ती १ x १०-५ ग्रॅ. इतकी असू शकते. असे तराजू विश्लेषण कामात वापरतात. कमी संवेदनक्षमता असणारे व परिबल नियमानुसार चालणारे तराजू बऱ्याच वेळा वस्तुमान अंदाजे मोजण्यासाठी वापरतात (उदा., बीरेंजर तराजू). मानद वजने न वापरता परिबल नियमानुसार चालणारे तराजू मोठ्या वस्तूचे वस्तुमान काढण्यासाठी वापरतात. याशिवाय स्वयंदर्शक वस्तुमान मोजणारी उपकरणे असतात. कोणतेही वजन नसताना दर्शक शून्य मापन दर्शवितो. वजन ठेवल्यावर उपकरणातील दर्शक मोजपट्टीवर वस्तुमान दर्शवितो. याहूनही वेगळ्या प्रकारचे स्वयंदर्शक यंत्र स्थितिस्थापकतेच्या तत्त्वावर चालते. हे उपकरण म्हणजे ताणकाटा होय. [⟶ तराजू वजन यंत्रे].

काल : पूर्वी सूर्यप्रकाशातील एखाद्या वस्तूच्या सावलीच्या आकारातील बदलानुसार कालखंडाचे मापन करीत. नंतर भारतात घटिकापात्रे व युरोपात वाळूची घड्याळे वापरात होती. यामंध्ये अचूकपणा कमी असे. १५८५ साली गॅलिलीओ यांनी घड्याळात प्रथम लंबकाचा उपयोग केला. सध्या वापरात असलेल्या यांत्रिक घड्याळात गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडणाऱ्या वजनामुळे किंवा कमानीमुळे ऊर्जा मिळते व काटे निरनिराळ्या दंतचक्रांच्या साहाय्याने नियमितपणे वर्तुळाकार तबकडीवर फिरतात. विद्युत प्रकारच्या घड्याळात चाके विद्युत्‌ शक्तीमुळे फिरतात. अशा घड्याळात समकालिक चलचित्राने दंतचक्रे व त्यामुळे काटे तबकडीवर फिरतात. अलीकडे क्वॉर्ट्‌झ स्फटिक घड्याळे बनविली जातात. या स्फटिकाच्या एका दिशेत विद्युत्‌ क्षेत्र बदलले, तर दुसऱ्या दिशेत लांबीमध्ये बदल होतो. अशा स्फटिकास प्रत्यावर्ती विद्युत्‌ दाब दिल्यास त्याच कंप्रतेने त्याची लांबी कमी-जास्त होईल. त्या स्फटिकाच्या नैसर्गिक कंप्रतेइतकी प्रत्यावर्ती विद्युत दाबाची कंप्रता असल्यास एक स्थिर दोलक बनतो. या दोलकाच्या साहाय्याने समकालिक चलित्र चालवून नेहमीप्रमाणे दंतचक्रांच्या योजनेने घड्याळाचे काटे फिरविले जातात. [⟶ घड्याळ काललेखक].


वेग : वेग म्हणजे एकक कालखंडात एखाद्या वस्तूचे होणारे स्थानांतर. ठराविक अंतर कापण्यास लागणाऱ्या वेळावरून वेग मोजता येतो. वेग कमी असल्यास साधी पट्टी व घड्याळ यांच्या साहाय्याने वेग सहज मोजता येतो, परंतु वेग जास्त असल्यास तो केवळ घड्याळाच्या साहाय्याने अचूकपणे मोजता येत नाही. केवळ संशोधन किंवा अभ्यासासाठी वेग मोजण्यासाठी विद्युत्‌ पद्धतीवर अवलंबित उपकरणे वापरतात.

वाहनाचा वेग मोजण्यासाठी वाहनावर वेगमापक हे उपकरण बसविलेले असते. वाहनाच्या चाकाकडून घर्षणाने तारेच्या साहाय्याने एक लहानसे चाक फिरविले जाते. वाफेच्या एंजिनातील नियामकाप्रमाणे केंद्रोत्सारी प्रेरकानुसार या उपकरणाचे कार्य चालते. दुसऱ्या प्रकारच्या वेगमापकात एक लहान तारेचे वेटोळे बसविलेले असून ते चाकाबरोबर चुंबकीय क्षेत्रात फिरते. त्यामुळे चाक फिरण्याच्या वेगानुसार विद्युत दाब निर्माण होतो. वेटोळ्याकडून आलेल्या दोन तारा व्होल्टमापकाला जोडलेल्या असतात. व्होल्टमापकाचे योग्य प्रकारे इयत्तीकरण केल्यास हा वेगमापक वाहनाचा वेग दर्शवितो.

विमानाचा हवेतील वेग मोजण्यासाठी पिट्ट नलिकेचे तत्त्व वापरलेले असते. या उपकरणात ‘यू’ नलिकेमध्ये सोयीस्कर द्रव भरून नलिकेच्या एका बाजूला ज्यातून हवा झोत येत आहे, ती जोडलेली असते, दुसऱ्या बाजूला हवेचा दाब असतो. दोन्ही बाजूंतील दाबांनुसार ‘यू’ नलिकेतील दोन्ही बाजूंतील द्रवाच्या पातळीत फरक पडतो. हा फरक विमानाच्या वेगानुसार बदलतो. ‘यू’ नलिकेवरच योग्य इयत्तीकरण केल्याने एकदमच विमानाचा वेग समजतो. याच तत्त्वावर बोटीचा पाण्यावरील वेग मोजता येतो. [⟶ वेगमापक].

दाब : दाब म्हणजे एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने होणारी प्रेरणा. हवेचा दाब मोजण्यासाठी सोयीनुसार विविध शास्त्रीय उपकरणे वापरली जातात. हवेच्या दाबातील बदलावरून पावसाळी वाऱ्यांसंबंधी अनुमान काढता येते. अनेक शास्त्रीय प्रयोगांत हवेचा दाब माहीत असणे जरुरीचे असते. तो मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्टिन वायुभारमापक वापरला जातो. निर्द्रव (ॲनोरॉइड) वायुभारमापक या उपकरणाच्या योग्य इयत्तीकरणाने कोणत्याही स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची समजते. या प्रकारच्या उपकरणास उच्चतामापक असे म्हणतात. बूरदाँ दाबमापक या उपकरणाने  वातावरण दाबाच्या काही भागांपासून ते २,००० पट या दरम्यान दाब मोजता येतो.

एखाद्या बंदिस्त अशा भागातील दाब अनेक उपकरणांच्या साहाय्याने मोजता येतो. सर्वांत सोपे उपकरण म्हणजे ‘यू नलिका’. याच नलिकेची एक बाजू ज्या बंदिस्त भागातील दाब मोजावयाचा असेल, त्याला जोडतात व दुसरी वातावरणाकडे उघडीच असते. नलिकेत सोयीस्कर द्रव भरलेला असतो. एक मिमी. (पारा) पर्यंत दाब ‘यू नलिका’ पद्धतीने मोजता येतो. एक टॉरपेक्षा कमी दाब मोजण्यासाठी मॅक्लॉडदर्शक वापरतात. याचे कार्य बॉइल नियमानुसार चालते.

तपयुग्म दाबमापकात एक तपयुग्म धातूच्या एका नळीत बसविलेले असते. ही नळी ज्या विभागातील दाब मोजावयाचा असेल त्याला जोडतात. या दाबमापकाने साधारणत: १०० टॉरपासून १०-३ टॉरपर्यंतचा कमी दाब मोजता येतो. याहून कमी दाब मोजण्यासाठी आयनीकरण दाबदर्शक वापरतात. या प्रकारच्या दाबमापकात काही फेरफार करून १०-६ टॉर इतक्या कमी दाबापर्यंत दाब मोजता येतो. [⟶ दाब व दाबमापन].

तापमान : जवळजवळ सर्व शास्त्रीय प्रयोगांत व कारखान्यांत तापमान मोजणे व त्या तापमानानुसार कृती करणे आवश्यक असते. तापमानानसुर पदार्थाचे काही गुणधर्म बदलतात. ते मोजून त्यावरून तापमान मोजले जाते. पाऱ्याच्या तापमापकात एका टोकाला काचेचा पोकळ गोळा असलेली केशाकर्षण नळी असून त्यात पारा भरलेला असतो व नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते. तापमानानुसार पदार्थाचे प्रसरण घडते. पाऱ्याच्या बाबतीत हे प्रकरण बरेच नियमित घडते. पाऱ्याच्या गोठणबिंदूपेक्षा कमी तापमान मोजावयाचे असल्यास पाऱ्याऐवजी अल्कोहोलाचा तापमापक वापरतात व त्याहूनही कमी तापमान मोजावयाचे असल्यास वायूचे तापमापक वापरतात. वातावरणाच्या अभ्यासासाठी सिक्स यांचा कमाल व किमान तापमापक वापरतात. तापमान मोजण्यासाठी बऱ्याच वेळा तपयुग्माचा उपयोग करतात. अशा प्रकारच्या उपकरणाने १५००° से. पर्यंत तापमान मोजता येते. तापमान वाढले असता सर्व धातूंचा विद्युत्‌ रोध वाढतो. या गुणधर्माचा उपयोग प्लॅटिनमरोध तापमापकात करतात. फार उच्च तापमान मोजावयाचे असल्यास (उदा, भट्टी) उत्तापमापक वापरतात. याचे दोन प्रकार आहेत. पहिला संपूर्ण उत्सर्जन उत्तापमापक व दुसरा प्रकाशीय उत्तापमापक. दुसरा प्रकार जास्त प्रचलित असून त्यामुळे तापमानही जास्त अचूकपणे समजते. [⟶ तापमापन].

घनता : एकक आयतनाच्या (घनफळाच्या) वस्तूचे वस्तुमान. अनेक शास्त्रीय प्रयोगांत व व्यवहारात निरनिराळ्या पदार्थांची घनता काढणे आवश्यक असते. ती अनेक पद्धतींनी काढता येते आणि त्यांनुसार अनेक प्रकारची उपकरणेही आहेत. आर्किमिडीज तत्त्वाचा वापर करून बनविलेले तरकाटा हे एक अगदी सुटसुटीत शास्त्रीय उपकरण आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या प्रकारच्या तरकाट्याने फक्त द्रवाची घनता मोजता येते. व्यवहारात दुधाची शुद्धता, दारूतील मद्यार्कप्रमाण, विद्युत घटमाला (बॅटरी) भारित झाली किंवा नाही वगैरे गोष्टी तपासता येतात. निकलसन तरकाट्याचा उपयोग द्रवाचे विशिष्ट गुरुत्व काढण्यासाठी करतात. [⟶ द्रव घनतामापक].

श्यानता : द्रायूमधील निरनिराळ्या पातळ्यांमधील घर्षण म्हणजे श्यानता. श्यानता अनेक उपकरणांनी मोजतात. द्रवाची श्यानता ‘यू’ नलिका श्यानतामापकाने काढतात. श्यानता जास्त असल्यास सर्ल यांच्या एक-अक्ष दंडगोल श्यानतामापक या उपकरणाने ती काढता येते. पडता गोल श्यानतामापकामध्ये द्रवात ठरावीक अंतरातून कायम वेगाने जाण्यास लगाणाऱ्या वेळावरून व गोळीच्या त्रिज्येवरून स्टोक यांच्या नियमानुसार श्यानता काढता येते. वायूंची श्यानता काढण्यासाठी निराळ्या पद्धती वापरतात (उदा. रॅंकिन श्यानतामापक).  [⟶ श्यानता].

आर्द्रता : वातावरणात हवेबरोबर पाण्याचे बाष्प असते. हवेत प्रत्यक्ष असलेले बाष्प व ती हवा संपृक्त होण्यासाठी लागणारे बाष्प यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. या सापेक्ष आर्द्रतेवर बाष्पीभवनाचा वेग, हवामानाचे अंदाज, कापसाच्या धाग्याचे गुणधर्म वगैरे अवलंबून असल्याने निरनिराळे कारखाने, हवामान खाते, कापडाच्या गिरण्या वगैरे ठिकाणी आर्द्रतामापक हे उपकरण वापरतात. [⟶ आर्द्रता].

ध्वनी : ध्वनिशास्त्रीय उपकरणांचे दोन प्रकार पाडता येतील. पहिल्यात कंप्रता, तीव्रता व तरंगप्रकार हे ध्वनीचे गुणधर्म अभ्यासण्याची उपकरणे व दुसऱ्यांत ध्वनीचे पुनरुत्पादन करणारी निरनिराळी उपकरणे येतात. ⇨ ध्वनिग्राहकाच्या साहाय्याने ध्वनितरंगांचे विद्युत्‌ तरंगांत रूपांतर करून त्यांचे वर्धन करतात. त्यानंतर ऋणाग्र दोलनदर्शकाने ध्वनीची कंप्रता व तरंगाकार समजतात. ध्वनीच्या तीव्रतेचे निरपेक्ष मापन रॅली तबकडी या उपकरणाने करतात. ध्वनीमध्ये निरनिराळ्या कंप्रतेचे घटक असल्यास त्याचे पृथक्करण ध्वनीय वर्णपटमापकाने करतात. निरनिराळी धारित्र प्रवणता असलेली अनुस्पंदनी मंडले वापरूनही ध्वनीचे पृथक्करण करता येते. रेडिओ, ⇨ग्रामोफोन,  ⇨ध्वनिक्षेपक वगैरे ध्वनिपुनरुत्पादन करणारी उपकरणे होते. [⟶ ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन].

पहिल्या महायुद्धानंतर बोटीवरून समुद्रामधून ध्वनितरंग पाठवून समुद्राची खोली, पाणबुडीचे स्तित्व किंवा समुद्रातील अन्य अडथळे मिळविण्याच्या दृष्टीने अनेक उपकरणे तयार करण्यात आली. सुरुवातीच्या काळात कमी कंप्रतेचा ध्वनी या कामासाठी वापरला जाई परंतु हल्ली जास्त कंप्रतेचा ध्वनी वापरतात. २०,००० हर्ट्‌झपेक्षा जास्त कंप्रता असलेला श्राव्यातीत तरंग अनेक पद्धतींनी व अनेक प्रकारच्या उपकरणांनी निर्माण करतात.


प्रकाश : घड्याळजीच्या साध्या भिंगापासून ते निरनिराळे वर्णपटदर्शक, सूक्ष्मदर्शक, दूरदर्शकापर्यंत उपकरणे यांत येतात. बहिर्गोल भिंगाच्या केंद्रांतरापेक्षा कमी अंतरावर एखादी वस्तू ठेवून दुसऱ्या बाजूने पाहिल्यास मोठी प्रतिमा मिळते, वस्तूंचे बारकावे स्पष्ट दिसतात. अशा भिंगास साधा सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. एका भिंगाऐवजी दोन किंवा अधिक भिंगे विशिष्ट प्रकारे वापरून हाच परिणाम जास्त प्रकर्षाने मिळतो. यास संयुक्त सूक्ष्मदर्शक असे म्हणतात. अशा प्रकारचे सूक्ष्मदर्शक जीवशास्त्रात निरनिराळ्या सूक्ष्मरचनांचे निरीक्षण करण्यासाठी आणि वैद्यकशास्त्रात रक्त, थुंकी किंवा निरनिराळे स्राव तपासण्यासाठी वापरतात. प्रकाशाय सूक्ष्मदर्शकाची विभेदनक्षमता ठरावीक मूल्यापेक्षा जास्त वाढविता येत नाही. यासाठी साध्या सूक्ष्मदर्शकाच्या तत्त्वावर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार करण्यात आला. या उपकरणात विद्युत्‌प्रवाह तारेतून पाठवून इलेक्ट्रॉन निर्माण करतात व खूप विद्युत दाब देऊन त्यांना वेग दिला जातो. हे वेगवान इलेक्ट्रॉन तरंगाचे गुणधर्म दर्शवितात. या उपकरणाच्या साहाय्याने ५ ते १० Å (१ Å = १०-८) इतकी कमी विभेदनक्षमता मिळू शकते तसेच ६,००० ते ७,००० पट वर्धन होऊ शकते. या प्रकारच्या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग व्हायरस, स्फटिकरचना, स्फटिकदोष यांच्या अभ्यासामध्ये होतो. [⟶ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शक].

दूरची वस्तू स्पष्ट दिसावी म्हणून दूरदर्शक वापरतात. प्रणमनीय दूरदर्शकात पदार्थाकडून येणारे प्रकाशकिरण बहिर्गोल भिंगावर पडतात व प्रणमनाने प्रतिमा मिळते. या उपकरणाचा उपयोग प्रामुख्याने आकाशातील ग्रह, तारे, वगैरे पाहण्यासाठी केला जातो. पृथ्वीवरील वस्तू पाहण्यासाठी दूरदर्शकातील नेत्रिका व वस्तुभिंग यांच्या दरम्यान आणखी एक भिंग घालून प्रतिमा मूळ वस्तूप्रमाणे दिसते. एका दूरदर्शकाऐवजी दोन डोळ्यांना दोन दूरदर्शक लावल्यास दूरची वस्तू स्पष्ट दिसतेच शिवाय त्रिमितीय परिणाम मिळतो आणि त्यामुळे वस्तूच्या खोलीची कल्पना येते. या उपकरणास द्विनेत्री दूरदर्शक असे म्हणतात. या उपकरणाचा उपयोग दूरचा प्रदेश न्याहाळण्यासाठी, क्रिकेट वा अन्य खेळ पाहण्यासाठी होतो. दूरचे तारे बघण्यासाठी किंवा त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी परावर्तनीय दूरदर्शक जास्त सोयीस्कर असतात. या उपकरणात नेत्रिकेऐवजी विशिष्ट प्रकारचा कॅमेरा वापरून छायाचित्र घेता येते.

साधारणतः सर्व प्रकारच्या प्रकाशांत निरनिराळ्या तरंगलांबींचे घटक असतात. या तरंगलांबी पाहण्यासाठी वर्णपटदर्शक व त्या तरंगलांबींचे मापन करण्यासाठी वर्णपटमापक वापरतात. यामध्ये लोलक एका तबकडीवर ठेवलेला असतो व दूरदर्शक या तबकडीच्या मध्याभोवती फिरविता येतो. या उपकरणास लोलक वर्णपटमापक असे म्हणतात. याच रचनेत लोलकाऐवजी विवर्तनजालक विशिष्ट प्रकारे वापरल्यास उपकरणाची विभेदनक्षमता बरीच वाढते. स्थिर विचलन वर्णपटमापक या उपकरणात दूरदर्शक स्थिर ठेवलेला असतो व निरनिराळ्या तरंगलांबींच्या रेषांचे वाचन करण्यासाठी लोलक एका दंडगोल मळसूत्राच्या साहाय्याने फिरविता येतो. [⟶ वर्णपटविज्ञान].

साधा प्रकाशकिरण जर निर्काल लोलक किंवा अन्य ध्रुवणकारकातून पाठविला, तर त्या प्रकाशाचे ध्रुवीकरण होते. असा प्रकाश क्वॉर्ट्‌झ, साखरेचा विद्राव, मद्यार्क वगैरे पदार्थांतून पाठविल्यास कंपनप्रतलाचे परिवलन होते. या आविष्काराचा उपयोग करून ध्रुवणमापक हे उपकरण बनविण्यात आले. या उपकरणाच्या साहाय्याने उसाच्या निरनिराळ्या नमुन्यातील साखरेचे प्रमाण, दारूतील मद्यार्काचे प्रमाण तसेच काही पदार्थांची शुद्धता इ. गोष्टी अजमाविता येतात. [⟶ ध्रुवणमिती].

वरील उपकरणांव्यतिरिक्त प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी निरनिराळे प्रकाशमापक, पाणबुडीतून समुद्रावरील वस्तू किंवा बोटी पाहण्यासाठी ⇨ परिदर्शक, दूरच्या दोन पदार्थांनी निरीक्षकाच्या स्थितीशी केलेला कोन व त्या कोनावरून त्या दोन पदार्थांची अंतरे किंवा निरीक्षकाचे स्थान निश्चित करण्यासाठी ⇨ कोणादर्श वगैरे अनेक प्रकाशीय उपकरणे निरनिराळ्या क्षेत्रांत वापरली जातात.

विद्युत् : सध्या जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या उपकरणांत विद्युत् उपकरणांचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग करतात. या उपकरणांमध्ये विद्युत्‌ प्रवाहमापक, विद्युत्‌ दाबमापक, जनित्रे, रोहित्रे वगैरे उपकरणांचा अंतर्भाव होतो. १८८८ पर्यंत फक्त विद्युत्‌ प्रवाहमापक हे एकच उपकरण वापरात होते परंतु त्यानंतर अनेक उपकरणांचे शोध लागले. चल, वेटोळे गॅल्व्हानोमीटरच्या [⟶ गॅल्व्हानोमीटर] साहाय्याने १०-६ अँपिअर इतका क्षीण प्रवाह मोजता येतो, हा विद्युत्‌ प्रवाहमापक जरी संवेदनाक्षम असला, तरी तो एके ठिकाणाहून दुसरीकडे सहज हलविता येत नाही. म्हणून कमी संवेदनाक्षम परंतु सुटसुटीत व सुवाह्य विद्युत्‌ प्रवाहमापक बनवितात. अतिशय क्षीण विद्युत् प्रवाह मोजावयाचा असल्यास त्याचे निरनिराळ्या इलेक्ट्रॉनीय मंडलांच्या साहाय्याने वर्धन करून शेवटी चल वेटोळे विद्युत् दर्शकाच्या साहाय्याने मोजला जातो. तसेच काही रोध जोडून व निरनिराळी इलेक्ट्रॉनीय वर्धन मंडले वापरून जरूरीप्रमाणे निरनिराळे विद्युत् प्रवाहमापक व विद्युत् दाबमापक अन्य उपकरणांत आणि अनेक गुंतागुंतीच्या यंत्राच्या कार्याचे किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरतात. बऱ्याच भौतिकी गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी किंवा भौतिकी क्रिया निरीक्षणासाठी त्या क्रियांचे विद्युत् शक्तीत रूपांतर करून त्याचे अंतिम गणन विद्युत् प्रवाहमापकाच्या किंवा विद्युत्‌ दाबमापकाच्या साहाय्याने करतात. प्रकाशविद्युत् घटावर प्रकाश पाडून विद्युत् मंडळात वाहणारा विद्युत् प्रवाह मोजतात व त्यावरून प्रकाश-तीव्रता आजमावली जाते. विद्युत् दाबमापकाच्या साहाय्याने उच्च तापमान मोजता येते. प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह किंवा विद्युत् दाब  मोजण्यासाठी निरनिराळ्या तत्त्वांवर आधारित उपकरणे वापरतात.

इलेक्ट्रॉनीय उपकरणे : इलेक्ट्रॉनीय तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या उपकरणांत उपयोग केला जातो. प्रत्येक शास्त्रात कोणत्या तरी इलेक्ट्रॉनीय तत्त्वांचा वापर केलेला असतो. इलेक्ट्रॉनीय उपकरणांत निरनिराळ्या प्रकारचे विवर्धक येतात. त्यायोगे अगदी लहान विद्युत्‌ संकेताचे विवर्धन होऊन जरूरीप्रमाणे त्याचा विद्युत् दाब किंवा प्रवाह वाढविला जातो. इलेक्ट्रॉनीय आंदोलकामुळे विद्युत आंदोलने निर्माण करता येतात [⟶ आंदोलक, इलेक्ट्रॉनीय]. ह्या आंदोलनांचा उपयोग संदेशप्रसारण, संदेशग्रहण, श्राव्यातीत आंदोलननिर्मिती अशा अनेक प्रकारे होतो. निरनिराळ्या प्रकारची द्वारमंडले वापरून अनेक गणितीय कृत्ये भराभर करता येतात. अशी छोटी गणनयंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. याचाच पुढचा प्रकार म्हणजे संगणक होय. ऋणाग्र किरण तरंगदर्शकाच्या साहाय्याने निरनिराळे तरंगप्रकार तपासता येतात. तसेच प्रत्यावर्ती किंवा एकदिश विद्युत् दाब मोजता येतो. या उपकरणाने अगदी लहान कालखंडही मोजता येतो. काही मंडलांच्या साहाय्याने एखाद्या भौतिक क्रियेचा विद्युत स्पंद बनवून त्या क्रियेची मोजदाद अगदी सहजपणे करता येते. अशा प्रकारचे गणित्र अनेक शास्त्रांत वापरले जातात.

प्रारण : अणुकेंद्रीय प्रयोगांत किंवा विक्रियकांत प्रारणे निर्माण होतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी ती निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने मोजतात उदा., वायू आयनीभवन नलिका किंवा गायगर गणित्र, चमचम किंवा स्फुल्लिंग गणित्र. काही उपकरणांत किरणोत्सर्गी  समस्थानिकाचा वापर करून निरनिराळ्या पत्र्यांची जाडी अचूकपणे मोजता येते, तसेच द्रवाचा वाहण्याचा वेग व भूगर्भशास्त्रीय कालखंड मोजता येतात.


भारतातील शास्त्रीय उपकरण उद्योग : कोलकाता येथे १८३० साली मॅथेमेटिकल इंस्ट्रुमेंट्‌स ऑर्गनायझेशन या नावाने स्थापन झालेल्या (सध्याचे नाव नॅशनल इन्स्ट्रुमेंट्‌स लि.) कंपनीद्वारा भारतात प्रथम शास्त्रीय उपकरण निर्मितीच्या उद्योगास सुरुवात झाली. गंगा नदीच्या कालव्याचे काम चालू असताना १८५० साली रूडकी येथे सर्वेक्षण आणि आरेखनासाठी लागणारी उपकरणे तयार करण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात शास्त्रीय उपकरणांचा उद्योगधंदा वाढीस लागला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस हारगो लाल यांनी अंबाला येथे प्रथम शाळेसाठी व नंतर महाविद्यालयांसाठी लगाणारी साधी आणि सोपी शास्त्रीय उपकरणे बनविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे रूडकी इंजिनिअरिंग कॉलेजमधील व्याख्याते वेणीमाधव मुखर्जी यांनी काचेची उपकरणे बनविण्यास सुरुवात केली आणि १९१० साली रूडकी येथे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट कंपनी काढली. १९१९ साली ओरिएंटल सायन्स इन्स्ट्रुमेंट्‌स वर्कशॉप हा कारखाना अंबाला येथे सुरू झाला. १९२५ साली वाराणसी येथे बनारस बॅलन्स वर्क्‌स हा शास्त्रीय तराजू बनविण्याचा कारखाना सुरू झाला. १९२२ साली एन्. एम्. आठवले यांनी पुणे येथे चलरोधक, रोधपेट्या, विविध प्रकारचे विद्युत् सेतू तसेच चलसूक्ष्मदर्शक बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्याच सुमारास आंध्र प्रदेशातील मच्छलीपटनम्‌ येथे अय्यागिरी राममूर्ती यांनी शास्त्रीय उपकरणे बनविण्यासाठी आंध्र सायंटिफिक कंपनी सुरू केली. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात (१९५६-५७ ते १९६०-६१)  या व्यवसायाच्या विकासाला गती मिळाली. याच काळात कोलकाता येथील नॅशनल इन्स्ट्रुमेंट्‌स फॅक्टरीचे सरकारीकरण करण्यात येऊन लखनौ येथे गव्हर्न्मेंट प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट फॅक्टरी ही नवीन सरकारी कंपनी सुरू करण्यात आली. याशिवाय याच काळात प्रामुख्याने आंध्र सायंटिफिक कंपनी (मच्छलीपटनम्‌), बार्टन अँड सन्स प्रायव्हेट लि. (बंगलोर), स्टॅंडर्ड सायंटिफिक कंपनी (चेन्नई), हारगो लाल अँड सन्स (अंबाला), सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्‌स कंपनी (अलाहाबाद), ॲसोसिएटेड इन्स्ट्रुमेंट्‌स मॅन्युफॅक्चरर्स (मुंबई) इ. नवीन कंपन्या उदयास आल्या. १९५९ साली शास्त्रीय उपकरण उद्योगाची सर्वांगीण प्रगती आणि विकास करण्याच्या दृष्टीने भारत शासनाने डी. जी. टी. डी. (डायरेक्टोरेट जनरल ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट) हे एक स्वतंत्र संचालनालय सुरू केले. या संचालनालयाकडे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस या उद्योगधंद्यातील ३७ विविध कंपन्यांची नोंद झाली होती.

तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये शास्त्रीय उपकरण निर्मितीच्या उद्योगधंद्यांना केंद्र शासनाने चंदीगढच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्‌स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ) या संस्थेतर्फे चालना दिली. याच काळात सोव्हिएट रशियाच्या आर्थिक आणि तांत्रिक पाठबळाच्या जोरावर राजस्थान आणि केरळ राज्यांत सीएसआयओ सारख्या दोन संस्था कार्यान्वित झाल्या.

भारत शासनाने १९६७ साली हा उद्योग पहिल्या ५९ अग्रक्रम उद्योगाच्या यादीत अंतर्भूत केला. १९६९ साली डी.जी. टी. डी. या संचालनालयाकडे जवळजवळ ५२ मोठ्या शास्त्रीय उपकरण उद्योग कंपन्यांची नोंद झाली होती. याशिवाय १९६८ सालापर्यंत विविध राज्यांच्या उद्योगधंदे संचालनालयाकडे ६५० छोट्या कंपन्यांची नोंद झाली होती. विविध राज्यांत कार्यरत असणाऱ्या पण रीतसर नोंद न झालेल्या सु. ४०० लघुउद्योग कंपन्या शास्त्रीय उपकरणांचे उत्पादन करीत होत्या.

स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिकीकरणास शासकीय स्तरावर सातत्याने मिळत गेलेले पाठबळ आणि आयात करांद्वारे परदेशी स्पर्धेपासून मिळालेले संरक्षण ह्यांमुळे भारताची औद्योगिक क्षेत्रात प्रगती अखंडितपणे चालू राहिली होती. त्याचप्रमाणे डी.जी.टी.डीद्वारे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना निरनिराळ्या क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या संधींबाबतही मार्गदर्शन मिळाल्यामुळे जेथे उत्पादनांना मागणी होती, अशा क्षेत्रांत केलेल्या गुंतवणुकींमुळे उद्योजकांचाही फायदा होत होता परंतु कालांतराने अप्रत्यक्ष करांद्वारे संरक्षण देण्याची प्रणाली अवाजवी पद्धतीने वापरली जाऊ लागली व आयात कर प्रचंड प्रमाणात वाढले आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची उत्पादने स्पर्धेत मागे पडू लागली. तसेच अंतर्गत बाजारात उत्पादने महाग झाली. डी.जी.टी.डी.द्वारे केलेले नियंत्रण हे उपक्रमशीलतेला मारक झाले होते व ज्यांनी आधीच उद्योगधंदे काढले होते त्यांना अवाजवी संरक्षण प्रदान करीत होते.

इ.स. १९८० नंतर जागतिक स्तरावर औद्योगिक विश्वात फार झपाट्याने बदल होत गेले. चीनसारख्या तुल्यबल मोठ्या देशातच नव्हे तर एशिअन ( ASEAN द ॲसोसिएशन ऑफ साउथ – ईस्ट एशिअन नेशन्स) ह्या आग्नेय आशियातील देशांनी स्थापलेल्या व्यापारी संघटनेतील छोट्या देशांचाही आर्थिक प्रगतीचा वेग भारताच्या आर्थिक प्रगतीच्या दुप्पट-अडीचपट झाला होता. १९८० च्या उत्तरार्धात मंत्रालयीन (डी.जी.टी.डी) लाल फितीने व अप्रत्यक्ष करांच्या शृंखलांनी जखडलेले भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेला तोंड देण्यास असमर्थ ठरू लागले आहेत’, हे शासनाच्याही लक्षात आले. १९८६ मध्ये अप्रत्यक्ष करप्रणालीत तर्कसंगत सुधारणा करण्याची सुरुवात झाली व आयात करातही मोठ्या प्रमाणावर घट करण्यास सुरुवात १९९१ नंतर झाली. १९९०-९१ नंतर तर संपूर्ण आर्थिक क्षेत्रात व आयात-निर्यात व्यापारात उदारीकरण व सुसूत्रीकरणाचे धोरण अमलात आणले गेले. त्याचा परिणाम म्हणून भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग आधीच्या तुलनेत अडीच ते तीन पट म्हणजे ७·५ ते ८·५ टक्के ह्या मर्यादेपर्यंत पोहोचला. भारतीय बाजारपेठेची स्वत:चीच गरज मोठी असल्याने जगातील सर्व मोठे व अग्रेसर उद्योजक भारतात कारखाने काढण्यास पुढे येऊ लागले. ह्या बदलाचा दृश्य परिणाम औद्योगिक उपकरणांच्या बाबतीत प्रकर्षाने दिसून येतो. ही उपकरणे निर्माण करण्यासाठी, सातत्याने त्यांच्या चाचण्या/परीक्षणे घेण्यासाठी, त्यांचा प्रकल्पात वापर करून ती कार्यान्वित करण्यासाठी तसेच त्यांची देखभाल/दुरूस्त्या करण्यासाठी लागणारे सुशिक्षित व प्रशिक्षित मनुष्यबळ भारतात उपलब्ध होते. त्यामुळे शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीच्या बाबतीत भारताने गेल्या १९९१–२००५ या काळात लक्षणीय प्रगती केली आहे. ही प्रगती नंतरही जोरात चालू राहिली. त्यामुळे ह्या क्षेत्रात उत्पादनक्षमतेत व कक्षेत नवीन भर पडत आहे. ह्या प्रगतीचा विभागवार आढावा पुढीलप्रमाणे :

सर्वेक्षण – गणितीय आणि इतर भूमापनीय उपकरणे : शैक्षणिक तसेच बांधकाम क्षेत्रात लागणारी होकायंत्रे, पाणसळी, संतलन उपकरणे, सर्व प्रकारचे थिओडोलाइट, सूक्ष्म प्रकाशीय/लेसर प्रणाली वापरून अचूक मापन करणारी उपकरणे भारतात निर्माण केली जातात. आरेखनासाठी लागणारी कंपास, गुण्या, कोनमापक वगैरे अत्याधुनिक प्रकारात बनविली जातात. संगणकाचा उपयोग करून कॅड व कॅम (कॉम्प्युटर एडेड डिझाइन व कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग) व छपाई यंत्राचा उपयोगही व्यापक प्रमाणात होऊ लागला आहे. त्यासां लागणारी काही उपकरणे भारतात बनतात तर काही आयात केली जातात.

विद्युत्‌मापन व यांत्रिक उपकरणे : ही उपकरणे आता यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनीय तत्त्वावर चालणारी मिळू लागली आहेत. तसेच त्यांच्या उपयोगाप्रमाणे ती टेबलावर ठेवण्यासाठी अथवा चौकटीवर (पॅनेलवर) लावण्यासाठी मिळतात. त्यांचे मापनही अंकीय (डिजिटल) अथवा मापनदर्शकाद्वारे दाखविण्याची पद्धती ग्राहकाच्या गरजेनुसार द्यावी लागते. व्होल्टमापक, ॲपिअरमापक, पीएच्‌मापक, तापमापक, दाबमापक वगैरे सर्व प्रकारची उपकरणे भारतात तयार होतात.

मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण झाल्यामुळे ऊर्जामापकाची मागणी भारतात फार मोठ्या प्रमाणावर आहे. यांत्रिक ऊर्जामापकांबरोबर आता अत्यंत प्रगत अशी अनेक मापने एकाच मापकामधून मिळण्याची सोय असलेले इलेक्ट्रॉनीय मापक भारतात अनेक कंपन्या बनवू लागल्या आहेत.


औद्योगिक प्रक्रिया नियंत्रण आणि मापन उपकरणे: गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मापनाबरोबरच संवेदक उपकरणांचीही जरुरी असते. दाब, उत्ताप, दमटपणा, तापमान, वेग, वजन, ताण आदी भौतिक राशींच्या मापनाला व नियंत्रणाला लागणारी सर्व प्रकारची उपकरणे भारतात तयार होतात. त्यांचा उपयोग करून प्रक्रिया नियंत्रणाची प्रणाली तयार करण्यासाठी वापरात येणारे कार्यक्रमणयोग्य तार्किक नियंत्रकही (प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर्स) भारतात निर्माण होतात. ग्राहकाच्या जरुरीप्रमाणे संगणकाद्वारे नियंत्रित करणाऱ्या प्रणाल्यांचे अभिकल्प करून देणाऱ्या कंपन्याही भारतात आहेत. अशा प्रणाल्यांच्या सॉफ्टवेअर्सची भारतातून निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते.

वैद्यकीय उपकरणे : इलेक्ट्रॉनीय, चुंबकीय व लेसर तंत्रविद्येचा उपयोग वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणावर होत आहे. ह्या उपकरणांसंबंधी संशोधन करणे व त्यांच्या चाचण्या घेऊन त्यांना वैद्यकीय व्यवसायाची मान्यता मिळविणे हे खर्चाचे व अनेक संस्थांमधील सहकार्याचे व सहभागाचे काम असते. ह्या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोजक्याच मोठ्या कंपन्या नवनवीन मोठी उपकरणे निर्माण करतात. त्या कंपन्यांपैकी काहींनी भारतात आपले कारखाने स्थापन केलेले आहेत. शस्त्रक्रिया व निदान यांकरिता लागणारी उपकरणे भारतात अनेक कारखाने बनवीत असतात.

छायाचित्रण उपकरणे : ह्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनीय कॅमेरे (वेबकॅम वगैरे), लेसर छपाई, उच्चविभेदनक्षमता असलेली बहुरंगी छपाई वगैरेंसाठी लागणारी उपकरणे वाजवी किमतीत मिळू लागल्यामुळे एक नवेच मन्वंतर चालू झाले आहे. संगणकांप्रमाणेच ह्या क्षेत्रातही अतिवेगाने जास्त क्षमतेची दर्जेदार उपकरणे किमती न वाढताही मिळू लागतात. त्यामुळे ह्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे पण नव्या उत्पादनाची चलती फार थोडा काल असल्यामुळे ह्या कंपन्या त्यांची उत्पादन केंद्रे निरनिराळ्या देशांत वसवतात. भारतालाही ह्याचा फायदा होतो, कारण भारतात प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत. अशा कारखान्यातील उत्पादन जवळच्या बाजारपेठांत निर्यात करण्यासाठीही असते. ती प्रक्रिया सोयीची व्हावी म्हणून बऱ्याच देशांत निर्यात क्षेत्रे निर्माण केली जातात. भारतातही ही सोय उपलब्ध आहे.

संदर्भ : 1. Bartholomew, Davis, Electrical Measurements and Instrumentation, Boston, 1963.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1971.

           3. Fribance, Austin E. Industrial Instrumentation Fundamental, New York, 1962.

           4. Jones, E. B. Instrument Technology, London, 1965.

           5. Malmstadt, H. V. and others, Electronic Measurements for Scientists, California, 1974.

           6. Thomas, H. E. Clarke, C. A. Handbook of Electronic Instruments and Measuring Techniques, New Jersey, 1967.

भिडे, र. द. बोटे शशिकांत