आरसा : परावर्तनाने वस्तूंच्या प्रतिमा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाशीय साधनाला आरसा असे म्हणतात. काचेला एका बाजूने मुलामा दिलेले आरसे असतात, तसेच धातूच्या गुळगुळीत पृष्ठाचेही असतात. आरशाला दर्पण असेही म्हणतात.

काचेचे आरसे व ते निर्माण करण्याची कृती भारतीयांना प्राचीन काळापासून माहीत असावी. पण आरसे भारतात केव्हा प्रचारात आले हे निश्चित सांगता येत नाही. प्राचीन उत्खननांत जे आरसे सापडले आहेत, त्यांपैकी एक अंडाकार काशाच्या मिश्रधातूचा आहे. कुमारसंभवात शिवाने पार्वतीला एक मणिदर्पण दिल्याचा उल्लेख कालिदासाने केला आहे. आरशात माणसाचे जे प्रतिबिंब दिसते, तो माणसाचा आत्मा असतो अशी एक समजूत होती.

इट्रुस्कन, ग्रीक व रोमन लोक ब्राँझ धातूचे आरसे वापरीत. ह्या आरशाची एक बाजू किंचित बहिर्गोल व चकचकीत असे व दुसरी बाजू सपाट किंवा कोरीवकाम केलेली असे. कथिल, चांदी यांचा मुलामा देऊन सिडॉन येथे काचेचे आरसे तयार करीत असा उल्लेख प्‍लिनीने केला आहे. इ. स. पू. चवथ्या शतकातील ग्रीक आरसे सापडले आहेत. इ. स. पू. काही शतके, धातूच्या पत्र्याला चकाकी आणून तयार केलेले आरसे प्रचारात होते. हे आरसे लहान होते. पोप बॉनिफेस चौथे यांनी नॉर्थंब्रियांच्या एथेलबर्ग राणीला चांदीचा आरसा इ. स. ६२५ मध्ये भेट दिल्याचा उल्लेख आढळतो. इंग्‍लंडमध्ये अँग्‍लोसॅक्सन कालापूर्वी आरसे माहीत होते.

मध्ययुगीन कालात, काचेला धातूंचे लहान तुकडे लावून आरसे तयार करीत. १३७३ मध्ये काचेचे आरसे बनविणाऱ्यांची एक संस्था न्यूरेंबर्ग येथे होती. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस जर्मनीमध्ये बहिर्गोल आरसे बनवीत. व्यापारी पद्धतीवर आरसे बनविण्यास व्हेनिस येथे प्रथमच सुरुवात झाली. १५६४ मध्ये व्हेनिसमधील काचेचे आरसे बनविणाऱ्या कारखानदारांनी एक संस्था स्थापन केली. त्यांच्या काचेच्या आरशांमुळे धातूंचे आरसे मागे पडले. सपाट काचेचे आरसे बनविण्यास फ्रान्समध्ये १६९१ मध्ये सुरुवात झाली. १८३५ मध्ये रासायनिक पद्धतीने काचेवर चांदीचा मुलामा देण्याची पद्धत लीबिग यांनी शोधून काढली व त्यानंतर पाच वर्षांनी ती प्रत्यक्ष वापरात आली. हल्ली इटलीतील व्हेनिस शहरी व बेल्जियम देशात तयार करण्यात येणारे आरसे उत्तम प्रतीचे मानण्यात येतात.

काचेवर मुलामा देण्यासाठी पारा, कथिल, अमोनियम सिल्व्हर नायट्रेटामधील आल्डिहाइड, चांदी, सोने, प्लॅटिनम, पॅलॅडियम, ऱ्होडियम, इरिडियम, तांबे, बाष्पीकृत ॲल्युमिनियम इ. रसायने व धातू वापरतात. चकाकी चांगली येण्यासाठी तांबे-कथिल मिश्रधातूत आर्सेनिक, अँटिमनी अगर जस्त मिसळतात. चकाकी नको असल्यास, काचेला थायोयूरिया लावतात.

आरसे तयार करण्याची कृती: रासायनिक पद्धतींनी काचेवर मुलामा चढविण्याची क्रिया साधी असली तरी, ती करण्याच्या पद्धती अनेक आहेत. पंधराव्या शतकात जर्मनीत लहान आरसे बनविण्यासाठी काचेचे लहान वृत्तचितीकार गोळे फुंकून, ते गरम असतानाच त्यात अँटिमनी, कथिल, रेझीन किंवा डांबर घालीत व गोळे गार झाल्यावर ते कापून त्यापासून आरसे तयार करीत. बॅसियर, रॉशेल लवण व फॉर्माल्डिहाइड या पद्धतींनीही आरसे बनवितात. त्यांपैकी पहिल्या दोन पद्धतींनी काचेवर मुलाम्याचे थर जाड बसतात.

काचेचे आरसे बनविण्यापूर्वी काच स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते. काच स्वच्छ नसल्यास आरसे सदोष होतात. यासाठी अल्कोहॉल, ॲसिटोन, खडूची वस्त्रगाळ पूड, स्टॅनस क्लोराइड, ऊर्ध्वपातित पाणी इ. रासायनिकदृष्ट्या शुद्ध रसायने वापरली जातात. काचेवरील तेलकटपणा घालविण्यासाठी ती प्रथम अल्कोहॉल किंवा ॲसिटोनात धुतात. ती वाळण्यापूर्वी ऊर्ध्वपातित पाण्याने पुसून काढतात व नंतर खडूच्या वस्त्रगाळ पुडीने ती घासतात. नंतर स्टॅनस क्लोराइडाने काच धुतात व शेवटी ऊर्ध्वपातित गरम पाण्याने धुतात. काच धुताना रबरी हातमोजे वापरणे श्रेयस्कर असते.

काचेवर असलेले चरे, चाकावर बसविलेल्या फेल्टने रूझ चूर्णाच्या साहाय्याने काढतात. नंतर काच स्वच्छ करतात. तसेच फेल्टवरील रूझ ब्रशाने काढून टाकतात. रूझचे कण काचेवर राहिले तर आरसा बिघडतो. यासाठी काम सुरू करण्याच्या आधी १५ दिवस ब्रश रोज धुवावे लागतात. यानंतर वरील पद्धतीने काच धुतात. स्वस्त किंमतीचे आरसे बनविण्यासाठी काच रूझने घासल्यावर स्टॅनस क्लोराइड विद्रावाने धुतात.

चांदीचा मुलामा थंड पद्धतीने दिल्यास चांदीचे सूक्ष्मस्फटिक होऊन ते काचेवर चांगल्या रीतीने चिकटतात. या पद्धतीस वेळ लागतो. उष्ण पद्धतीने हे काम कमी वेळात होते. मुलाम्याची जाडी १ दशलक्षांश सेंमी. इतकी असते. मुलामा पुरेसा झाला म्हणजे काचेतून दिवा निळा दिसू लागतो. नंतर आरसा धुऊन वाळवितात व त्यावर फवाऱ्याने रंग किंवा लाख लावतात. त्यामुळे मुलाम्याचे रक्षण होते. याशिवाय चांदी ६०० से. वर तापवून मुलामा देतात.

मुलाम्यासाठी संयुगांच्या स्वरूपात प्लॅटिनम वापरतात. प्लॅटिनिक क्लोराइड किंवा क्लोरोप्लॅटिनिक अम्‍ल वापरल्यास धातू चांगली चिकटते व तीवर डाख देता येतो. मिश्रणातील ऑक्साइडामुळे ओलावा वाढतो व चिकटपणाही सुधारतो.

मोठ्या प्रमाणावर आरसे तयार करावयाच्या पद्धतीत श्रम व वेळ वाचविण्यासाठी यंत्रे वापरतात. मुलाम्यासाठी वापरावयाची रसायने महाग असल्याने ती वाया जाऊ न देणे, तसेच सांडपाणी वगैरेंमधून ती रसायने परत मिळविणे जरुरीचे असते. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो व मालाचा दर्जाही योग्य ती रसायने व तापमान वापरल्यामुळे सुधारतो.

प्रकार : अंतर्गोल, बहिर्गोल, गोल, सपाट, अन्वस्ताकृती अशा विविध आकारांचे आरसे असतात. अंतर्गोल आरसे ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शकात वापरतात. पॅलोमार येथील दूरदर्शकातील आरसा सुमारे ५१० सेंमी. (२०० इंच) व्यासाचा आहे. अशा दूरदर्शकांत वस्तुभिंगाऐवजी आरशाचा वापर करतात.

एकमार्गी किंवा अर्धपाऱ्याच्या आरशातून काही प्रमाणात प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. हे आरसे काचेवर पाऱ्याचा पातळ थर चढवून विशिष्ट कृतीने तयार करतात. अशा काचा उन्हाच्या चष्म्यात वापरतात.

गुणधर्म : आरशावरून प्रकाश परावर्तित होण्याचे प्रमाण हे आपाती किरणांचा, आरशाच्या पृष्ठभागाशी होणारा कोन, पृष्ठभागाची सफाई, आरसा कोणत्या पदार्थाचा केला आहे इ. गोष्टींवर अवलंबून असते. आरसा जितका जास्त गुळगुळीत व चकचकीत असेल तितका प्रकाश जास्त परावर्तित होतो. उत्कृष्ट आरशापासूनही प्रकाश पूर्णपणे परावर्तित होत नाही.

सपाट आरशापासून जेवढ्या अंतरावर पदार्थ असतो तेवढ्याच अंतरावर पण आरशाच्या मागे त्याची प्रतिमा दिसते. ती भ्रामक असते. पदार्थाची डावी बाजू सपाट आरशातील प्रतिमेत उजवी दिसते व उजवी बाजू डावी दिसते. पदार्थाची पूर्ण प्रतिमा पाहिजे असल्यास आरशाची उंची पदार्थाच्या उंचीच्या निमपट असावी लागते.


दोन सपाट आरसे एकमेकांना जोडल्यास त्यांमध्ये होणाऱ्या कोनानुसार कमीजास्त गुणित प्रतिमा मिळतात. दोन आरसे समांतर असल्यास तत्त्वतः अगणित प्रतिमा मिळतात.

अंतर्गोल आरशाचे केंद्र व वक्रतामध्य यांमधील वस्तूची प्रतिमा मोठी, उलटी व वक्रतामध्याच्या पलीकडे असते. केंद्र व आरसा यांच्यामधील वस्तूची प्रतिमा मोठी, सुलट व भ्रामक असते. बहिर्गोल आरशात प्रतिमा नेहमी आरशाच्या मागे व मूळ वस्तूपेक्षा लहान, भ्रामक व सुलट असते. अन्वस्ताकृती आरशात पडणारे समांतर किरण परावर्तन पावून एकाच बिंदूमध्ये एकवटतात. तसेच केंद्राजवळ ठेवलेल्या प्रकाश उद्‌गमाचे किरण आरशावर पडून परावर्तित होऊन समांतर रेषेत जातात. विवृत्तीय आरशाला दोन केंद्र बिंदू असतात. त्यांपैकी एका केंद्रापासून निघणारे किरण दुसऱ्या केंद्रात एकत्रित होतात. वृत्तचित्याकार आरशाने प्रकाशाच्या बिंदुवत उगमाची रेषाकार प्रतिमा मिळते. ही प्रतिमा वृत्तचितीच्या अक्षाला समांतर असते. अक्ष उभा असेल तर प्रतिमा उभट व बारीक आणि आडवा असेल तर प्रतिमा ठेंगणी व लठ्ठ दिसते [→ प्रकाशकी].

उपयोग : मोटार, सायकल वगैरेंच्या दिव्यातील परावर्तक अंतर्गोल किंवा अन्वस्ताकार आरशाचे असतात. प्रकाश दूरवर जावा म्हणून दिवे आरशाच्या केंद्रावर बसवितात. दंतवैद्याच्या दिव्यातही अंतर्गोल आरसा बसविलेला असतो. मोटार चालवितांना चालकाला मागील रहदारी दिसण्यासाठी बर्हिगोल आरसे वापरले जातात. चित्रपट निर्मितीतील प्रकाशयोजनेमध्ये धातूंचे सपाट आरसे वापरतात. शोधक दिव्यात अन्वस्ताकृती आरसे वापरतात. चलच्चित्रपट-प्रक्षेपक, परिदर्शक, सूक्ष्मदर्शक इ. उपकरणांतही आरसे वापरतात. झोताच्या दिव्यात व सूर्यप्रकाशावर चालणाऱ्या भट्टीत धातूंचे आरसे वापरतात. तापमानात बदल होऊन काचेचे आरसे तडकतात म्हणून ते धातूचे करतात. कॅमेरा किंवा दूरदर्शक यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या आरशांच्या काचा प्रकाशकी कामासाठी योग्य अशा निवडाव्या लागतात व त्यांवर चांदीचा किंवा दुसऱ्या योग्य धातूचा मुलामा देतात.

काही चित्रपटगृहांत ‘आरशाचा रजतपट’ (मिरर स्क्रीन) प्रयोगादाखल वापरला जात आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांत व भारतातीलही प्रमुख शहरी बँका, पोलिस कचेऱ्या, इस्पितळे यांत पारदर्शक आरसे वापरतात. त्यातून बाहेरचे दिसते परंतु बाहेरच्या माणसांना आतील व्यक्ती आपणास न्याहाळीत आहे, हे कळत नाही. अशा आरशांचा उपयोग टेहळणी करणे, हेरणे व सावध राहणे यांसाठी होऊ शकतो. पाश्चिमात्य राष्ट्रांत या पारदर्शक आरशाचा वापर घरांमध्येही सुरू झाला आहे. या आरशामुळे दार न उघडता बाहेर कोण आले आहे हे कळू शकते.

प्रसाधनासाठी सपाट आरसे फार पूर्वीपासून वापरले जात आहेत. तसेच खोल्या सुशोभित करण्यासाठीही आरसे वापरतात. मध्य प्रदेशातील इंदूर येथील आरसे महाल प्रसिद्ध आहेत.

आरसा ही आता प्रत्येक घरातील आवश्यक वस्तू होऊन बसली आहे. हॉटेले, रेस्टॉरंट्स, केशकर्तनालये, आगगाड्या, मोटारी, विमाने, सौंदर्यप्रसाधनालये किंबहुना काही कचेऱ्यांतही सर्रास आरसे आढळतात. स्त्रियांच्या पोषाखातही बारीक बारीक आरसे बसवितात. आंगठीत आरसे बसविण्याची प्रथा राजस्थान व मावळा भागात आहे. तिला आरसी असे म्हणतात.

भारतीय उद्योग: रोजच्या व्यवहारात लागणारे आरसे भारतातच तयार होतात. शास्त्रीय उपकरणांत वापरावयाचे व खास प्रकारचे आरसे आयात करतात. पूर्वी मुख्यतः बेल्जियम, जर्मनी, जपान, हंगेरी वगैरे देशांतून आरसे आयात करीत.

ज्योतिषशास्त्रीय आरसे: न्यूटन यांनी १६६८ मध्ये परावर्ती दूरदर्शकाचा शोध लावला. १८५६ पर्यंत ज्योतिषशास्त्रीय आरसे धातूंचेच वापरीत असत पण हे आरसे लवकर खराब होत व ते वारंवार स्वच्छ करणे भाग पडे, यामुळे खगोलीय वेध घेण्यात वारंवार खंड पडे. १८५६ मध्ये कार्ल आउगुस्ट फोन श्टाइनहाइल यांनी दूरदर्शकातील आरशांकरिता चांदीच्या पटलाचे योग्य असे परावर्तक पूट देण्याची पद्धत शोधून काढली. हे पटल खराब झाले, तरी अत्यंत कमी वेळात अम्‍लाच्या साहाय्याने काढून टाकता येते व त्याच्या जागी नवीन पटल रासायनिक पद्धतीने घालता येते. हल्ली पटला-ऐवजी आरशाच्या पुढील पुष्ठभागावरच ॲल्युमिनियमाचा मुलामा देण्यात येतो. हा मुलामा भौतिकीय पद्धतीने देण्यात येतो. काही वेळा प्रथम क्रोमियम व नंतर त्यावरच ॲल्युमिनियमाचा मुलामा देतात. मुलाम्याचा थर १·०२ X १०-५ सेंमी. इतक्या जाडीचा बसवितात. बहुतेक दूरदर्शकांतील आरशांच्या तबकड्या त्यांच्या स्वतःच्या वजनानेच वाकू नयेत म्हणून त्यांची जाडी त्यांच्या व्यासाच्या १/८ किंवा १/६ ठेवतात. पॅलोमार येथील दूरदर्शकाच्या आरशाची जाडी ०·६ मी., व्यास ५·१ मी. आणि वजन १३,५०० किग्रॅ. आहे. दूरदर्शकातील आरशांची वक्रता अतिशय काळजीपूर्वकपणे नियंत्रित करावी लागते कारण थोडीशीही चूक झाल्यास दोषयुक्त आरशामुळे विकृत प्रतिमा मिळण्याची शक्यता असते. काही वेळा सपाट आरसेही दूरदर्शकाच्या साहाय्यक साधनांत वापरतात [® दूरदर्शक].

अशा रीतीने प्राचीन काळापासून फक्त सौंदर्यप्रसाधनासाठीच खास वापरला जाणारा आरसा आता विविध प्रकारांनी विविध साधनांच्या द्वारे मानवाला सुखदायक व उपयुक्त बनला आहे.

गोखले, श्री. पु. शहाणे, शा. वि.