शास्त्री, के. ए. नीलकंठ : (१२ ऑगस्ट १८९२–१५ जून १९७५). एक थोर भारतीय इतिहास-संशोधक व संस्कृतचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील कल्लीडैकुरिची या गावी तेलुगू नियोगी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते. नीलकंठ शास्त्री यांचे माध्यमिक शिक्षण कल्लीडैकुरिची आणि अंबसमुद्रम्‌ येथे झाले. वडीलबंधूच्या प्रोत्साहनामुळे आणि शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य झाले. त्यांनी बी. ए. ही पदवी प्रथमश्रेणीत मिळविली. तर ए्म. ए ला ते सर्वप्रथम आले (१९१३).

नीलकंठ शास्त्री यांनी तिरुनेलवेली येथील हिंदू महाविद्यालयामध्ये व्याख्याता (१९१८–२०), बनारस आणि अन्नमलई या विद्यापीठांत इतिहासाचे प्राध्यापक, मद्रास विद्यापीठामध्ये इतिहास आणि पुरातत्त्वविद्या या विषयांचे विभागप्रमुख (१९२९–४७), तसेच म्हैसूर विद्यापीठामध्ये भारतीय संस्कृती या विषयाचे विभागप्रमुख (१९५२–५६) म्हणून काम केले. शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही १९५९ पर्यंत त्यांनी काम केले.

नीलकंठ शास्त्री हे एक उत्तम वक्तेही होते. पाटणा येथे भरलेल्या भारतीय इतिहास परिषदेच्या (१९४६) आणि लखनौ येथील प्राच्यविद्या परिषदेच्या (१९५१) अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. अनेक अखिल भारतीय समित्यांवरही त्यांनी काम केले. त्यांनी जपान, मलाया, नेपाळ इ. देशांना भेटी दिल्या.

पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी त्यांचा फार निकटचा संबंध होता. हरिवंशाच्या प्रमाणभूत संशोधित आवृत्तीचा या संस्थेचा प्रकल्प पूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी मोठेच प्रयत्न केले. १९६८ साली या संस्थेचा सुवर्णमहोत्सव झाला, त्याप्रसंगी त्यांना संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले.

त्यांनी इतिहासावर, विशेषतः दक्षिण भारताच्या इतिहासावर सु. बावीस मौलिक संशोधनपर ग्रंथ लिहिले व त्यांतील वादग्रस्त प्रकरणांवर प्रकाश टाकला. त्यांच्या ग्रंथांपैकी द चोलाज (खंड ३, १९३५–३७), स्टडीज इन चोल हिस्टरी ॲड ॲड्‌मिनिस्ट्रेशन (१९४१), द तमिळ किंग्डम्स ऑफ साउथ इंडिया (१९४८), मेडिईव्हल इंडिया (खंड २, १९५०), हिस्टरी ऑफ इंडिया (खंड १, २, ३- १९५२-५३), एज ऑफ द नंदाज अँड मौर्याज (१९५२), अ हिस्टरी ऑफ इंडिया (१९६६), श्रीविजय किंग्डम्‌  इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांखेरीज प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती यांसंबंधी त्यांचे सु. एकशेसाठ संशोधनलेखही प्रसिद्ध झाले. १९५८ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार लाभला.

इनामदार, वि. बा. गोखले, शोभना