शार्त्र : फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागातील इतिहासप्रसिद्ध शहर व एक व्यापारी केंद्र, लोकसंख्या ३६,७०६ (१९८२). पॅरिसच्या नैर्ऋत्येस ८० किमी.वर अर नदीच्या डाव्या तीरावर हे वसलेले असून नोत्रदाम कॅथीड्रलसारख्या मध्ययुगीन वास्तुकलेच्या अनेकविध नमुन्यांनी ते संपन्न आहे. याशिवाय अर-ए-लवॉर विभागाचे प्रमुख केंद्र व देशाच्या कृषिसमृद्ध प्रदेशातील व्यापारी शहर म्हणूनही हे प्रसिद्ध आहे.
एका प्राचीन केल्टिक जमातीवरून याला शार्त्र हे नाव पडले. धार्मिक पीठ (ड्रूइडिक सेंटर) म्हणून त्यांनी याची स्थापना केली. नॉर्मनांनी यावर अनेक वेळा हल्ले करून ८५८ मध्ये ते जाळलेही होते. १२८६ मध्ये हे स्थळ फ्रान्सच्या राजाला विकण्यात आले. शतवार्षिक युद्धकाळात (१३३७–१४५३) हे सु. १५ वर्षे ब्रिटिशांच्या ताब्यात होते. १५२८ मध्ये याला ड्यूकच्या ठाण्याचा दर्जा लाभला. दुसऱ्या महायुद्धकाळात या शहराचे अतोनात नुकसान झाले होते. इलेक्ट्रॉनिकी वस्तू, रसायने, मोटारींचे तसेच रेडिओ, दूरचित्रवाणी संचांचे सुटे भाग, शेतीची अवजारे, लोकर, तयार कपडे इ. निर्मिती-उद्योग येथे चालतात.
फ्रान्समधील गॉथिक वास्तुशैलीच्या प्रभावकाळात (सु. ११५० ते १४००) शार्त्र येथे अनेक कॅथीड्रले व निवासी वास्तू बांधण्यात आल्या. पॅरिससारख्या नावीन्यप्रिय व पुरोगामी महानगराच्या सान्निध्यात असूनही शार्त्रने पारंपरिक कलात्मक – सांस्कृतिक वारसा अभिमानपूर्वक जपला आहे.
येथील सर्वांत महत्त्वाची वास्तू म्हणजे जगप्रसिद्ध नोत्रदाम कॅथीड्रल होय (तेरावे शतक). या कॅथीड्रलची अवकाशरचना ढोबळपणे इतर कॅथीड्रलासारखीच क्रॉसच्या आकारावर आधारित आहे. मात्र त्यातील भूमिगत दालन (क्रिप्ट) तुलनेने खूपच मोठे आहे. त्याचप्रमाणे यातील मध्यदालन (नॉट) काहीसे लहान असल्याने ते लांबोळके न वाटता प्रमाणबद्ध वाटते. मध्यदालनाच्या बाजूला स्तंभकमानयुक्त गल्ल्या (आइल्स) किंवा अभिसारिका आहेत. विधिकक्ष (ट्रॅन्सेप्ट) हेदेखील उत्तर-दक्षिण दिशेला आहेत आणि त्यांवर दोन भिन्न आकारांचे ६० मी. उंचीचे मनोरे (स्पायर) आहेत. हे मनोरे कलात्मकता व भव्यता यांचे अभ्यासनीय नमुने होत. मध्यदालनातील स्तंभरचना ही गोलाकार स्तंभाभोवती चार छोटे अर्धगोलाकार स्तंभगुच्छ, अशी खास गॉथिक शैलीत आहे. कमानीयुक्त दालनावर प्रकाशयोजनेसाठी केलेला पोटमाळा (क्लिअरस्टोरी) आहे. त्याच्या दोन भागांना टोकदार खिडक्या आहेत व त्यांवर चारभागी घुमटाकार छतरचना केलेली आहे. मध्यभागीचे छत ३६.५६ मी. उंचीवर आहे. त्यावरून अंतर्भागातील भव्यतेची कल्पना येऊ शकते. या चर्चवास्तूत रंगीत चित्रकाचांनी सजवलेल्या १६० खिडक्या आहेत. अधांतरी टेकूंची रचना तीन मजल्यांत केलेली असून त्यांत तीन भव्य कमानी एकावर एक बांधलेल्या आहेत. तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील कमानींच्या स्तंभिका (बॅलस्ट्रेड) मध्यभागातून सुरू होऊन परिघाकडे झेपावतात. पश्चिमेला प्रवेशद्वारावर सायकलच्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे असलेली चक्राकार खिडकी (रोझ विंडो) गॉथिक वास्तुशैलीच्या सर्व वैशिष्टयांनी नटलेली आहे. शिल्पांकन, रंगसंगती, प्रमाणबद्धता, आकृतिबंध यांतील नाजुक व सुबक देखणेपणातून ही वास्तू अत्यंत आकर्षक अशी अंतर्बाह्य वातावरणनिर्मिती करते. मूळ अभिकल्पानुसार एकूण नऊ मनोरे बांधण्याची योजना होती तथापि प्रत्यक्षात मात्र दोनच मनोरे बांधले गेले.
मध्ययुगीन निवासी वास्तुरचनांसाठीही शार्त्र प्रसिद्ध आहे. या गृहवास्तूंत वरील मजला पुढे झुकलेला असून त्यावर काष्ठशिल्पांची वेलबुट्टी आढळते, खिडक्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, पुढील सज्जाला आधार देणाऱ्या अर्धवर्तुळाकार काष्ठकमानी, त्रिकोणी छतरचना ही त्यांची अन्य काही वैशिष्ट्ये होत. अशी वेधक घरे आजही शार्त्रमध्ये आढळतात. नंतरच्या प्रबोधनकाळात वास्तुनिर्मितीचे केंद्र प्रामुख्याने पॅरिस हेच राहिले. त्यामुळे शार्त्रला गॉथिक शैलीच्या वास्तुकलेचे केंद्र म्हणूनच विशेषत्वाने प्रसिद्धी लाभली. [⟶ गॉथिक कला].
दीक्षित, विजय