शार्क : या माशांचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गातील सेलेची उपवर्गात व प्ल्युरोट्रिमॅटा या गणात होतो. समुद्रातील सर्वांत धोकादायक प्राणी किंवा ‘टायगर ऑफ दी सी’ म्हणून शार्क मासे ओळखले जातात. त्यांच्या सु. ३५० जाती आहेत. त्यांपैकी ३० जाती मानवाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. सर्व शार्क दिसण्यास सारखे दिसतात, पण त्यांच्या आकारांत व रंगांत विविधता आढळते. ते निळ्या, करड्या, पिवळ्या, तपकिरी, पांढऱ्या अशा विविध रंगांचे असतात. काहींच्या शरीरावर पट्टे, ठिपके किंवा नक्षी दिसते. शार्कचे यकृत मोठ्या आकाराचे असून त्यात तेल साठविलेले असते. त्याचा उपयोग त्यांना पोहण्यासाठी होतो. बहुतेक शार्क अनियततापी आहेत, मात्र व्हाइट शार्क व मॅको शार्क हे नियततापी आहेत. त्यांचे आयुष्य सु. २५ वर्षांचे असते, पण काही १०० वर्षेही जगतात.

शार्क माशांचे अस्तित्व पृथ्वीवर सु. ३५ कोटी वर्षांपासून आहे. त्यांची उत्पत्ती इतर माशांबरोबर सु. ३६·५ ते ४० कोटी वर्षांपूर्वी डेव्होनियन कालखंडात झाली असावी. जगातील सर्वच सागरात ते आढळतात. उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधातील सागरी विभागात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. भूमध्यवृत्तावर त्यांचे प्रमाण अधिक व ध्रुवप्रदेशाकडे ते कमी-कमी होत गेल्याचे आढळते. ग्रीनलंड शार्क आर्क्टिक महासागरात खोलवर राहतात, तर मुशी मासे किनाऱ्यालगत आढळतात. बहुतेक शार्क साधारणपणे ४५–५५ मी. खोलीवर आढळतात.

भारताच्या सागरी परिसरात व्हेल शार्क, टायगर शार्क, व्हाइट शार्क, मुशी व हॅमर हेडेड शार्क आढळतात. भारतात ते कोठेवाड, मुंबई, केरळ व प. बंगाल लगतच्या सागरांत वर्षभर आढळतात. हे मासे जुलै ते मार्च या काळात पश्चिम किनाऱ्यावर आणि मे ते जानेवारी या काळात पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅरकॅऱ्हिनस गॅंगेटिकस हा गोड्या पाण्यातील शार्क गंगा नदीत आढळतो.

शरीररचना : शार्कचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असून त्याचा आकार साधारण लांबट व दोन्ही टोकांस निमुळता व प्रवाहरेखित असतो. त्याच्या शरीरावरील बराचसा भाग त्वचेत रुतलेले सूक्ष्म खवले असा असतो, त्यामुळे ते आपणास डोळ्यांनी दिसत नाहीत. त्याच्या शरीराचे डोके, धड व शेपटी असे तीन भाग पडतात. डोके त्रिकोणी असून मुस्कट पाचरीसारखे पुढच्या बाजूस असते. त्याचे तोंड अधर बाजूस अर्धचंद्रकोरीसारखे असते. दोन्ही जबड्यांत तीक्ष्ण व पाठीमागे वळलेल्या दातांच्या अनेक रांगा असतात. त्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी व ते सुटू नये यासाठी होतो. डोक्याच्या दोन्ही बाजूंस डोळे असतात व त्यांच्या शेजारी नाकपुड्यांची छिद्रे असतात. डोक्याच्या डाव्या व उजव्या बाजूस लहान छिद्रांचे (अँप्युलरी पोअर्स) अनेक समूह असतात. घशाच्या दोन्ही बाजूंस पाच (काहींत सात) क्लोम-दरणे असतात व त्यावर आवरण नसते.

शेवटच्या क्लोम-दरणापासून अवस्करापर्यंतच्या भागाला धड म्हणतात. धडाच्या जागी त्याचे शरीर जाड असते व शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते. धडावर दोन अजोड पृष्ठपक्ष व अंसपक्ष आणि श्रोणिपक्षाची एक-एक जोडी असते. नरामध्ये श्रोणिपक्षाच्या आतील बाजूस आलिंगकाची जोडी असते. शेपटीच्या सुरुवातीस अधर बाजूस अवस्कर असते. शेपटी साधारणपणे शरीराच्या निम्म्या आकाराची असते. शेपटीच्या वरच्या भागावर अजोड लहान पृष्ठपक्ष असतो. शेपटीस मोठा पुच्छपक्ष असतो त्याचा वरचा अर्धा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. शेपटीच्या खालच्या बाजूस अजोड अधरपक्ष असतो. शार्कच्या शरीरावर असलेले सर्व पक्ष (पर) पाठीमागच्या बाजूकडे वळलेले असतात. त्यांचा उपयोग पोहण्यासाठी होतो. उपास्थिमिनांत आंतरिक सांगाडा हाडांचा नसून तो कुर्च्यापासून बनलेला असतो. त्यात वयानुसार कॅल्शियमाचे प्रमाण वाढल्याने तो टणक बनतो. सर्व मणके स्नायूने एकमेकांस जोडलेले असतात.

पचनतंत्राची सुरुवात मुखापासून होते. अन्ननलिकेतून अन्न जठरात येते. जठर इंग्रजी (J) आकाराचे असते. आतड्याच्या आतील बाजूस सर्पिल झडप असते. या झडपेमुळे अन्न शोषून घेण्यास अधिक वेळ मिळतो व शोषून घेणारा पृष्ठभाग वाढतो. आतड्यातील मलाचे अवस्करात उत्सर्जन होते. श्वसन तंत्रात क्लोम-दरणाच्या पाच (काहींत सात) जोड्या असतात. मुखात घेतलेले पाणी क्लोम पटलिकांवरून वाहत जाऊन मागील बाजूने बाहेर पडते. त्या वेळी पाण्यातील ऑक्सिजन रक्तात शोषून घेतला जातो व रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू पाण्यातून बाहेर टाकला जातो. शार्कमध्ये वाताशय नसते. उत्सर्जन क्रिया दोन वृक्कांमार्फत केली जाते. रक्तातील यूरिया तर्षण दाब समतोल राखतो. अंत:स्रावी ग्रंथी शरीराच्या विविध क्रिया – प्रक्रियांचे नियमन करतात. मेंदू व मेरुरज्जू या दोन्हींची मिळून केंद्रीय तंत्रिका तंत्र बनते. मेंदूत अग्रभागी दोन्ही बाजूंस गंधखंड, दाने प्रमस्तिष्क, दोन दृष्टिखंड, लंबमज्जा व खालील बाजूस निमस्तिष्क असे भाग असतात. मेंदूतून दहा मस्तिष्क तंत्रिकांचा उगम होतो. दृष्टी, श्रवणशक्ती, घ्राणेंद्रिये इत्यादींची संवेदना केंद्रे मेंदूमध्ये निरनिराळ्या ठिकाणी असतात.

शार्कमध्ये पुढील प्रकारची संवेदांगे असतात : (१) डोळा : याचे भिंग गोलाकार असते. भिंग व जालपटल यांतील अंतर कॅमेऱ्याप्रमाणे कमी-जास्त होते. जालपटलाच्या मागे टपेटम नावाचा चकाकणारा लेप असतो. खोल पाण्यात या लेपामुळे त्यांना दिसू शकते. (२) श्रवणेंद्रिय : हे मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात व तोल सांभाळण्यासाठी मुख्यत: होतो. (३) घ्राणेंद्रिये : मुखाच्या वरच्या बाजूस घ्राणेंद्रियाची दोन रंध्रे असतात. गंधज्ञानाबद्दल शार्क प्रसिद्धच आहेत. त्यांना लांब अंतरावरून भक्ष्याची चाहूल लागते. (४) त्वचा : स्पर्शाची जाणीव करून देणारे तंत्रिका तंतू त्वचेखाली सर्व शरीरभर पसरलेले असतात. तापमानातील अतिसूक्ष्म फरकही त्यांना जाणवू शकतात. (५) पार्श्विक रेखा ज्ञानेंद्रिय : त्वचेखाली असलेल्या संवेदन कोशिका नलिकांची ही रेखा बनलेली असते. या नलिका मध्य रांगेशी जोडलेल्या असून मधूनमधून संवेदनक्षम अशी रंध्रे असतात. या तंत्रामुळे पाण्यातील दाबाची, त्यातील निरनिराळ्या प्रवाहाची कल्पना येते. (६) अँप्युली ऑफ लोर्रेझिनी : डोक्याच्या दोन्ही बाजूंस व खालच्या बाजूस असे त्याचे तीन समूह आढळतात. लोर्रेझिनी कुंभिकेत ६ ते ८ लांबट नलिका भरलेल्या असतात. या संवेदांगामुळे माशांना पाण्यातील प्रदूषक रसायनाचा एक लक्षांश भागदेखील ओळखता येतो. तापमान, पाण्याचे प्रवाह, विद्युत्‌ व चुंबकीय प्रवाह इ. बदलांना ते उत्तम प्रतिसाद देतात. (७) पुटिका : या पुटिका त्वचेत शरीराच्या वरील व खालील बाजूस असतात. त्या वरून खवल्यांनी झाकलेल्या असतात. त्या प्रवाहातील बदल व पाण्यातील तरंगांची (लाटांची) हालचाल ओळखण्यास मदत करतात.

अन्न : शार्क हे प्रामुख्याने मांसाहारी आहेत. मासे, ऑक्टोपस, शेल मासे, छोटे शार्क, समुद्र कासवे हे त्यांचे अन्न आहे. त्यांची भूक अफाट असते. ते अन्न वा मांसाचे लचके तोडून सरळ गिळतात. त्यांवर चर्वण क्रिया होत नाही.


भक्ष्य पकडण्याची पद्धत : शार्क क्रूर व आक्रमक आहेत. ते कळपाने भक्ष्याचा शोध घेतात. अत्यंत संवेदनशील घ्राणेंद्रियांच्या साहाय्याने ते आपले भक्ष्य सहजपणे हेरतात. भक्ष्य पकडताना बऱ्याचदा ते पाठीवर पोहतात. त्यांच्या दोन्ही जबड्यांत कट्यारीच्या आकाराच्या दातांच्या अनेक रांगा असतात. सर्वांत पुढील रांगेतील दात मोठे व आतील रांगांतील दात लहान असतात. पुढचे दात झिजले की मागच्या रांगेतील दात त्याची जागा घेतात. त्यांचे दात आतील बाजूस वळलेले असल्याने भक्ष्याची सुटका होत नाही. भक्ष्यावर झडप टाकण्यापूर्वी ते त्याच्याभोवती २·५० ते ३ मी. वर कडे करतात, त्यास अस्वस्थ करतात. भक्षक शार्कची संख्या पुरेशी वाढल्यावर त्यांच्या फेर धरण्याच्या क्रियेला वेग येतो. काही शार्क मासे भक्ष्याच्या शरीराच्या खालील भागास स्पर्श करतात. काही वेळा ते सर्व भिऊन दूर गेल्यासारखे करतात व थोड्याच वेळात पुन्हा भक्ष्याभोवती कडे करतात. याद्वारे ते भक्ष्याच्या प्रतिकाराचा अंदाज घेतात. कडे हळूहळू बारीक केले जाते, त्यांच्या हालचाली वाढतात. एखादा शार्क भक्ष्यावर हल्ला करतो इतर त्यावर नजर ठेवतात. सुरुवातीस काही शार्क भक्ष्याच्या मांसाचे लचके तोडण्यास सुरुवात करतात व अखेरीस सर्वच त्यात सहभागी होतात.

प्रजनन : शार्क माशांच्या बहुतेक जाती पिलांना जन्म देतात, त्यास जरायुज म्हणतात. काही शार्कच्या जाती अंडी घालणाऱ्या आहेत. नरामध्ये आलिंगकाची जोडी (मैथुनाच्या वेळी उपयोगी पडणारी दंडासारखी उपांगे) श्रोणिपक्षाच्याजवळ असते. नरात दोन वृषण (पुं-जनन) ग्रंथी असतात. यात शुक्राणू तयार होतात. ते आलिंगकाच्या मदतीने मादीच्या योनिमार्गात मीलनाच्या वेळी सोडले जातात. अंड्याचे निषेचन (फलन) अंडनलिकेत होते. प्रियाराधनाच्या काळात नर व पिलांच्या संगोपनकाळात मादी अन्न वर्ज्य करते. गर्भाशयात पिलाची वाढ अंड्यातील बलक व गर्भाशयातील पाझरणाऱ्या पोषक द्रव्यावर होते. पूर्ण वाढ झाल्यावर मादी सुरक्षित जागी पिलांना जन्म देते.

कॅट शार्कसारख्या अंडज जातीत फलित अंडी चिवट बंद पिशवीतून शरीराबाहेर टाकली जातात. ती समुद्रातील खडकास किंवा शेवाळात अडकून राहतात व गर्भाची वाढ झाल्यावर डिंभ बाहेर पडते.

शार्कमध्ये प्रजनन विशिष्ट हंगामात होते. आकाराने मोठ्या जातीत ते दोन वर्षांतून एकदा होते. मादी एका वेळी ४-६ पिलांना जन्म देते. हॅमरहेडेड शार्कमध्ये मादी २० पिलांना जन्म देते. सॅंड टायगर जातीत गर्भाशयात वाढणाऱ्या पिलांपैकी सर्वांत मोठे व ताकदवान पिलू इतर भावंडांना खाऊन टाकते, असे झाल्याने मादी अखेर एकाच पिलास जन्म देते.

आ. १. ग्रेट व्हाइट शार्क महत्त्वाच्या जाती :ग्रेट व्हाइट शार्क : याचे शास्त्रीय नाव कॅरकॅरोडॉन कॅरकॅरिअस असे आहे. हा मोठ्या आकाराचा असून त्याची लांबी ३·६ ते ३·९ मी. असते. ११·२ मी. लांबीचेही हे मासे सापडल्याची नोंद आहे. यांच्या शरीराच्या उत्तर बाजूच्या (वरच्या) कडा पांढऱ्या, फिक्कट तपकिरी वा करड्या असतात. पाठ काळसर रंगाची असते. अधर बाजू पिवळसर पांढरी असते. डोके लहान असून मुस्कट टोकदार असते. अंसपक्षाच्या खालच्या बाजूस काळा डाग असतो. क्लोम-दरणे लांबट असतात. हा अतिशय चपळ, आक्रमक व शक्तिवान मासा असून तो एकटाच संचार करतो. त्यास समुद्रातील ‘लांडगा’ म्हणतात. हा सतत भक्ष्याच्या शोधात असतो. सील, सामन, लहान शार्क, कासवे हे यांचे अन्न आहे. 

आ. २. टायगर शार्क टायगर शार्क : याचे शास्त्रीय नाव गॅलिओसेर्डो क्युव्हिअर असे आहे. याच्या शरीरावर वाघासारखे पट्टे असतात. म्हणून यास टायगर शार्क म्हणतात. लहान माशाच्या कातडीवर गडद डाग असतात व याची जसजशी वाढ होते, तसतसे कातडीवरील डागापासून पट्टे तयार होतात. हे पट्टे वय वाढेल, तसे फिकट होतात. याच्या शरीराची वरील बाजू करडी वा करडी-तपकिरी असून खालची पिवळसर असते. याची लांबी ३·६ ते ४·२ मी. असते. याचे मुस्कट लहान असून शरीर दोन्ही बाजूस निमुळते झालेले असते. शेपटी लांब असते. 

हे मोठ्या संख्येने द. आफ्रिका, फिलिपीन्स, इंडोपॅसिफिक सागर, कॅरिबियन व ऑस्ट्रेलियन समुद्रात आढळतात. हा अतिशय धोकादायक मासा असून समुद्रस्नान करणाऱ्या माणसावर हल्ला करतो. याची प्रजोत्पादनक्षमता जास्त असून मादी एका वेळी ३० ते ६० पिलांना जन्म देते. 

आकृती. ३. ग्रेट ब्ल्यू शार्कग्रेट ब्ल्यू शार्क : याचे शास्त्रीय नाव प्रिन्स ग्लॉका असे आहे. याची लांबी ३ ते ३·६ मी. असते. हा अतिशय सुंदर मासा असून याची वरची बाजू निळसर रंगाची व खालची बाजू पांढरी असते.  याचे शरीर फार जाड नसून ते दोन्ही टोकास निमुळते झालेले असते. याचे अंसपक्ष लांब असतात. हा सर्व प्रकारच्या समुद्रांत आढळतो. याची प्रजोत्पादनक्षमता जास्त असून मादी एका वेळी २८ ते ५४ पिलांना जन्म देते.

आकृती. ४. स्मूथ हॅमरहेडेड शार्कहॅमरहेडेड शार्क : (हातोडीसारखे डोके असणारा शार्क). याचे शास्त्रीय नाव स्फायर्ना झायगीना असे आहे. हा हिंदी व अटलांटिक महासागरांत आढळतो. याची लांबी ३·६ ते ४·५ मी. असते. याच्या शरीराची वरची बाजू करड्या रंगाची व खालची बाजू पांढरी असते. याचा डोक्याचा सुरुवातीचा भाग पसरट असून तो हातोडीसारखा दिसतो. डोळे हातोडीसारख्या भागाच्या टोकास असतात. हा खादाड असून अतिशय चपळ आहे. `स्पोर्ट फिश’ म्हणून हा ओळखला जातो.


आ. ५. मॅको शार्कमॅको शार्क : याचे शास्त्रीय नाव आयस्यूरस ऑक्सिरिंकस असे आहे. याची लांबी १·८ ते ३·६ मी. असते. याच्या शरीराची वरची बाजू तांबूस निळ्या रंगाची व खालची बाजू पांढऱ्या रंगाची असते. याचे शरीर फार जाड नसून मुस्कट टोकदार असते. पुच्छपक्षाचे दोन्ही भाग सारखे असतात. क्लोम-दरणे लांबट असतात. तो पॅसिफिक, हिंदी व अटलांटिक महासागरांत आणि भूमध्य समुद्रात आढळतो.

फणिदंत शार्क : (सेव्हन गील्ड शार्क). हा भूमध्य समुद्रात व अटलांटिक महासागरात आढळतो. याची लांबी सु. २ मी. असते. डोक्याच्या खालील बाजूस तोंड असते. मुस्कटावर डोळे व नाकपुड्याची रंध्रे असतात. क्लोम-दरणाच्या सात जोड्या असतात. शरीरावर वरील बाजूस मोठे अंसपक्ष व लहान श्रोणिपक्ष असतात. शेपटी लांब असून पुच्छपक्षाचा वरचा भाग असतो. हा जरायुज आहे पण अपरा (वार) तयार होत नाही.

आ. ६. व्हेल शार्कव्हेल शार्क : ऱ्हिंकोडॉन टायपस हे याचे शास्त्रीय नाव आहे. याची लांबी सु. १२ मी. असते. हा प्रामुख्याने उष्ण कटिबंधातील सागरांत आढळतो. हा अकाराने ⇨ देवमाशासारखा आहे. यास करंज वा बहिरी या नावाने मुंबईत ओळखले जाते. भारतात सापडणाऱ्या जातीची लांबी सु. ४ ते ९ मी. पर्यंत असते. हे पाण्याच्या पृष्ठभागावर पोहतात. जलचर प्राणी वनस्पती हे यांचे अन्न आहे. मुंबई येथे आढळणारी त्यांची एक जात ‘सुनेरा’ (नेब्रिअस फेरूजिनम) या नावाने ओळखली जाते. याच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणावर तेल मिळते. 

मुशी : (डॉग फिश). सागर किनारी आढळणाऱ्या कॅरकॅरिअस या प्रजातीतील शार्कच्या लहान जातींना मुशी म्हणतात. त्याची लांबी ०·६ ते ०·८ मी. असते. त्याच्या दोन-तीन जाती आहेत. त्याचा उपयोग प्रामुख्याने अन्न व तेल मिळविण्यासाठी करतात.

आ. ७. बास्किंग शार्कबास्किंग शार्क : हा सागरतळाशी राहणारा असून क्वचितच पृष्ठभागावर येतो. याची त्वचा खरबरीत असते. याच्या शरीराची वरील बाजू करडी तपकिरी अथवा काळी असते. खालजी बाजू पिवळसर असते. याची लांबी सु. ७·६ मी. असते. हा उष्ण कटिबंधातील सागरात आढळतो. हा निरुपद्रवी मासा असून प्लवक हे याचे अन्न आहे.   

मासेमारी : शार्क पकडण्यासाठी लाकडाच्या लहान अथवा लांब मोठ्या बोटी वापरतात. दोराच्या टाकेस गळ (गर) लावतात व गळास मांसाचे तुकडे आमिष म्हणून लावतात. आमिषामुळे मासे गळाकडे येतात. आता यांत्रिक बोटीचा वापर शार्कच्या मासेमारीसाठी केला जातो. त्यासाठी विशिष्ट जाळ्याचा वापर करतात. ही मासेमारी भारतात मुंबई, मलबार इ. सागरी भागांत केली जाते. पकडलेले मासे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात व महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आणले जातात.

हल्ला व सुरक्षिततेचे उपाय : शार्कच्या ३५० जातींपैकी ३० जाती हल्लेखोर आहेत. ते मानवावर हल्ला का करतात, याचे समाधानकारक उत्तर अजूनही मिळालेले नाही. सारसोटा (फ्लॉरिडा) येथील `दि मोल मरीन लॅबोरेटरी’ ही संस्था जगभरातील शार्क माशांच्या हल्ल्याबाबतच्या नोंदी ठेवते. या संस्थेत १५८० सालापासून आजपर्यंत सु. २,००० हल्ल्यांची नोंद करण्यात आली आहे. संवेदनशील घ्राणेंद्रियांमुळे शार्कला पाण्यात मिसळलेल्या रक्ताचा वास चटकन लागतो. समुद्रस्नान करणारे, किनाऱ्यावर मासेमारी करणारे मच्छीमार, बोटी व जहाजातून प्रवास करणारे प्रवासी त्याच्या हल्ल्यांना बळी पडतात. ते बोटींवर व जहाजांवर त्यांच्या शक्तिशाली शरीराने व शेपटीने हल्ला करतात. त्याच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी मानवाची वर्दळ असणाऱ्या किनारपट्टीवर अनेक उपाययोजना करण्यात येतात. उंच मनोरे बांधून निरीक्षकांचा पहारा ठेवला जातो. शार्कचे अस्तित्व जाणविल्यास भोंगे, घंटा वाजवतात. पाण्यात धोक्याचा इशारा देणारे बावटे लावतात. शार्कचे वारंवार हल्ले जिथे होतात त्या ठिकाणी उथळ पाण्यात पोलादी तारेची जाळी व पडदे लावतात. ही पद्धत सर्वांत सुरक्षित असली, तरी फार खर्चिक आहे.

पोहणाऱ्यांनी विविधी रंगांचे पट्ट्यापट्ट्याचे कपडे वापरावेत त्यामुळे शार्कचा गोंधळ होतो. लोखंडी जाळीचा पोशाख किंवा पॉलिव्हिनिलच्या पिशवीत स्वत:ला बंद करून घेतल्यास माणूस शार्कला दिसत नाही. त्याला दूर घालविण्यासाठी शार्क गनचा वापर करतात. शार्कला दूर ठेवण्यासाठी शरीराला निरनिराळ्या वनस्पतीचे, फळांचे रस, सुगंधी द्रव्ये, निरनिराळी रसायने लावण्याचे प्रयोग करण्यात आले. शार्कपासून संरक्षणासाठी प्रतिक्षेपके म्हणून अमोनियम सल्फेट, कॉपर अँसिटेट ही रसायने उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या रसायनात रंग मिसळल्यास ते जास्त परिणामकारक ठरतात. नायग्रोसिन व कॉपर अँसिटेट यांपासून साबणासारख्या वड्या तयार करतात. त्या `शार्क चॅसर’ या व्यापारी नावाने विकतात. समुद्रस्नानास जाणाऱ्या व्यक्तीस त्या जवळ ठेवण्याची सूचना दिली जाते.


उपयोग : शार्कचे मांस खाण्यासाठी वापरतात. त्याच्या मांसाचे तुकडे उन्हात वाळवून विकतात. ते शेवंडे व खेकडे पकडण्यासाठी आमिष म्हणून वापरतात. शरीरावरील परांचा उपयोग सार करण्यासाठी करतात. त्याचा सांगाडा वाळवून त्यापासून खत तयार करतात. चुरा (पूड) पशुखाद्यात मिसळतात. त्याची कातडी चिवट असल्याने तिचा उपयोग चप्पल, बूट, पाकिटे इ. वस्तू तयार करण्यासाठी करतात. कमावलेल्या कातडीवर सूक्ष्म खवले असल्याने त्याचा उपयोग फर्निचर व हस्तिदंताच्या वस्तूंना पॉलिश करण्यासाठी करतात. त्याची कातडी जडजवाहिराची पेटी, पुस्तके व तलवारीची मूठ यांच्या आवरणासाठी वापरतात.

  

शार्कच्या यकृतापासून लिव्हर ऑइल काढतात. ह्या तेलात ही जीवनसत्त्वे असतात. तसेच त्यात स्क्वॅलीन नावाचा पदार्थ असतो. तो वायुयानात वंगण म्हणून वापरतात. भाजलेल्या जखमेसाठी तो वापरतात. स्क्वॅलीनमुळे कात व केस मऊ राहतात म्हणून त्याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात करतात. बद्धकोष्ठता, कर्करोग व हृदयविकार यांसाठी ते उपयुक्त मानले जाते. रंग व कीटकनाशके तयार करण्यासाठी ते वापरतात. यांच्या शरीरापासून काढलेल्या तेलावर प्रक्रिया करून ते खाद्यतेल म्हणून वापरतात. त्याचा उपयोग मार्गारीन, धुण्याचा साबण तयार करण्यासाठीही करतात. त्याच्या पोष ग्रंथीपासून काढलेल्या अर्काचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी करतात. मुशीसारख्या लहान शार्कचा उपयोग पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. 

संदर्भ : 1. Gilbert, P.W. Sharks and Survival, Boston, 1963. 

           2. Jhingran, V. G. Fish and Fisheries of India, New Delhi, 1983.

           3. Ommanney, F. D. The Fishes, New York, 1963.

बारगजे, रमेशचंद्र पाटील, चंद्रकांत