शारीर, आयुर्वेदीय : ‘आयुर्वेदीय शारीरात’ म्हणजे शरीररचनाशास्त्रात मानवी शरीराचा आयुर्वेदाच्या प्रयोजनानुसार विचार केलेला आहे. स्त्रीच्या गर्भाशयात शुक्र (पुरुषबीज) व शोणित (स्त्रीबीज) यांचा संयोग झाल्यावर तेथे आत्मा आणि अव्यक्त, महान, अहंकार व पंचतन्मात्रा या आठ प्रकृती पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन व पंचमहाभूते असे सोळा विकार याप्रमाणे पंचवीस तत्त्वांचा जो समुदाय होतो, त्यालाच ‘गर्भ’ म्हणतात. या चैतन्ययुक्त गर्भाची वायूमुळे प्रसवकाळापर्यंत दोष, धातू मळ, अंगे व प्रत्यंगे वेगवेगळी होतात. तेज तत्त्वामुळे त्याच्या सर्व धातूंचे पचन होते आप या तत्त्वामुळे क्लेद, द्रवभाग, ओलसरपणा निर्माण होतो. पृथ्वी या तत्त्वामुळे घनता, कठीणपणा, आकार, व्यक्तपणा निर्माण होतो व आकाश तत्त्वामुळे त्याचे आकारमान वाढते. याप्रमाणे पाचही महाभूतांची प्रक्रिया गर्भावर होऊन हात, पाय, कान, नाक, जीभ, नितंब आदी सर्व अंगप्रत्यंगे निर्माण होतात. आयुर्वेदात या सर्व घटकांच्या समन्वयाने तयार झालेल्या कर्मपुरुषाची चिकित्सा सांगितलेली आहे.

वात, पित्त, कफ ह्या दोषांतील जो दोष अधिक असेल त्यानुसार पुरुषांची दोषप्रकृती ठरते. देहामध्ये वात, पित्त, कफ ह्यांची सम-अवस्था म्हणजे ‘आरोग्य’ होय. आयुर्वेदामध्ये मानवी शरीराचा विचार ‘दोषधातुमलामूलं हि शरीरम्‌’ ह्या सिद्धांतानुसार केलेला आहे. म्हणजेच शरीराचे वात, पित्त, कफ हे दोष रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे धातू आणि पुरीष, मूत्र, स्वेद हे मल असे तीन मूलघटक आहेत. ह्या सर्व घटकांची उत्पत्ती पंचमहाभूतांपासून झालेली असून, ते देहाचे धारण व पोषण करतात.

शरीरात व्याधी झाला किंवा काही विकृती आढळून आली, तर त्याची चिकित्सा करणे सहज सुलभ व्हावे, हे आयुर्वेदीय शारीराचे उद्दिष्ट आहे. तसेच प्रकृतिभेदाने व धातुसारासारत्व भेदाने प्रत्येक मानवी शरीर वैशिष्ट्यपूर्ण असल्याने प्रकृतिविचार व धातुसारासारत्व विचार हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

अंगप्रत्यंग संज्ञा : पुरुषशरीराचे पुढीलप्रमाणे प्रमुख सहा विभाग किंवा अंगे आहेत : डोके, कोष्ठ, दोन हात व दोन पाय. या अंगांच्या उपविभागांना ‘प्रत्यंगे’ म्हणतात. या आयुर्वेदीय प्रत्यंगांची नावे अशी : कच (डोक्याचे केस), लोम (त्वचेवरील केस), श्मश्रू (दाढी-मिशा), शिर, पश्चात मस्तिष्क (डोक्याच्या पाठीमागचा भाग), शंख (कानशिलाकडील भाग), पुरस्तालू (डोक्याचा वरचा पुढचा भाग), पश्चात तालू (डोक्याचा मागचा भाग), ग्रीवा (मान), आनन (चेहरा), भुवया, कपाळ, नाक, नाकपुडी, नासास्थी (नाकातील हाड), दात, दंतवेष्टक (हिरड्या), गलशुंडिका (पडजीभ), जिव्हा (जीभ), उपजिव्हिका किंवा पडजीभ, ओष्ठ (ओठ), सृक्किणी (दोन्ही ओठांचा संधी), हनू (हनुवटी), नेत्र (डोळे), अक्षिकूट (डोळ्याची खोबणी), पक्ष्म (पापण्या), शुक्लमंडल (पांढरे बुबुळ), कृष्णमंडल (काळे बुबुळ), दृष्टी (बाहुली), अपांग (पापण्यांचा कानाकडील संधी), कनीनक (पापण्यांचा नाकाकडील संधी), कर्ण (कान), कर्णपाली (कानाची पाळी), कपोल (गाल), चिबूक (हनुवटीचा खालचा भाग), अबदू (मानेचा काटा), अंस (खांदा व मान यांच्यातील भाग), कक्षा (काख), पार्श्व (छाती व पाठ यांच्यातील भाग), उर (छाती), हृदय (हृदय अवयव व हृदयाभोवतीचा प्रदेश), पृष्ठ (पाठ), उदर (पोट), नाभी (बेंबीचा प्रदेश), बाहू (खांदा व कोपरापर्यंतचा भाग), कूर्पर (कोपरा), प्रकोष्ठ (कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग), मणिबंध (मनगट), हस्ततल (हाताचा तळवा), अंगुली, पर्व (बोटाची पेरे), अंगुष्ठ (आंगठा), तर्जनी (निर्देशिका, पहिले बोट), मध्यमिका (मधले बोट), अनामिका (चौथे बोट), कनिष्ठिका (करंगळी), उरू (मांडी), जानू (गुडघा), जंघा (पोटरी), गुल्‌फ (घोटा), पार्ष्णी (टाच), पादतल (पायाचा तळवा), बस्तिप्रदेश (अधोदर, ओटीपोट), मेंढ्र (शिश्न), अंडकोश (वृषण), पायू (गुद), स्फिक्‌ (कुल्याचा भाग).

विशेष संज्ञा : कंडरा : मोठ्या व गोल स्नायूंना ‘कंडरा’ म्हणतात. यांची उत्पत्ती रक्तापासून होते. हा रक्ताचा उपधातू आहे. शरीरात एकंदर सोळा कंडरा आहेत. हातात, पायात, मानेत व पाठीत चार-चार याप्रमाणे सोळा कंडरा आहेत. त्यांपैकी हाताच्या व पायाच्या कंडरांच्या अग्रभागी नखे उत्पन्न होतात. मान व हृदय ह्यांना बांधून असणाऱ्या ज्या चार कंडरा खाली जातात, त्यांपासून शिश्नाची उत्पत्ती होते. पाठ आणि कंबर ह्यांना बांधून असणाऱ्या ज्या कंडरा खाली जातात, त्यापासून गोल आकाराचे अवयव म्हणजे ढुंगण उत्पन्न होते. तसेच मस्तक, मांड्या, हृदय व खांद्याचे गोळे हेही त्यांपासून होतात. पायाच्या वर जाणाऱ्या कंडरांपासून छाती व स्तन उत्पन्न होतात. पाठीच्या वर जाणाऱ्या कंडरांपासून खांदे उत्पन्न होतात. हातातून वर जाणाऱ्या कंडरांचे अग्र डोके होय. कंडरांनी अवयवाचे प्रसरण व आकुंचन होते.

जाल : ‘जाल’ म्हणजेच जाळे, मांस, सिरा, स्नायू व अस्थी या अनेक रचना एकत्र येऊन तो जाळीदार भाग तयार होतो, त्याला ‘जाल’ म्हणतात. शरीरात एकूण सोळा जाल आहेत. मांस, सिरा, स्नायू व हाडे यांची प्रत्येकी चार जाळी आहेत. ती प्रत्येक घोट्यात व मनगटात एकेक असून परस्पर गुंतलेली आहेत. त्यांच्या योगाने शरीर हे जाळीदार व छिद्रमय बनते.

कूर्चा : शरीरातील स्नायूंचा एक प्रकार. स्नायू किंवा धमन्या एकत्र येऊन कुंचल्याप्रमाणे तयार होणाऱ्या भागास ‘कूर्चा’ म्हणतात. हातामध्ये दोन, पायामध्ये दोन, मान आणि शिश्न या अवयवांत एकेक यांप्रमाणे सहा कूर्चा आहेत.

मांसरज्जू :  मांसरज्जू म्हणजे मांसनिबंधन करणारा दोरीप्रमाणे जाड स्नायू. मांसरज्जू चार आहेत. पाठीच्या मणक्याच्या दोन्ही बाजूंना बाहेरून व आतून अशा दोन-दोन मिळून चार मांसरज्जू पेशींना बांधण्याचे काम करतात.

सीवनी : सीवनी म्हणजे शिवण. डोक्याच्या ठिकाणी पाच व जिभेखाली तसेच शिश्नाखाली एकेक अशा एकूण सात सीवनी आहेत. शस्त्रक्रिया करताना या सीवनींच्या ठिकाणी छेद घेत नाहीत. मर्मावर जर आघात झाला, तर जशी वेदना निर्माण होते किंवा विकलांगता येते, त्याप्रमाणे शस्त्रकर्माच्या वेळी जर चुकून सीवनीचे छेदन झाले, तर तीव्र वेदना आणि विकलांगता उत्पन्न होते. 

अस्थिसंघात : ‘अस्थिसंघात’ म्हणजे हाडांचा समूह. अस्थिसंघात चौदा आहेत. दोन किंवा अधिक हाडे एकत्र आली असतील, तर त्या स्थानाला ‘अस्थिसंघात’ म्हणतात. प्रत्येक घोटा, गुडघा व जांघ यांत प्रत्येकी डावा-उजवा असे दोन-दोन मनगट, कोपर व काख यांत प्रत्येकी डावा-उजवा असे दोन-दोन माकडहाड व डोके यांत प्रत्येकी एकेक असे मिळून एकंदर चौदा अस्थिसंघात आहेत.

सीमन्त : हाडांच्या प्रत्येक संघातातील हाडे परस्परांशी ज्याने शिवली आहेत, तो सीमन्त.सीमन्त हेदेखील चौदा आहेत. घोटा, गुडघा व जांघ यांत प्रत्येकी एक असे दोन्ही पायांतील सहा मनगट, कोपर व काख यांत प्रत्येकी एक असे दोन्ही हातांचे सहा माकडहाडात एक व डोक्यात एक असे एकूण चौदा सीमान्त आहेत. दुसऱ्या एका मतानुसार शरीरात एकूण अठरा सीमन्त आहेत. वरील चौदा अधिक कंबरेच्या वर एक व उराच्या वर एक, उदर व छातीच्या सांध्यात एक व अंसकूटाच्या वर एक असे एकूण अठरा आहेत. वृद्ध वाग्भट या ग्रंथाप्रमाणे – घोटा, गुडघा, जांघ, मनगट, कोपर व काख यांत प्रत्येकी दोन असे बारा, माकडहाड यांत एक व डोक्यात पाच असे एकूण अठरा सीमन्त आहेत.

प्राण : प्राण म्हणजे जीवनाचा आधार. पुढील बारा पदार्थांना ‘प्राण’असे म्हणतात. अग्नी, सोम, वायू, सत्त्व, रज, तम, पाच ज्ञानेंद्रिये व आत्मा.


प्राणायतन : ज्या ठिकाणी प्राणाचे अस्तित्व आहे, अशी शरीरात दहा स्थाने आहेत. ती अशी : शंख (दोन्ही बाजूंची कानशिले), हृदय, बस्ती, शिर, कंठ, रक्त, शुक्र, ओज व गुद. अग्नी व सोम इ. प्राणांचे आश्रय असलेली ही स्थाने असून त्यांच्यावर आघात झाला असता प्राणनाश होतो.

आशय : दोषधातुमलादींच्या आधारभूत अवयवांना आशाय म्हणतात. शरीरधातूंच्या अस्तित्वांचे अवकाशरूप स्थान किंवा स्रोतसरूपाने असलेले स्थान म्हणजे आशय होय. वायू मांसादी धातूंमध्ये राहतो व हळूहळू सतत पोकळी निर्माण करून आशयाची उत्पत्ती करतो. पुरुषशरीरात वाताशय, पित्ताशय, कफाशय, रक्ताशय, आमाशय, पक्वाशय व मूत्राशय असे सात आशय असतात. स्त्रीशरीरात एक आशय अधिक असतो तो म्हणजे गर्भाशय, मात्र शार्ङ्‌गधरसंहितेत स्त्रियांचे तीन आशय अधिक सांगितले आहेत, ते म्हणजे एक गर्भाशय व दोन स्तन. कश्यपसंहितेत विष्ठा, मूत्र, कृमी, पक्वाशय, आमाशय, कफाशय व वाताशय मिळून सात आशय सांगितले आहेत.

शरीरांश प्रकार : पार्थिवादी घटक : शरीराच्या ज्या घटकांत ज्या महाभूताचे प्राधान्य असते, त्यात त्या महाभूताचे गुण आधिक्याने व्यक्त असतात. उदा., पृथ्वी महाभूताधिक्य घटकांस ‘पार्थिव’ म्हणतात. त्याचप्रमाणे आप्य,  आग्नेय , वायवीय , आकाशीय अशा संज्ञा आहेत. काही घटक द्विजातीय असतात. उदा., कफदोष हा पार्थिव व आप्य आहे.

शरीरातील दोष, धातू व मल हे तेराही घटक पाच महाभूतांपासून बनलेले आहेत. त्यांच्यातील पार्थिवादी घटकांचे आधिक्य असे :

(अ) दोष : (१) वाय – वायू + आकाश,  (२) पित्त – तेज,  (३) कफ – आप + पृथ्वी.

(आ) धातू :(१) रस – आप (२) रक्त – तेज (काहींच्या मते सर्वच महाभूतांचे उत्कटत्व) (३) मांस – पृथ्वी (४) मेद – आप, पृथ्वी (५) अस्थी – पृथ्वी, वायू, तेज, आकाश   (६) मज्जा – आप (७) शुक्र – आप. 

(इ) मल : (१) स्वेद – आप,  (२) मूत्र – आप,  (३) पुरीष – पृथ्वी.

(ई) उपधातू : (१) खमल (कान, नाक इत्यादींमधील मळ), स्नायू, धमनी, कंडरा, त्वचा – पार्थिव (२) आर्तव व रज – तेज (३) सिरा व स्रोतसे – आकाश         (४) वसा व स्तन्य – आप (५) गर्भ – पंचमहाभूते.

(उ) इंद्रिये : (१) घ्राणेंद्रिय – पृथ्वी (२) रसनेंद्रिय – आप (३) चक्षुरेंद्रिय – अग्नी , (४) स्पर्शेंद्रिय – वायू, (५) श्रवणेंद्रिय – आकाश.

शरीरभाव : पंचमहाभूते आपापल्या आधिक्यानुसार शरीरामध्ये विविध गुण व कर्म व्यक्त करतात.

पृथ्वी तत्त्व : हे पंचमहाभूतापासून झालेले, पण पृथ्वी महाभूत अधिक प्रमाणात असलेले पदार्थ. पार्थिव द्रव्ये शरीरात जडपणा व स्थिरता निर्माण करतात. यांपासून गंध, नाक, शरीरातील सर्व घन पदार्थ, मांस, अस्थी इत्यादींमध्ये काठिण्य तसेच दोष व धातू ह्यांच्यात दृढत्व, जडत्व, आकार इ. निर्माण होतात. नख, हाडे, दात, मांस, कातडी, मळ, केस, तोंडावरचे केस, लव, कंडरादी, घ्राणेंद्रिय व सर्व आकारयुक्त पदार्थ पार्थिव घटक आहेत.

आप्य तत्त्व : हे पांचभौतिक द्रव्य असून, ज्यात जल गुण उत्कटत्वाने आहेत अशी द्रव्ये. ही सरणारी, स्निग्ध, मृदू, मंद व बुळबुळीत ह्या गुणांची असतात. रसधातू व रसनेंद्रिय आप्यच आहेत. आप्य तत्त्वापासून रस (चव), जिव्हा (रसना), कफ, मेद, रक्त व शुक्र इ. शरीराभाव तयार होतात. आप्यद्रव्ये शरीराला स्निग्ध करणारी, शरीराचे प्रीणन (तृप्तिकर) तसेच पुष्टी करणारी, मृदुता, शीतलता व द्रवता उत्पन्न करणारी आहेत.

तेज तत्त्व : हे पांचभौतिक द्रव्य असून, ज्यात तेज गुण उत्कटत्वाने आहेत अशी द्रव्ये. तेज तत्त्वापासून शरीरात दृष्टी, नेत्र, पित्त, उष्णता, पचन, संताप, बुद्धी, वर्ण, सौंदर्य, गोरेपणा, प्रभा, तेज, शैर्य इ. शरीरभाव उत्पन्न होतात. तेज तत्त्वामुळे हुशारी, धैर्य व चाणाक्षपणा येतो.

वायू तत्त्व : हे पांचभौतिक द्रव्य असून, ज्यात वात गुण उत्कटत्वाने आहेत अशी द्रव्ये. स्पर्श, स्पर्शनेंद्रिय, रुक्षता, खरखरीतपणा, श्वास घेणे, उच्छवास सोडणे, डोळ्यांची उघडझाप (उन्मेष-निमेष), ग्लानी, पोकळी (आशय), सर्व छिद्रे, नाडी, आकुंचन-प्रसरण इ. शरीरभाव वायूपासूनच उत्पन्न होतात. सर्व शरीरातील हालचाल व हलकेपणा हा वायूचा गुणधर्म आहे.

आकाशीय तत्त्व : हे पांचभौतिक द्रव्य असून आकाशाचे गुणधर्म आधिक्याने आहेत अशी द्रव्ये. आकाशीय तत्त्वापासून शब्द, शब्देंद्रिय, आशय, पोकळी व सर्व छिद्रसमुदाय, नाडी हे शरीरभाव निर्माण होतात.

शरीराचे त्रिगुणतात्मकत्त्व : शरीराची उत्पत्ती अव्यक्तापासून होते व अव्यक्त हे सत्त्व, रज व तम या तीन गुणांचे असते. याच तीन गुणांपासून पाच महाभूतांची उत्पत्ती होते. यामुळे पुरुषशरीर हे त्रिगुणात्मक म्हटले काय किंवा पांचभौतिक म्हटले काय, दोहोंचा अर्थ एकच होतो. सत्त्व गुणांपासून आकाश तत्त्व, रजो गुणांपासून वायू तत्त्व, सत्त्व व रजो गुणांपासून अग्नी तत्त्व, सत्त्व व तम गुणांपासून आप तत्त्व आणि तम गुणांपासून पृथ्वी तत्त्व निर्माण होते. तसेच अविकृत अशा वात, पित्त व कफ यांची उत्पत्ती पंचमहाभूतांपासून होते. वातामध्ये रजोगुणाचे आधिक्य, पित्तामध्ये सत्त्वगुण अधिक आणि कफामध्ये तमो गुण अधिक असतो. वायू व आकाश या तत्त्वांपासून कफधातू निर्माण होतो. मनुष्यस्वभावात याच तीन गुणांची कमी-अधिक लक्षणे आढळतात व त्यांनुसार त्या व्यक्तीची गुणमयी प्रकृती ओळखली जाते.

शरीराचे त्रिदोषमयत्व : शरीर हे दोष, धातू व मल यांचे बनलेले आहे. प्राकृत अवस्थेतील म्हणजे समप्रमाणातील दोष शरीराचे धारण करतात, त्या वेळी ते धातू असतात, दोष नसतात. वात, पित्त, कफ सर्व शरीरात संचार करतात. तेच शरीरधारणेला मूलाधार आहेत. वातादी धातू शुक्र व आर्तव ह्यांच्या सहकार्याने शरीर निर्माण करतात. तथापि हृदयाच्या वर विशषत: कफ, हृदय व नाभी यांमध्ये पित्त आणि नाभीच्या खाली वायू असतो. वाताचे विशेष स्थान मलाशय (पक्वाशय), पित्ताचे नाभी (बेंबीच्या भोवतालचा लहान आतड्याचा भाग) आणि कफाचे छाती (उर) असते.

शरीरात वात, पित्त, कफ हे तीन धातू पुढीलप्रमाणे कार्य करतात.

वातधातू : उत्साह, उच्छ्‌वास, निःश्वास, शरीराची कायिक, वाचिक व मानसिक सर्व हालचाल, मलमूत्रादिकांचा त्याग करण्याची सूचना व त्याग, अन्नरस व मूत्रादी मल पृथक्‌ करणे, सर्व शरीरात संचार, इंद्रियांना त्यांच्या विषयांचे ज्ञान करून देणे, ही कर्मे वातधातू करतो.

पित्तधातू : पचन, उष्णता राखणे, पाहणे (दर्शन), भूक, तहान, रुची, रूप, धारणाशक्ती, ओज, बुद्धी, शूरत्व, मऊपणा आणणे ही पित्तधातूची कार्ये आहेत.

कफधातू : शरीर स्थिर व स्निग्ध ठेवणे, मनाची एकाग्रता राखणे, सांधे बळकट ठेवणे, देहाचे पोषण करणे आणि त्यात बल व स्थिरता ठेवणे ही कार्ये कफधातूची आहेत.

धातू : रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सात धातू आहेत. आहारापासून या सात धातूंची उत्पत्ती होते. पांचभौतिक आहारावर कायाग्नीचा संस्कार होऊन उत्पन्न झालेल्या सारभागाला ‘आहाररस’ म्हणतात. रसधातूपासून रक्त, रक्तापासून मांस अशा क्रमाने शुक्रापर्यंत धातू उत्पन्न होतात. अगोदरच्या धातूपासून पुढचा धातू उत्पन्न होतो. हे सात धातू शरीराचे धारण व पोषण करतात.


धातुकर्मे : रसधातूमुळे शरीराची तृप्ती होते, आनंद मिळतो व रक्ताची पुष्टी होते. रक्तधातू वर्ण चांगला करून जीवन चालवितो व मांसाचे पोषण करतो. मांसधातू शरीराचे लेपन करतो व मेदाचे पोषण करतो. मेदधातू शरीराला स्निग्ध ठेवतो, तसेच घाम आणणे व हाडांचे पोषण करणे हे कार्य करतो. अस्थिधातू शरीराला त्याच्या स्वाभाविक आकारात ठेवतो, तसेच शरीराचे धारण व मज्जेचे पोषण करतो. मज्जाधातू अस्थीचे पूरण करतो तसेच प्रेम, स्निग्धता, बल व शुक्राचे पोषण करतो. शुक्रधातू गर्भ उत्पन्न करतो.

धातूंच्या अनुसार मनुष्याची प्रकृती असते. तिला `धातुसारप्रकृती’ म्हणतात. तिचे आठ प्रकार आहेत. त्वक्‌सार (रससार), रक्तसार, मांससार, मेदसार, अस्थिसार, मज्जासार, शुक्रसार व सत्त्वसार.

आहाररसापासून रसादी सात धातूंची उत्पत्ती होते. त्या सात धातूंचे सात अग्नी असतात. रसादी धातू आपापल्या अग्नीने पचत असतात. पचताना किट्ट व प्रसाद – साररूप असे दोन प्रकारचे पदार्थ निराळे होतात. जसे रसाचा मल कफ व साररूपभाग रक्त, रक्ताचा मल पित्त व साररूपभाग मांस, मांसाचा मल म्हणजे शरीराच्या सर्व पोकळ भागांतून बाहेर येणारा मल व साररूप भाग मेद, मेदाचा मल घाम व साररूप भाग अस्थी, हाडांचा मल नख, रोम व केश व साररूपभाग मज्जा आणि मज्जेचा मल म्हणजे डोळ्यातील मल व त्वचेचा स्नेह आहे.

मल : शरीरातील टाकाऊ पदार्थ जसे पुरीष (मल), मूत्र, घाम व शरीराच्या छिद्रांतील निरनिराळे बाहेर जाणारे मल.पुरीषादी मल हे प्राकृत अवस्थेत असताना शरीराचे धारण करतात. म्हणून त्यांनाही ‘धातू’ असे म्हणतात. रसादी धातू व पुरीषादी मल दोषांनी बिघडविले जातात, म्हणून त्यांना ‘दूष्य’ म्हणतात. मल (पुरीष) प्राकृत असताना शरीराचे तसेच वायू व जठराग्नी ह्यांचे धारण करतो. मूत्र बस्तीचे पूरण करते व शरीराला ओलावा देते. स्वेद (घाम) हा ओलसरपणा देतो व त्वचेला मृदू करतो. [→ दोषधातुमलविज्ञान].

गर्भोत्पादक भाव : ऋतू (स्त्रीला दर महिन्यात ती रजःस्वाला झाल्यानंतर येणारा काळ), क्षेत्र (गर्भाशय), अंबू (गर्भरूपी अंकुराचे पोषण करणारे रस व रक्त) व बीज (पुरुषबीज व स्त्रीबीज म्हणजेच शुक्र व आर्तव यांचा संयोग) ह्या चार गोष्टींचा संयोग झाला म्हणजे गर्भ उत्पन्न होतो. गर्भाशयामध्ये शुक्र व आर्तव यांच्या संयोगात मनाच्या संयोगाने जीव उतरतो. तेव्हा गर्भ निर्माण होतो. गर्भ निर्माण होताना त्यात मातृज, पितृज, आत्मज, सात्म्यज, सत्त्वज, रसज असे निरनिराळे भाव त्यांच्या शरीरगुणांमुळे उत्पन्न होतात. या सर्व भावांचा समुदायरूपी विकसित गर्भ पाहावयास मिळतो. हे सहाही भाव गर्भोत्पत्तीसाठी आवश्यक मानले आहेत.

मातृज भाव : गर्भाच्या ठिकाणी हे भाव आईच्या शरीरगुणांमुळे निर्माण होतात. त्वचा, रक्त, मांस, मेद, मज्जा इ. मृदुधातू आणि नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, मलाशय, आमाशय, पक्वाशय, गुद, मोठे आतडे, लहान आतडे, वपा, वपावहन, गर्भाशय, डोळ्यातील श्वेतमंडल इ. मृदू अवयव मातेच्या आर्तवापासून उत्पन्न होतात. या घटकात मातेच्या त्या त्या घटकांप्रमाणे द्रव्य, गुण, कर्मे असतात.

पितृज भाव : गर्भाच्या ठिकाणी पित्याच्या शरीरगुणांमुळे निर्माण होणारे भाव. नख, दाढी, मिशा, शरीरावरची लव, केस, हाडे, दात, सिरा, स्नायू, धमनी, शुक्र व डोळ्यातील कृष्णमंडल इ. कठीण अवयव हे पित्याच्या बीजापासून उत्पन्न होतात.

आत्मज भाव : गर्भशरीरात आत्म्यापासून निर्माण झालेले भाव. जसे त्या त्या योनीत जन्म घेणे, आयुष्य, आत्मज्ञान, मन, इंद्रिये, सुख-दुःख, इच्छा, द्वेष इ. भाव. प्राण, अपान, ग्रहण व धारणा करणे, प्रेरणा देणे, आकृती, स्वर, वर्ण उत्पन्न करणे स्मरण, अहंकार, प्रयत्न, चेतना, धी, धृती, बुद्धी, उन्मेष, संकल्प, विचार, विषयाशी एकरूप होणे, काम, क्रोध, लोभ, भय, हर्ष, धर्म, अधर्म, शील ह्या गोष्टी गर्भशरीरात आत्म्याच्यापासून निर्माण झालेल्या असतात.

सात्म्यज भाव : सात्म्यापासून होणारा भाव. जे सतत सेवन केल्याने शरीराला आरोग्यकर व सुखकर होते, ते सात्म्य होय. जे शरीरात आत्मसात होते, ते रोगनाशक व शरीराशी एकरूप होते. जो रस सेवन केला असता शरीराला सुखकर, आरोग्यकर होतो, तो सात्म्यरस होय. सात्म्य हे सुखावह, आरोग्यदायक झालेल्या परिणामावरून समजते. ह्यामुळे आरोग्य, उत्साह, कार्यप्रवणता (अनालस्य), संतोष, इंद्रियसौख्य, सुखी, समाधानी राहणे, आयुष्य, ओज, प्रभा, मेधा, बल, वर्ण, स्वर व बीजगुण वाढणे इ. भाव उत्पन्न होतात.  सात्म्य म्हणजे शरीरास औषध, अन्न, विहार यांचा सुखावह रोगशामक उपयोग.

सत्त्वज भाव : मनाचे भाव जसे पावित्र्य, आस्तिक्य, भक्ती, शील, त्याग, वेदांचा अभ्यास (गुरुपूजा, बुद्धी), अतिथीच्या सत्काराची आवड इ. भाव सत्त्व गुणांचे आहेत.

रसज भाव : रसधातूपासून निर्माण झालेले भाव. गर्भाचे शरीर, पृष्टी, बल, वर्ण, उत्पत्ती, अस्तित्व व नाश हे ‘रसज भाव’ आहेत.गर्भाची वाढ करणारे भाव : मातेच्या आहाररसापासूनच गर्भाची वाढ होते. वाताने अवकाश निर्माण होतो, आईकडून मिळणाऱ्या पोषक आहाररसाने, उष्णतेने व काळाच्या परिणामामुळे स्वभावतः गर्भाची वाढ होते. पाच महाभूतांपासून निर्माण झालेले वात, पित्त, कफ हे तीन दोष (धातू) शरीरात संचार करून त्या गर्भशरीराची वाढ करतात.

अंगप्रत्यंगाचे निर्माण : गर्भाची वाढ होताना पुढील धातूंची अवयवांची निर्मिती होते : हृदय हे कफ व रक्ताचा जो साररूप अंश यापासनू बनले आहे. त्याच्या आश्रयाने प्राणवहन करणार्याह धमन्या आहेत. रक्त व त्याचा फेस यांच्या साररूप अंशापासून फुफ्फुसे तयार होतात. रक्ताच्या मल भागापासून उंडुक हा अवयव उत्पन्न होतो. समान वायू व देहोष्यामुळे रक्ताच्या साररूप अंशापासून यकृत व प्लीहा उत्पन्न होतात.

रक्त व मेद यांच्या साररूप अंशापासून वृक्क उत्पन्न होते. मांस, रक्त, कफ व मेद यांच्या साररूप अंशापासून वृषण उत्पन्न होते. रक्त व कफ यांचा जो साररूप अंश तो पित्ताने पक्व झाला असता त्यात वायू येऊन मिळतो व त्यापासून आंत्र, गुद व बस्ती हे अवयव तयार होतात. कफ, रक्त व मांस ह्यांच्या सारभूत अंशांनी जिव्हा उत्पन्न होते. कफ, रक्त व स्रोतसे व महाभूतांच्या सारभूत अंशांनी जिव्हा उत्पन्न होते. कफ, रक्त व स्रोतसे व महाभूतांच्या सारभूत अंशामुळे इंद्रिये निर्माण होतात. नेत्रात कफसाररूप अंशांनी व मातृज घटकांनी शुक्लमंडल, रक्तापासून व पित्तज घटकांनी कृष्णमंडल निर्माण होते. दृष्टिमंडल उभयात्मक आहे. सिरा, कंडरा हे मेद व कफामुळे उत्पन्न होतात. शुक्र व आर्तव यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना सात त्वचा निर्माण होतात. ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते, त्याप्रमाणे रक्त पचत असताना त्वचेचे सात स्तर निर्माण होतात.

रोगमार्ग : मार्ग म्हणजे रोगांची स्थाने किंवा स्रोतस. शुक्र व शोणिताचे पचन होत असताना गर्भवृद्धीच्या वेळी तीन विभाग पडतात. शरीरात तीन प्रकारचे रोगमार्ग आहेत. बाह्य रोगमार्ग, मध्यम रोगमार्ग आणि आभ्यंतर रोगमार्ग.बाह्य रोगमार्ग : रक्तादी सहा धातू आणि त्वचा व शाखा हे बाह्य रोगमार्गात येतात. ह्या रोगमार्गात गंड, पिटिका, अपची, चामखीळ, अर्बुद, अधिमांस, मस, व्यंग, सूज, मूळव्याध, गुल्म, विसर्प, विद्रधी इ. रोग होतात.

मध्यम रोगमार्ग : डोके, हृदय, बस्ती, मर्मे, अस्थी आणि संधी व त्यांच्याशी निगडित स्नायू, सिरा, कंडरादी अवयव मध्यम रोगमार्गात येतात. या रोगमार्गात पक्षवध, पक्षग्रह, अपतानक, अर्दित, राजयक्ष्मा, अस्थिसंधिशूल, गुदभ्रंश, ऊर्ध्वजत्रुगत विकार इ. रोग होतात.


आभ्यंतर रोगमार्ग : शरीरामध्ये महास्रोतस, अमाशय, पक्वाशय, कोष्ठ, अंतर अशी या आभ्यंतर रोगमागाची पर्यायी नावे आहेत. या रोगमार्गात ताप, अतिसार, ओकारी, अलसक, वसूचिका, कास, श्वास, हिक्का आध्यान, उदर, प्लीहेचे रोग, आतल्या भागातील अर्श, विद्रधी, गुल्म इ. रोग होतात.

हे रोगमार्ग रोगाच्या दृष्टीने कल्पिलेले आहेत. प्रत्येक गटातील घटकांचा एकमेकांशी संबंध असतो. विशिष्ट रोग विशिष्ट मार्गानेच असतात. रोग अनेक मार्गांत असेल, तर तो कष्टसाध्य असतो. रोगकर दोष एक व एकमार्गात असला तर सुखसाध्य असतो. सुखसाध्य विकार साध्या उपचाराने व थोड्या अवधीत साध्य होतात.

प्रकृतिदृष्ट्या त्रिविध व अनेकविध शरीर : प्रकृती म्हणजे स्वभाव व आरोग्य. गर्भाशयामध्ये शुक्र व आर्तव यांचा संयोग झाल्यावर त्यांमध्ये जो दोष (वात, पित्त. कफ) अधिक किंवा उत्कटत्वाने असेल, त्या दोषाने त्या गर्भशरीराची प्रकृती बनते. त्रिदोषाची साम्यावस्था असताना समप्रकृती बनते. चरकाचार्य हिला ‘दोष प्रकृती’ म्हणतात. दोषप्रकृती सात प्रकारच्या आहेत: वातप्रकृती, कफप्रकृती, पित्तप्रकृती, द्विदोषज प्रकृती (वातपित्तज, कफपित्तज व वातकफज) व त्रिदोषज प्रकृती (तिन्ही दोषांची मिळून). यांपैकी वातप्रकृती हीन, पित्तप्रकृती मध्यम आणि कफप्रकृती उत्तम होय व सर्व दोष ज्यामध्ये समप्रमाणात आहेत ती प्रकृती श्रेष्ठ असते. ( → प्रकृति).

प्रकृतीच्या उत्पत्तीस शुक्रशोणित यांतील दोष, कालगर्भाशयस्थ दोष, मातेचा आहारविहार, महाभूतांचे विकार हे चार घटक कारणीभूत असतात. विषात उत्पन्न झालेल्या किड्याला जसे ते विष मारक होत नाही, तशी प्रकृती मनुष्याला घातक किंवा अतिबाधक होत नाही. जाती, कुल, देश, काल, वय, बल व संपूर्ण देह यांचेही शुक्रशोणित संयोगाच्या वेळी परिणाम होतात व त्या त्या स्वभावाच्या प्रकृती बनतात.

काही तज्ज्ञांच्या मते पंचमहाभूतांचीही प्रकृती असते. वायूची वात, अग्नीची पित्त व जलाची कफ प्रकृती असते. पार्थिव प्रकृतीचे लोक शरीराने स्थिर, धिप्पाड व क्षमावान असतात. आकाशीय लोकांच्या शरीराची रंध्रे प्रकृतीने मोठी असतात आणि ती व्यक्ती पवित्र व दीर्घजीवी असते.

एकदोषज प्रकृती तीन आहेत : वातप्रकृती, पित्तप्रकृती व कफप्रकृती. द्विदोषज प्रकृतीत दोन्ही दोषांचे व त्रिदोषज प्रकृतीत तिन्ही दोषांचे गुण असतात. या प्रत्येक प्रकारची विशिष्ट शारीरिक व स्वभावधर्मीय लक्षणे आयुर्वेदात दिलेली आहेत. सात्त्विक, राजस, तामस अशा गुणाधिष्ठित प्रकृती-प्रकारांचे वर्णनही आयुर्वेदात आहे, यांखेरीज भौतिक प्रकृती व महाप्रकृती असेही एक वर्गीकरण केल्याचे दिसते. ( → प्रकृति).

उत्तमांग शारीर : मनुष्यशरीराच्या सहा अंगांपैकी शिर या प्रमुख अंगास ‘उत्तमांग’ म्हणतात. हे डोळे, कान, जिव्हा इ. प्रधान इंद्रियांचे आश्रयस्थान आहे. याचे अन्तःशिर व बाह्यशिर असे दोन भाग आहेत. अन्तःशिर म्हणजे डोक्याच्या कवटीच्या आत असणारा मज्जाघटित अवयव. यास मेंदू, मस्तुल्लुंग किंवा मातुलुंग म्हणतात. हा शिरामध्ये थिजलेल्या लोण्याच्या गोळ्याप्रमाणे दिसतो. इंद्रियांची नियंत्रण केंद्रे व इंद्रिय प्राणवह स्रोतास तेथे असतात. कार्यकारी शक्तीचा साठा असलेला म्हणजेच बलाचे आधान असलेला हा घटक आहे. बाह्यशिर म्हणजे शिरकपालास्थींनी बनलेली डोक्याची कवटी, तिच्यावरील चपटे स्नायू, त्वचा व केश, शंखास्थी, नासास्थी, कर्णास्थी, हन्वस्थी व मन्याकशेरुक (मानेचे मणके) तिला संलग्न असतात. कपाळ, मुख, नाक, डोळे, कान तसेच पुरस्तालू व पश्चतालू यांत येतात.

मुख : हनुवटीपासून कवटीच्या शेवटच्या कडेपर्यंतचा भाग, बारा अंगुळे उंची व चोवीस अंगुळे घेराचा भाग (अंगुळ म्हणजे मध्यम बांध्याच्या पुरुषाच्या मधल्या बोटाच्या मधल्या पेराची जास्तीत जास्त रुंदी). दोन ओठ, दात, दाताची मुळे, जीभ, टाळू व गळा ही मुखरोगाची सात स्थाने आहेत. ते बहिर्मुख स्रोतास व मलायन आहे. ओठांची लांबी चार अंगुळे असते. यांत दोन संधी, दोन पेशी असतात. रसधातूमुळे चेहरा स्निग्ध व प्रसन्न दिसतो. रक्तामुळे आरक्त, मांसामुळे मृदू, मेदामुळे स्निग्ध दिसतो व शुक्रामुळे विशेषतः पुरुषांच्या ओठावर मिशी दिसते.

जिव्हा : जीभ हा रस जाणणारा अवयव आहे. ही कर्मेंद्रियसुद्धा आहे. अग्नीवर फुंकीत राहिल्याने सोन्यापासून जसे शुद्ध सुवर्ण निघते, त्याप्रमाणे कोठ्यात पचन होणाऱ्या कफ, रक्त व मांस यांच्या सारभूत भागापासून जीभ निर्माण होते.

तालू: (टाळू). तोंडातील अवयव, जलवह स्रोताचे हे मूळ आहे. गुळगुळीत, रक्तवर्णाचा मुखविवरातील भाग. पुरो, मध्य व पश्चतालू असे तीन विभाग. यात दोन पेशी असतात. ह्याचे त्वचा, पेशी व ताल्वस्थी हे तीन घटक आहेत.

दंतमांस : हिरडी. ही रक्त व मांस धातुघटित असते. दात पक्के ठेवणे हे तिचे कार्य.

दंतमूळ : दाताच्या उत्पत्तीचे स्थान.

कंठ : (गळा, घसा). प्राणाच्या दहा स्थानांपैकी एक. कंठ हे कफाचे स्थान आहे. कंठापासून आमाशयापर्यंत अन्न नेणारी कंठनाडी किंवा गलनाडी असते. ती तरुणास्थींनी बनते. तिच्यात तीन मंडल संधी असतात. कंठात एक पेणी असते. कंठनाडीच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी दोन नीला, ग्रीवासिरा आहेत. कंठनाडीच्या पोकळीत स्वरोत्पादक मांसरज्जू आहे.

दात : (रुचक, द्विज). प्रत्येक दाताचे दंतत्वचा, दंतास्थी, दंतमज्जा असे घटक असतात. दात हे रुचकास्थी प्रकारात मोडतात. साधारणपणे जन्मानंतर सहाव्या महिन्यापासून दात येऊ लागून सहाव्या वर्षी पडू लागतात. मग पुन्हा वर येतात व साठाव्या वर्षी पडू लागतात, त्यानंतर पुन्हा येत नाहीत. मुलींचे दात लवकर येतात व त्रास कमी होतो कारण दात मऊ, अधिक घट्ट व स्थिर स्वभावी असतात. दात दोनदा येतात. म्हणून त्यांना ‘द्विज’ म्हणतात. ह्याला स्वभाव हेच कारण आहे. एकूद दात ३२ असून वरचे १६ व खाली १६ असतात. राजदंत, सुळे, उपदाढा, दाढा असे त्याचे प्रकार असतात. दातांचे स्वरूप, टिकाऊपणा वगैरे शुक्रशोणिताच्या गर्भाधान काळाच्या स्थितीवर, आनुवंशिकतेवर आणि बालकाच्या शरीरवाढीवर अवलंबून आहेत. दातांची रचना चार प्रकारची असते: (१) सामुद्‌ग : खोलगट, मूळ क्षयी असेल तर सामुद्‌ग. हे लवकर पडतात. (२) संवृत्‌ : आत गेलेले. हे नेहमी घाण राहतात. (३) वितृत्‌ : बाहेर आलेले, उघडे असतात. बाहेरची घाण येते, लाळ सुटते, ते सडतात, रंग वाईट होतो. (४) सर्वगुणसंपन्न : आठव्या महिन्यात येणारे दात सर्वगुणसंपन्न असतात. ते सलगपणे एका मालिकेत असतात.

इंद्रियपंचपंचक : इंद्रिय, इंद्रियद्रव्य, इंद्रियाधिष्ठान, इंद्रियार्थ व इंद्रिय बुद्धी या पाचांचे प्रत्येकी पाच प्रकार आहेत.  म्हणून या सगळ्यांना ‘इंद्रियपंचपंचक’ म्हणतात.

इंद्रिय : विषयाचे ज्ञान होण्याकरिता तसेच कर्म करण्याकरिता उपयुक्त असा शरीरातील एक घटक. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये हे त्यांचे दोन प्रकार. कान, त्वचा, डोळा, नाक व जीभ ही बाह्य ज्ञानेंद्रिये आहेत. वाचा, हात, पाय, गुद व जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये आहेत. अशी दहा बाह्येंद्रिये होत. मन हे आंतरिंद्रिय असून ते ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय असे उभयात्मक आहे. वैद्यकात इंद्रिये ही भौतिक समजली जातात. ती प्रतिक्षणी क्षीण होणारी आहेत. आहाररसातील पोषक द्रव्ये कोष्ठाग्नीतील त्या त्या धात्वाग्नीच्या अंशाने पचविली जातात. त्यातील पंचेंद्रिय द्रव्यांची पोषक द्रव्येही त्या त्या अग्नीने पचविलेली असतात. ती पोषक इंद्रियद्रव्ये होत.

इंद्रियद्रव्ये : पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते इंद्रियद्रव्ये आहेत.


पंचइंद्रियाधिष्ठाने : ज्ञानेंद्रियांचे आश्रयस्थान. जसे डोळा हा चक्षू या इंद्रियाचे स्थान आहे. नेत्र, कर्ण, नासा, जिव्हा व त्वचा ही पाच इंद्रियांची अधिष्ठाने आहेत.

पाच इंद्रियार्थ : चक्षुरादी ज्ञानेंद्रियांना ग्रहण करण्यासारखे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध.

पंच बुद्धिंद्रियाणी : इंद्रियांनी होणारे ज्ञान उदा., डोळ्याने होणारे चाक्षुषज्ञान. ते क्षणिक आणि निश्चयात्मक असे दोन प्रकारचे असते. स्पर्श, रस, गंध, रूप आणि श्रवण यांची इंद्रियी हीच बुद्धिंद्रिये होत. बुद्धी म्हणजे तात्कालिक ज्ञान, निश्चित ज्ञान, निश्चयात्मक ज्ञान, इंद्रिय, इंद्रियार्थ, मन व आत्मा यांच्या संयोगाने बुद्धी उत्पन्न होते.

ज्ञानेंद्रियाधिष्ठाने : चक्षुरिंद्रियाधिष्ठान : डोळा हे तेच महाभूताच्या आधिक्याचे एक ज्ञानेंद्रिय आहे. त्यामुळे आपण वस्तू पाहू शकतो. शिर हे डोळ्याचे संश्रयस्थान आहे. डोळ्याचा विषय `रूप’ आहे. तो तेजस असला, तरी नेत्रातील मांस पार्थिवाचे, श्वेतमंडल जलतत्त्वाचे, रक्त अग्नीमुळे, कृष्णमंडल वातामुळे व अश्रुमार्ग पोकळी आकाशामुळे निर्माण झाले आहेत. डोळा हे पित्ताच्या स्थानांपैकी एक स्थान आहे. त्यात आलोचक पित्तामुळे रूपाचे ग्रहण होते, व्यानवायू (सर्व शरीर व्यापून राहणारा पंचप्राणांपैकी एक वायू) या वायूमुळे हालचाल, उघडमीट होते, प्राणवायूमुळे रूप-ज्ञानाचे ग्रहण होते, तर्पक कफामुळे डोळे प्रसन्न व स्वस्थ ठेवणे या क्रिया होतात. 

डोळ्याचे बुबूळ हे दोन अंगुळ लांब असून आंगठ्य़ाच्या मध्यभागाइतके रुंद व अडीच अंगुळ परिघाचे असते. डोळ्याचा आकार द्राक्षाप्रमाणे किंवा गोस्तनाप्रमाणे असतो. डोळ्यांत पक्ष्ममंडल, वर्त्ममंडल, श्वेतमंडल, कृष्णमंडल व दृष्टिमंडल अशी पाच मंडले आहेत. डोळ्यांत पाच संधी आहेत. वर्त्ममंडल व पक्ष्ममंडल ह्यांचा, श्वेतमंडल व कृष्णमंडल ह्यांचा, कृष्णमंडल व दृष्टिमंडल ह्यांचा, वरच्या व खालच्या पापणीच्या कानाकडील बाजूस अपांग संधी व नाकाकडील बाजूस कनीनक संधी आहे. डोळ्यात सहा पटले आहेत. दोन वर्त्म पटले बाहेर आहेत. एक वरची पापणी, खालची पापणी व दृष्टीची चार पटले आभ्यंतर आहेत. त्यातील पहिले पटल तेज व जलाश्रित, दुसरे पटल मांसाश्रित, तिसरे पटल मेदाश्रित, चौथे पटल अस्थिआश्रित आहे. यांचा क्रम आतून बाहेरच्या बाजूस असा असतो.

दृष्टी ही मसुराच्या डाळीएवढी असते व ती पाचही महाभूतांच्या सारभागापासून निर्माण होते. काजव्याप्रमाणे चमकणारी उपनिर्दिष्ट चार पटलांची पोकळी अशी असते. कालकास्थी नावाच्या हाडाच्या खोबणीत नेत्रगोलक बसवलेले असते. त्य़ामुळे ते सुरक्षित असते. डोळ्यांत अश्रुमार्ग असतात. ते शेवटी नाकात उघडतात. नेत्र हा ऊर्ध्वजत्रू भागातील नऊ बहिर्मुख स्रोतसांपैकी एक स्रोतस आहे. डोळ्यामध्ये वातवह, कफवह व रक्तवह शिरा प्रत्येकी आठ व पित्तवह शिरा दहा आहेत. दोन ऊर्ध्वगामी रूपवह धमन्या आहेत. भुवईच्या टोकाशी थोडे खाली अपांग मर्म आहे. भुवयांच्या वर खोलगट भागांत आवर्त मर्म आहे. ही मर्मे विद्ध झाल्यास आंधळेपणा किंवा डोळ्यात व्यंग निर्माण होते. ही दोन्ही वैकल्यकर मर्मे आहेत. तसेच शृंगाटक मर्मात नेत्रसिरा जातात. हे सद्यप्राणहर मर्म आहे व शरीरातील आमाशय, रक्तवह स्रोतस व पादतल (पायांचे तळवे) या अवयवांवर जर आघात झाला, तर त्याचा किंवा ह्या अवयवातील दोषदुष्टीचा परिणाम डोळ्यांवरही होतो.

गंधेंद्रियाधिष्ठान : (नाक). डोक्याचे एक प्रत्यंग आहे. घ्राणेंद्रियाचे अधिष्ठान म्हणजे नाक. गंध हा पृथ्वी महाभूताचा गुण आहे. तो सुगंध व दुर्गंध असा दोन प्रकारचा आहे. नासा हे कफस्थान आहे. नासा हे गंधज्ञान करून देणारे इंद्रिय आहे. त्याला बहिर्मुख स्रोतस म्हटलेले आहे. मांसमल, कफदोष (शेंबुड) व शिरस्थ दोष बाहेर घालवणारे हे बहिर्मुख स्रोतस आहे. नाकामुळे जसा वास कळतो, तसेच श्वासोच्छवासाचे कार्यही केले जाते. श्वास आत घेण्याचे कार्य प्राणवायू करतो आणि मल व त्याज्य पदार्थ उच्छवासावाटे बाहेर टाकण्याचे कार्य उदान वायू (पंचप्राणांपैकी एक वायू) करतो.

नाक हे उदान वायूचे संचारस्थान आहे. षडंगांपैकी शिरो ग्रीवम्‌ या भागात नेत्राच्या मधोमध व खाली नाकाचे स्थान आहे. आयुर्वेदात नाक हे डेक्याचेद्र म्हणजेच शिरःसंपुटात असलेल्या मस्तिष्कापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. त्यात टाकलेले औषध शृंगाटक स्रोतसात येऊन डोक्यात व डोळे, कान, घसा इ. ठिकाणच्या सिरांच्या तोंडात पसरून, व्यापून मानेच्या वरच्या दोषांना खेचून बाहेर काढते. या प्रकारला `नस्य’ म्हणतात.

घ्राणनाडी ही गंधज्ञान करून देणारी नाडी डोक्याच्या अधस्तलापासून नाकाच्या वरपर्यंत पसरलेली आहे. शिवाय नाकाच्या मूळ भागात चाळणी पटल हा अनेक सूक्ष्म छिद्रे असलेला अस्थीचा भाग आहे. त्या छिद्रातून घ्राणनाडीच्या अनेक शाखा नासामूळाजवळ अंतःकलेत पसरलेल्या असतात. नासाचे दोन भाग पडतात : (१) बहिर्नासा किंवा नासावंश, (२) अंतर्नासा किंवा नासा गुहा.

बहिर्नासा किंवा नासावंश : नाकाचा दोन्ही बाजूंचा बाहेरचा भाग हा त्वचा, कला, मांसपेशी व अस्थींनी बनलेला आहे. त्याचे एकूण आठ भाग असतात : (१) नासामूळ (२) नासापृष्ठ, (३) दोन नासापक्ष, (४) नासाग्र (५) नासापुट, (६) नासाविवर, (७) दोन नासापालिका, (७) दोन नासावंश (गुहा).

दोन्ही भुवयांच्या मध्ये थोडे खाली नाकाचे मूळ (नासामूळ) आहे. नाकाच्या प्रत्येक बाजूवर पाच-पाच पेशी संबद्ध आहेत. त्यांनी ओष्ठ, नासा, कपाळ इत्यादींची हालचाल होते. वातवह, पित्तवह, कफवह, रक्तवह अशा प्रत्येकी सहा सिरा मिळून एकूण २४ सिरा आहेत. तरुणास्थींनी बनलेल्या नासापटलामुळे दोन नासापुटे होतात. नाकाच्या मार्गात आतल्या बाजूस दोन्हीकडे `फणा’ मर्म आहे. हे वैकल्यकर मर्म आहे. ह्यावर आघात झाला असता गंधज्ञान नाहीसे होते.

श्रवणेंद्रियाधिष्ठान : (कान). हे श्रोत्रेंद्रियाचे अधिष्ठान आहे. डोळ्याचा कानाकडील कोपरा व कान यांतील अंतर पाच अंगुळे असते. शब्दाचे ज्ञान देणारे हे इंद्रिय आहे. हे आकाशभूयिष्ठ इंद्रिय आहे. कान शंखास्थीच्या आत व बाहेर पसरलेला असतो.

(१) श्रोत्र शृंगाटक : कानाच्या पोकळीच्या आतील भाग. या भागात शंखाच्या वेटोळ्यासारखे दोन वाटोळे संधी असतात. (२) बहिःकर्ण : शंखास्थीच्या बाहेर तरुणास्थीने बनलेला व त्वचेने आच्छादित असा फनेलच्या आकाराचा हा भाग आहे. कर्णशष्कुली व कर्णकुहर हे त्याचे दोन मुख्य भाग. (३) कर्णपाळी : कानाच्या बाहेरची पाळी. कानाच्या दोन्ही पाळ्यांच्या खालच्या भागी दैवकृत्‌ छिद्र असून ते फक्त सूर्यकिरणातच दिसते. हे नैसर्गिक छिद्र आहे. (४) कर्णशष्कुली : याचा मुख्य उपयोग शब्द ग्रहण करणे व तो एकवटून कर्णकुहराकडे नेणे हा आहे. (५) कालिका : मर्मरिका व लोहितिका या नावाच्या सिरा कर्णपालिकेत असतात. (६) मर्म : विधूर मर्म हे कानाच्या पाठीमागच्या हाडात खालच्या भागी असते, त्यावर आघात झाल्यास बहिरेपणा येतो. (७) स्रोतस : कर्णछिद्रापासून आत कर्णपटलापर्यंत विवरासारखे बहिस्रोतस असते. मांसमल त्यातून स्रवतो. (८) संधी : शंखाच्या आवर्ताप्रमाणे दोन शंखावर्त संधी असतात. (९) धमनी : शब्दवहन करणाऱ्या दोन ऊर्ध्वगामी धमन्या असतात.

बाह्यकर्णात आतील कला व त्वचा यांत असलेल्या स्नेहग्रंथी स्निग्ध मल उत्पन्न करतात.


स्पर्शनेंद्रियाधिष्ठान : (त्वचा). शरीराच्या सर्व अंगप्रत्यंगाच्या बाहेरून सभोवार असे एक संरक्षक आवरण असते. त्यालाच ‘त्वचा’ म्हणतात. ही शरीराचे संरक्षण करते. त्वचा ही पाच ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. त्वचा मांसधातूचा उपधातू आहे. मांसपोषक घटकांचे वहन करणाऱ्या स्रोतसाचे मूळ आहे. त्वचा ही स्पर्शनेंद्रियाचे अधिष्ठान आहे. तिच्यामुळे स्पर्श कळतो.

त्वचेची उत्पत्ती वायूपासून होते. वायू महाभूताचे ते अधिष्ठान आहे. शुक्र व आर्तव संयोग होऊन गर्भ बनत असताना ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते, त्याप्रमाणे अग्नी व पित्त यांमुळे रक्ताचे पचन होत असताना उदकधरा, रक्तधरा, मांसधरा, मेदोधरा, अस्थिधरा व मज्जाधरा अशा सहा त्वचांच्या रूपाने जणू साय येते व त्वचेचे स्तर निर्माण होतात. सुश्रुतमताने त्वचेचे स्तर निर्माण होतात. सुश्रुतमताने त्वचेचे स्तर सात आहेत. बाहेरून आत जाणारे हे सात स्तर असे : (१)अवभासिनी, (२) लोहिता, (३) श्वेता, (४) ताम्रा, (५) वेदिनी, (६) रोहिणी, (७) मांसधरा. यांच्या आश्रयाने क्रमाने शिबे, व्यंग, चर्मदळ, कोड, कुष्ठ, ग्रंथी, विद्रधी इ. विकार होतात.

प्रत्येक त्वचा विशिष्ट जाडीची असून उदरावरील, मांसल भागातील स्फिक्‌ (नितंब), उर, मान इ. भागांत सर्व त्वचांची मिळून जाडी आंगठ्याच्या पहिल्या पेराइतकी असते आणि कपाळावर व बोटावर ती कमीजास्त पातळ असते. त्वचेत इंद्रियधारक प्राणवायूचा संचार असतो. त्वचेत भ्राजकपित (अग्नी) असते. त्यामुळे त्वचेवर तेल लावल्यास त्याचे पचन होऊन ते शोषले जाते व त्वचा सतेच दिसते. त्वचा रसधातूचा आधार आहे व मांसाचा उपधातू आहे.

मेदाचा मल म्हणजे घाम त्वचेतून बाहेर टाकला जातो. त्वचेवरील केस व नख अस्थिधातूचा मल आहे. त्वचेवरील लवेचा रसधातूशी संबंध आहे. मेंढ्रावरील लव व योनीवरील लव यांचा स्त्रीपुरुष-शुक्राशी संबंध आहे. त्वचेवरील छिद्रे मज्जाधातूच्या मलाचे बहिर्मार्ग आहेत. तिचा मऊपणा तेज धातूच्या सारासारत्वावर अवलंबून आहे. त्वचेचे तेज व निश्चित स्पर्शज्ञान रक्तधातूवर अवलंबून असते. तिर्यग्गामी धमन्यांच्या शाखोपशाखा त्वचेवर सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांच्याकडून सुखदुःखात्मक स्पर्श ग्रहण केले जातात. पंचमहाभूतजन्य पंचविध छाया, वर्ण त्वचेवर व्यापलेले असतात.

रसनेंद्रियाधिष्ठान : (जिव्हा, जीभ). तोंडातील रस जाणणारा अवयव व रसनेंद्रियाचे अधिष्ठान. हे कर्मेंद्रिय आहे. कफ, रक्त व मांस यांच्या सारभूत भागापासून ते उत्पन्न होते. गो म्हणजे वाणीचे कारण (साधन) होणारी जीभ म्हणून ती गोजिव्हा. जिभेत बोधक कफाचे अधिष्ठान असल्यामुळे रसाचा बोध होतो. त्याचे ज्ञान प्राणवायूच्या वहनकार्यामुळे होते. बोलण्याचे कार्य उदानवायूमुळे होते. प्राकृत जीभ ही लांब-रुंद, गुळगुळीत, पातळ, व्यंगरहित, पाटळीच्या फुलाप्रमाणे गुलाबी रंगाची असते.

जिव्हाबंधनम्‌ : जिभेच्या समोरच्या खालच्या बाजूस मधोमध एक शिवण आहे. तिला बंधन म्हणतात. ते घट्ट असेल, तर बालकास स्तनपान करणे व तालव्य वर्ण उच्चारण करणे कठीण होते. हे महामर्म असल्यामुळे त्यावर शस्त्रकर्मामुळे आघात झाल्यास अत्यंतिक तीव्र वेदना होतात. दहा प्राणायतनांमध्ये जिव्हाबंधन मोहते. जीभ ही महामर्म आहे. जीभ ही गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा रसांची संवेदना मस्तिष्कापर्यंत पोचविते. तीमध्ये एक पेशी असते. जिभेमध्ये वात, पित्त, कफ व रक्तवह यांच्या प्रत्येकी नऊ म्हणजे एकूण 36 सिरा आहे. रसवहन करणाऱ्या दोन ऊर्ध्वगामी धमन्या जिव्हासंबंद्ध आहेत. दोन धमन्या बोलण्याचे कार्य करतात. दोन धमन्या अव्यक्त शब्दोच्चार करतात. नाभी, उर, कंठ व मुखातील दात, तालू, ओठ इत्यादींच्या साहाय्याने परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरीरूपी चतुर्विध वाणी प्रकट होते.

कर्मेंद्रियाधिष्ठाने : कर्म करणारी इंद्रिये : हात, पाय, गुद, जननेंद्रिय व वाचा ही पाच कर्मेंद्रिये आहेत.

शाखा शारीर : ऊर्ध्वशाखा : ऊर्ध्वशाखा म्हणजे डावा व उजवा हात. गर्भवृद्धी होत असताना तिसऱ्या महिन्यात शाखांची अभिव्यक्ती होते. चौथ्या महिन्यात प्रव्यक्तता येते व सातव्या महिन्यात पूर्ण व्यक्तता येते. संधी एकूण १७ आहेत. ते असे : आंगठ्यातील पेरांचे -२, इतर चार बोटांच्या पेरांचे प्रत्येकी तीन मिळून -१२, मनगटातील-१, कोपराचा -१, काखेतील -१. स्नायू ३०० असून प्रतानवती व कंडरा स्वरूपाचे स्नायू शाखेत असतात. त्याचे बाह्यस्नायू व अंतःस्नायू असे दोन प्रकार आहेत. पेशी १०० आहेत. तलहृदय, कूर्च, कूर्चशिर, क्षिप्र, मणिबंध, इंद्रबस्ती, कूर्पर, आणि, बाहवी, लोहिताक्ष, कक्षधर अशी एकूण अकरा मर्मे असतात. वातवह, पित्तवह, कफवह व रसवह अशा प्रत्येकी २५ मिळून एकूण १०० सिरा असतात. काही धमन्या ऊर्ध्वगामी व तिर्यग्गामी असतात.

हाताची प्रत्यंगे : (१) भुज : खांदा ते कोपर यांमधील भाग. यालाच `प्रबाहू’ म्हणतात. याची लांबी १६ अंगुळे असते. (२) प्रकोष्ठ : कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. यालाच `प्रपाणी’ म्हणतात. याची लांबी १६ अंगुळे असते. (३) मणिबंध हस्त : मनगटापासून तळवे, बोटे व नखे हा सर्व मिळून बनणारा भाग.

अधःशाखा : अध:शाखा म्हणजे उजवा व डावा पाय. ऊर्ध्वशाखेप्रमाणेच अधःशाखेचे शारीर आहे. अधःशाखेतील प्रत्यंगांची नावे मात्र पुढीलप्रमाणे आहेत : (१) कूर्परसंधीऐवजी जानुसंधी, (२) मणिबंधाऐवजी गुल्फसंधी. (३) कक्षेऐवजी वंक्षण, (४) कक्षधर मर्माऐवजी विटप मर्म, (५) बाहवी मर्माऐवजी और्वी मर्म.

कोष्ठ शारीर : शरीरातील आम, अग्नी व पक्व यांचे स्थान म्हणजेच सर्व उदर (खालचा कोठा). आमाशय, पक्वाशय, अग्न्याशय, मूत्र व रक्त यांचे आशय, हृदय, उंडुक, फुफ्फुस या सर्व प्रत्यंगांचे स्थान म्हणजे कोष्ठ होय. हृदय व फुफ्फुस यांना उरःकोष्ठ म्हणतात. आमाशय ते पक्वाशय मिळून अन्तकोष्ठ किंवा महास्रोतस होते. यकृत, प्लीहा, गर्भाशय, वृक्क इ. मिळून अन्तकोष्ठ म्हणजे उदरकोष्ठ. कठीण, मृदू, मध्यम, सम असा चार प्रकारचा कोठा असतो. कठीण कोठ्यात वातकफाचे आधिक्य असते. रेचक लागू होण्यास त्याला अधिक कालावधी लागतो. मृदू कोठा पुष्कळ पित्ताने युक्त असतो. त्याला दुधानेही रेच होतात. मध्यम कोठा कफाधिक्ययुक्त असतो. सम कोठ्यात तिन्ही दोष सम असतात.

आमाशय : हा पंधरा कोष्ठांगापैकी एक असून अन्नवह स्रोतसाचे मूळ आहे. कफ व विशेषतः पित्ताचे स्थान आहे. आमाशय हा अन्तकोष्ठाचा सुरुवातीचा अवयव असून त्यात चारही प्रकारचे अन्न पचते. तो छातीपासून नाभीपर्यंत पसरलेला असून अग्न्याशयांच्या वर असतो. येथे आर्द्रस्वरूप आहार खूप ओला, विरळ व सुखाने जिरण्यासारखा होतो. आमाशयात सुषिर स्नायू व दोन पेशी असतात.

पित्ताशय : पित्ताचे हे स्थान आमाशयाच्या खाली व पक्वाशयाच्या वर मधोमध असते. ग्रहणी, पच्यमानाशय, नाभी, लघ्वेत्र ही त्याची इतर नावे आहेत. रक्त, मांस यांच्या सार भागाचे अग्नीने पचन होत असता वायू आत शिरून पित्ताशय निर्माण करतो. हा सुषिर स्नायूंनी बनलेला व पोकळ असून येथे कायाग्नी असतो.

पक्वाधान : अन्न पचल्यानंतर जेथे धारण केले जाते ते स्थान. हे स्थान पक्वाशयाच्या खाली असते. वातस्थान, पुरीषाधार, पुरीषाशय, कटी, श्रोणी, वाताशय, अपानस्थान ही त्याची पर्यायी नावे आहेत. हे अपानवायूचे (पंचप्राणांपैकी अधोगामी वायूचे) स्थान आहे.

पक्वाशय : पंधरा कोष्ठांगापैकी एक. श्रोणी म्हणजे पक्वाधान, पुरीषाशय, पुरीषाधार, पक्वाशय व गुद यांच्या वर आणि नाभीच्या खाली डाव्या कुशीतला मोठ्या आतड्याचा भाग. हे पुरीषवह स्रोतसाचे मूळ आहे. पुरीषधरा कलेचे स्थान आहे. परिपक्व आहारद्रव्यांचा आशय आहे. याच परिपक्व आहारापासून उत्पन्न होणाऱ्या वाताचे हे स्थान होय.


ग्रहणीनंतरच्या गुदापर्यंतचा हे अवयव रक्तमांसाच्या सारभागापासून झालेला आहे. पक्वाशयाच्या शेवटी सुषिर स्नायू असतात. अधोभागी धमन्यांपैकी मलविसर्जन करणाऱ्या दोन धमन्या पक्वाशयाकडे येतात. त्याला स्थूलान्त्र – वाताशय असेही म्हणतात.

गुद : (उपस्थ). हा भाग स्थूलान्त्राच्या शेवटी असतो. मळ आणि वात खालून सोडणारे इंद्रिय. प्राणाचा आधार असलेल्या दहा स्थानांपैकी एक. गुद हे मांसमर्मांपैकी एक आहे. याला जोराचा आघात झाला, तर लवकर प्राणनाश होतो. गुद हे रक्त, कफ यांच्या साररूप अंशापासून झाले आहे. वरचे व खालचे असे त्याचे दोन भाग असतात. गुदास्थीच्या पोकळीत बस्ती, बस्तिशिर, शिश्न, वृषण व गुद इ. अवयव आहेत. यांच्याशी संबंधित कमरेतील पाच हाडे असतात. `त्यांना ‘श्रोण्यस्थी’ म्हणतात. गुदाचे बाहेरचे तोंड साडेचार अंगुळाचे मोठ्या आतड्याशी संबद्ध आहे. गुदामध्ये दीड दीड अंगुळांतराने तीन वळी आहेत. त्यांची प्रवाहिणी, विसर्जनी व संवरणी ही नावे आहेत. प्रवाहिणी मळाला गती देते व ढकलते. विसर्जनी मळ बाहेर टाकते व संवरणी ही गुद मिटविते. प्रत्येक वळी चार अंगुळे विस्तृत व एक अंगुळ जाडीची असते. पहिली वळी गुदाच्या ओठापासून एक अंगुळ अंतरावर आहे. वळीनंतर केसांची मर्यादा संपली की अर्ध्या अंगुळ अथवा दीड यव (यवाच्या-जवाच्या-दाण्याची लांबी) अंतरावर गुदाचा ओठ आहे व त्यावर केश असतात. पेशी आणि वातवह, पित्तवह, कफवह, रक्तवह या सिरा प्रत्येकी आठ असतात. मलविसर्जन करणाऱ्या अधोगामी धमन्या त्यांच्याशी संलग्न असतात.

आंत्र : (आतडी). कोठ्याचे एक अंग. रक्त व कफ यांच्या साररूप अंशापासून त्यांची उत्पत्ती होते. रक्त व मांस यांच्या साररूप अंशाचे अग्नीने पचन होत असताना वायू आत शिरून आतडी निर्माण होतात. आतड्याची लांबी पाच ते सात मीटर असते. (संहिताकारांनी आतड्याची लांबी पुरुषांमध्ये साडेतीन व्याम (लांबीचे एकक) व स्त्रियांमध्ये तीन व्याम असते असे सांगितले आहे).

वपावहन : हे मेदाचे स्थान आहे. वपा म्हणजे उदरातील तैल वर्तिका किंवा स्निग्ध वर्तिका. ही आंत्रास चिकटलेली असते. हिच्यामुळे आंत्र स्थिर राहण्यास मदत होते. हिच्यात मेद असतो.

क्लोम : कोष्ठाच्या पंधरा अंगांपैकी एक. जलवह स्रोतसाचे मूळ व तृष्णेचे (तहानेचे) क्लोम हे स्थान आहे. हृदयाच्या खाली, उजवीकडे यकृत व क्लोम आहे. यकृताच्या खाली आणि वृक्काच्या वर व डावीकडे आमाशय यांच्यामध्ये आडव्या नांगराच्या आकारासारखा हा अवयव आहे. कायाग्नीकडून समान वायूच्या (पंचप्राणांपैकी एक वायू) साहाय्याने रक्ताचे पचन झाल्यानंतर क्लोम निर्माण होतो. हा किंचित्‌ उन्नत असतो. तो सोमगुणभूयिष्ठ असून याच्या आत अग्नी असतो. वाग्भटाच्या मताने हा हृदयाच्या उजवीकडील मांसग्रंथी आहे. क्लोमाच्या नाडीचा संधी मंडलाकृती आहे. हृदयावर आघात झाल्यावर क्लोम खेचले जात असल्याची वेदना होते.

गर्भाशय : योनीच्या आत तिसऱ्या वर्तुळ विभागात वळणावर याचे स्थान आहे. स्त्रीशरीरात बस्तीच्या मागे गर्भाशयाचे स्थान आहे. हा कटिप्रदेशातील अवयव असून रोहित माशाच्या तोंडाप्रमाणे याचा आकार असतो. बाहेर तोंड लहान पण आत मोठा अवकाश असतो. त्याच्यावर अंतस्त्वचेचे आवरण असते. गर्भाशयाच्या मुखाशी तीन पेशी असून त्या शुक्रवेगास मदत करतात. सूक्ष्म केशवाहिन्या, सिरा गर्भाशयात रक्तपूरण करतात. महिन्याच्या अंतराने बीजही पुरवितात. गर्भाशयाचे तीन स्तर आहेत. तो त्र्यावर्त आहे. सर्वांत आतील स्तर हा अत्यंत पातळ आहे. त्यालाच `गर्भशय्या’ असे म्हणतात. ही गर्भशय्या रक्तघटित आहे. दुसरा स्तर हा स्नायूंचा आहे. तिसरा स्तर हा आंतरावरणाचा आहे. गर्भाशयाच्या वरील भागात बीजवह नलिकांची दोन तोंडे दोन बाजूंना उघडतात. त्यातून स्त्रीबीज भर्गाशयात येते. गर्भाशय हा अवयव स्नायुमय आहे म्हणजे मांसमेदोघटित आहे. स्नायू हे मेदोधातूचे उपधातू होत. चिवटपणा व धारणाशक्ती हे अस्थिधातूचे दोन गुण या स्नायूमध्ये प्रकर्षाने आढळून येतात. गर्भाशय हा रस, रक्त, मांस, मेद आणि शुक्र या धातूंच्या कक्षेत येणारा अवयव आहे. यामुळे या धातूंच्या वृद्ध क्षीणतेचा परिणाम गर्भाशयाच्या कार्यावर होत असतो. आर्तववह स्रोतसाचे मूळ गर्भाशय असते. आर्तववहन करणाऱ्या दोन अधोगामी धमन्या गर्भाशयाकडे येतात. शुक्रधातूचा विशेष ताबा या अवयवावर आहे. गर्भाशय ही स्नायुमय पोकळ पिशवी बाजूला असणाऱ्या स्नायुमय संधिबंधनांनी ताणून धरली आहे. पुढच्या बाजूने मूत्राशयाचा व मागच्या बाजूने मलाशयाचा तिला आधार आहे परंतु ती कोठेही चिकटलेली नसल्याने मागे किंवा पुढे कलू शकते. गर्भधारणा व गर्भवृद्धी ही गर्भाशयात होते.

गर्भधारणा नसलेल्या गर्भाशयात पोकळी अत्यंत कमी असते. गर्भाशयाच्या भित्ती जाड असतात. गर्भधारणा झाली की गर्भाबरोबर आतली पोकळी वाढत जाते व भित्ती पातळ होत जातात आणि रसरक्ताच्या होणाऱ्या पुरवठ्याने गर्भधारणेची गर्भाशयाची शक्ती वाढत जाते. गर्भ, गर्भोदक व अपरा इ. सहज राहू शकतील एवढी आतील पोकळी मोठी होते. प्रसूतीनंतर गर्भाशय परत पूर्ववत होते. गर्भाशयाचे गर्भाशय व गर्भाशयमुख असे दोन भाग आहेत. गर्भाशयमुखाचा काही भाग अपत्यपथात शेवटी असतो व बाकीचा गर्भाशयाबरोबर वर असतो. गर्भाशयमुखातून आतपर्यंत नलिकावजा मार्ग असतो. या नलिकेचे एक मुख गर्भाशयात व दुसरे मुख अपत्यपथात असते. अन्तःफलकोषाशी गर्भाशयाचा संबंध असतो. कटीकडे येणाऱ्या सिरा गर्भाशयाकडे येतात. रजःस्राव गर्भाशयमुखातून बाहेर पडतो. गर्भाशयमुखातून वरील नलिकेने पुरुषबीज व शुक्र गर्भाशयात शिरून त्याचा स्त्रीबीजाशी संयोग झाल्यास गर्भधारणा होते. कटी हे अपानवायूचे स्थान आहे. त्यामुळे शुक्र, रज, पुरीष, मूत्र व गर्भ ह्यांना शरीराबाहेर घालविण्याचे काम अपानवायू करतो.

अंतःफलकोष : कटीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस पेशींनी आच्छादलेले ग्रंथीप्रमाणे असणारे दोन अवयव. स्त्रीबीज त्यात उत्पन्न होऊन ऋतुकाळात गर्भाशयात येते.

यकृत : पंधरा कोष्ठांगापैकी एक, रंजकपित्ताचे स्थान व रक्तवहस्रोतसाचे मूळ. ते रक्तधरा कलेचे स्थानही आहे. ते रक्तापासून तयार होते. रसधातू यकृत, प्लीहेमध्ये आल्यावर तेथील रंजकपित्ताने त्याला लाली येते. यकृताच्या रक्तधरा कलेत रक्त तयार होते. त्या रक्तामुळे इतर रक्तस्थानांना बल मिळते. यकृत व प्लीहा हे दोन अवयव हृदयाच्या खाली आहेत. यकृत उजवीकडे व प्लीहा आमाशयाच्या डावीकडे किंचित पाठीमागे असते. प्रत्येकात दोन दोन पेशी आहेत.

प्लीहा : पंधरा कोष्ठांगापैकी एक. याला पानथरी कौलू म्हणतात. त्याचे स्थान हृदयाच्या खाली आमाशयाच्या डावीकडे किंचित पाठीमागे असते. प्लीहा हे रंजकपित्ताचे स्थान. रक्तधरा कलेचे स्थान व रक्तवहस्रोतसाचे मूळ आहे. ते रक्तापासून बनलेले कोष्ठांग आहे.

वृक्क : (मूत्रपिंड). पंधरा कोष्ठांगापैकी एक. शरीरात दोन मूत्रपिंडे असून ती पाठीच्या मणक्याच्या उजवीकडे व डावीकडे असतात. रक्त व मेद यांच्या सारभागापासून त्यांची उत्पत्ती होते. वृक्क हे मेदोवहस्रोतसांचे मूळ आहे.

बस्ती : पंधरा कोष्ठांगापैकी एक. मूत्राशय (बस्ती) हा वृक्कात तयार झालेल्या मूत्राचा साठा करतो. ते दहा प्राणायतनांपैकी एक असून मूत्रवहस्रोतसाचे मूळ आहे. मांस व रक्त यांनी घटित, कटिप्रदेशाच्या आत आहे. स्थानाच्या दृष्टीने उदरस्थ मर्म व जातीने स्नायुमर्म आहे. त्या ठिकाणी मुतखडा काढण्याव्यतिरिक्त इतर कारणांनी व्रण झाला, तर ताबडतोब मरण येते. मुतखड्याच्या शस्त्रकर्मातही जर दोन बाजूंना व्रण झाला, तरीही मरण येते पण एकाच बाजूला जर मूत्राशय फाडला, तर मूत्रस्राव करणारा व्रण होतो पण तो योग्य उपायांनी भरून येऊ शकतो. याचा आकार चार अंगुळे आहे.


बस्ती हे सर्व मूत्रविकारांचे अधिष्ठान व मूत्राचे आधारस्थान आहे. त्याचे तोंड खाली असून सिरा-स्नायू यांनी वेष्टिलेल्या अत्यंत पातळ त्वचेचा हा अवयव आहे. मूत्रवाही नाड्या (गविनी) बस्तीला वरच्या भागी उजवीकडे व डावीकडे येऊन मिळतात. बस्तीच्या अधोभागी मूत्रप्रसेक नावाचे छिद्र असते. बस्तीचे तोंड खाली असून त्यात येणाऱ्या मूत्रवह नाडीमध्ये हजारो सूक्ष्म स्रोतसांतून एकसारख्या पाझरणाऱ्या मूत्ररूप द्रवाने तो भरतो. त्याच सूक्ष्म स्रोतसांनी दुष्ट वातादी दोषसुद्धा बस्तीत प्रवेश करून आघात करतात व प्रमेह निर्माण करतात. स्वस्थानात विलीन झालेले शुक्र तेथून चलित होऊन शुक्रवाही स्रोतसांनी स्रवून बस्तीमध्ये भरले जाऊन मूत्रप्रसेक करणाऱ्या स्रोतसाने बाहेर जाते.

नाभी, पाठ, कंबर, अंड, गुद, वृषण, शिश्न या चार बाजूंना असलेल्या अवयवांच्या बरोबर मध्यावर ओटीपोटात ‘मूत्राशय’ असतो. पुरुषांत बस्तीच्या मागे दोन्ही बाजूंना शुक्रवहस्रोतस व डावीकडे गुद असते. स्त्रीशरीरात गुद व बस्ती यांमध्ये गर्भाशय असतो. बस्ती हा सुषिर स्नायुमय असून, रक्त व कफधातूच्या प्रसादरूप घटकांनी तो बनतो. त्यावर मार लागला, तर वायू, मूत्र, पुरीष यांचा अवरोध होतो.

कोष्ठसंबद्ध पण बाहेरील बाजूस असणारे अवयव : स्त्रीशरीरात अपत्यपथ व स्तन आणि पुरुषशरीरात मेंढ्र व वृषण हे या प्रकारात मोडतात.

अपत्यपथ : अपत्यपथ म्हणजे योनी किंवा स्त्रीचे गुह्यांग. भगोष्ठापासून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागास अपत्यपथ म्हणतात. मूत्रद्वाराच्या खाली अपत्यपथाचे बाह्यमुख असते. भगोष्ठावर रोम असतात. अपत्यपथातून मासिक पाळीच्या वेळी रजाचे उत्सर्जन होते. यात चार पेशी असतात.

स्तन : छपन्न प्रत्यंगांपैकी एक. स्तन दोन असतात. स्त्री व पुरुष दोघांच्याही उरोभागावर पर्शुकांच्या बाहेर मांसात त्वचेखाली स्तन असतात. स्तन हे बाहेर तोंड असलेले एक स्रोतस आहे. स्त्रियांचे स्तन बारा वर्षांनंतर शुक्रप्रादुर्भावाच्या वेळी यौवनात पुष्ट व मोठे होतात. पुरुषांचे होत नाहीत. गर्भधारणा झाल्यावर ते अधिक मोठे होतात. प्रसूतीनंतर तिसऱ्या दिवसानंतर स्तन्ययुक्त होतात. स्तन्य म्हणजे दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथी व स्तन्य स्तनचुचुकाकडे नेणाऱ्या दोन धमन्या स्तनामध्ये असतात. प्रत्येक स्तनात पाच पेशी असतात. त्यांनी स्तन पुष्ट होतात. रसवह सिरा स्तनांकडे रस घेऊन येतात. रसापासून स्तन्याची उत्पत्ती होते व अपत्य प्रेमामुळे स्तन्याची प्रवृत्ती होते. स्तन हे शुक्रवहस्रोतसाचे मूळ आहे.

स्तनरोहित व स्तनमूळ ही दोन्ही मर्मे स्तनप्रदेशाच्या भागात असतात. गर्भिणी व बाळंतिणीचे स्तन हे दुग्धयुक्त असतात. स्तनाच्या पुढे आलेल्या निमुळत्या टोकास स्तनचुचुक किंवा पिपालक म्हणतात. मातेच्या आहाररसाने गर्भावस्थेत गर्भाचे पोषण होते. त्यास सात्म्य झालेल्या रसापासून स्तन्य म्हणजे दूध निर्माण होते. हे स्तन्य बालकाची पुष्टी व वृद्धी करते. त्यामुळे बालकाची प्रतिकारशक्ती वाढते.

मेंढ्र : (शिश्न). शरीराबाहेर मूत्र व शूक्र सोडण्याचा पुरुषदेहातील मार्ग. हे कर्मेंद्रिय पुरुषांत भगास्थीच्या खाली साधारण सहा अंगुळे लांब व पाच अंगुळे घेराचे असते. मान व हृदय यांना बांधून असणाऱ्या ज्या कंडरा खाली जातात, त्यापासून शिश्नची उत्पत्ती होते. शिश्नाच्या ठिकाणी एक पेशी व एक कूर्चा आहे. शिश्नाखाली एक शिवण गुदापर्यंत जाते. ह्या शिवणीच्या ठिकाणी शस्त्रकर्म करू नये. मूत्रवह व शुक्रवह स्रोतसांचे शिश्न हे बहिर्द्वार आहे. शिश्नात मूत्रवहन करणाऱ्या दोन व शुक्रवहन करणाऱ्या दोन धमन्या आहेत. लघवी अडली किंवा रोखून धरली तर शिश्नात वेदना होतात.

मुष्क : (वृषण अंड अंडकोश). पुरुषशरीरामधील एक अवयव. पुरुषांच्या मेंढ्राच्या खालील सुपारीच्या आकाराच्या दोन ग्रंथींना वृषण किंवा मुष्क म्हणतात शुक्रवहस्रोतसाचे मूळ वृषणामध्ये असते. शुक्रवहन करणारी नाडी वृषणाच्या खालच्या टोकापासून वर कटीमध्ये जाते व बस्तीच्या पार्श्वभागाने मेंढ्रात येते. हे सहा अंगुळ लांब व आठ अंगुळ परिघाचे असतात.

सर्व शरीरव्यापिनी शुक्रधराकला शुक्रोत्पत्ती करते. वृषण हे मांस, रक्त, कफ आणि मेद यांचा सारभूत घटकांनी उत्पन्न होते. शुक्रवहस्रोतसाच्या छेदामुळे षंढत्व तसेच मरणही येऊ शकते. शुक्राचा अवरोध, अतिमैथुन, क्षार व अग्नी यांमुळे शुक्रवहस्रोतसे दुष्ट होतात. त्यात दोन पेशी आहेत.

उरःकोष्ठस्थ अवयव : यात हृदय व फुफ्फुस यांचा समावेश होतो.

हृदय : उरःस्थानातील अवयव. हा दोन्ही स्तनांच्या मध्ये उरःस्थानात थोडा डावीकडे, आमाशयाच्या तोंडाशी असतो. हृदयाच्या खाली डावीकडे आमाशय, प्लीहा व उजवीकडे यकृत आहे. खाली तोंड असलेल्या मिटलेल्या पुंडरिक कमळाप्रमाणे त्याचा आकार असतो. कफ व रक्ताच्या साररूप अंशापासून हृदय बनते. हे विशेषत्वाने चेतनेचे-ज्ञानाचे-स्थान असून मनाचे अधिष्ठान आहे. गर्भावस्थेत चौथ्या महिन्यात हृदयाची अभिव्यक्ती होते. हृदय हे रसवह व प्राणवह स्रोतसांचे मूळ व व्यानवायूचे स्थान आहे. तसेच ओजाचे सर्वांत श्रेष्ठ स्थान आहे. हृदयातून रसधातू व्यानवायूद्वारे सर्व धमन्यांमध्ये फेकला जातो व सिरांवाटे तो पुन्हा हृदयामध्ये परत येतो. हृदय हे प्राणाचे स्थान आहे. प्राणवायू हृदयाचे धारण करतो. उरःस्थानातील अवलंबक कफ अन्नाच्या व स्वतःच्या वीर्यामुळे हृदयाचे धारण करतो. हृदय हे सद्यप्राणहर मर्म तसेच सिरामर्म आहे. त्यात मंडलाकार संधी असतात.

फुफ्फुस : हृदयाच्या नाडींना सलग्न असा उरःस्थानातील अवयव. हा फासळ्यांच्या आत असतो. रक्ताचा फेस व वात यांपासून फुफ्फुसाची उत्पत्ती होते. फुफ्फुस हा उदानवायूचा आधार आहे. उजवे व डावे असे त्याचे दोन भाग आहेत. ही दोन्ही फुफ्फुसे प्राणवह किंवा श्वसननाडीने जोडलेली आहेत. डाव्या फुफ्फुसाने हृदयाचा बराच भाग झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसात दोन पेशी असतात.

कलाशारीर : कला म्हणजे धातू धारण करणाऱ्या अवयवांची अंतःत्वचा व तिच्यात धातू निर्माण करणारे घटक. धात्वाशयाचे स्नायू हे कलांना बाहेरून व जरायूसारखी म्हणजे गर्भ वेष्टनासारखी अंतःत्वचा आतून झाकते. प्रत्येक धातूच्या आशयामधील अंतरामध्ये कलांची व्याप्ती असते. धातूच्या आशयाने जो द्रवांश राहतो, तो स्वतः त्या धातूच्या अग्नीने परिपक्व होतो व हा रसाचा शिल्लक भाग अत्यंत अल्प असतो. म्हणून त्याला कला म्हणतात. प्रत्येक दोन कला भागांत कफ असल्याने प्रत्येक कला भाग कफवेष्टित असतो. कला ह्या सात आहेत.

(१) मांसधरा कला : या कलेत मांस असून त्यात सिरा, स्नायू, धमनी व स्रोतसे यांची बारीक प्रताने पसरलेली असतात. (२) रक्तधरा कला : ही मांसधातूच्या आत राहून रक्त उत्पन्न व धारण करते. ती विशेषतः यकृत, प्लीहा, सिरा व मांस यांत आतून आच्छादलेली असते. (३) मेदोधरा कला : ही सर्व प्राण्यांच्या पोटात व सर्व लहान हाडांत रक्तासह असते. तीच कवटीने झालेल्या पोकळीत मस्तिष्क, मस्तुल्लुंग (मेंदू) या नावाने असते व मोठ्या हाडाच्या पोकळीत मज्जा म्हणून असते. (४) श्लेष्मधरा कला : ही शरीराच्या सर्व सांध्यांमध्ये राहून कफ निर्माण व धारण करणारी कला आहे. या कफाच्या लेपनामुळे सांध्यांचे चलनवलन नीट रीतीने होते. तिने निर्माण केलेल्या कफाने सर्व संधींचे दोन्ही अस्थिघटक एकमेकांना जोडलेले राहून बळकट होतात. (५) पुरीषधरा कला : ही मलधरा कला होय. ही अन्तकोष्ठात म्हणजे पक्वाशयाच्या भागात असते. अन्नरसाचे पचन व पृथक्करण होऊन निर्माण होणाऱ्या घट्ट मलभागाची ही आधारभूत कला आहे. उंडुकाच्या ठिकाणी राहून मलधरा कला ही अन्नापासून मल वेगळा करण्याचे कार्य करते. (६) पित्तधरा कला : ही कला पित्ताशय असते. ती आमाशयातून पक्वाशयाकडे जाणारे आणि गिळलेले, चावून खाल्लेले, प्यायलेले व चाटून खाल्लेले असे चारही प्रकारचे अन्न आपल्या शक्तीने तेथे धारण करून योग्य त्या अवधीत पित्ताच्या तेजाने शोषून अन्नाचे पचन करते. (७) शुक्रधरा कला : शुक्रधातू हा मानवदेहामध्ये अदृश्य रूपात असतो व तो सर्व शरीर व्यापून असतो. शुक्रवहस्रोतसाचे मूळ स्तन आणि वृषणामध्ये असते. बाल्यावस्थेत शरीरामध्ये शुक्रधातू अव्यक्त स्वरूपात असतो व यौवनात येऊ लागल्यावर तो व्यक्त होऊ लागतो.


अस्थिशारीर : अस्थी हा शरीरातील सात धातूंपैकी एक धातू होय. हा सर्वांत कठीण धातू आहे. अस्थिधातू शरीराचे धारण करणारा स्थिर व आधार देणार आहे. पृथ्वी, अग्नी, वायू इत्यादिकांचे एकत्र पचन होऊन खरत्व, कठीणत्व निर्माण होते. अस्थीमध्ये वायू पोकळी व सच्छिद्रता निर्माण करतो. स्रोतसांतून वाहणारा द्रवरूप घटक अस्थीच्या शरीरात असतो. पोषक, सूक्ष्म अस्थिघटक रसवाहिनीतून अस्थिवहस्रोतसांत जातात व त्यांतून वाहत असताना अस्थीचे पोषण करतात. आहारापासून रसाची उत्पत्ती झाल्यानंतर विसाव्या दिवशी अस्थी धातूची उत्पत्ती होते, असे सुश्रुत मत आहे. पाराशर यांच्यामते सहाव्या दिवशी अस्थिधातू उत्पन्न होतो. अस्थिधातू देहाचे धारण व मज्जेचे पोषण करतो. तो मज्जेने भरलेला असतो. शरीराला उभ्या अवस्थेत ठेवणे व मज्जेचे पोषण करणे हे अस्थींचे कार्य होय. शरीराची त्वचा, मांस नष्ट झाले, तरी दीर्घकालपर्यंत हाडे ही राहतातच. ती नष्ट होत नाहीत. म्हणून ती शरीराचे सार होत. आधारभूत हाडांवर सिरांनी व स्नायूंनी मांस बांधलेले असते. हाडांचा आधार असल्याने ते गळून पडत नाही. दात हे अस्थिधातूचा उपधातू आहे. नख, केश हे अस्थींचे मल आहेत. दात, नख, लव किंवा केस गळणे त्वचेवर रुक्षता व अस्थीला चिकटलेले मांस खाण्याची इच्छा होणे ही अस्थिक्षीणतेची लक्षणे होत. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते शरीरात एकंदर ३६०, तर शल्यतंत्रज्ञांच्या मते ३०० हाडे आहेत. हाडांची स्थाने म्हणजे हात व पाय (१२० हाडे), फासळ्या, नितंब, कुशी, पाठ (११७ हाडे), मान व डोके (६३ हाडे) ही होत.

हाडांच्या रचनेला अनुसरून पाच प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : गुडघे, नितंब भाग, खांदे, गाल, टाळू, शंख व डोके याठिकाणची हाडे खापरासारखी असतात. त्यांना ‘कपालास्थी’ (खर्परास्थी) म्हणतात. रुचक म्हणजे दात. दाताच्या हाडांना ‘रुचकास्थी’ म्हणतात. नाक, कान, मान ह्या ठिकाणी हाडे तुलनेने मऊ असतात. ती सहजपणे वाकतात. त्यांना `तरुणास्थी’ म्हणतात. बरगड्या, पाठ व हृदय या ठिकाणची हाडे गोलाकार, अर्धगोलाकार असतात. त्यांना ‘वलयास्थी’ म्हणतात. नळीप्रमाणे पोकळ व लांब असणाऱ्या हाडांना ‘नलकास्थी ’ म्हणतात.

संधिशारीर : संधी म्हणजे शरीरातील हाडे एकमेकांशी जुळण्याचे स्थान. संधीमध्ये दोन किंवा अधिक हाडे एकत्र येतात. संधी हे मज्जावहस्रोतसाचे मूलस्थान आहे. संधींचे चल व अचल संधी असे दोन प्रकार आहेत. हातपाय, हनुवटी, कंबर, मान यांत हालचाल करणारे सांधे आहेत व बाकीचे सर्व स्थिर संधी आहेत. रचनेवरून सांध्यांचे पुढीलप्रमाणे आठ प्रकार आहेत : (१) कोरसंधी : अंगुळी, मनगट, घोटा, गुडघा, कोपर यांत खळग्याच्या आकाराचे व बिजागरीच्या रचनेप्रमाणे असतात. (२) उलूखलसंधी : उखळ व मुसळाप्रमाणे असून काख, जांघ व दांत यांमध्ये असतात. (३) सामुग्दसंधी : हे संपुटाप्रमाणे असतात. अंसफलक, गुद, योनी, ढुंगण यांत ते असतात. (४) प्रतरसंधी : मान व पाठीचा कणा यांत असतात. एकमेकांवर थर असल्याप्रमाणे ते असतात. (५) तुन्नसेवनी संधी : डोक्याच्या व कंबरेच्या पसरट हाडांत एकमेकांत शिवणीप्रमाणे ती गुंतवून ठेवलेली असतात. (६) वायसतुंडसंधी : हनुवटीच्या दोन्ही बाजूंस कावळ्याच्या चोचीसारखे असतात. (७) मंडलसंधी : हे गोल आकाराचे असून घसा, हृदय, डोळा व क्लोमनाडी यांत ते आढळतात. (८) शंखावर्त संधी : शंखाच्या आत असलेल्या आवर्ताप्रमाणे असतात. कान व शृंगाटकात ते असतात.

संधींची संख्या : सुश्रुतांनी एकूण २१० संधी सांगितले आहेत. हातापायांत ६८, कोठ्यांत ५९ व मानेच्या वर ८३ असे एकूण २१० संधी आहेत. पेशींचे, स्नायूंचे, सिरांचे, धमनींचे संधी मानवी देहात फार मोठ्या संख्येने आहेत.

संधिरचना : दोन किंवा अधिक अस्थी स्नायू व पेशी यांनी एकत्र बांधलेले असतात. त्यांवर त्वचेचे आवरण असते. संधींमधील आवरणात श्लेष्मधरा कला असते. संधींमध्ये श्लेषक कफ असतो. पेरे, हाडे, संधी यांना चिकटून ठेवण्याच्या स्वभावामुळे ह्या कफाला श्लेषक कफ म्हणतात. श्लेषधरा कला कफ निर्माण व धारण करणारी आहे. श्लेषक कफामुळे संधीचे दोन्ही अस्थिघटक एकमेकांना जोडलेले राहून बळकट होतात व आपापली कर्मे चांगली करतात.

स्नायुशारीर : सर्व शरीरभर सणाच्या (म्हणजे तागाच्या) तंतुप्रमाणे असणारा अवयव. स्नायू हा मेदाचा उपधातू असून पित्ताचा अंश आहे. मेदापासून त्याचा स्नेह घेऊन वायूच्या साहाय्याने स्नायू निर्माण होतात. वायूच्या साहाय्याने मेदाचा खरपाक होऊन स्नायूची उत्पत्ती होते. मांसवाहक स्रोतसाचे स्नायू हे मूळ आहेत. शरीरात एकंदर ९०० स्नायू आहेत. त्यांपैकी शाखांमध्ये ६००, कोष्ठांत २३० व मानेच्या वर ७० स्नायू आहेत.

स्नायूंचे चार प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : प्रतानवर्ती स्नायू म्हणजे तंतूसारखे लांबट स्नायू. हे हातापायांच्या सर्व सांध्यांत आहेत. वृत्त स्नायू वाटोळे असतात. त्यांना ‘कंडरा’असे म्हणतात. पृथू स्नायू पसरट व चपटे असतात. सुषिर स्नायू पोकळ असतात. आमाशय, पक्वाशय व त्यांच्या शेवटी तसेच बस्तीत सुषिर स्नायू असतात. फासळ्या, छाती, पाठ, डोके यांवर पृथू स्नायू असतात. शरीरातील संधी हे अनेक स्नायूंनी बांधल्यामुळे मनुष्य भार वाहण्यास समर्थ होतो. हाडे, पेशी, सिरा, संधी हे विकल झाले असता, शरीराला जो त्रास होतो त्यापेक्षा अधिक त्रास स्नायू विकल झाले असता होतो. स्नायूंमध्ये वात वाढला तर जखडणे, कंप होणे, वेदना होणे, आचके येणे ही लक्षणे उत्पन्न होतात. स्नायू कापला गेला, तर कुबडेपणा, अवयव गळणे, क्रिया करण्याची असमर्थता व अतिशय वेदना ही लक्षणे निर्माण होतात. स्नायूवर जखम झाली, तर ती लवकर भरून येत नाही. स्नायूंची पूर्णपणे माहिती असलेला वैद्य मनुष्याच्या शरीरात खोल गेलेले शल्य काढू शकतो.

पेशी शारीर : पेशी म्हणजे मांसखंड. विशिष्ट अग्नीने युक्त असा वायू मांसात शिरून मांसाचे विविध आकाराचे विभाग करतो, त्याला `पेशी’ म्हणतात. कोष्ठस्थ अवयव तसेच सिरा, स्नायू, हाडांची पेरे व सांधे हे पेशींनी आच्छादित आहेत. त्यामुळे त्या अवयवांना स्थिरत्व येते व शरीराला बल मिळते. स्थानानुसार पेशींचे लांब, आखूड, जाड, सूक्ष्म, पसरट, गोल इ. विविध आकार आहेत. तसेच पेशी नाजूक, मऊ, गुळगुळीत, खरखरीत अशा विविध स्वरूपांच्या असतात. शरीरात एकूण पाचशे पेशी आहेत. त्यांपैकी हातापायांत ४००, कोठ्याच्या ठिकाणी ६६ व मानेच्या ठिकाणी ३४ पेशी आहेत. स्त्रीशरीरात २० पेशी अधिक असतात. त्या अशा : दोन स्तनांच्या प्रत्येकी ५ मिळून १०, जननमार्गात ४, गर्भछिद्राच्या स्थानी ३ व शुक्रार्तवकारक ३.


मर्मशारीर : ज्या शरीरस्थानी आघात झाला असता पीडा किंवा वेदना होऊन मरण येते किंवा वैकल्य येते, त्या स्थानास मर्म म्हणतात. शरीरातील मांस, सिरा, स्नायू, अस्थी, संधी हे ज्या भागामध्ये एकत्रित आहेत, तेथे प्राणशक्ती निसर्गतःच अधिष्ठित असते. हृदय, बस्ती आणि शिर यांत प्रधान मर्मे आहेत. प्रत्येक मर्मावर होणाऱ्या आघाताचे परिणाम भिन्न असतात. सर्व शरीरभर एकूण १०७ मर्मे आहेत. षडंगानुसार मर्माची विभागणी अशी : दोन्ही हातपाय-४४, पोट आणि छाती-१२, पाठ-१४, मानेच्या वरचा भाग- ३७. निरनिराळ्या भागांतील मर्मांना निरनिराळी नावे आहेत. आघातानंतर होणाऱ्या परिणामानुसार मर्मांचे प्रकार व संख्या अशी : सद्यप्राणहर (ताबडतोब प्राणनाशक मर्मे) १९, कालांतर प्राणहर (काही दिवसांनी प्राणनाशक होणारी) ३३, निशल्यहर (शल्य काढताच मारक होणारी) ३, वैकल्यकर (विकलता निर्माण करणारी) ४४ आणि रुजाकर (वेदना उत्पन्न करणारी) ८.

मर्म विद्ध झाल्याची लक्षणे अशी : विद्ध झालेला भाग जड होणे, विचारशक्ती नष्ट होणे, थंड पदार्थांची इच्छा निर्माण होणे, घाम येणे, ओकारी होणे, श्वास लागणे, बेशुद्ध होणे इ. लक्षणे निर्माण होतात. शस्त्रक्रिया करताना मर्मस्थाने वर्ज्य करतात.

मर्मस्थानी होणारे रोग बहुधा कष्टाने बरे होतात. मर्माच्या ठिकाणी सोम, वायू व तेज ही तत्त्वे सत्त्व, रज व तम हे गुण आणि क्षेत्रज्ञ म्हणजे प्राण ह्यांचे अधिष्ठान असते. म्हणून मर्माघात प्राणांतिक ठरतो. मर्माच्या ठिकाणी छेद झाला असता, मनुष्य जायबंदी तरी होतो किंवा मरतो. मर्मस्थानात झालेले विकार बरे झाले, तरी त्यांच्यात अधूपणा राहतोच.

सिराशारीर : सिरा (शीर किंवा नाडी) हा रक्ताचा उपधातू आहे. जिच्यातून दोष बनलेले व बनण्याच्या अवस्थेत असलेले रसरक्त धातू आणि मल वाहतात, ती सिरा होय. मेदाचा स्नेह घेऊन वायू सिरांची उत्पत्ती करतो. त्यांचा पाक मृदू असतो. सिरांचे लहानमोठे फाये सर्व शरीरभर पसरलेले आहेत. गर्भशरीरात नाभीपासून सिरा निघतात. त्यांचे उगमस्थान नाभी आहे. तेथून त्या सिरा खालीवर व आडव्या अशा सर्वत्र पसरलेल्या असतात. गतिभेदाने सिरांचे तीन प्रकार आहेत : वर, खाली व तिरक्या जाणाऱ्या सिरा. नाभी हे प्राणांचे आश्रयस्थान असून सर्व प्राण्यांचे प्राण नाभीच्या ठिकाणी आहेत व ह्या सिरांनी सर्व नाभी व्यापलेली आहे. त्यामध्ये मूळ सिरा चाळीस आहेत. त्यांत वातवाहिनी, पित्तवाहिनी, कफवाहिनी व रक्तवाहिनी सिरा प्रत्येकी दहा आहेत. या चारही सिराप्रकारांचे प्रत्येकी १७५ फाटे असतात. याप्रमाणे एकूण ७०० सिरा आहेत.

हृदयापासून मूळ सिरा निघतात. त्या उरःस्थानात, ऊर्ध्वजत्रुभाग, ऊर्ध्वशाखा, कोष्ठ, अधःशाखा यांत जातात. त्यांना आणखीन उपशाखा फुटून त्या प्रत्येक अवयवाकडे जातात. त्यांच्यापासून पुन्हा बारीक सिरा प्रतान निघून तेथील मांसात पसरतात आणि रसरक्तादी परिणाम, आपद्यमान धातूंचा परिणाम धातूंना पुरवठा करतात. सिरांनी सर्व शरीराचे पोषण होते. सिरांतून रसधातू वाहतो म्हणून त्यांना `रसायनी’ असेही म्हणतात. व्यानवायूमुळे सिरांना आकुंचन-प्रसरण होण्याची योग्यता असते. त्यामुळे त्यांच्यातील घटक हृदयापासून इतर सर्व अवयवांकडे व त्यांच्याकडून परत हृदयाकडे अशी ये-जा करतात. सर्व सिरा ह्या सर्ववाहक आहेत. जो दोष त्यांतून आधिक्याने वाहतो, त्यावरून त्या दोषाचा उल्लेख केला जातो. वातवह सिरा वाताने भरलेल्या व अरुण रंगाच्या असतात. पित्तवह सिरा उष्ण व निळ्या रंगाच्या आणि कफवह सिरा पांढऱ्या व स्थिर असतात. रक्तवह सिरा लाल रंगाच्या असून खोल भागातून वाहतात.

सिरांची कर्मे : सिरांत संचार करणारा प्राकृत वात (धातू) निर्विघ्नपणे सर्व क्रिया व बुद्धीची कार्ये करतो. तो कुपित झाला, तर सिरांमध्ये वाताचे नाना प्रकारचे रोग निर्माण करतो. प्राकृत पित्त (धातू) सिरांतून सर्वत्र संचार करीत असताना अन्नाची रुची जाणवून देणे, पाचकाग्नी प्रदीप्त करणे, शरीर निरोगी व तेजस्वी ठेवणे हे कार्य करते. पित्त धातू प्रकुपित झाल्यास नाना प्रकारचे पित्ताचे रोग निर्माण करतो. प्राकृत कफ (धातू) आपल्या सिरांतून संचार करीत असताना सर्वांग स्निग्ध करतो, संधींना स्थिरता देतो, देह पुष्ट करतो व बल वाढवितो. तोच कफ दुष्ट झाल्यास नाना प्रकारचे कफ विकार उत्पन्न करतो. शुद्ध रक्त आपल्या सिरांतून संचार करीत असताना तो रक्तधातू धातूंचे पूरण करतो, वर्ण चांगला करतो व अचूक स्पर्शज्ञान करवितो. रक्तधातू दुष्ट झाल्यास रक्ताचे अनेक विकार निर्माण होतात. चिकित्सेच्या दृष्टिकोनातून शाखेतील १६, कोष्ठातील ३२ व डोक्यातील ४८ सिरा तोडण्यास वर्ज्य आहेत. विशिष्ट सिरांचा वेध केल्याने विशिष्ट रोग बरे होतात.

धमनी शारीर : वायूचे वहन करणाऱ्या वाहिनीला (सिरांशिवाय) धमनी किंवा पोकळ वाहिनी असे म्हणतात. हे रसवहस्रोतसाचे मूळ आहे. धमनीत असलेली छिद्रे शरीरपोषणार्थ व केवळ रक्तसंचयार्थ आहेत. शरीरात २४ मूळ धमन्या असून त्या नाभीपासून निघतात. त्यांपैकी ऊर्ध्वगामी धमन्या १०, अधोगामी १० आणि पाय व त्वचा यांकडे सर्वांगात जाणाऱ्या प्रत्येकी दोन मिळून ४ आडव्या जाणाऱ्या धमन्या आहेत.

ऊर्ध्वगामी धमन्या : या धमन्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे ग्रहण करतात. श्वास, उच्छ्‌वास, जांभई, भूक, हसणे, बोलणे व रडणे, झोपणे, जागे होणे इ. शारीरिक कर्मे करतात आणि शरीरधारणाच्या कार्यात सहभागी होतात. त्या तहानभूक निर्माण करतात व अन्नपाणी ग्रहण करतात. हृदयाच्या ठिकाणी आल्यावर त्या दहा धमन्यांच्या तीस धमन्या होतात. त्यांपैकी वात, पित्त, कफ, रक्त व रस ह्यांना वाहणाऱ्या प्रत्येकी दोन मिळून दहा शब्द, रूप, रस व गंध ह्यांना वाहून नेणाऱ्या प्रत्येकी दोन मिळून आठ बोलण्याचे कार्य करणाऱ्या दोन, अव्यक्त शब्दोच्चार (आवाज-घोष) करणाऱ्या दोन व झोपेचे कार्य करणाऱ्या दोन धमन्या असतात. दोन धमन्या स्त्रियांच्या स्तनांच्या आश्रयाने स्तन्य वाहण्याचे कार्य करतात. दोन धमन्या पुरुषांच्या स्तनांच्या आश्रयाने शुक्र वाहण्याचे कार्य करतात.

अधोगामी धमन्या : या धमन्या मल, मूत्र, अधोवायू शुक्र, आर्तवादींना खाली वाहून नेतात. ह्या धमन्या पित्ताशयात जाऊन तेथे असलेल्या अन्नपानाचा पचलेला रस पित्ताच्या उष्णतेने वेगळा काढून वाहून नेतात. इतर सारधातू तसेच अन्नपानरस रसस्थानाला पुरवितात व हृदयाचे पूरण व शरीराचे पोषण करतात. वर जाणाऱ्या व त्वचेकडे जाणाऱ्या धमन्यांच्या स्वाधीन तो रस करतात व सर्व शरीराला तृप्त करतात. बेंबीच्या खालचे पक्वाशय, मलाशय, कंबर, बस्ती, गुद, शिश्न व दोन्ही मांड्या ह्यांचे या धमन्या धारण-पोषण करतात. तसेच मूत्र, मळ व घाम ह्यांना विभक्त करून बाहेर सोडतात.

आमाशय व पक्वाशय यांमध्ये या धमन्यांची संख्या तीस होते. त्यांपैकी वात, पित्त, कफ, रक्त व रस ह्यांना वाहणाऱ्या प्रत्येकी दोन मिळून दहा आहेत. दोन धमन्या आतड्यांत राहून अन्न वाहण्याचे, दोन पाणी वाहण्याचे आणि दोन मूत्राशयाच्या आश्रयाने राहून मूत्र वाहण्याचे काम करतात. दोन धमन्या शुक्राचा प्रादुर्भाव करतात, दोन धमन्या शुक्राला बाहेर सोडतात, दोन धमन्या स्त्रियांमध्ये आर्तव बाहेर सोडतात आणि दोन धमन्या मोठ्या आतड्यांशी बद्ध असून मलविसर्जनाचे काम करतात.

तिर्यग्गामी धमन्या : या आडव्या जाणाऱ्या चार धमन्या त्वचेकडे जातात व उत्तरोत्तर क्रमाने त्यांच्या हजारो शाखा होतात. त्या सूक्ष्म, सूक्ष्मतर व असंख्य असून सर्व त्वचेवर पसरलेल्या आहेत. त्या रसवहन करतात. त्यांनी सच्छिद्र शरीर विणले आहे. त्यांची तोंडे केसांच्या मुळाशी बांधली आहेत. त्यांच्याकडून घाम वाहण्याचे कार्य होते.

आकाशादी पाच महाभूतांपासून उत्पन्न झालेल्या धमन्या इंद्रियांच्या अधिष्ठानात पाच प्रकारांनी कार्य करतात. त्या पाच इंद्रियांना पाच विषयांशी कार्याकरिता संलग्न करतात व विनाशकाली हे कार्य करून नष्ट होतात. ऊर्ध्वगामी धमन्यांचे कार्य प्राण व उदान वायू यांच्या आधीन आहे. तिर्यग्गामी धमन्यांचे कार्य व्यानवायूच्या आधीन आहे. धमन्या सिरांपेक्षा वेगळ्या आहेत. दोघांच्या रंगांत फरक आहे.


स्रोतस शारीर : स्रोतस म्हणजे शरीरातील स्थूल वा सूक्ष्म मार्ग. रसादी पोषक धातूंच्या स्रवणामुळे स्रोतसे हे पचनाचे रूपांतर पावत असलेल्या धातूंचे शरीरभर वहन करतात. कोणताही शरीरभाव स्रोतसावाचून उत्पन्न होऊ शकत नाही किंवा क्षयही पावू शकत नाहीत. हृदयासारख्या पोकळीतून शरीरात इतर स्थानांकडे जी अवकाशयुक्त पोकळी पसरते व आपद्यमान धातूंचे परिणाम (प्राण, उदक, मल इ.) वाहून नेण्याचे कार्य करते, अशा सिरा व धमनी नसलेल्या पोकळ अवयांस `स्रोतस’ म्हणतात. आपापल्या विशिष्ट अग्नीने युक्त असा वायू विशिष्ट स्रोतस निर्माण करतो व विशिष्ट स्रोतसातून विशिष्ट धातू वाहतो. ज्या धातूचे स्रोतस वहन करते, त्या धातूप्रमाणे त्याला रंग असतो व त्या रंगाचे वाटोळे, जाड, बारीक असे वेलीच्या तंतूंसारखे लांब, आखूड असे स्रोतसाचे विविध आकार असतात. शारीरात जितके आकारयुक्त घटक आहेत व जेवढी उत्पत्तिमान द्रव्ये आहेत, तितके स्रोतसांचे प्रकार आहेत. काहींच्या मते स्रोतसांची संख्या अगणित आहे.

स्रोतसाचे तीन प्रकार आहेत : अंतर्मुख, बहिर्मुख व इंद्रियप्राणवह. अंतुर्मुख स्रोतसांची संख्या चरकाचार्यांनी १३ मानली आहे. प्राण, अन्न, उदक, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र, मूत्र, मल व धामवाहक या तेरा पदार्थांचे प्रत्येकाचे स्वतंत्र स्रोतस आहेत. ही स्रोतसे सर्व शरीरात संचार करणाऱ्या वात, पित्त व कफ यांच्या संचाराचे मार्ग आहेत. बहिर्मुख स्रोतसे पुरुषांत नऊ व स्त्रियांत बारा असतात. कान, नाक, डोळे, तोंड, गुद व शिश्न ही बहिर्मुख स्रोतसे आहेत. स्त्रीशरीरात ही सर्व असून शिवाय दोन स्तन व अधोमार्गातील रजोवह असे एक मिळून तीन स्रोतसे अधिक आहेत. शिरस्थानात इंद्रिय प्राणवह स्रोतसे आहेत.

स्रोतसांची दुष्टी करणारी सामान्य कारणे व लक्षणे : जो आहार किंवा विहार दोषगुणांशी समान व धातूंच्या गुणांच्या विरोधी गुणांचा असतो, तो स्रोतसांची दुष्टी करतो. स्रोतसांची दुष्टी झाल्यावर दोष, मल संचित होऊन त्यांचा अवरोध होणे किंवा अतिप्रमाणात दोष, मल बाहेर जाणे, सिरांच्या गाठी होणे किंवा दोष व मल स्रोतसांत विरुद्ध दिशेने जाऊ लागणे इ. लक्षणे निर्माण होतात.

उपचार : स्रोतसे कापली गेली, तर ही अवस्था असाध्य आहे. रुग्णाला आधी सांगून मग त्यानंतर उपचार करावेत. रुतलेले शल्य काढून जखमेची चिकित्सा करावी. आयुर्वेदात कायचिकित्सा शास्त्रात स्रोतसांचा रोध होणे हेच प्राधान्याने रोगांचे कारण मानलेले आहे. म्हणून स्रोतसांचा रोध करणारी कारणे कोणती हे शोधून ती वर्ज्य करण्यास सांगून स्रोतसांच्या तोंडाची शुद्धी करावी म्हणजे दोष कोठ्यात येतात व नंतर कोठ्यात ज्या ठिकाणी दोष असतील, त्या स्थानाला अनुसरून वामक किंवा रेचक इ. औषधे देऊन ते दोष बाहेर काढून शोधन करावे.

पहा : दोषधातुमलविज्ञान प्रकृति सृष्टी व मानव.

संदर्भ : १. आचार्य, यादवजी त्रिकमजी, चरक संहिता-चक्रपाणि टीका, मुंबई, १९४१.

           २. आचार्य, यादवजी त्रिकमजी, सुश्रुतसंहिता-उल्हण टीका-शारीरस्थान, मुंबई, १९३८.

           ३. कुलकर्णी, पां. ह. मराठी चरक संहिता-शारीरस्थान, पुणे, १९४२.

           ४. जोशी, वेणीमाधवशास्त्री, आयुर्वेदीय महाकोश अर्थात आयुर्वेदीय शब्दकोश, मुंबई, १९६८.

पटवर्धन, शुभदा अ.