शामके : (सेडेटिव्ह्ज). शारीरिक अथवा मानसिक कारणांमुळे निर्माण होणारा ताण कमी करून एखाद्या व्यक्तीची उत्तेजित चित्तवृत्ती व मनोदौर्बल्य शमविणाऱ्या औषधाला ‘शामक’ म्हणतात. दिवसा अल्पमात्रेत हा परिणाम दिसून येतो. झोपताना (रात्री) किंवा मोठ्या मात्रेत दिवसाही घेतल्यास शामक झोप येण्यास मदत करते त्यामुळे अशा द्रव्यांना ‘शायक – शामके’ देखील म्हणतात. ⇨तंत्रिका तंत्राचे अवसादन करणाऱ्या (नैसर्गिक कार्य मंदावणाऱ्या) औषधांमध्ये शांतक, शामक, शायक व शुद्धिहारक अशी चढत्या क्रमाने वर्गवारी लावली असली, तरी या अवसादन क्रियेत बरेचसे परस्परव्यापन (औषधाची मुख्य क्रिया घडून येत असताना आसपासच्या त्याच प्रकारच्या ऊतकांवर कमी-अधिक प्रमाणात घडणारी क्रिया) होत असते. व्यक्तीची मन:स्थिती, शारीरिक क्रियाशीलता, औषध घेण्याची वेळ, मात्रा व ते वापरण्याचा मार्ग यांवर परिणाम अवलंबून असतो.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत शामक परिणामासाठी अफू व मद्य यांसारख्या मादक व व्यसनकारी द्रव्यांचाच वापर केला जाई. १८६९ मध्ये क्लोरल हायड्रेट हा संश्लेषित पदार्थ शामक व शायक म्हणून वापरात आला. त्यानंतर जवळजवळ ऐंशी वर्षे अशा प्रकारची अनेक औषधे प्रचारात आली. १९५० पासून शांतकांची कारकीर्द सुरू होऊन त्यांच्यातील अनेक गौण शांतके त्याच्या शांतक-शामक क्रियेमुळे याच उद्देशाने वापरली जाऊ लागली.
वर्गीकरण : शामकांचे वर्गीकरण स्थूलमानाने पुढीलप्रमाणे करता येईल : (१) क्लोरल हायड्रेट, ॲमिलीन हायड्रेट, सल्फॉनाल, ट्रायोनाल यांसारखी आता वापरात नसलेली संश्लेषणजन्य द्रव्ये (२) सोडियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम ब्रोमाइड ही एके काळी शामक व अपस्मारविरोधी (फेफरेविरोधी) म्हणून वापरली जाणारी ब्रोमिक अम्लाची संयुगे (३) बार्बिच्युरिक अम्लाची फिनोबार्बिटोन, पेंटोबार्बिटोन, ॲमिलोबार्बिटोन यांसारखी संयुगे [→ बार्बिच्युरेटे] (४) शांतकांच्या वर्गातील मेप्रोबामेट, डायझेपाम आणि तत्सम चिंतारोधक द्रव्ये आणि (५) ग्लुटेथिमाइड, एथिनमेट यांसारखी बार्बिच्युरेट वर्गाबाहेरील शामक द्रव्ये. व्यसनकारकता किंवा अन्य कारणांनी मर्यादित वापर असणारी ही द्रव्ये इतर औषधांना पर्याय म्हणून उपलब्ध असतात.
शामकांचे औषधिक्रिया वैज्ञानिक गुणधर्म : मेंदूच्या तळाशी लंबमज्जा व मध्यमस्तिष्क यांना जोडणारा ‘मस्तिष्कसेतू’ नावाचा जो भाग असतो, तेथील निद्राकेंद्रांवर शामकांची क्रिया होत असते. या केंद्राचे नक्की स्वरूप अनिश्चित आहे. मस्तिष्कस्तंभातील आरोही जालिकाबंधाचे अवसादन होऊन जालिकीय सक्रियण प्रणालीचे कार्य मंदावते व झोप येते, असे समजले जात असे [→ मेंदू] परंतु तेथेच असलेल्या संधिरेखा केंद्रकांची सक्रिय भूमिका या क्रियेत असावी, असे आता दिसत आहे. या केंद्रकांमध्ये निर्माण होणाऱ्या सिरोटोनीन या रसायनी पारेषकाची (शरीरक्रियेतील बदल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणाऱ्या संदेशवाहक पदार्थाची) पातळी बदलून शामक द्रव्ये झोप आणत असण्याची शक्यता आहे. शामक व शायक असे दोन परिणाम अनुक्रमे जालिकीय आणि संधिरेखीय स्थानांवरील क्रियेतून घडत असण्याची शक्यताही आहे.
शामकाच्या अल्प मात्रेनंतर शारीरिक हालचाली कमी होऊन व्यक्तीची क्षुब्धता ओसरू लागते स्नायूंच्या हालचालींतील सुसूत्रता कमी होते प्रतिसाद अवधी वाढतो काही व्यक्तींमध्ये ताण कमी होऊन त्याची जागा सुखभ्रम घेतो धनुर्वात, अपस्मार यांसारख्या कारणांनी झटके येत असल्यास ते कमी होतात. अधिक मात्रेनंतर किंवा शामक द्रव्य वरचेवर देण्यामुळे या परिणामांचे रूपांतर झोपेत होते. नैसर्गिक झोपेसारखीच ही झोप असते परंतु शारीरिक हालचाली कमी होऊन जलद नेत्रचलयुक्त घटक जवळजवळ पूर्णपणे लोपून झोप जास्त गाढ लागते. औषधाच्या चयापचयानुसार (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींनुसार) झोपेचा अवधी कमीजास्त असू शकतो व उठल्यावरही डोळ्यांवर झापड असू शकते. या गुंगल्यासारख्या वाटण्याला ‘शेष परिणाम’ म्हणतात. फार मोठ्या मात्रेनंतर (उदा., आत्महत्येच्या उद्देशाने घेतलेली मात्रा) नैसर्गिक झोपेएवजी बेशुद्धावस्था निर्माण होऊन श्वसनकेंद्राच्या अवसादनामुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो.
शामकांचा उपयोग मानसिक क्षुब्धतेमुळे, काळजीमुळे किंवा शारीरिक व्याधीमुळे होणाऱ्या निद्रानाशासाठी केला जातो. शस्त्रक्रियेपूर्वी वाटणारी चिंतायुक्त भीती, परक्या अनोळखी वातावरणामुळे झोप न लागणे, वार्धक्यातील निद्रानाश, मानसोपचारांसाठी साहाय्यक औषधांची आवश्यकता, व्यसनमुक्तीच्या उपचारातील मानसिक अस्वस्थता अशा विविध परिस्थितींमध्ये शामके उपयुक्त ठरतात.
दीर्घकाळ उपयोग केल्यास शामकांची सवय लागते. कधीकधी व्यसन जडून नित्याची मात्रा न घेतल्यास अस्वस्थता, निद्रानाश, हातापयांना कंप सुटणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. क्रमाक्रमाने मात्रा कमी करून ही लक्षणे टाळता येतात [→ औषधासक्ति]. दीर्घकालिक वापरामुळे निराधार भास, आक्रमकता, मानसिक संतुलन ढासळणे यांसारखे परिणाम विषाक्ततेमुळे घडून येतात.
पहा : औषधिक्रियाविज्ञान बार्बिच्युरेटे मादक पदार्थ वेदनाशामके शांतके,
संदर्भ : Gilman, A Rall, T. W. Nies, A. S. Taylor, P., (Eds), Goodman and Gilman’s Pharmacological Basic of Therapeutics,
New York, 1990.
श्रोत्री, दि. शं.