शांतता पारितोषिके : जागतिक शांततेसाठी पोषक असे मोलाचे विधायक कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येणारी पारितोषिके. सामान्यतः एखादे राष्ट्र, राष्ट्रीय संस्था किंवा आंतरराष्ट्रीय संस्था वा संघटना यांच्यातर्फे ही पारितोषिके वा पुरस्कार देण्यात येतात. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा असते. शांततेच्या पारितोषिकाची कल्पना एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध उद्योगपती ⇨आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल (१८३३–९६) यांच्या मृत्युपत्रात प्रथम नोंदविलेली आढळते. या पारितोषिकांची प्रेरणा आल्फ्रेड यांना विध्वंसक स्फोटकांच्या निर्मितीबद्दलचा पश्चात्ताप आणि एकोणिसाव्या शतकातील युद्धजन्य घटना व विनाशकारी संघर्ष यांच्या विदारक परिणामांमधून मिळाली असावी. [→ नोबेल पारितोषिके].
शांतता पारितोषिकांतून आधुनिक मनुष्यसंस्कृतीमधील शांतताप्रेमी व क्रियाशील अशा आंतरराष्ट्रीय जाणिवांचा प्रतीकात्मक आविष्कार सूचित होतो. जागतिक शांततेचा भंग करणारी युद्धे व इतर विध्वंसक दहशतवादी हिंसाचार जर अटळ असतील, तर त्याचबरोबर अशा संघर्षांना आळा घालणारे शांततावादी प्रयत्नही जारी राखले पाहिजेत, अशा प्रकारचे नवे जागतिक भान एकोणिसाव्या शतकात निर्माण झाले. परिणामतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही महत्त्वाच्या संस्था स्थापन होऊन कार्यरत झाल्या. उदा., आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समिती (१८६३), द लीग इंटरनॅशलन द ला पेक्स (१८६७), परमनंट इंटरनॅशनल पीस ब्यूरो (१८९१) इत्यादी. बेल्जियममधील गेंट या गावी इ.स. १८७३ मध्ये तेथील राजकीय मुत्सद्दी व विधिज्ञांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल लॉ’ ही संस्था स्थापन केली. तिचा मूळ उद्देश आंतरराष्ट्रीय कायद्यांचे सुलभीकरण आणि अर्थबोधन असा असला, तरी या संस्थेने युद्धपिपासू राष्ट्रांच्या कारवायांवर अप्रत्यक्षपणे दडपण आणून जागतिक शांततेसाठी विधायक पाऊल उचलले. या संस्थांच्या माध्यमांतून कार्यरत असणाऱ्या द्यूनां, एली द्यूकॉमं, शार्ल गॉबा, फ्रेदेरीक पासी इ. शांतताप्रेमी व्यक्ती उल्लेखनीय आहेत. जागतिक शांततेसाठी व्यक्तिगत पातळीवर कार्य करणाऱ्याही काही व्यक्ती होत्या. उदा., विल्यम क्रीमर (१८३८–१९०८), बेर्टा फोन झुटनर (१८४३–१९१४), थीओडर रूझवेल्ट (१८५८–१९१९) इत्यादी. या व्यक्तींनी वृत्तपत्रे, नियतकालिके, स्वतंत्र ग्रंथलेखन यांद्वारे आपले विचार प्रसृत केले. विल्यम रॅंडॉल क्रीमरने कामगारांची शांतता संस्था विकसित केली तर बेर्टा झुटनरने डाय वाफेन नायडर (डाउन युवर आर्म्स) या आंतरराष्ट्रीय शांतता नियतकालिकाचे संपादन केले आणि स्वतंत्र अशी ऑस्ट्रियन शांततावादी संघटना स्थापन करून (१८९१) आपल्या देशात शांतताविषयक जागृती केली. रशियाचा राजा दुसरा झार निकोलस याने या संघटनेच्या शांतता-चळवळीतून स्फूर्ती घेऊन हेग येथे १८९९मध्ये जागतिक शांतता परिषद भरविली. नोबेल यांना लिहिलेल्या एका पत्रात झुटनरने जागतिक शांततेसाठी काहीतरी विधायक कार्य करावे, अशी विनंती केली (१८९१). त्या सुमारास ते आपले मृत्युपत्र लिहीत होते. त्यांनी झुटनरला उत्तरादाखल लिहिले, ‘युद्ध थांबविण्याचा अत्यंत परिणामकारक उपाय म्हणजे सर्व देशांनी एकत्र येऊन असा करार करावा की, जे राष्ट्र शांततेचा भंग करेल, त्याविरुद्ध एकत्र येऊन सर्वांनी एकजुटीने लढावे’. याच पत्रात त्यांनी शांततेच्या पुरस्काराची मी तजवीज करीत आहे’, असे पुढे कळविले होते. बेर्टा झुटनरच्या प्रयत्नांमुळे आल्फ्रेड नोबेल यांनी शांततेसाठी एक खास पारितोषिक मृत्युपत्रात नमूद केले. नोबेल शांतता पारितोषिक १९०१ पासून देण्यात येऊ लागले.
अमेरिकेतील `कार्नेगी एन्डाउमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ (१९१०) या प्रतिष्ठानतर्फेही शांतता पारितोषिके देण्यात येतात. हे प्रतिष्ठान ⇨ अँड्रू कार्नेगी या दानशूर उद्योगपतीने स्थापन केले. कार्नेगीने हेग येथे एक शांतता प्रासादही बांधला (१९०३).
महात्मा गांधीजींच्या एकशेपंचविसाव्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर १९९४ पासून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन, या क्षेत्रात मानवी कल्याणाच्या दृष्टीने विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी महात्मा गांधी शांतता पारितोषिक सुरू केले. जी व्यक्ती गांधीजींच्या तत्त्वांनुसार मानवाची सेवा करते आणि जगभर या तत्त्वांचा प्रचार-प्रसार करते, त्या व्यक्तीस हे पारितोषिक देण्यात येते. या पारितोषिकाचे स्वरूप एक कोटी रुपये रोख, प्रमाणपत्र व कलाकुसरयुक्त तबकडी असे आहे. पारितोषिकाच्या निवडीसाठी पाच सभासदांचे परीक्षक मंडळ असून त्याचे प्रमुख (अध्यक्ष) भारताचे पंतप्रधान असतात. पहिले म. गांधी शांतता पारितोषिक १९९५ मध्ये ज्युलियस काम्बारागा न्येरेरे या टांझानियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांस देण्यात आले. त्यानंतर डॉ. ए. टी. अरियरत्ने (श्रीलंका – १९९६), डॉ. गेर्हार्ड फिशर (जर्मनी – १९९७), भारतातील रामकृष्ण मिशन या संस्थेस १९९८चे आणि आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या ‘गुड फ्रायडे’ कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना २००१चे ‘म. गांधी शांतता पारितोषिक’ देण्यात आले.
देशपांडे, सु. र.