शस्त्रसंभार : सामान्यपणे शस्त्रसंभारात वेगवेगळ्या प्रकारांतील शस्त्रास्त्रे, त्यांना लागणारा दारूगोळा, अनेकविध क्षेपण-यंत्रणा किंवा साधने, तसेच भूमीवरील, सागरी व हवाई संघर्षांतील चिलखती-गाड्या, नौका, विमाने यांसारखी विविध प्रकारची शस्त्रास्त्रवाहक साधने इत्यादींचा अंतर्भाव होतो.
शस्त्रसंभार, त्याची रचना, त्याच्यामागची प्रेरणा, उत्पत्ती, संख्येतील वाढ व विकास वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या गरजांमुळे निर्माण झाला. कालमानानुसार ठोकळमानाने त्याचा खालीलप्रमाणे आढावा घेता येईल:
पौराणिक व प्राचीन काळ : पौराणिक काळात अस्त्र म्हणजे मानवी शक्तीच्या किंवा यंत्रायुधांच्या साह्याने फेकले जाणारे व प्रामुख्याने विध्वंसक साधन. त्यात पुढील तीन प्रकारच्या अस्त्रांचा समावेश होत असे : मंत्रमुक्त, पाणिमुक्त व यंत्रमुक्त. मंत्रोच्चाराची अस्त्रे दैवी असून ती मंत्रोच्चारात इष्ट देवतांच्या विधिपूर्वक आवाहनाने सिद्ध होत. ह्यांमध्ये आग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, वायव्यास्त्र, ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र, नारायणास्त्र इ. समाविष्ट आहेत.
अस्त्रयोजना मंत्र, उपचार, प्रयोग व संहार या क्रमाने चार भागांत सिद्ध होत असल्याने त्यांचा `चतुष्पाद’ असा उल्लेख महाभारतात आढळतो. पाणिमुक्त शस्त्रसंभारात दगडधोंडे, गोफणी, गलोल, भाले, धनुष्यबाण, आगीचे बोळे आदींचा समावेश होतो. तलवार, भाले, गदा, परशु, कुऱ्हाडी हातात ठेवून वार केले जात. वेगवेगळी क्षेपणास्त्रे फेकण्याच्या अंतरावरून त्यांचे वर्गीकरण करण्यात येई.
बैल, घोडा, हत्ती यांच्या वापरामुळे योद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला तसेच त्याला अस्त्रे नेण्याकरिता वाहतुकीची साधने उपलब्ध होऊ लागली.
पुराणकाळात एक व्यक्ती, एका आयुधाने एका वेळी, एकाच शत्रूला मारीत असे. रामायणात हनुमंताने लंकादहन केले, महाभारतात लाक्षागृह जाळले इ. वर्णनांवरून वेगवेगळ्या साधनांनी आसमंत अथवा निवारा नष्ट करणे व एकाहून जास्त शत्रू नष्ट करणे, असे एक नवे युद्धतंत्र अस्तित्वात आले. एकापाठोपाठ बाण सोडून एखादा कुशल धनुर्धारी एकाहून जास्त शत्रूंचा समाचार घेऊ शकत असे. ह्यावरून असे दिसून येते की, अस्त्रांची संहाराची क्षेत्रव्याप्ती वाढत गेली व रणांगणात अथवा मुलकी प्रदेशांत जास्त प्राणहानी होऊ लागली.
परिस्थित्यनुसार शस्त्रसंभाराच्या वापरात बदल करणे, गरजेचे ठरत गेले. जसे इ.स.पू. ३२६ मध्ये ⇨ अलेक्झांडर व ⇨ पोरस यांच्या हायडास्पीझच्या लढाईत अलेक्झांडरचे घोडे हत्तींपेक्षा सरस ठरले आणि पोरसचे रथ चिखलात रुतले. [→ हायडास्पीझची लढाई]. सातव्या शतकात चीनचे स्फोटक द्रव्याचा शोध लावला व बंदुकीला लागणारी दारू तयार केली. त्यामुळे शस्त्रसंभाराला एक नवी दिशा मिळाली. शत्रूवर आघात करण्याकरता योद्धयाला प्रत्यक्ष हातात शस्त्र घेऊन मारण्याची गरज उरली नाही. तो दूर अंतरावरून नेम धरून एक-एक गोळी उडवून शत्रूचा वेध घेऊ लागला. अशा प्रकारे बंदूक व गोळी यांची शस्त्रसंभारात भर पडली.
मध्ययुगीन काळ : चौदाव्या शतकात युरोपमध्ये तोफा व तोफगोळे तयार केले गेले. तत्पूर्वी उखळीतून दगडधोंडे किल्ल्यांच्या तटाआड टाकण्याची प्रथा होती. हत्तींची धकड देऊन किल्ल्यांचे दरवाजे फोडत परंतु तोफा व दारूगोळा यांचा शोध लागल्यामुळे हत्तींऐवजी तोफगोळे वापरण्यात येऊ लागले हे गोळे भरीव असत. पुढे पोकळ्या गोळ्यांत खिळे, अणकुचीदार वस्तू, धातूंचे तुकडे इ. भरून शत्रूवर गोळे टाकले जात व ते फुटून त्यांतील धातूंच्या तुकड्यांनी शत्रूची माणसे जखमी होत.
पानिपतच्या पहिल्या लढाईत ⇨ बाबराने तोफखाना वापरला व इब्राहिम लोदीचा पराभव केला (१५२६). तोफांमुळे माऱ्याचे क्षेत्र वाढले व प्राणहानी जास्त होऊ लागली. तोफेचे गोळे अचूक मारण्याची कला त्या वेळी यंत्रसामग्रीच्या व वैज्ञानिक शोधांच्या अभावी अवगत नव्हती परंतु आवाजाने व इतरत्र दगडधोंडे, माती व छिलके उडाल्यामुळे शत्रूची दाणादाण होई व घोडे, तोफा ओढणारे बैल इ. जनावरे घाबरून पळून जात. जेव्हा तोफा निकामी करण्याकरता घोडदळ शत्रूच्या तोफखान्यावर तुटून पडे, तेव्हा त्या तोफा एकमेकींना साखळदंडाने जखडून घोडदळाचे हल्लेच निकामी करण्याची युक्ती वापरली जाऊ लागली.
पंधराव्या शतकात बंदुकीला संगिनी लावल्या जाऊ लागल्या व खांद्याला खांदा लावून पायदळ चाल करून जाई आणि आज्ञा मिळताच पुढची रांग गुडघ्यावर बसून व मागची रांग उभी राहून बंदुकीने नेम धरनू फैरी झाडत व नंतर बंदूक आडवी करून त्याला संगीन जोडून चाल करून जात.
मराठ्यांच्या काळात लढाईत सुरुवातीस तलवार, भाले, बरचे, ढाली इत्यादींचा वापर होत असे. मोगलांशी लढताना पोर्तुगीज, फ्रेंच आदींकडून गडावर संरक्षण म्हणून ठेवण्याकरिता तोफा विकत घेण्यात आल्या. अठराव्या शतकात मोठ्या प्रमाणावर स्थलयुद्धे होऊ लागली, तेव्हा तोफखान्याची सैन्याला गरज भासली परंतु बहुतेक ‘तोपची’ (तोफखाना अधिकारी) फिरंगी, मराठेतर असत. ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे सैन्य उभे केले, तेव्हापासून मराठी सेनेच्या आधुनिकीकरणास सुरुवात झाली. काही फ्रेंच, इंग्रज अधिकारी मराठा फौजेला कवाईत शिकवताना बंदुकी वापरीत.
भारतात सतराव्या शतकात मोगल काळात तोफखाना वेगळा झाला व अनेक तोफा रणक्षेत्रात लावून एकाच वेळी शत्रूच्या व्यापक क्षेत्रावर अथवा सैन्यसमूहावर भडीमार करू लागल्या. त्यांना पायदळाचे व घोडदळाचे संरक्षण लागे.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धापर्यंत मराठ्यांकडे मराठी तोपचीचा असा स्वतंत्र तोफखाना नव्हता (१७६१). सदाशिवराव भाऊंना इब्राहिमखान गारदीचा तोफखाना पदरी बाळगावा लागला. [→ पानिपतच्या लढाया].
विसाव्या शतकातील शस्त्रसंभार : पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत एक-एक गोळी उडवणाऱ्या बंदुका व संगिनी हेच प्रमुख शस्त्र होते. घोडदळ भाले (लान्स) व तलवारी वापरीत, तसेच पायदळाचे अधिकारीही तलवारीच्या जोरावर नेतृत्व करीत. पहिल्या महायुद्धात स्वयंचलित ब्रेनगन व मध्यम प्रतीची मशीनगन यांचा शोध लागला व त्यांतून गोळ्यांचा वर्षाव करता येऊ लागला. तसेच मशीनगनचे तोंड फिरवून गोळ्यांचा वर्षाव करणे शक्य झाल्याने क्षेत्रव्याप्ती वाढली.
खंदक युद्धतंत्राच्या लढाईत, काटेरी तार तोडून जाण्याचा उपाय म्हणून रणगाड्याचा शोध लागला आणि ब्रेनगन रणांगणात चालवण्याकरिता ब्रेनगन कॅरियरचा वापर होऊ लागला.
सैन्यात अभियांत्रिकी विभाग अस्तित्वात आले. सुरुंग तयार करणे, किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत खंदक खोदून दाराला सुरुंग लावणे, तोफांकरिता मचाण बांधणे, रस्ते बांधणे इ. कामे हे विभाग करू लागले. त्यामुळे स्फोटक सुरुंगाची शस्त्रास्त्रांमध्ये भर पडली.
दुसऱ्या महायुद्धात विज्ञान व सैनिकी तंत्रज्ञान यांत लक्षणीय वाढ झाली आणि रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी तोफांचे गोळे व हातगोळे वापरात येऊ लागले. काही शूर शिपाई रणगाड्याच्या जवळ जाऊन खांद्यावर क्षेपणयंत्र धरून रणगाडे उद्ध्वस्त करीत अथवा रणगाड्यात ज्वालाग्रही गोळे फेकीत.
जेव्हा युद्धात विमानांचा वापर सुरू झाला, तेव्हा विमानांतून टाकावयाचे गोळे तसेच रॉकेट व मशीनगनमधून मारता येणाऱ्या गोळ्या यांची भर पडली. त्याचबरोबर विमान विध्वंसक तोफा वापरात येऊ लागल्या. पायदळही मशीनगनने विमानावर मारा करू लागले. रणगाडे उद्ध्वस्त करण्याकरिता व पायदळाला हानी पोहोचवण्याकरिता रणगाडेनाशक व मनुष्यनाशक सुरुंगांचा शोध लागला. लहान डब्याच्या आकाराचे मनुष्यनाशक सुरुंग व रणगाडेनाशक लहान जात्याएवढे सुरुंग लावण्याचे काम लष्करी अभियंते करीत व तेच लोक शत्रूने पेरलेले सुरुंग निकामी करीत.
गंधकासारखे ज्वालाग्राही पदार्थ वापरून धूर व जाळ निर्माण करणारे हातगोळेही तयार होऊ लागले. रात्री शत्रूच्या हालचाली दिसाव्यात म्हणून हवाई छत्रीच्या साहाय्याने हवेत हळूहळू तरंगत येणारे व उजेड देणारे गोळे वापरात येऊ लागले. आधी काही विमाने हे बाँब टाकून युद्धक्षेत्रावर रात्री प्रकाश पाडीत व नंतर लढाऊ विमाने अचूक बाँबवर्षाव करीत. तसेच शत्रूची विमाने रात्री दिसावीत म्हणून उजेडाचा झोत उंचावर टाकता येणारे शोधदिवे (सर्च लाइट) वापरात आले.
रेल्वे यार्ड, बंदरे, गोद्या, कारखाने आदी शत्रूच्या दळणवळणाची व युद्धसामग्रीची उत्पत्ती करणाऱ्या क्षेत्रांची हानी करण्याकरिता, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता, चटई बाँबिंग (कार्पेट-बाँबिंग) हा एक नवा प्रकार अमलात आला. एकेका वेळी पाचशे ते हजार विमाने बाँब पेरीत जात व व्यापक क्षेत्रावर जाळपोळ, पडझड नाश होई. शत्रू शोधदिवे व विमानविध्वंसक तोफा आणि स्वतःची हल्ले परतविणारी विमाने वापरून हल्ला परतवीत. आकाशात विमानांची लढाई होऊ लागली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नौसेनेची सर्व भिस्त तोफांवर असे. लढाऊ जहाजे पाण्यावर तरंगत पण दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांचा शोध लागला. त्यामुळे पाणसुरुंग व पाणतीर (टॉर्पेडो) यांची शस्त्रसंभारात भर पडली. आधुनिक जहाजे आता दूरदूर जातात व समुद्रातच इंधन भरून घेऊन पुन्हा युद्धक्षम होतात. सगळ्यात महत्त्वाची सुधारणा म्हणजे ‘विमानवाहू जहाज’ होय. हा एक प्रकारचा हालताचालता विमानतळ होय. द्रुतगतीने जाऊन शत्रूवर अचानक हल्ला चढविणे व आपल्या काफिल्याचे संरक्षण करणे, या दृष्टींनी नाविक शस्त्रसंभारात याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यावरील विमाने, हेलिकॉप्टरे इ. शत्रूच्या भूप्रदेशावर व नौदलावर बाँब, क्षेपणास्त्रे टाकून हल्ला चढवतात व पुन्हा मूळच्या जहाजावर परत येऊ शकतात, हे याचे वैशिष्ट्य होय.
दुसऱ्या महायुद्धात (१९३९–१९४५) शास्त्रज्ञांनी लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे अनेक शोध लावून नवनवीन लष्करी सामग्री तयार केली. त्यात ‘रडार’मुळे (रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग) शत्रूच्या विमानांचा हल्ला होण्यापूर्वी त्यांची दिशा, उंची व अंतर कळू लागले व ‘रेडिओ’मुळे ही माहिती सर्व संबंधितांना तातडीने पोहोचवून स्वतःचा बचाव आणि प्रतिहल्ला करणे शक्य झाले. त्याचप्रमाणे पाणबुड्या खोल पाण्यात असल्या, तरी त्यांचा शोध घेण्यासाठी ध्वनितरंगावर आधारित ‘ॲसडिक’ यंत्रणा युद्धनौकांवर बसवून पाणबुडीच्या डोक्यावर जहाज आणून पाणसुरुंग टाकून पाणबुडीचा नाश करता येऊ लागला. पाणबुडी पाण्यातून तसेच वर येऊन शत्रूच्या जहाजावर पाणतीर सोडून बोटीचा वेध घेऊ लागली. त्याचप्रमाणे पाणबुडी वर आली की, शत्रूकडूनही तोफांचा मार करण्यात येऊ लागला. अशा प्रकारे सागरी शस्त्रसंभारामुळे लढायांचे स्वरूप व क्षेत्र वाढत गेले.
आधुनिक काळातील शस्त्रसंभार : ऑगस्ट १९४५ मध्ये जपानच्या हीरोशीमा व नागासाकी ह्या शहरांवर अमेरिकेने विमानांतून अणूबाँब टाकले व युद्धातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. अणुशक्तीतून उत्पन्न झालेल्या शस्त्रसंभाराचा जगाला भीषण धोका अनुभवावयास मिळाला. ‘अणुविच्छेदन’ व ‘अणुसम्मीलन’ ही तंत्रे अवगत झाली व ह्या प्रक्रियांतून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. हे ध्यानात येताच अणुशक्तीचा ‘संहारशक्ती’ म्हणून वापर होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यामध्ये अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू झाली. ही अण्वस्त्रे त्यांच्या पल्ल्यानुसार व स्फोटकांच्या वजनानुसार बनविण्यात येऊन रणक्षेत्रानुसार मर्यादित कमी पल्ल्याची, मध्यम अंतरावर जाणारी, दूर पल्ल्याची व एका खंडातून दुसऱ्या खंडात जाऊन पडू शकणारी असे त्यांचे गट पडले. शेवटी एकदा नव्हे, अनेकदा सगळ्या जगाचा संपूर्ण नाश होईल एवढी अण्वस्त्रे जगात निर्माण झाली. आणि अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, सोव्हियत रशिया आणि चीन हे देश अण्वस्त्रधारी बनले. कोरिया, इस्त्रायल त्यानंतर १९९८मध्ये भारत व पाकिस्तान यांनीही अणूचाचण्या करून अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
अणूबाँब निर्मितीबरोबर ते फेकण्याकरिता विमाने, तोफा वाहून नेणारी जहाजे व पुढे वैमानिकरहित संगणक व इतर वैज्ञानिक तंत्रज्ञानावर चालणारे एक नवे क्षेपणास्त्र शस्त्रसंभारात समाविष्ट झाले. हे क्षेपणास्त्रसुद्धा वेगवेगळ्या गरजा भागवू लागले. जमिनीवरून जमिनीवरच्या निशाणाचा वेध, जमिनीवरून आकाशात उडणाऱ्या यानांचा अथवा क्षेपणास्त्रांचा वेध घेणारे, बोटीवरून दुसऱ्या बोटींचा वेध घेणारे व आकाशातून टाकले जाऊन जमिनीवरचे निशाण (टारगेट) साधणारे असे क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार असून त्यांतही कमी पल्ल्याची, मध्यम पल्ल्याची व दूर पल्ल्याची क्षेपणास्त्रे असे प्रकार पडले. भारताने अग्नी, पृथ्वी, आकाश यांसारखी तर पाकिस्तानने घोरीसारखी क्षेपणास्त्रे बनवली.
दूरवर फेकल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांना वाहून नेणारी विमाने, बोटी, तोफा व पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्या उपग्रहांना उंच आकाशात नेऊन त्यांना गुरुत्वाकर्षण प्रभावक्षेत्राच्या बाहेर सोडून परत येणारी उपक्षेपणयंत्रणा निर्माण करण्यात आली.शत्रूच्या नौदलाचा आपल्या बंदरावर अथवा आरमारावर हल्ला होऊ नये, म्हणून समुद्रात सुरुंग पेरण्यात येऊ लागले व शत्रूचे सुरूंग काढून निकामी करण्याकरिता खास जहाजे बांधण्यात आली.शत्रूने डागलेल्या तोफांचे गोळे, बाँब, क्षेपणास्त्रे इ. जेव्हा हवेतून जमिनीवर मारा करतात, तेव्हा त्यांचा वेध ध्वनितरंग तसेच अवरक्त प्रारण यांच्या साहाय्याने घेतला जातो. त्यामुळे हा हल्ला नेमका कुठून होत आहे, हे शोधून स्वतःचा बचाव व शत्रूवर प्रतिहल्ला करणे शक्य झाले.
बंदुकी, मशीनगन, स्टेनगन व पिस्तूल यांच्या गोळ्यांच्या लांबी-रुंदी व परीघ यांच्यात फरक होत गेले. आणि ०·३०३ इंच, ०·३० इंच, ९ मिमी. इ. मापाचा दारूगोळा तयार करण्यात आला. नाटोसारख्या विविध देशांच्या सैन्याच्या संघटनेत हत्यारे व दारूगोळा ह्यांच्यात एकसूत्रता येणे आवश्यक होते. व्यवस्थापन गुंतागुंतीचे होते, म्हणून युरोप, अमेरिका व ब्रिटन यांनी एकाच मोजमापाचा दारूगोळा बनवण्याचा शक्यतो प्रयत्न केला. विकसनशील देशांना परदेशांतून युद्धसामग्री मिळे. त्यामुळे त्यांना जे मिळेल ते घेण्याखेरीज दुसरा मार्गच उरला नाही. त्यांना विकसित देशांवर अवलंबून राहावे लागते.
सांप्रत अण्वस्त्रसज्ज देशांनी इतर देशांवर अनेक निर्बंध लादले आहेत व वेगवेगळ्या करारांवर सह्या करून घेण्याचा आग्रह धरला आहे. काहींनी करार मान्य केले, काहींनी केले नाहीत. जे मान्य करीत नाहीत, त्यांची आर्थिक कोंडी केली जाते व सापत्नभाव दाखवला जातो. अशा प्रकारे अण्वस्त्र स्पर्धेत टिकण्याकरिता व सैन्यात अत्याधुनिक शस्त्रसंभार ठेवण्याकरिता प्रत्येक देशाने शक्यतो स्वावलंबी बनणे हेच उत्तम.
पहा : अणुबाँब अणुयुद्ध अस्त्रविद्या, प्राचीन आर्थिक युद्धतंत्र इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र उंटदल कमांडो काळपुळी, संसर्गजन्य क्रूझर खंदक युद्धतंत्र गनिमी युद्धतंत्र ग्रेनेड घोडदळ चिलखत जंगल युद्धतंत्र जैव व रासायनिक युद्धतंत्र डोंगरी युद्धतंत्र ढाल तडित् युद्धतंत्र तलवार तोफनौका तोफा व तोफखाना दारूगोळा धनुर्विद्या नाविक युद्धतंत्र पाणतीर पाणबुडी युद्धतंत्र पारिस्थितिकीय युद्धतंत्र फ्रिगेट बंदूक व रायफल बाँब बाँबफेकी विमाने भाला मरुभूमि युद्धतंत्र युद्धनौका रडार रणगाडा रॉकेट लढाऊ विमाने विनाशिका विमान विमानवाहू जहाज विषतंत्र विषविज्ञान शिरस्त्राण सुरुंग हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रे.
पित्रे, का. ग.