शांतके : (ट्रँक्विलायझर्स). विविध मानसिक आजारांमध्ये मनोव्यापारांची अतिरिक्तता अथवा चिंता, ताण यांसारखे मानसिक क्षोभ कमी करून उपचारांमध्ये मदत करणाऱ्या औषधांना शांतके म्हणतात. शांतकांमुळे अति उत्तेजित वा क्षुब्ध व्यक्ती शांत होते. १९५५ च्या सुमारास अशा प्रकारची द्रव्ये प्रथमच उपयोगात आली. त्यापूर्वी मनोरुग्णांच्या शांतकीय उपचारासाठी शीतस्नान, मेंदूला विजेचा धक्का देऊन आकडी आणणे, रक्तामधील ग्लुकोजाचे प्रमाण इन्शुलिनाच्या मदतीने द्रुत गतीने कमी करणे, शस्त्रक्रियेने मेंदूच्या पूर्वकपालखंडातील काही तंत्रिकामार्गांचे (मज्जामार्गांचे) छेदन करणे [→ मेंदू] यांसारखे उपचार साहाय्यक मार्ग अनुसरले जात. रुग्णांना इतरांपासून वेगळे ठेवून कधीकधी कैद्यांसारखे बांधून त्यांची हालचाल नियंत्रित केली जाई. शांतकांमुळे असे उपचार मागे पडले व उपचारांच्या यशस्वितेमध्येही क्रांतिकारक वाढ झाली. सुरुवातीला शांतकांच्या कार्यपद्धतीबद्दल व संपूर्ण परिणामांबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने वेगवेगळ्या नावांनी त्यांचा उल्लेख होई. उदा., शांतके, मानसोपचारी द्रव्ये, मनोअनुवर्ती औषधे, तंत्रिका शांतके, मनोआरामदायी औषधे, स्थितप्रज्ञताकारी द्रव्ये, मनोविकृतिनाशके इत्यादी.
मनोविकारांमधील उपयुक्ततेनुसार शांतकांचे प्रमुख व गौण असे दोन प्रमुख वर्ग पडतात.
प्रमुख शांतके : यांनाच चित्तविकृतीहारके (अँटिसायकोटिक्स) असे नाव आता रूढ झाले आहे. त्यांत ⇨सर्पगंधा वनस्पतीपासून मिळणारी रेसरपीन व तत्सम ⇨ अल्कलॉइडे तसेच फिनोथायाझीन या संयुगापासून तयार केलेली क्लोरप्रोमॅझीन व तत्सम द्रव्ये ही औषधे येतात. या दोन प्रमुख रासायनिक गटांव्यतिरिक्त इतर औषधेही यांत येतात. उदा., हॅलोपेरिडॉल गट, पिमोझाइड गट, क्लोरप्रॉथिक्सीन गट, क्लोझॅपीन गट, लोक्सॅपीन गट, मॉलिंडोन गट आणि रिस्पेरिडोन गट.
या औषधांपैकी रेसरपीन रक्तदाब कमी करण्यासाठी वापरले जाते. चित्तविकृतीवरील उपचारांसाठी सर्पगंधा वनस्पतीपासून मिळणाऱ्या द्रव्यांचा उपयोग केला जाऊ शकतो, हे जगात सर्वप्रथम गणेश सेन व कार्तिक बोस या भारतीय वैद्यांनी दाखविले होते. जठरामधील स्राव वाढून व्रण निर्माण होण्याची शक्यता व अतिअवसादनामुळे विषण्ण मनस्थितीत आत्महत्येकडे वळण्याचा धोका यांसारख्या दुष्परिणामांमुळे या वर्गातील अल्कलॉइडे लवकरच मागे पडली. त्यांची जागा क्लोरप्रोमॅझिनाने घेतली.
क्लोरप्रोमॅझीन गटाचे औषधी परिणाम बहुविध आहेत. छिन्नमानस, उन्माद-अवसाद चित्तविकृती वा वेड, मादक द्रव्यांच्या दीर्घकाल सेवनाने होणारी मनोविकृती, मेंदूच्या आजाराने निर्माण होणाऱ्या मनोविकृती यांमध्ये या गटातील औषधे दीर्घकाळ वापरून लक्षणीय सुधारणा घडवून आणता येते. यांशिवाय मळमळणे, उलटी होणे, उचकी, खाज, असह्य वेदना, अतिज्वर, अंतर्कर्ण विकारामुळे गरगरणे, व्यसनाधीनता या लक्षणांचा त्वरित परिहार करण्यासाठी या वर्गातील द्रव्ये वापरता येतात.
सुरक्षितता सीमा (पल्ला) मोठी असल्यामुळे या गटातील औषधे दीर्घकाळ किंवा मोठ्या मात्रेत वापरूनही मारकता आढळत नाही परंतु काही व्यक्तींमध्ये पार्किनसन रोगासारखा कंपवात, स्नायूंची ताठरता, उद्देशहीन हालचाली, आकडीसारखे झटके, जास्त झोप येणे, ⇨ अंतःस्रावी ग्रंथींमधील कार्यविक्षोभामुळे स्तनवृद्धी, दुग्धस्रवण, मासिक पाळीची अनियमितता इ. दुष्परिणाम आढळू शकतात. तसेच शरीराचे अवतापन (सामान्यपणे ३६·६० से. पेक्षा कमी तापमान असणे.), रक्तदाबात अकस्मात घट. कावीळ. पचनक्रियेतील बदल यांसारख्या घटनांकडे सतत लक्ष ठेवावे लागते. विशेषतः चित्तविकृत वा वेड्या रुग्णांच्या बाबतीत अशा घटना रुग्णाच्या स्वतःच्या लक्षात न आल्यामुळे दुर्लक्षिल्या जाणे शक्य असते. इतर गटांमधील औषधे अशा प्रसंगी पर्यायी म्हणून उपयुक्त ठरतात.
इ.स. १९९०–२००० या दशकात पूर्वीच्या औषधांची जागा क्लोझॅपीन गट व रिस्पेरिडोन या औषधांनी घ्यायला सुरुवात केली होती. त्यांचे गुणधर्म चित्तविकृतींवर पूर्वी देण्यात येणाऱ्या औषधांपेक्षा वेगळे असल्याने त्यांना अनियत ‘चित्तविकृतीहारके’ म्हणतात. छिन्नमानस या आजारात ही औषधे पूर्वीच्या औषधांपेक्षा अधिक गुणकारी व कमी दुष्परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.
गौण शांतके : चिंताहारक औषधे या नावाने ओळखली जाणारी ही औषधे चिंतेशी निगडित मनोविकारांसाठी आणि मनोविकास नसलेल्या व्यक्तींमध्ये तात्पुरती चिंता किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी वापरली जातात. पुढील प्रमुख गटांचा या शांतकांमध्ये समावेश होतो : (१) बेंझोडायॲझेपीन गट, उदा., डायझेपाम क्लोरडायझेपॉक्साइड (२) मेप्रोबामेट, प्रामुख्याने स्नायू शिथिल करणारे (३) ब्युस्पायरोन, हायड्रॉक्सिझीन यांसारखी विविध संकीर्ण गटांतील औषधे (४) प्रामुख्याने अनुकंपी तंत्रिका तंत्रावर [→ तंत्रिका तंत्र] क्रिया करणारे आणि हृदयरोग व रक्तदाब यांसाठी उपयोगी असलेले प्रोप्रानोलॉल.
गौण शांतकांचा उपयोग सर्वसाधारणपणे शांतक-शामक औषधांप्रमाणेच केला जातो परंतु मोठी मात्रा देऊनही झोप न येता केवळ मनाची क्षुब्धता, चिंता, ताण कमी व्हावा अशी अपेक्षा असते. आकडी किंवा स्नायूंचा ताण किंवा अतिरिक्त हालचाल असणाऱ्या तत्सम अवस्था त्वरित सुधारण्यासाठी डायझेपाम किंवा मेप्रोबामेट ही औषधे वापरली जातात. अकारण चिंता, भयगंड, मंत्रचळेपणा, वेडामधील उन्मादावस्था, ऋतुनिवृत्तीमध्ये घडणारे मानसिक बदल, लहान मुलांच्या वर्तनविषयक समस्या. इ. विविध प्रकारच्या मानसिक आविष्कारांचे नियंत्रण काही प्रमाणात या औषधांनी होते. यांखेरीज शस्त्रक्रिया, असह्य वेदना, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला झालेली इजा, उच्च रक्तदाब, जठरांत्र व्रण यांसारख्या अनेक शारीरिक व्याधींवर उपचारांमध्ये विशिष्ट उपचारांना पूरक म्हणून ‘चिंताहारक’ औषधांचा वापर केला जातो.
पहा : औषधिक्रियाविज्ञान मादक पदार्थ वेदनाशामके शामके.
संदर्भ : Gilman, A. Rall, T. W. Nies, A. S. Taylor, P. (Eds.), Goodman and Gilman’s Pharmacological Basis of Therapeutics,
New York, 1990.
श्रोत्री, दि. शं.