शॅप्ली, हार्लो : (२ नोव्हेंबर १८८५ – २० ऑक्टोबर १९७२). अमेरिकन ज्योतिर्विद. आकाशगंगेचे वेध घेऊन तिची व तिच्या बाहेरील विश्वाची संरचना व व्याप्ती त्यांनी ठरविली. सूर्य हा आकाशगंगेच्या मध्यवर्ती प्रतलाच्या जवळ व आकाशगंगेच्या मध्यापासून सु. ३०,००० प्रकाशवर्षे दूर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी युग्मताऱ्या चेही [→ तारा] वेधांद्वारे मापन केले.

शॅप्ली यांचा जन्म अमेरिकेतील नॅशव्हिल (मिसूरी) येथे झाला. वार्ताहर म्हणून काही काळ काम केल्यावर ते ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाकडे वळले. त्यांनी प्रिस्टन विद्यापीठात एम्‌.ए., पीएच्‌.डी. या पदव्या संपादन केल्या. 

⇨ हेन्री नॉरिस रसेल  यांनी काढलेल्या निष्कर्षावर शॅप्ली यांनी पुढे काम सुरू केले (१९११). युग्मताऱ्यांच्या अनेक प्रणालींमधील ताऱ्यांची मापे (अंतरे व आकारमाने) शोधण्यासाठी त्यांनी ९० युग्मताऱ्यांचा अभ्यास व ते एकमेकांच्या ⇨ पिधानात असताना त्यांच्या प्रकाशात होणाऱ्या बदलावरून त्यांची व्याप्ती वा आकारमान ठरविण्याचा प्रयत्न केला. पिधानाच्या वेळी ताऱ्याच्या दीप्तीमध्ये होणाऱ्या फरकावरून ताऱ्याचे आकारमान ठरविण्याची त्यांची ही पद्धती पुढील तीस वर्षे प्रमाण पद्धती म्हणून वापरात होती. ‘सेफीड चल’ तारे हे पिधानकारी (एकमेकांना ग्रासणारे) युग्मतारे नसतात, असेही त्यांनी दाखविले. सेफीड तारे हे स्पंदमान तारे असल्याचे व यामुळे त्यांच्या दीप्तीत फरक होत असल्याचे त्यांनीच प्रथम सूचित केले. आर.आर.लायरी तारे पण पिधानकारी नसल्याचे त्यांनी दाखविले. [→ तारा].

शॅप्ली पॅसाडीना (कॅलिफोर्निया) येथील मौंट विल्सन वेधशाळेत १९१४ साली साखल झाले. तेथील ६० इंची परावर्तक दूरदर्शक वापरून त्यांनी आकशगंगेमधील गोलाकार तारकागुच्छांची वाटणी कशी झाली आहे, याचा अभ्यास केला. असे असंख्य ‘तारकागुच्छ’ आकाशगंगेत असून त्यांपैकी काहीत दहा लाखांवर तारे असल्याचे त्यांना दिसून आले. ज्ञात अशा सुमारे १०० तारकागुच्छांपैकी तीस टक्के तारकागुच्छ धनू राशीच्या क्षेत्रात आहेत असे त्यांनी दाखविले. चल ताऱ्याच्या तेजस्वितेत आवर्ती बदल होण्याचे कालावधी व त्यांची भासमान दीप्ती यांच्यातील परस्परसंबंधांवरून त्यांची अचूक अंतरे काढण्याची संकल्पना पुढे आली होती. ती वापरून त्यांनी हे तारकागुच्छ स्थूलपणे एका गोलावर विखुरले असून या गोलाचा मध्य धनू राशीत आहे, असे सूचित केले. तारकागुच्छांनी गोलाकार मांडणी झाल्याचे समजल्याने ते आकाशगंगेच्या केंद्राभोवती तयार होत असल्याचा निष्कर्ष काढता आला. हा निष्कर्ष व त्यांनी जमा केलेली अंतरांविषयीची इतर माहिती यांवरून त्यांनी सूर्य आकाशगंगेच्या केंद्रापासून ५०,००० प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचे अनुमानन केले. नंतर हे अंतर ३०,००० प्रकाशवर्षे असल्याचे ठरविण्यात आले. याच्या आधीच्या काळात सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राजवळ असल्याचे मानीत असत. त्यांनी आकाशगंगेचा व्यास ३ लाख प्रकाशवर्षे व जाडी ३०,००० प्रकाशवर्षे तसेच शौरी (हर्क्युलस) तारकागुच्छ आकाशगंगेतच सुमारे ३६,००० प्रकाशवर्षे अंतरावर असल्याचे सांगितले होते. नंतर याही आकडेवारीत सुधारणा करण्यात आल्या.

अनेक शैक्षणिक संस्थांत त्यांनी अध्यापनाचे काम केले. त्यांनी हार्व्हर्ड कॉलेज वेधशाळा नावारूपास आणली. आकाशगंगेशिवाय त्यांनी विशेषकरून ⇨ मॅगेलनी मेघ  या दीर्घिकांचाही अभ्यास केला. दीर्घिकांच्या गुच्छांना त्यांनी मेटॅगॅलॅक्सी हे नाव दिले. आकाशगंगेत जीवसृष्टी असलेले एक लाख ग्रह असतील, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी दक्षिण गोलार्धात एक ज्योतिषशास्त्रीय संशोधक केंद्र उभारले. तेथून दक्षिण खगोलर्धात दिसणाऱ्या तारकासमूहांचे निरीक्षण व अध्ययन करण्याचा त्यांचा हेतू होता. शिल्पागार व अश्मंत या तारकासमूहांमध्ये त्यांना लघुदीर्घिका आढळल्या. त्यांची पुढील पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत : स्टार क्लस्टर्स (१९३०), फ्लाइट्‌स फ्रॉम केऑस (१९३०), गॅलॅक्सीज (१९४३), द इनर मेटॅगॅलॅक्सी (१९५७) व स्टार्स अँड मेन ···(१९५८). 

    

बोल्डर (कोलोरॅडो) येथे त्यांचे निधन झाले.                 

गोखले,  मो. ना.