शहामृग : याचा समावेश पक्षिवर्गातील स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस गणाच्या स्ट्रुथिओनिडी कुलात केलेला आहे. याचे शास्त्रीय नाव ‘स्ट्रुथिओ कॅमेलस’ आहे. विद्यमान पक्ष्यांतील तो सर्वांत मोठा पण उडू न शकणारा पक्षी आहे. तो आफ्रिका व अरबस्तानातील रेताड वाळवंटी मोकळ्या भागात आढळतो. सध्या तो पूर्व आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आढळतो.
पूर्ण वाढ झालेल्या नराची उंची २·५ मी. असते. मान खूप उंच असून, ती कोणत्याही दिशेला तो सहज फिरवू शकतो. त्याचे वजन १४० ते १५५ कि.ग्रॅ. असते. मादी नरापेक्षा थोडी लहान असते. शहामृगाचे डोके लहान व पसरट असून डोळे तपकिरी रंगाचे असतात. डोळ्यांभोवती काळे पट्टे असतात. दृष्टी अतिशय तीक्ष्ण असल्याने त्याला लांबवरचे दिसते. त्याची चोच आखूड पण तळाशी रुंद असते. त्याचे पाय बळकट असतात. पायाच्या फटकाऱ्याने तो शत्रूला जायबंदी करतो. त्याच्या पायाला दोन बोटे असतात. त्यांपैकी एक मोठे व दुसरे लहान असते. मोठे बोट १८ सें.मी. लांबीचे असते. बोटांना टोकदार नखे असतात. त्यांचा उपयोग तो शास्त्राप्रमाणे संरक्षणासाठी करतो.
नर पक्षी आकर्षक दिसतो. त्याच्या शरीरावर मऊ काळी पिसे व आखूड पंख असून शेपटीची पिसे पांढऱ्या रंगाची असतात. मादीचा रंग भुरकट तपकिरी असतो. डोके, मान व पायांवर तुरळक पिसे असतात. शहामृग ५ ते ५० च्या कळपाने राहतात. ते नेहमी झीब्रा, काळवीट यांच्या आसपास हिंडत असतात. सिंहासारखा या सर्वांचा शत्रू जवळ येताच ते इतरांना सावध करतात. शहामृग विश्रांती घेताना मान पसरून बसतो. त्यामुळे लांबून बघणाऱ्यास त्याचे फक्त शरीर दिसते व त्याने डोके वाळूत खुपसले आहे असे वाटते. संकट आल्यावर तो गर्जना करीत वेगाने पळतो. त्याचा पळण्याचा वेग ताशी सुमारे ६५ किमी. असतो. त्याची कोंडी केल्यास तो जोराने धडक देतो. तो एका ढांगेत ४ ते ५ मी. अंतर कापतो. त्याला पंख असूनही उडता येत नाही पण त्यांचा उपयोग वेगाने पळताना तोल सांभाळण्यासाठी त्याला होतो. उडणाऱ्या पक्ष्यांच्या उरोस्थीवर आढळणारा कणा शहामृगामध्ये नसतो.
शहामृग सर्वभक्षी आहेत. ते प्रामुख्याने धान्याच्या बिया, फळे व झुडपाची पाने, वेली व रसाळ वनस्पती तसेच लहान प्राणी खातात. शहामृग वेली व रसाळ वनस्पती खात असल्याने पाण्याशिवाय पुष्कळ काळ ते राहतात, असा समज आहे. ते संधी मिळाल्यास पाण्याचे डबके व तलावात अंघोळ करतात.
नर पाच ते सहा माद्यांवर हुकमत गाजवितो. प्रणयाराधन काळात नर मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट आवाज काढतो, तो गर्जना करतो व फुत्कारतो. नराचे दोन ते सहा माद्यांबरोबर मीलन होते. सर्व माद्या वाळूच्या एका खड्ड्यात १५ ते ६० अंडी आढळतात. सर्व माद्या दिवसा आळीपाळीने अंड्यावर बसतात. रात्री नर अंड्यांवर बसतो. अंडे भुरकट पांढऱ्या रंगाचे असते. अंड्याची लांबी १५० मि.मी. व व्यास १२५ मिमी. असतो. सर्वांत मोठ्या अंड्याचे वजन सुमारे १·४ किग्रॅ. असून सुमारे ४० दिवसांनंतर अंड्यांतून पिले बाहेर पडतात. काही तासांतच ती मातापित्यांबरोबर चालू लागतात. एका महिन्यानंतर पिले कळपाबरोबर फिरू लागतात. तीन-चार वर्षांत पिलांची पूर्ण वाढ होते. शहामृगाचे सरासरी आयुर्मान ४० ते ४५ वर्षांचे असते.
शहामृगांचे एकच कुल असून पुढील सहा उपजाती आहेत :
(१) अरेबियन शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस सिरियाकस). शिकार व पिसांसाठी हत्या केल्याने सिरिया व अरबस्तानात आढळणारी ही उपजाती नष्ट झाली आहे. १९४१ नंतर ह्या प्रकारचे शहामृग आढळले नाहीत.
(२) आफ्रिकन शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस ऑस्ट्रॅलिस). दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणारी उपजाती. सध्या नैर्ऋत्य आफ्रिका व अंगोलात आढळते. ह्या उपजातीची पालन केंद्रे निघाली आहेत.
(३) उत्तरेतील शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस कॅमेलस). सुरुवातीस मोठ्या प्रमाणावर आढळणारी ही उपजाती सध्या दक्षिण सहारा व इथिओपियाच्या पूर्व भागात आढळते.
(४) मसाई शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस मसाईकस). ही उपजाती दक्षिण केनिया व टांझानियात आढळते. त्यास ‘मसाई शहामृग’ म्हणतात.
(५) सोमाली शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस मॉलिब्डोफॅन्स). ही उपजाती उत्तर केनियापासून इथिओपिया व सोमालियात आढळते.
(६) स्पाट्झी शहामृग : (स्ट्रुथिओ कॅमेलस स्पाट्झी). ‘रीओ दे ऑरो’च्या वायव्येस व पश्चिम मॉरिटेनिया येथे ही लहान उपजाती आढळते. दोन चाकी गाडीला जुंपून हौशी लोक त्यांचा उपयोग फिरण्यासाठी करतात.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस शहामृगाच्या पिसांना मागणी असल्याने आफ्रिका, ईजिप्त, अल्जीरिया, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर त्यांची पालन केंद्रे निघाली होती. त्यांच्या पिसांचा उपयोग टोप्या व पोशाख यांची सजावट करण्यासाठी करीत. ही ‘टूम’ बदलल्याने पिसांची मागणी कमी झाली व बरीच केंद्रे बंद पडली. शहामृगाचे मांस चविष्ट नसल्याने त्यास मागणी नाही. त्याच्या कातडीपासून बूट, पट्टे, पिशव्या आदी वस्तू तयार करतात. दक्षिण आफ्रिकेत सुमारे १५,००० शहामृग पाळले गेले असून, त्यांचा उपयोग चांगल्या प्रतीची कातडी मिळविण्यासाठी केला जातो.
पहा : एमू कॅसोवेरी.
दातार, म.चिं. पाटील, चंद्रकांत प.