शरीररचनाशास्त्र : (शारीर अँनॅटॉमी). वनस्पती, प्राणी व मानवाच्या शरीररचनेचा अभ्यास करणारी ⇨ जीवविज्ञानाची शाखा. विच्छेदन किंवा कापणे या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून अँनॅटॉमी या इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. शरीररचनाशास्त्रात सजीवाच्या शरीरातील अवयवांचा आकार, रचना व कार्य, तसेच त्यांचे परस्परांशी संबंध यांबाबतचा अभ्यास केला जातो. ही संकल्पना काही वेळा अंतर्गत ⇨ आकारविज्ञान या अर्थाने वापरली जाते. ही खूप जुनी विज्ञानशाखा असून तिला मोठी परंपरा आहे. शरीररचनेचे ज्ञान सुरूवातीच्या काळात वनस्पती, प्राणी व मृत मानव यांच्या शरीर विच्छेदनातून मिळाले होते. [→ प्राणिविच्छेदन].
इतिहास : ⇨ हिरॉफिलस या ग्रीक अभ्यासकांनी शरीररचनाशास्त्राचा पाया घातला. त्यांनी प्रथम शास्त्रीय पद्धतीने मानवी शरीराचे विच्छेदन इ. स. पू. तिसऱ्या शतकाच्या सुरूवातीस केले. त्यांनी मेंदू, डोळा, प्रजोत्पादन तंत्राचे अवयव यांच्या रचनेचे वर्णन लिहिले आहे. त्यांनी तंत्रिका (मज्जा), नीला, रोहिणी यांच्या कार्याबाबत संशोधन केले होते. त्यांचे सहकारी ⇨ एरासिस्ट्राटस यांनी त्यावर अधिक संशोधन केले होते व त्यातून ⇨ शरीरक्रियाविज्ञान या नवीन शाखेचा जन्म झाला.
पूर्वीच्या काळी मानवी शरीर ही पवित्र बाब मानली जात असल्याने ते अभ्यासासाठी सहज उपलब्ध होणे अवघड होते. मानवी शरीराचे विच्छेदन हा गंभीर गुन्हा समजला जात असे. इ. स. पू. ४०० मध्ये ग्रीकांनी अपवादात्मक परिस्थितीत मानवी विच्छेदनास परवानगी दिली होती. इ. स. १०० मध्ये ⇨ गेलेन यांनी कपींवर (शेपूट नसलेल्या माकडांवर) प्रयोग केले व शरीररचनेविषयीच्या तपशिलांचे प्रथमच वर्णन केले. तसेच मूत्राची निर्मिती मूत्रशयात होत नसून ती वृक्कामध्ये (मूत्रपिंडांमध्ये) होते, असे त्यांनी संशोधनातून दाखविले. त्यांनी अनेक मानवी अवयवांची वर्णने लिहिली आहेत. त्याचे कार्य प्रामुख्याने प्राण्यांचा अभ्यास व जखमी योद्धांच्या उपचारावर आधारित होते. इ.स. १३०० नंतर पश्चिम युरोपात वैद्यकीय शिक्षणामध्ये मानवी शरीराच्या विच्छेदनास परवानगी देण्यात येई [→ शवपरीक्षा]. १५४३ मध्ये ⇨अँड्रिअस व्हेसेलिअर या बेल्जियन शास्त्रज्ञांचे मानवी शरीररचनेबाबतचे De humani corporis fabrica हे पुस्तक प्रकाशित झाले. ते शास्त्रीय विच्छेदनावर आधारित होते. त्यांना आधुनिक शरीररचनाशास्त्राचे प्रवर्तक मानतात. त्यानंतर या शस्त्रात हळूहळू प्रगती होत गेली. १६२८ मध्ये ⇨ विल्यम हार्वी या इंग्रज शास्त्राज्ञांनी शरीरातून रक्ताचे अभिसरण होते, असे प्रयोगांद्वारे दाखविले. त्यांचे अँन अँनॉटॉमिकल डिसर्शन ऑन द मूव्हमेंट ऑफ द हार्ट अँड ब्लड इन अँनिमल्स हे पुस्तक प्रसिद्ध आहे. १६३२ मध्ये ⇨ मार्चेल्लो मालपीगी यांनी शरीरात लहान रक्तवाहिन्या व केसाएवढ्या बारीक केशवाहिन्या असतात, असे सप्रयोग दाखविले. सतराव्या शतकात टॉमस बार्थोलिन या डॅनिश वैद्यानी ⇨ लसीका तंत्राचा शोध लावला. ⇨ आंतॉन व्हान लेव्हेनहूक या डच शास्त्रज्ञांनी मानवी शरीररचनाशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्मदर्शकाचा प्रथम वापर केला. १८०० मध्ये फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ⇨ झॉर्झ क्यूव्ह्ये यांच्या संशोधनातून तुलनात्मक शरीररचनाशास्त्र या शाखेचा उदय झाला.
संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा शोध, सूक्ष्मदर्शकीय क्षेत्रातील नवीन तंत्रे, विच्छेदनाच्या व ऊतकाचे छेद घेणाऱ्या नव्या पद्धती यांतून ⇨ ऊतकविज्ञान (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांचे शास्त्र) व ⇨ कोशिकाविज्ञान ह्या नवीन शाखा निर्माण झाल्या. १८९५ मध्ये ⇨ क्ष-किरणांचा शोध लावल्यावर त्यांचा उपयोग जीवशास्त्रज्ञांना जिवंत प्राण्याच्या शरीरातील अवयवांच्या अभ्यासासाठी व विकृती शोधण्यासाठी झाला. विसाव्या शतकाच्या मध्यास ज़-किरण सूक्ष्मदर्शकी व इलेक्ट्र्ऑन सूक्ष्मदर्शकी यांचा विकास झाला. [→ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शक क्ष-किरण]. त्यातून रेणवीय शरीररचनाशास्त्रामध्ये भौतिकी, रसायनशास्त्र व इलेक्ट्रॉनिकी या विज्ञान शाखांतील ज्ञानाचा उपयोग शरीराबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी केला जात आहे. सतत नवीन तंत्रे विकसित होत आहेत व त्यांचा उपयोग डोळे, हृदय, मेंदू व तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) कार्य, त्यांतील बिघाड यांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी केला जात आहे.
प्रमुख शाखा : तुलनात्मक शरीररचनाशास्त्र : दोन भिन्न जातींच्या प्राण्यांच्या शरीरांचा साम्यभेददर्शक तौलनिक अभ्यास या शाखेत केला जातो. असा अभ्यास अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी प्राण्यांबाबत केला जातो. अशी तुलना जवळच्या वर्गातील प्राण्यांमध्ये केली असता अनेक अवयवांच्या रचनेत बरेच साम्य आढळते. मानवी हात, देवमाशाचे पर व वटवाघळाचे पंख यांच्या हाडांच्या रचनेत साम्य आढळते. अशा अवयवांना सजातीय अवयव म्हणतात. अशा अवयवांचे कार्य वेगळे असते. कीटकांचे पंख व पक्ष्यांचे पंख यांचे कार्य समान आहे. पण त्यांच्या रचनेत खूप फरक आहे. अशा अवयवांना समधर्मी अवयव म्हणतात. तुलनात्मक अभ्यासात ज्या वेळी जास्त साम्य आढळते, त्या वेळी त्या दोन जातींत जवळचे संबंध असतात. तुलनात्मक शरीररचनाशास्त्राचा उपयोग क्रमविकासातील (उत्क्रांतीतील) दुवे शोधण्यासाठी होतो. डार्विन यांना क्रमविकासाची कल्पना मांडताना असा उपयोग झाला होता. [→ शारीर, तुलनात्मक].
सूक्ष्मदर्शकीय शरीररचनाशास्त्र : ऊतके व कोशिका यांपासून सजीवाचे अवयव तयार होतात. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने केलेल्या ऊतकांच्या अभ्यासास ऊतकविज्ञान म्हणतात. ह्या सूक्ष्मदर्शकीय शरीररचनाशास्त्राच्या शाखा आहेत. ऊतकाचे वर्गीकरण तंत्रिका ऊतक, स्नायू ऊतक, संयोजी (जोडणारे) ऊतक व मेदी ऊतक असे करतात. ऊतकविज्ञानात विशिष्ट अवयवात असणाऱ्या कोशिकांचा अभ्यास करतात. त्याचा उपयोग रोगनिदानासाठी होतो.
स्थूल शरीररचनाशास्त्र : सजीवाच्या शरीरातील अवयवांच्या रचनेचा फक्त डोळ्यांच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासास स्थूल शरीररचनाशास्त्र म्हणतात. सूक्ष्मदर्शक व इतर आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने या शाखेचे महत्त्व नंतर कमी झाले. सजीवाच्या शरीरातील निरनिराळ्या तंत्रिका, त्यातील अवयवांचे एकमेकांशी संबंध यांच्या अभ्यासासाठी या शाखेचा उपयोग होतो. भ्रूणशरीररचनाशास्त्र : भ्रूणाच्या प्राथमिक अवस्थांचा अभ्यास या शाखेत केला जातो. भ्रूणशरीररचनाशास्त्रामध्ये पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्य, उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे), सरीसृप (सरपटणारे), पक्षी व स्तनी या वर्गातील प्राण्यांच्या गर्भाचा सुरुवातीच्या अवस्थांचा अभ्यास केला असता त्यांत खूप साम्य आढळते. त्याचे कारण क्रमविकासात सापडते. ह्या प्राण्यांत गर्भाचा विकास होत असताना ते त्यांच्या पूर्वजांच्या अवस्थांची पुनरावृत्ती करतात, असे आढळले आहे. [→ भ्रूणविज्ञान].
विकृतिवैज्ञानिक शरीररचनाशास्त्र : निरनिराळ्या रोगांच्या शरीरातील ऊतकांवर होणाऱ्या परिणामाच्या अभ्यासास विकृतिवैज्ञानिक शरीररचनाशास्त्र म्हणतात. ऊतकामध्ये होणारे बदल हे रोगास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे वा घटकांमध्ये होतात. कर्करोग झालेल्या ऊतकाची वाढ सर्वसाधारण ऊतकापेक्षा वेगाने होते. रोगी व्यक्तीच्या शरीरात रोगाचा प्रतिकार करण्यासाठी श्वेत कोशिकांचे रक्तातील प्रमाण वाढते. शरीरात होणाऱ्या अशा बदलांच्या अभ्यासाचा उपयोग रोगाचे किंवा विकृतीचे अचूक निदान व त्यातील उपचार करण्यासाठी होतो. [→ विकृतिकिज्ञान विकृतिविज्ञान, उपरुग्ण].
मानवी शरीररचनाशास्त्र : या शाखेत मानवाच्या शरीरातील विविध अवयवांची रचना व कार्य यांचा समावेश केला जातो. मानवी शरीरातील कंकाल तंत्र, स्नायू तंत्र, पचन तंत्र, श्वसन तंत्र, रक्ताभिसरण तंत्र, जनन तंत्र, उत्सर्जन तंत्र, अंतःस्रावी ग्रंथी यांच्या अभ्यासाचा समावेश या शाखेत होतो. मराठी विश्वकोशात या सर्व तंत्रांवर स्वतंत्र नोंदी आहेत. शरीररचनाशास्त्राच्या काही शाखा विशिष्ट अवयवांच्या अभ्यासासंबंधी आहेत. उदा., तंत्रिकाविज्ञान, अस्थिविज्ञान, स्नायुविज्ञान इत्यादी. अतीतसूक्ष्म शरीररचनाशास्त्र : (अल्ट्रामायक्रो अँनॅटॉमी). साध्या प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या आवाक्यापलीकडील म्हणजे अधिक सूक्ष्म अशा शरीररचनांच्या अभ्यासाला अतीतसूक्ष्म शरीररचनाशास्त्र किंवा सूक्ष्मातीत शरीरचनाशास्त्र म्हणतात. द्रव्य हे रेणूंचे बनलेले आहे, ही संकल्पना १८५० च्या सुमारास पुढे आली. तिच्यामुळे रेणूच्या आकारमानाच्या शरीररचनांचा अभ्यास करण्यास चालना मिळाली. या कामात मुख्यत: रूडोल्फ आल्बेर्ट फोन कलिकर (१८५२) व फ्रिड्रिख गुस्टाफ याकोप हेंले (१८४१) यांनी पुढाकार घेतला. अशा शरीररचना दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा म्हणजे सु. ५,००० अँगस्ट्रॉमपेक्षा (१ अँगस्ट्रॉम = १० सेंमी) लहान म्हणेज अतिसूक्ष्म असतात. त्यामुळे साध्या प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाने १/४ मायक्रॉन ( १ मायक्रॉन = १०-४ सेंमी) पेक्षा लहान वस्तूंची सुस्पष्ट प्रतिमा मिळत नाही किंवा त्यांचे चित्रण करता येत नाही. म्हणून अशा अतिसूक्ष्म शरीररचनांच्या अभ्यासासाठी ध्रुवणकारी सूक्ष्मदर्शक, क्ष-किरण विवर्तन कॅमेरा व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक ही साधने वापरतात.
ध्रुवणकारी सूक्ष्मदर्शक : ध्रुवित (एकाच प्रतलात आंदोलित होणाऱ्या) प्रकाशाने तपासावयाचा नमुना प्रकाशित करून सूक्ष्मदर्शकाने त्याचे परीक्षण करणे ही अतिसूक्ष्म शरीररचनांचा अभ्यास करण्याची सर्वात आधीची पद्धती होय. ध्रुवित प्रकाशाने नमुना प्रकाशित करण्याची सोय असलेल्या सूक्ष्मदर्शकाला ध्रुवणकारी सूक्ष्मदर्शक म्हणतात. याच्या मदतीने अतिसूक्ष्म शरीररचनांच्या काही गुणधर्मांचे आकलन होते. अशा रीतीने तंत्रिका (मज्जा), स्नायू अथवा कंडरा यांच्या नमुन्यांचे परीक्षण केले असता त्या नमुन्यांच्या ध्रुवित प्रकाशशलाकेवर निश्चित परिणाम झालेला दिसतो. तिच्यात होणाऱ्या अशा बदलांचे योग्य प्रकारे विश्लेषण करून अतिसूक्ष्म शरीररचनांची माहिती मिळवितात. यातूनच या शरीररचना साध्या प्रकाशीय सूक्ष्मदर्शकाच्या आवाक्याबाहेरील असल्याचे उघड झाले आहे. [→ ध्रुवमिती सूक्ष्मदर्शक].
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक : उच्च वेग असलेल्या इलेक्ट्रॉनांना तरंगांसारखे गुणधर्म असतात, असे ⇨ ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली यांच्या लक्षात आले (१९२४). याचा अर्थ हलत्या इलेक्ट्रॉनांचे विवर्तन (विखुरण्याची क्रिया) होऊ शकते व असे विवर्तित इलेक्ट्रॉन चुंबकाच्या वा धातवीय पट्ट्यांच्या स्थिर विद्युतीय भिंगांनी एकत्रित आणता येतात किंवा वळविता येतात. अशा प्रकारे प्रतिमा निर्माण करता येते. जगातील पहिला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक जर्मनीत १९३०–४० दरम्यान बनविण्यात आला आणि १९६०–७० या दशकात जगभर सर्वत्र उत्तम दर्जाचे शेकडो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरले जात होते. यात परीक्षण करण्यासाठी अतिशय पातळ नमुने लागतात, म्हणजे ५,००० अँगस्ट्रॉमहून जास्त जाड नमुने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासाठी उपयुक्त नसतात. यामुळे इतके पातळे नमुने मिळविण्याच्या खास विच्छेदन पद्धती विकसित करण्यात आल्या. अतीत सूक्ष्मछेदक (अल्ट्रा मायक्रोटोम) या विच्छेदन पद्धतीने १०० अँगस्ट्रॉमपर्यंतच्या जाडीचे नमुने मिळविता येतात. मात्र सर्वसाधारणपणे या पद्धतीने सु. ५०० अँगस्ट्रॉम जाडीचे नमुने मिळवितात. रासायनिक विच्छेदनाद्वारेही एवढे पातळ नमुने मिळविता येतात.
अशा रीतीने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने प्रकाशीय सूक्ष्मदर्शकापेक्षा हजारपट पातळ नमुने तपासता येतात. परिणामी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे शरीररचनाशास्त्राच्या ज्ञानात १९५०–६० दरम्यान मोठी भर पडली. वनस्पतीच्या व प्राण्याच्या कोशिकांमधील सु. ७० अँगस्ट्रॉम जाडीची नाजुक पटले इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकामुळे अभ्यासणे शक्य झाले. ही पटले प्रथिने व लिपिडे (वसा) यांची बनलेली असून त्यांची संरचना गुंतागुंतीची असल्याचे उघड झाले. त्यांच्यामुळे कोशिकेतील द्रव्याची देवाणघेवाण सुकर होते, हे समजले. या पटलांवर एंझाइमाचे (प्रथिन उत्प्रेरकाचे) रेणू मांडलेले असून कोशिकांच्या संश्लेषणाच्या व ऊर्जानिर्मितीच्या कार्यात या एंझाइमांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो, हे लक्षात आले. यातूनच स्नायुकोशिकांच्या आकुंचन-प्रसरणाचे गूढ उकलले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने विशिष्ट रेणू व त्यांचे भाग यांच्या प्रतिमा व छायाचित्रे मिळू शकतात. यामुळे व्हायरस, सूक्ष्मजंतू, कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यहीन सूक्ष्म वनस्पती) इत्यादींच्या अंतर्गत व बाह्य शरीररचनांचा अभ्यास करता आला. शरीररचनाशास्त्रात १९५० सालानंतर झालेल्या प्रगतीमध्ये इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. [ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक].
रेणवीय शरीररचनाशास्त्र : १९१०–३० दरम्यान अतिसूक्ष्म व रेणूच्या आकारमानाच्या शरीररचना अभ्यासण्यासाठी क्ष-किरण विवर्तन तंत्र उपलब्ध झाले. नमुन्यातील अतिसूक्ष्म घटकांच्या विश्लेषणासाठी या तंत्राचा उपयोग होतो. यात शरीरामधील एकसारख्या प्रकारचे रेणू रासायनिक विच्छेदनाद्वारे इतर रेणूंपासून अलग करतात. मग ते एकत्रित करतात व त्यांची स्फटिकातील नियमित, क्रमबद्ध आकृतिबंधातील मांडणी तयार होऊ देतात. नंतर हा स्फटिक किंवा त्याचा भाग हा नमुना होतो व तो क्ष-किरण शलाकेच्या वाटेत ठेवतात. यामुळे विवर्तित होणाऱ्या क्ष-किरणांचा अभ्यास करणे शक्य असते आणि गणतीय रीतीने रेणूची प्रतिमा संश्लेषित करता येते. अशा रीतीने सजीवातील पाणी, शर्करा (मुखतः ग्लुकोज), अँमिनो अम्ले, वसा-घटक आणि इतर रेवणीय घटक अलग करून स्फटिकीकृत करण्यात आले आणि क्ष-किरण विवर्तन पद्धतीनी त्यांच्या रेवणीय शरीररचना निश्चित करण्यात आल्या. क्ष-किरण विवर्तन पद्धतीद्वारे मिळविण्यात आलेल्या छायाचित्रांद्वारे डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अँसिड) या अँमिनो अम्लाची सर्पिल रचना उघड झाली (१९५३). याच रीतीने मायोग्लोबिन तांबड्या स्नायूंतील तर हीमोग्लोबिन रक्तामधील तांबड्या कोशिकांमधील ऑक्सिजन वाहून नेण्याचे महत्त्वपूर्ण शरीरक्रियावैज्ञानिक कार्य करतात. पुरेसा रचनात्मक नियमितपणा असणाऱ्या संघटित ऊतक घटकांतील अतिसूक्ष्म शरीररचनांचा अभ्यास करण्यासाठी क्ष-किरण विवर्तन पद्धती उपयुक्त आहेत. उदा., कंडरा, तंत्रिका, स्नायू, अस्थी, कूर्चा, इत्यादींमधील अधिक सूक्ष्म शरीररचनांचेही काही मर्यादेपर्यंत क्ष-किरण विवर्तन तंत्राने अध्ययन करता येते. यातून त्यांचा तपशील कळतो व त्यांच्या कार्याचे पूर्ण आकलन होऊ शकते. [ रेवणीय जीवविज्ञान क्ष-किरण]
रासायनिक व क्रियात्मक शरीररचनाशास्त्र : रासायनिक शरीररचनाशास्त्रात विविध शरीररचनांचे रासायनिक संघटन जाणून घेणे गरजेचे असते. तसेच शरीरातील विविध रासायनिक व रचनात्मक घटक हे जीवाच्या कार्यात व त्यात होणाऱ्या विक्रियांमध्ये ज्या तऱ्हेने सहभागी होत असतात, त्या तऱ्हा समजून घेणेही शरीररचनाशास्त्राच्या दृष्टीने आवश्यक असते, शिवाय जीवाचे नित्याचे कार्य चालू असताना त्याच्या विविध घटक भागांचे कार्य किंवा क्रियाशीलता जाणून घेणेही गरजेचे असते. रचनात्मक घटक कोणत्या तऱ्हांनी कार्य करतात याचा अभ्यास म्हणजे क्रियात्मक शरीररचनाशास्त्र होय. रासायनिक व क्रियात्मक शरीररचनाशास्त्र या शरीररचनाशास्त्राच्या महत्त्वपूर्ण शाखा आहेत.
क्रियात्मक स्थूल शरीररचनाशास्त्रात विविध प्रकारचे स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या व इतर मोठे शरीरघटक हे शरीराच्या हालचालींमध्ये व शरीरक्रियावैज्ञानिक कार्यात कशा प्रकारे सहभागी होतात याचा अभ्यास केला जातो. कलकणू किंवा सूत्रकणिका (मायटोकॉड्रिया) हे धाग्यासारखे सूक्ष्म घटक बहुतेक कोशिकांत विपुलपणे असतात. यांच्या पटलांवर एंझाइमे असून त्यांचा वसा किंवा शर्करा यांच्या ऑक्सिडीभवनाशी संबंध आहे. या ऑक्सिडीभवनातून उष्णता किंवा ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचे रूपांतर ऊर्जा-समृद्ध फॉस्फेट बंधांमध्ये होते. हे बंध कोशिकेत इतरत्र जाऊ शकतात. त्यांच्यामार्फत तेथील कार्याला (उदा., आकुंचन) ऊर्जा मिळते, म्हणून कलकणूंना कोशिकेतील ऊर्जानिर्मिती केंद्रे किंवा भट्ट्या असे संबोधतात. म्हणजे त्यांच्यात इंधनाचे ज्वलन होते आणि तिचे रूपांतर अशा रूपात होते की, कोशिकेतील उपयुक्त कामांसाठी ऊर्जा सहजपणे उपलब्ध होते. कोशिकेतील कार्याचे नियमन करणाऱ्या तिच्यातील बारीक गोलसर पुंजाला केंद्रक म्हणतात. आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक म्हणजे गुणसूत्रे या केंद्रकात असतात. गुणसूत्रांत अँमिनो अम्ले आढळली असून त्यांचे क्रियात्मक शरीररचनाशास्त्रीय अध्ययन केले आहे. त्यावरून त्यांची रेणवीय रचना गुणसूत्रांवरील मण्यांसारख्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे जनुकांच्या [→ जीन] कार्याशी निगडित असल्याचे आढळले आहे. अशा रीतीने शरीरचनाशास्त्राच्या रासायनिक व क्रियात्मक शाखा या सजीवांच्या स्थूल, सूक्ष्मदर्शकीय, सूक्ष्मातीत सूक्ष्मदर्शकीय व रेणवीय पातळीवरील शरीररचनांच्या अध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व उपयोगी आहेत. शरीररचनाशास्त्राचे ज्ञान वैद्यकासाठी आवश्यक आहे. शिल्पकला, चित्रकला यांसारख्या क्षेत्रांतील कलावंतांना व कलामीमांसकांना या शास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
पहा : अस्थी ऊतकविज्ञान ‘ऊतके, प्राण्यांतील’ कोशिका ग्रंथी जीव जीवविज्ञान प्राणिविच्छेदन भ्रूणविज्ञान रेवणीय जीवविज्ञान वैद्यक ‘शारीर, तुलनात्मक’, शारीरप्रमाण, कलेतील,’ शारीर, वनस्पतींचे’
संदर्भ : 1. Felts, W. J. Gross Anatomy, Berlin, 1987.
2. LeBouton, A. V. A. Method of Microscopic Anatomy, 1989.
3. Solomon E. P. Philips, G.A. Understanding Human Anatomy and Physiology, Philadelphian, 1987.
पाटील, चंद्रकांत प. ठाकूर, अ. ना.