शल्यतंत्र व शालाक्यतंत्र : आयुर्वेदाची जी अष्टांगे म्हणजे आठ विभाग आहेत,  त्यात शल्यतंत्राचा प्रथम क्रमांक व शालाक्यतंत्राचा द्वितीय क्रमांक लावण्यात आलेला आढळून येतो [→ आयुर्वेद]. पूर्वीच्या काळी युद्धामुळे शस्त्रादिकांच्या आघाताने होणाऱ्या जखमा बऱ्या करण्याकरिता प्रथमत: ह्याच शल्यतंत्राचा उपयोग केला जात असे. वेदकाळापासून शल्यशालाक्य तंत्रासंबंधी उल्लेख आढळतात. त्या काळी आर्य लोक योद्धे होते. ऋग्वेदकालीन संस्कृतीमध्ये मृगया व योद्धे यांचे आधिक्याने वर्णन आढळते. त्या वेळी प्रमुख आयुधे भाले, बाण ही असत. या शस्त्रांचे शरीरात घुसलेले तुकडे बाहेर काढण्याचे, व्रणक्षत चिकित्सा आदी करण्याचे कामे शल्यचिकित्सक करीत. त्या काळी शल्यशालाक्यशास्त्र किती प्रगत होते यासंबंधीचे बरेच उल्लेख विविध वेदांत, ग्रंथात आढळतात.

मधुविद्या (रोपण शस्त्रक्रिया) याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दधीची ऋषीला अश्विनीकुमारांनी घोड्याचे शिर जोडले व त्याच्या मुखाने मधुविद्या ग्रहण केली आणि मधुविद्या शिकविल्यामुळे त्यांचे घोड्याचे शिर गळून पडताच पूर्वीचे खरे डोके जोडून दिले.   

अश्विनीकुमार हे देवांचे चिकित्सक मानले जातात. च्यवन ऋषींच्या शापामुळे इंद्राला झालेला भुजस्तंभ रोग त्यांनी बरा केला. यज्ञामध्ये छिन्न झालेले शिर त्यांनी पुन्हा जोडून दिले. खेल राजाची पत्नी विश्पला हिच्या युद्धात तुटलेल्या पायाच्या जागी त्यांनी दुसरा लोखंडाचा पाय बसवून दिला. अंध ऋजाश्वाला त्यांनी दृष्टिदान केले. जन्मांध दीर्घतमस ऋषीला त्यांनी दृष्टिदान केले. बहिऱ्या नार्षदाला त्यांनी पुन्हा श्रवणशक्ती प्राप्त करून दिली. हे सर्व उल्लेख ऋग्वेदात आढळतात.

दशरथ राजाचे मृत शरीर तेल द्रोणीत चौदा दिवसांपर्यंत न कुजता सुरक्षित ठेवण्यात आले होते, असा उल्लेख वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणात आढळतो.    

अथर्ववेदात मूढगर्भ (अडकलेला गर्भ) कसा काढावा याचे वर्णन आढळते. मूत्रमार्ग रुद्ध होऊन मूत्राचा संग झाला असेल, तर लोखंडाच्या शलाकेने विस्तारण करून मूत्राचे निर्हरण करावे असा उल्लेख आढळतो. अपचित (न पिकलेल्या) पिडिकांचे शलाका यंत्राने वेधन करावे असे उल्लेखही अथर्ववेदात आढळतात.

रक्तस्राव थांबविण्यासाठी धमनी बांधण्याचा उल्लेख गोपथ ब्राह्यणात आहे. कौशिक सूत्रात जळवा लावण्याचा उल्लेख आहे. रामायणात शल्यशालाक्यशास्त्राचे उल्लेख मिळतात. गौतम ऋषींच्या शापाने इंद्राचे वृषण गळून पडले. अश्विनीकुमारांनी मेष (मेंढ्याचे) वृषण त्याला लावले व त्यास पुन्हा पुरुषत्व प्राप्त झाले. म्हणून इंद्राला ‘मेषवृषण’ असे नाव पडले. त्याचप्रमाणे मूढगर्भ कापून काढण्याचा उल्लेखही मिळतो.

भारतीय शल्यतंत्राची परंपरा अगदी प्राचीन काळापासून म्हणजे ब्रह्यदेवापासून आहे. ब्रह्यदेवापासून दक्षप्रजापतींनी ही शल्यतंत्राची विद्या घेतली. त्यांच्यापासून अश्विनीकुमारांना ही विद्या प्राप्त झाली. अश्विनीकुमारांपासून इंद्राला या विद्येचा अनुग्रह लाभ झाला. धन्वंतरीपासून सुश्रुतींनी ही शास्त्रविद्या घेतली. सुश्रुतसंहिता हा शल्यप्रधान ग्रंथ त्यांनी लिहिला. सुश्रुतांचा काळ इ.स.पू. ८०० पेक्षा जास्त आहे. सुश्रुत हे भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. सुश्रुतकाळी सर्व विद्या व कला भरतखंडात उच्च कोटीस पोहोचल्या होत्या. शल्यशास्त्राचीही त्या काळात बरीच प्रगती झाली होती. त्या काळात शिर व उदरावरील शस्त्रकर्मे तसेच कृत्रिम नासानिर्मित रुग्णाला तीक्ष्ण मद्य पाजून मदाच्या तिसऱ्या अवस्थेत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाई. मद्याचा उपयोग भूलीप्रमाणे (शुद्धिहरणाप्रमाणे) करीत असत. शस्त्रकर्मे व रोगपरीक्षणासाठी निरनिराळ्या धातूंची यंत्रे तयार होत असत. शस्त्रे व यंत्र कशी वापरावयाची याचे ज्ञानही त्या वैद्यांना असे.    

आयुवेदाच्या अष्टांगांमध्ये हेच शल्यतंत्र शस्त्रप्रयोग श्रेष्ठ चिकित्सा म्हणून सांगितली आहे, कारण औषधी चिकित्सेपेक्षा शल्य चिकित्सेने व्याधी लवकर बरा होतो व व्याधीचा समूळ नाश होतो आणि तो व्याधी पुन्हा:पुन्हा होत नाही. उदा., गळू कापल्यावर त्या ठिकाणी पुन्हा गळू होत नाही कारण दोषांचे शोधन होते. परंतु औषधी चिकित्सा केल्यास तो व्याधी बरा झाल्यानंतरही परत होऊ शकतो. असे असले, तरी शास्त्रकारांनी प्रथम चिकित्सा पद्धतीचा अवलंब केल्यास शस्त्रकर्म टळण्याचा पुष्कळ संभव असतो हे आयुर्वेदाला सांगावयाचे आहे.

शलाकेचा (सळईचा) उपयोग करून ज्यांची चिकित्सा केली जाते अशा व्याधीचे विशेष वर्णन ज्या शास्त्रात आहे, ते शास्त्र म्हणजे ‘शालाक्यतंत्र’ होय, मानेच्या वरच्या भागात होणाऱ्या रोगांमध्ये हे तंत्र विशेष उपयोगी होते. मान व डोळे यांमधील कान, नाक, डोळे, तोंड या अवयवांतील मार्ग अतिशय नाजूक, चिंचोळे व अरुंद असल्याने त्या भागातील शल्यकर्म किंवा शस्त्रकर्मासाठी शलाकेसारख्या यंत्र-शस्त्रांचा उपयोग करावा लागतो, म्हणूनच या तंत्राचे नाव ‘शालाक्यतंत्र’ असे पडले आहे.

शल्यतंत्र

जोराने जाणे, हिंसा अथवा पीडा करणे या अर्थाच्या शल् या धातूपासून ‘शल्य’ हा शब्द बनलेला आहे. शरीराला ज्याच्यापासून बाधा अथवा दु:ख होते, त्याला शल्य असे म्हणतात. शरीरात कोठेही जे खुपते, पीडा करते ते शल्य होय. शल्यासंबंधीच्या शास्त्राला ‘शल्यतंत्र’ म्हणतात.

शल्ये दोन प्रकारची आहेत, शारीरिक व मानसिक. शारीरिक शल्याचे पुन्हा निज (शरीरातून उत्पन्न होणारे) व आगन्तुक (शरीरात बाहेरून प्रवेश करणारे) असे दोन प्रकार आहेत. 

शरीरातील वात, पित्त, कफ व रसादी सप्तधातू व मल जेव्हा साम्यावस्थेत असतात, तेव्हा स्वास्थ्य निर्माण होते पण जेव्हा त्यांची विषमावस्था निर्माण होते, तेव्हा शरीरात रोग निर्माण होतात. दोष-धातू-मलांची विषमावस्था वेदना-रुजा किंवा शल्य निर्माण करते. त्याचप्रमाणे अडकलेला गर्भ, दूषित व्रण, पू, इतर स्राव, आम (न पचलेले अन्न), मल, दृष्ट दोष ही निज शल्यांची उदाहरणे आहेत. शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या वस्तू, उदा., नाना प्रकारचे गवत, लाकूड, दगड, धुळीचे कण, लोखंड, मातीचे ढेकूळ, हाडे, केस, नख, धनुष्याचे बाण, बंदुकीच्या गोळ्या इ. शरीरात घुसून जखमा करतात. त्यांना आगन्तुक शल्य म्हणतात. मानसिक शल्ये ही मनाला पीडा देतात उदा., चिंता, शोक, भय, क्रोध इत्यादी. शारीरिक आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसतात.    

या शल्यांच्या अस्तित्वाचे ज्ञान, त्यांनी उत्पन्न होणाऱ्या जखमा, व्रणांमधून वाहणारा पू, अंगात घुसलेली शल्ये बाहेर काढणे, यंत्रे-शत्रे यांचा वापर, क्षारकर्म, अग्निकर्म यांचा उपयोग, जळवा लावणे इ. गोष्टींचा विचार शल्यतंत्रात केलेला आहे. तसेच वात, पित्त, कफ हे दोष व आम हे शरीरात ज्या ठिकाणची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, तेथे संचित होऊन सूज, गळू, गुल्म, मूळव्याध, अर्बुद, मुतखडा हे विकार निर्माण करतात. हे विकार काढण्याच्या चिकित्सेचा अंतर्भावही शल्यतंत्रात होतो.

शल्यतंत्रात उपयोगी पडणारी यंत्रे : शरीरात शिरलेली शल्ये बाहेर काढण्याचे कार्य यंत्रे करतात. तसेच नाक, तोंड, कान, घसा, डोळे, योनिमार्ग, गुद यांच्या परीक्षणासाठीही ती वारतात. शल्य ज्या जातीचे आहे व शरीरात जिथे आहे, त्यांनुसार लहानमोठी व विविध आकाराची यंत्रे वापरतात.


सर्व यंत्रांमध्ये वैद्याचा हात हाच प्रधान यंत्र मानलेला आहे, तरी त्याचा उल्लेख उपयंत्रात करण्यात येतो. यंत्राचे काम वैद्याच्या हस्तकौशल्यावर अवलंबून आहे.    

यंत्राचे गुण सहा आहेत, ती शास्त्रात सांगितल्याप्रमाणे बनविलेली, आवश्यकतेनुसार मृदू किंवा खरखरीत मुख असलेली तसेच मजबूत, सुंदर व हाताळण्यास सुलभ अशी असावीत.    

यंत्राचे दोष बारा आहेत. अतिशय मोठे, हलक्या प्रतीचे, अतिलांब, अतिआखूड, पकडता न येण्यासारखे, वेडेवाकडे, वाकलेले, सैल, खिळे अतिउंच असलेले, खिळे मृदू असलेले, बोथट तोंडाचे व शल्य चटकन पकडता न येणारे असे यंत्राचे बारा दोष आहेत. हे बहुधा स्वस्तिक यंत्रात असतात.    

यंत्राची कार्ये २४ आहेत. ती पुढीलप्रमाणे : (१) शल्य हलवून काढणे (२) डोळा, कान, नाक, ह्यात तेल, काढा इ. टाकून भरणे (३) पट्टा, वस्त्र यांनी बंध बांधणे (४) शल्य वर उचलणे, तुकडे गोळा करणे (५) हाडात घुसलेले शल्य हलवून काढणे (६) हाडाची दोन टोके जवळजवळ आणणे, दोन भाग जवळ आणणे (८) व्रणाचा छेद करून आतील भाग दृश्य करणे (९) व्रणातून दाबून पू बाहेर काढणे (१०) मलमूत्रादिकांचे मार्ग खुले करणे (११) शल्य जोरात ओढून काढणे (१२) शल्य नुसते उचलून बाहेर काढणे (१३) व्रणाच्या मुखाजवळ शल्य आणणे (१४) भग्नामध्ये खाली गेलेले अस्थीचे टोक वर उचलणे (१५) भग्नामध्ये वर आलेले अस्थीचे टोक खाली करणे (१६) शल्याचे तुकडे करणे (१७) शरीरात गेलेले शल्य समजण्याकरिता व्रणात सळई घालून हलविणे (१८) तुंबडीने रक्त ओढून घेणे (१९) नाडीव्रण किती लांब व किती खोल आहे ते पाहणे (२०) हाड वेडेवाकडे झाले असेल, तर ते पुन्हा जोडणे (२१) शल्य अगर एखादा अवयव सरळ करणे (२२) व्रण किंवा जखम पाणी, काढे यांनी धुवून काढणे (२३) नळीने नाकात औषध फुंकणे आणि (२४) डोळ्यात केस, धूळ वगैरे गेली असता, पुसून काढणे.    

यंत्रांचे प्रकार : यंत्राचे मुख्यत: सहा प्रकार आहेत. यंत्रे प्राय: धातुची, विशेषत: लोहाची, आजकाल अगंज पोलादाची (स्टेनलेस स्टीलची) तसेच इतरही काही धातूंची असतात. त्यांचे सहा प्रकार : (१) स्वस्तिक यंत्रे, (२) संदंश यंत्रे, (३) ताल यंत्रे, (४) नाडी यंत्रे, (५) शलाका यंत्रे, (६) उपयंत्रे.    

स्वस्तिक यंत्रे : स्वस्तिकाकार असलेल्या या यंत्राची लांबी साधारणपणे १८ अंगुळे (१८ इंच) असते. त्याचे वारंग (मूठ), कंठ व मुख असे तीन भाग असतात. मुख म्हणजे शल्य पकडण्याचा भाग. त्यास विविध पशुपक्ष्यांच्या तोंडाचा आकार दिलेला असतो. ही यंत्रे संखेने २४ आहेत. त्यांपैकी ९ पशुमुखी व १५ पक्षिमुखी आहेत. पशुमुखी यंत्रे जाड व मोठ्या रुंद तोंडाची असतात. बाहेर दिसणारे, वरवर रुतलेले, हाडात रुतलेले व मोठे शल्य काढण्यास त्यांचा उपयोग होतो. पक्षिमुखी यंत्रे बारीक, लांब व चिंचोळी असून खोलवर गेलेले न दिसणारे शल्य काढण्यास त्यांचा उपयोग होतो. दात उपटण्याचे सर्व चिमटे ह्या प्रकारचेच असतात.    

संदंश यंत्रे : संदंश यंत्रे म्हणजे चिमटे होत. दंश केल्याप्रमाणे त्यांची पकड असते. त्यांची लांबी १६ अंगुळे (१६ इंच) असते. याचे सनिग्रह व अनिग्रह असे दोन प्रकार आहेत. सनिग्रह म्हणजे शल्य पकडून ठेवण्याची सोय असणारे व दुसरे अनिग्रह म्हणजे तशी सोय नसणारे चिमटे होत. त्वचा, मांस, सिरा, स्नायू यांमधील शल्य काढण्याकरिता सनिग्रह यंत्र वापरण्यात येते आणि आंत्र वगैरे नाजूक भागातील शल्य काढण्याकरिता अनिग्रह यंत्राचा वापरत करतात. साधारणपणे आस्थिगत व खोलवर पक्के रुतलेले शल्य काढण्यासाठी स्वस्तिक यंत्र वापरले जात असे व पापणीचे केस, व्रणावर वाढलेले मांस काढण्याकरिता संदंश यंत्र वापरले जात असे.

तालयंत्रे : तालयंत्रे १२ अंगुळे (१२ इंच) लांबीची असतात. ह्यांचा उपयोग कानातील, नाकातील व नाडीव्रणातील शल्य काढण्याकरिता होतो. कानातील मळ काढण्यासही याचा उपयोग होतो.

 नाडी यंत्रे : एका अगर दोन्ही टोकांना छिद्र असून मधला भाग पोकळ असलेल्या यंत्राला नाडीयंत्र म्हणतात. नाडी म्हणजे पोकळ नळी. या एका बाजूस तोंड असणाऱ्या व दोन्ही बाजूस तोंड असणाऱ्या अशा दोन प्रकारच्या असतात. ही यंत्रे स्वरूप, कार्ये व स्थानानुसार १२ प्रकारची आहेत. बस्ती देणे, स्रोतसांतील शल्य काढणे, मूळव्याध-भगंदर-कान-नाक-योनी यांसारख्या शरीराच्या आतील भागात झालेले रोग पाहणे, जलोदरात जलविस्त्रावण करणे, पाण्याचा स्राव व निचरा करणे, रक्त व पू आचूषण करणे (ओढून घेणे), शस्त्र-क्षार-अग्नी यांचा उपयोग करणे, व्रण धुण्यासाठी काढ्याचा उपयोग करणे इत्यादीसाठी नाडीयंत्राचा उपयोग होतो.

शलाका यंत्रे : शलाका म्हणजे सळई किंवा काडी होय. या नाना प्रकारच्या, लांबीच्या व जाडीच्या असतात. त्यांचा उपयोग नाक, कान, घसा, तोंड, डोळे यांच्या रोगांत होतो. तसेच मूत्रमार्ग व गर्भाशय यांचे मुखविस्फारण (आकार मोठा) करण्यास होतो. ही एकूण १२ प्रकारची असतात.

उपयंत्रे : (अनुयंत्रे). उपयंत्रे पूरक कार्ये करतात. पंचवीस उपयंत्रे आयुर्वेदात सांगितली आहेत. गावताची वाळलेली दोरी, वेणी, चामड्याचा किंवा वस्त्राचा पट्टा, पातळ चामडे, झाडांची साल, वेणीचे ताणे, वस्त्र, गोल दगड, चपटा दगड, हातापायाचे तळवे, बोटे, जीभ, दात, नख, तोंड, केस, घोड्याचा लगाम, झाडाची फांदी, थुंकण्याची, कुंथण्याची क्रिया, आनंद, लोहचुंबक, क्षार, अग्नी, निरनिराळी औषधे यांचाही शल्य काढण्यास उपयोग होतो. म्हणून त्यांचा उल्लेख उपयंत्रामध्ये केलेला आहे. वस्त्र आणि कपडा यांचा व्रणकर्मात जखमेवर आच्छादन करून ठेवण्यास व बंध बांधण्यास तसेच अस्थिभग्नामध्ये वरून कापडाचा पट्टा बांधून ठेवण्यास उपयोग होतो. याच रीतीने इतरही उपयंत्रांचा उपयोग करण्यात येतो.    

शल्यतंत्रात वापरण्यात येणारी शस्त्रे : शस्त्रकर्मासाठी सुश्रुतसंहितेनुसार वीस, वाग्भटानुसार सव्वीस शस्त्रे सांगितली आहेत. ही पुढीलप्रमाणे: (१) मंडलाग्र शस्त्र : हे सहा अंगुळे लांब असून ह्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. ह्याचा उपयोग डोळ्यातील खुपऱ्या तसेच दुष्ट व्रण खरवडून काढण्यास तसेच गलशुंडिका व नाकातील वाढलेले मांस छेदन करण्यास होतो. (२) करपत्र: हे बारा अंगुळे लांब असते व दोन अंगुळे रुंद असून त्याला करवतीसारखे दात असतात. याची धार तीक्ष्ण असते. याचा उपयोग अस्थी कापण्यासाठी होतो. (३) वृद्धिपत्र : याचे दोन प्रकार आहेत दोन्हींचीही लांबी सात अंगुळे असते. ही छेदन-भेदन कर्मात उपयोगी पडतात. (४) नखशास्त्र : याचे पाते दोन अंगुळे लांब व एक अंगुळे रुंद असते. छोटे टोके काढण्यास तसेच छेदन, भेदन व लेखन करण्यास ते वापरतात. (५) मुद्रितशस्त्र : हे शस्त्र अंगठीप्रमाणे तर्जनीच्या शेवटच्या पेरात घालून वापरतात. घशामधील रोगांचे छेदन करण्यास हे शस्त्र उपयोगी पडते. (६) उत्पलपत्र : ह्याचा आकार कमळाच्या पानाप्रमाणे असून धार तीक्ष्ण असते. हे सहा अंगुळे रुंद असते. छेदन व भेदन करण्यास हे उपयोगी पडतात. (७) अर्धधार : हा एक चाकूचाच प्रकार असून ह्याच्या निम्म्या भागात धार असते. छेदन व भेदन करण्यास हे उपयोगी पडतात. (८) सूची: (सुई). ह्या विविध प्रकारच्या व लांबीच्या असतात. मांसल भाग तसेच अस्थी, संधी यांवरील व्रण तसेच आमाशय, पक्काशय यांचे व्रण शिवण्यास योग्य त्या सूची वापरण्यात येतात. (९) कुशपत्र : दर्भाच्या आकाराचे टोक असलेला हा चाकू आहे. त्वचा किंवा मांस खरवडून रक्तस्राव करण्यास याचा उपयोग होतो. (१०) आटीमुख: आटी या बगळ्यासारख्या पक्षाच्या मुखाप्रमाणे आकार असणारे हे शस्त्र आहे. रक्तस्राव करण्यास याचा उपयोग होतो. तसेच व्रणातून पू, जलोदरातील पाणी काढणे यासाठीही उपयोग होतो. 


(११) शरारीमुख : शरारी पक्षाच्या चोचीप्रमाणे हे शस्त्र असते व्यवहारात तिला ‘कातरी’ म्हणतात. ही बारा अंगुळे लांब असून त्याची पाती हलणारी असतात. स्नायू, त्वचा, केस, मांस कापण्यास ती उपयोगी पडते. (१२) अंतर्मुख: हे शस्त्र आठ अंगुळे लांब असून त्याच्या टोकाला अर्धचंद्राप्रमाणे बाक असतो. त्याची धार आतील बाजूस असते. याचा उपयोग रक्त काढण्यासाठी व व्रणाचे भेदन करण्यास होतो. (१३) त्रिकूर्चक : ह्या शस्त्राला अंतर्मुख अशी तीन अगुंळे लांबीची तीन पाती असतात. रक्तस्त्राव करण्यास ते उपयोगी पडते. (१४) कुठारिका :याचा दांडा साडेसात अंगुळे असून धारेची बाजू गायीच्या दातासारखी पसरट असते. हाडांच्या वर असलेल्या शिरांचा वेध घेण्यास हे उपयोगी पडते. (१५) ब्रीहीमुख : हे सहा अंगुळे लांब असते. याची, मूठ दोन अंगुळे व पाती चार अंगुळे लांब असतात. याला अणुकुचीदार धारेचे टोक असते. गुल्म व विद्रधी व जलोदरात उदरभेद करण्यास तसेच सिरावेध व भेदन यांसाठी उपयोगी पडते. (१६) आरा: हे आठ अंगुळे लांब असून पाते तिळाएवढे आकाराचे असते. कर्णपालीवेधन तसेच व्रणाच्या सूजेत तो व्रण आम (कच्चा) आहे की पक्का आहे, हे पाहण्यासाठी वेधन करण्यास उपयुक्त होते. (१७) वेतसपत्र : ह्याची धार तीक्ष्ण असून पात्याचा आकार वेतसाप्रमाणे असतो. ह्याचा उपयोग लिंगनाशाच्या शस्त्रकर्मासाठी केला जातो. (१८) बडिशशस्त्र : ह्याची लांबी सहा अंगुळे असून मूठ साडे पाच अंगुळे असते. हे शस्त्र धारयुक्त व तीक्ष्ण टोकाचे असते. ह्याचे एक टोक बरेचसे वाकलेले आणि दुसरे किंचित वाकलेले असते. मूढगर्भ काढताना छेदन करण्यासाठी ते वापरतात. (१९) दंतशंकू : ह्याची लांबी सहा अंगुळे असून टोक शंकूप्रमाणे असते. याला तीक्ष्ण धार असते. दंतकपालिका व दंतशर्करा खरवडून काढण्यास ते उपयोगी पडते. (२०) एषणी : तीक्ष्ण टोकाचे दाभणाप्रमाणे हे शस्त्र असते. बोथट टोकाचे एषणी शस्त्र व्रणाची गती वा मार्ग शोधण्यास उपयोगी पडते. दोन्ही टोकांस छिद्र असलेली एषणी क्षारसूत्र ओवून भेदन व वेधन कर्म करण्यास उपयोगी पडते. (२१) सर्पमुख : याचे पाते अर्धा अंगुळे असून नाकातील मोड, कानातील चामखीळ ह्यांचे छेदन करण्यास याचा उपयोग करतात. (२२) लिंगनाशव्यधनी शलाका : दोन्ही टोके तीक्ष्ण, धारयुक्त असलेली, तांब्याची तीन कडा असलेली (त्र्यस्त) ही शलाका असते. ‘लिंगनाश’ म्हणजे डोळ्यातील मोतीबिंदू काढण्यास हिचा उपयोग करतात. (२३) कर्तरी (कातरी) : ही कापण्याचे काम करण्यासाठी उपयोगी पडते. (२४) कूर्च : या टोचण्याच्या सुया होत. ह्याचा उपयोग निलिका, वांग ह्या त्वचाविकारांवर व इंद्रलुप्त (चाई) या व्याधीत कुट्ट्न म्हणजे गोंदण्याप्रमाणे टोचण्याची क्रिया करून रक्तमोक्षण करण्यासाठी करतात. (२५) कर्णवेधन सूची: तीन अंगुळे लांब, एक अंगुळ पोकळ व दोन भाग घन असते. कर्णाच्या पाळीला भोक पाडण्यास या शस्त्राचा उपयोग करतात. (२६) खज : टोकाला गोल, अर्धा अंगुळ लांबीचे आठ काटे असतात. म्हणून हे शस्त्र रवीप्रमाणे दिसते. हे शस्त्र नाकात घालून हाताने घुसळण्याची क्रिया केली असता नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो व रक्त काढता येते. ही शस्त्रे जाणकार लोहारांनी केलेली, सहज धरता येणारी, उत्तम लोखंडाची, तीक्ष्ण धार असलेली सुबक व सुंदर आणि ज्यांची तोंड व टोके योग्य प्रमाणात आहेत अशी असावीत.    

वाकडे बोथट, अर्धवट तुटलेले, खिंडी पडलेले, खरखरीत धारेचे अतिमोठे, अतिलहान, अतिलांब, अतिआखूड हे शस्त्राचे आठ दोष आहेत अशी सदोष शस्त्रे वापरत नाहीत. 

शस्त्रकर्म : पूर्वकर्म : कोणतेही शस्त्रकर्म करण्यापूर्वी जी तयारी करावी लागते, तिला पूर्वकर्म असे म्हणतात. यात मुख्यत: आवश्यक वस्तूंची व यंत्रशास्त्रांची तसेच औषधींची जमवाजमव, रुग्णाची व्यवस्था व शस्त्रकर्म व्यवस्था या गोष्टी समाविष्ट होतात. पूर्वकर्मातच व्याधीचे निश्चित निदान करणे, व्याधीची अवस्था ठरविणे, त्यासाठी रुग्णाचे बल, प्रकृती, अग्नी, कोष्ठ ह्यांची तपासणी करणे यांचा समावेश होतो. अवस्थानुरूप स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तसृती ही कर्मे करून रुग्णाची शरीरशुद्धी करावी.    

रुग्णाच्या अंगात भरपूर बल राहावे व रोगप्रतिकार सामर्थ्य वाढावे म्हणून शस्त्रकर्मापूर्वी काही दिवस त्या व्यक्तीस दूध-भात-साखर व मांसाहारी व्यक्तीस मांसरस खाण्यास द्यावे. हे पदार्थ खाल्ल्याने यकृत, हृदय व मेंदू ही प्राणस्थाने बलशाली राहतात व शस्त्रक्रिया चालू असताना रुग्णाची बलहानी होत नाही किंवा त्याला मूर्च्छा येत नाही. तसेच शरीराच्या ज्या भागावर शस्त्रकर्म करावयाचे असेल, त्या ठिकाणच्या त्वचेवरचे केस काढून त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी.    

शस्त्रकर्मासाठी व त्यानंतर लागणाऱ्या वस्तूंची उदा., यंत्रशस्त्रे, शलाका, कापसाच्या घड्या इ. जमवाजमव अगोदर करून घेतात. शस्त्रकर्म करण्यापूर्वी पूर्वीच्या काळी रुग्णास मद्य पाजून बेशुद्ध करीत असत. सध्या मात्र शुद्धिहरणासाठी सूचितकारभरण पद्धतीने विविध औषधांचा उपयोग केला जातो.    

शत्रवैद्याच्या अंगी कोणकोणते गुण असावेत याचे वर्णन सुश्रुतांनी केलेले आहे. शस्त्रवैद्याच्या अंगी शौर्य म्हणजे निर्भयपणा असावा. वैद्याने भीतीने वरवर शस्त्रक्रिया करून खोल भागात दोष व पू तसाच ठेवून व्रण बांधून टाकला, तर दोष खोलवर जाऊन आणखी उपद्रव निर्माण होतील. शस्त्रक्रिया करताना वैद्याचा हात थरथरता कामा नये. तसेच शस्त्रवैद्याच्या ठिकाणी असंमूढता म्हणजे प्रसंगावधान असावे. कोणता रोग आहे, त्याची अवस्था कोणती आहे व त्या अवस्थेत काय केले पाहिजे इ. शस्त्रवैद्याला संपूर्ण ज्ञान असावे, म्हणजे त्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते.    

प्रधानकर्म : रोग्यावर जी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करतात, तिला ‘प्रधानकर्म’ म्हणतात. शस्त्रकर्माचे मुख्य आठ प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे : (१) छेदनकर्म : शरीराचा रोगमुक्त भाग त्यावरील त्वचा, मांस यावरील आवरणासह संपूर्णपणे तोडून शरीरापासून वेगळा केला जातो. उदा., मूळव्याध, गाठी, अर्बुद, भगंदर, दुष्टव्रण, चामखीळ यांचे छेदन करतात. (२) भेदनकर्म : त्वचा व त्वचेखालील मांस चिरून त्या छेदातून त्याखाली असलेला पू अथवा दुष्ट रक्त काढून टाकणे. उदा., पिकलेली गाठ, नाडीव्रण भगंदर, गळू, पिकलेली सूज इ. व्याधीत भेदन करतात. (३) लेखनकर : शरीराचा दुष्ट व रोगयुक्त झालेला भाग खरवडून काढून टाकणे. उदा., डोळ्यातील खुपऱ्यात, अधिक वाढलेले मांसांकूर, तीळ, मस इत्यादी. (४) वेधनकर्म: तीक्ष्ण व टोकदार शस्त्राने दुष्ट रक्त किंवा पू बाहेर काढणे. उदा., सिरांतून रक्त काढणे, जलोदरातून पाणी काढणे. यात वेधनकर्म करतात. (५) एषण कर्म :दाभणासारखी पण बोथट सळी घेऊन तिच्या साहाय्याने व्रणाची लांबी, रुंदी, खोली पाहणे, व्रणाचा मार्ग पाहणे व त्यात असलेले शल्य बाहेर काढणे. उदा., भगंदर, नाडीव्रणात एषण कर्म करावे लागते. (६) आहरण कर्म : शरीरातील शल्ये यंत्राने पकडून ओढून बाहेर टाकणे. उदा., मूत्रशर्करा, दंतशर्करा, कानातील मळ, मूढगर्भ यासाठी आहरण कर्म करतात. (७) विस्त्रावण कर्म: त्वचेवर छेद घेऊन त्या ठिकाणचे दूषित रक्त बाहेर काढणे. उदा., कुष्ठरोग, सविष प्राण्यांचे दंश, विसर्प (धावरे) या रोगांत रक्ताचे विस्त्रावण करतात. त्याचप्रमाणे संचित मूत्र शरीरातून बाहेर काढणे., जलोदरातून पाणी काढणे, पिकलेल्या व्रणातून रक्त व पू काढणे यालाही ‘विस्त्रावण’ असे म्हणतात (८) सीवन कर्म : जखमा शिवणे याला सीवन कर्म म्हणतात, जखमा शिवल्यामुळे लवकर व चांगल्या भरून येतात.    


पश्चात कर्म : शस्त्रकर्म झाल्यावर करावयाचे उपचार म्हणजे पश्चात कर्म. जखम भरून येण्यासाठी शस्त्रकर्म केल्यानंतर व्रण शिवणे, त्याची स्वच्छता करणे, व्रण व्यवस्थित बांधून ठेवणे, रोग्याची शुश्रूषा, त्याने पाळावयाची पथ्ये याला पश्चात कर्म असे म्हणतात. पश्चात कर्म झाल्यावर शस्त्रकर्मानंतर व्रण व त्यावर लावलेले औषध हलू नये व व्रण लवकर भरून यावा याकरिता शरीराच्या स्थानाप्रमाणे निरनिराळे निरनिराळे बंध बांधावे लागतात. व्रणाच्या बांधावयाच्या बंधाचे पुढील १४ प्रकार आहेत : कोश, दम, स्वस्तिक, अनुवेल्लित, मुत्तोली, मंडळ, स्थगिका, यमक, खटवा, चीन, विबंध, वितान, गोफणा, पंचांगी.    

बंध बांधला म्हणजे रक्तस्राव थांबतो, वेदना कमी होतात. जंतुसंसर्ग टळतो व व्रण लवकर भरून येतो. मात्र भाजलेले व्रण, कुष्ठ व मधुमेहाचे व्रण बांधू नयेत. त्याचे न बांधता रक्षण करावे.

  पश्चात कर्मात रुग्णाच्या आहारविहाराची अनेक पथ्ये सांगितली आहेत. उदा., व्रणी माणसाने दिवसा झोपू नये. दिवसा झोपल्याने व्रणात वेदना, सूज, खाज ही लक्षणे उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे त्याने बसणे, उठणे या सर्व हालचालीही जपून कराव्यात. हल्लीच्या काळी शस्त्रकर्म झाल्यावर व आगोदरही प्रतिजैव पदार्थ दिले जातात. तरी पण काही वेळा व्रणात पू होतो. जंतुसंसर्ग होतो. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेली शस्त्रकर्मापूर्वीची व नंतरची जी आहारविहाराची पथ्ये आहेत ती पाळली, तर निश्चित उपयोग होतो असा अनुभव आहे. शस्त्रकर्मानंतर पहिले काही दिवस मुगाचे वरण, जुन्या तांदळाचा भाजून केलेला भात, तूप घालून पोळी, भाकरी व भाज्यांमध्ये दुधी भोपळा, पडवळ, परवर, कारले, मेथी इ. व फळांमध्ये डाळिंब, सफरचंद, चिकू, आवळा इ. विशेषत्वाने सेवन करावे व पाणी उकळून प्यावे. जखम भरून येईपर्यंत नवीन धान्य, उडीद, तीळ, चणा, वटाणा, छोला, दही, फ्रीजचे पाणी, मद्य इ. पदार्थ वर्ज्य करावेत. या पदार्थांच्या सेवनाने जखम पिकून पू होण्याची शक्यता असते.    

क्षारकर्म : [→ क्षार-२]. शल्यतंत्रांतर्गत व्याधीची चिकित्सा करताना औषध, क्षार, अग्निकर्म, रक्तावसेचन, शस्त्रकर्म ह्या क्रमाने साधारणपणे केली जाते. काही व्याधींत क्षारकर्मच प्रधानकर्म मानले आहे. सर्व शस्त्रे व अनुशस्त्रे (शस्त्रकर्मात वापरण्यात येणारी उपकरणे) ह्यामध्ये क्षार हे द्रव्य अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे, तेथे तसेच अवघड स्थानीही जाऊन छेदन, भेदन, लेखन (खरवडणे) ह्या तिन्ही क्रिया क्षार करू शकतो. उदा., नाकातील मूळव्याध तसेच कष्टसाध्य रोगांवर म्हणजे चामखीळ, मूळव्याध, कुष्ठरोग, भगंदर, नाडीव्रण, वांग, तीळ, मस व विषबाधा ह्या रोगांवर प्रत्यक्ष क्षार लावून कार्य होते. तसेच पोटात घेण्यासाठीही क्षारांचा उपयोग केला जातो. उदा., मूतखडा, मूळव्याध, अग्निमांद्य, जलोदर, गुल्म, मूत्रशर्करा, जीर्ण विषबाधा, तोंडाला चव नसणे, पोट डब्ब होणॆ, जंत इ. विकारांमध्ये क्षार पिण्यास देतात. क्षार तयार करण्यासाठी बहावा, चित्रक, आघाडा, पळस, केळे, कुडा, देवदारा, लोध्र या वनस्पतींची सुकी लाकडे निर्वात जागी पूर्णपणे जाळून ती राख एका मोठ्या कढईत चालून त्यात सहा पट पाणी घालून रात्रभर स्थिर ठेवावे. सकाळी चौपदरी फडक्याने एकवीस वेळा गाळून ते पाणी मंदाग्नीवर पूर्णपणे आटवावे. पाणी पूर्ण आटल्यावर खाली श्वेत वर्णाचा क्षार मिळतो.    

क्षाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक प्रतिसारणीय क्षार म्हणजे बाहेरून लेप लावण्यासाठी उपयोगी पडणारा क्षार. ह्याचे तीन प्रकार पडतात : मृदू, मध्य, तीक्ष्ण. दुसरा पानीय क्षार म्हणजे पिण्यास योग्य क्षार. हा क्षार सौम्य आहे. तथापि तो उष्ण, तीक्ष्ण गुणांचा व तिखट रसांचा असल्यामुळे जखम पिकविणारा किंवा अन्नाचे पचन करणारा, अग्नी वाढविणारा, सूज कमी करणारा आहे व शरीरातील आमदोष, कफदोष, मेद, विष, कृमी ह्यांचा नाश करतो.

भगंदर व नाडीव्रणात क्षारसूत्र स्वरूपात क्षाराचा प्रयोग करतात. क्षाराने छेदन व क्षरण होते व तेथील जखम भरून येते. व्रणशोथ व विद्रधी पिकल्यावर त्यावर क्षार लावतात. क्षाराने सुजेचे व विद्रधीचे भेदन होते. व्रणशोथात त्यावर क्षार लावल्याने त्याचे लवकर पचन होते व व्रणशोथाला लवकर पक्वता येते.

क्षाराने व्रणावर लेप केल्याने व्रणातील दृष्ट त्वचा, मांस व दुष्ट दोषादिकांचे शोधन होते. शुद्ध व्रणात मात्र पुन्हा क्षार वापरू नये. कारण तो भरत असलेल्या व्रणातील प्राकृत शुद्ध धातूंचेही क्षरण करेल. व्रणाचे शोधन झाल्याने व्रण लवकर भरून येतो म्हणून ‘रोपन करणे’ हे क्षाराचे अप्रत्यक्ष कार्य होते.

तसेच क्षार हा व्रणातील क्लेद, पूय व स्राव यांचे शोषणही करतो व व्रणातील स्राव कमी करतो. रक्तस्राव होत असताना धमनींचा मुखसंकोच करून क्षार रक्तस्राव थांबवितो. पण क्षार देताना थोडी दक्षता बाळगावी लागते. कारण क्षार हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा व दृष्टीलाही घातक आहे. पित्तज व रक्त प्रधान व्याधित तसेच लहान मुले, वृद्ध व अशक्त व्यक्तीस क्षार देऊ नये.    

क्षारसाध्य विकारात प्रथम छेदन करून जरा रक्तस्राव करावा, मग त्यावर क्षार लावाला. वातजन्य विकार असेल, तर प्रथम खरवडून क्षाराचा लेप लावावा. कफजन्य विकार असेल, तर किंचित छेदन करून म्हणजे थोड्या फासण्या टाकून क्षार लावावा व पित्त विकार असेल, तर त्या ठिकाणी घर्षण करून क्षार लावावा आणि आणि पाच-सात मिनिटे थांबावे (शंभर मात्रांचा काळ जाईपर्यंत थांबावे).    

क्षार लावल्यावर, त्याचे कार्य झाल्यावर जर जखम योग्य प्रमाणात भाजून निघाली असेल (कृष्णवर्ण आला), तर त्या रोगापासून होणारा ठणका, वेदना शांत होतात, हलकेपणा वाटतो व स्राव वगैरे बंद होतो. क्षाराने जखमेतील सर्व घाण निघून गेल्यावर तीळ व ज्येष्ठमध ह्यांचा कल्क तुपात व मधात तयार करून त्याचा लेप करावा. तो व्रणाला भरून आणणारा आहे.

अग्निकर्म : (डाग देणे). अग्नीने दग्ध केलेल्या व्याधी पुन: उद्भवत नाहीत. औषधी, क्षार व शस्त्र ह्यांनी शक्य नसलेले व ह्यांनी साध्य न झालेले व्याधीही अग्निकर्माने बरे होतात. डाग दिलेल्या ठिकाणी जीवाणू नष्ट होतात व त्यामुळे पू निर्माण होत नाही. शस्त्रकर्मात अत्यधिक रक्तस्राव होत असेल, तर तेथे अग्निकर्म करावे. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या मुखाचा संकोच होऊन रक्तस्राव थांबतो. मूळव्याध, नाडीव्रण, ग्रंथी हे रोग अग्नीने एकदा जाळून टाकले की, ते पुन्हा उद्‌भवत नाहीत. त्वचा, मांस, सिरा, स्नायू. अस्थी, संधी यांमध्ये वातप्रकोपांमुळे तीव्र वेदना होत असतील, तर त्यावर अग्निकर्म करावे. शिरोरोग, अधिमंथ ह्या व्याधीत भुवया, कपाळ किंवा शंखप्रदेशी अग्निकर्म करावे [→ अग्निकर्म].    

अग्निकर्मविधी : गायीचा दात, बांगडी, धातूची पट्टी, दगड, सोनेचांदी यांची सळई, पिंपळी, शेळीच्या लेंड्या अशी द्रव्ये तापवून व्याधीच्या ठिकाणी डाग द्यावा. योग्य प्रकारे डाग दिल्यानंतर त्या ठिकाणी तूप-मधाचा लेप लावावा म्हणजे वेदना कमी होतात. कोणत्याही प्रकारची गाठ, मूळव्याध, भगंदर, अपची, श्लीपद (हत्तीरोग), चामखीळ, तीळ, मस, कुरूप (भोवरी), संधी यांत अग्निकर्म करावे. अग्निकर्मामुळे रक्त व पित्त शुद्ध होते, समावस्थेत येते व वेदना तत्काळ कमी होतात.

रक्तमोक्षण : रक्त काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत उदा., ⇨ तुंबडी लावणे, जळवा लावणे, सिरावेध, फासण्या टाकणे. जळवा लावणे हा एक सोपा व प्रभावी उपाय असल्यामुळे चिकित्सेमध्ये त्याचा उपयोग केला जातो.


जलौकावचरण : ज्या ठिकाणी अत्यंत वेदना, लाली व दाह ही लक्षणे असतील, तेथे जळवा लावून रक्तस्राव केला असता लवकर बरे वाटते. कारण जळवांमुळे रोगस्थानातले दोष बाहेर काढून टाकले जातात. यामुळे लागलीच ठणका व दाह कमी होतो आणि पुढे रोगशामक औषधांच्या कार्याला मदत होते. इसब, दाढदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, नागीण, मूळव्याध, सूज, नखुर्डे, गळवे इ. व्याधींत वेदना कमी होण्यास मदत होते.

बालक व सुकुमार व्यक्ती, वृद्ध, कृश व्यक्ती, स्त्रिया, सुखवस्तू लोक यांच्या शरीरातील रक्त काढावयाचे असेल किंवा पित्तदूषित रक्त काढण्याकरिता जळवा लावाव्यात. जळवा बारा जातींच्या आहेत. त्यात सहा जाती विषारी आणि सहा जाती निर्विष आहेत. [→ जळू].    

 

जळवा लावण्याचा विधी : रोग्याला बसवून किंवा निजवून ज्या ठिकाणी जळू लावायची असेल, ती जागा पुसून कोरडी करावी व तेथे जळू लावावी. जळूच्या तोंडाकडील भाग घोड्याच्या खुराप्रमाणॆ उंच झाला, की जळू तेथे चिकटली आहे असे समजावे. जळू रक्त ओढून घेताना तिच्या शरीरावर लाटांप्रमाणे हालचाल दिसते. त्या वेळी तिच्या शरीरावर ओला कापूस किंवा पातळ कपडा झाकावा. तोंड मात्र उघडे ठेवावे व वरचेवर तिच्यावर पाणी शिंपडावे.    

निर्विष जळवा फक्त अशुद्ध रक्त पितात. जळवा लावलेल्या ठिकाणी खाज किंवा टोचणी नसेल, तर ती अशुद्ध रक्त ओढत आहे असे समजावे. बहुधा अशुद्ध रक्त संपले की, जळू आपोआप सुटते. काही वेळा दंश केलेल्या स्थानातून अधिक रक्तस्राव होतो. कारण जळू रक्त पित असताना तिच्या लाळेतून हिरुडीन नावाचा स्राव सोडते. त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद होते. अशा वेळी दंशस्थानावर हळदीचे चूर्ण दाबून धरावे म्हणजे रक्तस्राव थांबतो व त्या स्थानातील लाली, टोचल्यासारखी वेदना व दाह ही लक्षणे कमी होतात. पण ती सुटली नाही, तर तिच्या तोंडावर सैंधव चूर्ण किंवा हळद टाकावी. हळद टाकल्यावर ती लगेचच सुटते. खाली पडलेल्या जळूला शेपटीकडून तोंडापर्यंत हळूहळू दाब देऊन सर्व रक्त निघेपर्यंत ओकवावे. बाटलीत पाणी घालून त्यात त्या जळवा ठेवाव्या. बाटलीच्या झाकणाला चार-पाच छिद्रे पाडावीत व त्यातील पाणी रोज बदलावे.

सिरावेध : शीर तोडून रक्तस्राव करणे म्हणजे सिरावेध होय. जेव्हा रक्तदुष्टी सर्व शरीरभर पसरलेली असेल, तेव्हा व्याधीच्या स्थानी सिरावेध करावा. सिरा ह्या स्वभावत: चंचल असल्यामुळे सिरावेध करण्यापूर्वी त्यांचे नियंत्रण करून त्या स्थिर कराव्यात. चर्म, वल्कल, लता, वस्त्र इत्यादींनी सिरांच्या वरच्या बाजूस (हृदयाच्या दिशेला) फार घट्ट व फार सैल नाही असा समबंध बांधावा व सिरा त्यामुळे वर उचलून येतात. त्यानंतर वेधनस्थानाची स्वच्छता करून वेधनसूचीने सिरावेध करावा.    

तरुण व बलवान रुग्णात दोषांचे आधिक्य असेल, तर दिवसांत मिळून ५४ तोळे (सु. ५४० ग्रॅम) रक्त काढावे. ही उत्तम मात्रा होय. दोन दिवसांत २५ तोळे रक्त काढल्यास, ती मध्यम मात्रा व दोन दिवसांत १२·५ तोळे रक्त काढल्यास, ती हीन मात्रा होय. वर्षाऋतूत आभाळ नसताना, ग्रीष्म ऋतूत पहाटे किंवा तृतीय प्रहारानंतर व थंडीत दुपारी बारा वाजता रक्तमोक्षण करावे. मात्र एकाच वेळी सर्व रक्त न काढता दुसऱ्या दिवशी व तिसऱ्या  दिवशी थोडेथोडे रक्त काढावे.

आयोग्य काळी, स्नेहन व स्वेदन न करता, अधिक थंडीवाऱ्यात जेवणानंतर लगेच व आयोग्य पद्धतीने वेधन केल्यास, मद-मूर्च्छा-श्रम ह्यामुळे वेग धारण केल्याने, रक्ताचे मध्येच स्कंदन होते (रक्त गोठते) व त्यामुळॆ रक्तस्राव योग्य होत नाही. याला ‘आयोग’ म्हणतात. आयोग झाला, तर खाज, सूज, वेदना, आग, व्रण पिकणे ही लक्षणे उत्पन्न होतात. अशा वेळी कापूर, वेलदोडा, कुष्ठ, तगर, पहाडमूळ, देवदार, वावडिंग, चित्रक, त्रिकुट, हळद, करंज बी ह्यांपैकी मिळतील ती द्रव्ये घेऊन चूर्ण करून त्यात लवण व तेल मिसळून सिरामुखांवर चोळावीत. त्यामुळॆ स्रोतोरोध नाहीसा होऊन रक्तस्राव चांगला होतो. अतिउष्ण दिवशी, अतिस्वेदन केल्यावर अज्ञ वैद्याने वेध केल्यास, जास्त वेध केल्यामुळॆ रक्तस्राव अधिक झाल्यास शिर:शूल, अधिमंथ, अंधता, डोळ्यापुढे अंधारी येणे, आचके, तहान, दाह, उचकी, खोकला, दम, पक्षाघात, अशक्तपणा ही ‘अतियोगा’ची लक्षणे दिसतात. अशा वेळी लगेच लोध्र, ज्येष्ठमध, गव्हला, रक्तचंदन, गेरू, राळ, रसांजन, उडीद, सातू, गहू, लाख यांचे चूर्ण सिरामुखाजवळ ठेवून बोटांनी दाबावे व गाढ बंध बांधावा म्हणजे रक्तस्राव थांबतो. त्या स्थानी शीत वस्त्रांनी आच्छादन करावे. तेथे शीत द्रव्यांचा लेप व परिषेक करावा. रुग्णास शीतस्थानी ठेवावे व शीत भोजन द्यावे.    

 

सिरावेध योग्य प्रकारे झाला, तर योग्य मात्रेत दुष्ट रक्ताचा स्राव झाल्यावर रक्त आपोआप थांबते. शरीराला हलकेपणा येतो. वेदनांचे शमन होते. रोगाचा जोर कमी होतो. मन प्रसन्न होते. ही ‘सम्यक योगा’ ची लक्षणे होत.    

पश्चात कर्म : रक्तस्राव बंद झाल्यावर व्रणावर तेलाचा बोळा ठेवून बंध बांधावा. नंतर रुग्णाला काकोल्यादी मधुर गणातील द्रव्यांचा काढा साखर व मध घालून द्यावा. पित्तप्रकृती असल्यास दूध, कफप्रकृती असल्यास डाळीचे कढण व वातप्रकृती असल्यास मांसरस द्यावा. त्यामुळे रुग्णाचा अग्नी प्राकृत होतो व बळाचा अनुभव येतो.

व्याधीला अनुसरून शिरांचा वेध करण्याची काही स्थाने शास्त्रात सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे : (१) पायाची आग, पायाला मुंग्या येणे, बधिरता येणॆ, नखुरडे, विसर्प (धावरे) या विकारांत क्षिप्र मर्माच्या वर दोन अंगुळे (२) अपची, गंडमाळा या विकारात पायाच्या पिंढरीत टाचेच्या बाजूला दोन अंगुळांवर (३) प्रवाहिका व पोटात शूल यामध्ये कंबरेच्या बाजूला दोन अंगुळांवर (४) अपस्मारात हनुवटीच्या संधीमध्ये (५) उन्मादात शंख व केसांची रेषा यांच्या संधीवर (६) वातज हत्ती रोगात घोट्याच्या वर चार अंगुळे, पित्तजावर चार अंगुळे खाली व कफज हत्ती रोगावर अंगठ्याची शीर (७) वास येत नसेल, तर व नाकाच्या रोगात नाकाच्या टोकावर.

व्रण किंवा जखमा : जो त्वचेला वैवर्ण्य उत्पन्न करतो, त्यास व्रण म्हणतात. बरा झाल्यावरही तो देहाच्या त्या भागाचे आमरण आच्छादन करतो किंवा शेवटपर्यंत त्याची खूण नष्ट होत नाही. [→ व्रण व्रणबंध].

आगन्तू व्रण : बाह्य कारणामुळे जे व्रण होतात, त्यांना आगन्तू व्रण म्हणतात. व्रण होताक्षणी तो शुद्ध असतो व दोषांची दुष्टी नसतेच, नंतरच त्याला दुष्ट अवस्था प्राप्त होते, ह्यालाच सद्योव्रण असे म्हणतात. या व्रणाचे सहा प्रकार खालीलप्रमाणे पडतात.    

छिन्नव्रण : चाकू, सुऱ्यात, कुऱ्याहडी अशी धारेची शस्त्रे लागून हे व्रण होतात. आकाराने सरळ किंवा तिरपे परंतु विस्तीर्ण असे ज्याचे स्वरूप असते, असे व्रण व्यवस्थितपणे शिवावे लागतात व त्यावर घट्ट बंध बांधावे लागतात. अवयव पूर्णपणॆ तुटले असतील, तर ते अवयव पूर्ववत जेथल्या तेथे बसवून शिवून टाकतात, नंतर वातनाशक औषधांनी तयार केलेली तेले त्यावर लावतात.

भिन्नव्रण : टोकदार शस्त्रांनी पोटातील अवयवांना भोकसून जो व्रण होतो, त्याला ‘भिन्नव्रण’ म्हणतात. या व्रणातून आतडी बाहेर येतात किंवा प्रत्यक्ष आतडी फुटतात व कोठा रक्ताने भरतो. अशा वेळी प्रथम आतड्यातील व्रण शिवून ती जागच्या जागी बसवावीत. आत घालण्यापूर्वी ती उष्ण दुधाने धुवावीत व त्यांना तूप लावावे. आतडी जागच्या जागी व्यवस्थित बसली की, मग पोटावरील जखम शिवावी.


उदरातून मेदाची पिशवी बाहेर पडली असता अर्जुनसादडाच्या सालीचा काढा व त्याचेच क्षार यांचे त्यावर लेपन करून सुताने बांधून विस्तवात लाल केलेल्या शस्त्राने त्याचा छेदन करण्यासारखा भाग असेल, तो छेदून व्रण शिवून बांधून टाकावा आणि साखर व ज्येष्ठमध यांनी सिद्ध एरंडेल तेल त्यावर शिंपावे किंवा गोखरूने सिद्ध केलेले दूध शिंपावे, म्हणजे तेथील आग व ठणका यांचा नाश होतो.    

विद्धव्रण : टोकदार शस्त्रामुळे पोटाखेरीज शरीराच्या इतर भागांवर जे व्रण होतात, त्यांना ‘विद्धव्रण’ असे म्हणतात. त्यात तिळाचे ताजे तेल भरावे व बंध बांधावा किंवा पद्यकाष्ठ, जटामांसी, अगरू, चंदन, हळद, दारूहळद, कमलाक्ष, वाळा व ज्येष्ठमध या औषधांच्या कल्काने तेल सिद्ध करून ते सद्योव्रणावर लावावे. त्याने व्रण भरून येतो.    

क्षतव्रण : ही छिन्न व भिन्न व्रणाच्या मधली स्थिती आहे. आशयाच्या स्थानी गंभीर व्रण परंतु आशयापर्यंत गेलेला असा किंवा आशयाचे भेदन न झालेला असा व्रण, जो विषम असतो, तो क्षतव्रण होय. त्यावर तूप व मध लावावे व बंध बांधावा.    

पिच्चित व्रण : दगड लागल्याने वा अन्य आघाताने शरीराचा भाग पिचून ‘पिच्चित व्रण’ होते. यात अस्थीचाही भाग पिचला जाऊ शकतो. ह्या व्रणातून मज्जा व रक्त यांचा स्त्राव होतो व रक्त साकळून जखन लवकर पिकते. यामध्ये ज्येष्ठमध सिद्ध तूप लावावे. या व्रणाच्या स्थानी होणाऱ्या उष्णतेचा तसेच आग आणि पिकणे यांसारखे संभाव्य उपद्रव टाळण्यासाठी त्यावर थंड औषधांचे लेप लावावे. थंड पाणी शिंपडावे व थंड औषधांचे रस शिंपावे.

घृष्ट व्रण : खरचटण्यामुळे होणाऱ्या या व्रणात त्वचा घासली जाते आणि तिचा स्तर निघून जातो. त्यावर व्रणरोपक औषधाचे चूर्ण टाकावे.    

व्रणाची सामान्य चिकित्सा : चंदन, पद्मकाष्ठ, लोध्र, कमळ, गव्हला, हळद, ज्येष्ठमध या औषधांचा कल्क व दूध घालून तिळाचे तेल सिद्ध करावे. हे तेल जखम लवकर भरून आणते. तसेच त्रयोदशांग तेल व्रणावर शिंपण्याकरिता व व्रण भरून आणण्याकरिता हितकर आहे.    

व्रणी रुग्णांसाठी आयुर्वेदात पथ्यकर आहार सांगितला असून अपथ्यकर आहार वर्ज्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पथ्यकत आहार-शालीवर्गातील तांदळाची भाजून पेज किंवा भात, कणीक भाजून पेज किंवा पोळी, जवाची पेज, मुगाचे कढण, तूप, मध तांदुळजा, हरणदोडी, कुरडू, चाकवत, पडवळ, कारले या भाज्या. डाळिंब, आवळा, द्राक्षे, सफरचंद यांसारखी फळे विशेषत्वाने सेवन करावीत. अपथ्यकर आहार नवीन धान्य, तिखट, आंबट, खारट पदार्थ, दही, ताक, गूळ, तीळ, दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य करावेत.   

निजव्रण : शारीरिक विकारांमुळे जे व्रण होतात, त्यांना निजव्रण म्हणतात. हा दोषप्रकोप करणाऱ्या कारणांमुळे दोषांची दुष्टी होऊन होतो. त्यांत शारीरिक विकारांच्या त्या त्या दोषांची लक्षणे असतात. यात प्रथम सूज येते, ती सूज ठणकते, पिकते व नंतर आपोआप फुटते किंवा शस्त्राने फोडावी लागते. व्रण स्वच्छ झाला म्हणजे तो भरून येतो. त्वचा, मांस, सिरा, स्नायू, अस्थी, संधी, कोष्ठ, मर्म (जेथे आघात झाला असता मरणप्राय वेदना होतात किंवा मृत्यूसुद्धा येऊ शकते ते स्थान) ही निजव्रणाची आठ अधिष्ठाने आहेत. मर्मस्थानीचा व्रण लाल व कफदुष्ट व्रण पांधरा असतो.    

ज्या व्रणात गंध, स्राव, वेदना नाहीत, ज्याचा वर्ण व आकृती प्राकृतिक आहेत, ज्यातील मांसांकुरांची वाढ एकसारखी व सम आहे, असा व्रण शुद्ध समजाला जातो. त्याने ज्वरासारखी अन्य सार्वदेहिक लक्षणे निर्माण होत नाहीत.    

निजव्रणाच्या पूर्वरूपावस्थेत सूज असते. अशा अवस्थेत तो पिकू नये म्हणून तो व्रण स्नेहाने चोळणे, शेकणे, खरखरीत औषधींनी घासणॆ किंवा जळवा लावून त्या ठिकाणाहून रक्तसृती करणॆ असे उपचार करावेत. अशा उपचारांनी सूज कमी झाली नाही, तर त्यावर उपनाह किंवा पोटीस बांधून शेक द्यावा. ती पूर्णपणे पिकल्यावर पाटन किंवा शस्त्रकर्म करून ती फोडावी आणि त्यातून पू व दुष्ट रक्ताचा स्राव करावा. नंतर व्रण भरून येऊ लागतो.    

शल्यतंत्र व व्रण यांचा एकमेकांशी पूरक संबंध आहे. म्हणूनच सुश्रुतसंहितेत व्रणशोथ व व्रणाची विस्तृत चिकित्सा केलेली आहे. तिच्यात साठ प्रकारच्या उपक्रमांचे वर्णन आहे. महत्त्वाचे म्हणजे व्रण भरून आल्यावर त्या ठिकाणी संपूर्ण विकृती मुक्त होऊन त्वचा पूर्ववत व्हावी म्हणून विशेष उपचार वर्णन केलेले आहेत. हे सर्व उपचार प्राकृत अवस्था प्राप्त करून देणारे व सौंदर्याला बाधा न आणणारे आहेत. हे आयुर्वेद शल्यतंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.

व्रणाचे साठ उपक्रम : (१) अपतर्पण : याचा अर्थ लंघन करणे किंवा आहार वर्ज्य करणॆ. ह्याने व्याधीचे बल कमी होऊन व्याधीचे शमन होते. (२) आलेप : औषधी द्रव्यांचा लेप करणे. हा सूज नाहीशी करणारा आहे. (३) परिषेक : औषधी द्रव्यांची धार धरणॆ किंवा द्रव्यरूप औषधे शिंपडणे. (४) अभ्यंग : तेल चोळून अंगात जिरवणे. यामुळे दोष शिथिल होतात व वेदना कमी होतात. (५) विम्लापन : बोटाने, अंगठा, तळहात, नाल, वेत ह्यांनी व्रण किंवा सूज हळूहळू दाबून चोळणे. त्यामुळे आमावस्थेत दोषांचे पचन होते. (६) स्वेदन : उष्ण द्रव्यांनी शेक देऊन घाम आणणे. यामुळे वेदनांचे शमन होते. (७) उपनाह : सुजेच्या ठिकाणी उष्ण द्रव्यांचे पोटीस बांधणे. यामुळे सूज कमी होते. (८) पाचन : व्रण पक्क करणे. (९) स्नेहपान :औषधी द्रव्यांनी सिद्ध तेल किंवा तुपाचे रुग्णाला सेवन करविणे. याने धातुंचे बृंहण होते. (१०) विस्त्रावण : व्रण किंवा शिथातूर द्रव स्वरूपातील दुष्ट दोषांचे निर्हरण करणे. यामुळे वेदना, लाली व दाह कमी होतात. (११) वमन : ज्यात वरच्या मार्गाने-तोंडाने-दोष बाहेर घालविले जातात, तो उपचार. याने दुष्ट कफाचे निर्हरण होते. [→ ओकारी]. (१२) विरेचन : गुदमार्गाने पच्यमान दोषांना शरीराबाहेर घालविणे. याने दुष्ट पित्ताचे निर्हरण होते. [→ रेचके]. (१३) छेदन : वाढलेले मांसांकूर, दूषित मांस व मेद यांना कापून काढणे. व्रण लवकर भरून येण्यास मदत होते. (१४) भेदन : पक्व व्रणशोथ किंवा गळू शस्त्राने फोडून त्यालील पू, रक्त यांचा निचरा करणे, म्हणजे भेदन होय. (१५) दारण : औषधी द्रव्यांच्या साहाय्याने पिकलेली सूज किंवा विद्रधीला मूख निर्माण करणे म्हणजे दारण. (१६) लेखन : खरखरीत वस्त्र, क्षार, सैंधव, कापूस, पारिजातकाची पाने यांनी व्रण घासून स्वच्छ करणे. यामुळे व्रण शुद्ध होऊन लवकर भरून येतो. (१७) एषण : सळईने खोल व्रणाचा मार्ग तपासणे. उदा., भगंदर. (१८) अपहरण : शल्य बाहेर आणणे किंवा ओढणे. उदा., मुतखडा, कानातील मळ. (१९) वेधन : लहान तोंडाच्या शस्त्राने शिरांचा वेध करणे किंवा नाडीयंत्र किंवा शलाका यंत्राच्या बारीक टोकाने व्रणात प्रवेश करून दुष्ट स्रावांचे निर्हरण करणे. उदा., जलोदर. (२०) सीवन : व्रणाचे उघडलेले तोंड शिवणे. (२१) संधान : व्रणाच्या कडा जुळविणे. (२२) पीडन बोटाने वरून खाली किंवा खालून वर हळूहळू दाबणॆ. (२३) शोणितस्थापन : रक्तस्राव थांबिवणे. (२४) निर्वापण : पित्तरक्तजव्रण, तापातील जळजळ शांत करण्यासाठी थंड द्रव्ये, काढे, तूप शिंपडणे. (२५) उत्कारिका : औषधी द्रव्यांची पोळी किंवा चकती बनवून व्रण किंवा व्रणशोथावर ठेवणे. यामुळे पाचन, वेदनाशमन, शोधन व रोपन होण्यास मदत होते. (२६) कषाय : काट्याचा वापर करणे. व्रणाचे शोधन होते. (२७) वर्ती : खोल व निमुळत्या व्रणात औषधी द्रव्यांची वात करून घालणे. याने व्रणाचे शोधन व रोपन होते. [→ वर्ति]. (२८) कल्क : व्रण लवकर भरून येण्यासाठी औषधी द्रव्ये वाटून, चटणीसारखा गोळा करून त्या जागी ठेवणे.


(२९) सर्पी : व्रणाचे रोपन होण्यासाठी व व्रणस्थानी धातूंना आलेली रुक्षता नष्ट करण्यासाठी औषधी द्रव्यांनी सिद्ध तुपाचा वापर करणे. उदा., जात्यादी घृत (तूप). (३०) तेल : व्रणाच्या शोधन व रोपणासाठी अवस्थानुरूप औषधी द्रव्यांनी सिद्ध तेलाचा वापर करणे. (३१) रसक्रिया : औषधींचा काढा करून गाळून तो घट्ट होईपर्यंत आटवावा. (३२) अवचूर्णन : दुर्गेंधी व्रणात चूर्ण भूरभूरवणे किंवा पसरणे. (३३) व्रणधूपन: व्रणाला धुरी देणे, यामुळे वेदनांचे शमन होऊन व्रण शुद्ध होतो. (३४) उत्सादन : उटणे, सुगंधी चूर्ण किंवा सुगंधी पदार्थयुक्त पीठ अंगास चोळणॆ. यामुळे त्वचेतील मलाचा व मेदाचा नाश होतो. (३५) अवसादन : उष्ण, तीक्ष्ण व लेखन करणाऱ्या औषधांचा लेप करणे हे व्रणातील वर आलेले मांस नष्ट करते. (३६) मृदुकर्म : व्रणात प्रथम रक्तमोक्षण करून वातघ्न तेलाने स्नहेन व स्वेदन करणे तसेच घट्ट बंध बांधून ठेवणे. यामुळे व्रणाला रुक्षता येत नाही. (३७) दारुणकर्म : कठीणपणा आणणे. (३८) क्षारकर्म : क्षाराचा उपयोग करणे. (३९) अग्निकर्म : अग्नीच्या साहाय्याने डागण्याचा विधी. (४०) बस्तिकर्म : बस्तीच्या साहाय्याने केलेले उपचार. बस्तीमुळे सर्व शरीरगत वातप्रधान दोषांचे शमन होते. [→ बस्ति]. (४१) उत्तरबस्ती : उत्तरमार्ग म्हणजे वरचा मार्ग म्हणजे मूत्रमार्ग व जननमार्ग यात द्यावयाचा बस्ती. (४२) पत्रदान : जखमेवर औषधी वनस्पतीचे पान गरम करून बांधणॆ. (४३) कृमिघ्न : औषधी द्रव्यांनी व्रण धुणे, धुरी देणे. (४४) बृंहण : व्रणावर रुक्ष, उष्ण, तीक्ष्ण उपचार केल्यामुळे तेथील धातूंना कोरडेपणा व शुष्कता येते म्हणून तेथे बृंहण उपचार करणे, तूप व मध लावणे. (४५) विषघ्न : विषनाशक उपचार. (४६) शिरोविरेचन : नाकात घालावयाचे औषध. (४७) नस्य मानेच्या वरच्या भागातील विकारांसाठी नाकातून औषध किंवा औषधी स्नेह शरीरात प्रविष्ट करणॆ. [→ नस्य]. (४८) कवलग्रह गुळणी करणे. यामुळे तोंडाच्या आतील रोगांचे शमन होते. (४९) धूम्रपान : मानेच्या वरील अवयवातील वातकफज, शोथ व स्रावयुक्त व्रणात औषधी द्रव्यांचा धूर तोंडाने ओढून घेणे. (५०) मधू : मध हा कफ-मेद-त्रिदोषज ग्रंथी यांत लेखनासाठी उपयोगी आहे. हा रोपन करणाराही आहे. (५१) सर्पिष : तूप पिणे. (५२) यंत्रे : निज व आगन्तुक शल्य काढण्याकरिता उपयोगी पडणारी १०१ यंत्रे. यात शस्त्रांचाही समावेश होतो. (५३) कृष्णकर्म : त्वचेवरील व्रण भरून आल्यावर तेथे निर्माण झालेला पांढरा डाग काढून टाकणॆ. उदा., बिब्ब्याचे तेल लावणे. (५४) पांडुकर्म : त्वचेवरील व्रणाचा काळा डाग काढण्यासाठी पांडुकर्म करणे. (५५) प्रतिसारण : व्रण भरून आल्यावर काळा किंवा पांढरा याव्यतिरिक्त अन्य वर्ण आला असेल, तर औषधी लेपाने त्वचा पूर्ववत करणे. (५६) रोमसंजनन : व्रण भरून आल्यावर त्या जागी केस नसतील, तर ते पुन्हा येण्यासाठी करावयाचे उपाय. उदा., हस्तिदंताच्या राखेचा शेळीच्या दुधात लेप लावणे. (५७) रोमशातन : अंगावरील लव काढणे. (५८) बंध : व्रण बांधून ठेवणे. [→ व्रणबंध]. (५९) आहार : व्रण भरून येताना आहारातून काही पथ्यापथ्याचे नियम पाळावे लागतात. (६०) रक्षाविधान : जीवजंतूंपासून व्रणाचे रक्षण कसे करावे याचे उपचार. व्रणावर वेखंड, गुग्गुळ, अगरू अशा जंतुघ्न व दुर्गंधिनाशक द्रव्यांचा धूप देणे.    

शोफव्रण : शरीराच्या एखाद्या भागावर सूज येऊन ती फुटून होणारा व्रण. [→  शोफ].  

चिकित्सा : सूज जर शरीराच्या वरच्या भागात असेल, तर उलटी होण्याकरिता औषधे द्यावीत व खालच्या भागात सूज असेल, तर रेचक औषधे देऊन शरीर निर्दोष करावे. शुद्धीनंतर त्या सुजेवर सतत शीतोपचार करावेत. शोफ व व्रण विषारी असल्यास, तिथे जळवा, तुंबडी वगैरे लावून रक्त काढावे. वेदना असताना वेदनाहर औषधांपेक्षाही जळवा लावून रक्त काढणे ही आयुर्वेदातील तत्काळ वेदनाहर चिकित्सा आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा: पुन्हा रक्त काढावे.    

त्यानंतर स्पर्शाने व वीर्याने थंड औषधे दूध व उसाचा रस यात चांगली वाटून त्यात शतधौत तूप किंवा अन्य जे लेप लवकर वाळणार नाहीत अशी द्रव्ये घालून लेप लावावा. वड, पिंपळ, उंबर यांच्या सालींच्या चूर्णात भरपूर तूप घालून त्यांचा लेप करावा. हा लेप सूज नाहीशी करण्याकरिता उत्कृष्ट आहे.

वाताधिक, स्थिर, कठीण, अतिशय वेदनांनी युक्त व ज्यातून रक्त काढलेले आहे, अशी सूज किंवा व्रण असेल, तर आनुप मांसाच्या वाफेने शेकावे आणि अळशी व तीळ वाटून त्यांचा जाड लेप करावा. त्याने दाह व वेदना कमी होतात.    

ज्यात वेदना कमी आहेत व जो स्थिर असतो, अशा सुजेला वातकफनाशक तेल लावून, शेकून ती सूज बांबूंच्या नळीने किंवा अंगठ्याने किंवा तळहाताने हळूहळू चोळावी व त्यावर जव, गहू, मूग शिजवून वाटून त्यांचा लेप करावा म्हणजे सूज कमी होते. त्याने सूज कमी झाली नाही, तर पोटीस बांधावे. सूज चांगली पिकली की फोडावी.    

पडवळ व निंब यांच्या पानांच्या किंवा वड इत्यादींच्या सालींच्या काढ्याने व्रण धुवावा म्हणजे तो शुद्ध होतो. तसेच कुटकी, दारुहळद, उपळसरी, मंजिष्ठ, हिरडे, मोरचूद, ज्येष्ठमध व करंजाचे बी यांनी सिद्ध केलेल्या तुपाने मर्मगत खोल, वेदनायुक्त, नाडी-व्रणयुक्त, बारीक तोंडाचे स्रवणारे व्रण शुद्ध होतात व भरून येतात.    

ज्या व्रणात पू आहे, ज्याचे तोंड बारीक आहे, ज्यात आशय आहे व जे मर्मावर झाले आहेत अशा सुजेवर स्नेहरहित औषधांचा म्हणजे जव, गहू, उडीद, मूग, रेणूकबीज व बुळबुळीत पदार्थाच्या साली व मुळे यांचे कल्क पीडनाकरिता चहूकडे लावावा. मात्र व्रणाच्या तोंडावर लेप लावू नये. व्रणाचे शोधन होण्यासाठी पडवळाचा पाला, तीळ, ज्येष्ठमध, निशोत्तर, दंतीमूळ, हळद, दारुहळद, कडूनिंबाची पाने व सैंधव यांचा लेप करावा.    

ज्या व्रणातील मांस कुजले आहे असा मांसगत व्रण भरून येत नाही, तेव्हा तीळ, जव व ज्येष्ठमध यांचा कल्क लावावा.

व्रण खोल असेल व त्यातील मांस शुष्क व थोडे असेल, तर न्यग्रोधादी व पद्यकादीगण, अश्वगंधा, चिकणामूळ, तीळ यांनी सिद्ध केलेले तूप लावावे व मांसाहारी प्राण्यांचे मांस खाण्यास द्यावे. याउलट व्रणात मांस फार वाढले व व्रण त्वचेच्या पातळीपेक्षा फार उंच असेल, तर कासीसादी चूर्ण लावावे म्हणजे व्रणमांस कमी होईल. तुरटी, लोध्र, हिरडे, राळ, शेंदूर, सुरमा व मोरचूद यांचे चूर्ण तेल व मेण यांत घालून मलम तयार करावे. ह्याने व्रण लगेच भरून येतो. अर्जुनसादडा, उंबर, पिंपळ, जांभूळ, कायफळ व लोध्र यांच्या सालीचे चूर्ण व्रणावर लावले असता व्रणावर त्वचा लवकर येते. लाख, मनशीळ, मंजिष्ठा, हरताळ, हळद, दारुहळद यांचे चूर्ण तुपात खलून त्यांचा लेप केला असता व्रणाचा डाग जातो. जो व्रण भरून आल्यावर त्या जागी केस येत नाहीत, तेथे हस्तिदंत मषी (धूर बाहेर जाऊ न देता हस्तिदंताचा कोळसा करावा), तेल व रसांजन यांचा लेप केला असता व्रणाच्या ठिकाणी केस येतात.

अवस्थानुरूप सुजेची चिकित्सा : जेव्हा एका विशिष्ट स्थानी दोष संचित होऊ लागतात, तेव्हा ते स्थान आकारमानाने मोठे होऊ लागते. त्याला ढोबळमानाने सूज असे म्हणतात. शोथ, विद्रधी, ग्रंथी हे सर्व शोफ (सूज) होत. येथे दोष संचित होतात. ते घन व स्थूल स्वरूप धारण करतात व तेथून जवळच्या मार्गाने म्हणजे त्वचेतून बाहेर पडू पाहतात, तेथे ते पिकतात. त्वचादिधातूंना पचवतात व त्वचा फोडून बाहेर पडतात. दोषांच्या या प्रयत्नात कित्येक वेळी शरीराच्या फार मोठ्या भागाचे पचन होऊन नाश होण्याचा संभव असतो.


ज्या द्रव्यामुळे म्हणजे कारणांमुळे शरीरात सूज निर्माण झाली असेल, ती द्रव्ये म्हणजे दही, चिंच, मीठ इ. वर्ज्य केली पाहिजेत. ह्यालाच ‘निदान परिवर्जन’ असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जनाला फार महत्त्व दिले आहे. कारण निदान परिवर्जन केल्यामुळे स्वाभाविकपणे रोगाचे बल कमी होते व गुण लवकर येतो.

शरीरात सूज एकदम वाढत नाही, तर कोठ्यात दोषांचा पूर्णपणे साठा वाढून दोष शरीरभर पसरलेले असतात. त्यामुळे सूज दिसू लागताच कोष्ठशुद्धीसाठी वमन, विरेचन द्यावे व शोधानानंतर कोष्ठातील दोषांचे पचन करण्यास लंघन करण्यास सांगावे. लंघनाने दोषांचे पचन होते. जर लंघनाने सूज कमी झाली नाही, तर बोटांनी सूज चोळून ती शिथिल करणे, जळवा लावणे, पोटीस बांधणे, शस्त्रकर्म करणे या क्रमाने उपचार करणे आवश्यक ठरते. व्रण भरून येताना त्या स्थानी मूळ वर्णाची त्वचा यावी याकरिता सवर्णकर द्रव्यांचा उपयोग करावा.

आयुर्वेदात कोणताही रोग प्रथमावस्थेत कमी होऊन पुढे त्याकरिता शस्त्रक्रिया करावी लागू नये म्हणून अवस्थानुरूप सर्व व्याधींमध्ये अभ्यासपूर्वक चिकित्सा सांगितली आहे. फक्त अपरिहार्य परिस्थितीतच शास्त्रकारांनी शस्त्रकर्म चिकित्सा सुचविली आहे.    

नाडीव्रण : पिकलेल्या व्रणातील पू काढून टाकला नाही, तर तो व्रणाच्या आतील त्वचा इत्यादींचे विदारण करून आत प्रवेश करतो आणि खोलवर पसरून नाडीव्रण उत्पन्न करतो. हे नाडीव्रण वात, पित्त, कफ ह्या तीन दोषांनी तीन प्रकारचे आणि त्रिदोषजन्य एक व शल्यजन्य एक असे पाच प्रकारचे आहेत. [→ नाडीव्रण]    

चिकित्सा : वातज नाडीव्रणात प्रथम पोटिसाने शेकून नंतर नाडीच्या गतीचे विदारण किंवा छेदन करावे. नंतर तीळ व आघाड्याचे बी वाटून त्यात सैंधव घालून त्याचा लेप करावा. बृहत पंचमूळाच्या काढ्याने तो व्रण धुवावा व व्रण भरून आणण्यासाठी हळद, कुकटी, बला, बेलमूळ यांनी सिद्ध केलेले तेल लावावे.    

पित्तज नाडीव्रणात प्रथम पित्तघ्न द्रव्ये व दूध, तूप घालून पोटीस बांधावे. नंतर नाडीच्या गतीचे छेदन करावे. नंतर त्यावर तीळ, नागदंती व ज्येष्ठमध ह्यांच्या कल्काचा लेप करावा. निंब, रक्तचंदन, हळद ह्यांच्या काढ्याने तो व्रण धुवावा. व्रण भरून आणण्यासाठी वरधारा, हळद, कुडा व लोध्र यांत दूध घालून सिद्ध केलेले तूप लावावे.

कफज नाडीव्रणात कुळीथ, मोहरी, जव, सुराबीज ह्यांचे पोटीस बांधावे व नंतर नाडीच्या गतीचे छेदन करावे. त्यानंतर निंब, तीळ, दंती, तुरटी व सैंधव ह्यांच्या कल्काचा लेप करावा. करंज, निंब, बेहडा व पीलू यांच्या पानांचा रस किंवा या द्रव्यांच्या काढ्याने तो व्रण धुवावा, व्रणाचे शोधन होण्यासाठी व तो व्रण भरून आणण्यासाठी सज्जीखार, सैंधव, भुईआवळीचे मूळ, चित्रकमूळ, पांढरी रुई, आघाड्याचे बी ह्यांचा कल्क व गोमूत्र यांनी तेल सिद्ध करून ते तेल लावावे.

आगन्तुक व्रणात प्रथम शल्ययुक्त नाडीव्रणाची गती कोठवर आहे ते पाहून त्या गतीचे छेदन करून शल्य काढून टाकावे व नंतर व्रण शुद्ध होण्याकरिता त्यात मध, तूप व तीळ यांचा कल्क भरावा व नाडीव्रण भरून आणण्यासाठी कायफळ, खारीक, कवठ-बेलफळ यांची कोवळी फळे घेऊन त्यांचा काढा करून त्यात नागरमोथा, देवदार, गव्हला, उपळसरी, मोचरस, नागकेशर, लोध्र व धायटीची फुले ह्यांचा कल्क घालून तेल सिद्ध करून ते लावावे. ह्या तेलाने शल्यजन्य नाडीव्रण व इतर दुष्ट व्रण भरून येतात.    

कृश, दुर्बल, भित्रे ह्यांचा नाडीव्रण व मर्मस्थानी असलेला नाडीव्रण केंव्हाही शस्त्राने फोडू नये. क्षारसूत्राने त्याचे विदारण करावे.    

क्षारसूत्र विधी : प्रथम बोथट एषणीने नाडीची गती पाहून नंतर क्षारसूत्र ओवलेली सुई नाडीव्रणात तिच्या टोकापर्यंत घालावी व तेथून वर काढावी. नंतर क्षारसूत्राची दोन्ही टोके एकत्र बांधावी. एका सूत्राने गतीचे छेदन झाले नाही, तर पुन्हा दुसऱ्या क्षारसूत्राचा प्रयोग करावा. तिसऱ्या किंवा सातव्या दिवशी क्षारसूत्र बदलावे.    

क्षारसूत्र बनविण्याची पद्धत : निवडुंगाच्या चिकात दोरा बुडवून वाळवावा. असे २१ वेळा करून नंतर हळदीच्या पाण्यात बुडवून ३ वेळा वाळवावे. क्षारसूत्र बनविण्यासाठी हळद चूर्ण व चुन्याचे पाणी, उंबराचा चीक किंवा आघाड्याच्या क्षाराचाही वापर करतात.    

अस्थिभग्न : (अस्थिभंग). पडणे, मार लागणे इ. बाह्य कारणांमुळे अस्थिभंग होतो. अस्थिभंगाचे भग्नस्थानाला अनुसरून मुख्य दोन प्रकार आहेत : संधिमुक्त व कांडभग्न [→ अस्थिभंग]    

संधिमुक्त : ह्यात सांधा निखळतो. या संधिमुक्ताचे सहा प्रकार आहेत : (१) उत्पिष्ट : यात सांध्यातील हाडाचे बारीक तुकडे होतात. यात सूज व अतिशय वेदना असतात. (२) विश्लिष्ट : या प्रकारात सांध्यातील एक हाड खाली घसरते. सांध्याची क्रिया बंद पडते व सतत वेदना होत असते. (३) विवर्तित : यात सांध्यातील एक हाड मागे गेलेले व उलटे फिरलेले असते. सांधा बाजूला वळवताना वेदना होतात. (४) अवक्षिप्त : या प्रकारात सांध्यातील एक हाड खाली पण दूर गेलेले असते. यात सांधा ढिला पडतो व तीव्र वेदना असतात. (५) अतिक्षिप्त : यात सांध्यातील दोन्ही हाडे स्वत:च्या स्थानापासून फारच दूर गेलेली असतात. (६) तिर्यकक्षिप्त : यात सांध्यातील एक हाड आडव्या दिशेला सरकलेले असते. त्यामुळे वेदना फार होतात.    

कांडभग्न : भंगाच्या जागी अतिशय सूज असते, स्पर्श सहन होत नाही. दाबल्यास ‘कट्कट्’ असा आवाज येतो. तीव्र वेदना असतात. कांडभग्नाचे बारा प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) कर्कटक : यात हाडाचा एक तुकडा दुसऱ्या तुकड्याजवळ गेल्यामुळे गाठीसारखा लागतो. (२) अश्वकर्ण : या प्रकारात हाडाचा एक तुकडा दूर गेल्यामुळे त्याला घोड्याच्या कानाचा आकार येतो. (३) चूर्णित : यात आघातामुळे हाडाचे बारीक तुकडे होतात व स्पर्श केला असता ‘कट्‌कट्’ आवाज येतो. (४) पिच्चित : यात हाड दाबले गेल्यामुळे चपटे होते व सूज असते. (५) अस्थिच्छलित : यात हाडाचा एक तुकडा साल तासावी त्याप्रमाणे सुटलेला असतो. (६) कांडभग्न : यात हाडाचे पूर्णपणे दोन तुकडे होतात व त्यांतील एक तुकडा हलताना दिसतो व तेथे कंप जाणवतो. (७) मज्जानुगत : या प्रकारात हाडाचा एक तुकडा तुटून तो हाडाच्या पोकळीत असलेल्या मज्जेत जोरात अडकून बसतो. (८) अतिपातित : या प्रकारात हाड पूर्णपणे तुटून दूर गेलेले असते. (९) वक्र : या प्रकारच्या भंगात हाड पूर्णपणे न तुटता त्याच्यामध्ये केवळ किंचित बाक येतो. (१०) छिन्न : या प्रकारात हाडाचा एक तुकडा तुटतो व तो दुसऱ्या तुकड्याच्या कोणत्या तरी बाजूस जाऊन पडतो. (११) पाटित : बारीक बारीक पुष्कळ ठिकाणी हाड पिचले गेले की, त्याला ‘पाटित’ असे म्हणतात. (१२) स्फुरित : यात हाडाचे बारीक बारीक अनेक तुकडे पडतात.    

 

तरुणास्थी (कूर्चा) प्राय: वाकतात. नलकास्थी (सरळ लांब हाडे) तुटतात. कपालास्थींना (पसरट, चपटी हाडे) तडे जातात, दात फुटतात. याप्रमाणे हाडांच्या विविध प्रकाराप्रमाणे भंग होतात.    

भग्नचिकित्सा : हाड वाकले असल्यास, तो भाग वर उचलून घ्यावा. अथवा उचलून वर आले असल्यास, ते खाली दाबून बसवावे. जागा सोडून हाड पुढे-मागे किंवा खाली-वर आले असल्यास ते स्वस्थानी बसवावे. ते कोणत्याही तर्हेसने हलणार नाही याची खबरदारी घ्यावी. बंध बांधून शरीरातील अचल किंवा चल संधी स्वस्थानावर आणावेत.    


आघात लागून निखळलेला सांधा जेथल्या तेथे बसवून त्यावर तुपात भिजविलेले पट्टे बांधावे व पट्ट्यावर दर्भाच्या काड्या किंवा कदंब, पळस, उंबर, वड, पिंपळ ह्या मोठ्या झाडांच्या साली त्यावर आच्छादून बळकट पट्टा बांधावा. यामुळे सांधा साधला जातो.    

अस्थिभंग झाला असता, त्या ठिकाणी कदंब, पलाश, उंबर, पिंपळ ह्या मोठ्या झाडांच्या साली व कुशा (पट्ट्या) वेलाने बांधून नंतर वड, पिंपळ, उंबर यांच्या सालीच्या काढ्याने त्यावर सिंचन करावे किंवा तीळतेलाचे सिंचन करावे. म्हणजे वेदना कमी होतात. बांधलेल्या पट्ट्या हिवाळ्यात सात दिवसांनी, उन्हळ्यात तीन दिवसांनी व इतर काळात पाच दिवसांनी नव्याने बांधाव्यात.    

मोडलेल्या हाडाच्या ठिकाणी दाह होत असेल, तर न्यग्रोधादी गणातील औषधांचा थंड केलेला काढा शिंपडावा व वेदना फार असतील, तर मोठ्या पंचमूळाने सिद्ध केलेले कोमट दूध शिंपडावे.  

सर्वसाधारणपणे भग्नस्थानी शीत लेप व परिषेक करणे जास्त फायद्याचे आहे. दोष व काल यांचा विचार करून कोष्ठा उपचारसुद्धा करावेत. मोडलेल्या हाडांमध्ये जखम झाल्यास, तेथे न्यग्रोधादी गणातील औषधांचा काढा तूप व मध घालून शिंपावा.    

व्रणात मांस लोंबत असेल, तर मध, तूप लावून ते व्यवस्थित एकमेकांना जुळवून ठेवावे किंवा शिवून वर बंध बांधावा. गव्हाला व लोध्र यांचे चूर्ण टाकावे म्हणजे व्रण लवकर भरून येतो.    

भग्न झालेल्या अस्थीचे दोन्ही भाग प्राकृत अवस्थेत आणणे म्हणजे स्थानानयन किंवा यथास्थान स्थापन होय. भग्नाचे संधान होण्यासाठी बालपणी एक महिना, तारुण्यात दोन महिने व वार्धक्यात तीन महिने लागतात.    

 

कुशा व बंध सोडल्यावर अस्थिसंधीचे कार्य पुन्हा सुरू व्हावे म्हणून रुग्णाला विशिष्ट हालचालींच्या स्वरूपात व्यायाम द्यावे लागतात.    

शरीराचे अवयव भग्न झाले असता, पुढीलप्रमाणे उपचार करावेत. बोट तुटल्यास किंवा सांध्यापासून निखळल्यास कापडी पट्टा बांधून त्यावर तूप शिंपावे. हाताला विश्रांती द्यावी. तळपाय भग्न झाल्यास, त्याला तूप लावून कापडी पट्टा बांधून त्यावर दर्भाच्या काड्या अथवा झाडाच्या साली ठेवून वरून पुन्हा पट्टा बांधावा. चालण्याचा व्यायाम करू नये. कंबर व मांडीचे हाड तुटले असता, फळ्या बांधून त्या फळीवर निजवणे व निरनिराळ्या ठिकाणी पाच खिळ्यांनी त्याला जखडून टाकणे इष्ट होय. हनुवटी निखळली असता, ती जेथल्या तेथे बसवून त्याचे स्वेदन करून पंचांगी बंध बांधावा आणि वातनाशक व मधुर औषधांनी सिद्ध केलेले तूप त्याच्या नाकात घालावे. पुष्कळ दिवसांनी सांध्यावरचा पट्टा सोडला की, सांध्याला औषधिसिद्ध तेल चोळून शेकून मऊ करावे व त्या स्थानी भग्नाचा पाक होणार नाही याची काळजी घ्यावी.

वातव्याधी चिकित्सेत सांगितलेले सिद्ध स्नेह पिण्यास द्यावे. तसेच अभ्यंग, नस्य, बस्तिकर्म यांचे काही दिवस सतत सेवन करावे. संधी सांधण्यासाठी शाली जातीचे तांदूळ, दूध, तूप, मांसरस, खोबरे, डिंक व पौष्टिक पदार्थांचे नेहमी सेवन करावे. आहारासंबंधी सांगितलेली इतरही पथ्ये पाळावीत.    

अर्श : [→ मूळव्याध].  अपानमार्गात म्हणजे गुदाच्या अंतर्भागात किंवा बाह्यभागात खिळ्यासारखे मांसांकुर तयार होतात., त्यांना ‘अर्श’ असे म्हणतात. प्रकृपित झालेले दोष रक्तासह मुख्य शिरेतून खाली गुदात येऊन गुदामधील वळींना दूषित करून त्या स्थानातील त्वचा, मांस, मेद ह्यांमध्ये विकृती निर्माण करून तेथे ‘मांसाचे अंकुर’ उत्पन्न करतात.    

अर्शावर चार प्रकारचे उपचार करावे लागतात. औषधे, क्षार, अग्निकर्म व शस्त्रक्रिया. अर्श नवीन असून दोष लक्षणे व उपद्रव अल्प असतील, तर मृदू औषधी देतात. ही मूळव्याध औषधांनी बरी होते. जे मोड मऊ, पसरलेले, खोल व वर उचलून आलेले असतात, त्यांच्याकरिता ‘क्षारकर्म’ करण्यास सांगतात. अर्शाचे मोड खरखरीत, स्थिर, कठीण, जाड, मोठे व गंभीर असल्यास प्रथम डाग देऊन अग्निकर्माने नष्ट करतात. ज्यांची मुळे बारीक, ओलसर आहेत व उंच वाढलेले आहेत, त्यांचे अनशेपोटी ‘शस्त्रकर्म’ करावे लागते.    

औषधे : मूळव्याधीमध्ये मुख्यत्वेकरून स्रोतासांचा अवरोध दूर करणारी, वाताची खाली सरण्याची प्रवृत्ती करणारे, मलावरोध दूर करणारे व अग्नि प्रदीप्त करणारे असे अन्नपान व औषधे ह्यांची योजना करतात.

क्षारकर्म : अर्शरोगात कल्याण नावाचा क्षार तुपाबरोबर पोटात देतात. त्यामुळे मोड गळून पडतात. रुग्ण बलवान असेल व जे मोड मऊ, वर उचलून आलेले आहेत त्यावर क्षारकर्म करतात.

क्षारकर्म करताना त्या रुग्णाला उंच फलकावर झोपवून त्याच्या गुदाकडील भाग किंचित उंच करून ठेवतात. रुग्णाचे पाय पोटाजवळ घेऊन ते बांधून ठेवतात. मग गुदाला व अर्शोयंत्राला तूप लावून स्निग्ध केल्यावर ते अर्शोयंत्र गुदात घालतात व रुग्णास जरा कुंथण्यास सांगतात. त्यामुळे मोड अर्शोयंत्राच्या छिद्रातून वर येतात. ते चांगले वर आलेले आहेत असे पाहून शलाकेने उचलून ते कापसाने पुसतात. शलाकेने अर्शावर क्षार लावतात व अर्शोयंत्राचे मुख हाताने बंद करतात आणि शंभर अंक मोजेपर्यंत थांबतात. नंतर हात काढून अर्शाचा लावलेला क्षार पुसून टाकतात. योग्य प्रमाणात दग्ध झाले असल्यास अर्शाचा रंग पिकलेल्या जांभळाप्रमाणे दिसतो व अर्श दबलेला वाटतो. योग्य दग्ध न झाल्यास रुग्णाचे बल पाहून क्षार पुन्हा लावतात. नंतर कांजी, दह्याची निवळ व आंबट फळांचा रस अर्शावर लावून क्षार धुवून टाकतात. नंतर ज्येष्ठमधाचे चूर्ण तुपात कालवून त्याचा अर्शावर लेप लावतात.    

अग्निकर्म : क्षारकर्माप्रमाणेच पूर्वतयारी करतात. रुग्णाला पादोर्ध्व जानुमुद्रेत निजवावे. अर्शोयंत्र गुदात प्रविष्ट करून अर्श वर आल्यावर शलाकेने अग्निकर्म करतात. नंतर ज्येष्ठमध व तूप यांचा लेप लावतात.    

शस्त्रकर्म : ज्या मूळव्याधीच्या मोडाची मुळे बारीक असून मोड ओलसर व वर आलेले आहेत, अशा मोडांवर शस्त्रकर्म करतात. शस्त्रक्रिया प्राय: शरद किंवा वसंत ऋतूत करतात. रुग्णाला स्नेहनादी पूर्वकर्म व वमनविरेचनादी शोधनकर्म करून त्याचा देह शुद्ध करतात.

प्रधानकर्म : शस्त्रकर्म करावयाच्या वेळी रुग्णाला उंच फलकावर झोपवून त्याच्या गुदाला व अर्शोयंत्राला तूप लावून स्निग्ध करून ते अर्शोयंत्र गुदात घालतात व रुग्णाला जरा कुंथण्यास सांगतात. त्यामुळे मोड अर्शोयंत्राच्या छिद्रातून बाहेर येतात. ते चांगले वर आलेले आहेत असे पाहून त्या मोडाचे छेदन करतात. शस्त्रकर्म झाल्यावर अर्शोयंत्र गुदातून बाहेर काढतात व गुदाला तेलाने अभ्यंग करतात. एका मोठ्या डोणीत एरंडपत्र, निर्गुडीपत्र अशा वातनाशक द्रव्यांचा काढा भरून तो काढा गरम असतानाच त्या रुग्णाचा खालचा भाग त्या डोणीत काही काळ धरून ठेवण्यास सांगतात. अवगाह स्वेदनाने रुग्णाला वेदना होत नाहीत व रक्तस्रावही होण्याची भीती नसते. याप्रमाणे एकेका मोडाचे शस्त्रकर्म दर सात दिवसांनी करावयाचे असते.

जर अर्श कठीण असतील आणि त्या भागात सूज व वेदना असतील, तर जळवांनी रक्तसृती केली असता लगेच गुण येतो.    

भगंदर : भग म्हणजे गुद व मूत्रमार्ग यांच्या आसमंतातील प्रदेश. हा भाग ज्या विकारात फाटतो तो विकार. प्रकुपित झालेला वायू गूदमार्गात अवरुद्ध होऊन गुदामध्ये मांस आणि रक्त यांना बिघडवून एक पिटिका निर्माण करतो. ती फुटते व त्यातून पूयमिश्रित स्राव सतत व दीर्घकाळापर्यंत वाहतो. या व्रणाला भगंदर म्हणतात. [→ भगंदर]. भगंदराचे आठ प्रकार पाडलेले आहेत : शतपोनक, उष्ट्रग्रीव, परिस्रावी, शंबुकावर्त, परिक्षेपी, अर्शोभगंदर, क्षतज व उन्मार्गी.    


चिकित्सा : शंबुकावर्त व आगन्तू हे भगंदराचे प्रकार तर असाध्यच आहेत. भगंदराची पिटिका देहशुद्धीच्या उपचारानंतर जर पिकली व फुटली, तर पुढील उपचार करावेत. प्रथम या पिटिकेचे तोंड केवळ बाहेर आहे की आतही आहे हे पाहावे. यासाठी एषणी यंत्राचा वापर करावा. नंतर व्रणमुखातून एषणी वर उचलून सभोवतालचा सर्व जाड व टणक भाग आणि त्या नाडीव्रणाचा सर्व आश्रय वृद्धिपत्राने संपूर्ण काढून टाकावा आणि तळापासून हा नवीन निर्माण झालेला व्रण शुद्ध राखून क्रमाक्रमाने भरून आणावा. छेदनाने दोषांचा संपूर्ण नाश होत नसेल, तर त्यावर जरूर तर क्षारकर्म किंवा अग्निकर्मही करावे. भगंदराच्या पिटिकेस अनेक छिद्रे पडली असतील, तर गुदाच्या संवरणी वळीचे रक्षण करून छेदन कर्म करावे. यासाठी शल्यतंत्रात पुढील चार प्रकारचे छेद सांगितले आहेत.    

गोतीर्थक छेद : अनेक व्रण असतील, तर मागील बाजूस व्रणात एषणी घालून ती पुढे असलेल्या दुसऱ्या व्रणातून बाहेर काढावी व एषणीच्या अनुरोधाने भगंदराचा सर्व मार्ग छेदून काढावा. तसेच या मार्गाच्या तळात व सभोवती जो जो दोषयुक्त भाग असेल, तो तो काढून टाकून नवीन मोठा व खुला असा व्रण तयार करावा.

सर्वतोभद्र छेद : परिक्षेपी भगंदर असेल, तर गुदाची शिवण सोडून त्यासभोवतीचा भगंदराचा सर्व मार्ग छाटून काढावा व वर्तुलाकृती व्रण तयार करावा.

लांगलक छेद : हा छेद नांगराच्या फाळासारखा असतो. यातील आडवी रेषा गुदाकडे ओढावयाची व या रेषेच्या मध्यावर सरळ उभ्या रेषेत दुसरा छेद घ्यावा. हा छेद इंग्रजी टी (T)  अक्षराप्रमाणॆ दिसतो.    

अर्धलांगलक छेद : एका सरळ छेदावर दुसरा एक उभा छेद घेतला म्हणजे इंग्रजीतील व्ही (V) अक्षरासारखा छेद होतो.    

वातज पिटिका पिकली, तर तिला चाळणीसारखी अनेक सूक्ष्म छिद्रे पडतात. त्याला ‘शतपोनक’ भगंदर म्हणतात. यासाठी दोन मुखे असलेल्या व्रणाचा एक व्रण तयार करावा. हा व्रण भरून आला म्हणजे मग दुसऱ्या दोन छिद्रांमधील पोकळ मार्ग छेदून काढावयाचा आणि मग हा व्रण भरून आणावयाचा. याप्रमाणे भगंदराचे सर्व नाडीमार्ग भरून आणावयाचे असतात.

पित्तज पिटिकेच्या उष्ट्रीग्रीव व्रणाला उंटाच्या मानेसारखा बाक असतो. या प्रकारात भगंदराचा मार्ग नीट शोधून तो कापून काढावा व त्या व्रणावर क्षारकर्म करावे. या प्रकारात अग्निकर्म करू नये. क्षार लावल्यावर तिळाचा कल्क व तूप मिश्रण करून व्रणावर लावावा व व्रण बांधून टाकावा.    

याशिवाय भगंदरात पुढील प्रकारचे छेद घेतले जातात.    

खर्जूरपत्रक छेद : परिस्रावी या प्रकारच्या कफज भगंदरात पुष्कळ बुळबुळीत स्राव होतो. यात मध्यावर जी नाडी असते, ती सोडून तिच्या सभोवती असलेली सर्व स्राव होणारी मुखे कापून काढावीत व त्यावर अग्निकर्म किंवा क्षारकर्म करावे. त्यावर अणुतेलाचा पिचू (मोठा कापसाचा बोळा) ठेवावा. त्यामुळे ठणका व स्राव कमी होतात. त्यावर मूत्र क्षारमिश्रित अशा पोटिसांनी शेकावे व त्याच प्रकारच्या औषधांचे लेपही करावे. ज्या भगंदारातून अल्पस्राव होत असून ठणकाही आहे, त्याच्या मुखांची एषणाने गती शोधून काढून छेदन क्रिया करावी. त्यात मधल्या नाडीत प्रथम छेद घ्यावा व छेदाच्या दोन्ही बाजूंना असलेली मुखे गोतीर्थक छेद घेऊन कापून काढावीत. या सर्वांचा मिळून जो एक व्रण तयार होतो, त्याला ‘खर्जुरपत्रक’ छेद असे म्हणतात.

अर्धचंद्र छेद : कित्येक वेळा मधला व्रण भरून येतो पण त्याच्या बाजूला दोन नाडीव्रण राहतात. मग अशा वेळी त्याचे बाहेरचे मुख हे एकच मुख तयार करावयाचे असते. यासाठी चंद्रमंडळाप्रमाणे चंद्रचक्र छेद घ्यावा लागतो. कित्येक वेळा भगंदराच्या नाडीचे आतील तोंड स्थूल असते व बाहेरील तोंड लहान अथवा संकुचित असते. अशा नाडीव्रणाला ‘सूचिमुखी’ असे म्हणतात. त्यामुळे पुवाचा आतमध्ये संचय होऊन राहतो व बाहेरच्या तोंडाने तो पू नीट बाहेरही पडत नाही. कित्येक वेळा तोंड खाली असेल, त्याला ‘अवाक मुख’ किंवा ‘अधोमुखी’ असे म्हणतात. अशा व्रणात छेदनकर्म करून त्यावर क्षारकर्म किंवा अग्निकर्म करावे लागते, नंतर मृदू अशा संशोधन द्रव्याने शोधन करावे, अगान्तू भगंदरात निर्माण झालेली नाडी कापून काढावी व तिच्यावर तप्त शलाकेने किंवा तप्त जांबवोष्ठाने (जांबववदनाने) डाग द्यावा व पुढे सर्व कृमिहर उपचार करावेत.    

भगंदराचे शस्त्रकर्म केल्यावर त्या जागी वेदना फार होत असतील, तर त्यावर अणुतेल कोमट करून लावावे व तो व्रण शेवाका किंवा निर्गुडीपत्र, अर्कपत्र, शिग्रुपत्र अशा वातनाशक पानांचा काढा करून त्यांच्या वाफेने गुदाचा भाग शेकावा किंवा रुग्णाला त्या काढ्यात बसवून ठेवावे (अवगाह स्वेद द्यावा). मालकांगणी, दंतीमूळ, निशोत्तर, दूर्वा, लोध्र, काटेधोतर ही औषधे व्रणाचे शोधन करणारी आहेत. रसांजन हळद, दारुहळद, मंजिष्ठ, कडुनिंबाची पाने, कालकांगोणी, दंतीमूळ या औषधांचा कल्क नाडीव्रणाचा नाश करतो.

पिंपळी, ज्येष्ठमध, लोध्र, उपळसरी, हळद, दारुहळद, राळ, पद्यकाष्ठ, केशर, वेखंड, मेण आणि सैंधव ही सर्व द्रव्ये समप्रमाणात घेऊन तेल सिद्ध करावे. हे तेल भगंदराचा व्रण भरून आणते. व्यग्रोधारी गणातील औषधांचा काढा व ह्यांनी सिद्ध केलेले तेल किंवा तूप हे भगंदराच्या व्रणावर लावावे. ह्याने व्रणाचे शोधन व रोपन होते.

घोड्यावर बसून प्रवास करणे, अधोवाताचा वेग आवरून धरणॆ, मद्यपान, मैथुन व अजीर्ण वारंवार होणे, जे सवयीचे नाहीत असे पदार्थ सेवन करणे हे भगंदराचा व्रण भरल्यावरही पुढील एक वर्षापर्यंत वर्ज्य करावेत.    

क्षारसूत्रबंधन विधी : सुश्रुताचार्यांनी भगंदर व्याधीसाठी क्षारसूत्र चिकित्सा हा शस्त्रकर्मविरहित व हमखास व्याधीमुक्ती देणारा उपाय सांगितला आहे. क्षारसूत्र म्हणजे विविध औषधी वनस्पतींच्या क्षारांनी पुटे देऊन तयार केलेला धागा. निवडुंगाच्या चिकात धागा बुडवून तो वाळवावा. असे २१ वेळा करून हळदीच्या पाण्यात बुडवून तो तीन वेळा वाळवावा. अशी सूत्रे तयार करून ठेवावीत. भगंदर व्याधीचे निश्चित निदान झाल्यानंतर रुग्णाला शस्त्रकर्मगृहात नेऊन स्थानिक स्वच्छता करून आवश्यकतेनुसार स्थानिक संमोहन द्यावे. एषणी शलाकेने भगंदराचा मार्ग निश्चित करून गुदमार्गातून एषणी बाहेर काढून त्याची दोन्ही टोके गुदद्वाराजवळ फार सैल नाही, फार घट्ट नाही अशी प्रकारे बांधावीत. दर आठ दिवसांनी क्षारसूत्र बदलावे व पूर्ण मार्ग भरून येईपर्यंत ही प्रक्रिया करावी. रुग्णाला रोज गरम पाण्यात अवगाह स्वेद घेण्यास सांगावे आणि सोबत वेदनाशामक व विरेचन औषधी द्याव्यात.    

उदर : प्रकुपित वातदोष त्वचा व मांस ह्या दोहोंमधील संधीत सूज उत्पन्न करतो, तेव्हा उदररोग उत्पन्न होतो. सर्व प्रकारच्या उदररोगात दोष संचय अती प्रमाणात होत असल्याने स्रोतसांचा अवरोध होतो व वातदृष्टी होऊन तिन्ही दोषांचा प्रकोप होतो. त्यामुळे उदररोग कष्टसाध्य आहे. ‘अग्निमांद्य’ हे उदराचे मुख्य कारण आहे. गुदामध्ये व मलमार्गामध्ये मलसंचय झाला, तर बद्धगुदोदर व यकृतामध्ये मलसंचय झाला, तर यकृतोदर होतो. उदराच्या प्रकारांना दोषानुरूप व अवयवानुरूप नावे दिली आहेत. तसेच मल ज्या दोषांनी अधिक संचित होतो, त्या दोषाला अनुसरून वातादी तीन व तिन्ही दोषांमुळे सन्निपातोदर होते. आंत्राला छिद्र पडल्याने क्षतोदर होते व उदरात पाणी साठल्याने जलोदर होते. उदररोगाची उपेक्षा केल्याने सर्व प्रकारच्या उदराचे रूपांतर जलोदरात होते. मलदोषांचा उदरामध्ये संचय होणे हा उदराचा स्वभाव आहे. [→ प्रतिरोगचिकित्सा].


अग्निमांद्य हे उदराचे मुख्य कारण असल्याने अग्नीची चिकित्सा (दीपनपाचन) ही उदराची महत्त्वाची चिकित्सा होय. अग्निमांद्याने मलसंचय होत असल्यामुळे मलनिस्सरणाची चिकित्सा येथे अत्यंत आवश्यक आहे व उदरातून त्या मलीन दोषांचे शोधन करावयाचे असते. म्हणून विरेचन हाच शोधनाचा उपाय केला पाहिजे. विरेचनाने वातवृद्धी होऊ नये म्हणून स्नेहमय व वातनाशक असे एरंडेल तेल गोमूत्र किंवा दुधाबरोबर विरेचनाकरिता द्यावे. प्लीहोदराची चिकित्सा करताना रोग्याच्या डाव्या हाताच्या कोपरामधील शीर तोडून रक्त काढतात. यकृतोदरात सिरावेध करताना डाव्या हाताच्या शिरेचा वेध करतात.    

बद्धगुदोदर व छिद्रोदर या दोन्ही विकारांत शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्नेहन करून नाभीच्या खाली डाव्या बाजूला चार बोटे अंतर सोडून चार बोटे इतका खोल छेद उदरावर घ्यावा आणि आंत्राचा भाग बाहेर काढून त्याचे निरीक्षण करून त्यालीत केस, इतर मल, खडे इ. चिकटलेली द्रव्ये व अन्य शल्ये काढून टाकावीत.    

तसेच छिद्रोदर आंत्राला जेथे छिद्र पडले असेल, त्या छिद्रातील शल्य काढून टाकून व उदरात झालेला स्राव चांगल्या स्वच्छ, मऊ अशा शुद्ध व धूपित कपड्याने शोषून घेऊन त्या छिद्राचे तसेच बद्धगुदोदरातील मल काढून टाकल्यानंतर त्या छिद्राच्या समोरासमोरील काठांना-क़डांना जवळ घेऊन मोठे मुंगळे घेऊन दोन्ही कडा सांधल्या जातील अशा तर्हेिने ते मुंगळे डसवावे. नंतर त्या मुंगळ्यांचा खालचा भाग तोडून टाकावा. नंतर मुंगळ्यांच्या डोक्यांनी जोडलेले आंत्र पूर्वीच्या त्याच्या ठिकाणी बसवून नंतर त्याला मध व गायीचे तूप लावून बाहेरचा व्रण शिवावा, त्यावर ज्येष्ठमध व काळ्या मातीचा लेप लावून बांधावे. नंतर स्नेहाच्या डोणीत निवांत जागी त्याला बसवावे. व्रण पूर्ण बरा होईपर्यंत रुग्णाला दुग्धाहारावरच ठेवावे.    

जलोदरावर प्रथम वातादी दोषांनुसार जलदोषांचे निर्हरण करणारी तीक्ष्ण औषधे गोमूत्राबरोबर व विविध क्षार घालून द्यावीत. ह्या चिकित्सेने यश आले नाही, तर शस्त्रक्रिया करावी. जलोदरपीडित रुग्णाच्या बाबतीत वातनाशक द्रव्यांनी तेल सिद्ध करून सर्व शरीराला अभ्यंग करून ऊन पाण्याने शेकावे. नंतर ओटीपोटापासून ते काखेपर्यंत वस्त्राने गुंडाळून बद्धगुदोदर व छिद्रोदरात ज्या ठिकाणी छेद घेतात, त्या ठिकाणी म्हणजे नाभीच्या खाली चार अंगुळे अंतर सोडून ब्रीहीमुख शस्त्राने एक बोटभर खोल वेध घ्यावा व तिथे आत कथिलादिकांची नाडी (बारीक नळी) ठेवावी व आतले निम्मे पाणी स्त्रवू द्यावे. नंतर ती नलिका काढून घेऊन त्या ठिकाणी सैंधव तिळाच्या तेलात घालून ते तेल व्रणावर लावावे व नंतर कपड्याच्या पट्ट्यांनी उदर बांधावे. एकाच दिवशी सर्व दूषित पाणी काढू नये. तिसऱ्या  किंवा चौथ्या दिवशी पुन्हा थोडे थोडे पाणी काढावे. असा कार्यक्रम सोळा दिवस करावा. पोट जसजसे लहान होईल तसतसा पोटाचा पट्टा अधिकाधिक आवळून बांधावा. पाणी काढल्यानंतर रुग्णाला लंघन द्यावे. नेहमीच्या अन्नकालापेक्षा अधिक काल लंघन देऊन नंतर शाली जातीच्या तांदळाची पेज द्यावी. त्यात तूप, तेल वा मीठ घालू नये. त्या रुग्णास पेयादी क्रम द्यावा व नंतर तो क्रम संपल्यावर त्याला सहा महिने दुधावर ठेवावे व नंतर पेजेशिवाय दुसरे अन्न म्हणजे वर्य़ातचे तांदूळ दुधाबरोबर किंवा आंबट फळांच्या रसाबरोबर किंवा मांसरसाबरोबर द्यावे. असा क्रम एक वर्षभर चालवावा. नंतर क्रमाने नेहमीच्या पथ्यकर अन्नावर यावे. [→ जलोदर]

गुल्म : गोळा किंवा गाठ. हा संचयात्मक व्याधी आहे. या विकारात प्रामुख्याने वात व रक्तदुष्टी असते. हृदय व नाभी यांमध्ये ही गाठ काही वेळा स्थिर तर काही वेळ चल म्हणजे इकडून तिकडे जाणारी, लहान व मोठी होणारी असते. गुल्म पाच प्रकारचे आहेत. वातज, पित्तज, कफज, त्रिदोषज व रक्तज. यात प्रथम वाताची चिकित्सा करावी. वातहारक स्नेह व शेक द्यावे. स्नेहयुक्त मृदुरेचक बस्ती द्यावे. गुल्म नाभीच्या वर असेल, तर स्नेहपान हितावह आहे. हिंग्वादी तूप किंवा दशमूळादी तूप रुग्णास पिण्यास द्यावे. गुल्म पक्वाशयात असेल, तर बस्ती दिल्याने वातगुल्म, पित्तगुल्म व कफगुल्म नाहीसे होतात. बस्तीने पक्वाशयातील वात जिंकून गुल्माचा नाश होतो. रक्तगुल्म झाला असल्यास नऊ महिने झाल्यानंतर स्त्रीचे शरीर स्निग्ध करून, स्वेदन करून एरंडॆल तेलासारखे स्नेहविरेचन द्यावे. [→ गुल्म]

रक्तगुल्म : पळसाच्या क्षाराने सिद्ध केलेले तेल व तूप पिण्यास द्यावे. त्याने गुल्म शिथिल होतो. या उपायांनी गुल्म फुटला नाही, तर योनिविरेचन द्यावे. या उपायांनी रक्तस्राव झाला नाही, तर दूध, गोमूत्र व क्षार दशमुळाच्या काढ्यात घालून त्याचा उत्तर बस्ती द्यावा. 

अश्मरी : (मुतखडा). विशेषत: मूत्रमार्गात, मूत्राशयात किंवा वृक्कात (मूत्रपिंडात) झालेला खडा. यास ‘मूत्राश्मरी’ असेही म्हणतात. [→ अश्मरी मुतखडा]. अश्मरी हा मूत्रमलाचा विकार आहे. मूत्र हा अन्नाचा द्रवरुप मल आहे व तो कफजातीय आहे. तो जेव्हा कफाधिक्याने युक्त होतो, तेव्हा शरीराच्या उष्णतेने व वायूने तो शुष्क होऊन त्याची अश्मरी बनते. ह्या व्याधीची पूर्वरूपे दिसताच स्नेहन-स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, उत्तरबस्ती ही कर्मे अवश्य करावीत. त्यामुळे अश्मरीची वाढ होत नाही व तो कमीकमी होऊ लागतो. मात्र तो फार दिवसांचा जुना व मोठा असेल, तर शस्त्रकर्म करून काढावा लागतो.    

मैथुनामध्ये अडथळा निर्माण केला किंवा अतिमैथुनाने शुक्र शरीराच्या बाहेर न पडल्याने ते स्थिर होते व त्यामुळे वाताचा प्रकोप होऊन, वातामुळे शुक्राचे शोषण होऊन मेढ्र, वृषण येथे शुक्राश्मरी निर्माण होतो. यात वीरतरादी औषधांचा काढा हा भाताची पेज व कढणे ह्यातून द्यावा. तिल्कव घृताचे रेचक द्यावे. उत्तरबस्ती द्यावा. या उपचाराने शुक्राचा खडा निघू शकतो.

शस्त्रकर्म : मुतखड्याचे शस्त्रकर्म करण्यापूर्वी रुग्णाचे वमन, विरेचन, बस्ती या उपायांनी शोधन करावे. नंतर लंघन करून त्याच्या अंगाला तेल लावून किंचित स्वेदन करावे. नंतर रुग्णाला उताणे निजवून नाभी व त्याखालील प्रदेशात तेल लावावे. मुठीने बेंबीकडून खाली पोट इतके दाबावे की ज्यामुळे अश्मरी बस्तीच्या खालच्या भागी येईल. नंतर डाव्या हाताची दोन बोटे स्नेह लावून गुदात घालावीत. सीवनीच्या अनुरोधाने बस्तीचे पीडीन करावे म्हणजे गुद व शिश्न ह्यांच्यामधोमध अश्मरी आणावा व गुदातील बोटांनी तो जरा वर उचलून धरावा. मग वैद्याने उजव्या हाताने शिवणीच्या उजव्या भागास जवाइतकी जागा सोडून जरा बाजूला उभा छेद घ्यावा व त्या छेदातून सर्पमुख यंत्राने तो अश्मरी बाहेर काढावा. ही क्रिया करीत असताना तो मुतखडा फुटणार नाही याची काळजी घ्यावी.    

मुतखडा काढल्यानंतर त्या रुग्णाला ऊन पाण्याने भरलेल्या डोणीत बसवावे व त्याचे स्वेदन करावे. त्यामुळे बस्तीमध्ये रक्तस्राव होत नाही. कदाचित रक्तस्राव झाला तर वड, पिंपळ वगैरे झाडांच्या सालीच्या काढ्यांनी व ह्या क्षीरीवृक्षाच्या सालीच्या काढ्याची पिचकारी द्यावी. मूत्रमार्गाचे शोधन होण्याकरिता त्याला गुळाचे पाणी प्यावयास द्यावे. मग रुग्णाला डोणीतून बाहेर काढून त्याच्या व्रणावर तूप व मध यांचा लेप करावा. तृणपंचमूळ वरुण, कोहळा, पाषाणभेद इ. मूत्रशोधन करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेली यवाग तूप व गूळ घालून सकाळी, संध्याकाळी प्यावयास द्यावी याप्रमाणे तीन दिवस द्यावे. चौथ्या दिवसापासून पुष्कळ गूळ घातलेले दूध व भात खाण्यास द्यावा. त्यामुळे मूत्राशयाची शुद्धी होऊन लघवीला साफ होऊ लागते. दहा दिवसांनंतर आंबट फळांचा रस किंवा जांगल प्राण्यांच्या मांसांचा रस त्याला द्यावा. त्यानंतर दहा दिवसांपर्यंत त्याला तेलाने अभ्यंग करून स्वेदन करावे. क्षीरीवृक्षाच्या सालीच्या काढ्याने त्याचे जखम धुवावी. लोध्र, हरिद्रा, जेष्ठमध व मंजिष्ठा यांच्या सालीच्या चटणीचा व्रणावर लेप करावा किंवा वरील लोध्रादी औषधांचा काढा व हरिद्रादी गणातील औषधांचा कल्क घालून तेल किंवा तूप सिद्ध करून ते व्रणाला लावावे. त्यामुळे तो व्रण लवकर भरून येतो.


साधारणपणे सात-आठ दिवसांतच मूत्रप्रेसकातून मूत्र येऊ लागते. त्या वेळी काकोल्यादी गणातील मधुर द्रव्यांनी आणि क्षीरीवृक्ष व कषाय रसांच्या औषधांनी सिद्ध अनुवासम बस्ती तसेच याच द्रव्यांच्या काढ्याने उत्तरबस्ती व निरुहबस्ती द्यावा.

सात दिवसांत व्रण भरून आला नाही, तर व्रणावर अग्निकर्म करावे. त्यामुळे मूत्रस्रावी व्रण बंद होऊन स्वाभाविक मार्गाने मूत्रवहन होऊ लागते. व्रण बरा झाल्यानंतर एका वर्षापर्यंत स्त्रीसंग, घोड्यावर बसणे, पर्वत चढणे, घोडागाडीत बसणे, झाडावर चढणे, पोहणे व जड अन्न खाणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात.

विद्रधी : (गळू). हा रक्तदोषांपैकी एक विकार आहे. प्रकुपित दोष त्वचा, रक्त, मांस, मेदाला दूषित करून अस्थीच्या आश्रयाने त्वचेचा मोठा भाग व्यापून पीडा करणारी, बरीच खोल, वाटोळी सूज उत्पन्न करतात. ही सूज लवकर पिकते म्हणून तीला ‘विद्रधी’ म्हणतात. बाह्य व आभ्यंतर असे तिचे दोन प्रकार असतात. त्याचप्रमाणे वातज, पित्तज, कफज, सान्निपातिज, क्षतज (आघाताने उत्पन्न झालेला) आणि रक्तज असे दोषादिभेदाने सहा प्रकार होतात. [→ विद्रधी].    

हा शस्त्राने फोडण्यासारखा विकार आहे. मर्मरहित प्रदेशावर झालेल्या बाह्य विद्रधीला पिकवून, वृद्धिपत्राने छेद देऊन शोथनादी व्रणाप्रमाणे उपचार करावेत. आभ्यंतर विद्रधी पिकली किंवा बाहेरील जागी उंच दिसू लागला, तर तो फोडून त्यावर शोधनरोपणादी उपचार करावेत.    

अपक्व (कच्च्या) विद्रधीची शोफाप्रमाणे चिकित्सा करावी. अशा अवस्थेत वारंवार रक्तस्राव करून विद्रधीकडे जाणारा दोषांचा पुरवठा कमी करावा. रक्तस्राव शिरेतून किंवा विद्रधीभोवती जळवा लावून किंवा तुंबडी लावून करावे.    

स्तन विद्रधी : सूज जेव्हा स्थनात येते, तेव्हा ती पिकून जखम होण्याची भीती असते. स्तनासारख्या शिरामय व मृदू अवयवात जखम झाल्यास ती भरून येणे अवघड असते. ती भरण्यास वेळ लागतो म्हणून स्तनांची सूज पिकणार नाही, ती कच्ची असतानाच नाहीशी होईल असे लेप इ. उपचार करावेत. अशक्त झालेली बाळंतीण व स्तनांच्या व्रणासारखा कष्टदायक विकार यामुळे बाळंतीण अत्यंत क्षीण होते. ह्यासाठी स्तनातील गाठ पिकू नये ह्यासाठी अटोकाट प्रयत्न करावे. प्रथम सूज वाढू नये, ह्या अवस्थेत स्तनांना हलक्या हाताने तेल चोळून थोडे शेकावे व स्तन्य काढून टाकून द्यावे. हे उपाय केली नाही, तर सूज वाढते आणि रक्त व मांस यात पिकण्याची क्रिया सुरू होते. ताप येतो, पाठीला कळा लागतात व सूज वाढत जाते, मुलाला स्तनपानही देता येत नाही.    

सूज आली, तर पिकणार नाही असे शोधहर लेप लावावेत. इतके करूनही स्तनातील सूज पिकली, तर स्तनचूचूकाला धक्का लागणार नाही असा छेद घेऊन व्रणचिकित्सा करावी. कारण एकदा पू झाला म्हणजे तो शरीरात राहू न देता बाहेरच काढून टाकला पाहिजे, नाही तर तो अधिकाधिक खोल शिरून नाडीव्रण तयार करेल. व्रणातील सर्व पू चारी बाजूंनी दाबून पिळून टाकल्यावर व्रणशोधन रोपण तेलाचा बोळा ठेवून व्रणबंध बांधावा. व्रण दुष्ट होणार नाही व लवकर भरून येईल याची काळजी घ्यावी. स्तनविद्रधीत रक्त, मांस, मेद व त्वचा हे धातू दुष्ट होत असल्यामुळे हा विकार अधिक कष्टदायक असतो.    

ग्रंथी, अपची, गंडमाळा, अर्बुद : रक्त, मांस व मेद या शरीरधातूंत दोषांची दुष्टी होऊन हे विकार उत्पन्न होतात. या विकारांचा नंतरच्या अवस्थेत शल्यतंत्राशी संबंध येतो.    

ग्रंथी म्हणजे लहान गाठी किंवा वर उचलेली सूज. ह्या ग्रंथी त्वचेखाली कोठेही व्यक्त होतात. कफप्रधान दोष मेद, मांस व रक्त यांची दुष्टी करून वाटोळी व उचलून वर आलेली सूज त्वचेखाली उत्पन्न करतात.

मान, हनुवटी, गळा, काख ह्या भागांत संचित झालेला मेद व कफदोष कठीण, वाटोळ्या लांबट व किंचित वेदनायुक्त गाठी उत्पन्न करतात. या ग्रंथींना ‘गंडमाळा’ म्हणतात. यात शरीरदोषांचा संचय होत राहतो. हा व्याधी रोहिणी त्वचेच्या आश्रयाने राहतो. याचा रंग त्वचेसारखाच असतो. त्याच्या गाठी आवळा, डोरली वांगे यांच्या आकाराएवढ्या असतात. [→ गंडमाळ].

गंडमाळा पिकल्या नाहीत किंवा पिकून फुटल्यावर दीर्घकाळ भरून आल्या नाहीत, तर त्यांना ‘अपची’ असे म्हणतात. अपचीची संप्राप्ती व लक्षणे गंडमाळाप्रमाणेच आहेत.    

मोठ्या ग्रंथीना ‘अर्बुद’ म्हणतात. कफप्रधान तिन्ही दोष त्वचा, रक्त, मांस, मेद यांच्या आश्रयाने राहून, त्यांना दूषित करून वाटोळी, कठीण, किंचित वेदनायुक्त मोठे मूळ व फार खोल असलेली व सावकाश वाढून फार दिवसांनी पिकणारी, मांसयुक्त अशी सूज उप्तन्न करतात. [→ अर्बुदविज्ञान].    

चिकित्सा : ग्रंथी, गंडमाळा, अपची, अर्बुद या सर्व विकारांच्या प्रथमावस्थेत प्रथम वमन, विरेचन देऊन कोष्ठशोधन करावे व नंतर गाठींवर लेप देऊन संचित दोष कमी करावेत. नंतर त्या स्थानी जळवा लावून दुष्ट रक्ताचा स्राव करावा.    

वातजन्य गाठी पिकल्या असल्यास शस्त्राने फोडून पू काढून बेल, रुई व बाहवा यांच्या सालीने धुवून शोधन करावे. व्रण शुद्ध झाल्यावर रास्ना, सरळ देवदार, वावडिंग ज्येष्ठमध व गुळवेल ह्यांचा कल्क व दूध एकत्र करून सिद्ध केलेल्या तेलाने त्या व्रणाचे रोपन करावे. पित्तजन्य गाठीवर जळवा लावून रक्त काढावे व गाठींवर दूध व पाणी शिंपावे.    

गाठ जर मर्मस्थानी नसेल व ती बसत नसेल, तर ती पिकली नसतानाच फोडून तिच्यासाठी दूषित रक्त काढावे व रक्त बंद झाल्यावर त्या ठिकाणी डाग द्यावा व अगन्तू व्रणावरील उपचार करावे. ज्या कफजन्य गाठी मांसयुक्त, कठीण मोठ्या असतील, त्यावरही हाच विधी करावा. गाठ पिकली असल्यास ती फोडून, पू काढून टाकून कफजन्य व्रणनाशक औषधांच्या काढ्याने धुवावे व संशोधन गणातील कफनाशक औषधांच्या कल्कात मध व गूळ घालून त्यांच्या लेपाने त्या व्रणाचे संशोधन करावे व व्रण शुद्ध झाल्यावर हळद, पहाडमूळ व वावडिंग ह्यांच्या कल्काने सिद्ध केलेल्या तेलाने त्याचे रोपन करावे.

मेदापासून झालेल्या गाठींवर लेप, शेकणे इ. उपचार केल्यानंतर आवश्यक असेल, तर त्या शस्त्राने फोडून आतील मेद काढून टाकावा व डाग द्यावा. गाठ पिकली असल्यास फोडून पू निघून गेल्यावर गोमूत्राने धुऊन सज्जीखार, जवखार व सैंधव, हरताळ, तूप, मध आणि तिळाचा कल्क ह्यांचा लेप करून त्या व्रणाचे शोधन करावे. नंतर करंज, गुंजा, वंशलोचन व हिंगणबेटाचा गर ह्यांचा कल्क व गोमूत्र ह्यामध्ये सिद्ध केलेल्या तेलाने त्याचे रोपन करावे.    


अपची मर्मावर नसल्यास व न पिकलेली गाठ असल्यास, ती काढून टाकून त्या ठिकाणी डाग द्यावा अथवा शस्त्राला क्षार लावून तो लावावा, नंतर सर्व घाण निघूण गेल्यावर तीळ व ज्येष्ठमध ह्यांच्या कल्कात तूप घालून त्याचा लेप त्या ठिकाणी करावा. त्याने जखम लवकर भरून येते. याशिवाय शस्त्रकारांनी स्थानांतराची चिकित्सा सांगितली आहे. पायाच्या मागच्या बाजूच्या टाचेपासून बारा अंगुळे व इंद्रबस्ती नावाचे मर्म सोडून त्याच्या बाजूला अडीच अंगुळावर सरळ वेध करावा आणि त्यातून माशाच्या अंड्यासारखी असलेली मेदाची जाळी शस्त्रक्रिया करून काढून त्या ठिकाणी डाग द्यावा म्हणजे अपची विकार लवकर बरा होतो. कित्येकांचे असे म्हणणे आहे की, घोट्याच्या टोकापासून वर इंद्रबस्तिमर्माच्यापासून अडीच अंगुळे सोडून नाकाच्या दांडीप्रमाणे सरळ असा वेध करावा अथवा मनगटाच्या वरच्या भागात एकेक बोटाच्या अंतराने शस्त्राने अपची बर्याप होण्याकरिता तीन रेषा पाडाव्यात. आहारात नेहमी सातू व मूग विशेषत्वाने सेवन करावेत.    

सर्व अर्बुदांवर दोषादिकांचा विचार करून ग्रंथीप्रमाणेच चिकित्सा करावी. वातज अर्बुदातून रक्त काढावे व वातनाशक अशा औषधांचे काढे, दूध व आंबट फळांचे रस यांच्या योगाने तेल, तूप वसा असा त्रिवृत स्नेह सिद्ध करून पिण्यास द्यावा. कफज अर्बुदावर प्रथम वमन, विरेचन देऊन रोग्याचे संशोधन करून नंतर कफज अर्बुदातून रक्त काढावे व नंतर क्षार लावावा. हुलगे, तिळाची पेंड अशा कफघ्न द्रव्यांमध्ये मांस व दह्याची निवळ घालून त्यांचा लेप करावा व नंतर अग्निकर्म करावे. पित्तज अर्बुदातून रक्त काढावे. ज्येष्ठमध सिद्ध तूप पिण्यास द्यावे. मेदज अर्बुदाला प्रथम शेकून नंतर फोडावे व नंतर त्यातील सर्व दोष काढून टाकून ते लगेच शिवावे व नंतर हळद, लोध्र, मनशीळ ही द्रव्ये मधात चांगली खलून त्यांचा लेप करावा व वरून त्याचे शोधन व्हावे म्हणून करंज तेल लावावे. जीर्ण अर्बुदावर जळवा लावून रक्त काढावे किंवा रुईचे पान कांजीत वाटून ती चटणी अर्बुदावर बांधावी म्हणजे अर्बुद कायमचे नष्ट होते.    

वृषणवृद्धी : (अंडवृद्धी). वृषण मोठे होणे. मेदोज विकारांपैकी हा एक विकार आहे. ही वृद्धी सात प्रकारची आहे. वातज – पित्तज – कफज – रक्तज – मेदोज – मूत्रज आणि आंत्रज. प्रकुपित झालेला वायू वंक्षण व अंडकोश यांच्या सांध्यामध्ये संचार करणाऱ्या धमनींवर आक्रमण करून अंडकोशाच्या ठिकाणी सूज आणि ठणका उत्पन्न करतो. [→ अंडवृद्धी].

वातज अंडवृद्धीच्या बाबतीत रोग्याला प्रथम मिश्रक तूप पिण्यास देऊन कोठा स्निग्ध झाल्यावर विरेचन द्यावे, नंतर मलरेचक बस्ती द्यावा व वातनाशक औषधांचा लेप करावा. ती जर पिकू लागली असता, तिला पिकवून शिवण सोडून शस्त्रकर्म करावे व नंतर शोधन रोपणादी उपचार करावेत. पित्तजन्य अंडवृद्धी पिकली असेल, तर फोडून दोष बाहेर काढून तूप व मध लावून तिचे शोधन करावे. शोधन झाल्यावर व्रणरोपक तेल लावावे. रक्तजन्य अंडवृद्धीवर जळवा लावून रक्त काढावे. कफजन्य अंडवृद्धीची सूज पिकली असेल, तर ती फोडून दोष काढून जाई, बिब्बे, अंकोलाचे बी व सातवीण यांनी सिद्ध केलेल्या शोधन तेलाने व्रणाचे रोपण करावे. मेदोजन्य वृद्धीवर सुरसादी गणातील औषधांच्या कल्काचा लेप करावा किंवा स्वेदन करून पट्टा बांधून रुग्णाला धीर देऊन अंडकोशाचा व शिवणीचा भाग सोडून वृद्धीपत्राने छेद घेऊन त्यातील सर्व मेद काढून टाकावा व त्या ठिकाणी हिराकस व सैंधव मधातून व्रणावर लावावे व व्रण शिवावा. नंतर मनशीळ, हरताळ, पंचलवण व बिब्बे यांचे एकत्र केलेले तेल जखम भरून येण्यासाठी लावावे. मूत्रज अंडवृद्धीचे स्नेहन व स्वेदन करून वस्त्राने पट्ट बांधून शिवणीच्या एका बाजूला खालच्या भागी व्रीहीमुख शस्त्राने वेध करावा. नंतर दोन्ही टोके मोकळी असलेली नळी त्या ठिकाणी घालून मूत्र काढून घ्यावे व व्रणशुद्धिकारक औषध लावून स्थगिका बंध बांधून पट्टी बांधावी. व्रण शुद्ध झाल्यावर व्रण भरून आणणारी औषधे लावावीत.

आंत्रजवृद्धीमध्ये जोपर्यंत आतडे अंडकोशात उतरत नाही तोपर्यंत त्यावर शस्त्रक्रिया करून नये. ज्या बाजूला आंत्रवृद्धी असेल, त्याच्या उलट बाजूला आंगठ्याच्या वर दोरासारखा जो पिवळा स्नायू आहे, तो अर्धचंद्राकार वाकलेल्या सुईने वर उचलून तिरकस छेद घेऊन त्यावर डाग द्यावा अथवा करंगळीशेजारचे बोट, अनामिकेच्या वरच्या स्नायू डागावा असेही काही जणांचे मत आहे. ही आंत्रवृद्धी जोपर्यंत वंक्षण संधीमध्ये आहे, तोपर्यंत तिचा मार्ग बंद करण्याकरिता तिला अर्धचंद्राकृती टोकाच्या सळईने डाग द्यावा.

श्लीपद : [→ हत्ती रोग ]. पाय इत्यादींवर सूज असलेला विकार. कफप्रधान दोष जांघेत किंवा पायातील मांस व रक्ताची दुष्टी करून त्यात हळूहळू घट्ट अशी सूज उत्पन्न करतात. क्वचित प्रसंगी हात – कान – डोळे – नाक – ओठ यांवरही हा रोग होतो.

श्लीपद हा विकार प्राधान्याने रक्ताचा असल्यामुळे रक्तसृती करणे आवश्यक आहे. वातजन्य श्लीपदावर स्नेहन व स्वेदन करून घोट्याच्या वरच्या बाजूस चार अंगुळावर शीर तोडून रक्तस्राव करावा. ह्याने बरे वाटले नाही, तर विधियुक्त अग्नीने डाग द्यावा. पित्तजन्य श्लीपदामध्ये घोटाच्या खालील शीर तोडावी आणि पित्तनाशक पण कफ न वाढविणारे उपचार करावेत. कफजन्य श्लीपदावर अंगठ्याजवळ क्षिप्र मर्माच्या वर चार अंगुळावर शीर तोडून रक्तस्राव करावा व हिरडा क्रमाक्रमाने एक एक वाढवत नेऊन सात दिवस द्यावा. कुकटी, गुळवेल, सुंठ, वावडिंग, देवदार व मोहरी, रिंगणीचे मूळ व चित्रक किंवा धमाशाचा लेप करावा. शास्त्रात सांगितलेल्या अष्टविध मूत्रांपैकी एका मूत्रातून हिरड्याची चटणी रुग्णास खाण्यास द्यावी. वावडिंग, मिरे, रुईचे मूळ, सुंठ व चित्रकमूळ ह्यांच्या कल्काने किंवा देवदार व काळाबोळ व पंचलवणे घालून सिद्ध केलेले तेल प्यावे. सतत सातूचे सेवन करावे अथवा कोणतेही स्लीपद बरे होण्याकरिता मोहरीचे तेल प्यावे. 

क्षुद्ररोग : ज्या रोगाने दोष सर्व शरीरव्यापी नसतात, कारणे व लक्षणे थोडी असतात आणि चिकित्साही थोडक्यात केलेली आहे, अशा रोगांना ‘क्षुद्ररोग’ असे म्हणतात. रोग ज्या अंगात होतो, त्याचे नाव त्याला दिले जाते उदा., नखभेद, शंखभेद, अंतर्दाह. तसेच व्याधीच्या स्वरूपानुसार त्याला नाव दिले जाते उदा., वल्मिक, कुनख इत्यादी. सुश्रुताचार्यांनी ४४ क्षुद्ररोग वर्णन केले आहेत. रुग्णास जळवा लावून रक्तसृती करणे, लेप करणे, शेकणे व छोटे शस्त्रकर्म, अग्निकर्म वा क्षारकर्म चिकित्सा करावी लागते. म्हणून शल्यतंत्राच्या दृष्टीने क्षुद्ररोगांना महत्त्व आहे.

अजगल्लिका : विशेषत:लहान मुलांमध्ये कफवाताच्या दुष्टीने स्निग्ध, त्वचेच्या वर्णाच्या कठीण व फारशा न दुखवणाऱ्या अशा गाठी होतात, त्यांना ‘अजगल्लिका’ म्हणतात. या गाठी पिकलेल्या नसतानाच त्यांना जळवा लावून रक्त काढावे व नदीतील शिंपा, सज्जीक्षार, यवक्षार यांचा त्यावर लेप करावा किंवा आधी लेप करून त्याने त्या न बसल्यास त्यावर जळवा लावाव्यात.    

इंद्रलुप्त : (चाई). रोमकूपाच्या ठिकाणी असणारे पित्त वायूसह प्रकुपित होऊन त्या त्या ठिकाणचे केस नाहीसे करते व नंतर त्या स्थानी प्रकुपित झालेला कफ रक्तासह त्या रोमकूपांची तोंडे बंद करतो. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरे केस येत नाहीत. या रोग्यास स्निग्ध करून व शेकून त्याच्या मस्तकाच्या शिरेतून दूषित रक्ताचा स्राव करावा मिरे, मनशीळ, हिराकतस व मोरचूद यांच्या मलमांचा लेप करावा अथवा तगर व देवदार ह्यांच्या कल्कांचा लेप करावा. अथवा खोल फासण्या टाकून गुंजांचा वरचेवर लेप करावा किंवा एखादा रसायन प्रयोग करावा.

अरुंषिका : (खवडे). कफ, रक्त व कृमी ह्यांच्या प्रकोपाने ज्यांना बारीक बारीक पुष्कळ छिद्रे आहेत, असे व्रण डोक्यावर होतात. त्यातून लस वाहते. हा विकार झाला असता त्यातून जळवा लावून रक्त काढून कडुनिंबाच्या पाल्याचे पाणी शिंपडावे. नंतर घोड्याच्या लिदीचा रस काढून त्यात सैंधव घालून त्याचा लेप करावा. या उपचारांनी बरे वाटले नाही, तर त्याच्या जोडीला वमनादी शोधन करावे. [→ कवकसंसर्ग रोग].    


दारुणक : (दारणा). कफवाताच्या योगाने मस्तकावरील केसांची जागा कठीण व रुक्ष होऊन चिरा पडतात, खाज येते. या रोगावर प्रथम तेल लावून व घाम काढून मस्तकाच्या शिरेतून रक्तस्राव करून नाकामध्ये अणुतेल घालावे. शिरोबस्ती द्यावा व मस्तकास तेल लावावे.    

 

चिप्प : (नखुर्डे). नखाच्या मांसाच्या ठिकाणी पित्त व वात दोष संचित होऊन वातामुळॆ वेदना आणि पित्तामुळे दाह व पाक ही लक्षणे उत्पन्न होतात. चिप्पावर ऊन पाणी शिंपून ते पिकले म्हणजे त्यातील पिकलेले मांस काढून टाकावे व त्यावर घाण्यातील ताजे तेल ऊन करून घालून त्यावर राळेचे चूर्ण दडपावे व पट्टी बांधावी. मांस काढून टाकणे शक्य नसल्यास त्यावर अग्नीने डाग द्यावा.    

पाददारी : जास्त चालणाऱ्या मनुष्याच्या पायाच्या ठिकाणी वात वाढून रुक्षता येते व तळपायाला भेगा पडतात त्याला ‘पाददारी’ म्हणतात. त्यावर प्रथम तेल लावून पोटिसाने शेकून नंतर शिरेतून रक्तस्राव करावा. नंतर मेण, चरबी, मज्जा, राळेचे चूर्ण, तूप, जवखार, सोनकाव ह्यांचे मलम करून तळपायावर लेप करावा.    

कदर : (कुरूप). बारीक खडा अथवा काटा पायात रुतून राहिला असता त्या ठिकाणी मेद व रक्त यांसह वातादी दोष त्या काट्यासह कठीण, मध्यमागी खोल किंवा उंच अशी बोराएवढी वेदनायुक्त व स्रवणारी गाठ उत्पन्न करतात, तिला ‘कदर’ असे म्हणतात. ते खरवडून त्याच्यावर बिब्ब्याच्या तेलाने डाग द्यावा. [→ कुरूप].    

 

तिलकालक : वात, पित्त, कफ ह्यांनी रक्ताचे शोषण केल्यामुळे तिळाएवढे सूक्ष्म, काळे, वेदनारहित ठिपके त्वचेवर उठतात त्यांना ‘तिलकालक-तीळ’ म्हणतात. वेदनारहित, कठीण, उडदाप्रमाणे काळे व किंचित उंच असे चकते वातापासून उत्पन्न होतात, त्याला ‘मशक’ म्हणतात. मशक व तिलकालक हे खरवडून काढून त्यावर क्षाराने किंवा अग्नीने डाग द्यावा.

व्यंग : (वांग). क्रोध व श्रम यांच्या योगाने प्रकुपित झालेला वायू पित्तासह चेहऱ्याच्या त्वचेवर पातळ, काळसर असे मंडल उत्पन्न करतो, त्याला व्यंग असे म्हणतात. न्यच्छ, वांग आणि नीलिका या रोगांवर ते ज्या ठिकाणी असतील, तेथे जवळच्या शिरेतून रक्त काढावे किंवा जळवा लावून रक्त काढावे. ते खरवडून टाकून वड, उंबर वैगैरे क्षीरी वृक्षाच्या साली त्यांच्याच चिकात वाटून त्यांचा लेप करावा.    

शर्करार्बुद : कफ, मेद व वायू हे मांस, शिरा व स्नायू ह्यांचा आश्रय घेऊन एक गाठ उत्पन्न करतात. प्रथम शेकून नंतर पूर्णपणे फोडावे व त्यातील सर्व दोष काढून टाकून ते ताबडतोब शिवावे. नंतर हळद, लोध्र, पतंग व मनशीळ ही औषधे मधात खलून त्याच्या त्यावर लेप लावावा व त्याचे शोधन होण्याकरिता त्यावर करंज तेल लावावे.

शुक्रदोष : लिंग जाड किंवा लांब करणाऱ्या औषधांचा अतिउपयोग किंवा दुरुपयोग केल्याने होणारा रोग [→ शुकरोग]. शुकदोष हे अठरा प्रकारचे आहेत.    

चिकित्सा : शुकदोषातील अष्ठिलिका नावाच्या पुटकुळीला ती बरी होईपर्यंत पुन:पुन्हा जळवा लावून रक्त काढावे. कुंभिका नावाची पुटकुळी पिकली असता शस्त्राने फोडून तिचे व्रणाप्रमाणे शोधन व रोपण करावे. रोपणाकरिता त्रिफळा, लोध, टेंभुर्णीचे फळे व अंबाड्याची फळे यांनी सिद्ध केलेले तेल द्यावे. संमूढ पिटिकेला जळवा लावून त्वरित रक्त काढावे व ती पिकली असल्यास शस्त्राने फोडून पू वैगैरे काढून टाकून तिच्यावर तूप व मधाचा लेप करावा. शुकलेपाने रक्त दूषित झाले असता इंद्रियाच्या त्वचेला स्पर्श कळत नाही, त्या विकाराला ‘स्पर्शहानी’ म्हणतात. या विकारामध्ये रक्त काढून काकोल्यादी गणातील मधुर औषधांचा लेप करावा आणि थंड दूध, उसाचा रस व तूप त्यावर शिंपावे. रक्तजन्य अर्बुदावर आवश्यक ठरल्यास जळवा लावून रक्त काढावे.

निरुद्धप्रकाश : हा शिश्नाचा रोग आहे. यात प्रकुपित झालेल्या वाताने शिश्नमण्यावरील कातडी मागे न सरकता मण्यावरच राहते. त्यामुळॆ मूत्राचा मार्ग अडविला जातो व मूत्राची धार मंद होते. यात इतर उपचार विफल झाल्यास शिवण सोडून शस्त्राने मण्यावरील त्वचाच कापावी व व्रणाप्रमाणे उपचार करावेत.    

चिकित्सा : निरुद्धप्रकाशावर लोखंडाची, लाकडाची अथवा दोन्ही तोंडे असलेली बोथट नळी तूप लावून शिश्नात घालावी व त्यावर डुक्कर व सुसर यांची वसा व मज्जा कोमट करून शिंपडावी, त्याचप्रमाणे घाण्यातून काढलेले ताजे ऊन ऊन तेल वातनाशक द्रव्यांनी सिद्ध करून तेही लावावे. तीन तीन दिवसांनी ती नळी बदलून त्यापेक्षा जाड नळी शिश्नात घालीत जावी व मूत्रमार्ग रुंद करावा.

शालाक्यतंत्र

शालाक्यतंत्र हेही आयुर्वेदाचे एक अंग आहे. यात शलाका म्हणजे सळईच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या उपचारांचा समावेश होतो. असे काही रोग असतात की, त्यामध्ये प्राधान्याने बारीक व लांब सळईच्या आकाराप्रमाणे असलेली यंत्रे व शस्त्रे यांचा उपयोग करून चिकित्सा केली जाते. प्राय: शरीराच्या ऊर्ध्वजत्रुगत अवयवात म्हणजे मान व डोके यांमधील कान, नाक, डोळे, तोंड या अवयवांच्या ठिकाणी ज्या व्याधी होतात, त्यामध्ये यंत्रशस्त्ररूपाने सळईच्या द्वारे उपचार करावे लागतात. त्यांची समग्र माहिती शालाक्यतंत्रात आहे. विदेह देशाचे अधिपती राजे निमी हे ह्या तंत्राचे प्रणेते आहेत.    

मुखरोग : मुख हे बोधक कफाचे स्थान आहे. गोड व आंबट रसाचे पदार्थ तसेच दात न धुणे, पालथे झोपणे, धूम्रपान करणे व गुळण्या न करणे इ. गोष्टी मुखरोगांना कारणीभूत होतात. ओष्ठगत ८, दात व हिरड्यांचे २३, जिभेचे ५, तालूचे ९, कंठाचे (गळ्याचे) १७ व तोंडाचे ३ असे सर्व मिळून ६५ मुखरोग आहेत. मुखरोगामध्ये कफ व रक्तप्रधान दोषांची दुष्टी होत असल्याने रक्त काढणे ही प्रमुख चिकित्सा आहे.    

ओष्ठरोग : ओठाच्या ठिकाणी वातदोषाचा प्रकोप झाला असता, ओठांवर चिरा पडतात. वातज ओष्ठप्रकोपात पित्तज विद्रधीप्रमाणे थंड परिषेक, लेप, वमन, विरेचन, रक्त काढणे हे उपक्रम करावेत. जळवा लावून रक्तमोक्षण करावे. गुळवेल, ज्येष्ठमध, पतंग सिद्ध तूप लावावे. कडू रसाचे पदार्थ, मांसरस ह्यांचे सेवन करावे. कफज ओष्ठप्रकोपावर कफनाशक द्रवांचे धूम्रपान, शेकणे आदी उपक्रम करावेत. जळवा लावून किंवा फासण्या मारून रक्तविस्त्रावण करावे. त्यानंतर बिडलोण, जवखार, सज्जीखार, सुंठ, मिरे, पिंपळी मिसळून लेप करावा. कफनाशक द्रव्यांनी गुळण्या कराव्या. शिरोकिरेचन द्रव्याचे (श्वासकुठार रस, शिरीष, बीज) नस्य करावे. मांसज ओष्ठप्रकोप हा असाध्य व्याधी आहे. प्रथम शस्त्रकर्माद्वारे दूषित मांस काढून व्रणाचे शोधन व पूरण करावे. मेदोज ओष्ठप्रकोप म्हणजे ओठाच्या ठिकाणी मेदाची दुष्टी झाली असता पोटिसाने प्रथम शेकून वृद्धिपत्र शस्त्राने भेदन करावे व आतील मेद काढून टाकावा. त्यानंतर डाग द्यावा. त्यानंतर गव्हाला, त्रिफळा, लोध्र यांचे चूर्ण मधातून लावावे. जखम भरून येण्याकरिता आवश्यकतेनुसार सीवनकर्म करावे.    


खंडौष्ठ म्हणजे वायूचे ओठाचे दोन भाग झाले असता, ते एकमेकांजवळ आणून शिवावे. ओठांच्या सीवनानंतर सद्योव्रणाप्रमाणे चिकित्सा करावी. शतधौत तुपाचा लेप करावा. तालू फाटलेला असल्यास त्याचे सीवनकर्म करावे [→ खंडौष्ठ]. ओठावर आघात झाल्याने किंवा ओठ चावण्याची सवय असल्यास वात व कफ दुष्टी होऊन जलार्बुद होतो. जलार्बुदावर छेद घेऊन त्यातील संचित द्रव्य काढून टाकावे. जलार्बुद फार खोल वाढला असल्यास क्षारकर्म किंवा अग्निकर्म करावे. जलार्बुद पूर्णपणे काढून त्या जागेचे सीवनकर्म करावे. त्यानंतर हळद, लोध्र, ज्येष्ठमध, जाई व तगर ह्या द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल लावावे. रक्तार्बुद म्हणजे ओठाच्या ठिकाणी रक्ताचा क्षोभ झाल्यामुळे पुटकुळ्या निर्माण होतात. त्यांस जळवा लावून रक्तस्राव करू नये. लोध्र, राळ, ज्येष्ठमध व मध यांचा लेप करावा.

दंतमूळगत रोग : दातांच्या मुळाशी होणारे रोग पंधरा आहेत. ‘शीताद’ म्हणजे हिरड्यांतून अकस्मात रक्त येणे आणि दुर्गंधीयुक्त काळसर कुजके व मऊ असे मांस त्या हिरडीलाही पिकवते. ह्या रोगाला जळवा लावून रक्त काढावे. गव्हला, नागरमोथा, त्रिफळा यांचे चूर्ण तूप व मध यांतून हिरडीला लावावे. दंतपुप्पुट या रोगाला दोन किंवा तीन दातांच्या मुळाशी कफ व रक्त यांच्या दुष्टीने बोराच्या बीसारखी घट्ट व तीव्र वेदना असलेली सूज येते व ती लगेच पिकते. यात सूज पिकलेली नसतानाच जळवा लावून रक्त काढावे. नंतर सैंधवादि पंचलवणे व कवखार ह्यांचे चूर्ण मधात कालवून चोळावे. मध, त्रिफळा व निळेकमळ ह्यांनी सिद्ध केलेल्या तेलाने नस्य करावे. दंतवेष्टक ह्या रोगामध्ये हिरड्यांचा दाह होऊन त्या पिकतात आणि त्यातून पू व रक्त येऊन दात लवकर हलू लागतात. यात प्रथम जळवा लावून रक्त काढावे व हिरडीला लोध्र, ज्येष्ठमध व लाख ह्यांचे चूर्ण मधातून लावावे. तीळ तेलाने सकाळ-संध्याकाळ गुळण्या कराव्यात. सौषिर या रोगामध्ये कफ व रक्तदोषाने दातांच्या मुळाशी वेदनायुक्त अशी सूज येते. तिला खाज असते व तोंडातून लाळ गळते. यात दाताच्या मुळाशी जळवा लावून रक्त काढावे व लोध्र, नागरमोथे, रसांजन ह्यांचा मधातून लेप करावा आणि वड, पिंपळ वैगैरे क्षीरीवृक्षांच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात. महासौषिर या विकारात दात हिरड्यांपासून सुटतात. त्यांना भेगा पडतात. दातांच्या हिरड्यांचे मांस पिकते. सर्व तोंड दुखते. यात दाताच्या मुळाशी जळवा लावून रक्त काढावे. त्रिफळा, वड, पिंपळ वगैरे क्षीरीवृक्षाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात व नंतर हिरड्यांना जात्यादि तेल चोळून लावावे. वैदर्भ या रोगात दातांच्या मुळाशी घासल्याने मोठी सूज येते व दात हालू लागतात. हा व्याधी हिरड्यांवर आघात झाल्याने होतो. यावर शस्त्राने दातांच्या मुळांतील दोष काढून टाकावे. नंतर क्षार लावावा व नंतर सर्व शीत उपचार करावेत. वर्धन या विकारात वातदोषामुळे दातावर दात उत्पन्न होतात. वर आलेला दात उपटून टाकून त्या ठिकाणी अग्नीने डाग द्यावा व कृमिदंताप्रमाणे सर्व उपाय करावेत. अधिमांसक या विकारात शेवटच्या दाढेच्या ठिकाणी अतिशय वेदनायुक्त अशी मोठी सूज येते त्यामुळॆ लाळ गळते आणि हनुसंधी व कानात वेदना उत्पन्न होतात. खातानाही फारच वेदना उत्पन्न होते. यावर वमन देऊन किंवा लंघन करण्यास सांगून अधिमांसक कापून काढावे. शिरोविरेचन करावे व त्यावर वेखंड, पहाडमूळ, जवखार, पिंपळी यांचे चूर्ण मधात कालवून ते लावावे आणि त्रिफळा व कडूनिंबाच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. नाडीव्रणात दातांच्या मुळाशी खोलवर अशी नलिकेप्रमाणे मार्ग असलेली जखम उत्पन्न होते. ज्या दाताला नाडीव्रण झाला आहे, तो दात काढावा. नाडीव्रण खोल असेल, तर सर्व कुजलेले मांस काढून टाकून क्षाराने किंवा अग्नीने डाग द्यावा. नाडीव्रण झालेल्या दाताची उपेक्षा केली, तर त्याची गती हनुवटीच्या हाडात शिरून त्या हाडाला फोडते. त्यासाठी मग तो जर वरचा दात नसेल, तर मुळासकट काढून टाकून हाडाचा दूषित झालेला थोडा भागही काढून टाकावा व ज्येष्ठमध, लोध्र, मंजिष्ठ व खैर या कल्काने सिद्ध केलेले तेल लावावे.    

दंतरोग : दातांचे आठ रोग आहेत. दालन, दंतहर्ष, भंजनक, कृमिदंत, दंतशर्करा व कपालिका, श्यावदंत, सुषिर, हनुमोक्ष. श्यावदंत या रोगात रक्तमिश्रित पित्तदोषाने सर्व दात विस्तवाने भाजल्यासारखे काळे पडतात किंवा निळे होतात. यात प्रथम जळवा लावून रक्त काढावे व कोमट अशा तेलाने व तूप एकत्र करून त्याने गुळण्या कराव्यात. सुषिर नावाच्या दंतरोगावर हलणारा दात काढून त्या ठिकाणी अग्नीने (सळईने) वगैरे डाग द्यावा. नंतर भुईकोहळा, ज्येष्ठमध, शिंगाडे व कचोरा ह्या औषधांचा कल्क व तेलाच्या दसपट दूध घालून सिद्ध करावे. ते ह्या विकारात नाकात घालण्यास हितकारक आहे. कृमिदंत या रोगात दंत व दंतमुळांना आश्रित करून वातप्रधान दोष दंतमज्जेचे शोषण करतात. त्यामुळे दातांच्या मध्यभागी मोक पडते. त्यातून पू व रक्तस्राव होतो. सूक्ष्मकृमीदेखील उत्पन्न होतात. सातवण, रुई यांचा चीक दाढेत भरला असता, वेदना थांबतात व कृमी नष्ट होतात. गरम हिंग पोकळ दातामध्ये भरल्यासही वेदना कमी होतात. यानेही विकार न थांबल्यास पोकळ असलेला दात गुळाने किंवा मेणाने भरून त्यावर तापलेल्या लाल सळईने डाग द्यावा.    

वेदनामुक्त दंतोत्पाटन : कोणतेही वेदनानाशक न वापरता आयुर्वेदीय परंपरेतील दंतोत्पाटन कलेने वेदनारहित दंतोत्पाटन करता येते. दोन राजदंतांच्या (समोरच्या मधल्या दातांच्या) मधील अंतराच्या माध्यमातून घशाकडे जाणारी रेषा कल्पावी. खालच्या राजदंतामधून जाणारी रेषा जिभेवरून व वरच्या राजदंतांमधून जाणारी रेषा टाळूच्या पृष्ठभागावरून जाईल. या रेषांवर निरनिराळे मध्यबिंदू घेऊन वर्तुळे कल्पावी. खालचे राजदंत काढताना हे दात ज्या वर्तुळाच्या परिघावर येतील, ते वर्तुळ कल्पावे. त्या वर्तुळाच्या वरील रेषेवरील मध्यबिंदूतून ह्या प्रत्येक दाताच्या मध्यरेषेवरून बाहेर जाणारी त्रिज्या कल्पावी. चिमट्याने खालचा दात पकडून त्या बाह्यगामी त्रिज्येच्या दिशेनेच झटका द्यावा. झटका देताना दात वर उपटण्याची गती ही थोडी असावी. दात उपटून आडवा करण्याची क्रिया असावी. मुठीची गती परिघासारखी होते. त्या परिघाचा मध्य दाताचे मूळ आणि त्रिज्या दात-चिमटा व मूळ मिळून होते. दात उपटल्यानंतर तोही चिमट्याच्या टोकाबरोबर वरच्या दिशेने एका परिघातच फिरतो. मूळ खाली जाते व दात वर जातो.    

पहिल्या वर्तुळाच्या त्याच व्यासावर मध्यबिंदूच्या मागे पुन्हा एक मध्यबिंदू कल्पून दोन्ही बाजूंच्या वस्त (राजदंताच्या शेजारच्या) दातावरून ज्याचा परीघ जाईल, ते वर्तुळ कल्पून, मध्यबिंदूपासून त्या दातापर्यंत येणारी त्रिज्या ज्या दिशेत दाताच्या बाहेर जाईल, त्या दिशेने दात काढावयाचा असतो. अशा रीतीने सर्व दातांची मागे मागे जाणारी वर्तुळे कल्पून त्याच्या त्रिज्यांच्या बाहेरच्या दिशेने ते दात काढावेत म्हणजे वेदना होणार नाहीत. वरचे दात असेच काढावेत. या पद्धतीचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत : (१) दात काढताना वेदना मुळीच होत नाहीत. दात निघाल्याचे कळतही नाही. (२) सशूल दात काढला, तरी वेदना ताबडतोब थांबतात व नंतरही वेदना होत नाहीत. (३) रक्त फारच कमी जाते. (४) मारक पांडुरोग, मधुमेह अशा रोगांत आधुनिक दंतवैद्य दात काढत नाहीत. पण या रोगातही या पद्धतीने दात काढल्याने यत्किंचितही नुकसान न होता उलट फायदाच झाल्याचे आढळले आहे.


जिव्हारोग : वातादी दोषांचे तीन प्रकारचे जिव्हाकंटक (१) वातज, (२) पित्तज, (३) कफज असून ह्याशिवाय (४) अलस, (५) उपजिव्हा असे पाच जिव्हारोग सुश्रुताचार्यांनी वर्णन केले आहेत.

वातज जिव्हारोगामध्ये वातदोषाने जिभेला चिरा पडतात. तिला स्पर्श कळत नाही व ती सागाच्या पानासारखी खरखरीत होते. यात तेलतुपादी चार प्रकारचे स्नेह व मीठ मिश्रण करून जिभेला चोळावे आणि फुंकणी तापवून त्याने शेकावे. पित्तज जिव्हारोगामध्ये पित्तदोषाने जीभ पिवळी होते व तिचा दाह होतो आणि तिच्यावर आरक्तवर्णाने काटे उत्पन्न होतात. यात सागवानाच्या पानांनी जीभ घासून रक्त काढून टाकावे व नंतर काकोल्यादी गणातील औषधांचे चूर्ण, काढा व सिद्ध केलेले तूप उपयोगात आणावे. कफज जिव्हारोगात कफदोषाने जीभ जाड व जड होते आणि तिच्यावर शेवरीच्या काट्यांसारखे अंकुर येतात. यात जिभेवरील काटे खरवडून त्यामधील खराब रक्त काढून नंतर पिप्प्ल्यादी गणातील औषधांचे चूर्ण मधातून जीभेवर चोळावे. अलस रोगात जिभेच्या खालच्या बाजूस कफ व रक्त दुष्टीमुळे सूज उत्पन्न होते. यात कफज जिव्हारोगाप्रमाणे चिकित्सा करावी. वाग्भटाने यामध्ये शस्त्रकर्म करू नये असे सांगितले आहे. हा नवा रोग असेल, तर लोहरी, सूंठ, मिरी, पिंपळी इ. चूर्णांनी जीभ घासावी व गुळण्या कराव्यात.    

उपजीव्हा रोगात जिभेच्या खालच्या बाजूला जिभेच्या टोकासारखी सूज येते. या शोथाचे लहान शस्त्राने किंवा सागवानाच्या खरखरीत पानाने लेखन करावे. उपजीव्हा मोठ्या आकाराची असेल, तर बडिश यंत्राने पकडून मंडलाग्र शस्त्राने तिचे छेदन करीत असताना तिचा थोडा भाग शिल्लक ठेवावा. अन्यथा अत्यधिक रक्तस्राव होऊन मृत्यू येण्याचा धोका असतो. उपजीव्हा हा व्याधी सुश्रुत यांनी असाध्य सांगितला आहे.

तालुगत रोग : सुश्रुताचार्यांनी नऊ व वाग्भट यांनी आठ तालुरोग वर्णन केलेले आहेत. गलशुंडिका या व्याधीत टाळूच्या मुळाशी कफ व रक्त यांच्या प्रकोपामुळे वायूने भरलेल्या पिशवीप्रमाणे लांबट दिसणारी अशी मोठी सूज उत्पन्न होते. ह्यामुळे तहान, खोकला, श्वास व कंठोपरोध अशी लक्षणे उत्पन्न होतात. खाल्लेला आहार नाकावाटे बाहेर येतो. यास ‘पडजीभ वाढणे’ असेही म्हणतात. गुळण्या, नस्य इ. उपचारांनी हा विकार बरा झाला नाही, तर पडजीभ धरून पुढे ओढून मंडलाग्र शस्त्राने तिचे छेदन करावे. गलशुंडीचा फक्त एकतृतीयांश भाग कापावा. जास्त कापल्यास रक्तस्राव अधिक होतो व रक्तस्राव थांबिविणे अशक्य झाल्याने रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. गलशुंडिका प्रमाणापेक्षा कमी कापल्यास सूज, लाळ गळणे, झोप, ग्लानी व डोळ्यापुढे अंधारी येणे अशी लक्षणे निर्माण होतात. छेदनानंतर मिरे, अतिविष, पहाडमूळ, वेखंड ही द्रव्ये मधात कालवून ती जिभेला चोळावी. वेखंड, अतिविष, पहाडमूळ, रास्ना, कुकटी, निंब ह्यांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मालकांगोणी, दंती, त्रिवृत व देवदार यांची वात तयार करून धुम्रपान करावे. हे कफघ्न आहे. अनुभूत चिकित्सेत हळद व तुरटी २ : १ भाग घेऊन ती मधातून गलशुंडीवर चोळावी.    

तुंडीकेरी या रोगात टाळूच्या ठिकाणी कफ व रक्त दुष्टीमुळे कपाशीच्या बोंडाच्या आकाराची खूप मोठी सूज येते. ह्याची चिकित्सा गलशुंडिकेप्रमाणे करावी.    

अघ्रुष या विकारात टाळूच्या ठिकाणी रक्तदुष्टीमुळे लाल व कठीण सूज उत्पन्न होते. त्या सूजेमुळे वेदना होतात व ताप येतो. गलशुंडिकेप्रमाणेच छेदन व इतर चिकित्सा करावी. कच्छप किंवा कूर्म या रोगात टाळूमध्ये कासवाच्या पाठीच्या आकाराची वेदनारहित सूज केवळ कफदुष्टीने उत्पन्न होते. तिला लालीही नसते. गलशुंडिकेप्रमाणेच छेदन, गुळण्या करणे, धूम्रपान आदी चिकित्सा करावी. टाळूप्रदेशी रक्तदुष्टीमुळे कमळातील गुच्छासारखी सूज येते, त्यास ‘ताल्वर्बुद’ म्हणतात. अर्बुद नवीन असल्यास त्याचे छेदन करून जवखार व शुष्टी चूर्ण मधामध्ये कालवून लावावे.    

मांससंघात या रोगात कफामुळे टाळूच्या ठिकाणी मांसाची दुष्टी होते. त्यामुळे मांस एकत्र येऊन उत्सेध निर्माण होते. ह्या ठिकाणी वेदना नसतात. सुश्रुत यांनी ह्यामध्ये छेदन कर्म करावे असे म्हटले आहे.

तालुशोष या विकारात वात व पित्त प्रकोपामुळे टाळूला कोरड पडून त्याला भेगा पडतात व श्वास लागतो. यात रुग्णाला अम्लरसात्मक द्रव्याच्या काढ्यांनी गंडूष करवावे. दूध व तूप ह्यांचे नस्य व सिग्ध धूम्रपानाचा उपयोग करावा. आहारामध्ये सिग्ध मांसरस व तहान नाहीसे करणारे पदार्थ सेवन करावेत. तालुशोषावर वातनाशक व स्नेहन उपाय करावे.    

तालुपाक या विकारात पित्तदोषामुळे टाळू अतिशय पिकतो व त्यात तीव्र वेदना होते व पूवाचा स्राव हेही लक्षण असते. तालू पिकला असताना सोंगट्यांच्या पटाप्रमाणे (+) चिरून त्यात तीक्ष्ण व उष्ण औषधे मधात एकत्र कालवून ते लावावे आणि अडुळसा, कडूनिंब, पडवळ, कण्हेर, गुळवेल, कुकटी या कडू रसाच्या औषधांच्या काढ्यांनी गुळण्या कराव्यात.    

गळ्याचे रोग : पाच रोहिणी, कंठशालूक, अधिजिव्हा, वलय, बलास, एकवृंद, वृंद, शतघ्नी, गिलायू, गलविद्रधी, गलौद्य, स्वरघ्न, मांसतान व विदारी असे अठरा गलरोग आहेत.    

गलभाती वात, पित्त, कफ दोष प्रकुपित होऊन रक्ताची दुष्टी करून जिभेच्या मुळाशी सभोवार गळ्याच्या अवरोध करणारे मांसांकुर उत्पन्न करतात. ह्यास रोहिणी म्हणतात. रोहिणी हा त्वरित प्राणघातक रोग आहे. त्यामुळे गिळणे, श्वासोच्छवास या क्रियांस अवरोध होतो. रोहिणीमध्ये कंठावरोध झाल्याने अन्नवह व प्राणवह स्रोतसे बंद होतात. त्यामुळे श्वास घेताना त्रास होतो. स्रोतोरोध जास्त झाल्यास या क्रिया बंद होऊन मृत्यू होऊ शकतो. वातज रोहिणी या विकारात जिभेच्या आजूबाजूला वेदना असतात व मांसाचे अंकुर घशाचा मार्ग बंद करतात. यात जळवा लावून रक्तमोक्षण करावे. रोहिणीला आतून व बाहेरून शेकावे. अंगुळी शस्त्राने किंवा मध व सैंधव बोटाला लावून नखाने नीट थोडे खरवडून रक्त काढावे (लेखन) आणि त्यावर मीठ चोळावे. त्यानंतर कोमट तेलाने किंवा बृहतपंचमुळाच्या काढ्याने सिद्ध केलेल्या तेलाने गुळण्या कराव्यात. पित्तज रोहिणी या विकारात रोहिणीचे अंकुर फार लवकर उत्पन्न होऊन फार लवकर पिकतात आणि त्यामध्ये अतिशय दाह होतो व ताप येतो. ह्यामध्ये जळवा लावून रक्तमोक्षण करावे आणि लोध्र, गव्हला, रक्तचंदन ह्यामध्ये साखर, मध घालून ते लावावे. मनुका, त्रिफळा, लोध्र, कायफळ साल, ज्येष्ठमध ह्यांचे कल्क व दहापट दूध ह्यांनी सिद्ध केलेल्या तुपाने गुळण्या कराव्यात. कफजन्य रोहिणी या विकारात घशाचा अवरोध करणारी व उशिरा पिकणारी, मोठ्या व कठीण अंकुरांनी युक्त अशी रोहिणी असते. यामध्ये रक्तमोक्षण करून त्यानंतर सुंठ, मिरी, पिंपळी अशी तिखट द्रव्ये मधात घालून लावावी. आघाडा, गेळफळ, जाईचा पाला, वावडिंग, सैंधव यांनी सिद्ध केलेल्या तुपाने गुळण्या कराव्यात व नस्य करावे. रक्तज रोहिणी ही बारीक फोडांनी युक्त असून तिच्यामध्ये सर्व पित्तजन्य रोहिणीची लक्षणे असतात. म्हणून पित्तजन्य रोहिणीप्रमाणे चिकित्सा करावी.    


कंठशालूक या रोगात गळ्यामध्ये कफाच्या दुष्टीमुळे बोराच्या आकाराची एक गाठ उत्पन्न होते. या गाठीवर कुसळासारखे काटे असतात. तिची सावकाश वाढ होते. घशात काटे टोचल्याप्रमाणे वेदना होतात. यात रक्तमोक्षण करून गलशुंडिकेप्रमाणे शस्त्रकर्मादी उपचार करावे. अधिजिव्हा या विकारात कफरक्तदोषाने, जिभेच्या मुळाशी जिभेच्या शेंड्याप्रमाणे एक प्रकारची सूज येते. अधिजिव्हेवर उपजिव्हेप्रमाणे चिकित्सा करावी.    

एकवृंद या रोगात कफ व रक्त यांच्या दुष्टीने गळ्यात वाटोळी व उंच अशी सूज येते. ही सूज मऊ व न पिकणारी असते. यात प्रथम रक्तमोक्षण करावे आणि नंतर कफनाशक शोधन रोपणादी उपचार करावेत.    

वृंद म्हणजे गळ्याच्या डाव्या व उजव्या बाजूस उंच वाढलेली अशी सूज येणे. ही सूज पित्त व रक्त प्रकोपामुळे उत्पन्न होते. यात रक्तमोक्षण करून नंतर पित्तशामक उपचार करावेत.    

गिलायू या रोगात कफ व रक्त दोषांनी घशामध्ये आवळ्याच्या बीच्या आकाराची कठीण व वेदनायुक्त अशा गाठी उत्पन्न होतात. ह्या गाठी फार सावकाश वाढतात. जिभेच्या मुळाशी दोन्ही बाजूंना या गाठी असतात. या गाठींचे मूळ मोठे असून त्या जास्त वाढल्यास एकमेकांजवळ येतात. अशा वेळी श्वास घेताना व अन्न गिळताना त्रास होतो. सुश्रुत यांनी गिलायूवर औषधी चिकित्सा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे.    

सर्व गळ्याला व्यापून असणाऱ्या तिन्ही दोषात्मक सुजेला ‘गलविद्रधी’ म्हणतात. यात रक्तमोक्षण करावे. नंतर लोध्र, रसांजन, रक्तचंदन, सोनकाव, गोरोचन, पिंपळी, सैंधव ही सर्व चूर्णे एकत्र करून ती चोळून लावावी व याच द्रव्यांच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. सूज जर पिकली व ती मर्मस्थानावर नसेल, तर तिचे भेदन करावे.    

इतर मुखरोग : सर्वसराचे दोषांनुसार पाच प्रकार आहेत. याशिवाय कफार्बुद, पुतिवकत्रता व ऊर्ध्वगद हे तीन प्रकार आहेत. संपूर्ण मुखाला मुखातील अवयव, ओठ, जीभ व्याप्त करून होणाऱ्या रोगाला ‘सर्वसर रोग’ असे म्हणतात. वाग्भट यांनी आठ प्रकार सांगितले आहेत.    

वातज सर्वसर : वातज सर्वसरामध्ये वायू सर्व मुखामध्ये संचार करून तांबूस व रुक्ष व्रण उत्पन्न करतो. या व्रणाची जागा वारंवार बदलते. ओठ तांबडे होतात व ओठावरची त्वचा निघते. जीभ जाड व काट्यांनी भरलेली असते व तिला थंड पदार्थ सहन होत नाहीत व तोंड उघडण्यास त्रास होतो. यात पिंपळी, सैंधव व वेलची यांचे चूर्ण किंवा पंचलवण चूर्ण चोळून लावावे व वातहर अशा भद्रदार्व्यादी गणातील सिद्ध केलेल्या तेलाचे नस्य करावे व त्याने गुळण्या कराव्यात. अर्जुन चारोळी, खदिर, गुग्गुळ, शिलाजित, मेण इ. द्रव्यांचे चूर्ण तेलात व मधात खलून त्याची वात करून ती टेंटूच्या पानाच्या देठाला लिंपून ती पेटवून त्याचे धूमपान करावे. हा स्नैहिक धूम मुखपाकावर उपयोगी आहे. हा वातकफनाशक व मुखरोगनाशक आहे.

पित्तज सर्वसर : तोंडामध्ये क्षाराने भाजल्याप्रमाणे व्रण (जखमा) होतात. तांबूस रंगाच्या पिवळट, दाहयुक्त व बारीक फोडांनी तोंड व्यापून जाते. ह्या व्याधीवर वमन, विरेचन देऊन सर्व दोष काढून टाकावेत व शरीर शुद्ध झाल्यावर नंतर मधुर, थंड व पित्तशामक सर्व उपचार करावेत. दूध, उसाचा रस, द्राक्षाचा रस पिण्यास द्यावा. ही सर्व द्रव्ये मृदू विरेचन आहेत. ज्येष्ठमधाने सिद्ध केलेल्या दुधाने गुळण्या कराव्यात.

कफज सर्वसर : कफज सर्वसरामध्ये खाजयुक्त, किंचित दुखणारे व त्वचेच्या वर्णाचे फोड तोंडात येतात. तोंड चिकट असते व लाळ फार सुटते आणि तोंडाची चव गुळचट असते व वेदना कमी असतात. ह्यामध्ये कफघ्न उपचार करावेत, कुकटी, क्षार व मीठ एकत्र करून लावावे. फोड स्थिर असल्यास खरखरीत पानांनी खरवडून काढावे. पळस, आवळा ह्या द्रव्यांच्या काढ्यात क्षार व गोमूत्र घालून गुळण्या कराव्यात.

रक्तज सर्वसर : यामध्ये पित्तज सर्वसराप्रमाणे लक्षणे असतात म्हणून चिकित्साही त्याप्रमाणे करावी.    

सान्निपातिक सर्वसर : ह्यामध्ये तिन्ही दोषांची लक्षणे असतात म्हणून चिकित्साही त्याप्रमाणेच करावी.

कफार्बुद : गालाच्या आतील बाजूस कफामुळे काळसर व पांढर्याअ वर्णाचे अर्बुद तयार होतात. ते चोळले, दाबले, कापले तरी पुन्हा वाढते. अर्बुद नवीन व फार वाढले नसल्यास मंडलाग्र शस्त्राने त्याचे छेदन करावे नंतर सज्जीक्षार व सुंठ यांचे चूर्ण मधातून लावावे. गुळवेल व कडुनिंबाच्या काढ्यात मध व तेल घालून गुळण्या कराव्यात.    

गलगंड रोग : मांसदुष्टीमुळॆ गळ्याच्या बाह्य भागात होणारा एक विकार. वात, कफ व मेद यांच्या दुष्टीमुळे गळ्याच्या बाजूला गाठ उत्पन्न होते. ती वाढली, तर कालांतराने वृषणासारखी लोंबणारी अशी सूज दिसते. गलगंडाचे वातज, कफज व मेदोज असे तीन प्रकार असतात. [→ गलगंड]

वातज गलगंडाचा रंग काळसर तांबूस असतो. त्यावर काळ्या शिरांचे जाळे व टोचणी असते. या गलगंडाला वेळूच्या तापलेल्या नळकांड्याने आणि एरंडाच्या कोवळ्या पोटिसाने शेकावे. शेकवून ते पिकले म्हणजे फोडावे व त्यातील दोष काढून टाकून त्यांचे शोधून करावे. नंतर शेवग्याचे बी, मुळ्याचे बी, जवस, मद्याचा राब, चारोळीचे बी व तीळ ह्यांचा कांजीतून लेप करावा. गुळवेल, कडुनिंबाची साल, लाजाळू ह्या औषधांचा कल्क आणि लहान व मोठा चिकना, देवदार ह्यांच्या काढा ह्यामध्ये तेल सिद्ध करून रोज पिण्यास द्यावे.

कफजन्य गलगंड पांढरे, न हलणारे, किंचित वेदनायुक्त, अतिशय खाज असलेले, स्पर्शास थंड असे असतात. स्नेहन, स्वेदन करून गलगंडातून रक्त काढावे. नंतर रानतुळस, अतिविष, कळलावी, कोष्ठ व गुंजा ही औषधे पळसाच्या राखेच्या पाण्यात वाटून तो कल्क ऊन करून त्याचा लेप करावा व पिप्पल्यादी गणातील औषधांनी सिद्ध केलेल्या तेलात पंचलवणाचे चूर्ण घालून ते तेल प्यावे. जर गलगंड पिकले, तर ते फोडून नंतर व्रणशोथाप्रमाणे शोधनाचे उपचार करावे.

मेदोज गलगंड स्निग्ध, दाबून पाहिल्यास मऊ, दुर्गंधयुक्त व खाजयुक्त असते. ह्याचे मूळ फार खोल नसल्यामुळे, तो भोपळ्याप्रमाणे लोंबल्यासारखा दिसतो. हा शस्त्राने फोडून आतील मेद काढून शिवावे किंवा मज्जा, तूप व मध ह्यांनी डाग द्यावा. तेल लावून त्यावर रक्तचंदनाचे चूर्ण व गायीच्या शेणाची राख लावावी. नेहमी त्रिफळ्याचा काढा प्यावा. जखमेवर घट्ट पट्टी बांधावी.

गलगंडावर दोषांना अनुसरून वाफारा देणे, पोटीस बांधणे, लेप करणे, चोळून औषध लावणे, जळवा लावून रक्त काढणे, धूमपान, वमन, नस्य हे उपचार करावेत.    

डोळा आणि मज्जाधातू : डोळा हा ज्ञानेंद्रियांपैकी एक अवयव आहे. हा अवयव मांसाचा आहे असे वाटत असले, तरी वस्तुत: मज्जा हाच त्याचा प्रमुख घटक आहे. मज्जेच्या सारत्वाने डोळा निरोगी, मोठा आणि बलवान असतो, परंतु मज्जेच्या क्षयाने अंधारी येणे, मज्जेच्या वृद्धीने डोळा जड वाटणे व मज्जेच्या विकृतीने डोळा येणे वगैरे विकार संभवतात. दोषभेदाने वाताने १०, पित्ताने १०, कफाने १३, रक्तदुष्टीने १६, त्रिदोषांनी २५ आणि आगन्तू (बाह्य) कारणांनी २ असे मिळून एकूण ७६ नेत्ररोग आहेत.    


अभिष्यंद व अधिमंथ : अभिष्यद म्हणजे डोळे येणे. तिन्ही दोषांचा प्रकोप होऊन अभिष्यंद उत्पन्न होतो. डोळे खुपणे, टोचणे, रुक्ष होणे, लाल होणे इ. लक्षणे अभिष्यंदामुळे उत्पन्न होतात. अधिमंथ म्हणजे अभिष्यंद अधिक वाढणे. डोळ्यात मंथन केल्याप्रमाणे तीव्र वेदना उत्पन्न होतात. तर्पण, पुटपाक, सेक, आश्चोतन (डोळ्यात औषधाचे थेंब घालणे) व अंजन इ. उपचार डोळ्यांचे रक्षण करणारे आहेत. यात प्रथम रुग्णाला जुने तूप पिण्यास द्यावे, नंतर घाम येईल अशी योजना करावी व डोळ्याच्या भोवती व वरचा कपाळाचा भाग शेकून मग योग्य ती शीर तोडून रक्त काढावे व नंतर स्निग्ध विरेचन द्यावे. नंतर तेलाचा बस्ती द्यावा. शिवाय तर्पण (म्हणजे डोळा दूध, तूप यांत बुडेल असा विधी) करावे.    

संधिगत रोग : हे नऊ आहेत. अश्रुमार्गाने कुपित दोष नेत्रगत संधित प्रवेश करून हे रोग निर्माण होतात. कनीनिका (डोळ्याचा आतील बाजूचा संधी) संधीच्या ठिकाणी लाली व वेदनायुक्त शोथ होतो. तसेच नेत्रातून स्राव होतो.    

पर्वणी नावाच्या विकारात शुक्ल व कृष्ण मंडळ संधिस्थानी वायू व कफ रक्तदुष्टीमुळे मुगाएवढी तांबड्या रंगाची पुळी निर्माण होते. यामध्ये डोळ्यात दाह, वेदना व उष्ण स्राव होतो. यात संधिभागी स्वेदन करून ही पिटिका बडिश यंत्राने उचलावी. नंतर तिच्या १/३ भागाचे वृद्धिपत्राचे छेदन करावे. अश्रुवह स्रोतसांचा छेद होणार नाही याची काळजी घ्यावी. छेद अधिक गेला, तर अविरत अश्रुस्राव होत राहतो व तो थांबविता येत नाही.    

छेदनानंतर सैंधव चूर्ण व मधाचे प्रतिसारण करावे. मध, सुंठ, मिरे, पिंपळी आणि सैंधव त्यावर भुरभुरून तूप, मध लावावे व बांधून ठेवावे, तिसऱ्या  दिवशी पट्टी सोडून करंजसिद्ध दूध डोळ्यावर शिंपडावे.    

शुक्लरोग : काळ्या बुबुळावर होणारा अतिमहत्त्वाचा रोग. सव्रण शुक्लरोगामध्ये कृष्णभागी पित्तप्रकोपामुळॆ बाह्य आवरणाचा छेद होऊन व्रण उत्पन्न होतो. डोळा रक्तव्रणयुक्त असतो आणि त्यामध्ये तीव्र वेदना व उष्ण स्राव होतो. दोषानुरूप स्निग्ध किंवा रुक्ष उपचार करावेत. शिरेतून किंवा डोळ्याजवळच्या भागातून जळवा लावून रक्त काढावे. कमळ, द्राक्ष, ज्येष्ठमध यांच्या काढ्यात खडीसाखर घालून ह्या द्रव्यांनी सिद्ध केलेले दूध शिंपडावे. व्रण खोल असल्यास व वेदनायुक्त असल्यास, त्याचे रोपण करावे. त्याकरिता स्नेहपान, नस्य व शंख, शिंपले, मध, द्राक्ष, ज्येष्ठमध ह्यांचे तर्पण करावे. अभिष्यंदाची उपेक्षा केली असता अव्रण शुल्क हा व्याधी होतो. कृष्णमंडळावर शंख व पांढरे कमळ ह्यांसारखे ठिपके असतात आणि वेदना व स्राव होतो. यात हळद, ज्येष्ठमध, अनंतमूळ, लोध्र ह्यांच्या काढ्याने परिशेक करावा आणि त्यानंतर लेखन अंजन घालावे.    

वर्त्मगत रोग : डोळ्याच्या पापण्यांना होणारे हे २१ रोग आहेत. ‘पोथकी’ (खुपरी) या विकारात पापणीच्या आतील भागास मोहरीच्या आकाराच्या बारीक व घन पिटिका येतात. नेत्रस्राव अधिक प्रमाणात होतो. ह्यात वेदना, खाज व जडपणा ही लक्षणे असतात. हा एक छेदन व लेखन कर्माने बरा होणारा विकार आहे. पोथकीच्या पिटिकेचे प्रथम स्वेदन केल्यानंतर गोरोचन, पिंपळी किंवा मोरचूद ह्यांनी लेखन करावे. नंतर त्रिफळा, आमलकी यांच्या काढ्याने धुवून त्यानंतर तुल्यक मलम लावावे. ह्या चिकित्सेने लाभ न झाल्यास पोथकी कर्शक यंत्राने पिटिकेचे लेखन करावे. [→ खुपरी]. ‘अंजननामिका’ (रांजणवाडी) या विकारात पापणीच्या मध्यभागी किंवा पापणीच्या टोकास ताम्र व्रणाची मऊ, अल्प वेदनायुक्त खास असलेली, दाहयुक्त पिटिका निर्माण होते. ही शोकून शस्त्राने फोडून दाबून आतला खीळ काढल्यानंतर वेलदोडा, तगर, सैंधव ह्यांचे अंजनकर्म करावे. ‘पक्ष्मकोप’ यात पापणीचे केस रुक्ष होतात आणि वायूमुळे ते आत वळतात. हे केस डोळ्यास खुपतात, डोळ्यातून पाणी येते, डोळे लाल होतात व वेदना होते. यात नेत्राचे स्नेहन, स्वेदन, वमन व विरेचनाने शोधन करून रुग्णास आसनावर बसवावे. पापणीच्या वरच्या भागी व भुवईच्या खाली दोन भाग जागा सोडून जवाएवढा व त्याच आकाराचा तिरपा छेद घ्यावा. छेद जास्त खोल नसावा. रक्तस्राव झाल्यास ओल्या वस्त्राने पुसावे व नंतर अर्धचंद्राकार सुईने तो व्रण शिवावा. तो दोरा कपाळावर एक पट्टा बांधून त्याला त्याच सुईने बांधावा. नंतर व्रणावर मध व तूप यांत भिजवलेला कापूस ठेवावा. डोळा बांधू नये. पाचव्या- सहाव्या दिवशी जखम भरून आल्यावर टाके काढावेत व जखमेवर सोनकावाचे चूर्ण लावावे. या उपचाराने जर बरे वाटले नाही, तर पापणी उलटी करून त्या जागी अग्नीने डाग द्यावा किंवा पापणीचे वळणारे केस चिमट्याने काढून क्षाराने प्रतिसारण करावे.    

दृष्टिगत रोग : दृष्टीसंबंधी होणारे बारा रोग आहेत. नेत्राच्या चार पटलांत दोषदुष्टी होऊन त्याप्रमाणे दृष्टीवर परिणाम होतात. दोषदुष्टी चौथ्या पटलात गेल्यावर दृष्टिनाश होतो. त्या रुग्णाला काहीच दिसेनासे होते, तेव्हा त्याला ‘लिंगनाश’ असे म्हणतात. दोषाने अधिक क्षेत्र व्यापले गेले नसेल, तर चंद्र, सूर्य, वीज यांसारखी तेजस्वी दृश्ये दिसतात, यालाच सुश्रुत यांनी ‘तिमिर’ विकार आणि वाग्भट यांनी ‘काच’ असे म्हटले आहे. रंगीत प्रकाराला ‘काचबिंदू’ आणि रंगीत नसणाऱ्या प्रकाराला ‘लिंगनाश’ म्हणतात. यांची उपेक्षा केल्यास दृष्टिनाश होतो.    

लिंगनाश : (मोतीबिंदू). हा विकार कफोद्भव असून ह्यात पूर्णपणे दिसत नसेल आणि आवर्तक्यादी सहा उपद्रव नसतील, तर हा विकार शस्त्रकर्माने बरा करावा लागतो.    

हा दृष्टिमंडलगत रोग आहे. नेत्रपटलाच्या ठिकाणी कफदुष्टी झाली म्हणजे लिंगनाश होतो. वाढलेला कफदोष दृष्टिमंडल झाकून टाकतो. कफलिंगनाश शस्त्रसाध्य आहे.    


मोतीबिंदूचे शस्त्रकर्म :  रुग्णाला प्रथमत: स्नेहन, स्वेदन व विरेचन देऊन त्याची शरीरशुद्धी करावी व शस्त्रकर्माच्या आदल्या दिवशी त्याला घृतयुक्त आहार द्यावा. शस्त्रकर्माच्या वेळी रोग्याला पाय पसरून दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवून किंचित पाठीवर रेलून बसण्यास सांगावे आणि मान किंचित वर करून परिचारकाने आपल्या दोन्ही हातांनी त्याचे डोके धरून ठेवावे, रोग्याला व्यवस्थित बसून आपल्या तोंडाच्या वाफेने रोग्याचा डोळा शेकवून तो मिटून आतील बाहुली आंगठ्याच्या आतील भागाने चोळून आतील दोष वर आल्यावर डाव्या हाताने डोळा उघडून धरावा आणि वर्त्त्मसंग्राहक यंत्राने नेत्राचे विस्फारण करावे. रुग्णास नाकाकडे बघावयास सांगावे. नंतर उजव्या हाताचा अंगठा व जवळच्या दोन्ही बोटांनी वेधन शलाका घेऊन हात काढून न घेता काळॆ बुबुळ सोडून डोळ्याचा बाहेरच्या संधीकडील बाजूंनी एकतृतीयांश व बुबुळाकडे दोन-तृतीयांश पांढरा  भाग सोडून त्या संधीवर शिरा सोडून फार वर किंवा फार खाली नाही अशा बेताने मध्यावर असलेल्या दैवकृत (नैसर्गिक) छिद्रात शलाका घालावी. सम्यक वेध झाल्यास विशिष्ट प्रकारचा शब्द येतो व पाण्याच्या थेंबाप्रमाणे दोष बाहेर येतात. त्यानंतर लाली, वेदना, अश्रुस्राव टाळण्याकरिता स्त्रीस्तन्याचे सेचन करावे. दोष जास्त स्थिर वा चल असतील, तर कफाचे विश्लेषण करण्याकरिता शलाका आत घातल्यावर वातघ्न द्रव्यांची पाने पाण्यात उकळून त्याचे बाह्य स्वेदन करावे. नंतर दुष्टिमध्यापर्यंत शलाका घालून ज्या ज्या ठिकाणी दोष असतील, त्या त्या ठिकाणी शलाका फिरवून दोषाचे लेखन करावे. दृष्टिमंडल स्वच्छ झाल्यावर व रोग्यास अंगुली, तंतू व अन्य रूपे दिसू लागली म्हणजे शलाका हळूहळू काढावी. नंतर कापसाचा बोळा तुपात बुडवून तो डोळ्यावर ठेवावा व डोळा बांधून शस्त्रकर्म केले असेल, तर उताणे निजवावे. तीन दिवसांनंतर डोळा सोडून डोळ्यावर वातघ्न औषधांचा काढा शिंपडावा. ह्या काढ्यानेच अल्पस्वेद द्यावा. त्याकरिता लघुपंचमुळे, जीवनीय गणातील औषधिद्रव्ये वापरावीत. ह्याप्रमाणे दहा दिवसांपर्यंत दर तीन दिवसांनी बंध सोडून व्रणकर्म करावे. दहा दिवसांपर्यंत रोग्याला लंघन व योग्य मात्रेत लघू आहार द्यावा. पेज किंवा पातळ अन्न, तूप, सुंठ, मिरे, पिंपळी आणि आवळकाठी घालून द्यावी. जांगल प्राण्यांचा मांसरस, जीवनीय औषधांचे काढे, वातघ्न औषधांनी सिद्ध केलेले तूप व दूध यांनी युक्त आहार द्यावा. पायास व डोक्यास तूप चोळावे.    

ढेकर देणे, शिंकणे, थुंकणे, खोकणे, खाकरणे, अतिप्रमाणात पाणी पिणे, पालथे झोपणे किंवा खाली तोंड करणे, स्नान करणे, दात घासणे, कडक पदार्थ चावणे ह्या गोष्टी सात दिवस वर्ज्य काराव्यात. दृष्टिस्थैर्य प्राप्त होईपर्यंत अतिसूक्ष्म व अतितेजस्वी वस्तू पाहू नये व पथ्याने राहावे. दहा दिवसांनंतर दृष्टिप्रसादनार्थ नस्य, तर्पण, शिरोबस्ती द्यावा.

लिंगनाश जास्त स्थिर असताना लेखनकर्म योग्य प्रकाराने न केल्यास दोष पुन्हा वाढतात व लिंगनाश उत्पन्न होतो. तसेच डोळ्यावर मार बसणे, व्यायाम अतिप्रमाणात करणे, मैथुन करणे किंवा तरुण लिंगनाशाचा वेध केल्यामुळॆ दोषाचा पुन्हा प्रकोप होऊन लिंगनाश होतो. स्नेहस्वेदादी चिकित्सा करून पुन्हा वेधन व लेखन करावे.

शुक्लगत रोग : पांढर्याक बुबुळाच्या ठिकाणी प्रस्तारी अर्म, शुक्लार्म, रक्तजार्म, अधिमांसार्म व स्नाय्वर्म असे हे पाच प्रकार अर्म रोग निर्माण होतात. व्यवहारात त्यांना ‘वडस’ म्हणतात. त्याचप्रमाणे याशिवाय अर्जुन, शुक्तिका, पिष्टिका, शिराजाल, सिराजपिटिका, बलास, ग्रथित असे एकूण अकरा रोग नेत्राच्या शुक्लमंडलाच्या ठिकाणी होतात.

वडस नावाच्या रोगाचे शस्त्रकर्म पुढीलप्रमाणे करतात : वडस झालेल्या रोग्याला स्नेहनकर्म करावे. रुग्णाला पेया, विलेपी किंवा जांगल प्राण्याचा मांसरस पिण्यास द्यावा. नंतर रोग्याला शय्येवर उताणे झोपवावे. मान किंचित खाली करून विकारी डोळा कोमट पाण्याने शेकून महाळुंगाच्या रसात सैंधव घालून त्याचे अंजन करावे. रुग्णास डोळा मिटावयास सांगून हळूहळू चोळावा त्यामुळे वडसाचे मांस शिथिल होते व त्यानंतर डोळ्याच्या दोन्ही पापण्या घट्ट धरून डोळ्याला अल्प प्रमाणात स्वेदन करून वडस कनीनिका संधीजवळ असेल, तर रोग्याला कानाकडे व अपांग संधीजवळ असल्यास नाकाकडे पाहण्यास सांगावे. बडिश यंत्राने विशेष ताण न देता वडसाचे मांस पकडून उचलावे. मुचुंडीयंत्र किंवा सुईच्या टोकाने तो भाग शुक्ल किंवा कृष्णमंडलापासून सोडवून घ्यावा. वाटल्यास बडिश यंत्राने उचलून धरावे किंवा वृद्धिपत्राने किंवा कर्तरीने छेद घेऊन तीनचतुर्थांश भाग कापावा. या वेळीही कनीनिका संधीचे रक्षण करावे. छेदन झाल्यावर रक्तस्राव ओल्या वस्त्राने पुसून घ्यावा व त्रिकुट चूर्ण, मध व सैंधव यांनी तो घासून काढून गायीचे ऊन तूप त्यावर शिंपडावे आणि नंतर मध व तूप मिसळून लावावे व डोळा बांधून ठेवावा. तिसऱ्या दिवसानंतर रोज तो सोडून, वेदना असतील, तर करंज बी, ज्येष्ठमध, आवळा यांनी सिद्ध केलेल्या कोमट दुधात मध घालून शिंपावे. याप्रमाणे सातव्या दिवशी डोळा मोकळा करावा. त्यानंतर सूर्याकडे पाहू नये.    

हीन छेद झाला, तर वडसाची पुन्हा वाढ होते. प्रकाशाकडे बघवत नाही. अतिप्रमाणात छेद झाला तर रक्तस्राव होणे, तिमिर, नेत्रक्षोभ इ. लक्षणे उत्पन्न होतात. त्याची अवस्थानुररूप चिकित्सा करावी. वडसाचा काही भाग शिल्लक राहिल्यास लेखनांजन वापरावे. मिरे व बेहडा चूर्ण घेऊन त्यांना हळदीच्या काढ्याच्या भावना देऊन अंजन करावे.    

कर्णरोग : कानासंबंधी होणारे एकंदर पंचवीस विकार आहेत. कर्णशूल म्हणजे कानात वेदना होणे. ह्यात कानामध्ये निसर्गत: असलेला वायू स्वस्थानापासून भ्रष्ट होऊन कानाच्या आसमंतात संचार करू लागतो. हा विकार दोषांनुसार पाच प्रकारचा आहे. ह्या व्याधीमध्ये सामान्यत: वातनाशक चिकित्सा करावी. रुग्णाला प्रथम तूप पिण्यास द्यावे व नंतर एरंड, पुनर्नवा, शेवगा इ. वातनाशक द्रव्ये उकळत्या पाण्यात टाकून त्याची वाफ कानाला देऊन त्यानंतर शिरोबस्ती कर्म करावे. जेवणानंतर तूप व कोमट दूध पिण्यास द्यावे. डोक्यावर आघात होणे, पाण्यात पोहणे किंवा विद्रधी पिकल्याने व तो फुटल्याने वाताचा प्रकोप होऊन कानातून पाण्यासारखा किंवा पूवाचा स्राव होतो, त्याला कर्णस्राव म्हणतात. कर्णस्राव स्वच्छ असेल, तर इंद्रजवाने सिद्ध केलेले तेल कानात घालावे. पू वाहत असेल, तर धूमपान, नस्य व गुळण्या कराव्या. दुष्ट व्रण व नाडीव्रण यावरील उपचार करावेत. कृमिकर्ण विकारामध्ये कानात आघाताने व्रण होऊन त्याचे शोधन व रोपण योग्य रीतीने न झाल्याने त्वचा, मांस व रक्त कुजल्यामुळे कानात कृमी निर्माण होतात. या कर्णस्रावाची सर्वसामान्य चिकित्सा करावी. ह्याशिवाय कृमिहार उपचार करावेत. कंटकारीच्या फळांचा धूर किंवा गुग्गुळाचा धूर कानाला द्यावा. कटफळादि चूर्णाचे प्रधूमन नस्य करावे. त्यामुळे शिंका येऊन कृमी कानातून बाहेर येतात. कर्णगुथक या विकारात कानामध्ये मळ संचित होऊन तो पित्ताने सुकतो व तो तिथेच साचून राहतो. यात प्रथम कोमट तेल घालून कान शेकावा. नंतर मळ पातळ झाला म्हणजे तो सळईने काढून टाकावा.    

वातादि दोषांच्या प्रकोपाने रक्तमांसादीची दुष्टी होऊन दोषज कर्णविद्रधी उत्पन्न होतात किंवा कानावर मार बसल्याने किंवा जखमेमुळे कानात विद्रधी उत्पन्न होते. ह्याची अवस्थानुरूप चिकित्सा करावी. दोष कमी प्रमाणात असल्यास नुसत्या रक्तमोक्षणानेही विद्रधी नाहीसा होतो. कानातील ठणका कमी होण्यास मोहरीच्या तेलाने कर्णपूरण करावे. विद्रधी पिकल्यावर शस्त्राने फोडावा. विद्रधी फोडताना तिरका छेद घ्यावा व त्यानंतर व्रणाप्रमाणे शोधन व रोपण उपक्रम करावे. कानावर मांसांकुराप्रमाणे दिसणाऱ्या अंकुरांना ‘कर्णार्श’ म्हणतात. सर्वसामान्य अर्शाप्रमाणे औषधी, क्षारकर्म, अग्निकर्म व शस्त्रकर्म चिकित्सा करावी. बरेचदा शस्त्रकर्माने अर्शाचे छेदन केल्यानंतर क्षारकर्म किंवा अग्निकर्म करावे लागते. कानातील मोठ्या आकाराच्या न पिकणाऱ्या सुजेला ‘कर्णार्बुद’ म्हणतात. या अर्बुदाचे मुळापासून छेदन करावे.    

विदारिका ह्या व्याधीमध्ये त्रिदोष दुष्टीमुळे कर्णपालीच्या ठिकाणी त्वचेच्या रंगाची वेदना नसलेली सूज निर्माण होते. सूज कच्ची किंवा पिकलेली असताना औषधांनी चोळणे, परिषेक, रक्त काढणे इ. उपचार करावेत. पाक झाल्यास भेदन करून व्रणाप्रमाणे शोधन व रोपण उपचार करावेत.  

पूयरक्त या व्याधीमध्ये प्रकुपित झालेल्या दोषांनी अथवा कपाळावर लाकूड वगैरे जोराने लागले असता रक्तमिश्रित पू वाहतो. यात नाडीव्रणाप्रमाणे उपाय करावेत आणि वाती करवून तीक्ष्ण असे अवपीडन नस्य व शोधन असे धूमपान योजावे.


जन्मत: किंवा आघात, अपघात किंवा एखाद्या रोगामुळे कान किंवा त्याचा काही भाग तुटला किंवा छिन्नविच्छिन्न झाला, तर किंवा शस्त्राने छिन्न व्रण झाल्यास, कानाचा भाग जागच्या जागी बसवून शिवावे व व्रणाप्रमाणे त्याची चिकित्सा करावी. त्यानंतर कानात तेल घालावे.    

नासारोग : आचार्यांनी अठरा नासारोग सांगितले आहेत. नाकातील वाढलेला मांसांकुर (नासार्श) हे मोठ्या आकाराचे तंतुसंधान असून द्राक्षाच्या घडाप्रमाणे दिसतात. हे नासामार्ग अवरुद्ध करतात. बरेचदा नाकामध्ये एकापेक्षा अनेक नासार्श दिसतात. स्थानिक चिकित्सेमध्ये लेप, नस्य, तीक्ष्ण धूमपान आदी उपचार करावेत. ह्या उपचारांनी बरे न वाटल्यास क्षारकर्म, अग्निकर्म करावेत. नाकपुडीचे विस्फारण करून सळईवर अपामार्गाचा क्षार घेऊन ती सळई अर्शावर लावावी. अर्शाचा व्रण जांभळा होईपर्यंत ठेवावी. नंतर ती सळई कांजी वा अम्लद्रव्यांनी धुऊन त्यावर तूप व मध लावावे. त्यामुळे अर्श संकुचित होऊन गळून पडतो. क्षारकर्म किंवा अग्निकर्माने अर्शांकुर नाहीसे होत नसल्यास शस्त्रकर्म करावे. सुश्रुतानुसार बडिश यंत्राने किंवा संदंश यंत्राने अर्श पकडून वृद्धिपत्र शस्त्राने त्याचे समूळ छेदन करावे. नंतर तेथे दंतीवर्ती ठेवावी त्यामुळे शिल्लक राहिलेल्या अर्शाचे क्षरण होते.

नाक तुटले, तर त्या तुकड्याच्या प्रमाणात त्या आकाराचे झाडाचे पान कापून घ्यावे. त्या आकाराचे गालावरील किंवा कपाळावरील मांस त्वचेसह नाकाकडील एका टोकाला शरीराला संलग्न ठेवून काढावे. ते वळवून नाकाच्या पोकळीत योग्य आकाराच्या पोकळ एरंडाच्या किंवा नळाच्या नळ्या ठेवून त्यावरून ते मांस राहिलेल्या नाकाशी नाकाचा व्यवस्थित आकार देवून शिवावे. त्याच्यावर पतंगादी चूर्ण भुरभुरावे. कापसाच्या बोळ्याने त्यावर तीळ तेल शिंपावे. रोग्याला तूप पाजून ते जिरल्यावर रेचक द्यावे. जोड रुजल्यावर संलग्न टोक कापावे. नाक मोठे हवे असल्यास शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वाढवावे.    

शिरोरोग : सुश्रुत यांनी अकरा शिरोरोग सांगितले आहेत वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक, रक्तज, सूर्यावर्त, अर्धावभेदक, शंखक इ. [→ अर्धशिशि डोकेदुखी]. शिर:शूलाच्या चिकित्सेत नस्यकर्माला अतिशय महत्त्व आहे. शिरोरोगात धूमपान, विरेचन, वमन, लंघन, उपनाह यांचाही प्रयोग करावा. वाग्भट यांनी कपालगत नऊ रोगांची गणना शिरोरोगात केली आहे. कपाळाच्या (डोक्याच्या) हाडांबाहेरील अवयवांमध्ये विकृती झाल्यामुळॆ हे रोग होतात. ते पुढीलप्रमाणे आहेत : उपशीर्षक, पीडिका, अर्बुद, विद्रधी, अरुषिका (खवडे), दारुणक (वारणा), इंद्रलुप्त (चाई), खालित्य (टक्कल), पालित्य (केस पिकणे). बालक गर्भावस्थेत असताना त्याच्या आईने वातवर्धक चुकीचा आहारविहार केल्यास कपाळावर शरीराच्या वर्णाची वेदनारहित होणाऱ्या सुजेला ‘उपशीर्षक’ म्हणतात. जन्मानंतर या रोगावर वातव्याधीची चिकित्सा करावी. ही सूज पिकल्यावर विद्रधी (गळू) प्रमाणे चिकित्सा करावी. तिला तेल लावून शेकावे व पिकू नये अशा बेताने पोटीस बांधावे व जव, गहू, मूग वाटून त्यात तूप मिसळून कोमट असा परिषेक केल्याने सूज नाहीशी होते. पीडिका, अर्बुद आणि विद्रधी हे विकार दोषांनुसार त्या त्या लक्षणांनी युक्त असतात. याची चिकित्सा त्यांची अवस्था पाहून करावी म्हणजे सूज कच्ची किंवा पिकलेली असताना सामान्य अर्बुद व विद्रधी यांप्रमाणे चिकित्सा करावी. अरुषिका, दारुणक व इंद्रलुप्त हे डोक्यावरील केस असलेल्या त्वचेवर होणारे विकार आहेत. यांची लक्षणे व चिकित्सा यांचे वर्णन ‘क्षुद्ररोग’ या उपशीर्षकाखाली आले आहे.

आयुर्वेदीय शल्यतंत्रातील काही विशेष पण अगम्य वाटणारे उपचार : आयुर्वेदीय शल्यचिकित्सेत कित्येक रोगांवर प्रथमदर्शनी अगम्य असे उपाय सांगितलेले आढळतात. त्यांचा उलगडा प्रचलित विज्ञानात होईल व त्याचा कार्यकारणभाव सांगता येईल असे नाही. त्यातील काही उपाय उदाहरणादाखल सांगता येतील.    

गंडमाळा व अपची : या विकारात अवस्थानुरूप वमन, विरेचन, लंघन, लेप, रक्तसृती, अग्निकर्म, क्षारकर्म इ. चिकित्सा सांगितलेली आहे. सुश्रुतांनी अठराव्या अध्यायात चिकित्सा स्थानांतील शस्त्रक्रियेचे सविस्तर वर्णन केले आहे. उदा., अपची रोगामध्ये पायाच्या घोट्यापासून बारा अंगुळे वर मोजून पिंढरीच्या मध्ये व मागील बाजूस असलेली इंद्रबस्ती नावाचे मर्मस्थान सोडून त्या ठिकाणी माश्याच्या अंड्यासारखी असलेली मेदाची जाळी शस्त्रक्रिया करून काढून टाकावीत व नंतर त्या ठिकाणी अग्निकर्म करावे, म्हणजे अपची विकार बरा होतो. मानेत गाठी उजवीकडे असतील, तर डाव्या पिंढरीतील जाळी काढावी, म्हणजे गंडमाळा व अपची यांच्या गाठी एके ठिकाणी व शस्त्रक्रिया अन्य ठिकाणी सांगितलेली आहे.    

आंत्रवृद्धी किंवा अंतर्गळ : या विकारात ज्या वेळी ग्रंथीसारखी स्थानिक वृद्धी सुरुवातीला असते, अशा अवस्थेत आंत्र हे जोपर्यंत वंक्षणाच्या ठिकाणी आहे, तोपर्यंत ग्रंथीचा मार्ग बंद करण्याकरिता तिला डाग द्यावा. जांघेत अर्धचंद्राकृती शलाकेने अग्निकर्म करावे, असा स्थानिक दहनकर्माचा विधी सांगितला आहेच. आंत्रवृद्धी या विकारात आतडे ज्या छिद्रातून बाहेर येते, तेथे डागावे. ही सरळ समजणारी क्रिया आहे, पण ती फलकोषात उतरली असल्यास डाग न देता पाण्याच्या अंगठ्याच्या मध्यावरची त्वचा किंवा शेवटच्या दोन्ही बोटांवरील पिवळा स्नायू काढून त्या ठिकाणी डाग द्यावा म्हणजे आंत्रवृद्धी विकार बरा होतो असे सांगितले आहे. येथे आतड्याचा व स्नायूंचा काही अर्थाअर्थी संबंध दिसत नाही. आंत्रवृद्धी जर डावीकडे असेल, तर उजव्या अंगठ्यामध्ये व उजव्या बाजूची आंत्रवृद्धी असेल, तर त्या रोग्याला डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये शस्त्रकर्म करावे व डाग द्यावा असे म्हणतात.

सिरावेधातील अगम्य उपचार : सिरावेध विधीत निरनिराळ्या रोगांनुसार सिरांचा वेध करण्यास सांगितला आहे. उदा., (१) प्लीहावृद्धीत कोपराच्या सांध्यातील किंवा हाताच्या दोन बोटांमधील शीर तोडून रक्त काढावे. (२) प्रवाहिका (पोटात मुरडा येऊन आव पडणे) या विकारात कंबरेपासून वर दोन बोटावरची शीर तोडून रक्तस्राव करावा. (३) अपस्मारात (आकडी येणे) हनुवटीच्या सांध्यातील व उन्मादात शंखभागातील शीर तोडून रक्तस्राव करावा. (४) पाददाह (पायाची आग होणे), पादहर्ष म्हणजे पायाला मुंग्या येणे व बधिरता येणे, विपादिका म्हणजे पाय व हाताचे तळवे फुटणे व वातरक्त या विकारात क्षिप्रमर्माच्या वर दोन अंगुळे सिरावेध करावा. (५) गृध्रसी या विकारात गुडघ्याच्या वर किंवा खाली चार अंगुळे जागा सोडून सिरावेध करावा.    

वरील विकारांतील चिकित्सा केल्यानंतर शिल्लक राहिलेले दोष या विशिष्ट शिरा तोडल्याने निघतात, असे शास्त्रकारांनी अनुभवाने निश्चित केले आहे. त्या स्थानाचा, शिरेचा व तिच्यातील रक्ताचा अर्थाअर्थी काही शास्त्रीय कार्यकारणसंबंध लक्षात येत नाही.    

पहा : आतुरचिकित्सा आतुर निदान आयुर्वेद आयुर्वेदाचा इतिहास दोष धातुमलविज्ञान प्रतिरोगचिकित्सा यंत्र-२ रक्तसृति व्रणबंध स्नेह स्वेद.    

संदर्भ : जोशी, शि. गो. व इतर, शल्य शालाक्य तंत्र, भाग १ व २, पुणे, १९८२                            

पटवर्धन, शुभदा अ. जोशी, वेणीमाधवशास्त्री