शफ्‌तल : (पार्शियन क्लोव्हर). हे वैरणीचे पीक आहे. याचे मूलस्थान इराण आहे. हे बरसीमच्या जातीचे पीक आहे. ओलीतासाठी पाटाचे पाणी देण्याची प्रथा सुरू झाली, तेव्हा पंजाबात हे आणले गेले. उत्तर भारतात याला बरेच महत्त्व होते परंतु बरसीमची लागवड सुरू झाल्यावर ते कमी झाले. भारतात इतरत्र मात्र याचा प्रसार झाला नाही. उत्तर भारतातील थोडी हलकी जमीन व थंड हवामान याला चालते. जनावरे उभ्या पिकात चारल्यास त्याचे नुकसान होत नाही म्हणून हे पीक चराऊ रानातही घेतात. पिकासाठी जमीन बरसीमच्या पिकाप्रमाणेच तयार करतात. हेक्टरी २० –२६ टन शेणखत जमिनीत मिसळून तिच्यात १० –१२ किग्रॅ. शफतलचे बी मुठीने फोकून पेरतात. २·४ x २·४ मी. आकारमानाचे वाफे करून त्यांतून पाणी भरतात. बी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास पेरतात. पीक मेपर्यंत शेतात राहते. त्या अवधीत याच्या  ३ – ४ कापण्या घेतात. यापासून हेक्टरी ३० ते ४० हजार किग्रॅ. हिरवी वैरण मिळते. ही वैरण प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास जनावराचे पोट फुगते. एप्रिल महिन्यातील वैरणीची शेवटची कापणी घेतल्यानंतर हे बियांसाठी राखतात. मे अखेरीला कापणी करून पीक वाळवून बडवून बी काढून घेतात. हेक्टरी याचे बी २६० –३०० किग्रॅ. पर्यंत मिळते. उत्पन्नाच्या आणि खाद्याच्या दृष्टीने याचा दर्जा कमी पडत असल्यामुळॆ याची लागवड कमी होऊ लागली.

पाहा : बरसीम वैरण.

चव्हाण, ई. गो