शंबूक : (शंबुक). शबुकाची कथा वाल्मीकी रामायण (उत्तरकांड, सर्ग ७५ व ७६), महाभारत (शांतिपर्व, अध्याय १४९), कालिदासाचे रघुवंश (सर्ग १५ श्लोक ४२ ते ५७), भवभूतीचे  उत्तररामचरित (अंक २, श्लोक ८ व १०), पद्मपुराण (सृष्टिखंड – अध्याय ३२ व ३९ उत्तरखंड – अध्याय २३० व २४७) तसेच आनंद रामायण, भावार्थ रामायण, जैन पौमचरिय, तेलगू रंगनाथ रामायण, उडिया भाषेतील विचित्र रामायण, कन्नडमधील तोरवे रामायण, रामकियेन, सेरीराम, रामायण-मंजरी, दशावतारचरित या ग्रंथांत, तसेच इतराही अनेक ठिकाणी आलेला आहे. कन्नड कवी के.व्हि. पुट्टप्प (कुवेंपु) यांनी शूद्रतपस्वी….नामक काव्य आणि जगदीश गुप्त यांनी शंबूक नावाचेच एक हिंदी लघुकाव्य रचलेले आहे. फादर कामिल बुल्के यांनी आपल्या रामकथा या प्रदीर्घ हिंदी प्रबंधात शंबूककथेची पुष्कळच माहिती व मीमांसा दिलेली आहे. आधुनिक चातुर्वर्ण्य-चिकित्सेत शंबूककथेचा वारंवार उल्लेख झालेला दिसतो.

शंबूकाची हत्या का झाली, याचा खुलासा मात्र निरनिराळ्या प्रकारे केलेला आढळतो. महाभारत, रघुवंश, उत्तररामचरित यांतील कथेनुसार पुढील माहिती मिळते : रामाचा राज्यकारभार धर्मानुसार काटेकोरपणे चालला असता, एके दिवशी एक वृद्ध ब्राम्हण आपला सोळा वर्षांचा मुलगा अचानक मृत्यू पावल्यामुळे, त्याचा मृतदेह घेऊन रामाच्या दरबारात येतो. व फिर्याद दाखल करतो. राजाच्या कर्तव्यात काही कसूर झाल्यामुळे असे घडते ही तत्कालीन धर्मश्रद्धा. दरबारात असे बोलले जात होते, की कोणीएक शंबूकनामक शूद्र जनस्थानात यज्ञस्थळी झाडाच्या फांदीला उलटे टांगून घेऊन तप करीत आहे. प्राचीन धर्मानुसार शूद्राला तप करण्याचा अधिकार नव्हता. यावर राम पुष्पक विमानातून जनस्थानात जातो व शंबूकाला तपश्चर्येचे कारण विचारतो. शंबूक त्याला सांगतो, की ही त्याची तपश्चर्येचे धर्माच्या विरूद्ध म्हणून दंडार्ह आहे. असे सांगून राम त्याचा शिरच्छेद करतो. लगेच तिकडे त्या ब्राह्यणाचा मुलगा जिवंत होतो. प्रत्यक्ष रामाच्या हस्ते मृत्यू आल्यामुळे शंबूकाला सदगती मिळाली, पण देवत्व, स्वर्गप्रवेश व इंद्रपद लाभले नाही.

आनंद रामायणात वरील कथेत थोडा फरक केलेला दिसतो. त्या ब्राह्यणाचा मृत पुत्र पाच वर्षांचाच होता. त्याला घेऊन तो ब्राह्यण दरबारात गेला व त्याने रामाला विनंती केली, की जर त्याचा पुत्र जिवंत झाला नाही, तर रामाने लव-कुशांना त्या ब्राह्यणाला देऊन टाकावे. शंबूकानेही रामाकडे मागणी केली, की रामाने शुद्र ज्ञातीला सदगती द्यावी व दुवा घ्यावा. त्यावर रामाने उत्तर दिले, की त्यासाठी शूद्रांनी एकमेकांना भेटल्यावर ‘रामराम’ असे म्हणावे म्हणजे त्यांचा उद्धार होईल. तेव्हापासून ही पद्धत रूढ झाली. पउमचरिय व तेलगू रंगनाथ रामायण यांत सांगितलेल्या कथा याहून अगदी वेगळ्या आहेत. राम आणि रावण यांच्यामधील वितुष्ट पराकोटीला कसे गेले, हे दाखविण्यासाठी त्या कथांची रचना केलेली दिसते.

शंबूकथा या प्रकारे काही तपशिलांच्या फरकाने विविध प्राचीन ग्रंथांत आल्याचे वरील माहितीवरून दिसून येईल. आधुनिक काळात चातुर्वर्ण्यव्यवस्थेतील अंगभूत विषमता, अन्याय व माणुसकीचा अभाव या गोष्टी त्याज्य ठरल्याने शंबूककथेला नवी अर्थपूर्ण व मर्मभेदक प्रतीकात्मता प्राप्त झाली असून भारतीय दलित साहित्यात तिचा कल्पकतेने वापरही केल्याचे दिसून येते.

इनामदार, वि.बा.