व्हेस्पूची, आमेरीगो : (? १४५४ – २२ फेब्रुवारी १५१२). प्रसिद्ध इटालियन समन्वेषक. अमेरिका खंडाचे नाव हे त्याच्या नावावरूनच देण्यात आले आहे. जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे. आमेरीगोचे वडील लेखप्रमाणक (नोटरी) होते. व्हेस्पूची कुटुंब सुसंस्कृत असून फ्लॉरेन्सच्या सत्ताधारी मेदीची या घराण्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. आमेरीगोला भूगोल तसेच विश्ववर्णनशास्त्र विषयांत विशेष रस होता. तरुणपणातच त्याने नौकाचालनाचे शिक्षण घेतले. प्रारंभी बँकिंग क्षेत्रातील संस्थेत व्यापारी प्रतिनिधी म्हणून त्याने काम केले. १४९१ च्या अखेरीस स्पेनमधील सेव्हील येथील ग्यानेत्तो बेरार्डी या जहाजबांधणी व्यावसायिकाशी त्याने व्यापारी भागीदारी सुरू केली. कोलंबसच्या दुसऱ्या व तिसऱ्या सफरीसाठी जहाजे तयार करण्याचे काम बेरार्डीकडेच होते. बेरार्डीच्या मृत्यूनंतर आमेरीगो त्या कंपनीचा व्यवस्थापक बनला. जून १४९६ मध्ये कोलंबस दुसऱ्या सफरीवरून परत आला, त्या वेळी तो आमेरीगोला निश्चितपणे भेटलेला होता. आपण आशियाच्या किनाऱ्याजवळ जाऊन आलो आहोत, असा कोलंबसचा समज झाला असल्याचे आमेरीगोच्या लक्षात आले. नव्या जगाबद्दलची आमेरीगोची उत्सुकता त्यामुळे अधिकच वाढली.
आमेरीगोने १४९७ ते १५०४ या कालावधीत चार सफरी केल्या. १४९७ मधील पहिल्या सफरीत एका विस्तृत खंडाचा (दक्षिण अमेरिका) शोध लावल्याचा दावा त्याने केला. क्रिस्तोफर कोलंबस १४९२ मध्ये या प्रदेशात आला होता परंतु आपण नव्या जगात (अमेरिका खंडात) पोहोचलो आहोत याची खात्री त्याला १४९८ मधील सफरीपर्यंत वाटत नव्हती. मार्टिन व्हॉल्टझेम्यूलर या जर्मन नकाशाकाराने या नव्या खंडाचा (सांप्रतचे दक्षिण अमेरिका) नकाशा तयार केला आणि आमेरीगोने शोधून काढलेल्या या भूमीला (नव्या जगाच्या ब्राझीलियन प्रदेशाला) त्याच्या सन्मानार्थ अमेरिका हे नाव द्यावे, असे सुचविले (१५०७). तेच नाव पुढे कायम राहिले.
स्पॅनिश समन्वेषक आलॉन्सो दे ओखेदो याच्या १४९९-१५०० मधील सफरीत आमेरीगोने भाग घेतला. या सफरीत आमेरीगोने व्हेनेझुएलाच्या पहिल्या किनाऱ्यावरून प्रवास केला. पहिल्या दोन्ही सफरींचे आमेरीगोने दिलेले अंतर, त्याच्या तारखा, प्रदेश व मार्गांचे वर्णन संशयास्पद वाटतात. पोर्तुगीज कॅप्टन गाँथालो कूएल्यू याच्या १५०१-०२ व १५०३-०४मधील सफरींतही आमेरीगो सहभागी झाला होता. या दोन्ही सफरींत ब्राझीलच्या दक्षिण किनाऱ्याचे त्याने समन्वेषण केले. हा भूभाग आशियाचा भाग नसावा, कारण मार्को पोलोसारख्या पूर्वीच्या प्रवाशांनी आशियातील प्राणी, वनस्पती व मानवी जीवनाचे जे वर्णन केलेले आहे, ते वर्णन या भूमीशी जुळणारे नाही, असे स्पष्टीकरण आमेरीगोने दिले.
आमेरीगोने लोरेंझो दि पिअर फ्रान्सिस्को दे मेदीची याला १८ जुलै १५००मध्ये पाठविलेले पत्र आणि ४ सप्टेंबर १५०४ रोजी पिअरो सोडेरीनीला पाठविलेले Mundus Novas (न्यू वर्ल्ड) हे पत्र यांच्यात बरीच विसंगती आढळते. या पत्राला बरीच प्रसिद्धी देण्यात आली. याच पत्राने आमेरीगोला एक महान समन्वेषक म्हणून कीर्ती मिळवून दिली.
आमेरीगो १५०३–०४ मधील सफरीवरून परतल्यानंतर त्याने सेव्हील येथे स्थायिक होऊन स्पॅनिश नागरिकत्व स्वीकारले. उतार वयात त्याने मारीया दे सेरेझो या स्त्रीशी विवाह केला. १५०८मध्ये स्पेनच्या राजाने त्याची पायलट मेजर या पदावर नेमणूक केली. त्याने अटलांटिक महासागर व पश्चिमेकडील भूमीचे, तसेच सागरी जलमार्गाचे अधिकृत नकाशे तयार केले.
आमेरीगोच्या मृत्यूनंतर त्याच्या अमेरिका खंडाच्या शोधाबद्दलच्या दाव्याबाबत अनेक आक्षेप घेण्यात आले. त्याची पहिली सफर वादग्रस्त असून त्याचे या संदर्भातील पत्र बनावट असल्याचे म्हटले जाते. पहिल्या सफरीची त्याच्या पत्रातील बरीचशी माहिती काल्पनिक वाटते. त्याने सर्व सफरींचे नेतृत्व केले नसून प्रत्यक्षात तो एका जहाजाचा फक्त चालक होता. याच दरम्यान क्रिस्तोफर कोलंबसने नव्या जगाचा शोध लावल्याचे प्रसिद्ध झाले होते.
आधुनिक समन्वेषकांपैकी फ्रेडरिक ज्युलिअस पोहल यांनी आमेरीगो व्हेस्पूची पायलट मेजर (१९४४) या पुस्तकात आमेरीगोची पहिली सफर नसून त्याचे सोडेरीनीला लिहिलेले पत्र, दोन्ही बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र जर्मन आर्सीनेगसने ‘आमेरीगो अँड द न्यू वर्ल्ड’ मध्ये (इं. शी. १९५५) आमेरीगोने केलेली सफर व त्याचे पत्र दोन्हीही घटना सत्य असल्याचे मानले आहे. व्हॉल्टझेम्यूलरने दक्षिण खंडाला जे अमेरिका हे नाव दिलेले आहे, ते आपल्या मोठ्या मुख्य नकाशात न देता केवळ त्यातील लहान चौकटी नकाशात दिलेले आहे.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..