व्हेर्नर, आल्फ्रेट : (१२डिसेंबर १८६६–१५ नोव्हेंबर १९१९). फ्रेंच – स्विस रसायनशास्त्रज्ञ व सहसंबद्ध संयुजा सिद्धान्ताचे जनक. रेण्वीय संरचनेवरील काऱ्याबद्दल त्यांना १९१३ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पातिरतोषिक देण्यात आले. व्हेर्नर यांचा जन्म ॲल्सेसमधील (फ्रान्स) म्यूलूझ येथे झाला. एकोल प्रोफेशनल या तांत्रिक शाळेत रसायनशास्त्राचा अभ्यास केला (१८७८ – ८५). त्यांनी झुरिक येथे तांत्रिक रसायनशास्त्राची पदवी (१८८९) आणि ऑक्झाइमे या कार्बनी नायट्रोजन संयुगांवर संशोधन केल्याबद्दल पीएच. डी. पदवी (१८९०) संपादन केली. १८९३मध्ये ते झुरिक विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक झाले. पुढे त्यांची तेथे प्राध्यापकपदी नेमणूक झाली. या नेमणुकीपूर्वी लिहिलेल्या प्रबंधात त्यांनी युगप्रवर्तक, पण वादग्रस्त सहसंबद्धता सिद्धान्त प्रतिपादित केला होता. या सिद्धान्तामुळे अकार्बनी संयुगांचे साधे वर्गीकरण करणे शक्य झाले, तसेच समघटकतेची (रासायननिक संघटन तेच असून रासायनिक संरचना भिन्न असणाऱ्या आविष्काराची) संकल्पना व्यापक झाली.

व्हेर्नर यांच्या सहसंबद्ध संयुगांचे व्यावहारिक व सैद्धान्तिक महत्त्व आता वादातीत आहे. तसेच आधुनिक सांरचनिक अकार्बनी रसायनशास्त्राचा पायाही त्यांनी घातला. त्यांच्या मतांमध्ये नंतर किंचित बदल झाले. तथापि आधुनिक अकार्बनी रसायनशास्त्राच्या दृष्टीने ती मते मूलभूत महत्त्वाची असून त्यांच्यामुळे रासायनिक बंधांविषयीच्या आधुनिक संकल्पना पुढे येण्याचा मार्ग खुला झाला.

व्हेर्नर यांनी Lehrbuch der Stereochemie (१९०४) आणि Neuere Anschauungen auf dem Gebiete der anorganischen Chemie (१९०५) हे ग्रंथ लिहिले. त्यांना अनेक मानसन्मान व सन्माननीय पदव्या मिळाल्या. झुरिक येथे त्यांचे निधन झाले.           

    

जमदाडे, ज. वि.