व्हेगा, लोपे दे : (२५ नोव्हेंबर १५६२–२७ ऑगस्ट १६३५). स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णयुगातील नामवंत नाटककार. संपूर्ण नाव लोपे फेलीक्स दे व्हेगा कार्प्यो. जन्म माद्रिदचा. शिक्षण एका जेझुइट शिक्षणसंस्थेत व अल्कॉला दे आनरस या विद्यापीठात. अनेक स्त्रियांबरोबर त्याने प्रेमप्रकरणे केली. १५८७ मध्ये एका प्रेयसीबरोबरच्या संबंधात वितुष्ट आल्यानंतर तिच्याबद्दल अभद्र आशयाच्या दोन कविता रचल्याच्या आरोपावरून त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. पुढे एका उमराव घराण्याचील तरुणीबरोबर त्याने माद्रिदमधून पलायन केले आणि तिच्याशी विवाह केला. १५८८ मध्ये स्पेनच्या नाविक दलात (स्पॅनिश आर्माडा) दाखल होऊन इंग्लंडविरुद्धच्या लढाईत त्याने भाग घेतला. ही लढाई संपल्यानंतर आपल्या पत्नीसह विपन्नावस्थेत तो व्हॅलेन्शिया येथे येऊन राहिला. तेथे नाट्यलेखनासाठी त्याला चांगला वाव मिळाला. १५९५ साली त्याची पहिली पत्नी निवर्तली व त्याने दुसरा विवाह केला. दुसरी पत्नीही १६१३ मध्ये निवर्तल्यानंतर त्याने धर्मोपदेशकाची दीक्षा घेतली (१६१४). १६२७ मध्ये मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स हिचे जीवन, तिला मिळालेला मृत्यूदंड ह्या विषयावरील La corona tragic हे आपले महाकाव्य त्याने पोपला अर्पण केले आणि त्याच वर्षी पोपने ‘डॉक्टर ऑफ थिऑलॉजी’ ही पदवी त्याला बहाल केली. त्याआधी काही वर्षे मार्ता दे नेव्हारीस ह्या विवाहित स्त्रीबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मार्ता ही त्याच्या दृष्टीने आदर्श स्त्रीची प्रतिमा होती. तथापि व्हेगाचे जीवन सुखाचे झाले नाही. ह्या स्त्रीला अंधत्व आले तिला वेडाचे झटके येत. १६३२ साली ती मरण पावली. आयुष्यात आपण केलेल्या प्रमादांची शिक्षा आपल्याला मिळत आहे, ह्या भावनेने खचत जाऊन माद्रिद येथे त्याचा अंत झाला.
व्हेगाच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. ख्वान पेरेझ दे मोंताल्वान ह्या व्हेगाच्या पहिल्या चरित्रकाराने १,८०० नाटके आणि धार्मिक विषयांवरील ४०० लघुनाट्ये (autos sacramentales) व्हेगाने लिहिल्याचे म्हटले आहे. आज व्हेगाच्या ७२३ नाटकांची आणि ४४ धार्मिक लघुनाट्यांची शीर्षके मिळतात ४२६ नाटकांच्या आणि ४२ धार्मिक लघुनाट्यांच्या संहिता उपलब्ध आहेत.
स्पॅनिशमधील Comedia ह्या नाट्यप्रकाराचे महत्त्व प्रस्थापित करून त्याला वैशिष्ट्यपूर्ण रूप आणि आशय देण्याचे कार्य व्हेगाने समर्थपणे केले. व्हेगाची नाटके पद्यात असून त्यात वृत्तरचनांची नाट्यानुकूल योजना केलेली आहे. अनेक पद्यांना उत्कट भावकवितेची उंची लाभलेली आहे. नाट्ययचनेचे जुने अभिजाततावादी नियम व्हेगाने पाळले नाहीत. प्रेक्षकांचे समाधान त्याला महत्त्वाचे वाटे. ‘द न्यू आर्ट ऑफ रायटिंग प्लेज’मध्ये (१६०९, इं. शी.) त्याने आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. चार किंवा पाच अंकांचा संकेत मोडून त्याने तीन अंकी नाटकेही लिहिली. व्यक्तिरेखनापेक्षा कृतीला अधिक महत्त्व दिल्याने त्याच्या नाटकांत गुंतागुंतीच्या घटना आणि उपकथानके आढळतात. त्याच्या नाटकांतून स्पेनच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. व्हेगाने सर्वसामान्यांसाठी नाट्यलेखन केले व स्पेनच्या राष्ट्रीय रंगभूमीला सामर्थ्य प्राप्त करून देणारा स्पॅनिश नाटकाचा एक नवा नमुना रंगभूमीवर आणला.
व्हेगाने ‘ग्रेसिओसो’ नावाचा विनोदी पात्राचा नमुना निर्माण केला. हा आपल्या मालकाच्या वर्तनाचे विनोदी अनुकरण अथवा कधीकधी विडंबनही करीत असतो. त्याच्या ऐतिहासिक नाटकांत स्पेनच्या इतिहासातील पराक्रमी व्यक्ती, आख्यायिकांचा विषय झालेली कर्तृत्ववान माणसे त्याने उभी केली. व्हेगाने विविध प्रकारच्या नाट्यवस्तू हाताळल्या. उदा. प्रबोधनकालातील इटालियन कथांवर आधारलेली नाटके संतांची जीवने, बायबलमधील कथा ह्यांच्या आधारे लिहिलेली नाटके अभिजात मिथ्यकथांवरील नाटके कृषिजीवन आणि तेथील निसर्गरम्य परिसर ह्यांवर भर देणारी नाटके स्पॅनिश लोकांच्या जीवनातील मानबिंदूंचे दर्शन घडविणारी नाटके इत्यादी.
व्हेगाच्या काही विशेष उल्लेखनीय नाट्यकृती (सर्व इंग्रजी शीर्षकार्थ) प्रकारांनुसार अशा: (१) ऐतिहासिक नाटके–‘द नाइट फ्रॉम ऑल्मेदो’ (लेखन, १६१५ – २६), ‘द पीस ऑफ द किंग्ज अँड ज्युएस ऑफ टोलेडो’ (लेखन, १६०४ – १२), ‘द नोबलमन ऑफ इलिस्कास ऑर किंग पेद्रो इन माद्रिद’, ‘पेरीबानेझ अँड द कमांडर ऑफ ओकाना’ (लेखन, १६०९ – १२), ‘ऑल सिटिझन्स आर सोल्जर्स’ (लेखन, १६११ – १८), ‘द किंग अँड द फार्मर’ (लेखन, १६११). (२) प्रेम आणि आत्मसन्मान ह्यांच्याशी निगडित असलेली नाटके–‘द डॉग इन द मेंजर’ (लेखन, १६१३ – १५), ‘द वॉटर्स ऑफ माद्रिद’ (लेखन, १६०६ – १२), ‘द इडिअट लेडी’ (लेखन, १६१३), ‘द कॅप्रिसिस ऑफ बेलिझा’ (लेखन, १६०६ – ०८).
विपुल लेखन करणाऱ्या लेखकाच्या लेखनात घाईगर्दीने लिहिण्याचे जे प्रमाद आढळतात, ते व्हेगाच्या नाट्यलेखनातही आहेत. तथापि स्पेनच्या इतिहासातील एका विशिष्ट युगाचे सत्त्व त्याच्या नाटकांतून प्रकट झाले आणि प्रेक्षकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याच्या नाटकांतील दोषांप्रमाणेच त्यांचे सामर्थ्यही ह्याच वस्तुस्थितीत सामावलेले आहे.
व्हेगाने इतरही प्रकारचे विपुल गद्य-पद्य लेखन केले. La Doratea (१६२२) हे त्याचे संवादरूप लेखन आत्मचरित्रात्मक आहे. Laurel de Apolo मध्ये (१६३०) अपोलो हा स्पॅनिश कवींच्या मस्तकी मुकुट चढवून त्यांचा सन्मान करतो, हा विषय आहे. त्यातून तत्कालीन स्पॅनिश कवींची माहिती मिळू शकते.
संदर्भ : 1. Fitzmaurice-Kelly, J. Lope de Vega and the Spanish Drama, Glasgow, 1902.
2. Hayes, C. Lope de Vega, New York, 1967.
3. Larson, D. R. The Honor Plays of Lope de Vega, Cambridge, 1977.
4. Morleys, S. G. Bruerton, C. The Chronology of Lope de Vega’s “Comedias”, New York, 1940.
5. Parker, J. A. Fox, A. M. Lope de Vega Studies (1937-62) : A Critical Survey and Annotated Bibliography, Toronto, 1964.
6. Rennert, H. A. The Life of Lope de Vega, Glasgow, 1904.
7. Schevill, R. The Dramatic Art of Lope de Vega, Berkeley, 1918.
कुलकर्णी, अ. र.