व्हुस्टाइन, कारेल व्हानद : (१० मार्च १८७८–२३ ऑगस्ट १९२९). फ्लेमिश कवी. जन्म गेंट (बेल्जियम) येथे. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ब्रूसेल्समध्ये सरकारी अधिकारी म्हणून नोकरी केली (१९०७-२०). १९२० पासून गेंट येथे साहित्याचे अध्यापन केले. जीवनाच्या तीन अवस्थांशी निगडित असे आपले अनुभव त्याने तीन काव्यसंग्रहांतून व्यक्त केले आहेत. ते काव्यसंग्रह असे : ‘द फादर हाउस’ (१९०३, इं. शी.). ह्यात त्याने आपल्या बालपणाचे चित्रण केले आहे. ‘द ऑर्चर्ड ऑफ बर्ड्‌स अँड फ्रूट’ (१९०५, इं. शी.). ह्यात तारुण्याचे, प्रणयाराधनाचे अनुभव आहेत. ‘द गोल्डन शॅडो’ (१९१०, इं. शी.). ह्यात गृहस्थाश्रमातील अनुभवांचा आविष्कार आहे.

व्हुस्टाइनची कविता आत्मविश्लेषणात्मक स्वरूपाची आहे. प्रतीकात्मकता हे त्याच्या कवितेचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्याची एकूण कविता म्हणजे त्याचे प्रतीकात्मक आत्मचरित्र होय, असेही म्हटले जाते. त्याच्या कवितेची शब्दकळा समृद्ध असली, तरी अनेकदा ती दुर्बोधही वाटते. इंद्रियानुभवांशी निगडित असलेले लौकिक जीवन आणि आध्यात्मिकता यांतील कलहाची यातनामय जाणीव त्याला त्रस्त करीत असे. या अंतःकलहाचे प्रभावी चित्रण त्याच्या कवितेत आढळते. ‘द मॅन ऑफ मड’ (१९२०, इं.शी.) ह्या त्याच्या काव्यसंग्रहात अशा चित्रणाची परमोच्च उत्कटता जाणवते.

झ्विज्‌नार्दे येथे तो निधन पावला.                           

कुलकर्णी, अ. र.