व्हीलिया : (ग्रीक– ह्येले व रोमन ईलीआ). पुरातन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले प्राचीन ग्रीक नगर. दक्षिण इटालीच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर पेस्तम या प्राचीन नगरापासून आग्नेयेस ४० किमी.वर, तसेच हेलझ (आलेंटो) नदीमुखाच्या पूर्वेस हे शहर वसले होते. इ. स. पू. ५३५ च्या सुमारास परागंदा झालेल्या फोसीअन ग्रीक लोकांनी येथे वसाहत स्थापन केली. इ. स. पू. सहाव्या व पाचव्या शतकांत या ठिकाणी प्रसिद्ध ईलीॲटिक पंथीय तत्त्ववेत्त्यांचा एक वर्ग निर्माण झाला होता. पार्मेनिडीझ व झीनो हे या गटातील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते होते. ह्या शहराचे रोमन सत्तेशी सख्य होते. मध्ययुगीन काळाच्या पूर्वार्धात हे बिशपचे ठिकाण होते. मध्ययुगीन काळातच अरबांच्या हल्लल्यांमुळे हे शहर ओसाड बनले.

येथील उत्खननात मोठ्या प्रमाणावर भग्नावशेष आढळले आहेत. अनेक टेकाडांवरील येथील प्राचीन वसाहतींत उंच जाJगी किल्ला व मंदिर होते. टेकाडांच्या पायऱ्यापायऱ्यावर लोकवस्ती होती. ग्रीक सभास्थान, घरे, वैद्यकीय केंद्र व तटबंदी इत्यादींचे पुरावशेष येथे आढळले आहेत.

चौधरी, वसंत