व्हीझर, फ्रीड्रिख फोन : (१० जुलै १८५१–२३ जुलै १९२६). ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. अर्थशास्त्रातील ऑस्ट्रियन संप्रदायाचे एक प्रवर्तक. त्यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. त्यांचे वडील ऑस्ट्रियात उच्च पदस्थ सरकारी अधिकारी होते. व्हीझर यांनी व्हिएन्ना विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले (१८६८ – ७२). या शिक्षणक्रमात त्या काळी अर्थशास्त्राचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी दहा वर्षे सरकारी नोकरी केली. या नोकरीच्या कालखंडात त्यांनी दोन वर्षे रजा घेऊन त्यांचे सहाध्यायी असलेले ⇨ ऑइगेन फोन बंबाव्हेर्क यांच्यासोबत हायड्लबर्ग विद्यापीठात कार्ल नीस, लाइपसिक विद्यापीठात व्हिल्हेल्म जॉर्ग रॉशर आणि जेन्ना विद्यापीठात ब्रूनो हिल्देब्रान्द ह्यांच्या हाताखाली अध्ययन केले. त्यांचे गुरू असलेले हे तिघेही अर्थशास्त्रातील ऐतिहासिक संप्रदायाचे अध्वर्यू मानले जातात. पुढे व्हीझर मानवी समाजाच्या उत्क्रांतिविषयक नियमांच्या अभ्यासाकडे वळले. त्यामागे वरील तिघांपासून मिळालेली प्रेरणा हे जसे एक कारण होते त्याचप्रमाणे मेकॉले, ⇨ हर्बर्ट स्पेन्सर आणि ⇨ लीओ टॉलस्टॉय ह्यांच्या साहित्याचा त्यांच्यावर असलेला प्रभाव हेही एक कारण असल्याचे सांगता येते. तथापि ⇨कार्ल मेंगर ह्या ऑस्ट्रियन संप्रदायाच्या प्रवर्तकाचा व्हीझरवर सर्वाधिक प्रभाव होता. कार्ल नीस यांच्याकडे शिकत असताना १८७६ मध्ये एका चर्चासत्रात ज्या प्रबंधाची मांडणी त्यांनी केली त्याचीच परिणती आठ वर्षांनंतर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या रूपात झाली.
प्राग विद्यापीठात १८८४ ते १९०३ या काळात त्यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन केले. १९०३ मध्ये कार्ल मेंगर हे व्हिएन्ना विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी १९०३ ते १९१७ व १९१९ ते १९२२ या कालावधीत व्हीझर ह्यांनी अध्यापनाचे कार्य केले. १९१७-१८ या वर्षी त्यांनी ऑस्ट्रियाचे व्यापारमंत्री म्हणून काम केले.
त्यांच्या एकूण चार प्रमुख ग्रंथांपैकी नॅचरल व्हॅल्यू (इं. भा. १८९३, मूळ जर्मन ग्रंथ १८८९) आणि सोशल इकॉनॉमिक्स (इं. भा. १९२७, मूळ जर्मन भाषेत १९१४) हे दोन ग्रंथ विशेष महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी पहिल्या ग्रंथात त्यांनी ऑस्ट्रियन संप्रदायप्रणीत खर्चाच्या सिद्धान्ताचा विकास मेंगरच्या आत्मनिष्ठ दृष्टिकोनातून केलेला असून संधिखर्च (आपॉर्च्युनिटी कॉस्ट) या संकल्पनेच्या आर्थिक विचारात भर टाकून ती लोकप्रिय केली. संधिखर्चाचा विचार उत्पादन घटकांचे वितरण करताना करावा लागतो, असा विचारही त्यांनी मांडला. दुसऱ्या ग्रंथात त्यांनी सीमान्त उपयोगितेच्या कल्पनेपासून सुरुवात करून क्रमाक्रमाने अर्थव्यवस्थेची अधिकाधिक गुंतागुंतीची प्रारूपे विचारात घेऊन विविध घटकांच्या परस्पर-संबंधांतून अर्थव्यवस्थेत सामान्य समतोल कसा निर्माण होतो, हे दाखविले आहे. आपल्या १८८४ च्या पहिल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी मार्क्स, एंगेल्स, रिकार्डो, जेव्हन्झ व मेंगर यांचे बौद्धिक ऋण मान्य केले आहे.
वस्तूच्या मूल्याचा विचार नैसर्गिक मूल्य आणि विनिमय मूल्य अशा दोन अंगांनी करता येतो. नैसर्गिक मूल्य हे वस्तूच्या सीमान्त उपयोगितेनुसार, तर विनिमय मूल्य हे सीमान्त उपयोगिता तसेच ग्राहकाची क्रयशक्ती ह्या दोहोंनी ठरते. जीवनावश्यक वस्तूचे नैसर्गिक मूल्य हे तुलनेने अधिक व विनिमय मूल्य कमी असते. उलटपक्षी, चैनीच्या वस्तूंचे नैसर्गिक मूल्य कमी, तर विनिमय मूल्य अधिक असते. अशा विसंगतीमुळेच विनिमय मूल्य हे नैसर्गिक मूल्यांचे व्यंग्यचित्र (कॅरिकेचर) असते, असे व्हीझर ह्यांनी म्हटले आहे. ज्या वेळी विनिमय मूल्य आणि नैसर्गिक मूल्य यांच्यात फार मोठी तफावत असते, त्या वेळी बाजारव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप इष्ट ठरून सार्वजनिक उपक्रमांचा उदय होतो. सार्वजनिक उपक्रमांनी नफा मिळविणे गैर नाही, परंतु त्यांनी नेहमी जनहित समोर ठेवावे, असे मत ते व्यक्त करतात. सरकारी हस्तक्षेप हा समाजवादी अर्थव्यवस्थेकडे नेणारा नसावा, ह्याची काळजी सरकारने घ्यावी, असे ते आवर्जून सुचवितात. अर्थव्यवस्था ही मुक्तच असावी, हा त्यांचा आग्रह होता तरीही आवश्यक तेथे आणि आवश्यक तितकाच सरकारी हस्तक्षेप त्यांना मान्य होता.
मागणी व पुरवठ्याच्या नियमांची मांडणी त्यांनी काहीशा वेगळ्या पद्धतीने केली. वस्तूबद्दलच्या गरजा कायम असताना जर पुरवठ्यात वाढ झाली, तर सीमान्त उपयोगिता कमी होते, हा त्यांच्या पुरवठ्याच्या नियमाचा मथितार्थ आहे, तर त्यांच्या मागणीचा नियम असे दर्शवितो की, वस्तूबद्दलच्या गरजा वाढत्या असताना पुरवठा कायम ठेवला, तर वस्तूची सीमान्त उपयोगिता वाढते.
व्हीझर यांचा मृत्यू ऑस्ट्रियातील झांक्ट गिल्गेन येथे झाला.
संदर्भ : Schumpeter, J. A. The Theory of Economic Development, Oxford, 1934.
हातेकर, र. दे.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..