व्हिसप्यान्यस्की, स्टानीस्लाव्ह : (१५ जानेवारी १८६९–२८ नोव्हेंबर १९०७). पोलिश नाटककार, कवी आणि चित्रकार. आधुनिक पोलिश नाटकाचा तो जनक मानला जातो. पोलंडमधील क्रेको शहरी जन्म. त्याचे वडील शिल्पकार होते. क्रेको विद्यापीठ आणि ‘क्रेको अकॅडमी ऑफ फाइन आर्टस्’ येथे त्याचे शिक्षण झाले. पुढे या क्रेको अकॅडमीत तो प्राध्यापक झाला (१९०५). १८९० ते १८९४ हा कालखंड त्याने पॅरिसमध्ये वास्तुकला व इतर ललित कलांच्या अभ्यासात घालविला. त्याने सु. तीस भावकविता, दोन महाकाव्यसदृश्य दीर्घ काव्ये, वीस नाटके, काही नाट्यरूपांतरे आणि शेक्सपिअरच्या हॅम्लेटवरील एक दीर्घ निबंध इ. साहित्यनिर्मिती केली.
नाटककार म्हणून व्हिसप्यान्यस्कीवर मुख्यत: विख्यात पोलिश नाटककार ⇨ यूल्यूश स्लॉव्हाटस्की ह्याचा, तसेच शेक्सपिअर, ग्रीक शोकात्मिका आणि पोलिश कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा प्रभाव होता. आपल्या नाट्यलेखनात त्याने नाटकातील नाटक, रूपकयोजना, संकुल प्रतीके, मुखवटे, बोलते पुतळॆ यांसारख्या नानाविध तंत्राचा वापर केला. आपल्या काही नाटकांतून ग्रीक मिथ्यकथांना त्याने आधुनिक रूप दिले आणि ग्रीक रंगभूमीवरील ‘वृंदा’चा (कोरस) वापर केला. त्याने केलेला भाषेचा वापरही वैशिष्ट्यपूर्ण होता. आर्ष भाषिक प्रयोग, लोकबोली, जुनी पोलिश वाक्यरचना ह्यांचा त्याने कल्पकतेने उपयोग करून घेतला. नियती-मानव-संघर्ष, मानवी जीवनाची मूलभूत शोकात्मता, पोलंड आणि त्याचे ऎतिहासीक भागध्येय हे त्याच्या नाटकातील महत्त्वाचे विषय होत.
क्रेको येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.