व्हिन्सेंझ : फ्रान्सच्या उत्तरमध्य भागातील व्हाल-द-मार्न विभागातील एक औद्योगिक नगर व पॅरिसचे पूर्वेकडील निवासी उपनगर. लोकसंख्या ४२,८५२(१९८२). पॅरिसच्या पूर्वेकडील शहरसीमेलगतच मार्न आणि सेन नद्यांच्या दरम्यान हे नगर वसले आहे. नोत्रदाम कॅथीड्रलपासून ६·५ किमी.वर हे ठिकाण आहे.

पूर्वी या ठिकाणी तटबंदीयुक्त शिकारी वस्ती होती. बाराव्या शतकात याच जागेवर शातोची (शाही निवासस्थान/किल्ला) उभारणी करण्यात आली. नवव्या लूईचे हे विशेष आवडते स्थळ होते. येथील जंगलातील ओक वृक्षाखाली बसून न्यायदानाचे काम करणे त्याला खूप आवडे. फ्रान्सच्या अनेक राजांपैकी पाचवा चार्लस्, नववा चार्लस् व पहिला फ्रान्सिस यांचे येथील किल्ल्यात वास्तव्य असे. या शातोभोवतीच नगराचा विस्तार झालेला आहे. या शातोमध्ये चार प्रमुख वास्तू असून त्यांभोवती नऊ मनोऱ्यांसह तटबंदी आहे. त्यांपैकी चौदाव्या शतकातील कीप ही वास्तू अतिशय दिमाखदार आहे. फ्रान्समधील जुन्या सुंदर वास्तूंपैकी ही एक आहे. व्हर्सायची उभारणी होईपर्यंत येथे शाही निवासस्थान होते. सेंट चॅपेल या दुसऱ्या भव्य वास्तूची (किल्ल्याची) बांधणी १३७९ – १५२२ या काळात करण्यात आली. ही वास्तू आलंकारिक दर्शनी भागावर भर देणाऱ्या फ्रेंच गॉथिक शैलीतील असून खिडक्या भव्य व वाटोळ्या आहेत. पॅव्हिलॉन दू रॉय व पॅव्हिलॉन दे ला रेन हे दोन प्रकक्ष असून त्यांची रचना सतराव्या शतकात करण्यात आली. शाही निवासस्थान म्हणून या शातोचा वापर बंद झाल्यानंतर चिनी मातीची भांडी-निर्मितीचा कारखाना, सैनिकी शाळा व शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यासाठी त्याचा वापर करण्यात येऊ लागला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात १७९१मध्ये मार्की द लाफाएत याने हा राजवाडा उद्ध्वस्त होण्यापासून वाचविला. नेपोलियनने याचा वापर शस्त्रागार म्हणून केला. १८४०मध्ये त्याचे रूपांतर गढीमध्ये करण्यात आले. १९४४मध्ये पॅव्हिलॉन दे ला रेनच्या काही भागाची एका स्फोटामध्ये नासधूस झाली. हा शातो फ्रान्सच्या अनेक ऎतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. दहावा लूई, फिलिप, चौथा चार्लस् व नववा चार्लस् यांचे, तसेच इंग्लंडचा पाचवा हेन्री कार्डिनल माझारँ याचे देहावसान याच शातोमध्ये झाले. सतराव्या शतकात, तेराव्या लूईच्या कारकिर्दीत याचा तुरुंग म्हणून वापर होई. ग्रेट काँदे, कार्डिनल द रेट्स, दनी दीद्रो व काँत द मीराबो यांसारख्या ख्यातनाम व्यक्तींना येथेच कारावास घडला. पुढे या शातोचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले.

रेडिओ, विद्युत् व छायाचित्रण उपकरणे, टंकलेखन यंत्रे, सायकलींचे सुटे भाग, यंत्रे आणि यांत्रिक हत्यारे, तयार कपडे, छायाचित्र पटल, रबरी वस्तू, रसायने, औषधे इत्यादींच्या निर्मितीचे कारखाने येथे आहेत. भुयारी रेल्वेने हे ठिकाण पॅरिसशी जोडले आहे. येथील एका संग्रहालयात फ्रेंच वसाहतींच्या इतिहासविषयक, तर दुसऱ्या संग्रहालयात सैनिकी इतिहासविषयक वस्तूंचा संग्रह आहे.    

यूरोपातील सर्वांत प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयांपैकी एक या शहरात आहे. १८६० – ६७ या काळात येथील वनभूमीचे रूपांतर उद्यानात करण्यात आले. या भागात सरोवरे, सहलीची ठिकाणे, प्राणिसंग्रहालये, क्रीडागार, घोड्यांच्या शर्यतीचे मैदान इ. गोष्टी आहेत.                        

चौधरी, वसंत