व्हिटली कौन्सिल : ग्रेट ब्रिटनमध्ये मालक व मजूर अशा उभय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या व औद्योगिक संबंधात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या समितीला हे नाव प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१६ – १९) जे. एच. व्हिटली ह्यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक अशांततेची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली होती. ह्या समितीने केलेल्या शिफारशींपैकी औद्योगिक क्षेत्रात मालक व मजूर ह्यांचे प्रतिनिधित्व करणारी संयुक्त समिती असावी, अशी एक महत्त्वाची शिफारस होती. ही शिफारस सरकारने मान्य करून तदनुसार समित्या निर्माण केल्या. पुढे ह्या समित्या ‘व्हिटली कौन्सिल्स’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.

सुरुवातीच्या काळात ह्या समित्यंचे महत्त्वाचे कार्य औद्योगिक अशांततेचे निराकरण करणे, हे होते. कालांतराने त्यांच्या काऱ्याचे स्वरूप बदलत गेले. मालक व मजूर ह्यांच्यातील वेतनाबाबतच्या वाटाघाटींमध्ये तडजोड घडविण्याचा प्रयत्न करणे, ह्या कार्याला प्राधान्य मिळू लागले.    

व्हिटली कौन्सिलच्या निर्मितीमागे तडजोडीचे तत्त्व असल्याने औद्योगिक क्षेत्राबाहेरही त्यांची उपयुक्तता जाणवू लागली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या वर्षी नागरी सेवांच्या क्षेत्रात नॅशनल व्हिटली कौन्सिलची स्थापना करण्यात आली. भारतात ही पद्धत १९६३ मध्ये सुरू झाली. अशा मंडळांचे स्वरूप व्हिटली कौन्सिलप्रमाणेच असते.                                

हातेकर, र. दे.