प्रसिद्ध हॉफबर्ग राजवाडा, व्हिएन्ना.व्हिएन्ना : जर्मन व्हीन. ऑस्ट्रिया देशाची राजधानी आणि यूरोपातील ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध शहर. पूर्व व पश्चिम युरोपचे प्रवेशद्वार असलेले हे शहर लोहमार्ग प्रस्थानक व नदीबंदर म्हणूनही महत्त्वाचे आहे. लोकसंख्या १६,०६,८४३ (१९९८). देशाच्या ईशान्य भागात डॅन्यूब नदीच्या दक्षिण काठावर व्हिएन्ना वसले आहे. व्हिएन्नाजवळच डॅन्यूब नदीला व्हीन ही छोटीशी उपनदी येऊन मिळते. शहराचा विस्तार ४१५ चौ.किमी. क्षेत्रात झालेला आहे.

व्हिएन्नाच्या पश्चिमेस अल्पाईन प्रदेशाकडे उंचावत जाणारा ‘पॅनोनियन बेसिन’ हा प्रदेश आहे. व्हिएनाच्या पश्चिमेस, वायव्येस व दक्षिणेस वीनरवाल्ड (व्हिएन्ना वुड्स) हा पूर्व आल्प्स पर्वताच्या सोंडेचा हिमाच्छादित भाग आहे. व्हिएन्नाचे हवामान वैशिष्ट्यपूर्ण अशा अर्धखंडांतर्गत प्रकारचे असून जानेवारीचे सरासरी तापमान ०·५ से. व जुलैचे सरासरी तापमान १९·५ से. असते. सरासरी पर्जन्यमान सु. ६६ सेंमी. असते.

प्राचीन काळी व्हिएन्ना परिसरात केल्ट लोकांची वस्ती होती. इ.स.पू. १५ मध्ये हे रोमनांचे लष्करी व व्यापारी केंद्र बनले. व्हिंदाबॉना म्हणून त्याचा उल्लेख होतो. रोमन सम्राट मार्कस ऑरिलियस याचे येथे निधन झाले (इ.स. १८०). रोमन सत्ता संपुष्टात आल्यानंतर चौथ्या शतकाच्या उत्तरार्धापासून येथे वेगाने अनेक सत्तांतरे झाली. मग्यार लोकांच्या ताब्यात असतानाच याला व्हिएन्ना असे संबोधण्यात येऊ लागले. इ.स. ९५५ मध्ये झालेल्या लेखफेल्ट युद्धात जर्मन सम्राट ऑटो द ग्रेट याने मग्यार लोकांचा पराभव केल्यानंतर येथे जर्मन वस्ती बरीच वाढली. बाराव्या शतकात ऑस्ट्रियाच्या बॅबेनबर्ग ड्यूकने आपले कार्यालय व निवासस्थान येथे हलविले. तेव्हापासून व्हिएन्नाच्या प्रदीर्घ राजकीय इतिहासास प्रारंभ झाला.

हॅप्सबर्ग घराण्याचा पहिला रुडॉल्फ याने हे १२७८ मध्ये आपल्या ताब्यात घेतले. हॅप्सबर्गची ही राजधानी बनली तेव्हापासून शहराचा वेगाने विकास झाला. माराया टेरिसा राणीच्या कारकिर्दीत (१७४०-८०) व्हिएन्ना हे युरोपातील एक अग्रेसर सांस्कृतिक व ललित कालांचे केंद्र बनले. या काळात येथे बरोक शैलीतील सुंदर वास्तूंची निर्मिती झाली. येथील जुन्या विद्यापीठाचा (स्था. १६३५) विस्तार करण्यात आला. पहिल्या फ्रान्सिसच्या कारकिर्दीत ऑस्ट्रियन साम्राज्याचे हे प्रमुख ठिकाण होते. नेपोलियनने हे शहर दोनदा (१८०५ व १८०९) काबीज केले. १९०७ ते १९१३ या काळात ॲडॉल्फ हिटलरचे येथे वास्तव्य होते. १८१४-१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसचे हे प्रमुख ठाणे होते. १८४८ मधील क्रांतिकाळात हे प्रमुख केद्र बनले. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्हिएन्नाचे महत्त्वही बरेच कमी झाले. १९१८ मध्ये ही ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाची राजधानी बनली. दुसऱ्या महायुद्धात १९४५ पर्यंत नाझी सैन्याचा शहरावर ताबा होता. या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी शहरावर वारंवार बाँबहल्ले केल्यामुळे शहराचे प्रचंड नुकसान झाले. एप्रिल १९४५ मध्ये रशियन सैन्याने व्हिएन्ना जिंकले. १९४५-५५ या काळात रशिया व पश्चिमी राष्ट्रे यांची संयुक्त सत्ता यावर होती. १९५५ मध्ये एका करारान्वये व्हिएन्नातील सर्व विदेशी सैन्याच्या तुकड्या काढून घेण्यात आल्या. महायुद्धोत्तर काळात व्हिएन्ना हे आंतरराष्ट्रिय परिषदांचे, बैठकांचे अनेक आंतरराष्ट्रीय कार्यालयांचे केंद्र बनले आहे.

उद्योग व व्यापार हा व्हिएन्नाच्या अर्थकारणाचा मुख्य आधार आहे. यंत्रसामग्री, सुखवस्तू उत्पादने, विद्युत उपकरणे, मोटारगाड्या, कागद, कापड, औषधे, रसायने, लाकडी सामान, चामड्याच्या वस्तू, बांधकामाचे साहित्य, अन्न प्रक्रिया, दारू गाळणे, रेडिओ व दूरचित्रवाणी उत्पादने, रेल्वे कर्मशाळा, ओतशाळा, हस्तव्यवसाय, तेलशुद्धीकरण कारखाने इ. उद्योगधंदे येथे चालतात. १९७० च्या दशकात नवीन हॉटेले, तसेच भुयारी रेल्वेमार्ग उभारण्यात आले. परिसरात विविध फळे व भाजीपाल्याच्या बागा आढळतात. येथील पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे. १९५७ पासून संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेचे (आयईए) तसेच औद्योगिक विकास संघटनेचे कार्यालयही (यूएनआयडीओ) येथे आहे. रस्ते व लोहमार्ग यांचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आहे. व्हिएन्नाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आग्नेयीस १८ किमी. अंतरावरील श्फेकाट येथे आहे.

शहराचा जुना भाग (इनर सिटी) केंद्रस्थानी असून येथे अनेक ऐतिहासिक वास्तू, महत्त्वाची स्मारके तसेच आकर्षक बाजारपेठ आढळते. या भागाच्या मध्यभागी सेंट स्टीफनचे प्रसिद्ध चर्च आहे (बारावे शतक). तेराव्या शतकाच्या उत्तरार्धातील हॅप्सबर्ग राजकर्त्याचा हॉफबर्ग राजवाडा, चौदाव्या शतकातील फ्लेअर्स मिनोर (मिनोरीटेंकीची) व माराया ॲम ग्रेस्टेड हे चर्च. आर्चबिशपचा राजवाडा, राथौस (सिटी हॉल), बर्ग थिएटर, शॉनब्रून पॅलेस, विंटर पॅलेस, लिख्टेनश्टाइन पॅलेस, गॉथिक शैलीतील संसदभवन इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. सतराव्या शतकाच्या अखेरीस येथे बरोक वास्तुशिल्प बहरले. व्हिएन्नाची बरोक शैली दीर्घ काळ युरोपमध्ये लोकप्रिय ठरली. गॉथिक, बरोक तसेच आधुनिक शैलीच्या अनेक वास्तू येथे आढळतात. व्हिएन्ना हे वैशिष्टपूर्ण वास्तुकलेबाबत प्रसिद्ध आहे. येथे तीसपेक्षा अधिक संग्रहालये आहेत. कलासंग्रहालये विशेष प्रसिद्ध आहेत. हॉफबर्ग राजवाड्यात हॅप्सबर्ग व पवित्र रोमन साम्राज्यातील राजचिन्हांचा संग्रह आहे. याच राजवाड्यात आरेख्यक कलावस्तूंचा (ग्रॅफिक आर्ट) जगातील सर्वांत मोठा संग्रह आहे. व्हिएन्नातील प्रसिद्ध व्यक्तींच्या निवासस्थानांतही संग्रहालये आहेत. अनेक सार्वजनिक उद्याने व बागा येथे आढळतात. बरगार्टन व व्हॉक्सगार्टन ही व्हिएन्नातील विशेष सुंदर उद्याने आहेत. येथील व्हिनर मेसी (स्था. १९२१) ही वार्षिक औद्योगिक जत्रा प्रसिद्ध आहे. व्हिएन्ना ही पाश्चिमात्य जगातील संगीताची सु. शतकभर राजधानी होती. अनेक जगप्रसिद्ध संगीततज्ञांचे येथे वास्तव्य होते. येथील वाद्यवृंदही विख्यात आहेत. अनेक जगप्रसिद्ध चित्रकारही येथे होऊन गेले. व्हिएन्ना विद्यापीठ (स्था. १३६५), व्हिएन्ना तांत्रिक विद्यापीठ (१८१५) व इतर अनेक उच्च शिक्षणसंस्था शहरात आहेत.

चौधरी, वसंत