व्हाललीन, यूहान यूलॉव्ह : (१५ ऑक्टोबर १७७९–३० जून १८३९). स्वीडिश कवी आणि धर्मोपदेशक. जन्म डालकार्लिआ (डालर्ना) येथे. शिक्षण अपसाला विद्यापीठात. १८०६ मध्ये त्याला धर्माधिकाराची दीक्षा मिलाली. १८३७ मध्ये तो स्वीडनचा आर्चबिशप झाला. व्हाललीनची वाड्मयीन कीर्ती मुख्यत: त्याने रचिलेल्या सुंदर स्तोत्रांवर आधिष्ठित आहे. त्याचप्रमाणे काही जुन्या तसेच अन्य देशांतील सामगीतांचे (धर्मगीते वा ईशस्तवन गीते) स्वीडिश अनुवाद त्याने केले. मृत्यू आणि अंतिम निवाडा ह्या विषयावरील ‘एंजल ऑफ डेथ’ (१८३४, इं.शी.) ही त्याची सर्वोत्कृष्ट कविता समजली जाते. लौकिक विषयांवरील काही कविताही त्याने लिहिल्या, तथापि त्याच्या धार्मिक काव्यरचनेतली उत्कटता त्यांत आढळून येत नाही. आयुष्याच्या अखेरीअखेरीस त्याने डालकार्लिआ ह्या आपल्या जन्मभूमीच्या परिसरावर काही कविता लिहिल्या. त्याचे संकलित साहित्य प्रथम १८४७-४८ मध्ये प्रसिद्ध झाले. पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.
अप्साला येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.