व्हायोलेलीझ : द्विदलिकित वनस्पतींच्या वर्गातील एक गण [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग]. व्हायोलेट [→ व्हायोला] ही या गणातील सर्वांत परिचित वनस्पती होय. या गणात नऊ कुले, ११७ प्रजाती व १,९७५ जाती आहेत. यातील वनस्पती मुख्यतः क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून काही ⇨ औषधी आहेत.
व्हायोलेलीझ गणातील बहुतांश वनस्पती काष्ठयुक्त, बहुवर्षायू आहेत. त्यांची पाने साधी, एकांतरित (एका आड एक) असून त्यांची खोडावरील मांडणी सर्पिल असते व पानांच्या देठांच्या तळाशी उपपर्णांची जोडी असते. फुलात सामान्यतः पाच संदले व पाच प्रदले असतत व त्यांची सममिती अरीय (त्रिज्यीय) किंवा द्विपार्श्व असते. बहुतेक जातींत फुले द्विलिंगी (नर व मादी प्रजोत्पादक अवयव एकाच फुलात असणारी) असतात. एका प्रजातीचा अपवाद सोडल्यास या गणातील बाकी सर्व प्रजातींत बीजकविन्यास तटलग्न असतो. तटलग्न बीजकाविन्यासात बिया फळाच्या आतील भित्तीला चिकटलेल्या असतात [→ फूल] सामान्यतः फळ शुष्क संपुट असून बिया बाहेर पडण्यासाठी त्यास पुष्कळ छिद्रे असतात.
व्हायोलेलीझ गणातील व्हायोलेसी व सिस्टॅसी कुलांखेरीज बाकी सर्व कुलांचा प्रसार उष्ण कटिबंधापुरता मर्यादित आहे. त्यांतील वनस्पती लहान वृक्ष व झुडपे असून वनांतील मोठ्या वृक्षांच्या छायेत वाढतात. त्या वनस्पती त्या भागांतील प्रमुख वनस्पती म्हणून क्वचितच आढळतात. या गणातील वनस्पतींचे आर्थिक महत्त्व मर्यादितच आहे, तरीही काहींपासून अन्न व रंग मिळतात, तर काही शोभिवंत वनस्पती आहेत.
फ्लॅकोर्टिएसी (अत्रुण कुल) हे मोठे कुल असून त्यातील अनेक जातींपैकी अगदी थोड्यांना उष्ण कटिबंधात लहान फळे येतात. याच कुलातील सिलोन गुजबेरी (डोव्हिॲलिस हेबेकार्पा) या दुसऱ्या जातीची अमेरिकेच्या दक्षिण फ्लॉरिडा व कॅलिफोर्निया या दोन्ही राज्यांत खाद्य फळांसाठी लागवड करतात. ⇨ बिक्सेसी कुलातील ⇨ केसरी ह्या वृक्षाची लागवड उष्ण कटिबंधात करतात. [→ फ्लॅकोर्टिएसी].
प्रदीर्घ काल मानवोपयोगी ठरलेले व्हायोलेसी कुल आहे. त्यातील वनस्पती सर्व खंडांत आढळतात. व्हायोलेट या शोभिवंत वनस्पतीचे रानटी व लागवडीतील प्रकार उद्याने, बागा, बगीचे यांमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून सर्वत्र लोकप्रिय आहेत. व्हायोला या प्रजातीमध्ये असंख्य अन्य जातींचा समावेश होतो. यांच्या रानटी जातींची फुले छोटी असतात, पण उद्यानविद्यावेत्त्यांनी मोठ्या फुलांचे संकरित प्रकार विकसित केले आहेत. रानटी व्हायोलेट या जातींचा कधीकधी अन्न व फ्रेंच सुगंधी द्रव्यात चांगला घटक म्हणून उपयोग होतो.
सिस्टॅसी कुलातील वनस्पतींचा प्रसार जगभर आहे.त्यातही पुष्कळ लहान शोभिवंत वनस्प्ती आहेत. रॉकरोझच्या (शैल-गुलाब) सिस्टस या प्रजातीतील किमान वीस जाती मूळच्या भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून, तेथून त्या उत्तर अमेरिकेत नेऊन तेथे त्यांची शैलोद्यानांत लागवड होत आहे. सनरोझ (सूर्य गुलाब, हेलिअँथेमम प्रजाती) ही वनस्पतीही सिस्टॅसी कुलातील आहे.
व्हायोलेलीझचे थीएलीझशी [चैन (चहा) गणाशी] जवळचे संबंध आहेत.
जमदाडे, ज. वि.