व्हायकिंग : उत्तर युरोपातील नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलंड, डेन्मार्क इ. स्कँडिनेव्हियन देशांतील चाचेगिरी करणाऱ्या युद्धखोर लोकांचे सामूहिक नाव. या टोळ्यांतील व्यक्तीला नॉर्समन किंवा नॉर्थमन असेही म्हणतात. व्हायकिंग टोळ्यांनी युरोपच्या किनाऱ्यावर इ.स. नवव्या ते अकराव्या शतकापर्यंत अनेक धाडी घातल्या आणि दहशत निर्माण केली. त्यामुळे या कालखंडाला व्हायकिंग युग म्हणतात. ‘व्हिक’ म्हणजे छावणी किंवा आइसलँडिक भाषेतील ‘व्हिक’ म्हणजे उपसागर वा खाडी या शब्दांपासून व्हायकिंग हा शब्द तयार झालेला असावा. या आक्रमक लोकांच्या लुटालुटीच्या व हल्ल्यांच्या अनेक कथा व दंतकथा प्रचलित आहेत. ताम्रपाषाणयुगीन कालखंडात स्कँडिनेव्हीयन देशांत शेतकरी, मच्छीमार आणि शिकारी टोळ्या यांचा स्वायत्त समाज होता. त्यांची लहान लहान राज्ये होती. शेती तथा मच्छीमारी हे व्हायकिंग लोकांचे मूळ व्यवसाय होते. नौकानयनात व जहाजबांधणीत ते तरबेज होते. ह्यांची लढाऊ जहाजे सामान्यतः प्रशस्त (२१ x६ मी.) व उथळ असत. प्रत्येक जहाजावर तीस-चाळीस वल्ही मारणारे व अन्य सशस्त्र सेवक असा सु. शंभर लोकांचा ताफा असे.
व्यापाराची जबरदस्त लालसा, नौकानयनातील कौशल्य, असीम धाडस, हालचालीतील चापल्य व गुप्तता, प्रभावी शस्त्रास्त्रांचा वापर व कमालीचे क्रौर्य यांसारख्या गुणविशेषांमुळे व्हायकिंग टोळ्यांनी अवघ्या युरोप खंडात दशहत निर्माण केली होती. ‘व्हायकिंग वा नॉर्थमेन लोकांपासून आम्हाला वाचव’, ही तत्कालीन ख्रिस्ती लोकांची नित्याची प्रार्थनाच होऊन बसली होती. ते जवळपासच्या देशांवर सतत हल्ले करीत.
उत्तरेकडील ह्या टोळ्यांना सामान्यतः व्हायकिंग किंवा नॉर्थमेन म्हणत पण त्यांचे तीन गट असून प्रत्येकाचे वेगळे व स्वतंत्र संचारक्षेत्र असल्याचे मध्ययुगीन इतिहाससाधनांवरून दिसते. या तीनही गटांनी केवळ लूटमार केली असे नव्हे, तर काही स्वतंत्र वसाहतीही स्थ्रापन केल्या. स्वीडनमधील व्हायकिंग टोळीने बाल्टिक समुद्रातून रशियात संचार केला तसेच त्यांचा पुढारी रूरिक याने रशियन प्रदेशात काही ठाणी बसविली व तेथून कॉन्स्टँटिनोपलवर हल्ले करून रोमन बादशहाकडून अपार खंडणी वसूल केली. ह्या टोळ्यांना व्हॅरनजिअन म्हणत. कालांतराने ह्या टोळीतील लोक रशियन व तुर्की समाजात मिसळून गेले.
डेन्मार्कमधील व्हायकिंगांनी फ्रान्स इंग्लंडादी पश्चिम युरोपीय देशांवर स्वाऱ्या करून तेथील सत्ताधीशांकडून वारंवार खंडणीही वसूल केली. फ्रान्स व इंग्लंडमध्ये त्यांनी वसाहतीही स्थापन केल्या. रॉलो या व्हायकिंग पुढाऱ्याने फ्रान्समधील नॉर्मंडीचे राज्य जिंकले. इंग्लंडचा राजा ॲल्फ्रेड द ग्रेट याने त्यांना यशस्वीपणे टक्कर दिली पण कालांतराने एथेलरेड राजाचा पराभव करून स्व्हेन व कान्यूट ह्या व्हायकिंग पुढाऱ्यांनी इंग्लंडमध्येही सत्ता स्थापन केली.
नॉर्वेतील व्हायकिंगांनी आयर्लंड, स्कॉटलंड, आइसलँड, ग्रीनलँड अशा दूरदूरच्या देशांवर स्वाऱ्या केल्या. त्यावरून त्यांच्या नौकानयन कौशल्याची व धाडसाची कल्पाना येते. नॉर्वेजियन दंतकथांनुसार जॉर्नी हरजुल्फसाँ हा व्हायकिंग खलाशी वादळात सापडून अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत गेला. त्याचा मुलगा एट्रिकसन हा तर प्रत्यक्ष अमेरिकेत काही काळ वसाहत करून राहिलाही होता पण ही वसाहत फार काळ टिकली नाही.
स्कँडिनेव्हियात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाल्यावर, तसेच नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क या व इतर युरोपीय राजसत्तांचा उदय व विस्तार होऊ लागल्यानंतर व्हायकिंग टोळ्यांच्या विध्वसंक आक्रमणाला आळा बसला. त्याबरोबरच त्या त्या देशांतील लोकांत व्हायकिंग लोक मिसळले, तेथील व्यापारउदीमात सहभागी झाले आणि स्थानिक लोकांशी त्यांचा संकरही घडून आला.
नौकानयन, युद्धशास्त्र, भौगोलिक सर्वेक्षण-समन्वेषण-संशोधन या क्षेत्रांतील व्हायकिंगांची कामगिरी मोलाची आहे. त्यांच्या कथा-दंतकथांनी व वीरगाथांनी युरोपीय साहित्य व संस्कृती यांतही मौलिक भर पडली.
संदर्भ : 1. Jones, Gwyn, A History of The Vikings, Oxford, 1984.
2. Logan, F. D. The Vikings in History, New York, 1983.
3. Magnusson, Magnus, Viking, Merrimack, 1985.
4. Wahlgron, Erik, The Vikings and America, London, 1985.
ओक, द. ह.