व्हलर (व्होलर), फ्रीड्रिख : (३१ जुलै १८००-२३ सप्टेंबर १८८२). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. यांनी १८२८ मध्ये सर्वप्रथम अकार्बनी द्रव्यापासून ⇨ यूरिया हे कार्बनी संयुग कृत्रिमरीत्या तयार केले. शुद्ध ॲल्युमिनियम धातू मिळविण्याची एक रासायनिक प्रक्रियाही त्यांनी विकसित केली (१८२७).
व्हलर यांचा जन्म फ्रँकफुर्ट आम मेन जवळील एशरशाइम येथे झाला. त्यांचे शिक्षण फ्रँकफुर्ट येथेच झाले. आपला बहुतांश वेळ ते आपल्या घरात रसायनशास्त्राचे प्रयोग करण्यात व्यतीत करीत. १८२० मध्ये त्यांनी मारबर्ग विद्यापीठात वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला. तेथून नंतर ते हायडल्बर्गला गेले. तेथे लिओपोल्ट मेलिन या रसायनशास्त्रज्ञांनी रसायनशास्त्र हे आपले कार्यक्षेत्र ठरविण्याचा सल्ला व्हलर यांना दिला. १८२३ मध्ये व्हलर यांनी वैद्यकाची पदवी संपादन केली, पण वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी युरोपातील श्रेष्ठ रसायनशास्त्रज्ञ ⇨ यन्स याकॉप बर्झीलियस यांच्याबरोबर स्टॉकहोम येथे रसायनशास्त्राचे अध्ययन करण्यास सुरुवात केली (१८२३-२४). पुढे व्हलर यांनी बर्झीलियस यांची स्वीडिश भाषेतील प्रमुख परीक्षणे व पाठ्यपुस्तके जर्मन भाषेत अनुवादित केली.
जर्मनीला परतल्यावर व्हलर यांनी बर्लियनमधील नगरपालिकेच्या तांत्रिक शाळेत रसायनशास्त्राच्या अध्यापनास आरंभ केला. १८३१ पर्यंत ते या शाळेत राहिले व तेथेच त्यांनी दोन विख्यात शोध लावले. पूर्वी यूरिया हे शुद्ध प्राणिज (कार्बनी) द्रव्य आहे, असे मानीत. पण १८२८ मध्ये व्हलर यांनी अमोनियम सायनेट या अकार्बनी संयुगापासून उत्ताप विच्छेदनाने यूरियाचे संश्लेषण (कृत्रिमरीतीने निर्मिती) केले. कार्बनी संयुगे फक्त निसर्गात कुठल्या तरी अज्ञात शक्तीमुळे तयार होतात व माणसाला ती तयार करता येत नाहीत, अशी तोपर्यंत समजूत होती.
इ. स. १८३२ नंतर ⇨ युस्टुस फोन लीबिक व व्हलर या दोघांनी कडू बदामाच्या तेलावर (बेंझाल्डिहाइडावर) संशोधन सुरू केले व त्यावरून मूलक सिद्धांत पुढे आला. कार्बनी संयुगांची संरचना समजून घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. [→ कार्बनी रसायनशास्त्र].
व्हलर यांची १८३६ मध्ये गटिंगेन विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी अनेक मूलद्रव्ये व नवी खनिजे अलग केली आणि यूरिक अम्ल व कोकेन यांसारख्या शरीरक्रिया वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या संयुगांचे अनुसंधान केले. लीबिक यांच्या मदतीने त्यांनी आपले काम पुढे सुरू ठेवले.
Liebigs Annalen der Chemie ह्या प्रमुख रसायनशास्त्रीय नियतकालिकाचे व्हलर एक संपादक होते. त्यांना अनेक पदके व पुरस्कार मिळाले होते. गटिंगेन येथे ते मरण पावले.
जमदाडे, ज. वि.