व्हँडरबिल्ट घराणे : अमेरिकेतील जहाज-वाहतूक आणि रेल्वे या क्षेत्रांतील एक कर्तबगार व सधन उद्योजक घराणे. कॉर्नेलिअस व्हँडरबिल्ट (२७ मे १७९४-४ जानेवारी १८७७) हा या उद्योगसमूहाचा आद्य प्रवर्तक. जन्म पोर्ट रिचमंड (न्यूयॉर्क राज्य) येथे. त्याचे वडील गरीब डच शेतकरी होते. सोळाव्या वर्षी आईकडून शंभर डॉलर उसने घेऊन त्याने एक बोट विकत घेतली व न्यूयॉर्क शहर आणि स्टेटन बेटाच्या दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सुरू केली. कमी भाडे आकरून त्याने व्यावसाय वाढविला. १८१२ च्या युद्धात न्यूयॉर्क सभोवतालच्या ठाण्यांना रसद पुरविण्याचे कंत्राट मिळाल्याने त्याला भरपूर नफा झाला. त्यातून त्याने वेगवान बोटी विकत घेऊन व्यवसायाची वाढ केली.

त्याने १८१८ साली वाफेवर चालणाऱ्या बोटींच्या व्यवसायाकडे मोर्चा वळविला. कॉर्नेलिअसने प्रवासी बोटीच्या धंद्यातील टॉमस गिबन याच्याकडे नोकरी धरली. इतर कंपन्यांशी स्पर्धा करून त्याने गिबनची कंपनी उर्जितावस्थेला आणली. १८२९ मध्ये त्याने ही नोकरी सोडली आणि अत्यंत अल्प भांडवलावर न्यूयॉर्क ते पिक्सिल् अशी स्वतःची जहाज-वाहतूक सेवा सुरू केली. इथेही भाड्याचे दर अतिशय कमी ठेवून त्याने आपल्या स्पर्धकावर मात केली. पुढे ‘हडसन रिव्हर असोसिएशन’ या कंपनीने कॉर्नेलिअसला भरमसाट मोबदला देऊन हडसन नदीवरील जहाज-वाहतूक सोडून देण्यास राजी केले.

वयाची चाळिशी गाठेतोवर कॉर्नेलिअसची संपत्ती पाच लक्ष डॉलर झालेली होती. १८४९ नंतर कॅलिफोर्निया राज्यातील सोन्याच्या खाणींकडे जाण्याकरिता पश्चिमेकडे माणसांचा ओघ सुरू झाला. कॉर्नेलिअसने ६०० किमी. चा दोन दिवसांचा प्रवास कमी करून इतरांपेक्षा निम्म्या भाड्यात निकाराग्वाच्या मार्गाने प्रवाशांना कॅलिफोर्नियाला पोहोचवायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा व्यवसाय जोरात चालला. पुढे त्याने हा व्यवसाय ‘निकाराग्वा ट्रॅन्झिट कंपनी’ ला विकला. परंतु ती कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्याच मार्गावर पुन्हा आपल्या काही बोटी चालवून दोन वर्षांच्या अवधीतच निकाराग्वा ट्रॅन्झिट कंपनी बंद पाडली.

बोट-वाहतुकीच्या व्यवसायात १८५० पर्यंत कॉर्नेलिअसने आपला जम बसविला होता. पुढील काळात रेल्वेला महत्त्व येणार असल्याचे ओळखून त्याने न्यूयॉर्क-हार्लेम रेल्वेमार्ग विकत घेतला. कॉर्नेलिअसने विल्यम किसाम (१८४९-१९२०) या आपल्या मुलाला या नवीन कंपनीचे उपाध्यक्ष केले व ‘हडसन रिव्हर रेलरोड’ या डबघाईस आलेल्या कंपनीवर ताबा मिळवून ती हार्लेम कंपनीशी जोडण्याचे ठरविले. त्या कंपनीने विक्रीस काढलेले सर्व समभाग स्वतः विकत घेऊन कॉर्नेलिअसने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा डाव हाणून पाडला. अखेर १८६७ मध्ये त्याने ‘सेंट्रल रेलरोड’ ही कंपनी विकत घेऊन ती ‘हडसन रिव्हर रेलरोड’ मध्ये विलीन केली. ही नवी कंपनी हार्लेम कंपनीला भाड्याने चालवायला दिली. १८७६ मध्ये त्याने ‘ईअरी रेलरोड’ या कंपनीवर ताबा मिळविण्याचाही प्रयत्न केला. या व्यवहारात बनावट समभागांमुळे कॉर्नेलिअसचे मोठेच नुकसान झाले. १८७३ मध्ये कॉर्नेलिअसने आपली रेल्वे सेवा शिकागोपर्यंत वाढविली.

आयुष्याच्या अखेरच्या पर्वात सेंट्रल विद्यापीठाला दहा लक्ष डॉलरची आणि न्यूयॉर्क शहरातील ‘चर्च ऑफ द स्ट्रेंजर्स’ ला ५० हजार डॉलरची देणगी दिली. पुढे सेंट्रल विद्यापीठाचे नामकरण व्हँडरबिल्ट विद्यापीठ असे झाले. कॉर्नेलिअस ह्याने उत्पादक धंद्यांत आणि बँकिंग व्यवसायात बरीच गुंतवणूक केली होती. त्याचे व्यावसायिक वर्तन नीतिमत्तेला धरून नव्हते, हे उघडच आहे. त्याच्या असल्या वर्तनामुळे भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण होऊन अनेक कंपन्या बंद पडल्या. मृत्युसमयी त्याची संपत्ती १० कोटी डॉलर इतकी, म्हणजे त्या वेळेच्या कोणाही श्रीमंत अमेरिकनांपेक्षा अधिक होती. न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

कॉर्नेलिअसचा ज्येष्ठ मुलगा विल्यम हेन्री (३ मे १८२१-८ डिसेंबर १८८५) प्रकृतीने अशक्त व इतरांच्या दृष्टीने फारसा महत्त्वाकांक्षी नव्हता. वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्याने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न केले. त्यामुळे कॉर्नेलिअसने त्याची रवानगी स्टॅटन बेटावरील शेतावर केली. ही शेती त्याने भरभराटीला आणून वडिलांना आर्श्चयाचा धक्काच दिला. पुढे त्याने वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीत दुपटीने वाढ केली. १८५७ मध्ये त्याने दिवाळखोरीत निघालेली ‘स्टॅटन इनलँड रेलरोड’ ही कंपनी वडिलांकडून चालवायला घेतली व लवकरच ती सुस्थितीत आणून सोडली. १८६४ मध्ये तो न्यूयॉर्क व हार्लेम रेलरोडचा व पुढल्याच वर्षी न्यूयॉर्क व हडसन रेलरोडचा उपाध्यक्ष झाला. वडिलांच्या निधनानंतर विल्यमची व्यवस्थापकीय क्षमता प्रकर्षाने दिसून आली. त्याने अनेक नवे रेल्वेमार्ग सुरू केले. परंतु प्रकृती साथ देईनाशी झाल्यावर आपल्या कंपन्यांमधील अधिकारपदे सोडायला सुरुवात केली. आपल्या दानशूरपणाने त्याने व्हँडरबिल्ट घराण्याची कीर्ती वाढविली. व्हँडरबिल्ट विद्यापीठाला आणि कोलंबियाच्या ‘कॉलेज ऑफ फिजिशिअन्स अँड सर्जन्स’ या संस्थांना त्याने भरघोस देणग्या दिल्या. न्यूयॉर्क शहरातील पाचव्या मार्गावर (फिफ्थ ऍव्हेन्यू) त्याने चित्रकलेचे व मूर्तिकलेचे एक उत्तम संग्रहालय स्थापन केले. न्यूयॉर्क शहरात त्याचे निधन झाले. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्याने मेट्रोपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट, वाय. एम. सी. ए., निरनिराळ्या चर्चसंस्था आणि रुग्णालयांना भरपूर देणग्या दिल्या होत्या.

कॉर्नेलिअस (१८४३-९९), विल्यम किसाम (१८४९-१९२०), फ्रेडरिक विल्यम (१८५६-१९३८) व जॉर्ज वॉशिंग्टन (१८६२-१९१४) ही विल्यम हेन्रीची चार मुले. व्हँडरबिल्ट घराण्याची ही तिसरी पिढी होय. त्यांच्यापैकी कॉर्नेलिअसने घराण्याची मालमत्ता वाढविण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. विल्यम किसाम हा कॉर्नेलिअसच्या बरोबरीने घराण्याच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळीत असे परंतु त्याला घराण्याच्या व्यवसायात फारसा रस होता, असे दिसत नाही. १९०३ मध्ये त्याने रेल्वे कंपन्या इतरांना चालवायला दिल्या आणि स्वतःचे लक्ष दानधर्म, सामाजिक कार्य आणि खेळांकडे वळविले. ‘मेट्रोपॉलिटन ऑपेरा’ व कलासंग्रहाच्या कामात त्याने विशेष लक्ष घातले. शिडाच्या गलबतांच्या शर्यतीत भाग घेऊन त्याने १८९५ मध्ये अमेरिकेचे विजेतेपद कायम राखले. फ्रेडरिक हा रेल्वेमार्गांच्या व्यवस्थापनात कुशल व क्रीडानौका तज्ज्ञ होता. विल्यम हेन्रीचा सर्वांत धाकटा मुलगा जॉर्ज वॉशिंग्टन ह्याला तर घराण्याच्या व्यवसायात काडीमात्रही रस नव्हता. त्याने नॉर्थ कॅरोलायना संस्थानातील ऍशव्हियजवळ ‘बाल्टिमोर’ नावाची मोठी मालमत्ता निर्माण केली आणि तेथे शास्त्रीय पद्धतीची शेती, जनावरांची पैदास आणि वनशेती यांचा विकास केला. न्यूयॉर्कचे सार्वजनिक वाचनालय, कोलंबिया विद्यापीठ आणि अमेरिकन फाइन आर्ट सोसायटी ह्या संस्थांना त्याने भरपूर देणग्या दिल्या.

तिसऱ्या पिढीतील दुसरा कॉर्नेलिअस ह्याला तीन मुले होती. त्यांपैकी कॉर्नेलिअस (तिसरा) (१८७३-१९४२) ह्याने वित्तीय क्षेत्रात नाव कमविले तर आल्फ्रेड ग्विन (१८७७-१९१५) व रेजिनाल्ड क्लेपूल (१८८०-१९२५) ह्या दोघांनाही प्रदर्शनीय अश्वांची आवड होती. तसेच तिसऱ्या पिढीतील विल्यम किसाम याला दोन मुले होती, त्यांपैकी विल्यम किसाम (१८७८-१९४४) व हॅरल्ड स्टर्लिंग (१८८४-१९७०) हे दोघेही न्यूयॉर्क सेंट्रल रेलरोडचा कारभार पाहत असत. त्यांच्यापैकी हॅरल्ड स्टर्लिंग ह्याने कॉंट्रॅक्ट ब्रिज हा खेळ शोधून काढला व शीडजहाज शर्यतीत अमेरिकन चषक तीनदा जिंकला. कॉर्नेलिअस (तिसरा) ह्याचा मुलगा कॉर्नेलिअस ज्युनिअर (१८९८-१९७४) हा लेखक होता व त्याने साखळी वर्तमानपत्रे सुरू केली.

संदर्भ : 1. Hoyt, E. P. The Vanderbilts and Their Fortunes, Toronto, 1962.

            2. Vanderbilt, Cornelius, Jr. Man of the World : My Life on 5 Continents, London 1959.

हातेकर, र. दे.