व्हर्दन : फ्रान्समधील लॉरेन प्रदेशाच्या म्यूज विभागातील एक शहर. लोकसंख्या २१,५१६ (१९८२). फ्रान्सच्या ईशान्य भागातील हे शहर पॅरिसच्या ईशान्येस २१३ किमी. तर मेट्सच्या पश्चिमेस ५६ किमी. म्यूज नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे.

प्राचीन काळी गॉल लोकांची येथे एक गढी होती. व्हेरड्यूनम (मोठी गढी) या केल्टिक नावावरून व्हर्दन हे नाव आले असावे. रोमन काळात हे एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते. त्या काळी व्हर्दन हे बिशपच्या अखत्यारीत होते. ८४३ मधील व्हर्दन करारानुसार येथील शार्लमेनची सत्ता त्याच्या तीन नातवांनी तीन प्रदेशांत विभागली. दहाव्या शतकात जर्मन हल्लेखोरांनी व्हर्दन काबीज केले. त्यानंतर दोन बिशपांच्या अमलाखालील मेट्स व तूल ही स्थळे व्हर्दनला जोडण्यात आली. १५२२ मध्ये फ्रान्सच्या दुसऱ्या हेन्रीने पवित्र रोमन साम्राज्याकडून व्हर्दनसह तिन्ही बिशपची ठिकाणे काबीज केली. तत्पूर्वी व्हर्दन हे मुक्त सार्वभौम नगर होते. १६४८ मधील वेस्ट फेलिया शांतता करारानुसार तीस वर्षांचे युद्ध संपुष्टात आले व व्हर्दन फ्रान्सच्या ताब्यात गेले. चौदाव्या लूईच्या कारकिर्दीत फ्रेंच सैनिकी अभियंता सेबास्तॅन व्होबां याने नगराभोवती तटबंदी उभारली. तेव्हापासून व्हर्दन एक मोक्याचे ठिकाण बनले. १७९२ मध्ये प्रशियनांनी व्हर्दन अल्पकाळ काबीज केले. १८७० मध्ये पुन्हा ते प्रशियनांनी जिंकले व १८७३ पर्यंत ते त्यांच्या ताब्यात राहिले. पहिल्या महायुद्धकाळात व्हर्दनच्या परिसरात मोठ्या लढाया झाल्या (१९१६). जर्मन व फ्रेंच यांच्यातील व्हर्दनची लढाई प्रसिद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात जर्मनांनी व्हर्दन सहज काबीज केले (१९४०). १९४४ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी त्याच्यावर ताबा मिळविला. दोन्ही महायुद्धांत नगराची खूप हानी झाली. युद्धोत्तर काळात शहराची पुनर्रचना करण्यात आली. व्हर्दनची युद्धभूमी, तेथील स्मशानभूमी व मनोवेधक स्मारके ही राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची व पवित्र मानली जातात. अकराव्या शतकातील कॅथीड्रल, सतराव्या शतकातील नगरभवन या येथील उल्लेखनीय वास्तू आहेत. नगरभवनात लष्करी वस्तुसंग्रहालय आहे. व्हर्दन हे वाहतुकीच्या दृष्टीने एक मोक्याचे ठिकाण असून माल्ट (धान्याचे सत्त्व), मद्ये, मेवामिठाई इ. निर्मिती तसेच अन्नप्रक्रिया, धातुकाम व छपाई हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत.

चौधरी, वसंत