व्यावसायिक चिकित्सा : (ऑक्यूपेशनल थेरपी). एखाद्या अर्थपूर्ण, आनंददायक, विधायक तसेच सर्जनशील कामात किंवा उपक्रमामध्ये गुंतवून घेतल्यास शरीरावर आणि मनावर त्याचा चांगला परिणाम होतो, ही बाब फार पूर्वी ज्ञात झालेली असावी. व्यावसायिक चिकित्सेमध्ये प्रामुख्याने याच तत्त्वाचा उपयोग करून रुग्णाला त्याचे स्वास्थ्य आणि क्षमता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीकरिता ‘व्यवसायोपचार’, ‘व्यवसायचिकित्सा’, ‘व्यवसायी चिकित्सा’, ‘व्यवसायप्रधान चिकित्सा’ या मराठी व ‘वर्क थेरपी’ आणि ‘अर्गो थेरपी’ या इंग्रजी संज्ञादेखील वापरल्या जातात.
इतिहास : रुग्णांवरील उपचारांसाठी मानवी उपक्रमांचा वापर करण्याचे प्रयत्न मध्ययुगीन काळापासून झालेले दिसतात. ऍस्क्लपाइडीझ (इ. स. पू. दुसरे ते पहिले शतक) या ग्रीक वैद्याने पहिल्यांदाच मानसिक व्याधींवर उपचार करण्यासाठी संगीताचा वापर केला. सीलीअस ऑरीलिएनसने मनोरुग्णांचे मन गुंतवून ठेवण्यासाठी वाचन, व्याख्याने व वादविवादसत्रे यांची शिफारस केली. राझी वा राझीझ (नववे-दहावे शतक) या पर्शियन वैद्याने विशण्णावस्थेतील मनोरुग्णांसाठी बुद्धिबळ या खेळाचा वापर केला होता, तर रोमन वैद्य ⇨सेल्सस (इ. स. पहिले शतक) याने उद्दीपन विकृतीच्या अवस्थेतील मनोरुग्णांना भरपूर व्यायाम देऊन दमविणे व शांत करणे हा उपाय वापरला.
व्यवसायी उपक्रमांचा नियमित वापर करण्याची सुरुवात अमेरिकेमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस झाली. विविध हस्तकला आणि कारागिरींचा उपयोग करून दीर्घकालीन आजार (उदा., कुष्ठरोग, क्षयरोग) झालेल्या रुग्णांना कार्यात गुंतवून ठेवणे (ऑक्यूपाय करणे), एवढे एकच प्रयोजन त्या काळात या चिकित्सेमागे होते. त्यामुळेच या चिकित्सापद्धतीला ‘ऑक्यूपेशनल थेरपी’ हे नाव पडले.
याच काळात मनोरुग्णांसाठी स्वयंरंजन व मनोरंजन (दुसऱ्या व्यक्तीकडून रंजन करून घेणे) या प्रकारच्या उपक्रमांचा वापर केला जाऊ लागला. मानसिक आघातामुळे होणाऱ्या मानसिक वेदना व यातना यांपासून रुग्णाचे मन दुसरीकडे वळविणे (डायव्हर्ट करणे) हे प्रयोजन त्यामागे होते. यामुळे या पद्धतीला ‘डायव्हर्शनल थेरपी’ असेदेखील संबोधले जाई.
पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात या चिकित्सेचे प्रयोजन विस्तृत झाले. रुग्णांमध्ये असणाऱ्यात शारीरिक व मानसिक क्षमतांचा सर्वाधिक वापर करून त्यांच्यातील उत्पादनशीलतेचा समाजासाठी उपयोग करून घेत त्यांचे पुनर्वसन करणे, असे या प्रयोजनाचे स्वरूप झाले. दीर्घकालीन शारीरिक रोग असणारे रुग्ण व मनोरुग्ण यांच्याबरोबरच युद्धामुळे विकलांग झालेल्या व्यक्तींसाठीसुद्धा ही पद्धती वापरली जाऊ लागली. या काळात ‘ऑक्यूपेशनल’ या संज्ञेचा वापर व्यवसायप्रधान (व्होकेशनल) या अर्थाने रूढ होऊ लागला. रुग्णाच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त विकास घडवून, त्याद्वारे सभोवतालच्या भौतिक तसेच सामाजिक अडचणींबरोबर जुळवून घेणे अथवा त्यांवर मात करणे व यासाठी लागणारी कौशल्ये व कार्यक्षमता प्रस्थापित करणे, असे या चिकित्सेचे विद्यमान स्वरूप आहे. पहिल्या महायुद्धानंतर उपचारज्ञांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्याचबरोबर या चिकित्सेचा प्रचार व प्रसार अमेरिकेशिवाय युरोप खंडामध्ये सर्वत्र झाला. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चिकित्सा सेवा आणि उपचारज्ञांचे प्रशिक्षण यांखेरीज संशोधन कार्याकडेदेखील लक्ष देण्यात येऊ लागल्याने व्यावसायिक चिकित्सेचे कार्यक्षेत्र खूप व्यापक झाले. व्यावसायिक चिकित्सा उपचारज्ञ आता बहुशाखीय तज्ज्ञांच्या मंडळामधील महत्त्वाचे सदस्य मानले जातात.
भारतात व्यावसायिक चिकित्सेची सुरुवात १९५२ साली झाली. कमला निंबकर (पूर्वाश्रमीच्या एलिझाबेथ क्वेकर) यांनी ही चिकित्सापद्धती भारतात आणली. मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये व्यावसायिक चिकित्सा विभाग सुरू झाला आणि त्याच हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू झाले.
व्याख्या : ‘‘व्यावसायिक चिकित्सा ही वैद्याकडून विहित केल्या जाणाऱ्या. वैद्यकीय उपचाराचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये रुग्ण अर्हताप्राप्त व्यावसायिक चिकित्सा उपचारज्ञाच्या देखरेखीखाली स्वत:ची अवस्था सुधारण्यासाठी विशिष्ट उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो’’, अशा प्रकारची व्याख्या पूर्वी केली जात असे. आता मात्र उपचारज्ञ स्वत:च रुग्णाची तपासणी आणि मूल्यमापन करून उपक्रम आणि अथवा बाह्य फेरबदल विहित करू शकतो. त्याचबरोबर केवळ रुग्णाची अवस्था सुधारणे एवढा एकच हेतू पुरेसा राहिलेला नाही. ‘रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली ऑफ अमेरिकन ऑक्यूपेशनल थेरपी असोसिएशन’ या संस्थेद्वारा केलेली व्याख्या अशी (मार्च १९८१) : ‘शारीरिक इजा अथवा आजारपण, मनोसामाजिक अकार्यक्षमता, विकासात्मक किंवा अध्ययनसंबंधी विकलांगता, गरिबी आणि सांस्कृतिक बदल किंवा वृद्धत्वाची प्रक्रिया या कारणांमुळे कमी पडणाऱ्या व्यक्तींसाठी, त्यांची स्वतंत्र जीवन जगण्याची क्षमता वाढविण्याकरिता, विकलांगता टाळण्याकरिता आणि स्वास्थ्य राखण्याकरिता प्रयोजनात्मक उपक्रमांचा वापर करणे म्हणजे व्यावसायिक चिकित्सा होय”.
कार्ये : निवडलेल्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास रुग्णाला प्रवृत्त करणे व हा सहभाग अधिकाधिक लाभदायक होण्यास साहाय्य करणे, हे व्यावसायिक चिकित्सेचे प्रमुख कार्य आहे. त्यामागचे सूत्र असे की, विहित उपक्रमाद्वारे रुग्णाचे मन रमावे, संबंधित शरीरयंत्रणेला चालना व सराव मिळावा आणि परिणामत: रुग्णाला त्या उपक्रमासाठी आवश्यक असे कार्य स्वतः स्वतंत्रपणे करता यावे. अशा सकारात्मक परिणामामुळे रुग्णाला अधिकाधिक स्वावलंबी होण्याची प्रक्रिया मिळत जाते. उपक्रम हे व्यावसायिक चिकित्सेचे मूलभूत साधन आहे. असंख्य मानवी उपक्रम उपलब्ध असल्यामुळे उपक्रमांचे योग्य प्रकारे वर्गीकरण करणे, रुग्णाची चिकित्सकीय तपासणी व मूल्यांकन करणे आणि योग्य असे उपक्रम निवडून रुग्णास त्यांमध्ये सहभागी करून घेणे अगत्याचे असते. उपलब्ध उपक्रमांचे वर्गीकरण साधारणतः पुढीलप्रमाणे केले जाते : शारीरिक स्वावलंबनसंबंधी, घरगुती, शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजनात्मक, अर्थार्जनाच्या कामासंबंधी इत्यादी.
काही वेळा एखाद्या रुग्णाच्या कार्य-मर्यादा तीव्र असतात व त्यामुळे त्यास उपक्रमामध्ये परिणामकारकपणे सहभागी होणे जमत नाही. अशा वेळी सभोवतालच्या वातावरणामध्ये (उदा., वास्तू, फर्निचर, पोषाख, व्यक्तिगत वापराची उपकरणे, घरगुती कामाची साधने इ.) आवश्यक असे फेरबदल करणे, हे व्यावसायिक चिकित्सेचे दुसरे प्रमुख कार्य आहे.
दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे करण्याची क्षमता पुन्हा प्राप्त झाल्यावर रुग्णाचा वातावरणामधील वावर सुगम होतो. तरीही जोपर्यंत रोजगार मिळविण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत रुग्णाचे पुनर्वसन पूर्ण झाले असे म्हणता येत नाही. म्हणूनच कार्य-कौशल्ये (वर्क स्किल्स), कार्य-सहिष्णुता (वर्क टॉलरन्स), कार्य-चिकाटी (वर्क एंड्युअरन्स) इ. रोजगारप्राप्तीसंबंधीच्या क्षमता स्थापित करणे अगत्याचे असते. औद्योगिक उपक्रमांच्या माध्यमाद्वारे रुग्णामध्ये तशी क्षमता विकसित होण्यास साहाय्य करणे, हे व्यावसायिक चिकित्सेचे तिसरे प्रमुख कार्य आहे. या तिसऱ्या पारंपरिक कार्यामुळेच व्यावसायिक चिकित्सा म्हणजे ‘काही काम करविणे’ असा गैरसमज रुजला आहे. प्रत्यक्षात या चिकित्सेमध्ये रुग्णास निश्चित व अर्थपूर्ण कामासाठी आवश्यक क्षमता प्राप्त करून दिली जाते.
चिकित्सा : शारीरिक विकार व विकलांगता आणि मानसिक विकार या दोन्ही प्रकारच्या अवस्थांसाठी व्यावसायिक चिकित्सेमध्ये वेगवेगळ्या कार्यप्रणाली आणि प्रतिमाने वापरण्यात येतात. यांखेरीज विकासात्मक समस्या असणाऱ्या बालरुग्णांसाठी व्यावसायिक चिकित्सेची वेगळी कार्यप्रणाली आहे.
शारीरिक विकार किंवा विकलांगता असणाऱ्या व्यक्तीसाठी मुख्य तीन कार्यप्रणाली आहेत. व्यक्तीची समग्र कार्यक्षमता प्रभावीपणे संघटित होऊन व्यक्ती सभोवतालच्या वातावरणामध्ये परिणामकारकपणे वावरू शकते व त्यातून त्या व्यक्तीचे पुनर्वसन होते, असे गृहीतक या कार्यप्रणालींमागे आहे. या कार्यप्रणाली पुढीलप्रमाणे :
(१) मज्जासंस्थेच्या विकासाच्या अंगाने चिकित्सा करणारी कार्यप्रणाली : (न्यूरोडिव्हेलपमेंटल ॲप्रोच). जन्मतः किंवा नंतर आघात झाल्याने ज्या व्यक्तीची केंद्रीय मज्जासंस्था अकार्यक्षम बनते, अशा व्यक्तीच्या उपचारांकरिता ही कार्यप्रणाली वापरतात. मज्जासंस्थेच्या अकार्यक्षमतेमुळे वेदनांचे (सेन्सेशन्स) मेंदूपर्यंत वहन होणे आणि/अथवा मेंदूकडून स्नायू किंवा ग्रंथी यांपर्यंत संदेश पोहोचवून कार्य घडवून आणणे, या प्रक्रियांमध्ये दोष निर्माण होतो. शिवाय या दोन प्रक्रियांमधील परस्पर-समन्वय बिघडतो. परिणामतः एका बाजूला वेदनांचे व्यवस्थित संघटन न झाल्याने वेदनांद्वारे उपलब्ध होणार्याी माहितीचे संवेदन (पर्सेप्शन) व्यक्ती नीट करू शकत नाही. त्यामुळे माहितीचा अर्थबोध होत नाही व अध्ययन परिणामकारकपणे होत नाही. दुसऱ्या बाजूला कारकक्रिया सुगमपणे होत नसल्याने व्यक्तीला वातावरणामध्ये सुलभ रीतीने वावरता येत नाही.
या कार्यप्रणालीनुसार चिकित्सा करताना अगोदर अशा व्यक्तीच्या विविध संवेदी-यंत्रणांना सुयोग्य पद्धतीने उत्तेजन देऊन त्यांद्वारे तिच्या मज्जासंस्थेला उद्दीपित केले जाते. उदा., वेगवेगळ्या पोतांच्या कपड्यांनी त्वचा घासून स्पर्शवेदन यंत्रणा उत्तेजित करतात. तसेच झोपाळ्याच्या साहाय्याने शरीरसंतुलनाची यंत्रणा उत्तेजित केली जाते. असे करण्याने मज्जासंस्था सुदृढ व परिपक्व बनते. वेदनांचे संघटन चांगले होते.
त्यानंतर आत येणाऱ्यास या वेदनांना योग्य प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक अशा हालचाली करण्याचे प्रशिक्षण व सराव व्यक्तीला दिला जातो. सुरुवातीला मज्जासंस्थेतील प्रतिक्षिप्त-प्रतिक्रिया, नंतर ठरावीक साच्यातील प्रतिसादात्मक कृती व शेवटी स्नायूंवरील ऐच्छिक नियंत्रण या क्रमाने हे प्रशिक्षण दिले जाते. प्रारंभी बाह्य आधाराची गरज असते. पण नंतर व्यक्ती स्वयंप्रेरणेने व स्वतंत्रपणे कारक-कृती करण्यावर प्रभुत्व मिळवेल, इतका वाव त्या व्यक्तीला दिला जातो.
वेदन व कारकप्रक्रिया यांच्यात समन्वय साधल्यावर, जरूर असल्यास संवेदनप्रक्रिया व्यवस्थितपणे व्हावी यासाठी संवेदन-प्रशिक्षण दिले जाते. त्याच्या आधारे व्यक्तीला आपल्या बौद्धिक व वैचारिक क्षमतांचा विकास करणे सुलभ होते.
चिकित्सा निश्चित करण्यापूर्वी वेदन, कारक तसेच संवेदन ह्या प्रक्रियांच्या प्रचलित अवस्थेचे मूल्यांकन केलेले असते. त्यानुसार चिकित्सेकरिता शारीरिक, स्वावलंबनसंबंधी, घरगुती आणि शैक्षणिक उपक्रम विहित केले जातात. आवश्यकता भासेल, त्याप्रमाणे बंधफलक (स्प्लिंट्स), कॅलिपर आदी उपकरणांचा वापर केला जातो. ही उपकरणे व्यक्तिगत गरजेप्रमाणे बनविली जातात.
(२) जीवयांत्रिकी कार्याच्या विकासाच्या अंगाने चिकित्सा करणारी कार्यप्रणाली : (बायोमेकॅनिकल ॲप्रोच). ज्या व्यक्तीची केंद्रीय मज्जासंस्था निर्दोष आहे, परंतु तिच्या इतर शारीरिक संस्थांमधील दोषांमुळे चलनवलन (लोकोमोशन) आणि/अथवा कारक-कृती अकार्यक्षम बनतात, अशा व्यक्तीच्या उपचारांसाठी ही कार्यप्रणाली वापरतात. असा दोष असणाऱ्या/ इतर संस्थांमध्ये परिसरीय मज्जासंस्था, अस्थी, स्नायू, त्वचा व पेशीजालाचा थर आणि हृदय व फुप्फुसे या संस्थांचा अंतर्भाव होतो.
वरील संस्था एकट्या किंवा एकत्रितपणे सदोष असल्या, की व्यक्तीचे चलनवलन (उदा., चालणे, पळणे, उठणे, बसणे आदी) व कारक-कृती (उदा., हाताची कार्ये, बाहूंच्या हालचाली, मान व धडाच्या हालचाली आदी) अकार्यक्षम बनतात. विविध प्रकारच्या उणिवा निर्माण होतात. उदा., परिसरीय मज्जासंस्थेतील दोषामुळे स्नायूच्या आकुंचन-प्रसरण क्रियेवरील नियंत्रण कमी होते किंवा नष्ट होते. त्यामुळे स्नायूंची ताकद कमी होऊन त्या स्नायूंना आवश्यक हालचाली करता येत नाहीत. कधी स्नायू आक्रसणे किंवा भाजल्यावर त्वचा आणि मुखपट्ट (फॅशिआ) यांवर व्रण निर्माण होणे, यांमुळे आवश्यक ताकद असूनदेखील, स्नायू सांध्याला हव्या त्या दिशेने व हव्या तितक्या कक्षेतून हलविता येत नाहीत. हृदय आणि/किंवा फुप्फुसांतील रोगांमुळे स्नायू व अस्थी (सांधे) यांची यंत्रणा सुरक्षित असूनही व्यक्तीचा एकूण दम कमी पडत असल्याने तिला आवश्यक त्या ताकदीने, गतीने व कालावधीपर्यंत हालचाली करता येत नाहीत.
या कार्यप्रणालीनुसार चिकित्सा करताना शुद्धगतिकी व यांत्रिकी तत्त्वांचा वापर मानवी देहामधील हालचालींसाठी केला जातो. म्हणूनच इथे ‘जीवयांत्रिकी’ ही संज्ञा वापरली जाते. सर्वसाधारण व्यक्तीला हालचाल करताना या जीवयांत्रिकी तत्त्वांचा जाणीवपूर्वक वापर करावा लागत नाही. मात्र संबंधित संस्थांमध्ये दोष निर्माण झाल्यास या तत्त्वांचा जाणीवपूर्वक वापर करावयाचे प्रशिक्षण व्यक्तीला द्यावे लागते.
सांध्यांच्या हालचालींची कक्षा वाढविणे, स्नायूंची ताकद वाढविणे, दम सुधारणे व हालचाली समन्वयित करत त्यांमध्ये सहजता व कुशलता आणणे यांसाठी व्यक्तीस शारीरिक, स्वावलंबनसंबंधी व गृहकौशल्यांसंबंधीचे उपक्रम विहित केले जातात. जीवयांत्रिकी तत्त्वांचा वापर करत हे उपक्रम कसे करावयाचे याचे आधी मार्गदर्शन करून नंतर सराव दिला जातो. आवश्यक वाटेल, तेथे बंधफलक, कृत्रिम अवयव (प्रोस्थिसिस) व बाह्य फेरबदल केलेली यंत्रे किंवा उपकरणे यांचादेखील वापर केला जातो.
(३) पुनर्वसनजन्य कार्यक्षमतेच्या विकासाच्या अंगाने चिकित्सा करणारी कार्यप्रणाली : (रिहॅबिलिटेटिव्ह ॲप्रोच). मज्जासंस्थेच्या अथवा इतर संबंधित संस्थांच्या संदर्भात मूळ दोष असला, तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या उणिवा आधी नमूद केलेल्या कार्यप्रणालींनुसार केलेल्या चिकित्सेद्वारे पूर्णपणे कमी होतातच असे नाही. परिणामतः दोष कोणत्याही प्रकारचा असला, तरी काही प्रमाणात विकलांगता कायमची अवशिष्ट राहू शकते. अशा व्यक्तींसाठी ही कार्यप्रणाली वापरतात.
अवशिष्ट राहिलेल्या उणिवांचा परिणाम व्यक्तीच्या दैनंदिन जीवनव्यवहारांवर होतो. अशा उणिवांचे प्रमाण आणि/अथवा तीव्रता जास्त असल्यास, व्यक्तीच्या रोजगारक्षमतेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. इतर कार्यप्रणालींमध्ये उपलब्ध क्षमतांचा विकास करवून मर्यादांवर मात करण्याचे तत्त्व अनुसरले जाते. या कार्यप्रणालीमध्ये मात्र आहेत त्या मर्यादांच्या आधीन राहून उपलब्ध क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करणे हे तत्त्व अनुसरले जाते. एखादी कृती सर्वसाधारण पद्धतीने करता येत नसेल, तर ती पर्यायी पद्धतीने करण्यास व्यक्तीला सक्षम केले जाते.
पर्यायी पद्धतीने कृती करताना फेरबदल करून अनुकूल केलेली कार्यतंत्रे आणि/अथवा साहाय्यकारी उपकरणे यांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे व्यक्तीला आपल्या शक्तीचा अपव्यय करावा लागत नाही. उदा. उजव्या हाताने कार्य-कृती करता येणे शक्य नसेल, तर डाव्या हाताने करणे (कार्यतंत्रबदल), काहींना हातांऐवजी पायाने लिहिणे इत्यादी.
व्यक्तीच्या पुनर्वसनाचे मुख्य ध्येय तिचे आर्थिक स्वावलंबन हे असल्यामुळे या कार्यप्रणालीचा जास्तीत जास्त वापर व्यवसाय-प्रशिक्षण व रोजगार-प्रशिक्षण यांच्या संदर्भात होतो. रोजगारक्षमता प्रस्थापित करतानाच अनुकूल कार्यतंत्रे आणि साहाय्यकारी उपकरणे यांच्या मदतीने प्रत, प्रमाण, अचूकता आणि गती या बाबींमध्ये सुधारणा करून व्यक्तीस उत्पादनक्षम बनविले जाते.
मनोरुग्ण व्यक्तीने सामाजिक अपेक्षांच्या अनुरूप व्यवहार करण्यास सक्षम व्हावे, या हेतूने चिकित्सा करण्यासाठी मुख्य अशी चार प्रतिमाने विद्यमान आहेत. व्यक्तीची सर्व मनो-सामाजिक कार्यक्षमता संघटित झाल्यास, व्यक्ती सभोवतालच्या वातावरणामध्ये पुन्हा परिणामकारकपणे जीवन जगू शकते, असे गृहीतक या प्रतिमानांमागे आहे.
(१) मनोगतिकी प्रतिमान : हे प्रतिमान मनोगतिकी मानसशास्त्राच्या विचारप्रणालींवर आधारलेले आहे. या व्यक्तीच्या मनोयंत्रणेच्या जडणघडणीकडे लक्ष दिले जाते. व्यक्तीचे असमायोजित वर्तन हे तिच्या ⇨इदम् (इड) व ⇨पराहम् (सुपर एगो) यांच्यातील स्वाभाविक संघर्षाला नियंत्रित ठेवण्यात ⇨अहंला (एगो) अपयश येत असल्याचे लक्षण समजले जाते. [→ मनोविश्लेषण].
नियंत्रण ठेवण्यासाठी अहंच्या काही संरक्षक यंत्रणा असतात. यांतील काही यंत्रणा तात्कालिक उपाय म्हणून प्रभावी असल्या, तरी कालांतराने त्रासदायक होतात. उदा., दमन (रिप्रेशन). याउलट काही यंत्रणांचा वापर करून अहं सुप्त मनातील संघर्ष आणि अप्रिय चेतना ह्यांना वाट करून देतो. उदा., मनातील प्रक्षोम व्यक्त करण्यासाठी भडक रंगांची उधळण असलेली चित्रे रंगविणे (सब्लिमेशन), न्यूनगंडावर मात करण्यासाठी काही असामान्य साहस करून प्रशंसा मिळविणे (कॉंपेन्सेटरी बिहेव्हिअर) आदी.
मनोगतिकी प्रतिमानानुसार व्यावसायिक चिकित्सा करताना विहित उपक्रमांद्वारे अहंच्या सकारात्मक संरक्षण यंत्रणांना कार्यन्वित करून व्यक्तीला सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जातो. चित्रकला, हस्तकला, संगीत, नाट्य, काव्यलेखन, नावीन्यपूर्ण पाककला अशा प्रकारच्या उपक्रमांचा यासाठी जास्त वापर होतो.
(२) वर्तनवादी प्रतिमान : हे प्रतिमान वर्तनवादी मानसशास्त्राच्या विचारप्रणालीवर आधारलेले आहे. व्यक्तीची सर्व वर्तने अध्ययनप्राप्त (लर्न्ट) असतात, असे इथे मानले जाते. वर्तन घडण्याअगोदर कोणती घटना घडलेली असते आणि वर्तन घडल्यानंतर त्यास सभोवतालाकडून काय प्रतिसाद मिळतो, यावर ते वर्तन प्रस्थापित होईल किंवा नाही हे अवलंबून राहते. उदा., परीक्षेसाठी अभ्यास करून मुलाने यश मिळविले म्हणून पालकाने त्याला बक्षीस दिले, तर ‘अभ्यास करणे’ हे वर्तन प्रस्थापित होते किंवा नेहमी फुगा पाहिल्यावर तो पाहिजे असा हट्ट मुलाने केला व त्या हट्टाला कंटाळून पालकाने नेहमी फुगा आणून दिला, तर ‘हट्ट करणे’ हे वर्तन प्रस्थापित होते. याचाच अर्थ हा की, उपयुक्त म्हणजे समायोजित वर्तने आणि हानिकारक म्हणजे अपसमायोजित वर्तने ही दोन्ही अध्ययनप्राप्त असतात.
वर्तनवादी प्रतिमानानुसार व्यावसायिक चिकित्सा करताना विहित उपक्रमांद्वारे पूर्व-प्रस्थापित अपसमायोजित वर्तनजन्य अनुसंधानांच्या जागी समायोजित वर्तनजन्य अनुसंधाने पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर अपसमायोजित वर्तन ज्या परिस्थितीमध्ये घडते, ती परिस्थिती कशी टाळावी आणि ती परिस्थिती टाळता न आल्यास अपसमायोजित वर्तन टाळून त्याऐवजी पर्यायी समायोजित वर्तन कसे करावे, यांसंबंधी अध्ययन करण्यास संधी निर्माण केल्या जातात. ज्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये यशस्वी व्यवहार करता न आल्यामुळे व्यक्तीच्या वर्तनांचे संतुलन ढळले असेल (उदा., घरकाम, नोकरी, इ.), त्या प्रकारच्या उपक्रमांचा वापर अनुरूप कार्यपद्धतीने केला जातो.
(३) विकासात्मक प्रतिमान : हे प्रतिमान विकासात्मक मानसशास्त्राच्या विचारप्रणालीवर आधारलेले आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे तिच्या मानसिक व भावनिक विकासांचा उत्पाद समजले जाते. स्वास्थ्य आणि निकोप संगोपन प्राप्त झाल्यास व्यक्तीचा एकूणच विकास चांगला होऊन प्रभावी व्यक्तिमत्त्व विकसित होते. पंरतु विकासाच्या काळातील विविध घटनांमुळे व्यक्तीच्या मानसिक व भावनिक विकासामध्ये अडथळे येऊ शकतात. उदा., दमा किंवा तत्सम आजार असलेल्या व्यक्तीवर लहानपणापासून काही बंधने पडतात व त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विकास होण्यामध्ये बाधा निर्माण होते. कधीकधी अगदी लहानपणीच वडील वारल्यानंतर पतिनिधनाच्या दुःखामुळे आईकडून मुलांबाबतीत दुर्लक्ष होते व त्याचा परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्त्व-विकासावर होतो. जीवनातील काही आवश्यक घटनांची उणीव राहिल्यासही विपरीत परिणाम होतो. व्यक्तीचे अपसमायोजित वर्तन हे तिच्या मनो-भावनिक क्षमतांचा योग्य विकास न झाल्याचे लक्षण आहे, असे इथे मानले जाते.
विकासात्मक प्रतिमानानुसार व्यावसायिक चिकित्सा करताना विहित उपक्रमांद्वारे आवश्यक अशा मनो-भावनिक क्षमतांचा विकास साधण्याची संधी व्यक्तीला पुन्हा एकदा निर्माण करून दिली जाते व अपूर्ण राहिलेल्या त्रुटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. विहित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्याच माध्यमातून व्यक्तीला, प्रभावी विचारांची साखळी कशी जोडायची, भावना कशा व्यक्त करायच्या अशा क्षमतांचा सराव करून घेता येतो. यासाठी शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
(४) मानव्य प्रतिमान : व्यक्तीच्या काही मूलभूत गरजा असतात. शरीरक्रियासंबंधीच्या, सुरक्षिततेच्या, प्रेम व आपलेपणा ह्यांच्याशी संबंधित अशा गरजा. मान्यतेच्या गरजा आणि वैचारिक व सौंदर्यानुभवाच्या गरजा अशा चढत्या भाजणीनुसार असणाऱ्या या मूलभूत गरजा भागविण्याच्या प्रेरणेने व्यक्ती आयुष्यभर आपल्या क्षमता वाढवीत जाते आणि पुढील प्रगतीच्या आकांक्षांनुसार स्वतःचे लक्ष्य निश्चित करत जाते.
मात्र प्रत्यक्ष समाजजीवनात वावरताना व्यक्तीला प्राप्त होत जाणारे अनुभव म्हणजे तिच्या या क्षमता ह्या आकांक्षा किंवा लक्ष्यांना अनुरूप असतातच असे नाही. उदा., एखादी व्यक्ती एखाद्या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहाने व तयारीने भाग घेते, परंतु दुसरी एखादी व्यक्ती वरचढ ठरते. व्यक्तीच्या आकांक्षा आणि प्रतिकूल असणारी परिस्थिती यांतील अंतरामुळे व्यक्तीच्या मनात जो गोंधळ निर्माण होतो, तोच त्या व्यक्तीच्या अपसमायोजित वर्तनांद्वारे प्रक्षेपित होतो असे इथे मानले जाते.
मानव्य प्रतिमानानुसार व्यावसायिक चिकित्सा करताना विहित उपक्रमांद्वोर व्यक्तीला तिच्या आकांक्षा व प्रत्यक्ष परिस्थिती यांतील अंतराची जाणीव करून देऊन ते अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. उदा., कौटुंबिक जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली साचलेपणा येऊन खिन्न झालेल्या गृहिणीला नवीन पाककृती किंवा हस्तव्यवसाय इ. उपक्रमांत सहभागी करून घेऊन नवनिर्मितीचा आनंद (सौंदर्यानुभवाची गरज) व इतरांकडून प्रशंसा (मान्यतेची गरज) प्राप्त करून घेण्याची संधी निर्माण केली जाते. स्वतःच्या क्षमतांच्या आवाक्यातील वास्तव आकांक्षा बाळगण्याची सवय व्यक्तीला लागणे आणि त्याचबरोबर वास्तव आकांक्षांना साध्य करता येईल, इतपत स्वतःच्या क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण व सराव करायला लावणे यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, गृहकौशल्यासंबंधीचे, संभाषणकौशल्यासंबंधीचे व अर्थार्जनासंबंधीचे उपक्रम यांचा येथे प्रामुख्याने वापर केला जातो.
विकासात्मक समस्या असलेल्या मुलांसाठी व्यावसायिक चिकित्सा करताना वरील कार्यप्रणालींना व प्रतिमानांना अनुसरून उपक्रम दिले जातात. परंतु मुख्य फरक असा की, प्रौढ व्यक्तींमध्ये विविध क्षमतांचे पुनःस्थापन केले जाते, तर मुलांमध्ये या सर्व क्षमता सुरुवातीपासून निर्माण कराव्या लागतात. त्यामुळे मुलांसाठीच्या व्यावसायिक चिकित्सेमध्ये पुढील मुद्यांकडे मुद्दाम लक्ष दिले जाते : मुलाची शारीरिक व भावनिक हाताळणी व व्यवस्थापन त्याच्या संवेदी-एकात्मीकरणाला (सेन्सरी इंटिग्रेशन) व एकूण विकासाला सुगम बनवत असल्याची खातरी त्याचप्रमाणे साहाय्यकारी उपकरणांची निर्मिती व त्यांच्या वापरासंबंधीचे प्रशिक्षण.
व्याप्ती : व्यावसायिक चिकित्सेचे स्वरूप व्यापक होत गेले, तसा तिचा वापर केवळ दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांपुरता मर्यादित रहिला नाही. ही चिकित्सापद्धती पुढील ठिकाणी उपयुक्त असल्याचे सर्वमान्य झाले आहे : (१) मनोविकार चिकित्सा, उरो-शल्यचिकित्सा, विकलांगताचिकित्सा, बालरोग, क्षयरोग, कर्करोग यांसाठीची इस्पितळे. (२) बालमार्गदर्शन, व्यवसाय-प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रे. (३) अंध, मतिमंद, बहुविकलांग मुलांसाठीच्या विशेष शाळा. (४) वृद्धाश्रम.
प्रशिक्षण : भारतात सध्या मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता, वेल्लोर व बरोई (ओरिसा) येथे व्यावसायिक चिकित्सा उपचारज्ञांना प्रशिक्षण देणारी केंद्रे आहेत. पूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या( उपचारज्ञांना व्यावसायिक चिकित्सेची पदविका प्राप्त होत असे. आता त्यांना संबंधित विद्यापीठाकडून पदवी प्राप्त होते. हा पदवी अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा आहे. गणित आणि विज्ञान हे विषय घेऊन बारावी इयत्ता उत्तीर्ण होणाऱ्या व्यक्तीस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. मुंबई विद्यापीठामध्ये या शाखेत पदव्युत्तर अभ्यासदेखील करता येतो.
नोंदणी : आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसाय करण्यापूर्वी उपचारज्ञांना स्वतःची नावनोंदणी करावी लागते. काही देशांमध्ये त्याकरिता वेगळ्या परीक्षा असतात. भारतात नावनोंदणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही.
संघटना : ज्या देशांमध्ये व्यावसायिक चिकित्सा कार्यरत आहे, त्या देशांमध्ये तेथील उपचारज्ञांच्या संघटना आहेत. या चिकित्सापद्धतीचा प्रसार आणि विकास करीत यातील व्यावसायिक मूल्यांचे रक्षण आणि नियंत्रण करणे, हे या संघटनांचे काम असते. भारतात ‘ऑल इंडिया ऑक्यूपेशन थेरपिस्टस असोसिएशन’ ही संघटना आहे (१९५२). विविध देशांच्या संघटनांनी ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ऑक्यूपेशनल थेरपी’ हा संघ स्थापन केला (१९५२) असून भारत या संघाचा संस्थापक-सदस्य आहे.
संदर्भ : 1. American Occupational Therapy Association, Pub., American Journal of Occupational Therapy, Vol. 26, 1972.
2. Penso, D. E. Occupational Therapy of Children with Disabilities, London, 1987.
3. Reed, K. G. Sauderson, S. N. Concepts of Occupational Therapy, Baltimore, 1992.
4. Trombly, C. A. Ed. Occupational Therapy for Physical Dysfunctions, Baltimore, 1989.
5. Wilson, M. Occupational Therapy in Long Term Psychiarty, Edinburgh. 1983.
पंडित, आशुतोष