व्यापारचिन्हे व व्यापारनामे : आपले उत्पादन ग्राहकांना सहजपणे ओळखता यावे आणि बाजारातील इतर उत्पादनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण सहजपणे लक्षात यावे, यासाठी उत्पादकांनी किंवा वितरकांनी वापरलेली चिन्हे म्हणजे व्यापारचिन्हे होत. विशिष्ट शब्द, चिन्ह, शीर्षक, चित्र, छाप किंवा खूण इत्यादींचा उपयोग व्यापारचिन्हासाठी केला जातो. सेवा पुरविणार्याय संस्थाही आपल्या सेवांच्या वैशिष्ट्याचा व वेगळेपणाचा बोध व्हावा, यासाठी विशिष्ट सेवाचिन्ह वापरतात. ‘व्यापारचिन्ह’ (ट्रेडमार्क) व ‘व्यापारनाम’ (ट्रेडनेम) यांत फरक आहे. उत्पादकाने आपल्या व्यवसायाला अगर विक्रयवस्तूला दिलेले नाव म्हणजे व्यापारनाम होय. उदा., डालडा हे वनस्पती-तुपाचे नाव म्हणजे व्यापारनाम व ते ज्या उब्यात पॅकबंद केलेले असते, त्यावरील नारळाच्या झाडाचे चित्र हे त्याच्या उत्पादकाचे व्यापरचिन्ह होय.

इतिहासपूर्वकाळातही चिन्हांचा वापर केला जात असे. त्या काळी मातीच्या भांड्यांवर चित्रे किंवा छाप उठविले जात असत. इ. स. पू. सु. ५००० च्या दरम्यात अशा तऱ्हेची प्रथा प्रचलित असावी. युरोपमधील प्राचीन गुहाचित्रांतील प्राण्यांच्या शरीरांवर चिन्हे उठवलेली आढळून येतात.  प्राचीन काळातील चिन्हे केवळ वस्तूंची किंवा प्राण्यांची व्यक्तिगत मालकी दर्शविण्याच्या संदर्भात वापरली जात असावीत. प्राचीन काळातील ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वैशिष्ट्यीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व होते. मातीच्या भांड्यावर वा तत्सम विक्रयवस्तूवर उत्पादकाची ओळख व्हावी, यासाठी विशिष्ट छाप मारले जात. आधुनिक वाणिज्य क्षेत्रात वापरल्या जाणार्याअ व्यापारचिन्हाचे आज जे कार्य आहे, जवळपास तेच कार्य त्या वेळच्या छापांचे किंवा चित्रांचे होते. तथापि, वस्तू जर दोषमुक्त असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित उत्पादकाला शिक्षा करणे या प्रमुख उद्देशाने त्या काळी चिन्हांचा वापर केला जात असे. प्राचीन सुमेरियन व ईजिप्शियन संस्कृतींमध्ये इ. स. पू. सु. ३२०० वर्षांपूर्वी अनुक्रमे मंदिरात वापरल्या जाणार्या. दंडगोलांवर विशिष्ट मोहरा व राजाच्या थडग्यावर कोरलेल्या उभट आकाराच्या भांड्यावर चिन्हे आढळत. त्या काळी इमारतीसाठी जे दगड वापरले जात, ते कोणत्या खाणीतून आणण्यात आलेले आहेत, हे ओळखण्यासाठी तसेच दगड घडविणार्यांपची ओळख पटावी, यासाठी विशिष्ट खुणा कोरलेल्या असत. प्राचीन रोमन संस्कृतीमधील अर्थव्यवहारविषयक कागदपत्रांवरून तेव्हाच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये व्यापारचिन्हे मोठ्या प्रमाणावर वापरली जात असल्याचे दिसून येते. लोणी, दारू, औषधे, मलम तसेच काचेची भांडी यांवर उत्पादकाचे ठसे असल्याचे संदर्भ प्राचीन लॅटिन साहित्यात आढळतात. तयार कापडावरही छाप उठवले जात असत. बांधकामासाठी वापरल्या जाणार्यास विटा व फरशा यांवर उत्पादकांच्या खुणा असत. मातीच्या भांड्यांवर रोमन कारागिरांनी उठविलेले सु. ६,००० प्रकारचे ठसे किंवा छाप आढळून आले आहेत. त्यांपैकी काही खुणांचा वापर तेलाच्या दिव्यांवर तसेच अन्य काही उत्पादनांवर आजही केला जात असल्याचे दिसून येते.      

रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर अकराव्या शतकाअखेर व्यापारचिन्हांचा वापर करण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. या काळात मातीच्या भांड्यांवर छाप उठविणेही जवळजवळ बंदच झाले. बाराव्या शतकाच्या प्रारंभापासून पुन्हा अनेक प्रकारच्या उत्पादनांसाठी व्यापारचिन्हांचा वापर करण्यास सुरुवात झाली. इंग्लंड व उर्वरित युरोपमधील अर्थव्यवहारामध्ये कारागिरांचे व्यापारी संघ स्थापन झाले आणि संघाच्या सभासदांना व त्यांच्या वारसांना उत्पादनावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी प्रामुख्याने व्यापारचिन्हांचा वापर होऊ लागला. व्यक्तिगत कारागिराची ओळख पटावी व कोणत्या व्यापारी संघाचा तो सभासद आहे हे निश्चित कळावे, यासाठी व्यापारचिन्ह वापरण्याची सक्ती करण्यात येत असे. व्यापारी संघातील सभासदांचा माल योग्य दर्जाचा असल्याबद्दल लोकांची खात्री पटावी, हा प्रमुख उद्देश असे. तसेच वस्तू तयार करताना योग्य ती गुणवत्ता राखण्यासंबंधीची शिस्त कारागिरांना लागावी, हाही व्यापारचिन्हांचा उद्देश असे.

इंग्लंमध्ये तिसऱ्या हेंरीच्या कारकिर्दीत (१२१६–७२) प्रत्येक बेकरीवाल्याने पावाच्या प्रत्येक प्रकारच्या नगावर स्वत:चे व्यापारचिन्ह उमटविले पाहिजे, अशी सक्ती करण्यात आली. चौदाव्या शतकामध्ये प्रत्येक सोनाराने आपण तयार करीत असलेल्या अलंकारावर स्वत:चा छाप कोरणे सक्तीचे करण्यात आले. सर्व प्रकारच्या बाटल्यांच्या उत्पादकांनी ‘काचेपासून तयार केलेली भांडी’ असा मजकूर छापण्याबाबत वटहूकूम जारी करण्यात आला. पंधराव्या शतकात मातीच्या भांड्यांवर ठसे उमटविण्यास सु.१,००० वर्षांनी पुन्हा सुरुवात झाली. पाथरवट व गवंडी यांच्याकडून विशिष्ट अशा चिन्हांचा वापर होऊ लागला. विशेषत: चौदाव्या ते सतराव्या शतकांच्या दरम्यान व्यापार्यांचची बाजारातील पत वाढविण्यासाठी व उत्पादनाच्या दर्जाबद्दलची खात्री पटविण्यासाठी ठशांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. अनेक उत्पादकांनी काही अक्षरे एकत्र करून कोणताही विशिष्ट अर्थ नसलेले शब्द आपल्या उत्पादनासाठी व्यापारनामे म्हणून रूढ केले. उदा. ⇨ जॉर्ज ईस्टमन यांनी १८८८ मध्ये ‘कोडॅक’ हे जगप्रसिद्ध व्यापारनाम छायाचित्रणासंबंधीच्या आपल्या कॅमेरादी उत्पादनांना वापरण्यासाठी निवडले. ‘शेल’, ‘ओनीडा’, ‘केल्विनेटर’, ‘जिलेट’, ‘कोकाकोला’ इ. पाश्चात्त्य व्यापारनामे तसेच भारतात विशिष्ट मोटारींसाठी वापरले जाणारे ‘मारुती’, कापडासाठी वापरले जाणारे ‘विमल’ आणि दुग्धजन्य पदार्थासाठी वापरले जाणारे ‘अमूल’अशी व्यापारनामे अलीकडच्या काळात रूढ झाली.

व्यापारचिन्हांसंबंधीचे कायदे : अमेरिकेत १९४६ च्या लॅनहॅम कायद्यानुसार (फेडरल ट्रेडमार्क ऍक्ट) अनुचित व्यापारी स्पर्धासंबंधीच्या नियमांतर्गत उत्पादकांना व्यापारचिन्हांची नोंदणी निबंधकाकडे करणे सक्तीचे करण्यात आले. जो उत्पादक विशिष्ट व्यापारचिन्ह पहिल्यांदा आपल्या उत्पादनासाठी वापरतो, त्याच्याकडे त्या चिन्हाचे स्वामित्व जाते. सेवा पुरविणार्या६ संस्था आपल्या सेवांची जाहिरात करण्याच्या उद्देशाने सेवाचिन्हांचा (सर्व्हिस मार्क) वापर करतात. अशा सेवाचिन्हांची नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी अमेरिकन व्यापार विभागाच्या एकस्व (पेटंट) कार्यालयात नोंदणीपुस्तके (रजिस्टर्स) ठेवलेली असतात. दर वीस वर्षांनी व्यापारचिन्हांचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. नोंदणी केल्यानंतर सहाव्या वर्षी व्यापारचिन्हांच्या प्रत्यक्ष वापरासंबंधीचे प्रतिज्ञापत्र उत्पादकांनी सादर करणे गरजेचे असते. अन्यथा व्यापारचिन्हांची नोंदणी रद्द केली जाते. अमेरिकन उत्पादक आपल्या व्यापारचिन्हांची नोंदणी परदेशामध्ये तेथील स्थानिक कायद्यांच्या तरतुदींनुसार करू शकतात.

भारतात व्यापार वा वाणिज्य चिन्हविषयक अधिनियम, १९५८ अमलात असून त्यानुसार उत्पादक आपल्या व्यापारचिन्हांची नोंदणी निबंधकाकडे करू शकतात. अशी नोंदणी जरी सक्तीची नसली, तरी आपल्या व्यापारचिन्हांचा उपयोग इतरांनी करू नये, या दृष्टीने नोंदणी करून घेणे इष्ट असते. व्यापारचिन्हांच्या नोंदणीचा दाखला हा व्यापारचिन्हांच्या मालकीचा कायदेशीर पुरावा मानला जातो. कापडाशिवाय इतर सर्व वस्तूंची नोंदणी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे सु. ३४ गट पाडले आहेत. सात वर्षांच्या कालावधीसाठी व्यापारचिन्हांची नोंदणी वैध राहते आणि नंतर दर सात वर्षांनी तिचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. इतरांनी त्या किंवा तत्सदृश व्यापारचिन्हाचा वापर केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दिवाणी अगर फौजदारी कारवाई करता येते.

विशिष्ट व्यापारचिन्हांचा व व्यापारनामांचा वापर करून जाहिरातींद्वारे जुने ग्राहक टिकविणे आणि नवीन ग्राहक निर्माण करणे शक्य होते. व्यापारचिन्ह व व्यापारनाम यांभोवती उत्पादनाच्या दर्जाचे व कंपनीच्या प्रतिष्ठेचे वलय निर्माण करता येते. उदा. भारतीय कृषी विपणन सल्लागारांचे ⇨ ॲगमार्क हे व्यापारचिन्ह त्यांच्या यंत्रणेद्वारे बाजारात येणार्याय मालाच्या दर्जाची हमी ग्राहकांना देते. भारत सरकारने नवीन व्यापारचिन्ह विधेयक १९९३ साली संसदेत मांडलेले असले, तरी अद्याप ते पारित झालेले नाही. नवीन विधेयकात सेवाचिन्हांची नोंदणी करता यावी, व्यापारचिन्हांना अधिक प्रमाणात कायदेशीर संरक्षण मिळावे, तसेच व्यापारचिन्हांचे व्यवस्थापन करताना त्यात सुसूत्रता यावी, यांसाठी पोषक अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) करारानुसार प्रत्येक सदस्य-देशाने व्यापारचिन्हांचा कालावधी सात वर्षांचा ठेवला पाहिजे. व्यापारचिन्हांप्रमाणेच सेवा पुरविणार्याद संस्थांनी सेवांना सेवाचिन्हे (सर्व्हिस मार्क) दिली पाहिजेत, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.

आधुनिक काळात बौद्धिक संपदा (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी) अधिकाराचा समावेशही ‘संपत्ती’च्या संकल्पनेत केला जातो. मानवनिर्मित वस्तू, उत्पादने, प्रक्रिया आदींबाबत एखाद्या व्यक्तीने नवा शोध (इन्व्हेन्शन) लावल्यास आणि तो व्यापारी तत्त्वावर आर्थिक दृष्ट्या लाभधारक ठरल्यास त्या व्यक्तीस त्या विशिष्ट शोधाबाबत बौद्धिक संपदा अधिकार प्राप्त होतो. त्यानुसार एकस्व, औद्योगिक आकृतिबंध व व्यापारचिन्हे हे ‘औद्योगिक बौद्धिक संपदा’ या प्रकारात मोडतात. व्यापारविषयक बौद्धिक संपदा अधिकाराविषयी (ट्रीपस्) जागतिक व्यापार संघटनेच्या झालेल्या करारानुसार प्रत्येक सदस्य-देशाने विशिष्ट  मुदतीत आपल्या देशातील बौद्धिक संपदा अधिकारांचे नियोजन करावयाचे असून, त्यानुरूप आवश्यक ते बदल स्थानिक कायद्यात करावयाचे आहेत. भारताने एप्रिल १९९४ मध्ये सदर करारावर सही करून जागतिक व्यापारी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे.

संदर्भ : 1. Gandhi, J. C. Marketing, New Delhi, 1955.             2. Pandit, M. S. Pandit, Shobha, Business Law, Mumbai, 1998.             3. Ramaswamy, V. S. Namkumari, S. Marketing Management, Delhi, 1998.

चौधरी, जयवंत