व्यापारचक्र : (ट्रेड सायकल). ज्या देशांत वस्तूंचे उत्पादन आणि वितरण खाजगी क्षेत्राच्या हाती असते अशा देशांच्या अर्थव्यवस्थेत नियमितपणे होणारे चढउतार, खाजगी क्षेत्राचे प्राबल्य असलेल्या देशांना ठरावीक काळानंतर तेजी-मंदीच्या चक्रातून जावे लागते. अर्थव्यवस्थेत तेजी, घसरण, मंदी, संजीवन अशा चार अवस्थांना तोंड द्यावे लागते. हे चक्र पूर्ण होण्यास साधारणतः दहा ते बारा वर्षांचा कालावधी लागतो, असे अर्थशास्त्रज्ञांना आढळून आले आहे. या चढउतारांना व्यापारचक्र म्हणण्याचे कारण, त्यांचा परिणाम पहिल्यांदा व ठळकपणे व्यापारावर झालेला दिसून येई व अनुषंगाने उत्पादन, रोजगार, चलनव्यवहार, किमती, राहणीमान यांसारख्या अर्थकारणाच्या इतर सर्व अंगांवर होत असे. व्यापारचक्राला तेजीमंदीचक्र किंवा ‘अर्थोद्योगचक्र’ असेही म्हणणे उचित ठरेल. तज्ज्ञांच्या मते, हे चढउतार चक्री स्वरूपाचे असतात. आर्थिक मंदीला थोपवून अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्याचे तंत्र आता देशीदेशीच्या सरकारांनी व मध्यवर्ती बँकांनी आत्मसात केल्यामुळे, व्यापारचक्राच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली आहे.

व्यापारचक्राचा मागोवा व मीमांसा : फ्रेंच अर्थतज्ज्ञ क्लेमेंट जगलर याचा खास व्यापारचक्रावरील पहिला मोठा ग्रंथ १८६० साली प्रसिद्ध झाला. त्यात व्यापारचक्राच्या तीन अवस्था दर्शविलेल्या होत्या. आर्थिक भरभराट (प्रॉस्पेरिटी) ही पहिली अवस्था, आर्थिक घसरण (रिसेशन) ही दुसरी अवस्था आणि आर्थिक अरिष्ट अगर दिवाळखोरी (डिप्रेशन) ही तिसरी अवस्था. या तीन अवस्था क्रमशः एकापाठोपाठ एक अशा येत असतात. आर्थिक अरिष्टे चक्री आंदोलनाचा भाग असतात, हे प्रथम ज्यांना उमगले, त्यांत जगलरचा समावेश होतो. आर्थिक भरभराटीतच विघटनाची बीजे रोवली जातात, त्यांतूनच मंदी उदभवते, तसेच किमतींमधील कालानुसारी फेरबदल यांसारख्या बाबींच्या मुळाशी व्यापारचक्राची संकल्पना आहे, असे जगलरचे निदान होते.

जगलरनंतर विल्यम स्टॅन्ली, जेव्हन्झ हायेक, ⇨ ॲल्फ्रेड मार्शल, ⇨ कार्ल मार्क्स, ⇨ डेव्हिड रिकार्डो, ⇨ योझेफ शुंपेटर, ⇨ नट विकसेल, ⇨ जॉन मेनाई केन्स, ⇨ जॉन हिक्स रिचर्ड इ. प्रमुख अर्थशास्त्रज्ञांनी व्यापारचक्राचा विशेष विचार केला आणि त्यांतून व्यापारचक्रविषयक एक सैद्धांतिक प्रणाली तयार झाली. तीत व्यापारचक्रातील अवस्था, त्यातील कालबद्धता, त्याची कारणमीमांसा, त्यांतील कारणांचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम, त्यांवरील उपाययोजना या सर्वांचा विचार वेगवेगळ्या भूमिकांतून व वेगवेगळ्या आर्थिक प्रवाहांना महत्त्व देऊन करण्यात आला. अलीकडील काळात संख्याशास्त्राधिष्ठित अभ्यासाचे महत्त्व वाढल्याने, गतकालीन व्यापारचक्रांबाबत बरीच सांख्यिकीय माहिती गोळा करण्यात आली. व्यापारचक्र हा एक महत्त्वाचा प्रश्न मानला गेला असून, त्याबाबत खूप संशोधन व चिकित्साही झालेली आहे.

व्यापारचक्र व त्यातील प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्ये यांचे व्यवस्थित वर्णन ⇨ बेस्ली क्लेअर मिचेल (५ ऑगस्ट १८७४–२९ ऑक्टोबर १९४८) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने केले आहे. बिझिनेस सायकल्स (१९१३) हा त्याच्या व्यापारचक्रीय अभ्यासाचा आद्य व मार्गदर्शक ग्रंथ होय. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्कमधील ‘राष्ट्रीय आर्थिक संशोधन कार्यालय’ (नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च) या संस्थेने व्यापारचक्रांबाबत मौलिक संशोधन केले. या संशोधनानुसार कोणतेही व्यापारचक्र चार अवस्थांतून जाते. या चार अवस्था एकमेकींतून उदभवतात आणि त्यांतील प्रत्येक अवस्थेला स्वयंगती असते. व्यापारचक्र एकदा सुरू झाले की, त्यातील सर्व अवस्था क्रमशः व पाठोपाठ येतातच. एखाद्या अवस्थेची गती कमी-अधिक होते पण ती अवस्था संपून दुसरी अवस्था येण्याच्या प्रक्रियेला बाधा येत नाही. सारांश, व्यापारचक्र हे स्वयंनिर्मित गतीने फिरत राहते. हे मिचेलचे मुख्य प्रतिपादन होते. त्याच्या मते व्यापारचक्रातील प्रत्येक अवस्था स्वयंपोषक असते.

मिचेलच्या संशोधनानुसार व्यापारचक्राला चार अवस्थांतून जावे लागते. संजीवन ही पहिली अवस्था मानली तर भरभराट (अथवा तेजी), घसरण व अरिष्ट (अथवा मंदी) या मागून येणाऱ्या तीन अवस्था होत. यांतील प्रत्येक अवस्था संपून दुसरी अवस्था जेव्हा सुरू होते, त्या कालपरिमाणाला अवस्थांतरबिंदू अथवा पलटबिंदू असे म्हणतात येईल. चार पलटबिंदूंपैकी तेजी संपून घसरणीचा प्रारंभ दर्शविणारा व मंदीची अखेर सुचविणारा हे दोन पलटबिंदू महत्त्वाचे आहेत. त्यांना अनुक्रमे उच्च पलटबिंदू व नीच पलटबिंदू असे म्हणता येईल. तेजी जेव्हा आपली पूर्णावस्था गाठते, त्या वेळी आर्थिक व्यवहारांचे मापन करणारे जे प्रवाह असतात, त्यांनी संख्यात्मक दृष्ट्या उच्चांक गाठलेले असतात म्हणून तेजीची अखेर दर्शविणारा बिंदू उच्च पलटबिंदू होय. याच न्यायाने मंदीची अखेर दर्शविणारा बिंदू हा नीच पलटबिंदू होय कारण त्या वेळी आर्थिक प्रवाहांनी नीचावस्था गाठलेली असते.

व्यापारचक्राच्या प्रत्येक अवस्थेत सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, अर्थोद्योगांची पातळी दर्शविणारे जे महत्त्वाचे आर्थिक प्रवाह असतात, त्यांचे सूचकांक एकाच दिशेने बदलत असतात आणि परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत होत असतात. उदा. तेजीच्या काळात सर्व क्षेत्रांतील व सर्व प्रकारच्या अर्थोद्योगांतील उत्पादन, रोजगार, नफा व वेतन, वस्तूंच्या किमती यांत एकाच म्हणजे वाढीच्या दिशेने बदल होत असतो. याउलट मंदीच्या अवस्थेतील बदलांची दिशा संकोच दर्शविणारी असते व हा बदलही अर्थोद्योगांच्या सर्व क्षेत्रांना व अर्थव्यवस्थेच्या सर्व अंगांना व्यापणारा असतो. सर्वव्यापी व एकमार्गी बदल हे व्यापारचक्राच्या सर्व अवस्थांचे एक प्रमुख लक्षण असते. या बदलांचे दर्शन घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेशी संबंधित ज्या ज्या गोष्टी मापनीय असतात, त्यांच्यासंबंधात निर्देशांक तयार केले जातात व त्यांच्या अनुरोधाने व्यापारचक्राचे सांख्यिकीय संशोधन केले जाते.

व्यापारचक्राच्या संदर्भात जे बदल होतात त्यांपैकी उत्पादन, रोजगार, किंमती व राष्ट्रीय उत्पन्न यांत होणारे बदल महत्त्वाचे असतात. त्यांबाबत संशोधन करताना दोन प्रमुख गोष्टी पहाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे, प्रत्येक अवस्थेच्या प्रारंभापासून अखेरपर्यंतचा काळ. त्या विशिष्ट अवस्थेच्या कालमर्यादेवरून एखाद्या व्यापारचक्राची एखादी कालमर्यादाही निश्चित करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणत्याही अवस्थेत एखाद्या मापनीय घटकात विशिष्ट दिशेने जो बदल होतो, त्याची तीव्रता ही होय. उदा. मंदीच्या काळात राष्ट्रीय उत्पन्न घटत जाते. एखाद्या व्यापारचक्रातील घसरण सुरू झाल्यापासून मंदीचा तडाखा कमाल वेळेपर्यंत टिकल्यास राष्ट्रीय उत्पन्न किती प्रमाणात घटले, हे कळल्यास संबंधित मंदीची तीव्रता समजते आणि  अशा प्रकारे विविध मंदीकाळांची अथवा तेजींची तुलना करता येते. १९२९ च्या मंदीला ‘महामंदी’ म्हणण्याचे कारण, त्यापूर्वी होऊन गेलेल्या मंदींपेक्षा तिची तीव्रता अधिक होती. राष्ट्रीय उत्पन्नाप्रमाणेच रोजगार, किमती यांच्यांत होणाऱ्या बदलांचे प्रमाण मापता येते आणि कमाल बदल होण्यास, मग त्या बदलाची दिशा कोणतीही असो, किती कालमऱ्यादा लागली, हे निश्चित करता येते.


व्यापारचक्राच्या चार अवस्था : व्यापारचक्राचा मागोवा घेण्यासाठी संजीवन अथवा पुनरुज्जीवन (रिव्हायव्हल) या अवस्थेपासून सुरुवात करता येईल. मंदी अनिष्ट असली, तरी तिच्या ओघात व्यापारउद्योगाला अनुकूल असलेल्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यांत उत्पादनखर्चात घट, व्याजाच्या दरात घट, उद्योगसंस्थांच्या राखीव साठ्यांत घट, बँकांकडे व भांडवलगुंतवणूक करणारांकडे पडून राहिलेला पैसा यांचा खास उल्लेख केला पाहिजे. मंदी बराच काळ टिकून असली, म्हणजे केव्हा ना केव्हा व्यापाऱ्यांलकडील व उपभोक्त्यांकडील मालाचे राखीव साठे संपुष्टात येतात किंवा निदान किमान मर्यादा गाठतात. मंदीच्या काळातही मागणीची वाढ होण्यास पोषक ठरणारी लोकसंख्येची वाढ, लोकांच्या आवडीनिवडींतील बदल या गोष्टी चालूच असतात. या घटकांना राखीव साठे कमी झाल्यामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीची जोड मिळाली, म्हणजे व्यापारी मालाची मागणी वाढवितात. तिची नोंद प्रथम कारखानदारांकडे होते. काही काळापर्यंत आपल्या राखीव साठ्यांमधून कारखानदार वाढलेली मागणी भागवितात. पण कारखानदारांकडील राखीव साठ्यांनी किमान मर्यादा गाठली, म्हणजे उत्पादन वाढवावे लागते. उत्पादनखर्चात व व्याजात आधीच झालेली कपात, गुंतवणूक करणारांकडे पडून राहिलेला पैसा या अनुकूल गोष्टींमुळे व मंदीच्या काळातील बेकारीमुळे व घटलेल्या वेतनखर्चामुळे उत्पादन वाढविणे सुलभही होते. उत्पादन वाढू लागले की, रोजगार वाढू लागतो. त्यामुळे लोकांची प्राप्ती वाढू लागते. साहजिकच मागणी वाढण्यास आणखी जोर येतो. अशा प्रकारे मंदीच्या काळात मृतवत् झालेल्या अर्थव्यवस्थेला प्राणवायू दिला जातो, तिला संजीवनी प्राप्त होते. मागणीच्या प्रभावामुळे किमती वाढू लागतात.

किमती जरी वाढल्या, तरी सर्व किमती सारख्या प्रमाणात व एकाच वेळी वाढत नाहीत. वस्तूंच्या किमती ज्या मानाने व गतीने वाढतात, त्यांच्या तुलनेने उत्पादनखर्च वाढत नाही. त्यामुळे किमतीपेक्षा अधिक प्रमाणात नफा वाढतो. मालाची मागणी सारखी वाढतच जाते. अशा वातावरणात भांडवलगुंतवणूक करण्याचा उत्साहही वाढतच राहतो. वाढती भांडवलगुंतवणूक, वाढते उत्पादन, वाढता रोजगार, वाढती वैयक्तिक उत्पन्ने, वाढती मागणी असे सुष्टचक्र सुरू झाले की संजीवन मिळालेली अर्थव्यवस्था भरभराटीकडे वाटचाल करू लागते. भरभराटीची अवस्था सुरू होते आणि चालू राहते. भरभराट केव्हा ना केव्हा तरी उच्चावस्था गाठते व त्यानंतर घसरण सुरू होते. बाह्य प्रवाहांमुळे भरभराट संपत नाही तर भरभराटीच्या ओघात ज्या गोष्टी घडतात, त्यांचा अंतर्गत ताणच शेवटी तिचा अस्त होण्यास कारणीभूत होतो. एक तर भरभराटीच्या काळात हळूहळू का होईना, पण उत्पादनखर्च निश्चितपणे वाढत जातो. उत्पादन ज्या मानाने वाढते, त्या मानाने उत्पादनक्षमता वाढत नाही. कार्यक्षमता कमी असलेले उत्पादनकघटक उत्पादनासाठी वापरावे लागतात. व्यवस्थापनावर कामाचा ताण वाजवीपेक्षा अधिक पडतो. यांसारखे ताण उद्भवले व त्यांचा प्रभाव पडेल एवढे वाढले, म्हणजे नफ्यासंबंधीच्या अपेक्षा विफल होण्याची चिन्हे दिसू लागतात. त्यातच गुंतवणूक फार वाढल्यामुळे व्याजाचा दरही वाढू लागतो. वाढते व्याज व घटता नफा यांच्या कात्रीत सापडलेल्या उद्योगपतींचा आत्मविश्वास डळमळू लागतो आणि भांडवलगुंतवणूक कमी करण्याकडे त्यांची प्रवृत्ती होते. ही प्रवृत्ती जेव्हा मूळ धरते, तेव्हाच घसरणीला आरंभ होतो. या अवस्थेत वाढत्या उत्पादनखर्चाला तोंड देण्यासाठी उत्पादक किमती का वाढवू शकत नाहीत, या प्रश्नाला उत्तर म्हणून मिचेलने तीन कारणे सांगितली आहेत. पहिले कारण असे की, काही किमती दीर्घकालीन करारांनी ठरलेल्या असल्यामुळे त्या वाढविता येत नाहीत. दुसरे कारण असे की, भरभराटीच्या काळात अतिउत्साहाच्या भरात काही उद्योगांत तरी अति-उत्पादन झालेले असते व अवाजवी प्रमाणात उत्पादनशक्ती वाढून ठेवण्यात आलेली असते. तिसरे कारण असे की, वाढलेले व्याजाचे दर व वाढलेला खर्च यांमुळे बांधकामाला प्रथम आळा बसतो आणि त्यामुळे त्या व्यवसायातील रोजगार कमी होऊन मागणी वाढण्याची प्रक्रिया मंदावू लागते. सारांश, घटत्या नफ्यामुळे भरभराटीची अखेर होऊन घसरण सुरू होते.

घसरण सुरू झाल्यानंतर दुष्टचक्रांचा अनुभव येऊ लागतो. प्रथम भांडवलगुंतणूक कमी होते. त्यामुळे उत्पादन कमी होते आणि त्यामुळे रोजगारही कमी होतो. रोजगार कमी झाल्यामुळे लोकांची उत्पन्ने कमी होतात. साहजिकच विविध प्रकारच्या मालाला मागणी कमी होते. किमती पडू लागतात. शेतमालाच्या किमती कारखान्यातील तयार मालाच्या तुलनेने वेगाने खाली येतात. किमती ज्या प्रमाणात कमी होतात, त्या प्रमाणात उत्पादनखर्च त्वरित कमी होत नाही. त्यामुळे नफा अधिकच कमी होतो. त्यामुळे घटता नफा, घटती गुंतवणूक, घटते उत्पादन, घटता रोजगार, घटत्या किमती, घटती मागणी हे अनिष्ट प्रवाह परस्परपोषक़ ठरतात. या प्रवाहांचा जोर वाढला, म्हणजेच घसरणीचे पर्यवसान मंदीत होते. मंदी बराच काळ अस्तित्वात असते. मंदी ज्या वेळी आपली नीचावस्था गाठते, त्या वेळी पुरेशी आर्थिक कुवत नसल्यामुळे अनेक व्यवसाय-उद्योग बंद करावे लागतात. पुढे यथासमय मंदी नाहीशी होऊन अर्थव्यवस्थेला पुन्हा पालवी फुटू लागते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत तेजीमंदीचे व्यापारचक्र चालू राहते.

व्यापारचक्राच्या चार अवस्थांमध्ये ज्या घटना घडतात, त्यांबाबत फारसे दुमत नाही. तेजीच्या काळात उत्पादन, रोजगार, किमती, नफा, उत्पन्ने, भांडवलगुंतवणूक, मागणी इ. गोष्टी वाढत असतात आणि मंदीच्या काळात याच गोष्टी घटत असतात. तसेच या गोष्टींचा एकमेकींवर परिणाम होतो आणि त्यांची तेजीच्या अथवा मंदीच्या काळातील दिशा एकच असते. त्याचप्रमाणे भरभराटीची अवस्था कमी काळ टिकते, पण मंदीचा कालावधी तुलनेने दीर्घ असतो, हेही मान्य झालेले आहे. पण घटनांचे वर्णन बरोबर असले, तरी त्यामुळे तेजी-मंदीला चालना देणारी व कलाटणी देणारी निश्चित कारणे कोणती, ही कारणे तेजीमंदीच्या प्रक्रियेतच अंतर्भूत असतात की बाह्य असतात, यांबाबत अर्थशास्त्रज्ञांत खूप मतभेद आहेत. त्यांतील एक मत असे आहे की, तेजीमंदीच्या कारण-परिणामांविषयी भरपूर चिकित्सा आजवर झालेली असली, तरी व्यापारचक्रांबाबत समाधानकारक खुलासा मिळाला, असे म्हणता येणार नाही. या मतभेदाच्या गदारोळात एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसते ती म्हणजे तेजीमंदीचक्राचा नफ्याशी संबंध असतो आणि म्हणूनच नफ्याच्या प्रेरणेवर चालणाऱ्या भांडवलशाहीशी व्यापारचक्र निगडित झाले आहे.  भांडवलशाही अर्थव्यवस्था जोपर्यंत आहे, तोपर्यंत तेजी कितीही आली, तरी मंदीची भीती कायम राहणारच आणि ती भीती जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपली आर्थिक धोरणे ठरविताना भांडवलशाही देशांच्या राज्यकर्त्यांना जागरूक राहावे लागणार, असे मत अमेरिकेसारख्या देशाच्या अर्थकारणाच्या संदर्भात नामवंत अर्थशास्त्रज्ञांकडून द्वितीय महायुद्धोत्तर मांडण्यात आले आहे. ज्यांना हे मत अमान्य आहे, त्यांचे म्हणणे असे की, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात भांडवलशाहीच्या स्वरूपात असे मूलभूत बदल झाले आहेत, की ज्यामुळे मंदीच्या भीतीला आता अर्थ उरला नाही. या मतभेदांचे सम्यक आकलन व निराकरण करण्यासाठी तेजीमंदीच्या चक्राची कारणमीमांसा करणारी जी विविध मते अर्थशास्त्रज्ञांकडून मांडली गेली आहेत, त्यांचा मागोवा घेतला पाहिजे.


व्यापारचक्रविषयक काही उपपत्ती : जेव्हन्झच्या मते व्यापारचक्र हवामानाशी संबंधित आहे आणि अवर्षणाचा काळ जेव्हाजेव्हा येतो, तेव्हा मंदी येते आणि पीक चांगले असले, म्हणजे तेजी असते. हवामानचक्राचा कालावधी दहा वर्षांचा असतो, असे जेव्हन्झचे म्हणणे आहे. हे प्रतिपादन अर्थशास्त्रीय चिकित्सेत मूळ धरू शकले नाही. विशेषत: उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकी उत्पादनाच्या अनुरोधाने केलेला व्यापारचक्राचा खुलासा पटण्याजोगा नव्हता. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अवर्षणामुळे अर्थोद्योगावर विपरीत परिणाम होतो, हे मान्य केले पाहिजे. तथापि त्यामुळे होणारे परिणाम चक्री स्वरूपाचे असण्याचे कारण नाही. उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत तर या परिणामांचे महत्त्व फारच कमी असते. याशिवाय अनेक देशांत एकाच वेळी तेजीमंदी असल्याचे दिसून आले आहे, अवर्षणाचा संबंध मंदीशी लावून त्याचा खुलासा करता येण्याजोगा नाही. सर्व जगभर अवर्षंण आहे, अशी परिस्थिती सामान्यत: नसते. अर्थात एका देशातील मंदीचा परिणाम दुसऱ्या देशातील व्यापार-उद्योगांवर होऊ शकतो, हे खरे आहे. शेती व उद्योग यांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. शेतकी उत्पादन कमी झाल्यास कच्च्या मालाच्या किमती वाढून औद्योगिक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आणि उलटपक्षी औद्योगिक तेजीमंदीचा फटका शेतीलाही बसतो, एवढे मान्य करता येईल.

व्यापारचक्र ही निव्वळ चलनसंबंधित घटना आहे, अशी मीमांसा हॉट्रे या सुप्रसिद्ध चलनशास्त्रपंडिताने केली. चलनाधिष्ठित अर्थव्यवस्थेत, चलनव्यवस्थेत व चलनसंख्यामानात जे फेरबदल होतात त्यांचा किमतीवर व किमतींच्या प्रभावामुळे सर्व अर्थोद्योगांवर परिणाम होतो, हे खरेच आहे. प्रश्न एवढाच आहे की, चलनसंबंधित फेरबदल व त्यांचे परिणाम चक्री स्वरूपाचे का असावेत? हॉट्रे यांनी असे प्रतिपादन केले की, एकंदर चलन कमी-अधिक होण्याचा तेजी-मंदीशी संबंध असतो. एकंदर चलन जेव्हा कमी होते, तेव्हा उपभोक्त्यांजवळ  पैसा कमी असल्यामुळे ते आपला खर्च कमी करतात. म्हणजेच उपभोग्य मालाची मागणी कमी होते. याची झळ प्रथम उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाला, त्यांतील रोजगाराला लागते आणि कालांतराने ती भांडवली वस्तूंच्या उत्पादनाला, त्यांतील रोजगारालाही लागते. उत्पादन, रोजगार सर्वत्र कमी झाला, मागणी कमी असल्यामुळे किमती सर्वत्र पडल्या, म्हणजे मंदी येते. याउलट एकंदर पैसा वाढला, म्हणजे उपभोक्त्यांची उपभोग्य मालाची मागणी वाढते, त्यांच्या किमती वाढतात. त्यांतील नफा वाढतो, उत्पादन वाढविले जाते, रोजगार वाढतो, उपभोग्य मालाचे उत्पादन वाढवावे लागल्यामुळे भांडवली मालाच्या उत्पादनाला चालना मिळते. तेथेही रोजगार-किमती यांत वाढ होते व एकंदरीने सर्वत्र तेजीची परिस्थिती येते.

या संदर्भात, एकंदर चलनातील फेरफार टाळता का येऊ नयेत, असा प्रश्न उद्भवतो. हॉट्रेच्या मते सध्याच्या चलनव्यवस्थेची सूत्रे बँकांच्या हातात आहेत कारण एकंदर चलनात बँकनिर्मित चलनाला म्हणजेच पतचलनाला प्राधान्य आहे. बँक-व्यवसायातील तत्त्वे व कार्यपद्धती अशी आहेत की, एकंदर चलनातील फेरबदल टाळता येत नाहीत एवढेच नव्हे, तर त्यांनाही चक्री स्वरूप प्राप्त होते. एकंदर बँक-व्यवसायाची रचनाच अशी आहे की पतचलनविस्तार असो की पतचलनसंकोच असो, सर्वच बँका अपरिहार्यपणे त्या प्रक्रियेला हातभार लावतात. बँका जेव्हा पतचलनविस्तार करतात, तेव्हा तेजी येते आणि जोपर्यंत पतचलनविस्ताराची प्रक्रिया चालू आहे, तोपर्यंत तेजी चालू राहते. पतचलनविस्तार बँकांनी आखडता घेतला, म्हणजे मंदी दिसू लागते आणि पतचलनसंकोच वाढत गेला, म्हणजे मंदीची परिस्थिती चालू राहून आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होऊ लागते. जोपर्यंत पतसंकोचाचे धोरण बँका चालू ठेवतात, तोपर्यंत मंदीची झळ लागतच राहते, बँकांनी पुन्हा पतचलनविस्तार सुरू केला, म्हणजे मंदी संपून तेजी येण्यास मदत होते. बँकांना जेव्हा पतचलनविस्तार करावयाचा असतो  तेव्हा व्याज कमी करणे, कर्जे देताना अटी शिथिल करणे यांसारख्या उपायांनी कर्ज घेणे बँका सुलभ करतात. याउलट जेव्हा बँकांना पतचलसंकोच करावयाचा असतो, तेव्हा बँक आपला व्याजाचा दर तर वाढवितातच, शिवाय ऋणकोंना कर्जे मागताना अनेक अवघड अटी पूर्ण कराव्या लागतात. बँकांना आपल्या पतचलनविषयक धोरणात बदल का करावा लागतो, काही काळ विस्तार, मग संकोच, मग पुन्हा विस्तार व पुन्हा संकोच असे त्या बदलाचे स्वरूप का असते, याची मीमांसा करताना हॉट्रे म्हणतो की, पतनिर्मितीचे धोरण बँकांना स्वतंत्रपणे ठरविता येत नाही. आपल्याकडील रोकडीच्या काही प्रमाणातच त्यांना पतनिर्मिती करता येते. बँकांवरील हे बंधन कायद्याचे, रूढीचे वा स्वानुभवामुळे स्वत:वर लादलेले असते. या बंधनामुळे बँकांच्या पतनिर्मितीत अस्थैर्य येते आणि या पतनिर्मितीला चक्री स्वरूप प्राप्त होते. बँकांनी पतचलननिर्मिती केल्यामुळे जेव्हा तेजी येते, तेव्हा किमती वर जातात, लोकांचे व्यवहार वाढू लागतात आणि त्यामुळे लोकांना स्वत:जवळ अधिक रोकड ठेवावीशी वाटू लागते. त्यामुळे बँकांकडे जाणारी रोकड कमी होते. शिवाय पतचलननिर्मिती वाढत असते, तेव्हा रोकड-पतचलन गुणक घसरत असतोच. तेजीची परिस्थिती बराच काळ चालू राहिल्यास बँकाजवळील रोकड किमान पातळीवर येण्यास वेळ लागत नाही. ही धोक्याची पातळी आली की, बँका गडबडतात व चलनसंकोच करण्यास उद्युक्त होतात. परिणामी मंदी अस्तित्वात येते. मंदीच्या काळात वस्तूंच्या किमती घटल्यामुळे आणि लोकांच व्यवहार कमी झाल्यामुळे दैनंदिन व्यवहारांसाठी रोकड कमी लागते. ती बँकांकडे येते व आपली रोखतेची परिस्थिती समाधानकारक आहे, असे वाटल्यास बँका पुन्हा पतचलनविस्तार करू पाहतात. बँका तेजीला चालना देतात आणि हे चक्र पूर्ण होते. मात्र कालांतराने तेजीला आळा घालणे बँकांना भाग पडते. तेजीला आपणहून आळा घालण्याची वेळ बँकावर येऊ द्यावयाची नसेल, तर तेजीच्या काळातही बँकांकडील रोकड कमी होणार नाही, अशी स्थिती निर्माण व्हावी लागते. मध्यवर्ती बँकेकडून होणारी रोकडनिर्मिती सतत वाढत राहिली, तर अशी सोय होऊ शकेल कारण लोकांची रोकडीची गरज भागूनही बँकांकडे भरपूर रोकड येत राहील. पण तसे होत नाही कारण मध्यवर्ती बँकेकडून केल्या जाणाऱ्या रोकडनिर्मितीवरही मर्यादा असतात. विशेषत: चलननिर्मिती मध्यवर्ती बँकेकडील सुवर्णसाठ्यावर अवलंबून असते. म्हणजेच चलननिर्मिती अमर्याद होऊ शकत नाही आणि म्हणून मंदी अपरिहार्य ठरते. हॉट्रेच्या मते, व्यापारचक्र ही निव्वळ चलनसंबंधित घटना आहे.

बँकांना कर्जे वाढवावयाची असली, म्हणजे त्या व्याजाचा दर कमी करतात आणि अन्यथा वाढवितात. बँकांकडून व्याजाच्या दरांत हे जे फेरफार केले जातात, त्यांचा प्रथम व त्वरित परिणाम व्यापाऱ्यांवर होतो, असा हॉट्रे याचा दावा आहे. त्याचे म्हणणे असे की, आपल्या कुवतीच्या मानाने बरेच मोठे व्यवहार व्यापारी करीत असल्यामुळे ते कर्जावर विशेष अवलंबून असतात आणि व्याजदरांतील फरक त्यांना ताबडतोब जाणवतो. व्याज वाढल्यास आपल्याकडील राखीव साठ्यात ते कपात न करता उलटपक्षी तो वाढवितात. व्यापाऱ्यांबची मालासाठी मागणी कमीअधिक झाली, म्हणजे उत्पादनही कमीअधिक करावे लागते. सारांश, व्यापारचक्रांस व्यापारी व अस्थायी भांडवलासाठी त्यांची मागणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ कारण मात्र चलनसंबंधित आहे. लोकांची उत्पन्ने स्थिर राहतील, अशा बेताने चलननिर्मिती करण्याचे धोरण चलनसंस्थेने अनुसरले, तर बँकांजवळील रोकडीलाही स्थैर्य येईल व त्यामुळे त्यांच्या पतचलननिर्मितीलाही स्थैर्य येईल. सामान्यत: असे म्हणता येईल की, चलनपुरवठा स्थिर असला पाहिजे, पण उत्पादन घटकांत होणारी संख्यात्मक व गुणात्मक वाढ लक्षात घेऊन त्यांत वाढ अगर घटही केली पाहिजे. सारांश, योग्य चलननीती व्यापारचक्राचे उच्चाटन करून आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करू शकते.


व्यापारचक्राची दुसरी जी उपपत्ती आहे, तिचा संबंध ‘भांडवलगुंतवणूक’ या आर्थिक प्रक्रियेशी आहे. या उपपत्तीप्रमाणे भांडवलगुंतवणुकीचे सुयोग्य प्रमाण राखले जात नसल्यामुळे तेजीतून मंदी व मंदीतून तेजी हा प्रकार उद्भवतो. तेजीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भांडवलगुंतवणूक केली जाते. त्यामुळे भांडवली वस्तूंचे उत्पादन वाढते, पण त्या प्रमाणात उपभोग्य वस्तूंचे उत्पादन वाढत नाही. याउलट मंदीमध्ये भांडवलगुंतवणूक कमी होते व ज्या प्रमाणात भांडवली वस्तूंचे उत्पादन घटते, त्या प्रमाणात उपभोग्य वस्तूंचे उत्पादन कमी होत जाते. या प्रकारामुळे उत्पादनाचा समतोल ढासळतो. व्यापारचक्राचे रहस्य यात आहे. हायेक या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने ‘अतिरिक्त गुंतवणुकी’ चा सिद्धांत मांडला. आपल्या सिद्धांताची त्याने हॉट्रेच्या विश्लेषणाशी सांगड घातली आणि गुंतवणुकीवर चलनविषयक नीतीचा कसा प्रभाव पडतो, यांवर भर दिला.

एकूण प्राप्तीतून म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नातून जो भाग बचत केला जातो, त्या भागावर भांडवली मालाची मागणी अवलंबून असते. भांडवली मालाची मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधला, तर अर्थव्यवस्थेचा समतोल बिघडण्याचे काही कारण नसते. पण बँका जेव्हा पतचलनविस्तार करून भांडवलगुंतवणुकीसाठी पैसा उपलब्ध करून देतात, तेव्हा भांडवली वस्तूंसाठी मागणी कृत्रिमरीत्या तयार केली जाते आणि त्यामुळे त्या वस्तूंचे उत्पादन वाढते. पतचलनविस्तारामुळे जेव्हा भांडवली वस्तूंची मागणी वाढते, त्या वेळी उपभोग्य वस्तूंची मागणी वाढण्याचे मात्र काहीच कारण नसते. त्यांचा उत्पादनखर्च मात्र वाढतो, कारण उत्पादन-घटक मिळविण्यासाठी भांडवलीउद्योग व उपभोग्य वस्तू-उद्योग यांच्यात तीव्र स्पर्धा होते व एकंदरीने घटकांच्या किमती वाढतात. पतचलननिर्मितीमुळे एकंदरीने सर्वच वस्तूंच्या किमती वाढतात. भाववाढीची प्रक्रिया सुरू झाली की, बचत करण्याची प्रवृत्ती ज्यांच्यात अधिक आहे, त्यांच्याकडे पैसा जातो. त्यामुळे उपभोग्य वस्तूंची मागणी कमी होण्याची प्रवृत्ती अर्थव्यवस्थेत दिसून येते. वाढता खर्च व घटती मागणी यांच्या कात्रीत उपभोग्य वस्तु-उद्योग  सापडतात आणि त्यांची वाढ खुंटते कारण उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनावरच शेवटी भांडवली मालाची मागणी अवलंबून असते. म्हणजेच उपभोग्य मालाच्या उद्योगातील बिकट परिस्थितीची प्रतिक्रिया उत्पादक मालाच्या उद्योगांवर अपरिहार्यपणे होतेच आणि मग तेथेही घटत्या मागणीमुळे उत्पादक उत्पादन वाढविण्यास बिचकू लागतात. अशा प्रकारे तेजीच्या काळात होणारी अतिभांडवल-गुंतवणूक शेवटी सर्व अर्थव्यवस्थेलाच धोक्यात आणते आणि शेवटी आर्थिक अरिष्ट कोसळते, म्हणजेच मंदी येते. अतिभांडवल-गुंतवणूक काही काळापर्यंत चालू राहते, कारण बँका कृत्रिमरीत्या त्या मालाला मागणी निर्माण करीत असतात पण जेव्हा बँका पतचलनविस्तार थांबवितात, तेव्हा भांडवलीउद्योग धोक्यात येतात. कारण बचत-पुरवठा हव्या त्या प्रमाणात होऊ शकत नाही. येथे लक्षणीय गोष्ट ही की, बँकांनी आपला हात जरी आखडता घेतला नाही, तरी भांडवलगुंतवणूक अती झाल्यावाचून रहात नाही व भांडवली वस्तूच्या उत्पादकांना वाढता खर्च व घटती मागणी,  ही परिस्थिती उदभवते व परिणामी मंदीची अवस्था उदभवते.

मंदीच्या काळात उलट परिस्थिती अनुभवास येते. भांडवलगुंतवणूक कमीकमी होऊ लागते. ती कमी झाल्यास संबंधित व्यवसायातील रोजगाराला झळ लागते.त्या उद्योगातल्या मालाच्या किमती पडू लागतात. या सर्वांचा परिणाम उपभोग्य मालाची मागणी कमी होण्यात होतो. त्यामुळे त्या मालाच्या उत्पादनातही मंदी येते, पण उपभोग्य मालाची मागणी विशिष्ट मर्यादेखाली येऊ शकत नाही कारण ती मागणी सामान्यतः लवचीक नसते. लोकसंख्याही वाढत असते. भांडवली वस्तूंचे उत्पादन कमी झाल्यामुळे उपभोग्य वस्तूंचा पुरवठा कमी होऊ लागतो, त्या मानाने मागणी कमी न झाल्यास काही काळ लोटल्यानंतर उपभोग्य वस्तूंच्या किमती वर जातात आणि उत्पादनात नफा वाढण्याची चिन्हे दिसू लागतात. याचा परिणाम हळूहळू मंदीतून तेजीकडे जाण्यात होतो. पुन्हा भांडवलगुंतवणूक वाढण्यास मदत होते. केव्हातरी ही भांडवलगुंतवणूक अती होते आणि मंदी येते.या विवेचनाचा आशय असा की, भांडवलगुंतवणुकीत जी आंदोलने चालतात, त्यांत व्यापारचक्राचे रहस्य आढळते. गुंतवणुकीत होणाऱ्या फेरफारांना बँकांचे पतविषयक धोरण खातपाणी घालत असते. अतिरिक्त गुंतवणूक सिद्धांत हॉट्रेच्या सिद्धांताचा एक भाग आहे, तो या अर्थाने होय.

व्यापारचक्राची तिसरी मीमांसा जी आहे, तिचा भर उपभोगखर्चात होणाऱ्या बदलावर आहे. हॉब्सन या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने केलेल्या मीमांसेप्रमाणे मंदीचे रहस्य उपभोगन्यूनतेत आढळते. उपभोगावर होणारा खर्च कमी झाल्यामुळे त्या मालाचा उठाव होत नाही आणि म्हणून मंदी येते. मंदीची झळ प्रथम उपभोग्य वस्तूंच्या उद्योगांना लागते, नंतर तिचा परिणाम भांडवली वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांवरही होतो. उपभोगन्यूनतेवर आधारलेल्या या प्रणालीला उपभोग-न्यूनता-मीमांसा किंवा सेवन-न्यूनता-मीमांसा असे म्हणता येईल. ⇨ टॉमस मॅल्थस, सिसमाँडी, फॉस्टर इ. अर्थशास्त्रज्ञांच्या लिखाणात या मीमांसेला महत्त्वाचे स्थान आहे.

उपभोगन्यूनतेची मीमांसा प्रामुख्याने घसरणीची व मंदीची मीमांसा आहे. संपूर्ण व्यापारचक्राचे स्वरूप ही मीमांसा स्पष्ट करत नाही. चालू प्राप्तीतील वाजवीपेक्षा अधिक भाग बचत केला जातो, म्हणजेच अति-बचत होते. त्यामुळे उपभोग-खर्च व्हावा तेवढा होत नाही आणि म्हणून मंदी येते, असा या मीमांसेचा आशय आहे. अतिबचत होण्याचे कारण राष्ट्रीय उत्पन्नाचा बराचसा भाग धनिकांच्या हातात असतो आणि या धनिकांची प्रवृत्ती बचत करण्याकडे असते. त्यांच्या उपभोगसामर्थ्यावर साहजिकच मर्यादा असतात, परिणामी त्यांच्याकडून आपोआप बचत होत जाते. अति-बचत झाल्यामुळे भांडवलनिर्मिती होऊन अर्थव्यवस्थेची उत्पादनशक्ती वाढते पण ज्या प्रमाणात उत्पादन-विशेषतः उपभोग्य वस्तूंचे उत्पादन-वाढते, त्या प्रमाणात उपभोग्य वस्तूंची बाजारपेठ वाढली नाही, असे जेव्हा आढळून येते, तेव्हा मंदी येते. उपभोगन्यूनता-मीमांसेचे हे ढोबळ स्वरूप होय. मार्क्सने भांडवलशाहीचे जे विश्लेषण केले आहे, त्यात हीच मीमांसा उचलून धरली आहे. केन्सने आपल्या ‘जनरल थिअरी’ मध्ये उपभोग्यन्यूनतेची मंदीशी सांगड घातली आहे.

व्यापारचक्राची आणखी एक मीमांसा मानसशास्त्रावर आधारित आहे. सुविख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ ⇨ आर्थर सेसिल पिगू यांच्या मीमांसेनुसार भांडवलगुंतवणूक करणाऱ्यांउना जेव्हा निराशावादाने पछाडलेले असते, तेव्हा मंदी येते. त्या काळात भांडवलगुंतवणूक कमी होते, उत्पादन कमी होते, रोजगार कमी होतो, प्राप्ती कमी होते, खर्च कमी होतो, नफा कमी होतो आणि त्यामुळे निराशावाद वाढतो. निराशावाद हा सांसर्गिक असतो. त्यामुळे एकाच वेळी भांडवलगुंतवणूक करणारे सर्वच निराशावादाने पछाडलेले असतात. हा निराशावाद काही कालावधीनंतर नाहीसा होतो पण अमुक एका कारणाने तो नाहीसा होईल, असे निश्चित सांगता येत नाही. बँकांनी व्याजाचा दर कमी करून भांडवलगुंतवणुकीला चालना देण्याचा प्रयत्न केला, तरी भांडवलगुंतवणारे निराशावादी कमी व्याजदराचा फायदा घेतील, असा भरवसा देता येत नाही. निराशावादाचे आशावादात परिवर्तन होण्यास एखादी अफवादेखील पुरते. आशावादही निराशावादाप्रमाणे सांसर्गिक असतो. आशावादाची लाट एकदा आली, की व्याजाचा दर कितीही असो, भांडवलगुंतवणूक वाढते त्यामुळे तेजी येते. परत निराशावाद येण्यास आणि तो पसरण्यास आधार मिळेपर्यंत ही तेजी चालू राहते. आशावाद व निराशावाद यांच्या लाटा पाठोपाठ येत असतात आणि त्यामुळे तेजी-मंदीला चक्री स्वरूप येते. व्यापारचक्राची मानसशास्त्रीय मीमांसा अशी आहे. मानसशास्त्रीय घटक तेजी-मंदीला कारणीभूत असतात, प्रवर्तकांची व बचत करणाऱ्यां ची प्रतिक्रिया व्यापारचक्रांच्या अवस्थांना गती देते, हे व्यापारचक्राचे सिद्धांत मांडणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना मान्य आहे. मात्र ते घटक दुय्यम स्वरूपाचे असतात, संपूर्ण व्यापारचक्राचे सामाधानकारक स्पष्टीकरण देण्यास ते अपुरे पडतात, यांवर अर्थशास्त्रज्ञांचे एकमत आहे.


चलन, भांडवलगुंतवणूक व उपभोगप्रमाण यांचा कार्यभाग व्यापारचक्रात काय असतो हे निश्चित करून पूर्वीच्या सर्व मीमांसांचे समायोजन करण्याचा प्रयत्न केन्सप्रणीत व्यापारचक्राच्या सिद्धांतात करण्यात आला आहे. केन्स व त्यानंतरचे अर्थशास्त्रज्ञ ह्यांनी आर्थिक विश्लेषणाची जी नवीन साधने आणली, त्यांचा उपयोग करून आधुनिक मीमांसेची उभारणी करण्यात आली आहे. त्यांतील तीन संकल्पनारूप साधने महत्त्वाची आहेत. ती अशी : (१) भांडवलाची (सीमांत) लाभक्षमता, (२) उत्पन्नातील बदलांचा भांडवलगुंतवणुकीवर होणारा परिणाम म्हणजे प्रवृद्धिप्रमाण, (३) भांडवलगुंतवणुकीवर उत्पन्नावर होणारा परिणाम म्हणजेच गुणक.

भांडवलाची उत्पादकता व भांडवलाची लाभक्षमता यांत फरक आहे. भांडवलाची उत्पादकता भांडवलगुंतवणुकीपासून सुटणाऱ्या (प्रत्यक्ष नफ्यावर अवलंबून असते. भांडवलाची लाभक्षमता म्हणजे भांडवलगुंतवणुकीपासून होणारा अपेक्षित नफा होय. नफ्याबाबतच्या अपेक्षा, कल्पनेच्या आवाक्यात येणाऱ्या भविष्यकाळात नफा किती मिळेल, यासंबंधीच्या भांडवलगुंतवणूक करणाऱ्यां च्या अंदाजावर अवलंबून असतात. हे अंदाज करताना वर्तमानकाळातील प्रत्यक्ष नफा अर्थातच विचारात घेतला जातो. पण त्याखेरीज अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या  सर्व प्रवाहांचा विचारही केला जातो. उदा. आवडी-निवडींतील बदलांमुळे एखाद्या वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होईल अथवा उत्पादनतंत्रातील एखाद्या सुधारणेमुळे तिच्या पुरवठ्यावर काय परिणाम होईल, याचा विचार करून नफ्याबाबतचे अंदाज बांधले जातात. भांडवलगुंतवणूक करणारांचे अंदाज बरोबर ठरतातच असे नाही पण ते बरोबर असोत वा चूक असोत, त्यांचा परिणाम भांडवलगुंतवणुकीवर निश्चित होतो. भांडवलाची उत्पादकता ही तांत्रिक बाब आहे, तर भांडवलाची लाभक्षमता ही गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनोव्यापाराशी संबंधित आहे. अशा प्रकारे मानसशास्त्रीय मीमांसा आधुनिक मीमांसेत समाविष्ट आहे. भांडवलगुंतवणुकीपासून होणारा अपेक्षित नफा व्याजाच्या दरापेक्षा अधिक असेल, तर भांडवलगुंतवणूक करण्यास व वाढविण्यास गुंतवणूकदार प्रवृत्त होतात. तो कमी असेल, तर भांडवलगुंतवणूक करणाऱ्यांतचा उत्साह मावळतो.

 भांडवलगुंतवणूक केल्यानंतर भविष्यात एकंदर उत्पन्नात किती वाढ होईल, हे लोकांच्या उपभोगप्रवृत्तीवर अवलंबून असते. विवक्षित भांडवलगुंतवणुकीमुळे तिच्या प्रमाणात लोकांच्या उत्पन्नात भर पडते. त्यानंतर उत्पन्नात होणारी वाढ प्रथम वाढलेल्या उत्पन्नाचा किती भाग खर्च केला जाईल, यावर अवलंबून असते. १०० रु. भांडवलगुंतवणुकीमुळे उत्पन्न १०० रुपयांनी वाढले आणि उपभोग प्रवृत्तीचे प्रमाण एक द्वितीयांश असल्याने त्यांतील ५० रु. खर्च केले गेले, तर प्रथम १०० रुपयांनी व त्यानंतर ५० रुपयांनी उत्पन्न वाढते. त्या पन्नासमधील जो भाग खर्च केला जातो, तो उत्पन्नवाढीचा तिसरा टप्पा. अशा प्रकारचे टप्पे येत गेल्यानंतर शेवटी जेव्हा उत्पन्न वाढण्याची प्रक्रिया थांबते, तेव्हा मूळच्या १०० रु. भांडवलगुंतवणुकीमुळे उत्पन्नातील वाढ विशिष्ट पटीने म्हणजे दुप्पट होते. मुळची भांडवलगुंतवणूक व एकंदर उत्पन्नवाढ यांचा परस्परसंबंध म्हणजेच ‘गुणक’ (मल्टिप्लायर) होय.

भांडवलगुंतवणुकीमुळे उत्पन्न वाढून उपभोगखर्च वाढतो आणि त्यामुळे उत्पन्नात भर पडते, हे गुणकाच्या कल्पनेत अभिप्रेत आहे. पण ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबत नाही. उपभोगखर्च वाढल्यामुळे भांडवलगुंतवणूक वाढण्यास चालना मिळते आणि त्यामुळे जी भांडवलगुंतवणूक होते, तिच्यामुळे पुन्हा उत्पन्नात वाढ होते. उपभोगखर्च विवक्षित प्रमाणात वाढल्यामुळे भांडवलगुंतवणूक ज्या प्रमाणात वाढवावी लागते, तिला उद्देशून ‘प्रवृद्धिप्रमाण’ (ॲक्सिलरेटर) हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. भांडवलगुंतवणुकीतून होणारी उत्पादन-उत्पन्नातील वाढ व त्या वाढीमुळे होणारी गुंतवणूकवाढ यांनाच अनुक्रमे ‘गुणकप्रमाण’ व ‘प्रवृद्धिप्रमाण’ असे म्हणता येईल. ‘गुणक’ व ‘प्रवृद्धी’ या दोन कल्पना लक्षात घेतल्या, तर व्यापारचक्राच्या विविध अवस्थांतील आर्थिक व्यवहारांत स्वयंवृद्धी का दिसून येते व आर्थिक आंदोलनात तीव्र स्वरूपाची गतिमानता का असते, यांचा बोध होतो.

 

लाभक्षमता, गुणक व प्रवृद्धी यांचा उपयोग करून केन्स, हन्सेन, हिक्स यांसारख्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी व्यापारचक्राची पुढीलप्रमाणे मीमांसा केली आहे : भांडवलगुंतवणूक जसजशी वाढत जाते, तसतशी तिची सीमांत लाभक्षमता कमी होत जाते. म्हणजेच भांडवलगुंवणुकीला असलेले प्रोत्साहन हळूहळू पण निश्चितपणे मंदावत जाते. तेजीच्या काळात एकंदर उत्पन्न जसजसे वाढत जाते, तसतसे घटत्या उपभोग प्रवृत्तीच्या नियमानुसार उपभोग कमी होऊन बचतीचे प्रमाण वाढत जाते आणि त्या प्रमाणात भांडवलगुंतवणूक होऊ शकेल की नाही, असा संशय निर्माण होतो. भांडवलगुंतवणूकीमुळे रोजगार वाढत जातो. त्यामुळे उपभोग वाढत जाऊन त्या उपभोगाच्या निमित्ताने भांडवलगुंतवणूक वाढवावी लागते. पण आवश्यक असा रोजगार वाढणे कमीकमी होऊ लागल्यानंतर- म्हणजे पूर्ण रोजगाराची किंवा त्यासदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, भांडवलगुंतवणूक कमी होऊ लागते. समजा पूर्ण रोजगारच प्रस्थापित झाला आहे ह्या परिस्थितीत उत्पन्न वाढण्याची आणि त्यामुळे उपभोग प्रथम व त्या अनुषंगाने भांडवलगुंतवणूक वाढण्याची शक्यता कमी होते. याचाच अर्थ असा की, भांडवलगुंतवणुकीचे सुरुवातीचे प्रमाण कायम राहू शकत नाही. बचतीच्या मानाने भांडवलगुतवणूक कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे उत्पन्न व उपभोग यांच्यातील तफावत भरून निघणार, या स्थितीत तेजीला धोका पोचतो. भांडवलगुंतवणूक कमी झाल्यास तुलनेने अधिक प्रमाणात उत्पन्ने कमी होऊन घसरण सुरू होते आणि मंदीची चाहूल लागते.

याउलट मंदीच्या काळात उत्पन्ने ज्या प्रमाणात कमी होतात, त्या प्रमाणात उपभोग प्रमाण कमी होत नाही. मंदीच्या काळातही तांत्रिक प्रगती चालूच राहिली, तर भांडवलाची लाभक्षमता मंदीच्या प्रमाणात कमी होतेच असे नाही. या कारणामुळे मंदीचा मुळचा जोर कायम राहू शकत नाही. काही काळ मंदी चालू राहिल्यानंतर परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, तरी आशेचे किरण आपोआप दिसू लागतात. हळूहळू प्रवास तेजीच्या दिशेने चालू होतो. सारांश, अर्थव्यवस्थेतील कोणत्याही दिशेने होणारे बदल स्वयंपोषक असले, तरी हे स्वयंपोषण अमर्यादित काळ चालू शकत नाही. या स्वयंपोषणावर अर्थशास्त्राच्या नियमातूनच, म्हणजे एका अर्थाने नैसर्गिक अशा मर्यादा असतात आणि त्यामुळे कोणत्याही दिशेने होणाऱ्या बदलाने विशिष्ट मर्यादा गाठली, म्हणजे तो बदल होण्याची प्रक्रिया थांबणे, एवढेच नव्हे, तर त्या दिशेला प्रतिकूल असे वातावरण निर्माण होऊन बदलाची दिशा पालटणे अपरिहार्यच होते. त्यामुळे तेजीचे मंदीत व मंदीचे तेजीत होणारे परिवर्तन अपरिहार्य म्हटले पाहिजे. नफ्याच्या प्रेरणेवर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेत त्या प्रेरणेला थोडा जरी धक्का बसला, तरी मंदीचे वातावरण येण्यास वेळ लागत नाही आणि याउलट थोडासा आशेचा किरण जरी दिसला, तरी आर्थिक परिस्थिती सुधारू लागते. आधुनिक मीमांसा सुसंगतपणे एवढेच दाखवून देते की, आर्थिक गतिमानतेचे स्वरूपच असे आहे की भांडवलगुंवणुकीचे उत्पन्न, बचत, उपभोग यांवर ज्या प्रकारचे परिणाम होतात, त्यामुळेच भांडवलगुंतवणुकीला धोका निर्माण होतो. सारांश, चांगली आर्थिक परिस्थितीच आर्थिक अरिष्टाचे बीजारोपण करते. याउलट वाईट  काही काळ चालू राहिली, म्हणजे परिस्थिती सुधारणारे प्रवाह तिच्यातूनच उदयास येतात. वाईटातून चांगले व चांगल्यातून वाईट असे आर्थिक गतिमानतेचे स्वरूप असल्यामुळे तेजीमंदीचक्र उद्‌भवते, असा या मीमांसेचा निष्कर्ष थोडक्यात सांगता येईल.


व्यापारचक्रावरील उपाययोजना : गतिमान अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर होणारी आर्थिक आंदोलने अपरिहार्य आहेत, असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. समृद्ध अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे जे मान असत,. ते केवळ चालू ठेवण्यासही मोठ्या प्रमाणावर भांडवलगुंतवणूक लागते. त्या गुंतवणुकीत होणाऱ्या फेरफारांचे परिणाम चांगलेच जाणवणारे असतात. अशा अर्थव्यवस्थेत मंदीचा धक्का किती जोरदार असू शकतो, हे १९२९ च्या महामंदीने चांगलेच निदर्शनास आणून दिले. त्या मंदीनेच तेजीमंदीचक्राचे स्वरूप समजावून घेणे व त्या अनुरोधाने प्रतिबंधक उपाययोजना करणे किती अगत्याचे आहे, याची जाणीव करून दिली.

व्यापारचक्रावरील उपाययोजना म्हणजे मुख्यत्वेकरून मंदीविरुद्ध केलेली उपाययोजना होय. तथापि तेजीच्या काळातही आर्थिक अस्थिरता असतेच. ही अस्थिरता टाळण्यासाठी तेजी एखाद्या विशिष्ट पातळीवर गेली, की तेव्हाची आर्थिक परिस्थिती स्थिर राखण्यासाठी उपाययोजना आवश्यक ठरते. अर्थव्यवस्थेत बेकारी नसणे हे सर्व दृष्टींनी महत्त्वाचे असल्यामुळे पूर्णरोजगाराच्या पातळीवर उत्पादनप्रमाण नेऊन तेथे ते स्थिर राहील, अशी उपाययोजना झाली आणि ती यशस्वी ठरली, तर व्यापारचक्र उदभवणारच नाही. अशी उपाययोजना केन्सप्रणीत अर्थशास्त्रात प्रथम सुचविण्यात आली. पूर्ण रोजगाराला आवश्यक असे भांडवलगुंतवणूकीचे प्रमाण नेहमी राखले पाहिजे, हे या उपाययोजनेचे वैशिष्ट्य होय.

अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार आपोआपच निर्माण होतो, हा सनातन अर्थशास्त्राचा सिद्धांत केन्सने अग्राह्य ठरविला. मंदी व तीमुळे बेकारी अशी आर्थिक परिस्थिती असल्यास ती नाहीशी करण्याच्या दृष्टीने भांडवलगुंतवणूक वाढविली पाहिजे, असे केन्सने सुचविले. केन्सच्या अर्थशास्त्रात व्याजाचा दर कमी करण्यावर भर दिला आहे. व्याजाचा दर चलनपुरवठ्यावर अवलंबून असतो आणि चलनपुरवठा मध्यवर्ती बँकेच्या अधीन असल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजाच्या दराने नियंत्रण करता येते. बेकारीच्या परिस्थितीत व्याजाचा दर कमी झाल्यास व तो कमी झालेला दर प्रचलित सीमांत लाभक्षमतेच्या तुलनेने अनुकूल ठरल्यास भांडवलगुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल आणि तेजी निर्माण होईल, असे केन्सचे प्रतिपादन आहे. पूर्ण रोजगार होईपर्यंत भांडवलगुंतवणूक वाढल्यानंतर ती टिकविण्याचा प्रश्न येतो. या बाबतीत आणि एकंदर भांडवलगुंतवणाऱ्यांच्या बाबतीत आधुनिक आर्थिक विचारांची भूमिकाच अशी आहे की, नफ्याच्या अपेक्षेने होणारी खाजगी भांडवलगुंतवणूक पूर्ण रोजगारासाठी आवश्यक एवढी होईलच, असा निर्वाळा देता येणार नाही. शिवाय तीव्र मंदीच्या काळात व्याज कितीही कमी झाले, तरी भांडवलगुंतवणूक वाढत नाही, असा अनुभव आहे. अशा परिस्थितीत नफ्याच्या अपेक्षेने न केली गेलेली-म्हणजेच सरकारी भांडवलगुंतवणूक केली पाहिजे, असे केन्सचे म्हणणे आहे. पूर्ण रोजगाराला आवश्यक एवढी भांडवलगुंतवणूक खाजगी क्षेत्राकडून झाली तर ठीकच पण ती न झाली, तर जी पोकळी निर्माण होईल ती भरून काढण्याची जबाबदारी राज्यसंस्थेने पत्करली पाहिजे कारण सरकारी गुंतवणूक भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर अवलंबून नसते. पुरेशी भांडवलगुंतवणूक होणे, हे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने म्हणजेच व्यापारचक्राचे निवारण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे भांडवलगुंतवणुकीला उत्तेजन देण्याच्या दृष्टीने राज्यसंस्थेने व मध्यवर्ती बँकेने नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी व्यापारचक्राच्या केन्स-हिक्सप्रभूती अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या मीमांसेनुसार, व्याजाचा दर सीमांत लाभक्षमतेच्या तुलनेने कमी ठेवणे, खाजगी भांडवलगुंतवणूक पुरेशी न झाल्यास तिला सार्वजनिक भांडवलगुंतवणुकीची जोड देणे आणि एकंदरीत सरकारी खर्च वाढवून उपभोगमान वाढण्यास हातभार लावणे, हे तीन महत्त्वाचे उपाय आहेत. आर्थिक विषमता वाढल्यास बचत कमी होते, पण विषमता कमी झाल्यास उपभोगमान वाढते, हा निष्कर्ष केन्सच्या आर्थिक विचारातून निघत असल्यामुळे, विषमता कमी करणाऱ्या अर्थसंकल्पीय उपायांना हा विचार अनुकूल आहे. केन्सवादी अर्थशास्त्रातून सूचित होणाऱ्या, उपायांपैकी सरकारी भांडवलगुंतवणूक या उपायावर अलीकडे अधिक भर दिलेला आढळतो. भांडवलशाही विचारप्रणालीची जी राष्ट्रे आहेत, त्यांत खाजगी क्षेत्राशी ज्यायोगे स्पर्धा होणार नाही, अशा प्रकारचा खर्च व भांडवलगुंतवणूक वाढवून -उदा., संरक्षणावर खर्च करून-पूर्ण रोजगार व एकंदरीने आर्थिक स्थैर्य टिकविण्याचा कल दिसून येतो. मंदीची चाहूल लागली की, त्वरित आवश्यक उपाय योजण्याचे तंत्र अमेरिकेसारख्या देशाने साध्य केल्याचे दिसून येते.

व्यापारचक्रामुळे जे दीर्घ मुदतीचे चढउतार अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतात, त्यांची मीमांसा अमेरिकन अर्थतज्ज्ञ सायबरलिंग व शुंपेटर यांनी वेगळ्या प्रकारे केली आहे. सायबरलिंग यांच्या मते, जागतिक पातळीवर जी मोठी युद्धे झाली, त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडून दीर्घ अशी आंदोलने निर्माण झाली. युद्धजन्य परिस्थितीत सरकारी खर्चात प्रचंड वाढ होते. वाढीव खर्च भागविण्यासाठी इतर उपायांबरोबरच चलनपुरवठ्यामध्येही वाढ केली जाते. त्यामुळे भाववाढ होऊन आर्थिक तेजी अवतरते. याउलट युद्धाची समाप्ती झाल्यानंतर सरकारी खर्च व चलनपुरवठा कमी झाल्याने औद्योगिक क्षेत्रात घसरण सुरू होते आणि वाढीचा वेग मंदावतो. मंदीचा कालावधी साधारणपणे १० वर्षांपर्यंत टिकून राहतो. शुंपेटर यांच्या मीमांसेनुसार व्यापारचक्रामध्ये अंतर्भूत असलेली आंदोलने ⇨ नवप्रवर्तनामुळे (इनोव्हेशन) निर्माण होतात. नवप्रवर्तनांची गती धीमी असेल, तर व्यापारचक्रांतर्गत बदल अल्प मुदतीचे असतात नवप्रवर्तनाचा वेग जास्त असेल, तर दीर्घ मुदतीची आंदोलने संभवतात. रेल्वे, दळणवळणाची साधने, विद्युतपुरवठा व तंत्रज्ञान या पायाभूत क्षेत्रांतील नवप्रवर्तनामुळे आर्थिक भरभराट होत असते.

व्यापारचक्राच्या मुख्य अवस्था एकापाठोपाठ येतात, हे स्थूलमानानेच खरे आहे कारण दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या इतिहासाचा अनुभव असा आहे की, एका मोठ्या व्यापारचक्राच्या दीर्घावधीत एकदोन लहान व्यापारचक्रेही अंतर्भूत असतात. कालमऱ्यादेसंबंधी अमेरिकेत अलीकडील काळात जो सखोल अभ्यास करण्यात आला, त्यावरून असे दिसते की, १८६५ ते १९३८ या काळातील मोठ्या व्यापारचक्रांची कालमऱ्यादा कमीतकमी सहा वर्षे व जास्तीतजास्त तेरा वर्षे होती. अल्प मुदतीची व्यापारचक्रे जर विचारात घेतली, तर अशी व्यापारचक्रे १८६५ ते १९३८ या काळात अठरा झाली आणि किमान दोन वर्षे व कमाल नऊ वर्षे, अशी त्यांची कालमऱ्यादा होती. त्यावरून व्यापारचक्रांत बऱ्याच प्रमाणात कालमऱ्यादेच्या बाबतींत नियमितपणा दिसून येतो, असे म्हणता येईल.


भांडवलशाही अर्थप्रणालीमध्ये व्यापारचक्रांची निर्मिती ही अपरिहार्य घटना आहे. व्यापारचक्रांतर्गत आंदोलनांचा आर्थिक प्रगतीवर व सामाजिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतो. व्यापारचक्रामुळे ओढविणाऱ्या आर्थिक अरिष्टांचे समूळ उच्चाटन करणे शक्य नसले, तरी त्यांमुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शक्य झाले आहे. व्यापारचक्राच्या निर्मितीमागे कोणतेही कारण असले, तरी सरकारच्या मुद्राविषयक (मोनेटरी) धोरणामुळे व्यापारचक्र प्रभावित होऊ शकते. मध्यवर्ती बँकेच्या साहाय्याने चलनवाढ व पतनिर्मिती रोखून उद्योगव्यवसायांचा अवाजवी विस्तार सरकार नियंत्रित करू शकते. आर्थिक क्षेत्रात जेव्हा घसरण सुरू होते, तेव्हा मध्यवर्ती बँक मुद्राविषयक धोरणात बदल करून पतपुरवठ्यात वाढ करते व उद्योगव्यवसायांना चालना देण्याचे प्रयत्न करते. परंतु व्यावसायिकांना जेव्हा निराशावादाने पछाडलेले असते, तेव्हा केवळ व्याजदरांत कपात करून किंवा पतपुरवठ्यात वाढ करून आर्थिक घसरण रोखणे कठीण होते. त्यासाठी सरकारने आपल्या मुद्राविषयक धोरणाबरोबरच योग्य असे राजकोषीय धोरण (फिस्कल पॉलिसी) राबविणे गरजेचे असते. करप्रणालीची पुनर्रचना, सार्वजनिक खर्च व दीर्घ मुदतीची कर्जे यांचे सुयोग्य नियंत्रण असे राजकोषीय धोरणाचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. जेव्हा आर्थिक प्रगतीचा वेग मंदावतो, तेव्हा या तीन साधनांचा अवलंब करणे गरजेचे असते. कोणतेही नवीन कर न लावता प्रत्यक्ष करांमध्ये कपात केल्यास लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा राहतो आणि तो वस्तूंच्या अगर सेवांच्या खरेदीसाठी वापरला जातो. सार्वजनिक विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन लोकांच्याकडे पैसा येतो व त्यांची क्रयशक्ती वाढते. अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून व धनिक वर्गाकडून कर्जे घेऊन वाढीव सार्वजनिक खर्चाची तरतूद करता येते. तुटीचे अंदाजपत्रक सादर करून अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसा चलनात आणता येतो. या तिन्ही उपायांमुळे लोकांची क्रयशक्ती वाढून वस्तूंची व सेवांची मागणी वाढते आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास मदत होते. अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होऊन जेव्हा तेजी अवतरते, तेव्हा वरील तीन घटकांचा विरुद्ध दिशेने वापर केल्यास आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते. परंतु सरकारच्या मुद्राविषयक व राजकोषीय धोरणांची परिणामकारकता सरकारी यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर, जागरूकतेवर व तत्परतेवर अवलंबून असते. सरकार व्यापारचक्रामुळे उदभवणाऱ्या अरिष्टांचा सामना करण्यात उदासीन व निष्क्रिय असेल, तर आर्थिक स्थैर्य येणे अवघड जाते. त्या दृष्टीने अर्थशास्त्रज्ञांनी व्यापारचक्रांतर्गत आंदोलनांचा प्रतिकार करण्यासाठी स्वयंचलित स्थिरकाची (ॲटोमॅटिक स्टॅबिलायझर) कल्पना मांडलेली आहे. तेजीच्या काळात प्रागतिक कर प्रणाली (प्रोगेसिव्ह टॅक्सेशन पॉलिसी) ही त्यांपैकी एक स्वयंचलित स्थिरक असून, त्यामुळे अधिक-उत्पन्नगटातील लोकांकडून जादा प्रत्यक्ष करआकारणीद्वारे पैसा काढून घेतला जातो व खर्च नियंत्रित केला जातो. याउलट अर्थव्यवस्थेत घसरण सुरू झाल्यास करआकारणीत कपात होऊन लोकांच्याकडे खर्चासाठी जादा पैसा राहतो व त्यांची क्रयशक्ती वाढते. बेरोजगारांना भत्ता अगर विम्यांचे संरक्षण, हाही स्वयंचलित स्थिरक अमेरिकेसारख्या देशात प्रचलित आहे. तथापि अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यामध्ये या स्वयंचलित स्थिरकांचा वाटा मर्यादितच आहे.

पहा : व्यापारी क्रांति.

संदर्भ : 1. American Economic Association, Readings in Nusiness Cycle Theory, New York, 1942.           2. Burns, A. F. Mitchell, W. C. Measuring Business Cycle, New York, 1944.           3. Estey, James Arthur, Business Cycle, Bombay, 1960.           4. Haberler, G. Prosperity and Depression, London, 1958.           5. Lucas, Robert, E., Jr. Models of Business Cycles, Oxford, 1987.  

सहस्रबुद्धे, व. गो. भेंडे, सुभाष