व्यापार, किरकोळ व घाऊक : उपभाक्त्यांना नित्य गरजेचा माल अल्प प्रमाणात विकण्याची प्रक्रिया म्हणजे किरकोळ व्यापार आणि हे कार्य करणारा म्हणजे किरकोळ व्यापारी. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याचे, तो साठविण्याचे आणि लहान व्यापाऱ्यांना पुरविण्याचे कार्य म्हणजे घाऊक (ठोक) व्यापार आणि तो करणारा घाऊक व्यापारी. किरकोळ व्यापारी म्हणजे इंग्रजीतील ‘रिटेलर’. रिटेलरचा अर्थ लहान तुकडे वा भाग करणे, असा असून तो मोठा अर्थपूर्ण आहे.
किरकोळ व्यापार व त्याचे प्रकार : किरकोळ विक्रेत्याला वा व्यापाऱ्याला किमतीतील संभाव्य चढउतार, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडींतील संभाव्य बदल, मालाच्या दर्जातील संभाव्य बिघाड यांसारखे व्यापार उदिमांतील अटळ धोके पत्करावे लागतात. ग्राहकाची आवडनिवड लक्षात घेऊन तिची उत्पादकांना जाणीव करून देणे व मालाच्या मागणी-पुरवठ्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करणे, हे किरकोळ व्यापाऱ्याचे काम असते. उत्पादन-मागणी यांत समन्वय घडवून आणणारा बाजार-व्यवसायातील अत्यावश्यक घटक म्हणजे किरकोळ विक्रेता. जरूरीप्रमाणे गिऱ्हाईकाला उधारीवर माल देण्याची तयारी त्याला ठेवावी लागते.
किरकोळ व्यापाऱ्याची स्थूलमानाने फिरते दुकानदार व बैठे दुकानदार, अशी किरकोळ व्यापाऱ्याची स्थूलमानाने वर्गवारी करता येईल. कोणत्याही एका ठिकाणी दुकान न घालता गल्लोगल्ली व गावोगावी आपला माल खपविणारे हातगाडीवाले आणि फेरीवाले पूर्वीपासून सर्वत्र आढळतात. गावांत आणि शहरांत बैठे दुकानदार विशेषत्वाने आढळतात. या बैठ्या दुकानांची अनेक प्रकारे विभागणी करता येते. विक्रीचा माल, दुकानाची मालकी, अंतर्गत व्यवस्था इत्यादींवरून किरकोळ दुकानांची वर्गवारी करता येते. मर्यादित भांडवलाची सर्वसामान्य दुकाने आणि भांडवलप्रधान अशी बहुविभागीय दुकाने, ⇨ सुपर बाजार व ⇨ साखळी दुकाने अशीही वर्गवारी करता येते. याव्यतिरिक्त सहकारी ग्राहक संस्था, कराराने बांधलेली दुकाने, साठा न करणारे व्यापारी, ⇨ टपाल विक्री व्यवसाय व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विक्री हे प्रकारही आढळतात.
सर्वसाधारण दुकाने ही सर्वांत जुनी किरकोळ विक्री संस्था असून, त्यांची मालकी एकाच व्यक्तीकडे असते. ही दुकाने ग्रामीण भागांत, छोट्या गावांत आणि शहरांच्या परिसरात ग्राहकांना सर्व प्रकारचा माल पुरवितात. या दुकानांना बेताचे भांडवल पुरते. दुकानदार ग्राहकांच्या गरजांनुसार वस्तूंची निवड करतो, त्यामुळे वस्तूंच्या विक्रीसाठी छोट्या दुकानांत क्वचित एकाच प्रकारचा अगर गटातील माल विकला जातो. किरकोळ दुकानाची मालकी एकाकडे असल्याने एकदा दुकानदार व्यवसायाच्या विविध अंगांवर जातीने लक्ष ठेवू शकतो. यासाठी तो आपल्या कुटुंबियांचीही मदत घेतो. मर्यादित भांडवल असल्याने स्वस्त भावात मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करणे त्याला शक्य नसते. किरकोळ दुकानदारांकडे मालाचा पुरेसा साठा नसतो आणि मर्यादित उलाढालीमुळे खरेदी-विक्रीचा हिशेब बारकाईने ठेवण्याचे त्यांना ज्ञान नसते. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय चालविणे, हेच बहुतेकांचे उद्दिष्ट असते. असे असले, तरी त्यांचे ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध व ग्राहकांच्या गरजांची चांगली ओळख त्यांना असते. वाहतुकीच्या साधनांत वाढ होऊनही सर्वसामान्य दुकाने मोठ्या दुकानांच्या स्पर्धेत अद्यापिही टिकून राहिली आहेत.
जेव्हा एकाच छपराखाली व व्यवस्थापनाखाली दुकानाचे अनेक विभाग पाडून प्रत्येक विभागातून विशिष्ट वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा अशा दुकानाला एकछत्री दुकाने किंवा ⇨ विभागीय भांडारे असे म्हणतात. हे बहुविभागीय दुकान म्हणजे एक भव्य विक्रीकेंद्रच होय. टाचणीपासून मोटारीपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू या दुकानांत विकल्या जातात. ग्राहकांच्या क्रय-प्रेरणांना आवाहन करण्यासाठी वस्तु-दालने (शोकेस), वस्तूंची आकर्षक मांडणी, अत्याधुनिक फर्निचर, तत्पर सेवक व भव्य सजावट यांवर मोठा खर्च केला जातो. दूरध्वनीवरून मालाची मागणी स्वीकारली जाते. माल घरपोच करण्यासाठी दुकानाची गाडी असते. थोडक्यात, गिऱ्हाईकांच्या जास्तीत जास्त सुखसोयींकडे लक्ष पुरविण्यात येते. पाश्चिमात्य देशांत बहुविभागीय दुकाने अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. या दुकानांना मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. मालांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त असल्याने छोटी गिऱ्हाईके या दुकानांकडे फारशी फिरकत नाहीत. धंद्याचा पसारा प्रचंड असल्याने मालक आणि ग्राहक यांच्यात जिव्हाळा निर्माण होणे अशक्य होते. अनेकदा व्यवसायाचा व्याप आटोक्याबाहेर जातो, माल पडून राहतो आणि व्यवस्थापनाला प्रचंड नुकसानही सोसावे लागते. वाढती स्पर्धा, मोठ्या प्रमाणावरील वाहतूक समस्या, मोटारगाड्या ठेवण्यासाठी अपुरे वाहनतळ, प्रदूषण यांमुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एकछत्री दुकाने अनेक देशांमध्ये ग्राहकांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यामुळे अशा दुकानांनी आपल्या शाखा उपनगरांमध्ये उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी न करता केवळ विशिष्ट वस्तूंचीच विक्री शहरातील निरनिराळ्या भागांत करणाऱ्या दुकानांना बहुशाखा अगर साखळी दुकाने असे म्हणतात. जसजसे धंद्यात यश मिळत जाईल, तसतशा दुकानांच्या शाखा शहराच्या विविध भागांत उघडण्यात येतात. शहरभर विखुरलेल्या सर्व दुकानांवर मध्यवर्ती कार्यालयाचे नियंत्रण असते. स्वत: उत्पादक साखळी दुकाने सुरू करून ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू शकतो. त्यामुळे मध्यस्थाचे उच्चाटन होते. अशा दुकानांतून भपक्यापेक्षा चांगल्या दर्जाचा नित्योपयोगी माल शहराच्या विविध भागांतील रहिवाशांना माफक किमतीत देण्यावर अधिक कटाक्ष असतो. ग्राहकांच्या तक्रारी असतील, तर मुख्य कचेरी तक्रारीचे निवारण करते. मात्र ग्राहकांना बहुविभागीय दुकानांत मिळतो, तसा विविध प्रकारचा वैविध्यपूर्ण माल येथे मिळत नाही. साखळी दुकाने चालविण्यासाठी कार्यक्षम नोकरवर्गाची गरज भासते. अन्यथा ही दुकाने ग्राहकांच्या सदिच्छा गमावतात.
कराराने बांधलेली दुकाने वेगळ्या तत्त्वावर चालविली जातात. किरकोळ व्यापारी एरवी स्वतंत्र असला, तरी उत्पादकाचे नियंत्रण तो काही विशिष्ट बाबतींत स्वत:वर लादून घेतो. हा किरकोळ दुकानदार वरकरणी सर्व उत्पादकांचा माल विकत असला, तरी तो एकदोन उत्पादकांचा माल अधिक प्रमाणात खपविण्याचा प्रयत्न करतो. या उत्पादकांकडून दुकानदारास उधारीवर वा स्वस्त किमतीत माल मिळत असतो म्हणून दुकानदार उत्पादकाशी अलिखित कराराने बांधलेला असतो. मात्र हा करार गुप्त असतो. दुकानात माल ठेवणाऱ्या इतर उत्पादकांना त्याची कुणकुण लागणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.
अमेरिकेमध्ये १९३० साली स्वयंसेवा पद्धतीने किरकोळ विक्री करणारे सुपर बाजार (सुपर मार्केट्स-मॉल्स) सुरू झाले. त्यानंतर अनेक युरोपीय देशांत अशा दुकानांचा झपाट्याने प्रसार झाला. प्रत्येक वस्तूच्या वेष्टनावर मूल्यदर्शक चिठ्ठी लावलेली असते. ग्राहकांनी दुकानात हिंडून वस्तू स्वत:च निवडाव्यात आणि छोट्या ढकलगाडीत घालून रोखपालापर्यंत आणाव्यात, अशी अपेक्षा असते [→ सुपर बाजार].
एकच किंमत आकारणाऱ्या दुकानात कोणत्याही वस्तूची एकच किंमत आकारण्यात येते. अशा दुकानांत सर्वसामान्य लोकांच्या नित्याच्या गरजेच्या वस्तू विकण्यात येतात. वस्तूंच्या किमती अल्प असतात. ज्या मालाला सतत मागणी आहे, असाच माल विक्रीसाठी ठेवण्यात येत असतो. त्यामुळे उलाढाल मोठ्या प्रमाणात होते.
दर्जेदार उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री व नफ्याचे प्रमाण कमी ठेवून, भरीव सूट देऊन विक्री करणारी दुकाने सर्वत्र पाहावयास मिळतात. चांगल्या कंपन्यांची व उत्तम दर्जाची उत्पादने अशा दुकानांमधून विक्रीस ठेवलेली असतात. दुकानांचे भाडे व इतर खर्च कमी व्हावा, या दृष्टीने अशी दुकाने मोठ्या शहरांच्या उपनगरांमध्ये उघडण्यात येतात.
अलीकडे काही कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री विक्रय-प्रतिनिधीमार्फत थेट ग्राहकाला करू लागल्या आहेत. ह्या कंपन्या आपले वितरक स्वतःच निवडतात. वितरक आपल्या नियंत्रणाखाली काम करणारे उपवितरक नेमतात आणि ते ग्राहकांमधून विक्री-प्रतिनिधी निवडतात. वितरक आपल्या नियंत्रणाखाली काम करणारे उपवितरक नेमतात आणि ते ग्राहकांमधून विक्री-प्रतिनिधी निवडतात. अशा प्रतिनिधींमार्फत उपभोक्त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी वस्तूंची विक्री केली जाते. वितरणव्यवस्थेतील सर्व मध्यस्थांना साधारपणे विक्रीच्या २० ते ५० टक्के दलाली (कमिशन) दिली जाते. मध्यस्थांना द्यावा लागणारा मोबदला आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च यांमुळे उपभोक्त्यांना वस्तू काहीशा महाग मिळतात.
उत्पादक आणि ग्राहक यांमधील मध्यस्थांना दूर करून माल रास्त किमतीत मिळणे सहजसाध्य होण्याच्या उद्देशाने ग्राहक एकत्र येतात आणि परस्परसहकार्याने दुकाने उघडतात. अशा दुकानांस ‘ग्राहक सहकारी संस्था’ म्हणतात [→ सहकार]. नफा मिळविण्यापेक्षा ग्राहकांना चांगल्या दर्जाचा निर्भेळ माल स्वस्त किमतीत मिळावा, असा ह्या सहकारी संस्थांचा प्रयत्न असतो. कामगार अगर मध्यमवर्ग छोट्या रकमा गोळा करून भांडवल उभे करतो. सहकारी संस्थांचे सभासद हाच अशा दुकानांचा प्रमुख ग्राहकवर्ग असतो. ग्राहकांना त्यांनी केलेल्या खरेदीच्या प्रमाणात नफ्यातील लाभांश वाटण्यात येतो. कार्यक्षम सहकारी संस्था खाजगी दुकानदारांना यशस्वी शह देऊ शकतात. मात्र संस्था चालविणारी माणसे प्रामाणिक व कामसू असावी लागतात.
उत्पादकाला आपल्या मालाची विक्री टपालाद्वारे करता येते. मालाची विविध प्रकारांनी जाहिरात करून, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून ग्राहकवर्ग आकृष्ट केला जातो. जाहिरातीची परिपत्रके, मूल्यपत्रके, नमुनापत्रके इ. विविध माध्यमांवर उत्पादकास खर्च करावा लागतो. ग्राहक टपालाद्वारे मालाची मागणी करतो आणि माल व्ही. पी. पी., पोस्ट पार्सल, रेल्वे पार्सल यांद्वारा रवाना केला जातो. [→ टपाल विक्री व्यवसाय].
यानंतरची पुढील पायरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम विक्री किंवा स्काय शॉपिंग होय. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांद्वारे ग्राहकांना वस्तू व त्यांचा वापर यांसंबंधी माहिती पुरविली जाते. उत्पादनांना वेगवेगळे सांकेतिक क्रमांक दिलेले असून, त्यांसमोरच कंपन्यांचे किंवा वितरकांचे दूरध्वनी क्रमांक दिलेले असतात. ग्राहकाने त्या क्रमांकावर दूरध्वनी करून वस्तू मागवावयाची असते. विक्रय प्रतिनिधी ग्राहकाकडे त्या पत्त्यावर वस्तू स्वतः नेऊन देतो आणि ग्राहकाकडून पैसे वसूल करतो. मालाची किंमत भागविण्यासाठी पतपत्राचाही उपयोग केला जातो. पाश्चात्त्य देशांत दूरचित्रवाणीच्या स्वतंत्र वाहिन्या व्यापारी व्यवहारांसाठी राखून ठेवलेल्या असतात. पाश्चात्त्य देशांत इलेक्ट्रॉनीय स्वयंचलित विक्री-यंत्रे सार्वजनिक ठिकाणी बसविलेली असतात. सिगारेटी, दाढीची पाती, पोस्टाची तिकिटे, दूध, आइस्क्रीम, वृत्तपत्रे यांसारख्या वस्तू यंत्रात साठवून ठेवलेल्या असतात. योग्य त्या रकमेचे नाणे यंत्रात टाकून संबंधित बटन दाबल्यास, हवी ती वस्तू यंत्रातून बाहेर टाकली जाते. काही ठिकाणी ग्राहकांच्या दूरसंचांना विक्रेत्यांचे संगणक जोडलेले असतात. संगणकाच्या माध्यमातून खरेदीदारांशी संपर्क साधून किरकोळ स्वरूपाची मालाची विक्री केली जाते.
हातगाडीवाले व फेरीवाले सर्वत्र फिरत असतात. सर्वसामान्य लोकांच्या गरजेच्या वस्तू त्यांना परवडतील अशा किंमतीत ते विकत असतात. टोपल्यांमध्ये, मोठ्या पिशव्यांमध्ये किंवा हातगाड्यांवरून माल घेऊन तो घरोघरी विकण्यात येतो. या पद्धतीत मालाची खरेदी-विक्री व वाहतूक एकाच माणसाच्या हाती असते. घासाघीस करणे, हा या प्रकारातील एक लोकप्रिय घटक असतो. काही फेरीवाले निरनिराळ्या खेड्यांतून आठवडे-बाजाराच्या व जत्रेच्या ठिकाणी जाऊन माल विकतात. छोट्या खेड्यांतील लोकांना फिरत्या दुकानदारांवर अवलंबून रहावे लागते. मोठ्या शहरांत व उपनगरांत भाजीपाला-फळे इत्यादींची विक्री फेरीवाले करतात.
किरकोळ व्यापारी मालाची विक्री झपाट्याने होण्याकरिता योजत असलेल्या अनेक क्लृप्त्यांपैकी दोन क्लृप्त्या म्हणजे भाडे-खरेदी (हायर पर्चेस) पद्धतीने आणि हप्तेबंद पद्धतीने माल विकणे ह्या होत. भाडे-खरेदी पद्धतीत माल उधारीवर देण्यात येतो. किंमत एक रकमेत न घेता एकूण रकमेचे हप्ते ठरविण्यात येतात. पहिला हप्ता मिळाल्यावर, विक्रेता माल गिऱ्हाईकाच्या स्वाधीन करतो. कमी मिळकत असणाऱ्यांना महागड्या वस्तू खरेदी करणे या पद्धतीमुळे सुलभ झाले आहे [→ भाडे खरेदी पद्धती]. हप्तेबंद पद्धत भाडे खरेदी पद्धतीहून थोडीफार निराळी आहे. वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकाला एकूण किमतीचा काही भाग रोख द्यावा लागतो आणि उरलेल्या रकमेचे साप्ताहिक अगर मासिक हप्ते ठरविण्यात येतात. पहिला हप्ता दिल्यानंतर वस्तू ग्राहकाच्या मालकीची होते पण राहिलेली बाकी चुकती करण्यात ग्राहकाकडून चालढकल झाली, तर वस्तू ताब्यात घेण्याचा हक्क विक्रेता राखून ठेवतो. मागील हप्ते रद्द समजले जात नाहीत. मात्र या व्यवहारात हप्तेबंद किंमत ही रोख किमतीपेक्षा जास्त असते.
अलीकडे दिसू लागलेली किरकोळ विक्रीची पद्धत म्हणजे ग्राहकांची साखळी आणि त्या साखळीतलेच काही ग्राहक विक्रेते. सुरुवातीला उत्पादक आपला माल घरोघरी जाऊन विकतात. अशा विक्रीच्या वेळी ग्राहकाला साखळीत सहभागी होण्याची विनंती केली जाते. जो ग्राहक अशी तयारी दाखवितो, त्याला भरपूर सूट देऊन माल दिला जातो. हा ग्राहक त्या मालाची विक्री करताना संपर्कात आलेल्या ग्राहकांना साखळीत सहभागी होण्यासाठी विचारणा करतो.या नव्याने साखळीत आलेल्या ग्राहक-विक्रेत्याला पहिल्या ग्राहक-विक्रेत्याकडून व/वा सरळ उत्पादकाकडून माल मिळू शकतो. पण त्याला मिळणारी सूट मात्र पहिल्या ग्राहक-विक्रेत्यापेक्षा काही टक्के कमी असते. साहजिकच साखळीत जसा क्रमांक खालचा होईल, तसे फायद्याचे प्रमाण कमी होते. नित्य उपयोगाच्या वस्तूंमध्ये (खप सतत वाढता असल्याने) दर्जा चांगला असल्यास ही पद्धत यशस्वी होते. हा सर्व व्यवहार रोखीने होतो. ठोक व किरकोळ विक्रेत्यांना द्यावी लागणारी सूट, जाहिरात, उधारी असे खर्च वाचत असल्याने उत्पादकाला साखळीत भरपूर सूट देणे, स्वतःचा फायदा कमी न करताही परवडते.
किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रे विकसित होत असल्याने विक्री करण्याच्या पारंपरिक प्रकारांना आव्हान दिले जाऊ लागले आहे. उत्पादक व ग्राहक यांतील अंतरही कमी होत चालले आहे. मालाचा साठा न करता दूरचित्रवाणी, दूरध्वनी व संगणक यांच्या साहाय्याने विक्री करणारी व्यवस्था अस्तित्वात येत असल्याने किरकोळ व्यापारामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामतः मोठ्या दुकानांच्या तुलनेत लहान दुकानांना टिकून राहणे अवघड होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहन ठेवून, विविध वस्तू भव्य अशा एकछत्री दुकानातून किंवा सुपर बाजारामधून विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे.
घाऊक व्यापार व त्याचे प्रकार : उत्पादकांचा विकाऊ माल त्यांच्याकडून अगर बाजारपेठेतील त्यांच्या दलालांमार्फत विकत घेऊन मालाचे केंद्रीकरण करणे आणि किरकोळ व्यापाऱ्यांद्वारा ग्राहकांकडे तो माल पोचविणे, हे घाऊक व्यापाऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट. घाऊक व्यापारी अनेक किरकोळ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल विकतो. उत्पादकाकडून खरेदी केलेल्या मालाचे वितरण करण्यापूर्वी मालाचा गुदामात साठा करणे, प्रतवारी ठरविणे, योग्य परिमाण निश्चित करणे, आकर्षक वेष्टन घालणे, मालाची ने-आण करणे यांसारखी बाजार-व्यवसायातील अंगभूत कार्ये घाऊक व्यापारी पार पाडतो. त्यामुळे स्थल, काल व बाह्यांग या बाबतींतील मालाची उपयोगिता वाढते.
भांडवल व व्यवस्थापन घाऊक व्यापाऱ्यांचे असून, व्यवसायापासून होणारा नफा अगर तोटा त्यांच्या एकट्याच्या मालकीचा असतो. मालाच्या विक्रीबरोबरच किरकोळ व्यापाऱ्यांना व्यावसायिक सल्ला देण्याचे कामही ते करतात. अनेकविध वस्तूंचे व ठरावीक वस्तूंचेच असे दोन प्रकार घाऊक व्यापाऱ्यात असतात. कच्चा मालाचा पुरवठा घाऊक व्यापारी करीत असतात. विक्रीबरोबरच वाहतुकीची मर्यादित सेवा पुरविणारे घाऊक व्यापारीही असतात. काही घाऊक व्यापारी उत्पादकांचे प्रतिनिधी (एजंट) म्हणून कार्य करतात. घाऊक व्यापारातील जोखीम किंवा नफा-तोटा ते स्वीकारीत नाहीत. उत्पादकांच्या वतीने ठराविक दलाली घेऊन ते मालाची विक्री करीत असतात.
घाऊक व्यापाऱ्यांमुळे ठिकठिकाणी पसरलेल्या छोट्या उत्पादकांना आपल्याकडील विकाऊ माल दूरदूरच्या बाजारपेठांकडे नेण्याचे जिकिरीचे आणि खर्चाचे काम करावे लागत नाही. शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी घाऊक व्यापाऱ्याची जरूरी भासते [→ कृषिउत्पादन विनिमय केंद्रे कृषिविपणन]. उत्पादकाचा मालाचा साठा ठेवण्याचा त्रास वाचतो. उत्पादकाला बाजारातील उलाढालीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज उरत नाही आणि त्याला आपल्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करणे शक्य होते.
घाऊक व्यापारी विविध प्रकारच्या मालाचा अखंड पुरवठा किरकोळ व्यापाऱ्याला लागेल त्या प्रमाणात करतो. त्यास उधारीची सवलतही देतो. सामान्य किरकोळ व्यापाऱ्याला सर्व उत्पादकांची माहिती नसते, ही अडचण घाऊक व्यापारी सोडवितो.
घाऊक व्यापारी मालावर योग्य त्या प्रक्रिया स्वखर्चाने करीत असल्याने प्रतवारी केलेला माल ग्राहकांच्या हाती पडतो. घाऊक व्यापाऱ्याचे मालाच्या साठ्यावर नियंत्रण असल्यामुळे मागणी-पुरवठ्यांत समतोल प्रस्थापित करून, किंमती स्थिर ठेवता येतात. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो. त्यामुळे वाहतूक खर्चात काटकसर होते.
घाऊक व्यापारी हा उत्पादक व ग्राहक यांमधील महत्त्वाचा दुवा असतो. घाऊक व्यापाऱ्याला उत्पादकाची आर्थिक कोंडीही करता येते. घाऊक व्यापारी भरमसाट नफा काढून किरकोळ व्यापाऱ्यांना माल विकू शकतो. त्याला बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून मालाच्या किमती जबरदस्त वाढविता येतात. वितरण साखळीतील आपल्या महत्त्वाच्या स्थानाचा दुरुपयोग करून उत्पादकाचे, किरकोळ व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे शोषण करणे घाऊक व्यापाऱ्याला सहज शक्य होत असते [→ साठेबाजी]. हे संभाव्य दोष टाळण्यासाठी उत्पादकांच्या अगर ग्राहकांच्या सहकारी संस्था स्थापन होत आहेत.
घाऊक व्यापारी बाजार-व्यवसायातील एक तज्द्न्य माणूस असतो. बाजारविषयक अनेक कार्ये तो माफक दरात पुरी करतो ती करताना बाजार-व्यवसायातील धोके त्याला पत्करावे लागतात. घाऊक व्यापार व व्यापारी हा बाजार-व्यवसायातील एक अपरिहार्य घटक ठरल्यामुळे त्याला पूर्णपणे पर्यायी ठरणारी यंत्रणा निर्माण करणे अवघड ठरते [→ समाईक बाजारपेठा].
पहा : व्यापार.
संदर्भ : 1. Kulkarni, K. R. Agricultural Marketing in India, Vol. I, Bombay, 1956.
2. Stephenson, James, Economics of Wholesale and Retail Trade, London, 1929.
भेंडे, सुभाष चौधरी, जयवंत