व्यापार : (ट्रेड). वस्तू व सेवा यांचे उत्पादन झाल्यापासून त्या उपभोक्त्यांच्या हातात पडेपर्यंत त्या वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीचे होणारे एकूण व्यवहार. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू व सेवा निर्माण कराव्या लागतात. त्या पुरविण्याचे कार्य ज्या व्यक्ती करतात, त्यांना ‘व्यापारी’ असे म्हणतात. व्यापार हा वस्तुविनिमयाच्या स्वरूपात किंवा पैसा-विनिमयाच्या स्वरूपात असू शकतो. अशा विनिमयाचे व्यापाराचे शास्त्र म्हणजे वाणिज्यशास्त्र होय. ⇨ वाणिज्य (कॉमर्स) ही संज्ञा व्यापार या संज्ञेपेक्षा अधिक व्यापक असून, तीत व्यापाराचा (म्हणजे खरेदी-विक्रीचा) समावेश होतोच त्याशिवाय व्यापाराला साहाय्य करणार्याप घटकांत दळणवळणांची साधने, गुदामे, व्यापारी अभिकर्ते, विमा कंपन्या, बँका, जाहिरात व प्रसिद्धी या आनुषंगिक गोष्टींचाही समावेश होतो. उत्पादनाच्या ठिकाणांपासून बाजारपेठांपर्यंत वस्तू व सेवा पोचविण्यासाठी व त्यांचे जलद, कार्यक्षम वितरण होण्यासाठी ही साधने मदत करतात. या साधनांद्वारे खरेदी-विक्री प्रक्रियेत व्यक्ती, स्थळ, काळ यांमुळे निर्माण होणार्याम अडचणी व अडथळे यांचे निवारण केले जाते.
मानवी जीवन व संस्कृती यांच्या प्रगतीबरोबर व्यापाराची प्रगती होत गेली. मानवी गरजांमध्ये व त्याविषयीच्या विचार करण्याच्या पद्धतीत जसजसे बदल होत गेले, त्याप्रमाणे व्यापाराचे स्वरूप बदलत गेले. व्यापाराच्या उत्क्रांतीचा इतिहास प्रदीर्घ आहे. अन्नसंकलक व शिकारी अवस्थेतील अतिप्राचीन मानवी समूहांत व्यापाराचा पूर्ण अभाव होता. नंतरच्या काळात पशुपालन, मासेमारी व शेती या व्यवसायांचा उदय झाला. या अवस्थेत ⇨ वस्तुस्विनिमयास सुरुवात होऊन व्यापाराचा पाया घातला गेला. गाई, शेळ्या, शंख-शिंपले, मीठ यांसारख्या वस्तू विनिमय-माध्यम म्हणून वापरण्यात येत असत. पुढे वस्तुविनिमयातील अनेक अडचणी मानवाच्या लक्षात येऊ लागल्या. त्या दूर करण्यासाठी नंतर चलनाचा वापर होऊ लागला. अशा रीतीने ग्रामीण अवस्थेत व्यापार नियमितपणे सुरू झाला. त्या काळात बाजारपेठा खेड्यांपुरत्याच मर्यादित होत्या. कालांतराने शहरे निर्माण झाली व व्यापाराच्या प्रगतीस चालना मिळाली. शहरांमधून मुख्यत: व्यापार व उद्योगधंदे सुरू झाले. शहरे व खेडी यांच्यात नियमितपणे व्यापार सुरू झाल्याने ती एकमेकांवर अवलंबून राहू लागली. व्यापारी व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने स्वतंत्र व्यापारिवर्गाची गरज निर्माण झाली.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील औद्योगिक क्रांतीमुळे वस्तू व सेवा यांच्या उत्पादनतंत्रात व विनिमय-यंत्रणेत आमूलाग्र परिवर्तन झाले. वाहतूक व दळणवळण क्षेत्रांतही क्रांती होऊन शहरी बाजारपेठांबरोबर राष्ट्रीय बाजारपेठा निर्माण झालाया [→ बाजारपेठ]. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक वस्तूंना इतर देशांतून मागणी येऊ लागली. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर उत्पादनास सुरुवात झाली व जागतिक अर्थव्यवस्था निर्माण झाली. आज संपूर्ण जग ही एक मोठी बाजारपेठ बनली असून, व्यापारी व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहेत. व्यापार वाढविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. बहुतेक सर्व देशांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. जागतिक व्यापार वाढविण्यासाठी जागतिक बँक आणि – आंतरराष्ट्रीय चलन निधी यांसारख्या जागतिक स्वरूपाच्या संघटना प्रयत्नशील आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक संस्था, परकीय चलनव्यवहार करणाऱ्या बँका, विमा कंपन्या, विविध प्रकारचे मध्यस्थ व व्यापारी अभिकर्ते यांच्यात वाढ होत आहे [→ आंतरराष्ट्रीय व्यापार].
मालाची किंमत ठरविण्याच्या पद्धती : व्यापारात मालाची व सेवांची किंमत ठरविण्याच्या पद्धती सर्वसाधारणपणे सारख्याच असतात. जेव्हा विक्रेते व खरेदीदार संख्येने फारच कमी असतात, तेव्हा उभयतांनी सौदा पटवून किंमत ठरविण्याची पद्धत उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय वस्तुविनिमय बाजारासारख्या संघटित बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत ठरविण्यासाठी मध्यस्थाची किंवा दलालाची मदत घेतली जाते. बाजारपेठेतील घडामोडींचे अद्ययावत ज्ञान दलालाला असल्याने तो विक्रेता व खरेदीदार या दोघांना मान्य होईल, अशी किंमत ठरविण्याचा प्रयत्न करतो. मालाची जाहीर रीत्या विक्री करण्याची ⇨ लिलाव ही महत्त्वाची पद्धत प्रचलित असून, या पद्धतीमध्ये अनेक संभाव्य खरेदीदारांपैकी सर्वांत जास्त बोली (बिडिंग) करणाऱ्याला मालाची विक्री करण्यात येते. लिलाव करणारा हा विक्रेत्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. भावी किंमत ठरविण्याच्या पद्धतीमध्ये विक्रेता मालावर अपेक्षित किमतीचा फलक लावतो. बाजारात माल ज्या कमी-जास्त प्रमाणात उपलब्ध असेल, त्या प्रमाणात विक्रेता व खरेदीदार भावी किमतीत फरक करून, त्यानुसार व्यवहार पूर्ण करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात, तसेच पाश्चात्त्य देशांतील किरकोळ विक्रीच्या दुकानांमध्ये ही किंमत ठरविण्याची पद्धत वापरली जाते.
व्यापारामुळे ग्राहकांना आवश्यक त्या वस्तू उपलब्ध होतात आणि त्यांच्या गरजा भागतात. देशात उत्पादन न होणाऱ्या वस्तू नागरिकांना उपलब्ध होतात. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रमविभागणीचे व विशेषीकरणाचे विशेष फायदेही होऊ शकतात. देशांतील उपलब्ध साधनसामग्रीचा व मानवी संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यास प्रोत्साहन लाभते.
व्यापार-पूरक व्यवहार : व्यापार-व्यवहार प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी काही बाह्य घटकांचे सहकार्य घेणे आवश्यक असते. या व्यापार-व्यवहारांना साहाय्यभूत असणाऱ्या घटकांना व्यापाराची आनुषंगिक साधने (एड्स टू ट्रेड) असे म्हणतात. या आनुषंगिक साधनांमध्ये वाहतूक, मालाची साठवण, विमा, अधिकोष, जाहिरात व व्यापारी अभिकर्ते यांचा समावेश होतो [→ गुदामव्यवस्था जाहिरात वाणिज्य विमा].
व्यापाराची व्याप्ती : व्यापाराचे प्रामुख्याने देशी किंवा देशांतर्गत आणि विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्गीकरण केले जाते. अलीकडे जागतिकीकरणाच्या संदर्भात देशी व्यापारा बरोबरच विदेशी व्यापाराचे महत्त्व वाढू लागले आहे. बहुतेक सर्व देशांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असल्याने, आंतरराष्ट्रीय व्यापाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. [→ आंतरराष्ट्रीय व्यापार खुला व्यापार].
देशी किंवा देशांतर्गत व्यापारात किरकोळ व घाऊक व्यापाराचा अंतर्भाव होतो. आधुनिक काळात वस्तूंचे उत्पादन यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व असे केले जाते. उत्पादन केंद्राच्या ठिकाणी तयार झालेल्या वस्तू असंख्य ग्राहकांपर्यंत पोचवणे आवश्यक असते. या प्रक्रियेत घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल किंवा सेवा खरेदी करतात व किरकोळ व्यापार्यां ना त्या लहान प्रमाणात विकतात. उत्पादनकाळापासून उपभोगकाळापर्यंत मालाची साठवण करणे व योग्य प्रमाणात माल किरकोळ व्यापाऱ्यांना त्या लहान प्रमाणात विकतात. उत्पादनकाळापासून उपभोगकाळापर्यंत मालाची साठवण करणे व योग्य प्रमाणात माल किरकोळ व्यापार्यांतना उपलब्ध करून देणे, हे घाऊक व्यापाऱ्याचे प्रमुख कार्य असते. घाऊक व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करणे व प्रत्यक्ष उपभोक्त्याला लहान प्रमाणावर तो विकणे, हे किरकोळ व्यापार्यायचे कार्य असते. किरकोळ व्यापारी हा वस्तुवितरणाच्या प्रक्रियेत उत्पादक किंवा घाऊक व्यापारी व ग्राहक यांना जोडणारा मध्यस्थ असतो. किरकोळ व्यापाराचे वर्गीकरण व्यापाराच्या प्रमाणानुसार किंवा व्यवसायाच्या ठिकाणानुसार करण्यात येते. फिरत्या व्यापार्यांकमध्ये फेरीवाले, रस्त्यावरील दुकानदार, स्वस्त वस्तूंचे दुकानदार व बाजारातील व्यापारी यांचा समावेश होतो [→ दुकाने व विक्री केंद्रे]. स्थायिक किरकोळ व्यापाऱ्या मध्ये सर्वसाधारण माल विकणारी दुकाने, विशिष्ट माल विकणारी दुकाने, रस्त्यावरील विक्रेते व वापरलेल्या वस्तू विकणारे विक्रेते इत्यादींचा समावेश होतो तर मोठ्या प्रमाणावरील किरकोळ व्यापारामध्ये एकछत्री व बहुशाखी दुकाने, एकाच किंमत आकारणारी व कराराने बांधलेली दुकाने, ⇨ टपाल विक्री व्यवसाय, सहकारी संस्था व ⇨ सुपर बाजार इत्यादींचा अंतर्भाव होतो [→ व्यापार, किरकोळ व घाऊक].
देशी व्यापार : या व्यापारी व्यवहारामध्ये वस्तू अगर सेवा यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा समावेश होतो. भारतात खरेदी-विक्रीचे व्यवहार ‘भारतीय मालविक्री कायद्या’ नुसार होत असतात. व्यापारी व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी अनेक क्रिया कराव्या लागतात.
व्यापारी व्यवहाराची सुरुवात ग्राहकाने केलेल्या चौकशीने होते. चौकशीसाठी पत्र पाठवणे ही या व्यवहारातील पहिली अवस्था असते. चौकशीपत्राला उत्तर म्हणून विक्रेता किंमत-पत्रक पाठवितो. किंमत-पत्रकात वस्तूची किंमत, वस्तूचा प्रकार व दर्जा, माल पाठविण्यासंबंधीच्याव मालाची किंमत देण्यासंबंधीच्या अटी यांचा समावेश असतो. किंमत-पत्रकात दिलेल्या किमती अनेक प्रकारच्या असतात. ज्या ठिकाणी मालविक्रीचा करार होतो, त्या ठिकाणची वस्तूची किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. स्थानिक पोहोच किंमतीमध्ये मालाच्या बांधणीचा खर्च, रेल्वे स्थानकापर्यंत माल पोहोचविण्याचा खर्च समाविष्ट असतो. मालाची मूळ किंमत, बांधणीचा खर्च व स्टेशनपर्यंतचे गाडीभाडे हा खर्च विक्रेता करावयास तयार असतो. त्यापुढील सर्व प्रकारचा खर्च खरेदीदाराला करावा लागतो. किमतीमध्ये वस्तूचा परिव्यय, वाहतूक खर्च व वाहतुकीच्या काळातील विम्याचा खर्च यांचा समावेश केलेला असतो. रेल्वे स्थानकापासून आपल्या गुदामापर्यंत मालाची वाहतूक करण्याचा खर्च खरेदीदाराने करावयाचा असतो. अनेक विक्रेत्यांकडून आलेल्या किंमत-पत्रकांची तुलना केल्यावर कोणत्या विक्रेत्याकडून मालाची खरेदी करावी, हे निश्चित केले जाते व त्यानुसार त्याला खरेदीदार मालाची मागणी नोंदविणारे मागणीपत्र (ऑर्डर) पाठवतो. मागणीपत्रात आपण कोणत्या अटींवर माल खरेदी करण्यास तयार आहोत, हे नमूद केलेले असते. विशेषत: वस्तूचे नाव, परिणाम, दर्जा, किंमत, वाहतूकमार्ग, आवेष्टन, माल पाठविण्याचा काळ व पद्धत,तसेच किंमत देण्याचा काळ व पद्धत आणि अन्य अटी यांचा समावेश असतो.
ग्राहकाच्या मागणीची पूर्तता करण्यापूर्वी ग्राहकाच्या आर्थिक परिस्थितीसंबंधीची माहिती मिळविली जाते. विशेषत: उधारीवर मालविक्री करावयाची असेल, तर ग्राहकाची आर्थिक स्थिती जाणून घेणे आवश्यक ठरते. बाजारपेठेतील नामवंत व्यापारी, व्यापारी चौकशी संस्था व बँका यांच्याकडून खरेदीदाराच्या आर्थिक परिस्थितीसंबंधी माहिती मिळू शकते. ग्राहकाच्या आर्थिक स्थितीविषयी अनुकूल माहिती मिळाल्यावर विक्रेता ग्राहकाच्या मागणीची अंमलबजावणी करतो. मालाभोवती आवेष्टन घालून माल वाहतुकीसाठी पाठविण्यात येतो व तशी सूचना खरेदीदाराकडे पाठवली जाते. माल पाठविल्यानंतर विक्रेता बीजक (इन्व्हाइस) तयार करतो. त्यात मालाची किंमत, मालाचे स्वरूप इ. माहिती दिली जाते. व्यापारात अनेकदा बीजक पाठवण्याऐवजी आढावा-बीजक (प्रोफॉर्मा इन्व्हाइस) तयार केले जाते. बीजक तयार करताना काही चुका राहिल्यास त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जमा-चिठ्ठी (क्रेडिट नोट) किंवा नावे-चिठ्ठी (डेबिट नोट) पाठविली जाते. माल मिळाल्यावर खरेदीदाराने करारात ठरल्याप्रमाणे मालाची किंमत द्यावयाची असते.
विदेशी व्यापार : आधुनिक काळात कुठलाही देश आपल्या गरजांबाबत स्वयंपूर्ण नाही. बहुतेक सर्व देश आपल्याला लागणार्याद परंतु आपल्या देशात उत्पन्न न होणाऱ्या वस्तू व सेवा अन्य देशांतून आयात करतात. तद्वतच आपल्या गरजेपेक्षा अधिक होणारे उत्पादन इतर देशांना निर्यात करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ज्या वस्तूंचे देशात नैसर्गिक वा अन्य कारणांमुळे उत्पादन करणे शक्य नसते किंवा ते अधिक खर्चाचे व त्रासदायक असते, अशा वस्तू उपलब्ध होतात त्याचप्रमाणे आपल्या मालाच्या विक्रीसाठी विशाल बाजारपेठा मिळू शकतात. आयात व्यापार व निर्यात व्यापार असे विदेशी व्यापाराचे दोन प्रकार आहेत. प्रत्येक देशाचे विदेशी व्यापारविषयक धोरण स्वतंत्र असून आयात-निर्यातीच्या मालावर व सेवांवर असलेली नियंत्रणे, आयात कर व परकीय चलनविषयक निर्बंध भिन्न असतात. दोन किंवा अधिक देशांतील व्यापारी करारानुसार व राजकीय संबंधांनुसार विशेष सवलती किंवा निर्बंध घातले जातात. आता जगतिक व्यापार संघटनेमुळे सदस्य देशांना नियंत्रणे, आयार कर इ. बाबींमध्ये समानता ठेवणे आवश्यक झाले आहे.
आयात व्यापार कार्यपद्धती : आयातीसाठी सर्वसाधारण किंवा विशेष परवाना आयातदाराला मिळवावा लागतो. नंतर परकीय चलन मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परदेशातील निर्यात व्यापारी किंवा उत्पादक यांच्याकडे आयातीसाठी मागणी नोंदवावी लागते. असे मागणीपत्र (इंडेंट) आयातदार स्वतंत्रपणे किंवा मध्यस्थ मागणीगृहामार्फत (इंडेट हाउस) देऊ शकतो. त्या गृहामार्फत मागणीपत्रके त्या त्या निर्यातदाराकडे किंवा उत्पादकाकडे पाठविण्यात येतात. आर्थिक स्थितीचा पुरावा म्हणून आयातदाराची बँक निर्यातदाराला उद्देशून पतपत्र (लेटर ऑफ क्रेडिट) पाठविण्याची व्यवस्था करू शकते. निर्यातदार माल वाहतूक कंपनीकडे पाठवितो व त्याबाबतची तपशीलवार सूचना आयातदाराकडे किंवा मध्यस्थ मागणीगृहाकडे पाठवितो. त्यानंतर निर्यातदार आयातदारावर मालाच्या किमतीइतकी व खर्चाइतकी हुंडी काढतो. त्या हुंडीसोबत सागरी विमापत्र, बोटीचे भरणपत्र (बिल ऑफ लेडींग), उत्पत्तीचा दाखला (सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन) व आवश्यकता वाटल्यास राजप्रतिनिधीचे शिफारसपत्र (कॉन्सुलर इन्व्हाइस) हे दस्तऐवज पाठवितो. या सर्व दस्तऐवजांसह पाठविलेल्या हुंडीस विपत्रहुंडी (डॉक्युमेंटरी बिल ऑफ एक्स्चेंज) असे संबोधतात. माल पोचल्याची सूचना मिळताच व वरील सर्व दस्तऐवज आयातदार किंवा मध्यस्थगृह यांच्याकडे आल्यावर प्रत्यक्ष माल सोडविण्याचे कार्य केले जाते. आयातीची कार्यपद्धती अत्यंत किचकट व दीर्घसूत्री असल्याने बहुतेक आयातदार त्यासाठी निष्कासन अभिकर्त्यांची (क्लिअरिंग एजंट) मदत घेतात.
निर्यात व्यापार कार्यपद्धती : निर्यात व्यापार-व्यवहार विविध अवस्थांतून जातो. निर्यातदार परदेशातील व्यापार्यांपना जो माल खरेदी करावयाचा आहे, त्याचे किंमत-पत्रक पाठवितो. त्यानंतर आयातदार हा निवडलेल्या निर्यातदाराकडे मागणीपत्र पाठवितो. त्यात मालाचे वर्णन किंवा आवेष्टन, चिन्हांकन, विमा यांविषयी सविस्तर सूचना दिलेली असते. परदेशी व्यापाऱ्याकडून मागणीपत्र आल्यानंतर निर्यात व्यापारी माल पाठविण्याची तयारी करतो. आपला माल वैशिष्ट्यपूर्ण दिसावा, या दृष्टीने निर्यातदार मालाच्या आवेष्टनावर विशिष्ट प्रकारचे चिन्हांकन करतो. निर्यातदाराला बंदराच्या शहरी जाऊन माल निर्यात करण्याच्या सर्व तरतुदी पूर्ण करणे अवघड जाते. त्यासाठी तो अग्रेषण अभिकर्त्याची (फॉर्वर्डिंग एजंट) मदत घेऊ शकतो. अग्रेषण अभिकर्त्याची नियुक्ती केल्यानंतर विक्रीचा माल त्याच्याकडे पाठविला जातो. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अग्रेषण अभिकर्ता माल पाठविण्याची व्यवस्था करतो. जहाजकंपनीची निवड करून जहाजाचे भाडे भरतो व नौवहन-आदेश (शिपिंग ऑर्डर) मिळवितो. नौवहन-विपत्रात (शिपिंग बिल) दिलेल्या माहितीच्या आधारे निर्यात कर आकारला जातो. मालधक्क्यावरील अधिकार्यािची परवानगी मिळविल्यानंतरच माल धक्क्यावर नेता येतो. जहाज धक्क्यावर येते, तेव्हा धक्क्यावरील अधिकारी निर्यात कर अधिकार्यां च्या उपस्थितीत माल जहाजावर चढविण्याची व्यवस्था करतात. जहाजावर माल चढविल्यावर जहाजावरील अधिकारी अग्रेषण अभिकर्त्याला कप्तानाची पावती देऊन नौवहन भरणपत्र मिळवितो. भरणपत्रातील तपशिलांच्या आधारे विमा कंपनीकडून निर्यात मालाचा सागरी विमा (मरिन इन्शुअरन्स) उतरविण्याची व्यवस्था अग्रेषण अभिकर्त्यामार्फत केली जाते. अग्रेषण अभिकर्त्याला कप्तानाची पावती (मेट्स रिसिट) देतो. अग्रेषण अभिकर्ता निर्यातदारातर्फे केलेल्या खर्चाचे विवरणतयार करून त्यात त्याची दलाली समाविष्ट करतो. अशा एकूण खर्चाच्या विवरणपत्रासोबत नौवहन-विपत्र, धक्क्याचे चलन, भरणपत्र, विमापत्र इ. कागदपत्रे जोडून ती सर्व कागदपत्रे तो निर्यातदाराकडे पाठवितो, निर्यातदार अग्रेषण अभिकर्त्याने केलेल्या खर्चाचे प्रदान (पेमेंट) करून निर्यात-बीजक तयार करतो. त्यात जहाजाचे नाव, चिन्हांकन, मालाचे प्रमाण, आवेष्टन खर्च, भाडे, भरणपत्र, मालधक्क्यावरील खर्च, विमाखर्च इत्यादींचा समावेश केला जातो. निर्यातदार व आयातदार यांच्यामध्ये झालेल्या करारात पैसे देण्याची पद्धत ठरलेली असते. निर्यातदार वस्तूंच्या मालकीची सर्व कागदपत्रे विनिमय बँकेमार्फत आयातदाराकडे पाठवितो. या कागदपत्रांसोबत आयातदारावर काढलेले विनिमयविपत्रही (एक्स्चेंज बिल) पाठविले जाते. विनिमय बँक विपत्रावर आयातदाराची स्वीकृतीची सही घेऊन, मालकी हक्कासंबंधीची सर्व कागदपत्रे त्याच्या स्वाधीन करते किंवा आयातदाराकडून मालाची संपूर्ण किंमत घेऊन मालकी हक्कासंबंधीची सर्व कागदपत्रे त्याच्याकडे सुपूर्द करते. या कागदपत्रांच्या साहाय्याने आयातदार माल आपल्या ताब्यात घेण्याची व्यवस्था करते.
खुली अर्थव्यवस्था व बाजारपेठेचे जागतिकीकरण यांमुळे १९९० पासूनच्या कालखंडात व्यापाराच्या परंपरागत संकल्पनेत क्रांतिकारक बदल होत आहेत. नव्या व्यापारव्यवस्थेबाबत अनुकूल-प्रतिकूल विचारप्रवाह जगभर आढळून येतात.
पहा : निर्यात वाणिज्य वाणिज्य मंडळे वाणिज्य विधी व्यापार प्रशासन व्यापार, भारताचा (अंतर्गत, परदेशी).
संदर्भ : Branton, Novel, The Structure of Commerce, London, 1964.
चौधरी, जयवंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..