वैज्ञानिक व तांत्रिक संदर्भ साहित्य : विज्ञान व तंत्रविद्या यांविषयीचे संदर्भ साहित्य संग्रहित होत जाऊन वाढत आहे. मुख्यत: वैज्ञानिक, अभियंते व संशोधक यांच्या माहितीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे साहित्य प्रसिद्ध केले जाते.
वैज्ञानिक व तांत्रिक संदर्भ साहित्याची प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक अशी तीन प्रकारची साधने किंवा स्रोत आहेत. प्राथमिक साधनांमध्ये मूळ संशोधन व विकास यांविषयीची प्रथम व पुष्कळदा एकदाच प्रसिद्ध होणारी टिपणे, तसेच तंत्रविद्येतील व उद्योगातील विज्ञान व अभियांत्रिकी यांच्या नवीन अनुप्रयुक्तींविषयीची विवरणे यांचा अंतर्भाव होतो. प्राथमिक साधनांमधून किंवा त्यांच्या आधारे सिद्ध केलेली व्यवस्थित स्वरूपाची पुस्तके किंवा संकलने ही वैज्ञानिक व तांत्रिक साहित्याची द्वितीयक साधने होत. उदा., निदेशपुस्तके, विश्वकोश, विवेचक ग्रंथ, समालोचने किंवा पुनर्विलोकने, संदर्भ-ग्रंथसूच, सारंशदर्शक व सूचिदर्शक क्रमिका वगैरे. साहित्यविषयक मार्गदर्शक ग्रंथ, व्यक्ती, संघटना, उत्पादने इत्यादींच्या निर्देशिका आपण पाठ्यपुस्तके ही सर्वसाधारणपणे वैज्ञानिक व तांत्रिक संदर्भ साहित्याची तृतीयक साधने मानली जातात.
प्राथमिक साधने : मूळ संशोधन, एकस्वे, प्रमाण-पुस्तके व उत्पादकांचे संदर्भ साहित्य यांविषयीच्या दप्तरनोंदी यांमध्ये येतात.
नियतकालिके : प्राथमिक संदर्भ साधनात मूळच्या संशोधनावर आधारलेले निबंध प्रसिद्ध करणारी नियतकालिके मोडतात. ज्ञानपत्रिका, विद्वत्ताप्रचुर ज्ञानपत्रिका (जर्नल), विवरणपत्रिका (बुलेटिन), कार्यवृत्ते (प्रोसिडिंग्ज), प्रसिद्ध केलेले अहवाल (ट्रँझॅक्शन्स) आणि मालिकेच्या रूपात नियमितपणे व अखंडपणे प्रसिद्ध होणाऱ्या इतर क्रमिका ही नियतकालिके होत. जगभर अशी वेगवेगळ्या भाषांमध्ये व किमान १५० देशांतून वीस हजारांहून अधिक नियतकालिके प्रसिद्ध होतात.
काही नियतकालिकांचे चालू अंक छापील रूपात किंवा कृष्णधवल अथवा रंगीत सूक्ष्मपत्रांच्या वा सूक्ष्मपृष्ठांच्या रूपातही (मायक्रोफिश सूक्ष्म फिल्मरूपातील ही पत्रे काही माहिती संग्राहक प्रणालींत वापरतात १०x १५ सेंमी. आकारमानाच्या या पत्रात टंकित व इतर माहिती सूक्ष्मप्रतिमांच्या रूपात असून यातील शीर्षके नुसत्या डोळ्यांनी वाचण्याएवढी मोठी असतात) उपलब्ध आहेत. पुष्कळ नियतकालिकांचे समग्र खंड सूक्ष्म फिल्मच्या रूपात उपलब्ध होतात. काही नियतकालिके संदेशवहन माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनीय रूपात (इंटरनेट ऑन-लाइन) म्हणजे एखाद्या संगणकाशी परस्परक्रिया करू शकणाऱ्या रूपात उपलब्ध आहेत. लेखक अजूनही आपले लेखन मुद्रणाशिवाय अन्य रूपात प्रसिद्ध करायला राजी नसतात, परंतु याला आलेखिकी (ग्राफिक्स) व विशिष्ट इलेक्ट्रॉनीय ज्ञानपत्रिका हा पर्याय आहे.
वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक संस्थांचा कल मूलभूत संशोधन व विषयाचे अधिक तांत्रिक असणारे अंग यांवर भर देण्याचा असतो, तर औद्योगिक व व्यापारी संस्था व्यावहारिक, व्यक्तीगत व लोकप्रिय अंगांवर भर देतात. या संस्था प्रसिद्धीपूर्वी मूलभूत कार्याचे अतिशय चिकित्सकपणे मूल्यमापन करण्यासाठी तज्ञांचे साहाय्य घेतात. त्यामुळे प्रकाशित साहित्याला विश्वासार्हता, अधिकृतपणा व प्रतिष्ठा लाभते. संशोधन संस्था, विद्यापीठांतील प्रायोगिक केंद्रे व शासकीय अभिकरणे यांसारख्या इतर संस्था संघटनांनी प्रसिद्ध केलेली नियतकालिके याच दर्जाची असतात.
भारतात जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन जर्नल ऑफ टेक्नॉलॉजी (मासिके), इंडियन जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोफिजिक्स (द्वैमासिक), इंडियन जर्नल ऑफ टेक्स्टाइल रिसर्च (त्रैमासिक), इंडियन जर्नल ऑफ केमिस्ट्री, इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स, प्रमाण, करंट सायन्स या ज्ञानपत्रिका प्रसिद्ध होतात. शिवाय प्रोसिडिंग्ज ऑफ इंडियन अँकॅडेमी ऑफ सायन्स, प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अँकॅडेमी ऑफ सायन्स, इंडिया आदी कार्यवृत्तेही नियमित प्रसिद्ध होतात.
वैज्ञानिक परिषदांमधील शोधनिबंध : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा किंवा संमेलने, तसेच मीमांसक वर्ग, चर्चासत्रे, परिसंवाद व इतर तांत्रिक बैठकांमध्ये शोधनिबंध वा प्रबंध सादर होतात. प्राथमिक संदर्भ साहित्यात या निबंध प्रबंधाचे स्थान महत्त्वाचे आहे. नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानपत्रिकांमध्ये ते लेख किंवा पुरवणीच्या रूपात प्रसिद्ध होतात, त्यांचे सारांशही प्रसिद्ध केले जातात. त्याच्या ध्वनिमुद्रित प्रतीही मिळू शकतात. भावी वैज्ञानिक बैठका व त्यांतील तांत्रिक प्रकाशने यांची माहिती काही नियतकालिकांत आधीच प्रसिद्ध केली जाते. उदा., आगामी दोन वर्षांमधील बैठकांची अशी माहिती देणारे वर्ल्ड मिटिंग्ज व इंडेक्स टू सायंटिफिक अँड टेक्निकल प्रोसिडिंग्ज वगैरे. अशा प्रकाशनांची एक सूचीही प्रसिद्ध होते.
संशोधन व्याप्तिलेख/प्रबंधिका : हे मूळ संशोधनावरचे स्वतंत्रपणे प्रसिद्ध होणारे अहवाल असतात. यांतील संशोधन हे अतिशय व्यापक व अत्यंत विशेषीकृत असते. तसेच पुष्कळदा ते एखाद्या मान्यताप्राप्त प्रमाणभूत ज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध करण्याला सोयीचे नसते. हे व्याप्तीलेख सूक्ष्मपत्रावर किंवा सूक्ष्मपृष्ठावरही प्रसिद्ध होतात व मागणीनुसार त्यांच्या छापील प्रतीही मिळतात. संशोधन अहवाल : हे अहवाल संशोधनाच्या कार्यक्रमात आधी तयार होतात व पुष्कळदा प्रगति-अहवालांच्या रूपात तयार केले जातात. प्रगति-अहवाल हा तात्पुरता संदर्भ असला, तरी महत्त्वाचा असतो. त्यात असू शकणारी नकारात्मक फले व आनुषंगिक माहिती अंतिम अहवालात असत नाहीत. अमेरिकेत अशा अहवालांचे काहीसे मर्यादित प्रमाणावर वितरण होते. तेथील वाणिज्य खात्याची नॅशनल टेक्निकल इन्फर्मेशन सर्व्हिस (NTIS, स्थापना १९७०) ही संस्था सर्वसाधारण संशोधन अहवाल प्रसिद्ध करते. गव्हर्मेंट रिपोर्टस अनाउन्समेंटस अँड इंडेक्स (GRA & I ) आणि शेतकी, रसायन, नागरी विकास आदी २७ विषयांवरील एनटीआयएस अँलर्टस यांमध्ये या अहवालांचा सारांश व परदेशी अहवालांचे अनुवाद प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडून मुद्रित रूपात किंवा इलेक्ट्रॉनीय माध्यमाद्वारे संपूर्ण अहवाल मिळू शकतात.
पूर्वमुद्रिते : चालू असलेल्या संशोधनाचे असे अहवाल थोड्याच व खास लोकांसाठी आधीच तयार करतात. तांत्रिक संदर्भ साहित्याचे हे प्राथमिक रूप असून त्यांचा उल्लेख वा संदर्भ दिला जात नसला, तरी त्यांना ऐतिहासिक महत्त्व असते. संशोधनात आघाडीवर असणाऱ्या संशोधकांच्या दृष्टीने पूर्वमुद्रिते महत्त्वाची ठरतात. कारण त्यांच्यामुळे संशोधनाची द्विरुक्ती टळून वेळेची व पैशाची बचत होते. तसेच कोणत्या क्षेत्रातील संशोधन अधिक किफायतशीर ठरू शकेल हेही त्यांच्यावरून लक्षात येऊ शकते.
एकस्वे : विज्ञान व तंत्रविद्या यांच्या प्राथमिक संदर्भ साहित्याचा एकस्वे हाही एक भाग मानतात. निरनिराळी राष्ट्रीय एकस्व कार्यालये व निवडक संग्राहक ग्रंथालये येथून एकस्व घोषित करणारी प्रकाशने, गोषवारा देणाऱ्या १३० हून अधिक संस्था असून भारतात दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई येथे प्रमुख एकस्व कार्यालये आहेत. [→ एकस्व].
प्रमाणपत्रिका : पुष्कळदा हे पुस्तपत्र असते व त्यात द्रव्ये, उत्पादने किंवा प्रक्रिया यांची मिती, गुणवत्ता, कार्यमान किंवा इतर गुणविशेषांच्या स्वीकारार्ह मानकांचे वर्णन असते. उत्पादक व ग्राहक यांसारख्या गटांच्या प्रतिनिधींमध्ये सर्वसाधारण एकमत वा मतैक्य होऊन ही मानके निश्चित केली जातात. कंपन्या, व्यापारी संघ, तंत्रविद्याविषयक संस्था, शासकीय अभिकरणे अथवा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना ही मानके जाहीर वा प्रकाशित करतात. पुष्कळदा तंत्रविद्याविषयक संस्थाही सक्षम व्यावसायिकाने वापरलेल्या कृतींची माहिती प्रसृत करतात.
शोधप्रबंध : डॉक्टरेट व मास्टर पदव्यांसाठीचे प्रबंध हे मूळ वा अस्सल संशोधनाचे अहवाल असतात. हे संशोधन नंतर ज्ञानपत्रिकांमधील एक वा अनेक लेखांत प्रसिद्ध करता येतात.
स्मृतिग्रंथ : (फेस्ट स्क्रिफ्टेन स्मरणिका). सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संस्था किंवा महत्त्वाची वैज्ञानिक घटना यांच्या स्मृत्यर्थ विद्वत्तापूर्ण लेख वा प्रबंध संकलित करून प्रसिद्ध केले जातात. यांमध्ये पुष्कळदा मूळ संशोधनाचा आढावा घेतलेले असतो अथवा त्याचे निष्कर्ष दिलेले असतात.
उत्पादकाचे/निर्मात्याचे साहित्य : विशिष्ट उत्पादने किंवा त्यांचा झालेला विकास व प्रगती यांविषयीची विवक्षित वा विनिर्दिष्ट माहिती देणारे एकमेव असे संदर्भ साहित्य असते. ही माहिती इतरत्र प्रसिद्ध झालेली नसल्यास हे प्राथमिक संदर्भ साहित्य ठरते. तांत्रिक सेवेविषयीच्या विवरणपत्रिका. माहितीपत्रे, विक्रीदराच्या याद्या, मालिका (क्रमसूच्या) आणि उत्पादकाची सामग्री किंवा प्रक्रिया यांचे वर्णन करणारी इतर खास प्रकारची माहिती ही या साहित्याची नमुनेदार उदाहरणे होत.
द्वितीयक साधने : याचे मुख्य तीन प्रकार आहेत : (१) प्राथमिक साधनांतील वेचक भागांची उपयुक्त सूची असलेली साधने पहिल्या प्रकारात अंतर्भूत होतात. (२) प्राथमिक साधनांमधील निवडक भागांची पाहणी वा सर्वेक्षण करणारी साधने दुसऱ्या प्रकारात येतात. त्यांच्यामुळे हव्या असलेल्या विषयाची सद्य:स्थिती, अलीकडची पार्श्वभूमी वा व्यापक व निश्चित माहिती मिळविण्यास मदत होते. उदा., व्याप्तिलेख, समालेचने (पुनर्विलोकने), विवेचन ग्रंथ व विशिष्ट परिस्थितीत साररूप क्रमसूची इत्यादी. (३) अपेक्षित माहिती काहीशा संक्षिप्त रूपात देणारी साधने तिसऱ्याच प्रकारात येतात. उदा., प्रस्थापित झालेली तथ्ये, सूत्रे, कार्यविधी, समीकरणे, आशय, उपपत्ती इतिहास व चरित्र ही सर्व माहिती प्राथमिक साधनांमधून विवेचक दृष्टीने निवडून संकलित केलेली असते. उदा., शब्दकोश, विश्वकोश, कोष्टकसंग्रह व निदेशपुस्तके. यंत्राच्या वा संगणकाच्या मदतीने वाचण्याचा योग्य अशा माहिती-पेढ्यांमध्येही अशा साधनांची सांख्यिकीय रचनानिष्ठ व संख्यात्मक माहिती वाढत्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.
तांत्रिक अनुवाद हे द्वितीयक साधनांतील महत्त्वाचे पण खर्चिक साधन होय. १९५७ सालापासून वैज्ञानिक व तांत्रिक माहितीचा प्रसार करण्याचा धडक कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळे जगभर अधिकाधिक संस्था, सरकारी, शैक्षणिक व खाजगी संघटना यांच्याकडून मुळात रशियन, चिनी, जपानी व इतर भाषांत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचे इंग्रजीय अनुवाद करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. उलट इंग्रजी ग्रंथाचे या भाषांतही अनुवाद होत आहेत.
सुमारे ५०० नियतकालिकांचे (पूर्ण अंकांचे, निवडक लेखांचे किंवा सारांशरूपातील), शिवाय हजारो स्वतंत्र लेख, व्याप्तिलेख व इतर लेखन यांचे इंग्रजी अनुवाद हे व्यापारी साधनस्त्रित, एनटीआयएस, नॅशनल ट्रान्सलेशन सेंटर (यू. एस. लायब्ररी ऑफ कॉग्रेस), तसेच कॅनडा व इतरत्र असलेल्या अशा प्रकारच्या अभिकरणांमधून आता उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल ट्रान्सलेशन्स सेंटरतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सलेशन्स इंडेक्स या सूचीमध्ये विज्ञान व तंत्रविद्या यांच्या सर्व क्षेत्रांतील अनुवादाची माहिती प्रसिद्ध होते. इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर भारतातील अनुवादांची नॅशनल इंडेक्स ऑफ ट्रान्सक्लेशन ही सूची प्रसिद्ध करते.
सूचींचे प्रकार : विविध सूचीकरण सेवांचे विवरण खाली उपविभागांत दिले आहे.
सूची : सूची हा साहित्यकृतीचाच एक भाग असतो अथवा ती स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेली असू शकते. योग्य रीतीने संकलित केलेली सूची हे माहितीचा शोध घेणाऱ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे साधन असते. [→ सूचि].
संदर्भ-ग्रंथसूची : विशिष्ट विषयाशी अथवा व्यक्तीशी संबंधित अशा प्राथमिक वा इतर प्रकारच्या साधनांच्या संदर्भ-ग्रंथाची ही यादी असते. ही सूची संक्षिप्त किंवा वेचक असते आणि कधीकधी भाष्य किंवा अन्य प्रकारे मूल्यमापन करणारीही असते. माहितीच्या साधनांची दखल घेणे, जादा वाचनासाठी शिफारस करणे किंवा इतरत्र आलेल्या अधिक तपशीलवार माहितीकडे लक्ष वेधणे यांसाठी संदर्भ-ग्रंथसूची उपयुक्त असते. चांगली संदर्भ-ग्रंथसूची ही ठराविक कालखंडातील संदर्भ साहित्याची निश्चित व्याप्ती सूचित करते. यामुळे त्या प्रमाणात आधीच्या संदर्भ साहित्याचा शोध घेण्याचे काम अधिक सोपे होते.
सूचीकरण क्रमिका/सूचिग्रंथ : हिला कधीकधी चालू संदर्भ-ग्रंथसूची म्हटले जाते. ही लेखांच्या शीर्षकांची किंवा त्यांच्याशी निगडित असलेल्या नंतरच्या संदर्भाची नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येणारी संकलने असतात. पुष्कळदा या क्रमिकेत नवीन पुस्तकांची आणि स्वतंत्रपणे प्रसिद्ध होणाऱ्या इतर साहित्याची शीर्षकेही दिलेली असतात. हे अंक नियतकालिक असू शकतात. काही सूचीकरण क्रमितांत त्या त्या क्षेत्रातील निवडक ज्ञानपत्रिकांचा अंतर्भाव करतात व त्याचबरोबरच जे लेख वाचले जाण्याची शक्यता आहे अशा सर्व लेखांची यादी तिच्यात देतात. काही क्रमिकांत त्या त्या क्षेत्रातील सर्व ज्ञानपत्रिका समाविष्ट करताना खरे महत्त्वपूर्ण असे लेखच निवडून देतात. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले लेख शोधण्यासाठी चालू सूचीकरण क्रमिकांचा उपयोग होतो. १९७०–८० या दशकात यंत्राच्या वा संगणकाच्या मदतीने वाचता येणाऱ्या संदर्भ-ग्रंथसूचींच्या माहिती-पेढ्या पुढे आल्या.
द्रुत सेवा (उदा., करंट कंटेंट्स) ह्या माहिती पुरविणाऱ्या क्षेत्रातील चालू महत्त्वपूर्ण साहाय्यकारी सेवा आहेत. त्याच्यामार्फत निवडक प्राथमिक संदर्भ साहित्य असलेल्या ज्ञानपत्रिकांच्या अनुक्रमणिका उदधृत करतात. पुष्कळदा त्यांचा अनुवाद करतात व सूची तयार करतात. मग सामान्यपणे संकलित माहिती दर आठवड्याला हवाई टपाल सेवेद्वारे किंवा संगणकांच्या जाळ्यामार्फत वितरीत केली जाते.
अशा क्रमिका संकलित करण्यासाठी व छापण्यासाठी आता बहुधा संगणक वापरतात. उत्पादक यांच्या फिती संदर्भ साहित्याचा शोध घेणाऱ्यांना उपलब्ध करून देतात किंवा माहिती सेवा भाडेपट्ट्याने देणाऱ्या विक्रेत्यांमार्फत त्या प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनीय संदेशवहन जाळ्यांत (ऑन-लाइन) शोध घेणाऱ्याना उपलब्ध होतात. या फिती विकतही मिळतात.
संक्षेपकारी क्रमिका : एके काळी हिला चालू संदर्भ-ग्रंथसूचीही म्हणत. हिच्यात पुढील दोन गोष्टींच्या गोषवार्ची संकलने नियमितपणे प्रसिद्ध होतात : (१) प्राथमिक संदर्भ साहित्याच्या चालू ज्ञानपत्रिकांमधील एखाद्या विषयातील महत्त्वाचे लेख आणि (२) याच क्षेत्रातील महत्त्वाचे नवे संशोधन, व्याप्तिलेख, अहवाल, एकस्वे व प्राथमिक संदर्भ साहित्य विषयक इतर प्रकाशने. बहुतेक क्रमिकांमध्ये त्यांच्या क्षेत्रांतील सर्व ज्ञात व उपलब्ध ज्ञानपत्रिकांमधील मुख्य निवडक संदर्भ दिलेले असतात. याला पर्याय म्हणून लेखक, विषक, एकस्व, सूत्र किंवा अहवाल क्रमांक यांनुसार केलेल्या परिपूर्ण अशा वार्षिक किंवा बहुवार्षिक सूच्या प्रसिद्ध करण्यात येतात. आता अशा बहुतेक क्रमिकांचे संकलन व प्रकाशन संगणकांच्या मदतीने करतात.
या सारांशांमध्ये अधिक प्रमाणात प्राथमिक संदर्भ साहित्य असते. संशोधकांनी निवडलेल्या क्षेत्रांत जगभर होत असलेल्या प्रगतीबरोबर राहण्यासाठी या संशोधकांना चालू अंक विशेष सोयीस्कर वाटतात. विशिष्ट माहितीच्या सूची व विशिष्ट विषयाच्या क्षेत्रांची सर्वेक्षणे म्हणून या सारांशांचा उपयोग होतो. भारतात इंडियन सायन्स अँब्स्ट्रॅक्ट्स, भारतीय उद्योगांविषयी माहिती देणारे रिसर्च अँड इंडस्ट्री तसेच मेडिसिनल अँड अँरोमॅटिक प्लँट्स अँब्स्ट्रॅक्ट्स ही प्रकाशने प्रसिद्ध होतात.
संदर्भ-ग्रंथसूचिविषयक माहिती-पॆढ्या : यंत्राने संगणकाद्वारे वाचण्या योग्य अशी चालू संदर्भ- ग्रंथसूची अथवा सूचिकरण वा संक्षेपकारी क्रमिका म्हणजे संदर्भ-ग्रंथसूचिविषयक माहिती-पेढी होय. सूक्ष्मसंगणकाने शोध घेण्यायोग्य अशी सीडी-रॉम यावरही माहिती – पेढीचे वितरण करतात. काही माहिती-पेढ्यांमध्ये एखाद्या विषयाचे संदर्भ साहित्य असते. तर इतर काही माहिती-पेढ्यांमध्ये इतर प्रकारचे प्राथमिक संदर्भ साहित्य असते (उदा., शोधप्रबंध प्रमाणपत्रिका, एकस्वे, वैज्ञानिक परिषदांमधील शोधनिबंध). शोध घेण्याचे सुविकसित व्यूहतंत्र वापरून थेट इलेक्ट्रॉनीय संदेशवहन जाळ्यातून (इंटरनेट) अथवा सीडी-रॉम यावरून संदर्भ परत मिळविता येऊ शकतात.
सर्वेक्षणाचे प्रकार : संदर्भ साहित्याच्या सर्वेक्षणाच्या विविध प्रकारांची माहिती खाली दिली आहे.
समालोचने/ पुनर्विलोकने : एखाद्या विशिष्ट विषयावरील प्राथमिक संदर्भ साहित्याचे सर्वेक्षण म्हणजे समालोचन होय. चांगल्या समालोचनात चालू काळातील साहित्याचा संग्रह झालेला असतो. ते आत्मसात केलेले असते व त्याचा समन्वय साधलेला असतो आणि भावी संशोधनाची संभाव्य दिशा त्यातून सूचित होते. वार्षिक, त्रैमासिक अथवा मासिक लेखमालिका यात कमीजास्त प्रमाणात परस्परनिगडित प्रबंधांच्या संग्रहातील एक प्रबंध म्हणून अथवा ज्ञानपत्रिकेतील एक लेख म्हणून समालोचन प्रसिद्ध होऊ शकते. प्राथमिक संदर्भ साहित्याच्या साधनांचे व्यापक व चिकित्सक व्याप्तीक्षेत्र होण्याला अपरिहार्यपणे विलंब लागतो व हा विलंबही समालोचनांची मर्यादा आहे.
विवेचन ग्रंथ/निबंध : यात एखाद्या विषयाच्या ज्ञात माहितीचे व्यापक प्रमाणात, अधिकृत, पद्धतशीर व चांगल्या पुराव्याच्या आधारे एकत्रीकरण केलेले असते. लेखनाच्या वेळी हे काम अंतिम स्वरूपाचे असू शकते. विवेचन ग्रंथामुळे संबंधित विषयाची पायाभूत जाण निर्माण होण्यास मदत होते, तसेच प्रशिक्षित व्यक्ती याच्या आधारे प्रगत संशोधन करू शकते. विवेचन ग्रंथ मात्र लवकर कालबाह्य होतात. विवेचन ग्रंथाचे अनेक भाग असल्यास अखेरचा भाग प्रसिद्ध होण्याच्या वेळी आधीचे भाग जुने झालेले असतात.
व्याप्तिलेख : विषयाचा एक विभाग अथवा अधिक मोठ्या ज्ञानशाखेचा एक भाग असलेला विशिष्ट विषयावरील लघुरूपातील विवेचन ग्रंथ म्हणजे व्याप्तिलेख होय, प्रसिद्धीच्या समयी तो अद्ययावत असतो. या खास विषयावरील जवळजवळ प्रत्येक पुस्तकाला व्याप्तिलेख म्हणता येईल.
संदर्भ साधने : विश्वकोश, शब्दकोश, निदेशपुस्तके, चिकित्सक वा विवेचक कोष्टके आणि यंत्राच्या व संगणकाच्या मदतीने वाचता येऊ शकतील अशा माहिती-पेढ्या हे संदर्भ साधनांचे पाच मुख्य प्रकार आहेत.
विश्वकोश : एखाद्या विषयाची वा ज्ञानशाखेची पार्श्वभूमी समजावी किंवा तोंडओळख व्हावी म्हणून विश्वकोशात सारंशरूपात माहिती दिलेली असते, तसेच विशिष्ट क्षेत्रातील संकल्पनांचे विवरण केलेले असते. मॅग्रॉ-हिल एन्सायक्लोपीडिया ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि कर्क-ऑथमर एंसायक्लोपीडिया ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हे विज्ञान व तंत्रविद्या यांचे प्रसिद्ध विश्वकोश आहेत. भारत सरकारच्या पब्लिकेशन्स अँड इन्फर्मेशन डायरेक्टोरेटने प्रसिद्ध केलेले द वेल्थ ऑफ इंडिया हे खंड कच्चा माल (रॉ मटेरिअल्स) व औद्योगिक उत्पादने (इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्स) यांच्यावरील दोन मालिकांचा विश्वकोश आहे.
डॉ. जयंत नारळीकर संपादित सृष्टिविज्ञान गाथा ही द्विखंडात प्रसिद्ध झाली आहे. अशोक महादेव जोशी संपादित कृषिज्ञानकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झालेला असून त्याचे एकूण 15 खंड प्रसिद्ध होणार आहेत. [→ विश्वकोश].
शब्दकोश : हे शब्दार्थ देणारे पुस्तक असते. विज्ञान व तंत्रविद्या यांच्या संदर्भातील शब्दकोशाचा हेतू सामान्यपणे वापरण्यात येणाऱ्या संज्ञांचे शक्य तितक्या सोप्या भाषेत अर्थ वा व्याख्या देणे हा असतो. भारतात पब्लिकेशन्स अँड इन्फर्मेशन डायरेक्टोरेटने प्राणी व वनस्पती यांच्या शास्त्रीय नावांचा कोश प्रसिद्ध केला आहे. मॅग्रॉ-हिल डिक्शनरी ऑफ सायंटिफिक अँड टेक्निकल टर्म्स, वेब्स्टर्स मेडिकल डेस्क डिक्शनरी व स्थापत्य शिल्प-कोश (रामचंद्र विनायक मराठे) ही विज्ञान व तंत्रविद्या यांतील पारिभाषिक शब्दांच्या कोशांची काही उदाहरणे होत. [→ शब्दकोश].
निदेशपुस्तक : (हँडबुक). विज्ञान व अभियांत्रिकी यांची निवेदनपुस्तके असतात. निवेदनपुस्तकात विशिष्ट विषयातील विनिर्दिष्ट माहिती, कार्यविधी व व्यावसायिक तत्त्वे अद्ययावत रीतीने सापेक्षत: परिपूर्णपणे व अधिकृय रूपात संकलित केलेली असतात. व्यापक अथवा तपशीलवार सूची, अद्ययावत संदर्भग्रंथ, तज्ञ संपादकवर्ग, सहज वाचता येणारे मुद्रण व सोयीस्कर रचना ही चांगल्या निदेशपुस्तकांची गुणवैशिष्ट्ये असतात. निदेशपुस्तक या संज्ञेचा अर्थ एखाद्या तांत्रिक विषयाचा तयार संदर्भ-ग्रंथ असा आहे.
विवेचक कोष्टके : द्रव्याच्या रासायनिक व भौतिक गुणधर्मासारख्या प्रमाणभूत संदर्भ माहितीचे या कोष्टकात संकलन केलेले असते. प्रत्यक्ष काम करणारे वैज्ञानिक व अभियंते यांच्या दृष्टीने ही कोष्टके गरजेचे संदर्भ साधन असते. कामिटी ऑन डेटा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CODATA) या आंतरराष्ट्रीय संस्थेने पॅरिस येथे वर्ल्ड डेटा रेफरल सेंटर स्थापन केले आहे. हे केंद्र जगभरच्या संदर्भ स्त्रोतांकडून प्रमाणभूत संदर्भ माहिती घेऊन व तिचे चिकित्सकपणे मूल्यमापन करून अस्गा कोष्टकांची निर्देशिका संकलित करते.
माहिती-पेढ्या : (डेटा बँक्स). संख्यात्मक, सांख्यिकीय किंव रचनात्मक (उदा., रासायनिक) माहितीचे यंत्राने वा संगणकाने वाचण्यायोग्य रूपात केलेले संकलन म्हणजे माहिती-पेढ्या होय. माहिती-पेढीशी इलेक्ट्रॉनीय संदेशवहन जाळ्यामार्फत संपर्क साधता येतो.
तृतीयक साधने : यांमध्ये पाठ्यपुस्तके, निर्देशिका व साहित्यिक मार्गदर्शक पुस्तिका किंवा मार्गदर्शिका येतात.
पाठ्यपुस्तके : शिक्षणातील ही प्रमाणपुस्तके असून ती शिकणे व शिकविणे यांसाठी वापरतात. पाठ्यपुस्तक केवळ माहिती पुरविणारे साधन नसते, तर विषयक समजून सांगणारे पुस्तक असते. आदर्शवत पाठ्यपुस्तकांना व्याप्तिलेखांचे किंवा विवेचन ग्रंथाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. [→ पाठ्यपुस्तके].
निर्देशिका : (डिरेक्टरी). व्यक्तींची नावे व पत्ते, तसेच संघटना, उत्पादक, एखाद्या विशिष्ट समूहासाठी असलेली नियतकालिके यांची अकारविल्हे केलेली यादी म्हणजे निर्देशिका होय. व्यक्तीची किमान माहिती असलेल्या सभासदांच्या वार्षिक यादीपासून ते ‘हूज हू‘ (Who’s Who) सारख्या विशेषीकृत सारसंग्रहरूपाच्या निर्देशिका असतात. व्यापारी व उत्पादन विषयक निर्देशिका पुष्कळदा विशिष्ट औद्योगिक किंवा व्यापरविषयक नियतकालिकांच्या ग्राहकांच्या मार्गदर्शक अंकांच्या रूपात निघतात. शहर, राज्य, देश यांच्या वा आंतरराष्ट्रीय औद्योगिक निर्देशिकांमध्ये उत्पादक व त्यांचे अधिकारी, उपकंपन्या, संयंत्रे, विक्रेते, व्यापारी नाके, उत्पादने इत्यादींची पुष्कळ माहिती वरचेवर येत असते.
भारतात इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या केंद्रामार्फत डिरेक्टरी ऑफ सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया, डिरेक्टरी ऑफ इंडियन सायंटिफिक पिरिऑडिकल्स, डिरेक्टरी ऑफ सायंटिफिक रिसर्च इन इंडियन युनिव्हर्सिटीज इ. संदर्भ निर्देशिका प्रसिद्ध झाल्या आहेत. [→ निर्देशिका].
साहित्यिक मार्गदर्शिका : ही एक संदर्भ नियमपुस्तिका असून संशोधन किंवा जिज्ञासू यांना मदत करण्याच्या दृष्टीने हिची रचना केलेली असते. हिच्याद्वारे ते एका विशिष्ट विषयाशी निगडित असलेलेया संदर्भ साधनांचा शोध घेऊ शकतात. ग्रंथालयीन सुविधा व सेवा यांचे विवरण या मार्गदर्शिकेत असते. या मार्गदर्शिका छापील व दृकश्राव्य रूपात उपलब्ध असतात. विशिष्ट संदर्भ साधने, शोध घेण्यासाठी लागणारे साहाय्य किंवा माहिती सेवा या बाबतींत हिची मदत होते.
माहितीशास्त्र : आंतरराष्ट्रीय माहिती-उद्योगात व्यावसायिक, शैक्षणिक, शासकीय, व्यापारी या व इतर सदस्यांनी विविध साधने तयार केलेली असतात. या साधनांच्या मदतींने ग्रंथालये सर्वसाधारणपणे संदर्भ साहित्य/ साधने जमविणे, संघटित करणे व इतर ग्रंथालये सर्वसाधारणपणे संदर्भ साहित्य/ साधने जमविणे, संघटित करणे व वाचकाला सहजपणे उपलब्ध करून देणे ही कामे सहजपणे करतात. [→ माहितीशास्त्र व माहिती केंद्रे].
ग्रंथालयांचे काम : संदर्भ साहित्य मिळविणे, साठविणे, जतन करणे, परत मिळविणे व वापर करणे या कामांची पद्धती, कौशल्य व प्रणाली उभारण्याचे काम मुख्यत: ग्रंथालये दीर्घकाळापासून करीत आलेली आहेत. खास एखाद्या विषयासाठी असलेले संशोधन ग्रंथालय समग्र ग्रंथ अथवा माहितीचे अंश शक्य तेवढ्या अचूकतेने मिळविते, त्यांचे वर्गीकरण करते, त्यांची सूची बनविते, साठविते व ग्राहकांना पुरविते.
ग्रंथालय कितीही मोठे, प्रतिष्ठित वा विशेषीकृत असले, तरी ते सर्वथा परिपूर्ण नसते. म्हणून विविध प्रकारच्या ग्रंथालयांच्या दरम्यान स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची माहितीची (इलेक्ट्रॉनीय) जाळी उभारण्यात येत आहेत. अशा रीतीने विशेषीकृत माहिती हवी असल्यास एखाद्या विशिष्ट जाळ्यातील समग्र साधनस्तोतातून ती माहिती मिळविता येते [→ ग्रंथालय ग्रंथालयशास्त्र].
माहिती तंत्रविद्येचे कार्य : आदान व प्रदान प्रयुक्त्या आणि माहिती साठविणारी माध्यम यांच्यासह इलेक्ट्रॉनीय माहिती व दूरसंदेशवहन प्रणाली यांचे एकत्रितपणे साहाय्य संशोधनकांना घेता येते. गेल डिरेक्टरी ऑफ डॆटाबेसेस या निर्देशिकेत विज्ञान व तंत्रविद्याविषयक सर्व प्रकारच्या २,२०० हून अधिक माहिती-पेढ्यांची माहिती आहे. संगणकाच्या मदतीने वाचता येणाऱ्या इतर माहिती-पेढ्याही आहेत.
दस्ताऐवजीकरणातील प्रगती : लायब्ररी अँड इन्फर्मेशन सायन्स अँब्स्ट्रॅक्ट्स (संक्षेपकारी क्रमिका) व लायब्ररी लिटरेचर (सूचीकरण क्रमिका) या नियतकालिकांत विज्ञानविषयक माहिती क्षेत्रातील संशोधन व विकास आणि विज्ञानाच्या सर्व बाबींचा अंतर्भाव असलेल्या चालू घडीमधील बातम्यांविषयीचा मजकूर आढळू शकतो. तर ऑनलाइन, ऑनलाइन अँड सीडी-रॉम रिह्यू आणि डेटाबेस या नियतकालिकांमध्ये संगणकाच्या मदतीने वाचता येईल असे माहिती-पेढीतील साहित्य येते.
भारत : पूर्वी भारतात विवेचन ग्रंथ, तांत्रिक शब्दकोश, टीका, भाष्ये इ. रूपांतील विपुल वैज्ञानिक संदर्भ लेखन झाल्याने आढळते. उदा., यज्ञाच्या वेदी व स्थंडिल यांच्या विषयीच्या नियमपुस्तिका, काश्मीरमधील बक्षाली हस्तलिखित (बारावे शतक) हा अंकगणितातील प्रश्न व त्यांचे निर्वाह (उत्तरे) यांचा संग्रह होता. ज्योतिषशास्त्राचे अभिजात विवेचन ग्रंथ उपलब्ध असून त्यांमध्ये नष्ट झालेल्या ग्रंथाचे अप्रत्यक्ष उल्लेख व सार आढळतात. ज्योतिषशास्त्रीय कोष्टके कारिकांच्या (श्लोकांच्या) रूपात संक्षिप्तपणे दिलेली आढळतात. रसरत्नाकर हे नागार्जुन यांचे पुस्तक रसायनशास्त्राचे पहिले खरे पाठ्यपुस्तक आहे. अन्न, औषधे व तांत्रिक उपयोग यांच्या दृष्टीने वनस्पतींच्या उपयुक्त गुणधर्मांचा याद्यांच्या रूपात संग्रह केला जाई. तसेच औषधींचे निघूंट असत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांच्या संपर्कामुळे भारतात वैज्ञानिक लेखनाला परत सुरूवात झाली.१९८२साली यूनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या वैज्ञानिक ज्ञानपत्रिकांच्या संदर्भ-ग्रंथसूचीमध्ये सु. २०० भारतीय ज्ञानपत्रिकांचा उल्लेख होता. या ज्ञानपत्रिकांचा आवाका व्यापक असून त्यांच्यामध्ये बहुतेक सर्व महत्त्वाच्या विज्ञान शाखांतील संशोधन आलेले आहे.
भारतातील विज्ञान व उद्योगधंदे (यात तंत्रविद्या येते) यांतील संशोधनाची सर्व प्रकारची जबाबदारी ⇨कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) या भारत सरकारने स्थापन केलेल्या स्वायत्त मंडळाकडे आहे. त्याचप्रमाणे प्रकाशन व माहिती संचालनालय व इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या नवी दिल्लीतील संस्था वैज्ञानिक व तांत्रिक माहिती प्रकाशित करतात. यांपैकी पहिले संचालनालय १९५१ साली स्थापन झाले. या संचालनालयाने १९६६–८० दरम्यान हिंदी वैग्यानिक और तकनिक प्रकाशन- निर्देशिका प्रसिद्धी केली आहे. दुसरी संस्था १९५१ साली स्थापन झाली. ही संस्था संदर्भ संकलन व मानितीच्या क्षेत्रांतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांशी सहकार्य करते.
पहा : अवगम सिद्धांत कोशवाड:मय तंत्रविद्या माहिती संस्करण राष्ट्रीय प्रयोगशाळा विश्वकोश विज्ञान वैज्ञानिक संस्था व संघटना संगणक
संदर्भ : 1. Hurt, C. D. Information Sources in Science and Technology, 1994.
2. Malinowsky, H. R. Reference Sources in Science, Engineering, Medicine and Agriculture, 1994.
3. Mount, E: Kovacs, B. Using Science and Technology Information Sources, New Yourk, 1991.
4. Walker, R. D Hurt, C. D. Scientific and Techical Litetature : An Introduction to Forms of Communication, 1990.
ठाकूर, अ. ना.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..