वैमानिकीय पंचांग : (एअर आल्मनॅक) . जमिनीवर प्रवास करताना जमिनीवरील प्रवासाचे ⇨मार्गनिर्देशन करण्यास नकाशे आणि रस्त्यावरील फलक आवश्यक असतात. अफाट सागरावर प्रवास करताना मार्गनिर्देशकाला नाविक पंचांगाचा उपयोग करावा लागतो [→ पंचांग], त्याचप्रमाणे विमानातून प्रवास करताना विमानाचे ठिकाण निश्चित करण्यासाठी वैमानिकीय पंचांगाचा उपयोग करावा लागतो. नाविक व वैमानिकीय पंचांगाचा उद्देश त्यात दिलेल्या खगोलीय वस्तूंच्या स्थानांवरून मार्गनिर्देशकाचे स्थान निश्चित करणे, हा असतो. खगोलीय वस्तूचा जमिनीवरील बिंदू, उत्तर व दक्षिण ध्रुव आणि मार्गनिर्देशकाचे स्थान यांपासून एक गोलीय त्रिकोण तयार केला जातो. आणि गोलीय ⇨त्रिकोणिमितीचा उपयोग करून त्याच्या बाजू संगणन करून काढतात. खगोलीय वस्तूची दोन किंवा जास्त निरीक्षणे घेऊन आणि संगणन करून मार्गनिर्देशक आपले स्थान निश्चित करू शकतो.
जगातील काही देश वैमानिकीय पंचांग तयार करतात. हे पंचांग प्रत्येक सहा महिन्यांनी प्रकाशित केले जाते. यात प्रत्येक दिवसाकरिता एक पान असते. पानाच्या दोन्हीही बाजूंस खगोलीय वतूंची निरनिराळ्या वेळांची स्थाने दिलेली असतात. सूर्य, मेषारंभ बिंदू, चंद्र व काही ग्रह (शुक्र, मंगळ व गुरू) यांचे प्रत्येक दहा मिनिटांच्या कालांतराने येणारे ग्रिनिचचे होराकोण व क्रांती दिलेली असतात. त्याशिवाय विमानाला उपयुक्त अशा काही ठराविक प्रमुख ताऱ्यांचे विषुवांश आणि क्रांती हे त्या कालखंडाच्या आरंभीचे सहनिर्देशक दिलेले असतात [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती]. आवश्यक माहिती पंचांगात अशा रीतीने दिलेली असते की, एखाद्या ठराविक वेळेच्या माहितीचा उपयोग लगेच पुढे दिलेल्या वेळेपर्यंत जरी केला, तरी हवाई मार्गनिर्देशनात विशेष चुक होत नाही. अशी व्यवस्था केल्यामुळे एखाद्या निश्चित वेळेच्या माहितीकरीता दोन आसपासच्या वेळांकरीता दिलेल्या माहितीवरून अंतर्वेशन [→ अंतर्वेशन व बहिर्वेशन] करावे लागत नाही. वैमानिकीय पंचांगात प्रत्येक दिवसाचे सूर्योदय, सूर्यास्त, संधिप्रकाश, चंद्रोदय व चंद्रास्त यांच्या वेळा दिलेल्या असतात. यांशिवाय प्रमाणित वेळा, आकाशाचे रेखाचित्र, निरनिराळे आलेख आणि हवाई मार्गनिर्देशनासाठी आवश्यक असलेली शुद्धिकोष्टके दिलेली असतात. वैमानिकीय पंचांगात नाविक पंचांगापेक्षा वेधांची सूक्ष्मता थोडी कमी असली तरी वैमानिकीय पंचांग सोयीस्कर असल्यामुळे नाविक मार्गनिर्देशक वैमानिकीय पंचांगाचा उपयोग करू लागले आहेत. अमेरिका आणि इंग्लंड हे देश वैमानिकीय व नाविक पंचांगे इंग्रजी भाषेत प्रकाशित करतात. या पंचांगाचा आधार घेऊन काही देश त्यांच्या भाषेत वैमानिकीय व नाविक पंचांगे नियमितपणे प्रकाशित करतात.
गोखले, मो. ना. मुळे, दि. आ.