वेलिंग्टन बंदराचे दृश्य

वेलिंग्टन-१ : न्यूझीलंडची राजधानी. लोकसंख्या – शहर १,३७,४९५ महानगर ३,३५,४६८ (१९९६). देशातील उत्तर बेटाच्या दक्षिण टोकाशी डोंगराळ प्रदेशात वेलिंग्टन वसलेले आहे. उत्तर व दक्षिण बेटाला अलग करणाऱ्या कुक सामुद्रधुनीचा भाग असलेल्या पोर्ट निकोलसन उपसागरावर हे आहे.

दहाव्या शतकातील पॉलिनीशियन समन्वेषक कुपे याने या स्थळाचा शोध लावल्याचे मानले जाते. काही अधिकाऱ्यांसह `न्यूझीलंड कंपनी’ चे एक जहाज, कंपनीच्या पहिल्या वसाहतीचे स्थान निश्चित करण्यासाठी येथे आले होते. १८४० मध्ये न्यूझीलंड कंपनीने आणलेल्या २,००० ब्रिटिश वसाहतकारांनी पटोनी येथे वस्ती केली परंतु अल्पावधीतच दक्षिणेस ११ किमी.वर सध्याच्या जागी ही वसाहत हलविण्यात आली. त्यानंतर 1842 मध्ये बरो आणि १८५६ मध्ये नगरपालिका यांत तिचे रूपांतर झाले. १८५४-७६ या काळात ही वसाहत वेलिंग्टन प्रांताची राजधानी होती. १८६५ मध्ये देशाच्या राजधानीचे ठिकाण ऑक्लंडहून येथे हलविण्यात आले. वेलिंग्टनचा पहिला ड्यूक आर्थर वेलस्ली (ड्यूक ऑफ वेलिंग्टन) याच्यासाठी शहराला वेलिंग्टन हे नाव देण्यात आले आहे.

वेलिंग्टनचे हवामान सौम्य सागरी स्वरूपाचे आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०४ सेंमी. आहे. वर्षभर आर्द्रतेचे प्रमाण भरपूर असते. शहरासभोवतालचा प्रदेश शेतीसाठी आणि गुरे व मेंढ्या यांच्या पालनासाठी उपयुक्त आहे. येथे भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यांशिवाय हे वाहतूक व दळणवळणाचे तसेच व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी या बंदराचा उपयोग केला जातो. या बंदरातून खनिजतेल उत्पादने, मोटारी व त्यांचे सुटे भाग, कोळसा, खनिजे यांची आयात व लोकर, गोठविलेले मांस, दुग्धोत्पादने, चामडी, वृत्तपत्र – कागद, फळे इत्यादींची निर्यात केली जाते. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दक्षिण बेटावरील क्राइस्टचर्चशी ते जलमार्गाने जोडलेले आहे. लोअर हट या उपनगरात व पटोनी बरोमध्ये मोठमोठे कारखाने आहेत. त्यांमध्ये वस्त्रोद्योग, वाहतूकसाधने, तंबाखू उत्पादने, साबण, अभियांत्रिकी उद्योग, यंत्रनिर्मिती, विद्युत्‌सामग्री, रबर उत्पादने, मांस प्रक्रिया, लोकर उत्पादने, चामड्याच्या वस्तू, धातू उत्पादने, छपाई, रासायनिक उत्पादने, वाहनांची जुळणी व अन्न – प्रक्रिया इ. उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत.

वेलिंग्टन व त्याची उपनगरे तीव्र उताराच्या डोंगराळ भागात वसलेली आहेत. लोअर हट हे सर्वांत मोठे उपनगर व पटोनी हा महत्त्वाचा बरो आहे. आर्थिकदृष्ट्या पटोनी व लोअर हट यांच्या नगरपालिका स्वायत्त आहेत. येथील घरांचे बांधकाम सामान्यपणे लाकडांत केलेले आढळते. नवीन इमारती मात्र विटा व सिमेंट-कॉंक्रीटमध्ये बांधलेल्या आढळतात.

वेलिंग्टनमधील व्यापारी केंद्र हे प्रामुख्याने बंदरालगतचा समुद्र हटवून तयार केलेल्या भागात आहे. त्यामुळे कार्यालयाच्या इमारती, रेल्वे यार्ड, जहाजकारखाना व तेलाच्या वखारी या भागातच आढळतात. देशातील हे एक प्रमुख सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. शहरातील संसदभवन, गव्हर्नर जनरलचे निवासस्थान, राष्ट्रीय कलावीथी, डोमिनियन म्यूझीयम, नगरभवन, दोन कॅथीड्रल, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, मध्यवर्ती ग्रंथालय, वॉर मेमोरिअल कॅरिलॉन (पहिले महायुद्ध स्मारक) इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. येथील शासकीय इमारत ही जगातील सर्वांत मोठ्या लाकडी इमारतींपैकी एक आहे. व्हिक्टोरिया विद्यापीठ येथेच आहे. शहरात सिंफनी वाद्यवृंत, बॅले व संगीतिकागृहे आहेत.

चौधरी, वसंत