आर्नल्ड वेस्करवेस्कर, आर्नल्ड : (१९३२– ). ब्रिटिश नाटककार. आईवडील रशियन ज्यू होते ते स्थलांतर करून इंग्लंडमध्ये आले होते. लंडनच्या ईस्ट एंड ह्या भागातील झोपडपट्टीत वेस्कर वाढला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने शाळा सोडली व कसले ना कसले काम मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याची ज्यू धर्मीय कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पोटासाठी काम मिळविण्याची धडपड ह्यांचा त्याच्या नाट्यलेखनावर लक्षणीय परिणाम झालेला आहे. ‘लंडन स्कूल ऑफ फिल्म टेक्‌निक’ ह्या संस्थेत एक अभ्यासक्रम पूर्ण करीत असतानाच त्याने चिकन सूप विथ बार्ली (१९५८) हे आपले पहिले नाटक लिहिले. हे नाटक ‘वेस्कर ट्रिलॉजी’ ह्या नावाने ओळखल्या जाणार्या तीन नाटकांपैकी एक होते. रूट्‌स (१९५९) आणि आय ॲम टॉकिंग अबाउट जेरूसलेम (१९६०) ही ह्या नाट्यत्रयीपैकी अन्य दोन नाटके. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी आणि नंतरच्या काळात, एका कम्युनिस्ट कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे वैफल्य ह्यांचे चित्रण ह्या नाट्यत्रयीत केलेले आहे. ह्या कुटुंबातील सारा आणि हॅरी हे आईवडील स्थलांतर करून इंग्लंडमध्ये आलेले ज्यू आहेत आणि लंडनच्या ईस्ट एंड ह्या भागात राहतात. क्रांतिकारक कम्युनिस्ट विचारसरणी साराच्या मनात पक्की रुजलेली आहे. तिचा नवरा हॅरी हा मात्र त्याबाबतीत काहीसा उदासीन वृत्तीचा आहे. ॲडा आणि रॉनी ह्या आपल्या मुलांवर ती कम्युनिस्ट विचारांचे संस्कार करते परंतु ही मुलेही आपल्या वडिलांप्रमाणेच कम्युनिस्ट विचारसरणीबाबत उदासीन बनतात. ॲडा एका तरुण कम्युनिस्टाबरोबर विवाह करते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ती दोघे इंग्लंडमध्ये कोठेतरी आदर्श जीवन जगण्याच्या उद्देशाने लंडन सोडतात. हंगेरीतील उठाव सोव्हिएट रशियाकडून चिरडला गेल्यानंतर रॉनीचा कम्युनिस्ट विचारसरणीबद्दल भ्रमनिरास होतो. हॅरी हा सततच्या आजारीपणामुळे अपंग बनतो आणि उदासीनतेचे टोक गाठतो. सारा मात्र आपल्या पक्षाविषयीच्या निष्ठा सोडत नाही.

वेस्करच्या अन्य नाटकांत द किचन (१९५९), चिप्‌स विथ एव्ह्‌रिथिंग (१९६२), द ओल्ड वन्‌स (१९७२), द वेडिंग फीस्ट (१९७४), द मर्चंट (१९७८) ह्यांचा समावेश होतो. ह्यांखेरीज जर्नलिस्ट ह्या नावाचे एक नाटकही त्याने लिहिले परंतु ते रंगभूमीवर आले नाही. द किचन ह्या नाटकात वरवर पाहता, लंडनमधील एका हॉटेलातील स्वयंपाकघरातला एक दिवस कसा जातो, तेथे काय काय घडते ह्यांचे चित्रण आहे. तथापि ह्या घटनांच्या आधारे त्या हॉटेलाबाहेरील व्यापक जगातील वास्तव समोर आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. चिप्‌स विथ एव्ह्‌रिथिंगमध्ये माणसांच्या एका मर्यादित गटात काही कारणाने अलग पडलेल्या एका तरुणाचे चित्रण आहे. ब्रिटनच्या ‘रॉयल एअर फोर्स’ राष्ट्रीय सेवेत वेस्करने दोन वर्षे काढली होती. तेथील अनुभव ही ह्या नाटकाची कच्ची सामग्री. धर्मावर विश्वास नसलेल्या काही ज्यूंच्या गटाभोवती द ओल्ड वन्‌स ह्या नाटकातील प्रसंग गुंफले आहेत तर द वेडिंग फीस्ट ही नाट्यकृती विख्यात रशियन सहित्यिक ⇨फ्यॉडर डॉस्टोव्हस्की ह्याच्या एका कथेवर आधारित आहे. द मर्चंट हे नाटक म्हणजे शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस ह्या नाटकाची वेस्करने आपल्या पद्धतीने केलेली पुनर्निर्मिती आहे. व्हेनिसमध्ये आणि एकंदरीतच यूरोपमध्ये आढळून येणारी ज्यूविरोधी भावना, ही ह्या नाटकामागील प्रेरणा होती. वेस्करची आरंभीची नाटके नाटककार म्हणून त्याचे सामर्थ्य विशेष प्रभावीपणे दाखवून देतात.

संदर्भ : 1. Hayman, R. Arnold Wesker, London, 1979.

            2. Leeming, G. Trussler, S. The Plays of Arnold Wesker, London, 1971.

 कुलकर्णी , अ. र.